मंगळवार, २ जुलै, २०१९

अंतराळातही भारताचा दबदबा!

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉


      सध्याचे युग हे विज्ञानाचे आहे. युद्ध झाले, तर ते जमिनीपेक्षा आवकाशातूनच होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे देशाच्या जमिनीवरील सीमा आणि समुद्रातील सुरक्षा मजबूत करीत असतानाच अंतराळातील सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देशाला मजबूत करण्यासाठी भारताने तयारीला सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात ए सॅट क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली होती. या महिन्यात पहिल्यांदाच भारत आभासी अंतराळ युद्धाभ्यास करणार आहे. भारताच्या या नव्या योजनेला इंडोस्पेसएक्स असे नाव देण्यात आले आहे. याबरोबरच भारताने स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करण्याची योजना आखली आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प गगनयान मोहिमेचाच विस्तार असणार आहे. याच महिन्यात १५ जुलैला चांद्रयान-२ श्रीहरीकोटाहून रवाना करण्यात येणार आहे.
        २०२१ मध्ये सूर्याच्या अभ्यासासाठी इस्रोचे मिशन आदित्य सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर २०२३ पर्यंत शुक्र ग्रहापर्यंत पोहचण्याचं इस्रोचं उद्दिष्ट आहे. चांद्रयान-२ मोहिमेची तारीख जाहीर केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतासमोर आणखी एक स्वप्न मांडले. भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक असावे, हे ते स्वप्न होय. २०२९ पर्यंत भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करण्याचे उद्दिष्ट ’इस्रो’ने ठेवले आहे. अमेरिका आणि रशियाने उभारलेल्या अंतराळ स्थानकात युरोपीय महासंघ आणि जपानचाही सहभाग आहे. चीनचे तिआनगग-२ अंतराळ स्थानक स्वतंत्रपणे काम करीत आहे. या पार्शवभूमीवर अन्य देशांच्या सहकार्याने अंतराळ स्थानक न उभारता भारत स्वत:चे स्थानक उभारण्याची घोषणा करतो, याकडे जगाने डोळे विस्ङ्गारून पाहणे साहजिकच आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्यानंतर अधिक संख्येने मानवाला अंतराळात पाठविणे भारताला शक्य होईल. आयएसएस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा भारत हा भागीदार बनणार नाही, तर स्वत:चे स्थानक उभारेल. हा प्रकल्प गगनयान योजनेचाच विस्तारित प्रकल्प असणार आहे. गगनयान ही मानवयुक्त अंतराळ मोहीम २०२२ मध्ये प्रस्तावित आहे. तर त्यानंतर सात वर्षांनी भारताचे अंतराळ स्थानक कार्यरत होईल, अशी सध्याची योजना आहे. गगनयान मोहिमेद्वारे मानवयुक्त अंतराळ यान पाठविणे एवढेच भारताचे मर्यादित उद्दिष्ट असणार नाही, तर एकदा मानवयुक्त मोहीम ङ्गत्ते झाली, की अशा मोहिमा वारंवार आखून अंतराळाची अधिकाधिक रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाणार आहे. तसेच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे उद्दिष्ट आतापर्यंत आपल्या नागरिकांना विविध सुविधांचा लाभ देण्यापर्यंतच मर्यादित राहिले आहे. भारतीय मच्छीमार असोत वा शेतकरी असोत, त्यांना अंतराश संशोधन कार्यक्रमातून मोठा लाभ झाला आहे. एवढेच नव्हे, तर तुम्ही-आम्ही आज एटीएममधून पैसे काढू शकतो, ते याच संशोधन कार्यक्रमाच्या आणि भारताने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांच्या आधारावर, हेही विसरुन चालणार नाही.
     भारताचे अंतराळ स्थानक छोटे असेल आणि त्याचा वापर मायक्रोग्रॅव्हिटी विषयावरील प्रयोगांसाठी केला जाईल. भारताच्या अंतराळ स्थानकाचे वजन सुमारे वीस टन असण्याची शक्यता आहे. अंतराळ स्थानकाची रचना करताना अंतराळ पर्यटनाचा विचार ’इस्रो’ने केलेला नाही. २०२२ मध्ये गगनयान मोहीम पूर्ण झाल्यानंतर अंतराळ स्थानकाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. स्थानकाच्या उभारणीसाठी पाच ते सात वर्षांचा कालावधी लागणार आहे. अंतराळ स्थानक म्हणजे एक अंतराळ यानच (स्पेस क्राफ्ट) असते आणि चालक समूहाच्या राहण्याची व्यवस्था त्यात असते. अंतराळात प्रदीर्घ काळ मुक्काम करता येईल, अशा रीतीने त्याचे डिझाइन तयार केले जाते. अंतराळ स्थानकाला आणखी एक अंतराळ यान जोडले जाऊ शकते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सध्या जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे. पृथ्वीच्या अगदी जवळच्या कक्षेतून भ्रमण करणारे हे स्थानक नुसत्या डोळ्यांनीही स्पष्टपणे दिसू शकते. भारतीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून चारशे किलोमीटरवर प्रस्थापित केले जाईल. अंतराळवीर या स्थानकात पंधरा ते वीस दिवस राहू शकतील.
      अंतराळवीरांना एका स्पेस क्राफ्टमधून दुस-या स्पेस क्राफ्टमध्ये पाठविता यावे, अशा तंत्रज्ञानावर ’इस्रो’ काम करीत असला तरी या मोहिमेचा उद्देश अंतराळ यानांमध्ये इंधन भरण्याची सुविधा निर्माण करणे हाच आहे. अंतराळात यापूर्वी पाठविलेल्या यानांनी दीर्घ काळ सेवेत राहावे, यासाठी ही तरतूद आहे. याखेरीज अंतराळ संशोधनासाठी उपयुक्त उपकरणेही पृथ्वीवरून पाठविता यावीत, हाही एक उद्देश आहे. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास भारतीय अंतराळ स्थानक हे मानवयुक्त यानाप्रमाणेच असेल. यामुळे भारताची पृथ्वीसह अंतराळात टेहळणी करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढेल. जीएसएलव्ही रॉकेटचा वापर अंतराळ स्थानक तयार करण्यासाठी केला जाईल. हे रॉकिट पृथ्वीच्या सर्वात जवळच्या कक्षेत दहा टन इतके वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त अंतराळ स्थानकात कॅमेरे लावता येतात आणि त्याद्वारे उत्कृष्ट गुणवत्तेची छायाचित्रे प्राप्त करता येतात. भारत आपल्या शत्रूवर बारीक नजर ठेवू शकेल. पूर्वी सोडलेल्या उपग्रहांत इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वारंवार नवे उपग्रह सोडण्यावर येणारा खर्चही वाचेल. अंतराळ स्थानक एखाद्या प्रयोगशाळेप्रमाणे काम करते. गेल्या काही वर्षात ’इस्रो’ने लागोपाठ यशस्वीरीत्या उपग्रहांचे प्रक्षेपण करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळेच अंतराळ स्थानकाचे स्वप्न ’इस्रो’ नक्कीच पूर्ण करेल, याची खात्री पटते.
    अंतराळात शत्रूचा उपग्रह नष्ट करण्याची क्षमता असो वा टेहळणी करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता असो, अशा सर्वच बाबतीत  ’इस्रो’चे शास्त्रज्ञ गाजावाजा न करता ज्या वेगाने काम करीत आहेत, ते प्रशंसनीय आहे. अमेरिकेने अंतरिक्ष युद्धाची शक्यता गृहीत धरून या युद्धासाठी लष्कराची वेगळी तुकडी तयार करण्याचीही तयारी चालविली आहे. कारण, भविष्यातील युद्धे तंत्रज्ञानावर आधारित असतील, आपण ही क्षमता वेळेत विकसित केली नाही, तर आपण या दृष्टीने खूप पिछाडीवर राहू शकतो. अशा परिस्थितीत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भारत जो इंडोस्पेसएक्स  या नावाने आभासी अंतराळ युद्धाभ्यास करणार आहे, त्याचे महत्व लक्षात येते. ही एकप्रकाराची स्पर्धा आहे जी सिम्युलेटरचा वापर करून कंप्युटरद्वारे खेळली जाणार. त्यात लष्करी आणि वैज्ञानिक समुदायातले सर्व भागधारक सहभागी होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड डिङ्गेन्स स्टाङ्ग याच्या अधीन हा युद्धाभ्यास असणार आहे. यात हवाईदल, नौदल, भूदलाचे अधिकारी सहभागी असणार आहेत.  या अभ्यासाचा मुख्य उद्देश म्हणजे आपली राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे होय. तचेस अंतराळात काउंटर स्पेच क्षमतेचे मोजमाप करणे हे होय, यामुळे आपल्या सशस्त्र दलाची विश्वासार्हता वाढणार आहे तसेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होणार आहे. इंडोस्पेसएक्समुळे अंतराळातील आव्हाने समजून घेण्यात मदत मिळणार आहे.
