मंगळवार, २३ जुलै, २०१९

गधड्यांनो, अलिबागच्या कुचेष्ठेला तुम्ही विनोद कसे समजता?

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       उच्च न्यायालयाने अलिबागकरांची याचिका फेटाळल्याने काहीजणांना हर्षोन्माद झाला आहे. काही चक्क अलिबागकरांविरुद्ध लेखण्या सरसावून बसले आहेत. पण उच्च न्यायालयापर्यंत अलिबागकरांच्या तीव्र भावना न पोहचल्यानेच त्यांना न्याय मिळाला नाही, हे स्पष्ट आहे. अलिबागकरांवर जो लेकी बोले सुने लागे या पद्धतीने जो विनोद केला जातो, तो वास्तवात विनोद नसून अलिबागकरांची कुचेष्टा आहे, हे समजाविण्यात आणि समजून घेण्यात दोन्ही बाजू कमी पडल्या आहेत हे स्पष्ट आहे. न्यायालयाला विनोद आणि कुचेष्टा यामध्ये एक सीमारेषा असते याची जाणीव नसेल असे कसे म्हणता येईल. तरीही अलिबागकरांना वाटाण्याच्या अक्षता न्यायालयाने लावल्या आहेत. यासाठी प्रचलित विनोदांची उदाहणे दिली. त्याच्याशी अलिबागकरांचा काही संबंध नाही. अलिबागकरांचेही विनोदाशी काही वाकडे नाही. अलिबागकरांना निखळ विनोद समजतो आणि त्याला ते दादही देतात. पण अलिबागकरांना विनोदाच्या नावावर टार्गेट केले जाते, तो कोणत्याही ऍगलने विनोद वाटत नाही, तर त्यातून अलिबागकरांची कुचेष्टा, अवमान दिसून येते. त्या वाक्यात कोणता विनोद दडला आहे, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, न्यायालयाला त्यात विनोद दिसला हाच एक मोठा विनोद आहे. 
       अलिबागकर समजूतदार आहेत, संयमी आहेत, तसेच पराक्रमीही आहेत. त्यांनी आतापर्यंत समजूतदारपणा आणि संयम दाखवला, म्हणूनच न्यायासाठी आधी न्यायालयात धाव घेतली. पण आता घाव घालण्याची वेळ आली आहे. अलिबागकरांची तथाकथित विनोदाचा आस्वाद घेऊन कोणी कुचेष्टा केली तर त्याला अलिबागकरांचा पराक्रमही पहायला मिळेल. अलिबागकर कोणत्याही जाती धर्माचे असले तरी एक अलिबागकर म्हणून ते वाढले आहेत, अलिबागकर म्हणून अन्यायाविरुद्ध एकत्र होतात. आम्हा अलिबागकरांची विनाकारण विनोदाच्या नावावर कुचेष्ठा केली तर त्यांना अलिबागी हिसका दाखवायलाच लागेल. त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील. अलिबागकरांच्या नावाने कुचेष्ठा करण्याएवजी स्वत:च्या घरी असा तथाकथित विनोद निपजून तरी पहा, कसं वाटतंय?
         अलिबागवर निसर्गसौंदर्याची पखरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेल्या मिश्रदुर्ग कुलाब्याची श्रीमंती अलिबागला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची सावली, नव्हे आशीर्वाद अलिबागवर आहे. अलिबागवर अगदी महात्मा गांधी, सानेगुरुजी, देशातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी, तसेच अनेक थोरांनी प्रेम केले आणि आजचे अलिबागबाहेरचे चोर अलिबागकरांची कुचेष्ठा करत आहेत. या मातीने जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या रुपाने देशाला लष्कर प्रमुख दिले, अनेक संत, कलाकार, लेखक, राजकारणी, समाजकारणी दिले. अलिबाग आणि अलिबागकर समृद्ध आहेत. पर्यटकांना येथील निसर्ग व येथील माणसेही आवडत असताना विनोदाच्या नावावर अलिबागकरांचा कुचेष्ठा करुन त्यांचे भान का सुटावे, याचे आश्चर्य वाटते.
      कोण एक कादरखान आपल्या चित्रपटात अलिबागबद्दल एक वाक्य काय टाकतो, सवंग विनोदाच्या नावावर त्याचा बाजार करणे सुरु झाले. कादरखानच्या वेळी अलिबागकरांना त्याचे गांभीर्य वाटले नाही. तो विषय तिथेच संपला असता तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. आज कोणीही लल्लूपंजू चित्रपट, मालिकांत, नाटकांत अलिबागची बदनामी विनोदाच्या नावावर बेछूट करतो. या बिनबापाच्या अवलादींना अलिबागकर समजले असते तर अलिबागची त्यांनी आपल्या तथाकथित विनोदाने बदनामी केली नसती.  मठ्ठांनो, तो विनोद नाही, ती कुचेष्ठा आहे. ही कुचेष्ठा न्यायालय संपवणार नसेल तर अलिबागकरांनाच ती संपवावी लागणार आहे. मग अलिबागकरांच्या या न्याय्य लढ्यात कोणी बरोबर नाही आलं तरी चालेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा