शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

‘सेल्फी’श पालकमंत्र्यांना घरी बसवा

 -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



    रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांची निष्क्रियता आणि उद्धटपणा महाड दुर्घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. रायगडच्या पत्रकारांमध्ये या दुर्घटनेबद्दल जितकी संवेदना आहे त्यांचा अंशदेखील जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांत पहायला मिळाली नाही. पत्रकारांनी दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली, पण पालकमंत्री घटनेच्या दुसर्‍या दिवशी २० तासांनी घटनास्थळी पोहचतात. तेथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्य उत्तरे देण्याऐवजी गुटख्याचा तोबरा तोंडात भरलेल्या अवस्थेत पत्रकारांच्या अंगावर धावून जातात आणि म्हणतात, पक्ष माझ्यासोबत आहे. या त्यांच्या सत्तेचा माजामुळेच दुर्घटनाग्रस्तांचा बचाव व शोधकार्य वेळेवर सुरु झाले नाही. जुना पूल सावित्री नदीने तिच्यावरील वाहनांसकट विसर्जित केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहता यांना रायगडच्या पालकमंत्रीपदावरुनच नाही तर राज्याच्या गृनिर्माणपदावरुनही विसर्जित केले पाहिजे.
      महाड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर या मार्गातील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल मंगळवार, २ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता कोसळला. पूल कोसळल्यानंतर त्या मार्गावरुन जाणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या जयगड ते मुंबई आणि राजापूर बोरिवली या साधारण २२ प्रवासी घेऊन जाणार्‍या दोन बसेस व इतर काही वाहने बुडून बेपत्ता झाली. सावित्री नदीवरीत एस.टी. बसेच आणि इतर वाहने यांचा शोध सुरु असताना विधानसभा अधिवेशनात बुधवार, ३ ऑगस्ट रोजी सत्ताधार्‍यांविरोधात राष्ट्रवादी, कॉंग्रेस आग ओकत होती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या घटनेला त्या दिवशी १२ तास होऊनही या घटनेत सापडलेल्या जीवांना वाचविण्याबाबत किंवा शोधण्याबाबतची ठोस पावले उचलण्याबाबत विधानसभेत विशेष चर्चा करण्याचे भान कोणी दाखवले नाही. याप्रसंगी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन जलद गतीने दुर्घटनाग्रस्त बसेस आणि इतर वाहनांचा कसा शोध लागेल याच्याकडे लक्ष पुरविणे आवश्यक होते. पण सत्ताधार्‍यांनी आणि विरोधकांनीही या घटनेबाबत पाहिजे तितका संवेदनशीलपणा दाखविला नाही. या सर्व गदारोळात आंतरराष्ट्रीय दर्जाची शोध मोहिम आखली गेली नाही. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी त्याबाबतची योग्य पावले उचलली नाही, त्यामुळे केवळ दूरवर वाहत गेलेले मृतदेहच हाती लागत आहेत.
      मुळात महाड दुर्घटनेनंतर प्रशासनात समन्वयाचा अक्षम्य असा अभाव पहायला मिळाला. जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती मंगळवार, २ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कळते, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रात्री २ वाजेपर्यंत या घटनेची माहिती मिळत नाही. बुधवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ पर्यंत परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना माहिती मिळत नाही आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांना सकाळी ११ वाजेपर्यंत या घटनेचा पत्ताच लागत नाही, ही बाब धक्कादायक आहे. घटना घडल्यानंतर ताबडतोब रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळी धाव घेणे अपेक्षित होते. त्यांनी मदत आणि शोध कार्याची सूत्रे हाती घेणे आवश्यक होते. पण रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक मोहम्मद सुवेझ हक घटनास्थळी हजर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी ६ वाजेपासून शोधकार्य सुरु केले. त्यानंतर तटरक्षक दल, एनडीआरएफ, नौदलाची हेलिकॉप्टर्सने बेपत्ता वाहनांचा शोध सुरु झाला. सकाळी शोधकार्य सुरु झाल्यानंतर दहा तासांनी पालकमंत्री प्रकाश मेहता महाडला उगवले आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागून स्वत:ची सेल्फी काढण्यात ते गुंग झाले. या माणसाच्या चेहर्‍यावर घटनेचे कसलेच गांभीर्य दिसले नाही. आपण पालकमंत्री आहोत, आपण कसे वागले पाहिजे याचे भान त्यांना असल्याचे कधीच दिसले नाही, या घटनेनंतर याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. 

      ही घटना घडल्याचे जिल्हा प्रशासनाला कळल्यानंतर ताबडतोब अलिबाग येथील पत्रकारांनी महाड येथील घटनास्थळी धाव घेतली. तीनच्या सुमारास तिथे ते पोहचलेही. महाड येथील प्रिंट मिडियाचे तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार तेथे हजर होतेच. पण जिल्ह्यातील दोन्ही माध्यमांतील पत्रकारांनी तेथे धाव घेतली. ते पगारी नोकर होते म्हणून नाही, तर घटनेचे गांभीर्य आणि आपल्या पेशाची निष्ठा व तळमळ म्हणून तेथे वार्तांकन करण्यासाठी गेले आणि सतत तीन दिवस तहान-भूक-झोप विसरुन ते तेथे तंबू ठोकून आहेत. पण पालकमंत्री प्रकाश मेहता दुसर्‍या दिवशी पाच वाजता घटनास्थळी पोहचतात आणि तेथे पर्यटनाला आल्यासारखे वागतात, आपल्या पदाच्या जबाबदारीचे भान दाखवत नाहीत, हा असंवदेनशीलतेचा कळसच म्हणायचा. दुसर्‍या दिवशी गुरुवार, ४ ऑगस्ट रोजी साम टीव्हीचे प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी तेथे आलेल्या बेपत्ता, मृतांच्या नातेवाईकांना माहिती व मार्गदर्शनाची तसेच त्यांच्या निवास व भोजनाची काय व्यवस्था केली आहे, असे पालकमंत्र्यांना विचारल्यावर त्यांनी ‘काहीतरी फालतू प्रश्‍न काय विचारता?’ असे म्हणत एखाद्या गुंडाप्रमाणे तांबे यांना दमदाटी केली व भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले. या वृत्तीला काय म्हणायचे? मेहता स्वत:ला रायगड जिल्ह्याचा पालक समजत नसून मालक समजत आहेत आणि यातूनच त्यांना माज चढला आहे हे उघड आहे. रायगडच्या जनतेने आपल्याला निवडून दिलेले नाही, ही जनता आपले काही वाकडे करु शकत नाही, हाच त्यांना माज चढला आहे. त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात रायगडचा विकास खुंटला आहे. आज रायगड जिल्ह्याची जी दुर्दशा आहे, त्याचे कारण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहताच आहे. रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे, मुंबई-गोवा राज्य महामार्ग असो, अथवा शहरे, गावांतील रस्त्यांवरील पडलेले खड्डे पालकमंत्र्यांच्याच निष्क्रियतेचा चेहरा दाखवतात. जिल्ह्यात विकासासंदर्भातील जे प्रश्‍न निर्माण झाले आहेत ते पालकमंत्री प्रकाश महेता काही प्रकाश पाडू न शकल्यामुळेच. रायगड जिल्ह्याबद्दल काहीही आस्था नसलेला पालकमंत्री रायगडवर लादला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री या पदावर शेंदुर फासलेला धोंडा बसवलाय याची खात्री पटते. या धोंड्याची रायगड जिल्ह्याला अजिबात गरज नाही.
