सोमवार, २७ मे, २०१९

लष्करात महिलांचा टक्का वाढतोय!

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉  


      निमलष्करी दलाच्या तुलनेत लष्करामध्ये महिलांची संख्या खूपच कमी होती. लष्करामध्ये विविध अधिकारी पदांसाठी महिलांची निवड केली जाते, पण त्यांना आजही प्रत्यक्ष युद्धात थेट लढण्याची परवानगी नाही. निमलष्करी दलात मात्र महिलांना प्रत्यक्ष कारवाईत भाग घेता येतो. निमलष्करी दलात सध्या ९ लाख सैनिक असून त्यात २० हजार महिला आहेत, तर लष्करात (तिन्ही दल) १४ लाख सैनिकांत ३६६० महिला आहेत. (या आकडेवारीत आता फरक झालेला असू शकतो.) निमलष्करी दलाच्या तुलनेने महिलांची संख्या कमीच आहे, पण इतर देशांच्या लष्करांतील महिलांच्या तुलनेतही भारतीय लष्करातील महिलांची संख्या ङ्गारच कमी आहे. संरक्षण मंत्रालयाने ही संख्या वाढवायचे ठरवले असून त्यादृष्टीने  वुमेन मिलिटरी पोलीस (महिला लष्कर पोलीस) भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यातूनच पुढे महिलांना  प्रत्यक्ष रणभूमीवर पाठवण्याची शक्यता तपासण्यात येणार आहे. एक मात्र खरे आहे, ते म्हणजे लष्करातील महिलांचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे.
      भारतीय लष्करात महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे आणि महत्वाच्या मोहिमांत त्यांची नगण्य भूमिका असते. त्यामुळे लष्करात महिलांचे प्रमाण वाढवावे आणि महत्वाच्या मोहिमांत त्यांना विशेष जबाबदारी द्यावी, अशी मागणी गेल्या काही काळापासून केली जात होती. भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिलांना सेनादलात प्रवेश देण्याबाबत प्रयत्न सुरु केले होते. सरंक्षण मंत्री निर्मला सीतारमण  यांनीही या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत महिलांना लष्करात जवान म्हणून संधी देण्यासंदर्भातील घोषणा जानेवारी महिन्यात केली होती. त्यावेळी त्यांनी मिलिट्री पोलीस दलात २० टक्क्यांपर्यंत महिलांचा सहभाग असेल, असे सांगितले होते. त्यानुसार संरक्षण मंत्रालयाने वुमेन मिलिटरी पोलीस (महिला लष्कर पोलीस)  या पदासाठीच्या भरती प्रक्रिया २५ एप्रिल  २०१९ पासून सुरू केली आहे.  ८ जून २०१९ पर्यंत महिलांना लष्कराच्या वेबसाईटवर आपला अर्ज भरता येणार आहे. सध्या १०० पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. साधारण ८०० महिलांची मिलिट्री पोलीस या पदावर नियुक्ती केली जाणार आहे, यामध्ये प्रत्येक वर्षाला ५२ महिलांची निवड होईल.
     आजवर लष्करात महिलांची नियुक्ती केवळ अधिकारी पदावर केली जात होती. एज्युकेशन, लॉ, लॉजिस्टिक्स, इंजिनीअरिंग, एअर डिङ्गेन्स आर्टिलरी अशा विभागांमध्येच महिलांना संधी होती. मात्र आता सशस्त्र दलात वुमेन मिलिटरी पोलीस (महिला लष्कर पोलीस)  म्हणून महिलांची नियुक्ती होणार आहे. निवड झालेल्या महिला जवानांवर निर्वासितांचे व्यवस्थापन, युद्धसदृश परिस्थितीत सीमेलगतच्या नागरिकांच्या स्थलांतराची गरज असल्यास या स्थलांतरात पोलिस प्रशासनाला मदत, नाकाबंदीच्या वेळी महिलांची तपासणी किंवा झडती, चोरी, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचा तपास, युद्धछावण्यांचे व्यवस्थापन, कार्यक्रमप्रसंगी लष्करी शिस्तपालन आणि लष्कराला पोलिसांची मदत आवश्यक असल्यास अशा प्रकारच्या मोहिमांवर जाणे, आदी जबाबदार्‍या सोपवल्या जाणार आहेत.
      भारत स्वतंत्र होण्याआधीपासून लष्कर आहे. ब्रिटिश राजवटीत तिला ‘ब्रिटिश इंडियन आर्मी’ म्हटले जायचे. १८९० च्या सुमारास ‘इंडियन मिलीटरी नर्सिंग सर्व्हिस’ सुरू झाली. त्यात महिलांचा सहभाग होता. पहिल्या महायुद्धात (१९१४-१९१८) आणि दुसर्‍या महायुद्ध (१९३९-१९४५) जवळपास ३००-३५० ब्रिटिश इंडियन आर्मी नर्सेस होत्या. पहिल्यांदा १९९२ मध्ये भारतीय लष्कराध्ये महिला ऑङ्गिसर या नॉन मेडिकल रोल्समध्ये भरती करण्यात आल्या. परंतु जवळजवळ तीन दशकांनंतरही लष्करातील त्यांची संख्या पाहिल्यास आश्चर्य वाटते. सध्या १४ लाख सशस्त्र दलांच्या ६५ हजार अधिकार्‍यांच्या ङ्गौजेत हवाईदलात १६१०, भूदलात १५६१ व नौदलात ४८९ महिला आहेत. विशेष म्हणजे भारतीय लष्करामध्ये शॉर्ट सर्विस कमिशनच्या माध्यमातून महिलांना भरती केलं जायचं. एसएससीमधून भरती झालेल्या अधिकार्‍यांना ङ्गक्त १४ वर्षेच सेवा करता येत होती. पण त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लागू होत नव्हती कारण आपल्याकडे २० वर्षे बजावल्याशिवाय पेन्शन लागू होत नाही. १४ वर्षे सेवा बजावल्यानंतर महिलांच वय ४० किंवा त्यापेक्षा जास्त व्हायचं. मग चाळीशीनंतर रोजगार मिळणार कुठे? असा प्रश्न निर्माण व्हायचा.महिला अधिकार्‍यांना ङ्गक्त एज्युकेशन आणि लॉ या दोनच विभागात स्थायी कमिशन लागू होते. यावर्षी मार्च २०१९ ला संरक्षण मंत्रालयाने शॉर्ट सेवा कमीशन संदर्भात भारतीय लष्करात सेवेत असणार्‍या सर्व महिलांना स्थायी कमीशन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता स्थायी कमिशनमुळे महिलांना निवृत्तीपर्यंत लष्करात काम करता येणार आहे. त्यांना पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. तसेच त्या आपल्या मर्जीने नोकरी सोडू शकणार आहेत.
     युद्ध मोहिमांबाबत बोलायचे झाले तर जगातील अनेक समृद्ध देशांत युद्ध मोहिमांतही महिलांचा चांगल्याप्रकारे सहभाग असतो. अमेरिकेत न्युक्लियर मिसाइल सबमरीन्सवरही  महिलांची नियुक्ती होते आणि मलेशिया, श्रीलंका, बांग्लादेश सारखे देश युद्धात आपल्या महिला सैनिकांना सहभागी करतात. परंतु आपल्या येथे युद्ध मोहिमांपासून महिलांना दूर ठेवले जाते. येथे तिन्ही दलांमध्ये महिलांना सध्या ङ्गक्त अधिकारी पदावर, शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये सामावून घेतले जात आहे. भूदलात एज्युकेशन, लॉ, लॉजिस्टिक्स, इंजिनीअरिंग, एअर डिङ्गेन्स आर्टिलरी आदी विभागांमध्ये महिलांचा समावेश आहे. केवळ पायदळ (इन्फंट्री) आणि रणगाडे (आर्मर्ड कोर) यांमध्ये महिला नाहीत. हवाई दलामध्ये ग्राउंड ड्यूटीज, टेक्निकल ब्रँच तसेच फ्लाइंग ब्रँचच्या ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टर विभागामध्ये महिला अधिकारी सेवा बजावत आहेत.  प्रायोगिक पातळीवर त्याना लढाऊ जेट विमाने उडविण्याची परवानगी मिळाली आहे. हवाई दलात यावेळी जवळजवळ शंभर महिला पायलट आहेत, परंतु युद्धक्षेत्रात सबमरीन आणि संकटग्रस्त विभागांत त्यांच्या नियुक्तीची अजूनही कोणतीही तरतूद नाही.
     जर परदेशी लष्कराच्या तुलनेत भारतीय लष्करात महिलांच्या प्रतिनिधीत्वाबाबत बोलायचे झाले तर आपण याबाबत खूप मागे आहोत. तथापि आता लष्करात महिलांचं प्रतिनिधीत्व २० टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. परदेशी लष्करातील महिलांच्या संख्येवर नजर टाकली तर चिनी लष्करात जवळजवळ साडेतीन लाख महिला सौनिक आहेत, त्यातील दीड लाख महिला सशस्त्र दलांचा भाग आहेत. अमेरिकेच्या लष्करात जवळपास दोन लाख महिला सैनिक आहेत. चार वर्षांपूर्वी तेथील लष्करात महिलांना युद्धात सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे. फ्रान्समध्येही कॉम्बॅट विंगमध्ये महिला आहेत. इस्रायलमध्ये १९८५ पासून लढाऊ विभागात महिलांना संधी मिळाली. विशेष म्हणजे, प्रत्येक महिलेला दोन वर्षे लष्करी सेवा बजावण्याची सक्ती आहे. या महिला सैनिक जगातील सर्वात खतरनाक महिला सैनिक समजल्या जातात. तेथील लष्करात पुरुष आणि महिलांची संख्या जवळपास सारखीच आहे. कॅनडात पाणबुडीतील लढाऊ जबाबदार्‍या वगळता अन्य सर्व लढाऊ विभागांमध्ये महिला आहे. १९८९ पासून महिलांच्या समावेशास सुरुवात झालेल्या कॅनडाच्या लष्करात १५ टक्के महिला आहेत. डेन्मार्कमध्ये १९८९ पासून, तर नॉर्वेमध्ये १९८५ पासून, जर्मनीमध्ये २००१, न्यूझीलंडमध्ये २००१ पासून तर ऑस्ट्रेलियामध्ये २०११ पासून महिलांना सर्व विभागांमध्ये घेतले जाऊ लागले.  जपानी लष्करात पाच टक्के महिला आहेत. रशियन लष्करातही जवळपास दोन लाख महिला सैनिक आहेत. या देशांव्यतिरिक्त ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, आणि चेक गणराज्य, पोलंड, पाकिस्तान, रोमानिया आदींमध्येही महिला लष्कराचा भाग बनून लढाऊ आणि प्रशासकीय दोन्ही प्रकारच्या भूमिका चांगल्याप्रकारे बजावत आहेत.
    भारतीय लष्करात महिलांची संख्या मर्यादित राहण्यास आणि त्यांना सैनिक म्हणून नियुक्त न केले जाण्यास आपली पुरुषी मानसिकता कारणीभूत आहेच, पण इतर देशांशी तुलना करताना तेथील संस्कृती आणि आपल्याकडील संस्कृती यात जमीन-अस्मानाचा ङ्गरक आहे, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. तेथे लष्करात लिंगभेद मोडीत काढलेला असतो, आपल्या येथे तसे होणे शक्य नाही. आपल्याकडे महिला युद्धस्थळी असतील, तर त्यांची राहण्याची, प्रसाधनाची वेगळी सुविधा करावी लागेल. त्यांचे लक्ष शत्रूवर केंद्रित न होता, लज्जारक्षणाकडे लागून राहील. युद्धकाळात कसेही राहावे लागते, कुठेही झोपावे लागते, कुटुंबापासून दूर राहावे लागते, कधी कधी तर शत्रूच्या विळख्यात अडकल्यावरही तग धरून राहावे लागते. या सर्व गोष्टी महिला करू शकणार नाहीत, असे नाही, ङ्गक्त त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून युद्धजन्य परिस्थिती वगळता इतर पदांवर महिलांना नियुक्त केले जाते.
     लष्कराच्या २२ विभागांपैकी एज्युकेशन, लॉ, इंजिनीअरिंग, इंटेलिजन्स आदी २० विभागांमध्ये महिलांचा समावेश आहे. त्यांच्या कामगिरीबाबत वादच नाही. अनेक कठीण जबाबदार्‍याही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सक्षम नाहीत, म्हणून संधी नाही, असे मुळीच नाही. केवळ पायदळ आणि रणगाड्यांमध्ये सध्या त्यांचा समावेश नाही, मात्र त्यातही महिलांना संधी देता येऊ शकेल का, यावर विचार सुरू आहे. त्याला काही वेळ लागेल, पण त्याचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालयाने वुमेन मिलिटरी पोलीस (महिला लष्कर पोलीस)  म्हणून भूदलात महिलांचा टक्का वाढवायचा ठरवले आहे. कारण महिला कुठेही कमी पडणार नाही, कारण आपल्याकडे महिलांनी रणांगणावर कर्तृत्व गाजवल्याची भारतीय इतिहासातली उदाहरणं प्रसिद्ध आहेत. मर्दानी झाशीवाली म्हणून प्रसिद्ध झालेली झाशीची राणी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पलटणीचं बिरूद बनून गेली. राणी झाशी रेजिमेंट, तिची कॅप्टन लक्ष्मी आणि या पलटणीतल्या रणरागिणी यांची नावं इतिहासात कोरली गेलीत. महिलांविना आझाद हिंद फौज अपुरी असेल, असं सुभाषबाबू म्हणाले होते. त्याचं स्मरण ठेवून पुढे युद्धभूमीतही महिलांना संधी दिली जाईल आणि त्या तेथे आपली कर्तबगारी गाजवताना दिसतील, यात शंका नाही.

सोमवार, २० मे, २०१९

बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या अस्तित्वाचे आव्हान

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉


     दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) आणि एमटीएनएल (महानगर टेलिङ्गोन निगम लिमिटेड) या सरकारी कंपन्या असल्याने त्यांची झेप मोठी असणे आवश्यक होते, परंतु आज या कंपन्यांची अवस्था पंख कापलेल्या गरुडाप्रमाणे झाली आहे. याला कारणे अनेक आहेत. राजकीय अतिरेकी हस्तक्षेप, ढासळेले व्यवस्थापन आणि ग्राहकसेवेबाबत अनास्था ही तर ठळक कारणे आहेतच, पण या क्षेत्रातील प्रचंड स्पर्धेने बीएसएनएल आणि एमटीएनएलला तोट्याच्या गर्तेत नेले आहे. यामुळे या कंपन्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. नवे येणारे सरकार या दोन कंपन्यांना न्याय देते की खाजगी कंपन्यांचे चांगभले करते हे लवकरच दिसून येईल. तूर्तास दोन्ही कंपन्यांचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचार्‍यांना बळीचा बकरा बनवायची योजना आकार घेत आहे, तिचा कितपत उपयोग होईल, हेही भविष्यात दिसून येईल.  
      भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पूर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते यांच्या एकत्रीकरणातून दूरसंचार विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. या दूरसंचार विभागाचे १ ऑक्टोबर २००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रूपांतर झाले. मन जोडणारी माणसे असे सांगत देशभरात संवादाचे जाळे विणणा-या या बीएसएनएलच्या सेवेकडे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्रामस्थांचे सुसंवादाचे हक्काचे माध्यम म्हणूनच त्याकडे पाहिले गेले. संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न यामुळे साहजिकच विशेषत: ग्रामीण भागामध्ये ग्रामस्थांच्या दृष्टीने संवाद माध्यम म्हणून बीएसएनएलकडे आपलेपणाने पाहिले जात होते; परंतु कालप्रवाहात आणि स्पर्धेत बीएसएनएल ज्या प्रकारे स्पर्धा करण्यासाठी सज्ज असायला हवे होते, तसे घडले नाही. ग्राहकांवर आपण मेहरबानीच करत आहोत. अशा भावनेतून दूरसंचार विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा नेहमीच वावर राहिला. त्यात भरीस भर म्हणजे सरकारी उदासिनता आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे या कंपनीला दोन तपे पूर्ण होण्याआधीच घरघर लागली आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही सरकारी कंपन्या प्रचंड तोट्यात आहेत. त्या कधीही बंद होऊ शकतील अशी परिस्थिती आहे. या कंपन्यांचे नशीब आता नवे सरकारच ठरवणार आहे.
      केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या दोन्ही कंपन्यांच्या पुनरुज्जीवन योजनांचे प्रस्ताव पुनर्तपासणीसाठी दूरसंचार विभागाकडे माघारी पाठवले आहेत. तपासणीनंतर हे प्रस्ताव पुन्हा सादर होतील तेव्हा केंद्रात नवे सरकार असेल. डिपार्टमेंट ऑङ्ग टेलिकम्युनिकेशन्स (डीओटी) विभागाने मागील महिन्यातच बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी उपक्रमांच्या पुनरुज्जीवन योजनेचे प्लॅन अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावांना उत्तर देताना त्यांची ङ्गेरतपासणी करून पुन्हा सादर करण्यास सांगितले आहे. नव्या प्रस्तावात पुनरुज्जीवन योजनांवर किती खर्च होईल आणि पुनरुज्जीवन कशा प्रकारे होईल याचा तपशीलवार खुलासा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मागवून घेतला आहे. दोन्ही कंपन्यांच्या पुनरुज्जीवन योजनांमध्ये कर्मचार्‍यांच्या स्वेच्छानिवृत्ती आणि ङ्गोरजी स्पेक्ट्रम वितरण, हे दोन कळीचे मुद्दे आहेत. दोन्ही मुद्द्यांसाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. तसेच दोन्ही कंपन्यांच्या संपत्तीचे पैशात रूपांतर करण्याचा मुद्दा देखील प्रमुख आहे. कारण दोन्ही कंपन्या दूरसंचार विभाकडून स्वतंत्र केल्या असल्या तरी या दोन्ही कंपन्यांच्या मालकीची जमीन आणि इमारती मात्र अजूनही दूरसंचार विभागाकडेच आहेत.
      ङ्गायद्यात चालणारे बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्या तोट्यात जाण्यास या दूरसंचार क्षेत्रातील गळेकापू स्पर्धा, सरकारी उदासिनता, अतिरेकी राजकीय हस्तक्षेप, गलथान व्यवस्थापन आदी कारणे आहेत. बीएसएनएलवर १४,००० कोटींचे कर्ज असून २०१७-१८ मध्ये या कंपनीला ३१,२८७ कोटींचे नुकसान झाले होते. सध्या या कंपनीत १.७६ लाख कर्मचारी असून एक वर्षात या कर्मचार्‍यांच्या वेतनावर ६० टक्के रक्कम खर्च होते. एमटीएनएलमध्ये २२,००० कर्मचारी असून या कंपनीवर १९,००० कोटींचे कर्ज आहे. ९० टक्के रक्कम या कंपनीतील कर्मचार्‍यांच्या वेतनावर खर्च होते. ही बाब लक्षात घेऊन स्वेच्छानिवृत्ती आणि सेवानिवृत्ती या दोन योजना राबवून कर्मचार्‍यांची संख्या मर्यादित करण्यात येणार आहे. त्यासाठी तोट्याच्या गाळात अडकलेल्या दोन्ही कंपन्यांना ७ हजार कोटी रुपयांच्या सरकारी पॅकेजची प्रतिक्षा आहे. असे पॅकेज मिळाल्यास या दोन्ही कंपन्या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकतील असे संबंधितांना वाटते. बीएसएनएलच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी ६५०० ची, तर एमटीएनएलच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी २१२० कोटींची आवश्यकता आहे. त्याअंतर्गत बीएसएनएलचे ७५ हजार कर्मचारी आणि एमटीएनएलचे १६ हजार कर्मचारी स्वेच्छानिवृत्तीच्या कक्षेत येणार आहेत. तसेच सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरुन ५८ करण्यात येणार आहे. या स्वेच्छा आणि सेवानिवृत्तीच्या वयाच्या विरोधात कर्मचार्‍यांनी देशभर आंदोलने केली आहेत. पण हे उपाय करुन बीएसएनएल आणि एमटीएनएलची परिस्थिती सुधारणार आहे का असा प्रश्न उरतोच. कारण सरकारची धोरणे खाजगी ऑपरेटर्सना मोकळे रान ठेवण्याचीच आहेत. तसे नसते तर बीएसएनएलचा दबदबा आजही कायम असता. बीएसएनएलचे नेटवर्क देशभर पसरलेले आहे. आजही खाजगी दूरसंचार ऑपरेटर आपला कारभार बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मदतीनेचे पुढे रेटत असतात, कारण त्यांचे स्वत:चे नेटवर्क खूप कमी आहे. असे खाजगी दूरसंचार ऑपरेटर्स ५ जी सेवा आणण्याच्या तयारीत आहेत आणि  बीएसएनएल आणि एमटीएनएलची सरकारी कृपेने ४ जी सेवाही सुरु नाही. खाजगी ऑपरेटर्ससाठी सरकारी आशीर्वादाने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मुस्क्या आवळल्या आहेत. अशा परिस्थितीत वरवरच्या सुधारणा करुन या दोन कंपन्यांची परिस्थिती सुधारणार नाही. मुळात उपाय सरकारी मानसिकतेवर केला पाहिजे. पण तो करणार कोण?
     बीएसएनएल आणि एमटीएनएलचे कर्ज खाजगी क्षेत्राच्या आस्थापनांच्या तुलनेत ङ्गारच कमी आहे आणि त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता आहे. दोन्ही कंपन्यांकडे देशभर जवळ जवळ ७५०० स्थावर मालमत्ता आहेत. त्यांची किंमत जवळपास सत्तर हजार कोटी आहे. कंपन्यांचा प्रस्ताव जमिनी भाड्याने देऊन महसूल मिळवण्याचा आहे. म्हणूनच बीएसएनएल आणि एमटीएनएल देशभरातील आपली जमीन सार्वजनिक क्षेत्रातील इतर अस्थापनांना भाड्याने देण्याची योजना आखत आहे. दोन्ही कंपन्यांनी ग्राहकांना चांगला पर्याय उपलब्ध व्हावा आणि चांगली सेवा उपलब्ध करता यावी यासाठी ४ जी सेवेची मागणी केली आहे. तसेच दोन्ही कंपन्या संकटातून बाहेर पडण्याचा विलिनीकरण हा देखील एक उपाय असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही कंपन्या एकत्र झाल्यास एका मजबूत दूरसंचार विभागाची निर्मिती होईल आणि संकट दूर होण्याबरोबरच व्यवसायही प्रगतीपथावर राहील, असे कर्मचार्‍यांना वाटते आहे. असे असले तरी बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी आपल्या ग्राहकांचा विश्वास या दोन दशकात कमावला नाही.
      सरकारी पातळीवरुन या दोन कंपन्यांची गळचेपी होत असताना अधिकारी आणि कर्मचारी आपल्या ग्राहकांची गळचेपी करीत राहिले. आज या दोन्ही कंपन्या ग्राहकांना समाधानकारक सेवा देत नाही. त्यांची उत्पादनेही खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत कमी पडतात. ऑनलाईन सेवा देण्याबाबतही या कंपन्या मागास ठरल्या आहेत. याच कारणामुळे मोठ्या संख्येत ग्राहक खाजगी कंपन्यांकडे वळले आहेत. महसूल वाढविण्यासाठी बीएसएनएल आणि एमटीएनएल ब्रॉडबँड आणि ङ्गायबर टू होमचा विस्तार करण्याची आवश्यकता होती. परंतु असं झालं नाही. या उद्योगातून प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांचा नङ्गा झाला असता, परंतु दोनही कंपन्यांनी योजनाबद्धरित्या काम केले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तोटा वाढत गेला. आता सरकार बीएसएनएल आणि एमटीएनएलवर आणि बीएसएनएल आणि एमटीएनएल सरकारवर आपल्या अपयशाचे खापर ङ्गोडेल. यशात सर्व भागिदार होतात, पण अपयशात कोणी सहभागी होत नाही. आज तशी अवस्था सरकार आणि बीएसएनएल आणि एमटीएनएलची झाली आहे. दोघांच्याही चुका या चांगल्या सेवेला चाप लावणार्‍या ठरल्या आहेत. त्यामुळे येणार्‍या सरकारने आता कोणतीही नाटके न करता या दोन्ही सरकारी कंपन्यांचे पुनरुज्जीवन केले पाहिजे. खाजगी कंपन्यांच्या तुलनेत तत्पर सेवा आणि स्वस्त, विनम्र सेवा मिळाली आणि सरकारने, संबंधित मंत्र्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्या कंपन्यांना वेठीस धरले नाही, तर बीएसएनएल आणि एमटीएनएल तोट्यात जाण्याचे कारणच उरणार नाही.