     भारत मागील बर्‍याच वर्षांपासून अंतराळ तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करीत आहे. आजवर चीनने दळणवळण, पृथ्वीनिरीक्षण अशा विविध शंभर उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे; भारत त्याबाबतीत चीनच्या पिछाडीवर आहे. चीनने त्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला (समुद्रात एका जहाजावरून ७ सॅटेलाइट लॉंच)  ६ जून रोजी  लॉंच केले आहे. भारत सध्या अन्य काउंटर-स्पेस क्षमतेला विकसीत करण्यासाठी काम करीत आहे.  भारताने ‘मिशन शक्ती’द्वारे २७ मार्चला पृथ्वीच्या कक्षेत २८३ किमी उंचीवरील ७४० किलोग्रामच्या मायक्रो-आर उपग्रहाला नष्ट करणारे १९ टन वजनाचे इंटरस्पेस-एक्स मिसाईल लॉन्च केले होते. यामुळे भारताची अंतराळ महाशक्ती म्हणून नोंद झाली आणि भारत अशी क्षमता प्राप्त करणारा जगातील चौथा देश बनला. यापूर्वी अमेरिका, रशिया, चीनने ही क्षमता प्राप्त केली होती. अशाप्रकारे या क्षेत्रातील भरारीसाठी भारताची सिद्धता झाली आहे, तथापि भारताला अंतराळात विरोधकांची टेहळणी, दळणवळण, क्षेपणास्त्रांचा पूर्व इशारा आणि अचूक लक्ष्यवेध यात नैपुण्य मिळविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत इंडोस्पेसएक्स आपल्याला अंतराळातील रणनीतीक आव्हाने योग्यरित्या उमगण्यास मदतगार ठरणार आहे. भविष्यात ज्याच्या ताफ्यात अंतराळ युद्ध जिंकण्याचे ब्रम्हास्त्र असेल तोच जगावर राज्य करणार आहे, हे यातून लक्षात येते.
      भविष्यात युद्ध पारंपरिक युद्धांपेक्षा वेगळी अंतराळ सामर्थ्यावरअवलंबून असणार आहेत. त्यादृष्टीने भारताची भक्कम पावले पडत आहेत. अंतराळ आणि त्याच्याशी निगडित तंत्रज्ञानाबाबतीत भारत स्पेस इंडस्ट्रीमध्ये जगातील काही निवडक देशाच्या दबदब्याला आव्हान देत आहे. ए सॅट क्षेपणास्त्रांच्या क्षमतेचे प्रदर्शन आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार्‍या आभासी अंतराळ युद्धाभ्यासाने  हे आव्हान अधिकच कडवे बनले आहे. २०१८ मध्ये स्पेस इंडस्ट्रीचा आकार ३६० अब्ज डॉलर्सचा होता, तो २०२६ मध्ये ५५८ अब्ज डॉलर्सचा होईल. भारताची स्पेस मोहीम चालवणारी सरकारी संस्था इस्रोचा जवळजवळ ३३ देशांच्या बहुराष्ट्रीय संस्थांबरोबर स्पेस प्रोजेक्टबाबत करार आहे आणि ती जगभरच्या अंतराळ मोहिमांसाठी लॉंचपॅड उपलब्ध करुन देणारी संस्था ठरली आहे. इस्रोची ही यशाची उंचावती कमान भारतीय संरक्षणसिद्धतेसाठी पुरक ठरत आली आहे. अंतराळ संरक्षण सिद्धता हवाईदल इस्रोच्याच सहकार्याने करणार आहे. जल, जमिनीवरील संरक्षण सिद्धता कधीच झाली आहे. अंतराळातही भारताचा दबदबा वाढत आहे. त्यामुळे यापुढे भारताकडे वाकडे डोळे करुन पाहण्याची कोणाचीच हिम्मत होणार नाही, हे नक्की!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा