मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

सावधान! रिलायन्सची गॅस पाईपलाईन पेटलेय!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉ 


    रिलायन्स गॅस पाईप प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी  कामगार पक्ष, शिवसेना, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप बहुजन महासंघ, भारतीय कम्युनिष्ट पक्ष आणि भाजपा, रिलायन्स, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार एकमेकांविरुद्ध अंगाला तेल लावून रिंगणात उतरले आहेत. निमित्त ठरले रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी भूसंपादनचे उप जिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना मारहाण केल्याच्या घटनेचे. ही मारहाण निषेधार्हच आहे, पण आमदार सुरेश लाड यांच्यासारखा मवाळ माणूस असे जहाल पाऊल उचलतो, यातून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे, असेही रिलायन्सच्या विरोधातील काही पक्ष बोलत असले आणि रिलायन्सच्याच विरोधातील काही पक्षांना याप्रकरणी आमदार सुरेश लाड यांचा शेतकरीप्रेमाचा कळवळा खोटा आहे असे वाटत असले तरी रायगड जिल्ह्यातील जनता मात्र खुश आहे. एक मात्र खरे आहे की रिलायन्स मात्र कसलेल्या मल्लाप्रमाणे शड्डू ठोकत आहे. तिला सत्ता आणि संपत्तीची साथ आहे. ही साथ आजची नाही, फार पूर्वीपासूनची आहे. त्यामुळे तिच्यामध्ये ‘मी करेन ती पूर्व दिशा’ हा जो माजोरी अहंकार आला, त्यातूनच संघर्षाची ठिणगी पडली आहे आणि याचा वणवा केव्हाही पसरु शकतो.
     रायगड जिल्ह्याला एकेकाळी भाताचे कोठार समजले जायचे, अगदी पाठ्यपुस्तकांतही तोच उल्लेख असायचा. काळ बदलला, कृषी उत्पादन आणि कृषी क्षेत्राने देशाचा विकास होऊ शकत नाही, असा शोध कोणा मूर्खाने लावला, त्याचे परिणाम रायगड जिल्ह्यालाही भोगायला लागले. या जिल्ह्यात नद्या आणि समुद्र यांच्या कुशीत, हीच कुशी दुषित करण्यासाठी रासायनिक कारखानदारी वाढली. येथील जमीन, येथील पाणी आपल्या रासायनिक कचर्‍याने दुषित करुन येथील भूमिपुत्रांची निसर्गाधारित उपजीविका या कंपन्यांनी मोडित काढली. येथील काहीजण लंगोटीतून सुटाबुटात आले, हे खरे असले तरी बाहेरुन सुटाबुटांतून आलेले सरंजामशहा झाले, त्यामुळे स्थानिकांचा खराखुरा विकास झालाच नाही, येथील जल-जमीन आणि माणसांचा मात्र सत्यानाश झाला. रायगड जिल्ह्यात अडीचशेहून अधिक कारखाने आहेत. याचबरोबर विविध नवे प्रकल्प येऊ घातले आहेत. या सर्वांमुळे रायगड जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा अशी नवी ओळख मिळाली आहे. रायगड जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा अशी ओळख मिळाली, पण ती शेतकर्‍यांच्या पिकत्या शेतजमिनीच्या बदल्यात. पिकत्या जमिनीच्या बदल्यात विकास, याचे समर्थन करता येणार नाही. पण तसे रायगड जिल्ह्यात घडले होते, घडत आहेे. अशा परिस्थितीत रिलायन्ससारख्या बलाढ्य कंपन्यांच्या आसुरी इच्छा जाग्या झाल्या. महामुंबई सेझच्या नावावर या जिल्ह्यात सोन्याची नांगरणी करण्याचा आव आणत रिलायन्सचा बुलडोझर फिरू लागल्यावर मात्र येथील जनतेला जाग आली आणि तिने महामुंबई सेझ  पळवून लावला. पण हा सेझ केव्हाही डोके वर काढू शकतो. लढाई संपलेली नाही. आता मात्र रायगडकरांना नव्याच लढाईला तोंड द्यावे लागत आहे. ही लढाई लाड विरुद्ध लबाडी अशी आहे.
    सध्या गाजते आहे तीे रिलायन्सच्याच गॅस पाईपलाईनप्रकरणी भूसंपादनचे उप जिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना आमदार सुरेश लाड यांनी केलेल्या मारहाणीची घटना. रायगड जिल्ह्यातून रिलायन्स गॅस पाईपलाईन टाकली जाणार आहे. याकरिता २००७ पासून भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. हा रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्प या भागापुरता मर्यादित नसून तो आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात व महाराष्ट्र या चार राज्यांतून जात आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी तत्कालिन, तसेच विद्यमान केंद्र व राज्ये सरकारे रिलायन्सबाबत उदार ठरली आहेत. त्यामुळे महसूल विभाग मांजर बनले आहे आणि रिलायन्सने पुरवलेले दूध डोळे मिटून पीत आहे. याचा फटका गोरगरीब शेतकर्‍यांना बसला आहे, त्यांच्यावर बळजबरी होत आहे. त्यामुळे रिलायन्सविरोधात ठिकठिकाणी आंदोलने उभी राहिली. रायगडमध्येही सध्या अशीच चिन्हे दिसत आहेत. रिलायन्सची ही गॅस पाईपलाईन रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर अशी पुढे जाणार आहे. पण या रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पाबाबत सरकारने शेतकर्‍यांना विश्‍वासात घेतले नाही. या प्रकल्पाची कोणतीही माहिती शासनाने वा कंपनीने दिलेली नाही. मनमानीपणे भूसंपादन केले जात आहे. हा प्रकल्प गॅसवर आधारित असल्याने त्याचे ङ्गायदे तोटे देखील स्पष्ट केले नाही. संबंधील प्रकल्पाच्या जागेच्या परिसरातील संरक्षणात्मक कोणतीही काळजी घेतली जात नाही. प्रोजेक्ट रिपोर्ट दिले जात नाहीत. 
      भूसंपादन करताना मनमोहन सिंग सरकारच्या धोरणाप्रमाणे ४ पट नुकसान भरपाई देणे आवश्यक असताना तीही देण्यात आलेली नाही. या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांची जमीन कवडीमोलाने तीही लीजवर घेतली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम झाल्यानंतर दोन्ही बाजूला बांधकामच करता येणार नसल्याने त्या जागेसह उर्वरित जमिनीची किंमतही शून्य होत असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या जमिनीवर शेतकरी शेती करु शकणार नाही की कसलाही उद्योग करु शकणार नाही. उर्वरित जागेची किंमतही कमी असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करताना असलेले अधिकारी हे त्या त्या तालुक्यातील प्रांत, तहसिलदार असावेत त्यांच्या अखत्यारीत हे संपादन झाले पाहिजे. मात्र तसे न होता, या जिल्ह्याबद्दल काडीचाही जिव्हाळा नसलेले बाहेरील अधिकारी भूसंपादन करीत आहेत. हे करताना अधिकारी आणि रिलायन्स आपणच शासन आहोत आणि शासनाचे सर्व अधिकार आम्हाला आहेत असे गृहीत धरुन वागत आहेत. कर्जतला तर या भूसंपादन अधिकार्‍यांनी कळसच गाठला. त्यांनी कर्जत तहसील कार्यालयाच्या बाहेर असलेल्या सभागृहात शेतकर्‍यांना बोलावून कोर्‍या कागदावर सही घेतल्या. ङ्गसवणूक होत असलेल्या शेतकर्‍यांनी आमदार सुरेश लाड यांच्यापुढे कैङ्गियत मांडली. त्यामुळे ११ ऑगस्ट रोजी लाड यांनी रिलायन्सचे अधिकारी बसत असलेल्या कर्जत तहसील कार्यालयात जाऊन शेतकर्‍यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘लोकप्रतिनिधी आम्हाला जाब विचारू शकत नाही’ असे तिथे त्यांना उत्तर मिळाले. त्यामुळे संतापलेल्या लाड यांनी कलगुटकर यांच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र पसरल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेचा निषेध शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ रायगड जिल्हा समन्वय समितीने  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन नोंदविला तर शनिवार २० ऑगस्ट रोजी कोकण विभागातील महसूल संघटनांचे काम बंद आंदोलन झाले. आता या घटनेला लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही असे स्वरुप आले आहे.
     गेल्या काही वर्षांत लोकप्रतिनिधींबद्दल आणि नोकरशाहीबद्दल चांगलं बोललं जात नाही. नोकरशाही लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, याला लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत. या दोघांतील ‘अर्थ’पूर्ण हातमिळवणीतून सलगी वाढली आणि सलगीतून मर्यादा ओलांडल्या गेल्या. ती नोकरशाहीची सवय वाढीस लागली आणि ही नोकरशाही लोकप्रतिनिधींनाही जुमानेशी झाली. उन्मत्त झाली. आपण लोकप्रतिनिधींपेक्षा मोठे आहोत, असा तिला भास होऊ लागला. या नोकरशाहीला भांडवलदारांनी हाताशी धरलं. नोकरशाहीने भांडवलदारांशी ‘अर्थ’पूर्ण संवाद सुरु केला. सेझच्या रुपात तो प्रामुख्याने दिसून आला. २००९ साली चक्क राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी रिलायन्सचे अधिकारी (पूर्वीचे सरकारी अधिकारी असलेले, तसेच सरकारी दीर्घ रजेवर असलेले अधिकारी) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेबलावर बसून शहापूर, धेरंड आदी नऊ गावांतील सर्व शेतकर्‍यांचे सातबारा उतारे व सरकारी महसुली खाते पुस्तकांतील नोंदीच्या प्रती काढताना आढळले. यातून जिल्हाधिकारी कार्यालयच रिलायन्सला कसे विकले गेलेय हे आढळून आले. मुळात जिल्हाधिकारी कार्यालयातच असा प्रकार चालतो असे नाही. तलाठी कार्यालय असो, तहसिल कार्यालय असो वा जिल्हापरिषद असो, वा इतर स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येक ठिकाणी दलालांची चलती आहे. या दलालीत कोणकोण सामील आहे, कोणाकोणाचा वाटा आहे, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळेच रायगड जिल्हा परिषद आणि रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचलुचपतीची प्रकरणे गाजत राहिली होती. महसूल विभाग सर्वात भ्रष्ट विभाग म्हणून ओळखला जातो ते उगीच नाही. आजही जनतेला आपल्या न्याय्य हक्कांसाठी या ठिकाणी सातत्याने खेटे मारावे लागतात. लाच हा परवलीचा शब्द आहे.
      नेहमी लोकप्रतिनिधींच्या संपत्तीची चर्चा होते, पण नोकरशाहीतील अधिकार्‍यांच्या संपत्तीची हवी त्या प्रमाणात चर्चा होत नाही, ती देखील यानिमित्त होणे आवश्यक आहे.  नोकरशाही स्वच्छ नाही, लोकप्रतिनिधी स्वच्छ नाहीत, त्यामुळे या नोकरशाहीला वेसण बसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वत:वरच अंकुश ठेवणे आवश्यक आहे. दोघांनीही एकमेकांकडे बोटे दाखवून उपयोगाचे नाही. रिलायन्स गॅस पाईप प्रकरणात आमदार सुरेश लाड चुकले की भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर चुकले, याचा अर्थ काढणारे काय तो अर्थ काढतील, पण रायगड जिल्ह्यातील जनतेचा, शेतकर्‍यांचा विकासाला विरोध नाही, तर विकासाच्या नावावर चालवल्या जाणार्‍या हुकुमशाहीला, फसवणुकीला आहे. रिलायन्सने आणि सरकारने शेतकर्‍यांना विश्‍वासात घेतले आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर संघर्षाची परिस्थिती निर्माणच झाली नसती. केंद्र, राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाने रिलायन्सचे लाड पुरवायचे आणि रिलायन्सने केद्र, राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाचे लाड पुरवायचे असा सारा कारभार चाललाय, मात्र ज्या शेतकर्‍यांकडून त्यांच्या काळजाचा तुकडा घ्यायचाय त्या शेतकर्‍यांचे लाड न पुरवता त्यांच्याशी लबाडी करायची ही हरामखोरी आहे. रायगड जिल्हा यामुळेच अस्वस्थ आहे आणि ही अस्वस्थता आता राजकीय पातळीवरुनही उमटू लागली आहे. इतकेच.

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

अमित वैद्य यांची ‘पॅशन ब्युटी अॅकॅडमी’

 -उमाजी म. केळुसकर ⬑ वलयांकित ⬉


     अलिबाग तालुका निसर्ग सौंदर्याने नटला आहे, इथल्या माणसांतही तेच सौंदर्य आहे. हे सौंदर्य अधिकच खुलवण्याचा ध्यास अमित वैद्य यांनी घेतला आणि त्यांनी पॅशन ब्युटी सलोन व पॅशन ब्युटी अॅकॅडमी सुरु केली. त्यांच्या या पॅशन ब्युटी अॅकॅडमीचे नाव रायगड जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतले जाते. पुण्यातही बिबवेवाडी येथे या अॅकॅडमीची शाखा आहे. या अॅकॅडमीतून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशभर या क्षेत्रात चमकत आहेत. रायगडकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
      अमित सूर्यकांत वैद्य हे आतिथ्यशील, विनयशील व्यक्तीमत्व. एक अत्युच्च दर्जाचे हेअर स्टाईलिस्ट, मेकअप आर्टिस्ट आहेत. चेंढरे येथील आनंदनगरमध्ये त्यांचे पॅशन ब्युटी पार्लर आणि पॅशन ब्युटी अॅकॅडमी आहे. अलिबाग, पुणे येथील पॅशन ब्युटी अॅकॅडमीत हेअर ड्रेसिंग, ब्युटी थेरपी, मेअकप आर्टिस्टली हे तीन विषय शिकवले जातात. बेसिक, ऍडव्हान्स, प्रोफेशनल, डिप्लोमा, मास्टर कोर्सेस असे पॅशन ब्युटी अॅकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी याच क्षेत्रात यशस्वीरित्या व्यवसाय करीत आहेत. पॅशन ब्युटी अॅकॅडमी हे अमित वैद्य यांच्या या क्षेत्रातील ध्यासाचे आणि तळमळीचे फळ आहे. त्यांनी शून्यातून निर्माण केलेल्या या विश्‍वामुळे या क्षेत्रात नव्याने येणार्‍यांना एक आगळा विश्‍वास आणि आधार मिळाला आहे.
       पॅशन ब्युटी पार्लरमध्ये हेअर ट्रिटमेंट, हेअर कलरिंग, हेअर स्टेटनिंग, पर्मिंग, लेडिज-जेन्टस कटिंग, ब्रायडल मेकअप, लग्नासाठीचे इतर मेकअप, रिसेप्शन, फोटोग्राफीचे मेकअप, स्कीन ट्रीटमेंट, फेशियल, ब्लीच, बॉडी ट्रिटमेंट, बॉडी मसाज, बॉडी स्पा, आरोमा थेरपी इत्यादी केले जाते. या पॅशन ब्युटी पार्लरची सेवा रायगडकर, पुणेकरांच्याच पसंतीस उतरलेली नाही तर संपूर्ण देशभरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. अमित वैद्य स्वत: देशातील विविध राज्यांत जाऊन मेकअप करतात.
     अमित वैद्य यांच्या मातोश्री शिल्पा वैद्य गेली ३५ वर्ष अलिबागेत ब्युटी पार्लर चालवत आहेत. त्यांच्या ब्युटी पार्लरचे संस्कार अमित यांच्यावर झाले. तीच आवड त्यांच्या मनावर ठसली. मातोश्रींचीही त्यांनी या श्रेत्रात करियर करावे ही इच्छा होती. मुळातच आवड असल्यामुळे जेएसएम कॉलेजमधून बीएसस्सी केल्यानंतर अमित यांनी पुण्याला १९९८ साली सौंदर्यशास्त्राबाबतचे विविध कोर्स केले आणि १९९९ साली अलिबागेत पॅशन ब्युटी पार्लर सुरु केले.
     अमित वैद्य यांनी २००८-२०१० ही दोन वर्ष लंडन येथील टोनी ऍण्ड गाय व विडाल ससूनसारख्या जगप्रसिद्ध अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले व तेथीलच नामांकीत सलोनमध्ये नोकरीही केली. तेथील हेअर कटरचा अनुभव घेतला. २०१० मध्ये परत आल्यावर त्यांनी स्पा आणि मेकअप स्टुडिओची सुरुवात केली. तोपर्यंत अलिबागमध्ये ही कल्पना नवी होती, पण या कल्पनेला मात्र चांगला प्रतिसाद मिळाला. अमित वैद्य यांना इथेच थांबायचं नव्हतं. आपण जे शिकलो त्याचा लाभ अलिबागमधील युवक-युवतींना व्हावा या ध्यासाने त्यांना झपाटलं. त्याच ध्यासातून त्यांनी पॅशन ब्युटी अॅकॅडमी काढण्याचा निर्णय घेतला. ते सोपे काम नव्हते. आर्थिक प्रश्‍न होता. पण त्यावर मात करुन त्यांनी २०१० साली पॅशन ब्युटी अॅकॅडमीस प्रारंभ केला. त्याची पुणे येथे शाखा काढली. दोन्ही ठिकाणच्या अॅकॅडमीना चांगल्याप्रकारचा प्रतिसाद मिळत गेला. लंडन येथे आधी मेकअपचे प्रशिक्षण घेतले असतानाही २०११ साली भारतीय रंगछटांचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी चेन्नईच्या कायलॉन अॅकॅडमीत प्रशिक्षण घेतले. इतक्यावरच त्यांची शिक्षण घेण्याची प्रक्रिया थांबली नाही. त्यानंतरही त्यांनी मुंबईमध्ये भरत गोडांबे यांच्याकडे मेकअपचे प्रशिक्षण घेतले. या क्षेत्रातील सौंदर्यशास्त्रातील होणारे बदल आत्मसात करण्यासाठी स्वत: प्रशिक्षक असून, या क्षेत्रातले तज्ज्ञ असून अमित वैद्य सातत्याने प्रशिक्षण घेत आले आहेत. त्यांचे मोठमोठे आंतरराष्ट्रीय कोर्सेस अजूनही चालू असतात. त्यांनी केलेल्या कोर्सची ६०-७० प्रमाणपत्रे त्यांच्याकडे आहेत. अशाप्रकारचं रायगड जिल्ह्यामधून प्रशिक्षण घेतलेले अमित वैद्य हे एकमेव आहेत. लंडनला जाऊन तेथे प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात तेथे दोन वर्षे काम करणार्‍या भारतातील मोजक्या मंडळींत वैद्य यांची गणना होते. हेअरस्टाईलिंगमध्ये स्पेशलायझेशन करत असताना त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. २०१५ साली झालेल्या राष्ट्रीय हेअर स्टाईलिंग स्पर्धामध्ये त्यांना चौथी क्रमवारी मिळाली. २०१७ साली पॅरिस येथे होणार्‍या हेअर वर्ल्ड कपची त्यांची आतापासूनच तयारी सुरु आहे.
      पॅशन ब्युटी अॅकॅडमी सुरु करण्याचा अमित वैद्य यांचा हेतू निश्‍चितच उदात्त आहे. येथील नव्याने या क्षेत्रात येणार्‍या ब्युटीशियन्सना पुण्या-मुंबईला जाऊन याबाबतचे नवनवे शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी आपण काहीतरी ठोस केले पाहिजे या उद्देशातून त्यांनी पॅशन ब्युटी अॅकॅडमी सुरु केली. पुण्या-मुंबईत विविध संस्था जी फी घेतात त्यापेक्षा कमी फीमध्ये पॅशन ब्युटी अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा जीवनाच्या विविध अंगांसाठी आता खूप उपयोग आहे. ज्यांना या क्षेत्रात व्यवसाय अथवा नोकरी करायची आहे, त्यांना या प्रशिक्षणाचा अतिशय फायदा होतो. याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना अमित वैद्य म्हणाले, ‘करिअर म्हणून युवक-युवती हे क्षेत्र डोळेझाकून निवडू शकतात, एवढं हे क्षेत्र चांगलं आहे. या क्षेत्रात देशा-परदेशात प्रचंड वाव आहे. देशात, तसेच परदेशात याच्या संबंधित चांगल्या नोकर्‍या मिळू शकतात. विशिष्ट शिक्षणाचीचीही अट नाही. बारावी असो वा पदवीधर कोणीही सौंदर्यासंबधी प्रशिक्षण घेऊ शकतं. या क्षेत्राच्या माध्यमातून चित्रपट, टिव्ही मालिका, मॉडेलिंगसाठीचा मेकअप आर्टिस्ट म्हणूनही काम करता येऊ शकते. स्वत:चे ब्युटी पार्लर सुरु करता येते. पार्लर मध्ये नोकरी करता येते. प्रशिक्षक म्हणून ब्युटी अॅकॅडमीत काम करता येऊ शकते. मुंबईत प्रशिक्षकास सुरुवातीस २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत सुरुवातीस वेतन मिळते. त्यामुळे ब्युटी संबंधातील प्रशिक्षण ज्यांनी घेतलेय त्याच्या किंवा तिच्या हाताला काम नाही असे होत नाही.’
      अमित वैद्य यांची ब्युटी अॅकॅडमी ‘पॅशन’ असल्यामुळे तेच नाव त्यांनी आपल्या ब्युटी पार्लर आणि ब्युटी अॅकॅडमीला दिले आहे. त्यांच्यात हा झपाटलेपणा आहे. म्हणूनच त्यांची महाड-रायगडसह पुणे, मुंबई, रत्नागिरी तसेस इतरत्र सेमिनार चालू असतात. आपल्याला जे येते ते दुसर्‍याला शिकवण्याचा त्यांचा ध्यास हा त्यांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. अशी ध्यास असणारी माणसेच इतिहास घडवत असतात. रायगड जिल्ह्यामध्ये अमित वैद्य यांनी पॅशन ब्युटी अॅकॅडमीच्या माध्यमातून सौंदर्यशास्त्र प्रशिक्षणाचे एक महाद्वार उघडले आहे. त्याचा फायदा या क्षेत्रात येणार्‍या युवक-युवतींना निश्‍चितच होईल, यात शंकाच नाही.
अमित वैद्य यांचा मोबाईल क्र. ८८८८०५००५५

सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या ‘प्रेषिता’ची देशाला प्रतीक्षा

  -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


      आज भारतीय स्वातंत्र्याचा ६७ वा वर्धापन दिन साजरा करताना भारतीय जनतेसाठी खर्‍या समतेचं स्वातंत्र्य केव्हा मिळणार हा प्रश्‍न उपस्थित होतो. कारण आज विविध विषमतांचं पारतंत्र्य प्रकर्षाने येथील जनतेला अनुभवायला मिळत आहे. ब्रिटीशांकडून देशाने स्वातंत्र्य मिळवले, पण आपल्याला आपल्याच बांधवांकडून स्वातंत्र्य मिळवण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण आज व्यवस्थेचे शिकार ठरत आहोत. आपले लोकप्रतिनिधीच लोकशाहीच्या नावाने आपल्यावर पारतंत्र्य लादत आहेत. स्वत:च्या फायद्याचे नियम बनवून सर्वसामान्य जनतेच्या स्वातंत्र्याची त्यांनी गळचेपी चालवली आहे. दुसरीकडे समतेचे मारेकरी वाढले आहेत, शिक्षणाची दुकाने बनली आहेत. भ्रष्टाचार, अनाचार वाढला आहे. त्यामुळे जनतेला सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या ‘प्रेषिता’ची देशाला प्रतीक्षा आहे.
     १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. ब्रिटीशांच्या गुलामगिरीत दीडशे वर्ष पिचत पडलेल्या भारतीय जनतेच्या देहावरील पारतंत्र्याच्या शृखला गळून पडल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य कोणकोणत्या बाबींचे पाहिजे होते? देशाचे स्वातंत्र तर पाहिजेच होते, पण जाती-धर्माच्या अघोरी परंपरेत अडकलेल्या वर्गालाही समतेचं स्वातंत्र्य हवं होत, शिक्षणापासून वंचित असलेल्यांना शिक्षणाचं स्वातंत्र्य हवं होतं. या स्वातंत्र्या अभावी स्त्रियांच्या तोंडाला वेसण घातलेल्या बैलासारखे निशब्द असे कुलुप घालण्यात आले होते. ब्रिटीशांबरोबर स्वातंत्र्यासाठी लढा चाललेला असतानाच समांतर पातळीवर या देशात समाजसुधारणेचाही लढा तितक्याच निग्रहाने सुरु होता. न्या. महादेव गोविंद रानडे, राजाराम मोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणशिखा सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, छत्रपती शाहू महाराज यांचा शिक्षण आणि समतेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याच बांधवांबरोबर लढा सुरु होता. 
      देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण यासाठी हिंसक आणि अहिंसक पातळीवर लढा लढला गेला. युद्धनितीत साम, दाम, दंड, भेद हे एक भेदक शस्त्र असतं. या शस्त्राचा वापर आपल्या क्रांतीकारकांनी केला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य हे माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे ब्रिटीशांना ठणकावून सांगितले. सर्वसामान्यांच्या या स्वातंत्र्यचळवळी आधी राजसत्तांनी ही चळवळ राबविली. १८५७ साली बहादूरशाह, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, कुंवरसिंह यांनी उठाव केला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी ‘माझी झाशी मी देणार नाही’ अशी मराठीत गर्जना करुन प्राणाहुती दिली. ब्रिटीशांच्या लष्करातील मंगल पाडे यांच्यासारख्या भारतीय जवानांनीही बंड केले आणि ते तोफेच्या तोंडी गेले. अशी अनेक बंडे स्वातंत्र्यचळवळीला पूरक ठरली. आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व उमाजी नाईक यांनी सशस्त्र क्रांतीचा बिगुल वाजवला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यासारख्या सशस्त्र क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशीचा स्वीकार केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व असंख्य क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी अंदमानातील जन्मठेपेच्या सजा भोगल्या.
       महात्मा गांधी यांनी अहिंसक स्वातंत्र्य चळवळीचा जनतेला मंत्र दिला, त्या मंत्राचा वापर करुन जवाहरला नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल व असंख्य क्रांतिकारकांनी ब्रिटीशांविरुद्धची स्वातंत्र्याची चळवळ तीव्र केली. दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटीशांविरुद्ध लढण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. अशा पद्धतीने स्वातंत्र्यचळवळ निशस्त्र आणि सशस्त्र पातळीवल लढवली जात होती. नाण्याला दोन बाजू असल्या तरच ते चलनात ग्राह्य मानले जाते, टाळी वाजवायला दोन हातांची गरज असते, तशीच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र आणि निशस्त्र लढ्याची गरज होती. ती गरज तत्कालिन क्रांतिकारकांनी भागवली. १२४२ साली महात्मा गांधी यांनी छोडो भारत असा इशारा दिला, अशा परिस्थितीत जगाच्या रणांगणावर दुसर्‍या महायुद्धाला सुरुवात झाली आणि यापरिस्थित आपण भारताला स्वातंत्र्य दिले नाही, तर या सशस्त्र आणि निशस्त्र चळवळीचा फास आपल्याला बसेल याची खात्री झाल्याने १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले. ते देण्यापूर्वी हिंदू-मुस्लिमांमध्ये कायम भांडण रहावे यासाठी भारत-पाकिस्तान अशी फाळणी केली. इंग्रजांचा तो हेतू सफल झाला आहे. 
        क्रांती अशीच होत नाही. गुलामांना गुलामगिरीची जाणीव करुन दिल्याशिवाय बंडाचे निशाण फडकत नाही. ब्रिटीशाच्या गुलामगिरीत खितपत असलेल्या जनतेलाही या गुलामगिरीची जाणव नव्हती, ही जाणीव त्यांना सशस्त्र आणि निशस्त्र क्रांतीच्या नेत्यांनी करुन दिली, त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची ठिणगी उडाली आणि या ठिणगीचा वणवा झाला. या क्रांतिकार्यासाठी किती हुतात्मा झाले, याची गणतीच नाही, कितींनी आपल्या घरादारांवर पाणी सोडले याची गणती नाही, कितींनी आपल्या संसाराचा त्याग केला गणतीच नाही. तुरुंग तर अशा क्रांतिकारकांनी खचाखच भरले होते. क्रांतिकारकांनी मोठी किंमत देवून हे स्वातंत्र्य मिळवले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजच्या पिढीला आणि आजच्या नेत्यांना या स्वातंत्र्याची किंमत नाही. स्वातंत्र्यानंतर लोकशाही स्थापन झाली. राजेरजवाडे, संस्थाने खालसा झाली, पण लोकप्रतिनिधींच्या नावावर अगदी सरपंचापासून नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार, मंत्रीपदाची संस्थाने सुरु झाली. प्रत्येकाची स्वतंत्र संस्थाने, प्रत्येकाचे स्वतंत्र भाव, अशा परिस्थितीत जनतेला आपले राज्य आहे, असे वाटण्याची शक्यताच उरली नाही. त्यामुळेच या देशात भ्रष्टाचार, बलात्कार, असमानता याचा आलेख वाढतो आहे.
      या  देशांची गेल्या ७० वर्षात प्रगती झाली, हे खरे असले तरी त्याबरोबर असलेले दुसरे वास्तवही भीषण आहे. देशातील ९५ टक्के जनता दारिद्ˆयरेषेखाली आहे. एक वेळचे अन्नही त्यांना दुरापास्त आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो आहे. बेरोजगांरासमोरही आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना निवृत्ती नाही आणि निवृत्ती वेतन नाही. जोपर्यंत हातपाय चालताहेत तोपर्यंत त्यांना काम करायचे आहे, सर्वसामान्य जनता कराच्या ओझ्याखाली चिरडून गेली आहे, अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींना त्यांचा विचार करावासा वाटत नाही, ते स्वत:चाच विचार करतात. त्यामुळेच देशातील प्रत्येक राज्याच्या विधानपरिषद, विधानसभा, देशाची लोकसभा, राज्यसभा येथे सर्व लोकप्रतिनिधी आपापले वेतन, निवृत्ती वेतन वाढवून घेण्यातच धन्यता मानत आहेत. नुकतेच महाराष्ट्राच्या आमदार, मंत्र्यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी महाडच्या दुर्दैवी घटनेचं सावट असूनही आपले वेतन दीड ते पावणेदोन लाखांपर्यंत वाढवून घेतले, तसेच माजी आमदारांचेही निवृत्ती वेतन वाढवून घेतले. बरे हे आमदार, मंत्रीसंत्री गरीब नाहीत, प्रत्येकाची संपत्ती ५ ते ५०० कोटींच्या घरात आहे. अशांनी वास्तविक १ रुपया पगार घेऊन आपल्या पदाची प्रतिष्ठा वाढविली असती तर खरोखरच लोकशाही अवतरली आहे, असे जाणवले असते. पण आपल्याला कार्पोरेट कंपन्यांतील अधिकार्‍यांप्रमाणे पगार मिळवणारे हे लोकप्रतिनिधी कार्पोरेट कंपन्यातील अधिकार्‍यांप्रमाणे खरोखरच काम करतात का? कार्पोरेट कंपन्यात कामाचे उद्दीष्ट न गाठल्यास हातावर नारळ ठेवला जातो. मात्र लोकप्रतिनिधींची दुकानदारी मात्र पाच वर्षे सुरुच असते. त्यामुळे लोकशाहीत स्वातंत्र्याचा असा दुरुपयोग होणे क्लेषकारक आहे.
     ब्रिटीशांकडून देशाने स्वातंत्र्य मिळवले, पण आपल्याला आपल्याच बांधवांकडून स्वातंत्र्य मिळवण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण आज व्यवस्थेचे शिकार ठरत आहोत. आपले लोकप्रतिनिधीच लोकशाहीच्या नावाने आपल्यावर पारतंत्र्य लादत आहेत. स्वत:च्या फायद्याचे नियम बनवून सर्वसामान्य जनतेच्या स्वातंत्र्याची त्यांनी गळचेपी चालवली आहे. दुसरीकडे समतेचे मारेकरी वाढले आहेत, शिक्षणाची दुकाने बनली आहेत. अशा परिस्थितीत न्या. महादेव गोविंद रानडे, महात्मा ज्योतिबा फुले, शिक्षणशिखा सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजाराम मोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखे महापुरुष आज समाजसुधारणेसाठी नेतृत्व करण्यासाठी नाहीत, अंधश्रद्धेविरुद्ध लढणार्‍या डॉ. दाभोळकर यांच्यासारख्यांना संपवण्यात येते हा या काळाला पडलेला मोठा खड्डा आहे. म्हणूनच नाईलाजाने म्हणावेसे वाटते की अजूनही स्वातंत्र्याचा लढा संपलेला नाही. लढ्याची आवश्यकता आहे, पण या लढ्यासाठी सशक्त नेतृत्व नाही. असे एकजरी भक्कम नेतृत्व मिळाले तरी त्यातून अनेकांचे नेतृत्व संपादित केले जाईल आणि समतेचा, सुधारणेचा, भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा पूर्णत्वास जाईल. यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराचा हक्क सर्वसामान्य जनतेसाठी मिळवून एक पार्श्‍वभूमी बनवली आहे. आता केवळ संकल्पाची आणि नेतृत्वाची गरज आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना सामाजिक स्वातंत्र्याचा हुंकारही तीव्र झाला पाहिजे.   


बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

हुतात्मा स्मारके अश्रू ढाळताहेत...

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉   


      दीडशे वर्षे भारतावर राज्य करणार्‍या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! ब्रिटिशांच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यविरांनी स्वातंत्र्याच्या समरात उडी घेतली. घरदार, संसार सार्‍याला तिलांजली दिली. भारतमाता स्वतंत्र व्हावी हीच त्यांची इच्छा होती. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. यासाठी अनेकांना हौतात्म पत्करावे लागले. दुर्दैवाने स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी आणि सत्ताधार्‍यांसाठी स्वातंत्र्याची मशाल पेटविणारे क्रांतिवीर ‘अनोळखी’ झाले आहेत. सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे. त्यामुळेच रायगडसह संपूर्ण राज्यातील हुतात्मा स्मारकांची दूरवस्था झाली आहे. ही हुतात्मा स्मारके आपल्यात दुर्दशेवर अश्रू ढाळताहेत. हे अश्रू पुसण्याची गरज आहे.
     रायगड ही छत्रपती शिवाजी महाराज निर्मित हिंदवी स्वराज्याची राजधानी. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे ‘रायगड’ असे नामाभिदान होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा आणि आदर्श या जिल्ह्याला लाभलेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे ब्रिटिशांबरोबर सशस्त्र लढा देताना हुतात्मा झालेले व इंग्रजांना हैराण करुन सोडणारे शूरवीर याच जिल्ह्यात जन्माला आले. त्यानंतच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही अभिनव भारत संस्थेती स्थापना केली. त्यातही रायगड जिल्ह्याने- विशेषत: पेणमधील मंडळींनी कृतीशील सहभाग घेतला. लोकमान्य टिळकांनीही रायगड जिल्ह्यात येऊन स्वराज्याचा त्रिसुत्री मार्ग सांगितला. त्यातही रायगड जिल्हा मागे राहिला नाही.
     गांधीयुगात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९२० चा असहकार लढा, १९२८ चा सायमन कमिशन चालते व्हा लढा, १९३० चा मिठाचा सत्याग्रह, १९३२ चा कायदेभंग, १९४१ चा वैयक्तिक सत्याग्रह, १९४२ चा चले जाव लढा, एवढ्यावरच न थांबत १९४७ साली स्वराज्य मिळाल्यानंतरही रायगड जिल्ह्यातील महाड येथील नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली झालेला जंजिरा संस्थान मुक्ती लढा आणि १९५५ चा गोवा मुक्ती लढा या सर्व संग्रामांत रायगड जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. या सर्व लढ्यांच्या स्मृती रायगड जिल्ह्यात १६ हुतात्मा स्मारकांच्या रुपाने जागत्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्रातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अशा हुतात्म्यांची स्मारके उभारण्याची कल्पना रायगड जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांची आहे. १९८० साली ते सातारा येथील वडूज येथे गेले असताना तेथे त्यांना हुतात्मा स्मारकाची कल्पना सुचली. हुतात्मा स्मारकाची वास्तू लोकोपयोगी, प्रेरणादायी, आकर्षक व्हावी. युवकांना स्वातंत्र्य प्रेरणेचा उगम कळावा, अशी अंतुले यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी राज्यातील पाच वास्तू शिल्प संस्थांच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित केली. त्यात तीन आर्किटेक्चर कॉलेजेस आणि दोन ऍकेडेमिजमधील विद्यार्थ्यांनी दोनशे प्रवेश पत्रिका पाठवल्या होत्या. त्यातील एकाचे डिझाईन बक्षिसपात्र ठरले, त्यावरच राज्यातील २१६ हुतात्मा स्मारके उभी राहिली आहेत. पण यातील बहुसंख्य हुतात्मा स्मारकांची आज दूरवस्था झाली आहे. रायगड जिल्हाही याला अपवाद नाही.
     रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यामध्ये शिरढोण येथे हुतात्मा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, पनवेल येथे हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे (गुरुजी), पेण येथे हुतात्मा विनायक पांडुरंग कोल्हटकर, उरण तालुक्यातील पाणदिवे येथे हुतात्मा परशुराम माया पाटील, चिरनेर येथे हुतात्मा धाकू गवत्या फोफेरीकर, मोठी जुई येथे हुतात्मा रामा बामा कोळी, धाकटी जुई येथे हुतात्मा आनंद माया पाटील, दिघोडे येथे हुतात्मा आलु बेमट्या म्हात्रे, कोप्रोली येथे हुतात्मा परशुराम मोरेश्‍वर शिंदे, खोपटे येथे हुतात्मा हसुराम बुधाजी घरत, महाड तालुक्यातील शेलटोली येथे हुतात्मा नथु दौलत टेकावले, महाड येथे हुतात्मा कमलाकर विठ्ठल दांडेकर, नडगाव तर्फ बिरवाडी येथे हुतात्मा अर्जुन कानू भोई, कर्जत तालुक्यामधील माथेरान येथे हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण तथा भाई कोतवाल, मानिवली येथे हिराजी गोमा पाटील, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे हुतात्मा शेषनाथ नानाभाई पितळे तथा शेषनाथ वाडेकर यांची स्मारके आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या हुतात्मा स्मारकांची अवस्था बिकट आहे.
      राज्यात बहुतेक ठिकाणी ही स्मारके गावात एका बाजूला, अगर गावाच्या बाहेर उभारली गेली आहेत. याचा फायदा समाजकंटकांनी घेतला आणि अनेक स्मारके जुगाराचे अड्डे, दारुबाजांच्या नशापानाची ठिकाणे अगर प्रेमीयुगुलांच्या मीलनाची स्थाने बनली. ही स्थिती नजरेस आणल्यावर शासनाने ती देखभालीसाठी स्वयंसेवी सार्वजनिक संस्थांकडे दिली. ३४-३५ वर्षांपूर्वी बांधलेली ही स्मारके आता दुरुस्तीला आली आहेत. गावातील ज्या स्वयंसेवी संस्थांनी या स्मारकांच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली आहे, त्या संस्थांची आर्थिक स्थिती या स्मारकांची दुरुस्ती करण्याइतपत नाही. त्यामुळे शासनाने या संदर्भात निर्णय घेतला की या स्मारकांच्या दुरुस्तीची अंदाजपत्रके शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार करावीत आणि प्रत्यक्ष दुरुस्ती त्या त्या जिल्ह्यातील आमदार-खासदारांना दिल्या जाणार्‍या स्थानिक विकास निधीतून केली जावी. मात्र बहुतेक ठिकाणी दुरुस्ती लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून अद्यापी झालेली नाही. रायगड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. येथील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था होऊ लागलेली आहे. ही स्मारके अडगळीत पडली आहेत. त्यांच्यापासून देशप्रेमाची प्रेरणा घेणे तर दूर, त्यांची साधी देखभाल सुद्धा केली जात नाही. गेल्यावर्षी चिरनेर येथील हुतात्मा स्मारकातील हुतात्मा स्तंभाची ज्योत कोसळली. ती बसवून घेण्यासाठी चिरनेरकरांना बराच संघर्ष करावा लागला. या हुतात्मा स्मारकांची दूरवस्था गौरवशाली परंपरा सांगणार्‍या या रायगड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा किंवा सुसज्ज स्मारके ठेवण्याचा विचार राज्य सरकारने करावा.
     ‘नाही दिवा, नाही पणती’ अशा अवस्थेत असणार्‍या हुतात्मा स्मारकांच्या देखभालीसह तेथील जागेचा योग्य उपयोग झाल्यास हुतात्मा स्मारकाची निश्चितच अभ्यास केंद्रे, पर्यटनस्थळ बनतील. त्यासाठी त्यांची कायमस्वरूपी देखभाल ग्रामपंचायतीकडे देण्याची, तसेच त्यासाठी दर वर्षी एकरकमी अनुदान देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने नुकतेच पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एकमताने माजी आमदारांचे निवृत्ती वेतन, आमदार, मंत्र्यांचे वेतन वाढवून घेतले, पण ज्यांच्यामुळे आपण सत्ता उपभोगतो आहोत आणि या सत्तेचे विरोधक म्हणूनही वावरतो आहोत, त्या हुतात्म्यांच्या स्मारकांच्या देखरेखीसाठी दरवर्षी एकरकमी अनुदान दिले जावे यासाठी कधी त्यांनी विधानसभा, विधानपरिषेदत आपली एकी दाखवली नाही. त्यामुळे हे खरेच आपले लोकप्रतिनिधी आहेत की, त्यांच्याच घराण्याचे, कुटुंबाचे प्रतिनिधी आहेत याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे.


शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

‘सेल्फी’श पालकमंत्र्यांना घरी बसवा

 -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



    रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांची निष्क्रियता आणि उद्धटपणा महाड दुर्घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. रायगडच्या पत्रकारांमध्ये या दुर्घटनेबद्दल जितकी संवेदना आहे त्यांचा अंशदेखील जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांत पहायला मिळाली नाही. पत्रकारांनी दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली, पण पालकमंत्री घटनेच्या दुसर्‍या दिवशी २० तासांनी घटनास्थळी पोहचतात. तेथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्य उत्तरे देण्याऐवजी गुटख्याचा तोबरा तोंडात भरलेल्या अवस्थेत पत्रकारांच्या अंगावर धावून जातात आणि म्हणतात, पक्ष माझ्यासोबत आहे. या त्यांच्या सत्तेचा माजामुळेच दुर्घटनाग्रस्तांचा बचाव व शोधकार्य वेळेवर सुरु झाले नाही. जुना पूल सावित्री नदीने तिच्यावरील वाहनांसकट विसर्जित केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहता यांना रायगडच्या पालकमंत्रीपदावरुनच नाही तर राज्याच्या गृनिर्माणपदावरुनही विसर्जित केले पाहिजे.
      महाड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर या मार्गातील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल मंगळवार, २ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता कोसळला. पूल कोसळल्यानंतर त्या मार्गावरुन जाणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या जयगड ते मुंबई आणि राजापूर बोरिवली या साधारण २२ प्रवासी घेऊन जाणार्‍या दोन बसेस व इतर काही वाहने बुडून बेपत्ता झाली. सावित्री नदीवरीत एस.टी. बसेच आणि इतर वाहने यांचा शोध सुरु असताना विधानसभा अधिवेशनात बुधवार, ३ ऑगस्ट रोजी सत्ताधार्‍यांविरोधात राष्ट्रवादी, कॉंग्रेस आग ओकत होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या घटनेला त्या दिवशी १२ तास होऊनही या घटनेत सापडलेल्या जीवांना वाचविण्याबाबत किंवा शोधण्याबाबतची ठोस पावले उचलण्याबाबत विधानसभेत विशेष चर्चा करण्याचे भान कोणी दाखवले नाही. याप्रसंगी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन जलद गतीने दुर्घटनाग्रस्त बसेस आणि इतर वाहनांचा कसा शोध लागेल याच्याकडे लक्ष पुरविणे आवश्यक होते. पण सत्ताधार्‍यांनी आणि विरोधकांनीही या घटनेबाबत पाहिजे तितका संवेदनशीलपणा दाखविला नाही. या सर्व गदारोळात आंतरराष्ट्रीय दर्जाची शोध मोहिम आखली गेली नाही. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी त्याबाबतची योग्य पावले उचलली नाही, त्यामुळे केवळ दूरवर वाहत गेलेले मृतदेहच हाती लागत आहेत.
      मुळात महाड दुर्घटनेनंतर प्रशासनात समन्वयाचा अक्षम्य असा अभाव पहायला मिळाला. जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती मंगळवार, २ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कळते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रात्री २ वाजेपर्यंत या घटनेची माहिती मिळत नाही. बुधवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ पर्यंत परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना माहिती मिळत नाही आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांना सकाळी ११ वाजेपर्यंत या घटनेचा पत्ताच लागत नाही, ही बाब धक्कादायक आहे. घटना घडल्यानंतर ताबडतोब रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी धाव घेणे अपेक्षित होते. त्यांनी मदत आणि शोध कार्याची सूत्रे हाती घेणे आवश्यक होते. पण रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक मोहम्मद सुवेझ हक घटनास्थळी हजर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी ६ वाजेपासून शोधकार्य सुरु केले. त्यानंतर तटरक्षक दल, एनडीआरएफ, नौदलाची हेलिकॉप्टर्सने बेपत्ता वाहनांचा शोध सुरु झाला. सकाळी शोधकार्य सुरु झाल्यानंतर दहा तासांनी पालकमंत्री प्रकाश मेहता महाडला उगवले आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागून स्वत:ची सेल्फी काढण्यात ते गुंग झाले. या माणसाच्या चेहर्‍यावर घटनेचे कसलेच गांभीर्य दिसले नाही. आपण पालकमंत्री आहोत, आपण कसे वागले पाहिजे याचे भान त्यांना असल्याचे कधीच दिसले नाही, या घटनेनंतर याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. 

      ही घटना घडल्याचे जिल्हा प्रशासनाला कळल्यानंतर ताबडतोब अलिबाग येथील पत्रकारांनी महाड येथील घटनास्थळी धाव घेतली. तीनच्या सुमारास तिथे ते पोहचलेही. महाड येथील प्रिंट मिडियाचे तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार तेथे हजर होतेच. पण जिल्ह्यातील दोन्ही माध्यमांतील पत्रकारांनी तेथे धाव घेतली. ते पगारी नोकर होते म्हणून नाही, तर घटनेचे गांभीर्य आणि आपल्या पेशाची निष्ठा व तळमळ म्हणून तेथे वार्तांकन करण्यासाठी गेले आणि सतत तीन दिवस तहान-भूक-झोप विसरुन ते तेथे तंबू ठोकून आहेत. पण पालकमंत्री प्रकाश मेहता दुसर्‍या दिवशी पाच वाजता घटनास्थळी पोहचतात आणि तेथे पर्यटनाला आल्यासारखे वागतात, आपल्या पदाच्या जबाबदारीचे भान दाखवत नाहीत, हा असंवदेनशीलतेचा कळसच म्हणायचा. दुसर्‍या दिवशी गुरुवार, ४ ऑगस्ट रोजी साम टीव्हीचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी तेथे आलेल्या बेपत्ता, मृतांच्या नातेवाईकांना माहिती व मार्गदर्शनाची तसेच त्यांच्या निवास व भोजनाची काय व्यवस्था केली आहे, असे पालकमंत्र्यांना विचारल्यावर त्यांनी ‘काहीतरी फालतू प्रश्‍न काय विचारता?’ असे म्हणत एखाद्या गुंडाप्रमाणे तांबे यांना दमदाटी केली व भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले. या वृत्तीला काय म्हणायचे? मेहता स्वत:ला रायगड जिल्ह्याचा पालक समजत नसून मालक समजत आहेत आणि यातूनच त्यांना माज चढला आहे हे उघड आहे. रायगडच्या जनतेने आपल्याला निवडून दिलेले नाही, ही जनता आपले काही वाकडे करु शकत नाही, हाच त्यांना माज चढला आहे. त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात रायगडचा विकास खुंटला आहे. आज रायगड जिल्ह्याची जी दुर्दशा आहे, त्याचे कारण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहताच आहे. रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे, मुंबई-गोवा राज्य महामार्ग असो, अथवा शहरे, गावांतील रस्त्यांवरील पडलेले खड्डे पालकमंत्र्यांच्याच निष्क्रियतेचा चेहरा दाखवतात. जिल्ह्यात विकासासंदर्भातील जे प्रश्‍न निर्माण झाले आहेत ते पालकमंत्री प्रकाश महेता काही प्रकाश पाडू न शकल्यामुळेच. रायगड जिल्ह्याबद्दल काहीही आस्था नसलेला पालकमंत्री रायगडवर लादला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री या पदावर शेंदुर फासलेला धोंडा बसवलाय याची खात्री पटते. या धोंड्याची रायगड जिल्ह्याला अजिबात गरज नाही.
      रायगडचे पालकमंत्रीपद म्हणजे एक खेळ आहे आणि येथील जनता मूर्ख आहे, असा त्यांचा समज झालेला आहे. त्यामुळे अनेक महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे त्यांना महत्वाचे वाटत नाही. प्रोटोकॉल वगैरेची त्यांना काही तमा नाही. ते वेळ पाळण्याबाबत प्रसिद्ध नाहीत. अनेक कार्यक्रमांत त्यांची लेटलतिङ्गी दिसून आली आहे. पत्रकार परिषद बोलावून स्वत: तासादोनतासांनी उपस्थित राहण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. यावर्षी ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावर राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपस्थित राहण्याचा प्रोटोकॉल पाळण्याचे औचित्य त्यांनी दाखवले नाही. कृषीदिनी १ जुलै रोजी राज्यात सरकारने आयोजित केलेल्या २ कोटी वृक्षारोपणाच्या जिल्ह्यातील कार्यक्रमातही दांडी मारुन प्रकाश मेहता यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री सरकारी योजनेला फाट्यावर मारतो हे दाखवून दिले. त्यापूर्वी १ मे रोजी जिल्हा मुख्यालयाच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहून या जिल्ह्याचे आपल्याला काही पडले नाही, हे त्यांनी दाखवून दिले होते. अलिबागच्या पोलीस परेड मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापनदिन मुख्य ध्वजारोहण समारंभ रायगड जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या अनुपस्थितीत पार पडला. पालकमंत्र्यांच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी शितल उगले यांनी ध्वजारोहण केले आणि पोलीस मानवंदना स्वीकारली. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या दिवशी जिल्हास्तरावर होणार्‍या मुख्य ध्वजारोहण समारंभाला त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हजेरी लावावी आणि ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारावी व संचलनाची पहाणी करावी हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मोठ्या अभिमानाने या सोहळ्यांना हजेरी लावत आले आहेत. पण रायगड जिल्ह्यात याला अपवाद ठरले प्रकाश मेहता. रायगड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ध्वजारोहण समारंभाला उपस्थित न राहणारे ते पालकमंत्री ठरले. यापूर्वीच्या कॉंग्रेस असो, वा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालकमंत्र्यांनी कधीही महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहुन या जाहीर कार्यक्रमाचा, उपस्थितांचा, राजशिष्टाचाराचा अवमान केला नव्हता, पण हा अवमान भाजपच्या पालकमंत्र्याकडून झाला. त्यानंतर त्यांना असा अवमान करणे म्हणजे डाव्या हाताचा मळ वाटू लागला. रायगड जिल्हा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही ते मनाने व अंतराने रायगडपासून हजारो मैल दूर आहेत. त्यामुळेच महाडला वेळीच येऊन मदत व शोध कार्याची सूत्रे हाती घेण्याची त्यांना गरज वाटली नाही. प्रकाश मेहतांनी निदान मदत व शोध कार्याची सूत्रे हाती घेतली असती तर जिल्हाला पालकमंत्री आहे, हे दिसले असते. पण तसे व्हायचे नव्हते. या दुर्घटनेनंतर बचाव कार्य झाले नाही, झाले ते शोध कार्य. घटना कळल्यानंतर जर ताबडतोब बचाव कार्य सुरु झाले असते तर आजच्याइतके शोधकार्य लांबले नसते. जिल्ह्याचा पालकमंत्रीच जर दुर्घटना घडल्यानंतर २० तासांनी पोहोचत असेल तर या जिल्ह्याच्या आपत्तीव्यवस्थापनाचे कसे तीनतेरा वाजलेले आहेत हे लक्षात येते.
     आमचे पत्रकार आपत्तीआधी आणि आपत्तीनंतर अलर्ट असतात हे वारंवार दिसून आले आहे. सदर ब्रिटीशकालीन पूल कधीही कोसळून अनर्थ घडेल हे भाकीत नव्हे तर वास्तव पत्रकारांनी तीन वर्षांपूर्वी मांडले होते, पण त्यावेळच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारची व आजच्या सरकारची गेंड्याची कातडी थरथरली नाही. ‘ज्याच्या हाती सत्ता तो तत्ववेत्ता’ अशा पद्धतीने गेली काही दशके राज्यकारभार चालू आहे, त्यातच भाजप-सेना युतीच्या राजवटीत प्रकाश मेहता यांच्यासारखे पालकमंत्री रायगडला मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे रायगड जिल्ह्यासमोर अनंत अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या अकार्यक्षम पालकमंत्र्याला पदावरुन दूर करुन जिल्हाला कार्यक्षम, विनयशील, व्यसनांपासून दूर असणारा पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिला तर रायगडकरांसाठी ही बाब वाईटातून चांगली ठरेल.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

अफजलखानाचे सासरे आहात का?

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आणि त्यांची युद्धनीती, शौर्य हे सर्व नेत्रदीपक आहे. त्यांचा हा पैलू देशाला एक वेगळेपण देतो, तसेच महाराष्ट्राला देशात मान मिळवून देतो. तत्कालिन हिंदुस्थानात माता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, ते सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शिवरायांनी महाराष्ट्रात साकार केले. पण हे करताना त्यांनी हिंदू धर्मातील जातीपातीची उतरंड बाजूला केली आणि वेशीबाहेर असलेल्या अस्पृश्यांसह ब्राह्मण, कुणबी, मराठे, आगरी, कोळी, माळी, भंडारी, प्रभू आदी अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करुन सुराज्य राबविले. म्हणूनच शिवराय खर्‍या अर्थाने रयतेचे राजा ठरले. तथापि हिंदुस्थानला इंग्रजाकडून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर देशवासियांसाठी भारत आणि परदेशियांसाठी इंडिया असे नामकरण झाले. पण आज भारत आणि इंडिया दोन देश असल्यासारखे झाले आहेत. गरिबांचा भारत आणि श्रीमंतांचा इंडिया. यात शिवरायांचे सुराज्य अनुभवता येत नाही. अशा परिस्थितीत  महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता  ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील शिवरायांबाबतचे चार धडेच वगळले जाणे, हे शिवरायांच्या नावाने राज्यकारभार करणार्‍या केंद्र व राज्य सरकारला शोभादायक नाही. अधिक शोभा होऊ नये म्हणून राज्य सरकारने वगळलेले चार धडे व अफजलखान वधाचे चित्र पुन्हा त्या पाठ्युस्तकांत अंतर्भूत करावे.
    छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आपल्या जिल्ह्यातील रायगडावर होती, याचा रायगडकर म्हणून आपल्याला अभिमान आहे. अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला म्हणून त्याचा सातारकरांना अभिमान वाटतो. त्यांचा जन्म पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली म्हणून पुणेकरांना त्याचा अभिमान वाटतो. या पुण्याने जशी शिवशाही पाहिली, तशीच शिवरायांचे नाव घेऊन चालवलेली पेशवाईही पाहिली. आजही या पेशवाईच्या खाणाखुणा आपल्याला पुण्यात पहायला मिळतात. या खाणाखुणा आता पुण्यातच नाही, तर पुण्यातील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातही पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री मराठा आहे म्हणून शिवशाही अवतरते आणि मुख्यमंत्री ब्राह्मण आहे म्हणून पेशवाई अवतरते असे नाही. परंतु देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता  ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देदीप्यमान कारकीर्दीवरील ‘शिवरायांचे सक्षम प्रशासन’, ‘शिवरायांची युद्धनीती’, ‘जनतेचे राजा शिवाजी’, ‘प्रेरणेचा जिवंत स्रोत’ हे चार धडे वगळले गेले  व मराठी माध्यम चौथीच्या पुस्तकात आधीचे अफजलखान वधाचे चित्र वगळून त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांचे आलिंगनाचा पवित्रा घेतलेले चित्र छापण्यात आले आहे. हा निव्वळ योगायोग समजाचा का?  इतिहासाची ही मोडतोड पाठ्यपुस्तक मंडळाने स्वत:च्या अकलेने केलेली नसणार हे स्पष्ट आहे. मग हे काम सरकारने या मंडळाकडून का करवून घेतले असा प्रश्‍न निर्माण होतो. खरेतर देशाचे पंतप्रधान बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी रायगडावर शिवसमाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही शिवराज्याभिषेकाचे निमित्त साधून तिसर्‍यांदा रायगडची धूळ मस्तकी लावण्यासाठी किल्ले रायगडावर आले. शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही रायगड वार्‍या केल्या आहेत. रायगडावर रायगड महोत्सव त्यांनी घडवून आणला. हे सर्व शिवप्रेम खोटे की काय असे शिवरायांचे धडे वगळले गेल्याने वाटत आहे.
     इतिहास हा इतिहास असतो. इतिहास हा मार्गदर्शक असतो. तो जर माहीत नसेल आपल्या वाटचालीतील दिशांचे आकलन होत नाही. योग्य-अयोग्य याची निवड करण्याची आकलन क्षमता  उरत नाही.  काही निर्णय इतिहासाच्या कसोटीवर घासून घेतले तर त्याचा फायदाच होतो. शिवरायांची कारकीर्द तर इतिहासाच्या कसोटीवरील पराक्रमाचे आणि दूरदृष्टीचे वैभवसंपन्न उदाहरण आहे. ज्या मातीला शिवरायांचा गंध आहे, त्या महाराष्ट्रात जन्म घेणार्‍या पिढ्यांना शिवइतिहासाचे बाळकडू पाजलेच पाहिजे. या बाळकडूवरच अन्याय, अत्याचार यांच्याशी झुंजण्याचे बळ त्यांना मिळणार आहे. पण हे बळ मिळू नये म्हणून की काय हे गेल्या काही वर्षांत इतिहास बदलण्याचा प्रयत्न कॉंग्रेस, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात झाला, तोच प्रकार भाजप-सेना युती सरकारने चालू ठेवला आहे. या राज्य सरकारमध्ये शिवसेना आहे. असे असूनही येथे इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ४ थीच्या पुस्तकातून शिवरायांचे धडे वगळले जातात, तर मराठी माध्यम ४ थीच्या इतिहासाच्या पुस्तकात अफजलखान वधाच्या छायाचित्रा ऐवजी अफजलखान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आलिंगनाचा पवित्रा घेतलेले छायाचित्र दाखवले जाते, याचे आश्‍चर्य वाटते.
      छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा सुराज्यासाठी होता. तो अन्यायकारी सत्तांशी होता. दुष्ट शक्तींशी होता. हिंदू-मुस्लिम असा नव्हता. त्या काळात बादशहा औरंगझेबाकडे, तसेच आदिलशहाकडे विविध पदांवर हिंदू होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे विविध पदावर मुस्लीम होते. ते धर्म न पाहता एकमेकांशी लढून चाकरी बजावत होते. त्या काळात धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव हे शब्दही विकसित झाले नव्हते, या शब्दांचा शोध देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागला आणि त्याच शब्दांचा आधार घेऊन धार्मिक अनुनय केला जाऊ लागला. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता. पण मतपेटीच्या वर्चस्वासाठी धर्माकडून अपेक्षा बाळगली जाऊ लागली आणि धर्माचे लांगूलचालनही केले जाऊ लागले. धर्माचे रंग बदलत राहिले, पण अनुनय तोच राहिला. म्हणूनच सत्ताबदल होऊनही अफजलखानाचे सरकारांमधील प्रेम कायम राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिवे मारण्यास आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढल्याबद्दल त्याकाळी मुस्लीम समाजाला काही वाटले नाही आणि आजही वाटत नाही, कारण ती घटना हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी नव्हती, दोन सत्तांमधील होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजखानाचा कोथळा काढला, हा गुन्हा होता अशा थाटात माजी-आजी सरकारे वागत आली आहेत आणि अफजखानाचे उदात्तीकरण त्यांनी चालवले आहे. एका सरकारने उदात्तीकरणातूनच प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीवर अनधिकृत आलिशान वास्तू उभी राहू दिली. अफजलखानाच्या वधाच्या पोस्टरवर बंदी आणली आणि दुसर्‍या सरकारने पाठ्यपुस्तकातील आधीचे अफजलखान वधाचे चित्र वगळून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान आलिंगनोत्सुक असल्याचे चित्र छापले. उद्या तोही धडा वगळला तर त्याचे नवल नाही. 
    माजी-आजी सरकारे आणि अफजलखानप्रेमी आपण जणू अफजलखानाचे सासरे असल्यासारखे त्याची बाजू घेऊन वागत आहेत. पण अफजलखानाने शिवरायांना जिवे मारायला येण्यापूर्वी आपल्या ६४ बायकांना मारुन सर्व सासर्‍यांना कन्यावियोग दिला आणि शिवरायांना मारण्याऐवजी स्वत:चीच कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी खोदून गेला, हे वास्तव कसे नाकारता येईल. त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा गेली अनेक वर्षे शिवभक्त आग्रह धरत आहेत. त्यांचे काही चूक नाही. ते काही ती कबर पाडा असे म्हणत नाहीत. कारण ती शिवप्रतापाची खूण आहे. माता जिजाऊंच्या आज्ञेने ती शिवरायांनी ती कबर बांधून घेतली. तेथे दिवाबत्तीची सोयही केली. पण कबरीभोवती त्यांनी कसलेही बांधकाम केले नाही. उन्हा-पावसात ती कबर लांबूनही शत्रूला दिसावी आणि त्यामुळे त्यांच्या उरात धडकी भरावी हा त्यामागचा हेतू होता. कोणी आमच्या स्वराज्यावर चालून आले तर त्याचे धड व शिर वेगळे केले जाईल आणि अशीच कबर बांधण्यात येईल हा त्यामागचा इशारा होता. कालांतराने अङ्गझलखान याचे उदात्तीकरण सुरु झाले. त्याच्या कबरीभोवताली ५ बाय ५ या क्षेत्रङ्गळाची छोटी अनधिकृत शेड बांधली गेली,  १९८५ सालानंतर वनजमिनीवर अतिक्रमण करुन खानाच्या कबरीभोवताली आजपर्यंत सुमारे पाच हजार चौरस ङ्गुटांचे अनधिकृत बांधकाम उभे राहिले आणि तेथे धार्मिक कार्यक्रमही सुरू झाले. त्या कबरीचे नामकरण दर्गा करण्यात आले आहे. अङ्गझलखान हा कोणी संत नव्हता, तर तो क्रूर आक्रमक होता. त्यामुळे त्याच्या कबरीला दर्गा संबोधणे हास्यास्पद आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रतापगड येथील अङ्गझलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम तोडण्याबाबत आदेश दोन वर्षांपूर्वी दिले आहेत. परंतु त्याची कार्यवाही शासनाने अद्याप केलेली नाही. वास्तविक तेथील अनधिकृत बांधकाम पाडून अफजलखान वधाची शिल्पसृष्टी तेथे उभी करुन शिवप्रताप चिरंतन केला पाहिजे, पण अफलखान वधाचे पोस्टर लावण्यास बंदी घालणारी व पाठ्यपुस्तकातूनच अफलखान वधाचे चित्र वगळणारी सरकारे यांना या ऐतिहासिक घटनेचे वावडे आहे, त्यामुळे शिवभक्तांना तेथे अफजखान वधाची स्मृती म्हणून शिवप्रतापदिन साजरा करायला बंदी घातली जाते. सारेच दुर्दैवी आहे.
   जो महाराष्ट्र शिवरायांनी घडवला, त्याच महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील शिवरायांबाबतचे ४ धडे वगळले जाणे, म्हणजे या विद्यार्थ्यांना शिवचरित्रापासून अंधारात ठेवण्यासारखे आहेच, पण महाराष्ट्राशीही हा कृतघ्नपणा आहे. ही चूक सुधारण्यासाठी सरकारने मराठी माध्यम इयत्ता ४ थीच्या पुस्तकात पुन्हा अफजलखान वधाचे चित्र छापावे, तसेच इंग्रजी माध्यमाच्या ४ थीच्या पुस्तकातील वगळलेले ४ धडे पुन्हा अंतर्भूत केलेले पाठ्यपुस्तक प्रसिद्ध करावे आणि चुकीचे पुस्तक मागे घ्यावे. ते धडे वगळल्याने आणि छायाचित्र बदलल्याने पुरोगामीत्व सिद्ध होत नाही. शिवराय पुरोगामी आणि प्रतिगामी विचारांपलिकडचे होते. त्यांना कोणत्याही विचारात बांधता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्शाची, त्यांच्या सक्षम राज्यकारभाराची, त्यांच्या युद्धनीतीची महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही गरज आहे, पण महाराष्ट्रातच त्यांची उपेक्षा होत आहे, यासारखा सत्ताधार्‍यांचा आणि विरोधकांचीही दुसरा कपाळकरंटेपणा नाही.