सोमवार, १३ मे, २०१९

सर्वोच्च न्यायालयाचा रिझर्व्ह बँकेवर अंकुश!

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉

   
    सर्वसामान्य शेतकरी काही हजारांचे कर्ज घेतो आणि ते चुकवू शकला नाही तर त्याची मालमत्ता लगेच जप्त केली जाते. इथे उद्योजक करोडो रुपयांची कर्जे घेतात, औद्योगिक साम्राज्य उभारतात आणि सर्रास कर्ज बुडवतात आणि जागल्या म्हणून काम करणारी रिझर्व्ह बँक हातावर हात धरून बसून राहते. यावेळी  सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी आदेश देऊनही गोपनीयतेचे कारण देत बँकांचा वार्षिक परीक्षण अहवाल व कर्जबुडव्यांची यादी जाहीर न करणार्‍या रिझर्व्ह बँकेला न्यायालयाने झटका देत या दोन्ही बाबी उघड करण्याचा आदेश दिला. त्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती व देशातील कर्जबुडव्यांची सर्व माहिती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
        बँकांकडून घेतलेली कर्जे जाणूनबुजून परत न करणार्‍या अनेक कर्जदारांविरुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून देशातील विविध न्यायालयांमध्ये खटले सुरू आहेत. अशा कर्जदारांची नावे उघड केली जावीत, अशी मागणी होत असतानाच रिझर्व्ह बँक आणि व्यापारी बँका मात्र अनेक कायद्यांचा हवाला देत नावे उघड करण्यास टाळाटाळ करीत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते एस सी. अग्रवाल यांनी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज करीत, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, एचडीएङ्ग व स्टेट बँक ऑङ्ग इंडियाच्या एप्रिल, २०११ पासून डिसेंबर, २०१५ पर्यंतचा तपासणी अहवालाची प्रत मागितली होती. रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी देशातील सर्व बँकांची आर्थिक स्थिती अभ्यासण्यासाठी अंतर्गत परीक्षण केले जाते. यावरून संबंधित बँकांची आर्थिक स्थिती समजते. मात्र हा अर्ज ङ्गेटाळत रिझर्व्ह बँकेने अशी माहिती देण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. माहिती अधिकार कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेला ही माहिती नाकारता येत नाही, हा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला असून, त्यानुसार या कर्जदारांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता वाढली आहे. जाणूनबुजून कर्जाची परतङ्गेड न करणार्‍यांना विलङ्गुल डिङ्गॉल्टर्स’ या नावाने ओळखले जाते. न्यायालयाने म्हटले आहे की, बँकांच्या संदर्भात जो वार्षिक तपासणी अहवाल रिझर्व्ह बँकेकडून तयार केला जातो, तो माहितीच्या अधिकारांतर्गत सार्वजनिक केला पाहिजे. या तपासणी अहवालात बँकांच्या एनपीए ग्राहकांच्या नावांसमवेत त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या अनेक घोटाळ्यांचा पर्दाङ्गाश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
      केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी डिसेंबर २०१५ पर्यंतची आकडेवारी राज्यसभेत सादर करून असे म्हटले होते की, ’कर्ज घेऊन जाणूनबुजून ते परत न करणार्‍या प्रमुख व्यक्ती आणि कंपन्यांकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची १ लाख २१ हजार ८३२ कोटी रुपये येणे बाकी आहे.’ अशी ङ्गसवणूक करणार्‍यांची संख्या त्यावेळी ५५५४ होती. ती वाढून आता ७६८६ इतकी झाली आहे. बँकांनी ज्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले आहेत, अशांची संख्या सुमारे ९००० आहे. एका माहितीनुसार, असे ११ उद्योगसमूह आहेत, ज्यांच्याकडून १००० कोटींपेक्षाही अधिक थकबाकी आहे. या केवळ ११ कंपन्यांचे एनपीए २६००० कोटींच्या वर पोहोचले आहेत. देशाच्या आर्थिक क्षेत्राच्या संरक्षणासाठी, वाणिज्यविषयक गोपनीयता आणि विश्वासात्मक माहिती असल्याने ही यादी सार्वजनिक करता येणार नाही. याचप्रमाणे आरबीआय कायदा १९३४ च्या कलम ४५-ई नुसार क्रेडिट संदर्भातील माहिती उघड करता येत नाही, असा असा दावा रिझर्व्ह बँक आतापर्यंत करीत होती. आता न्यायालयाने याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच आपल्या आदेशाची अवहेलना झाल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने ज्याअंतर्गत बँकांशी निगडीत घोटाळ्यांची माहिती उघड करता येत नाही अशी धोरणे संपविण्याचा सल्लाही दिला आहे.
     व्याजासह परतङ्गेड होऊ शकत नसेल, तर त्याला कर्ज कशाला म्हणायचे, हाच प्रश्‍न आहे. परंतु उद्योग जगतातील बडे कर्जदार सार्वजनिक बँकांचे व्याज तर सोडाच; पण मुद्दलदेखील परत करण्यास टाळाटाळ करीत आहेत. बँकांचा व्यवसाय कर्जाऊ दिलेल्या रकमेवरील व्याजावर चालतो, हे वास्तव सर्वांना चांगले ठाऊकसुद्धा आहे. कर्जदाराने बँकांच्या कर्जाचे मुद्दल आणि व्याजच परत दिले नाही, तर बँकांचा व्यवसाय चालणार तरी कसा? बँका आपले व्यावसायिक उद्दिष्ट कशा गाठू शकणार? यासंदर्भात परिस्थिती इतकी बिकट आहे की, देशभरातील बँकांचा एनपीए आता ७ लाख ३४ हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. यापैकी तब्बल ७७ टक्के एनपीए सरकारी बँकांचा आहे. स्टेट बँक ऑङ्ग इंडिया १.९९ लाख कोटी, पंजाब नॅशनल बँक ५७ हजार ६३० कोटी, बँक ऑङ्ग इंडिया ४९ हजार ३०७ कोटी, बँक ऑङ्ग बडोदा ४६ हजार ३०७ कोटी, कॅनरा बँक ३९ हजार १६४ कोटी आणि युनियन बँक ३८ हजार २८६ कोटी. हे ठळक आकडेच मती गुंग करीत आहेत.
     सुमारे वर्षभरापासून कर्जाचे हप्ते न भरणार्‍या कंपन्यांची संख्या सुमारे ११०० आहे. बँका आणि सरकार कर्जाऊ दिलेल्या रकमेच्या वसुलीसाठी कोणतेही ठोस प्रयत्न करीत नसल्यामुळे अशीही शंका उपस्थित केली जात आहे की, सरकार आणि बँका संगनमत करून नागरिकांच्या कष्टाच्या कमाईचे जे पैसे बँकांमध्ये ठेवले जातात, ते लुबाडण्याची खुली सूट कॉर्पोरेट घराण्यांना देत आहेत. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणेज सर्वाधिक म्हणजेच ५१ टक्के कर्ज इस्पात, कपडा, विमान, खनन, ऊर्जा आदी उद्योगांनी घेतलेले आहे. बँक आणि सरकार या कर्जदारांच्या नावाची अधिकृत यादीही सार्वजनिक करीत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. कर्जबुडव्या उद्योगपतींची नावे गुलदस्त्यात आहेत. याबाबत उद्योगपतींचा युक्तीवाद आहे की उद्योगांनी कर्ज घेऊन जी गुंतवणूक केली आहे, ती अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे ङ्गायदेशीर ठरली नाही.
       कर्जात बुडालेल्या ११२९ कंपन्या अशा आहेत, ज्यांच्यावरील कर्ज सातत्याने वाढत आहे. त्यातील ३११ कंपन्यांनी २ बँकांकडून, २८५ कंपन्यांनी ३ बँकांकड़ून, २९७ कंपन्यांनी ४ बँकांकडून, ३ कंपन्यांनी ६ बँकांकडून, ४ कंपन्यांनी ७ बँकांकडून, ४ कंपन्यांनी ८ बँकांकडून, तर २ कंपन्यांनी ९ बँकांकडून कर्जे घेतली आहेत. या वाढत्या एनपीएच्या समस्येमुळे बँकांचा महसूल आणि नव्या शाखाविस्तारावर प्रचंड प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे बँक सुरळीत चालणार्‍या प्रकल्पांना नवे कर्जही देऊ शकत नाही. यामुळे या प्रकल्प आणि उद्योगांचं उत्पादन मर्यादित झालं आहे, त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. जर हेच कर्जदार लघु, मध्यम व्यावसायिक अथवा शेतकरी असते तर त्यांच्या संपत्तीवर टाच आली असती. तथापि, जर कोणी कर्जाचे तीन महिने हप्ते भरले नाही, तर त्याला दोषी श्रेणीत टाकण्याचे रिझर्व्ह बँकेचे नियम असले तरी एनपीएच्या दरोडेखोरांनी हप्ते ङ्गेडले नाहीतच, उलट अनेक बँकांतून पुन्हा कर्ज घेण्यात ते यशस्वीही झाले. विजय मल्ल्या, निरव मोदी, मेहुल चोक्सी आणि ललित मोदी याची प्रमुख उदाहरणे आहेत.
        देशातील बँकांमधील जमा रक्कम सुमारे ८० लाख कोटी इतकी आहे. त्यातील ७५ टक्के रक्कम छोटी बचत करणार्‍या नागरिकांची आणि सर्वसामान्य नागरिकांची आहे. कायद्याने या रक्कमेवर नियंत्रण सरकारचे हवे, कारण गरजू शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि लघु व मध्यम व्यावसायिकांच्या भांडवली गरजा पूर्ण व्हाव्यात, परंतु दुर्दैवाने तसे होत नाही. ही रक्कम मोठ्या औद्योगिक घराण्यांकडे गेली आहे आणि ती त्यांनी दाबूनच ठेवली नाही तर देशा-विदेशात मौजमजाही करीत आहेत, तर दुसरीकडे धान्य उत्पादक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ज्यावेळी कैंद्रात संपुआचे मनमोहन सरकार होते आणि अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र सादर केले जात होते, त्याच वेळी तत्कालिन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एक निखळ सत्याचा परिचय करुन देत म्हटले होते की, गरीब कर्जदारांमुळे कधीही बँकांचं हजोरो कोटी रुपयांचं तसं नुकसान झालं नाही, जे नुकतच किंगङ्गिशर एअरलाईन्सच्या डिङ्गॉल्टरमुळे झालं आहे. ही घटना अपवाद नाही. असे अनेक डिङ्गॉल्टर आहेत. त्याचवेळी चिदंबरम यांनी वित्तीय संस्थांना सल्ला देताना म्हटले होते की, भारतात गरीब हे वाईट कर्जदार अजिबात नाहीत. ते प्रामाणिक आहेत. गरीब नैतिक दृष्टीने मजबूत आणि पारंपरिक ज्ञानाने समृद्ध आहेत, म्हणून त्यांना अधिक कर्ज देण्याची गरज आहे.
         असे असूनही औद्योगिक घराण्यांना सहजपणे हजारो कोटींचे कर्ज मिळते, तर छोट्या कर्जदारांना बँकांमध्ये अनेक ङ्गेर्‍या माराव्या लागतात. विसंगती अशीही आहे की उद्योगांसाठी कमी व्याजदरावर कर्ज मिळते. या अडचणीमुळे लघु व मध्यम उद्योग-व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरु करणे अवघड बनते. घरासाठी कर्ज घेणेही कठीण असते. याच कारणामुळे सामान्य माणसे नङ्गेखोरांच्या सापळ्यात अडकतात. अशा विषम अडचणीमुळे मायक्रो ङ्गायनान्सचा धंदा संपूर्ण देशात पसरला आहे. ते ३० टक्के या उच्च वार्षिक व्याजदरावर गरीब आणि मध्यम वर्गाच्या लोकांना कर्ज देतात. हे कर्ज असं दुष्टचक्र असते की त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही. अनेक कर्जदारांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नाही. या वास्तवाने लक्षात येते की बँकींग क्षेत्र कमकुवत वर्गाचा आधार बनण्याच अपयशी ठरलं आहे.  या उलट याच बँका श्रीमंत वर्गाच्या सुख-सुविधा वाढविणे, औद्योगिक क्षेत्रासाठी आर्थिक स्त्रोत सुरु ठेवणे आणि अव्यवस्थेमुळे बुडणार्‍या उद्योगांना तारणे यासाठीचं माध्यम बनल्या आहेत.  कर्ज व्याजासहित परत न मिळण्याचा परिणाम नव्या आणि अपूर्ण प्रकल्पांवरही पडला आहे. वास्तविक कर्जाच्या स्वरूपात दिलेली रक्कम परत मिळाली, तरच या प्रकल्पांमध्ये नव्याने गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. एनपीएच्या समस्येकडे धोरणात्मक दृष्टिकोनातूनही पाहिले जाणे गरजेचे आहे. भारतात एखाद्या कंपनीला दिवाळखोर जाहीर करणे आणि कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे. नियमांमधील शिथिलतेमुळेच न्यायालयांसमोर दिवाळखोर जाहीर करण्याची आणि संपत्तीचा लिलाव करण्याची ६० हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळेच हे नियमसुद्धा चेक बाउन्स’च्या नियमांप्रमाणे कठोर केले जाण्याची गरज आहे.
       या दृष्टीने आणखीही एक दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. एका बँकेकडून एकाच कंपनीला आणि एकाच कंपनीसमूहाला कर्ज देण्याची मर्यादाही निश्‍चित करायला हवी. सध्याच्या नियमांनुसार, बँक आपल्या एकूण भांडवलाच्या २५ टक्के रक्कम एकाच कंपनीला किंवा ५५ टक्के रक्कम एकाच कंपनीसमूहाला कर्जाऊ देऊ शकते. हाच नियम बँक अधिकार्‍यांना उदारपणे एखाद्या कंपनीला झुकते माप देण्यास भाग पाडतो. बँकांमधील गैरव्यवहारसुद्धा अशा नियमांमुळेच वाढीस लागल्याचे दिसते. बँक व्यवस्थापनाची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी तसेच कर्जाची परतङ्गेड न करणार्‍यांना दोषी व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी कायदेशीर तरतुदी करणेही गरजेचे आहे. बँकांकडे आपणच कर्जाऊ दिलेल्या रकमेची परतङ्गेड होण्यासाठी वसुलीची पर्याप्त प्रणाली अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न विचारण्याची वेळ न्यायालयावर आली, ती त्यामुळेच! आता कर्जाऊ रक्कम घेऊन जाणीवपूर्वक परतङ्गेड टाळणार्‍यांची नावे जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कदाचित वसुलीची प्रक्रिया सुधारेल, अशी चिन्हे आहेत. बघुया आता काय होतेय ते, रिझर्व्ह बँक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कसा आणि किती सन्मान करते ते. तसे झाले नाही तर सर्वोच्च न्यायालय याबाबतची गंभीर दखल कशी घेते आणि बँकाना पाठिशी घालणार्‍या सरकारची कशी भूमिका असेल तेच आता पहायचे.

सोमवार, ६ मे, २०१९

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाला, पण...

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉


        भारतासह जगातील अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरलेला जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत सातत्यानं प्रयत्न करत आला होता. भारताला फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने पाठिंबा देखील दिला. पण, चीनने मात्र सातत्याने नकाराधिकार वापरल्याने भारताच्या प्रयत्नांना खीळ बसली होती. पण, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत अझहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ म्हणून घोषित करण्यासाठी पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरला. शिवाय, चीनचे मन वळवण्याकरता ङ्ग्रान्स, अमेरिका आणि  ब्रिटनने  देखील प्रयत्न केले. परिणामी  मसूद अझहर याला अखेर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बुधवार, १ मे रोजी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. पण त्याच्यावर आणि त्याला आश्रय देणार्‍यांवर ठोस कारवाई होईल, तेव्हाच या प्रक्रियेला अर्थ असणार आहे. 
      संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेला मसूद अझहर हा पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चा अत्यंत खास म्हणून मानला जातो. पाकिस्तानच्या बहावलपूर येथे जुलै १९६८ मध्ये जन्मलेल्या मसूदचे वडील सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. मसूद अझरचे शिक्षण कराची येथील जमिया उलूम अल इस्लामिया येथे झाले. हरकत-उल-अंसर या संघटनेच्या मार्ङ्गत त्याने दहशतवादी कारवाया करण्यास प्रारंभ केला होता. १९९४ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे या संघटनेचा आणि मसूदचा प्रामुख्याने हात होता. त्यावेळी पहिल्यांदा त्याला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली होती. मसूदच्या सुटकेसाठी दहशतवादी संघटनांनी वेळोवेळी प्रयत्न केले होते. १९९९ मध्ये कोट बलवाल येथील तुरुंगात त्याच्या सुटकेसाठी बोगदा खणण्यात आला होता. मात्र मसूदच्या बोजड शरीरामुळे त्याला तेथून पलायन करणे शक्य झाले नाही. या प्रयत्नात त्याचा साथीदार सज्जद अङ्गगाणी ठार झाला होता. अखेर नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्ली येथे जात असलेल्या विमानाचे दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण केले. त्यात १८० प्रवासी होते. या प्रवाशांच्या सुटकेसाठी तत्कालीन भाजपप्रणीत रालोआ सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. सुटकेनंतर त्याने पाकिस्तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेची स्थापना २००० मध्ये केली. या संघटनेने २००१ मध्ये भारताच्या संसदेवर १३ डिसेंबरला हल्ला केला होता.
      १९९८ ला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा  ’अल कायदा १२६७’ हा एक ठराव अस्तित्वात आला. अल कायदा त्यावेळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना होती. अल कायदाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी हा ठराव आणण्यात आला होता. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांतर्ङ्गे अशा पद्धतीची घोषणा करण्यास सुरुवात झाली होती. १९९८ पासून आजतागायत या ठरावानुसार २०० संघटनांना दहशतवादी म्हणून घोषित केले गेले. यापैकी ८० संघटना या पाकिस्तानच्या आहेत. आज जरी मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले तरी जैश-ए-मोहम्मद संघटनेला २००१ मध्येच दहशतवादी संघटना घोषित केले होते. या संघटनेला ओसामा बिन लादेनची आर्थिक मदत असल्याचे त्या वेळी राष्ट्रसंघाने म्हटले होते. २६-११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अझहरचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, यासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरू केले होते. या कामी संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेच्या सर्व देशांचे मन वळविण्यात भारताला यश आले होते. मात्र, चीन सातत्यानं यात खोडा घालत होता.
      मसूदला दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव गेल्या दहा वर्षांत चारवेळा संयुक्त राष्ट्रसंघापुढे ठेवण्यात आला होता. मात्र, भारतावर राजकीय कुरघोडी करण्यासाठी व पाकिस्तानला चुचकारण्यासाठी चीननं चारही वेळा नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव हाणून पाडला. चीनच्या या भूमिकेनंतरही भारताने प्रयत्न सुरूच ठेवले होते. अनेक मार्गांनी चीनवर दबाव वाढवण्यात येत होता. अमेरिका, ङ्ग्रान्स व ब्रिटननेही चीनवर दबाव वाढवला होता. श्रीलंकेतील भयंकर आत्मघाती स्ङ्गोटांनंतर दहशतवादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. चीन अथवा जो कोणी देश मसूदला आंतरराष्ट्रीय  दहशतवादी मानण्याच्या विरुद्ध आहे, त्यांनी याची कारणे जगासमोर मांडावित, असे ङ्ग्रान्सने चीनला सांगितले. अशाच प्रकारचा दबाव अमेरिका, ब्रिटननेही टाकल्यामुळे चीन नरमला. आतापर्यंत चीनचं म्हणणे होते की, भारताने ज्याप्रकारे दलाई लामांना आपल्या येथे आश्रय दिला आहे, त्याप्रकारे पाकिस्तानही मसूद अझहरला आपल्या येथे आश्रय देऊन कोणतेही चुकीचे काम करत नाही. चीनचे काहीही म्हणणे असले तरी दलाई लामा एक सज्जन व्यक्ती आहेत, तर मसूद अझहर एक दहशतवादी आहे, हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे चीनची पाकिस्तानची पाठराखण बिनबुडाची ठरली.
    मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे आता मसूदचे काय केले जाणार हा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी असलेल्या व्यक्तीची संपत्ती तत्काळ जप्त केली जाते. याचा अर्थ मसूदची जगभरात जी संपत्ती आहे ती आता जप्त करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे अशा व्यक्तीला तसेच त्याच्याशी संबंधितांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळणार नाही, याची काळजी घेतली जाते. सध्या मसूद पाकिस्तानात खुलेआम आर्थिक मदत गोळा करतो. आता त्याला अटकाव बसेल. याचा एक भाग म्हणून पाकिस्तानने मसूद अजहरच्या मालमत्ता जप्त केल्या असून त्याचावर प्रवास बंदी देखील घातली आहे. शिवाय, शस्त्रास्त्र खरेदी आणि विक्रीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्याला अन्य घटकांकडून आर्थिक मदत होणार नाही, याचीही काळजीही आता पाकिस्तानला घ्यावी लागणार आहे. आजपर्यंत मसूद मोकाटपणे पाकिस्तानात ङ्गिरत होता आणि भारताविरद्ध भाषणे देत होता. आता मात्र या सर्व कारवायांना पाकिस्तानला लगाम घालावा लागणार आहे. अर्थात वरवर तरी पाकिस्तान सध्या आपण तेच करत असल्याचे आशावादी चित्र उभे करत आहे. पण खरा प्रश्न आहे तो मसूदला पाकिस्तान अटक करणार का? त्याबाबत संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद काय कारवाई करणार? पाकिस्तानचा आधीचा इतिहास पाहिला तर दहशतवादाला खतपाणी घालण्याशिवाय त्याने काही केले नाही. त्यामुळे पाकिस्तान जी कारवाई करीत आहे, त्याकडे गाङ्गिलपणे नाही, तर सावधपणे पाहणे गरजेचे आहे.
        मसूद अझहरच्या बाबतीत भारताच्या या यशस्वी प्रयत्नामागे गेल्या तीन-चार वर्षांत कुटनीतिक पातळीवर मोदी सरकारचा पुढाकार राहिला आहे. यामुळे पाक पुरस्कृत दहशतवादाबाबत जगातील शक्तीशाली देशांचे मत बदलले आहे. सर्व देश पाकिस्तानच्या कारवायांमुळे त्रस्त झाले आहेत. यात अमेरिका सर्वांत पुढे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर म्हटले आहे की, पाकिस्तान आम्हाला ङ्गसवत आला आहे, याच ङ्गसवणुकीमुळे त्याने आमच्याकडून ३० ते ३५ अब्ज डॉलर खाल्ले आहेत. त्याच्या कारवायांवर आम्ही विश्वास ठेऊ शकत नाही. अमेरिकेनेच इतर देशांवरही दबाव टाकला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत १५ सदस्य देश आहेत. त्यात पाच स्थायी देश आहेत, तर दहा अस्थायी आहेत. आता जे सदस्य देश आहेत, त्यांच्याबरोबर अमेरिकेने कुटनीतिक पुढाकार घेतला असेल, त्यामुळे १४ देश मसूद अझहरला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या बाजून उभे राहिले.
     कोणत्या कारणामुळे चीन मसूदला दहशतवादी मानत नाही, ते सिद्ध करा, असा चीनवर दबाव ङ्ग्रान्स, अमेरिका, ब्रिटनने निर्माण झाला. अशा परिस्थितीत त्याला जगासमोर झुकावेच लागले, याचे कारण तो हादरला आहे. याशिवाय भारताचा कुटनीतिक पुढाकारही मजबूत आहे. परराष्ट्र सचिन विजय गोखले नुकतेच बीजिंगला गेले होते. त्यांचा हा दौरा आपण मसूदबाबत चीनला समजावण्याचा प्रयत्न करीत आहोत, हे दाखवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग होता. चीन मसूदबाबत अडथळा आणणार नाही याबाबत आपल्या परराष्ट्र मंत्रालयाला विश्वास वाटत होता. चीनकडे जरी नकाराधिकार वापरण्याची अजून एक संधी असली तरी डोकलाम व इतर काही मुद्द्यांवर शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली आहे, ती दूर करण्याची ही एक संधी म्हणून चीन याकडे पाहू शकतो. तथापि काही लोकांचं म्हणणं आहे की, मसूद अझहरच्या विरुद्ध संयुक्त राष्ट्राच्या यादीत पुलवामा हल्ला व काश्मीरमधील जैश पुरस्कृत दहशतवादाला सामील करण्यात आलेलं नाही. आपण लक्षात घेतले पाहिजे की, कोणत्याही एका बाबतीत कोणाला आंतरराष्ट्रीय दहशतावादी घोषित करता येऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्रात मसूद अझहरचा मुद्दा २००९ पासून होता. त्याने आपल्या संसदेवर हल्ला करविला, पठाणकोट आणि अङ्गगाणीस्तानमध्ये भारतीय दुतावासावर हल्ले करविले. मध्येच त्याच्याकडे पाकिस्तान पाठ ङ्गिरवली होती, परंतु दोघांचे परत मनोमीलन झाले. पाकिस्तान जगतयच दहशतवादावर, त्यामुळे मनोमीलनाशिवाय पाकिस्तानकडे दुसरा पर्याय नसतो.
    संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने मसूद विरोधात पाऊल उचलले आहे, परंतु त्याचा पाठपुरावा करणे हे आता येणार्‍या सरकारची जबाबदारी आहे. मसूद अझहर दीर्घकाळ रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात राहिला तर पाकिस्तानला पुन्हा उघडे पाडावे लागणार आहे. ज्याला आंतरराष्ट्री दहशतवादी घोषित करण्यात आले आहे, तो मसूद अझहर पाकिस्तानी लष्कराच्या मांडीवर खेळत आहे, हे चित्र  भारताने जगाला दाखवावे लागेल. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल गङ्गूर यांनी म्हटले आहे की, त्यांनी दहशतवाद्यांविरद्ध अतिशय कठोर पावले उचलली आहेत. कोणती गंभीर पावले ते गङ्गूर यांनाच माहीत. परंतु जे मोठे दहशतवादी गट आहेत, त्यांच्यावर अजूनही बंदी घालण्यात आलेली नाही की त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत भारताने जागतिक समुदायाकडे पाकिस्तानवर अंकुश ठेवण्याची मागणी केली पाहिजे, कारण मसूद पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात आहे, हे सिद्ध झाले आहे.
पहिले काम हे झालं पाहिजे की, पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना अमेरिकी व्हीजा दिला जाऊ नये. कारण अधिकांश लष्करी अधिकार्‍यांची मुले तेथेच शिक्षण घेतात. याशिवाय जोपर्यंत पाकिस्तान दहशतावाद्यांना अंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊन अंतरराष्ट्रीय गुन्हे कायद्यानुसार शिक्षा देववित नाही, तोपर्यंत त्याला आयएमएङ्गकडून कर्ज दिले जाऊ नये, असा दबाव टाकला पाहिजे.
      चीननेही हे लक्षात घेतले पाहिजे की, तो जरी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असला तरी तो जर पाकिस्तानला याप्रकारे सहकार्य करीत राहिला, तर भारत त्याच्या सर्व गुंतवणुकीला थांबवेल आणि चीनकडून आयातित वस्तूंवरही बंदी घालेल. याबरोबरच भारत-पाकिस्तान अथवा काश्मीर प्रश्नाबाबत चीनने हस्तक्षेप केला तर भारत चीनवर नाराज असलेल्या देशांना संरक्षण तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यास उशीर करणार नाही. भारताने चीनविरुद्ध वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. चीन हा काही भावनेवर चालणारा देश नाही, तो व्यावहारिक आहे आणि भारत ही त्याच्यासाठी मोठी बाजारपेठ आहे ती तो सहजासहजी हातातून जावू देणार नाही. त्यामानाने पाकिस्तानी बाजारपेठ नगण्य असल्यामुळे भविष्यातही चीनला भारताबरोबर ङ्गार ताणता येणार नाही. त्याला ङ्गक्त चिंता आहे ती पाकिस्तानात सुरु असलेल्या त्याच्या प्रकल्पाची आणि कामगारांची, म्हणूनच तो पाकिस्तानबाबत ठोस भूमिका घ्यायला कचरत होता. अखेर त्याला मसूदबाबत ठोस भूमिका घ्यायला लागलीच, हा पाकिस्तानला झटका असला तरी त्याने भारताने हुरळून जाण्याचे कारण नाही. पाकिस्तान हा दहशतवादाचा आणि दहशतवाद्यांचा कारखाना आहे, हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यात आल्याने भारताची दहशतवादाविरुद्धची लढाई संपलेली नाही. पाकिस्तानने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय ट्रिब्युनलच्या ताब्यात द्यावे किंवा त्याला शिक्षा देता यावी म्हणून भारताच्या ताब्यात द्यावे,  असा पाकिस्तानवर दबाव टाकावा यासाठी आपल्याला जगातील देशांना प्रवृत्त करावे लागेल. दहशतवाद एका रात्रीत संपणार नाही, की एका दहशतवाद्याला संपवून संपणार नाही. ती एक प्रवृत्ती आहे, ती पाकिस्तानी लष्करात आणि पाकिस्तानी राजकारणात भिनली आहे. त्यामुळे हा दहशतवाद न संपणारा आहे हेही तितकेच खरे आहे.