      रायगडचे पालकमंत्रीपद म्हणजे एक खेळ आहे आणि येथील जनता मूर्ख आहे, असा त्यांचा समज झालेला आहे. त्यामुळे अनेक महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे त्यांना महत्वाचे वाटत नाही. प्रोटोकॉल वगैरेची त्यांना काही तमा नाही. ते वेळ पाळण्याबाबत प्रसिद्ध नाहीत. अनेक कार्यक्रमांत त्यांची लेटलतिङ्गी दिसून आली आहे. पत्रकार परिषद बोलावून स्वत: तासादोनतासांनी उपस्थित राहण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. यावर्षी ६ जूनला शिवराज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावर राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपस्थित राहण्याचा प्रोटोकॉल पाळण्याचे औचित्य त्यांनी दाखवले नाही. कृषीदिनी १ जुलै रोजी राज्यात सरकारने आयोजित केलेल्या २ कोटी वृक्षारोपणाच्या जिल्ह्यातील कार्यक्रमातही दांडी मारुन प्रकाश मेहता यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री सरकारी योजनेला फाट्यावर मारतो हे दाखवून दिले. त्यापूर्वी १ मे रोजी जिल्हा मुख्यालयाच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहून या जिल्ह्याचे आपल्याला काही पडले नाही, हे त्यांनी दाखवून दिले होते. अलिबागच्या पोलीस परेड मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापनदिन मुख्य ध्वजारोहण समारंभ रायगड जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या अनुपस्थितीत पार पडला. पालकमंत्र्यांच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी शितल उगले यांनी ध्वजारोहण केले आणि पोलीस मानवंदना स्वीकारली. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या दिवशी जिल्हास्तरावर होणार्‍या मुख्य ध्वजारोहण समारंभाला त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हजेरी लावावी आणि ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारावी व संचलनाची पहाणी करावी हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मोठ्या अभिमानाने या सोहळ्यांना हजेरी लावत आले आहेत. पण रायगड जिल्ह्यात याला अपवाद ठरले प्रकाश मेहता. रायगड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ध्वजारोहण समारंभाला उपस्थित न राहणारे ते पालकमंत्री ठरले. यापूर्वीच्या कॉंग्रेस असो, वा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालकमंत्र्यांनी कधीही महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहुन या जाहीर कार्यक्रमाचा, उपस्थितांचा, राजशिष्टाचाराचा अवमान केला नव्हता, पण हा अवमान भाजपच्या पालकमंत्र्याकडून झाला. त्यानंतर त्यांना असा अवमान करणे म्हणजे डाव्या हाताचा मळ वाटू लागला. रायगड जिल्हा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही ते मनाने व अंतराने रायगडपासून हजारो मैल दूर आहेत. त्यामुळेच महाडला वेळीच येऊन मदत व शोध कार्याची सूत्रे हाती घेण्याची त्यांना गरज वाटली नाही. प्रकाश मेहतांनी निदान मदत व शोध कार्याची सूत्रे हाती घेतली असती तर जिल्हाला पालकमंत्री आहे, हे दिसले असते. पण तसे व्हायचे नव्हते. या दुर्घटनेनंतर बचाव कार्य झाले नाही, झाले ते शोध कार्य. घटना कळल्यानंतर जर ताबडतोब बचाव कार्य सुरु झाले असते तर आजच्याइतके शोधकार्य लांबले नसते. जिल्ह्याचा पालकमंत्रीच जर दुर्घटना घडल्यानंतर २० तासांनी पोहोचत असेल तर या जिल्ह्याच्या आपत्तीव्यवस्थापनाचे कसे तीनतेरा वाजलेले आहेत हे लक्षात येते.
     आमचे पत्रकार आपत्तीआधी आणि आपत्तीनंतर अलर्ट असतात हे वारंवार दिसून आले आहे. सदर ब्रिटीशकालीन पूल कधीही कोसळून अनर्थ घडेल हे भाकीत नव्हे तर वास्तव पत्रकारांनी तीन वर्षांपूर्वी मांडले होते, पण त्यावेळच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारची व आजच्या सरकारची गेंड्याची कातडी थरथरली नाही. ‘ज्याच्या हाती सत्ता तो तत्ववेत्ता’ अशा पद्धतीने गेली काही दशके राज्यकारभार चालू आहे, त्यातच भाजप-सेना युतीच्या राजवटीत प्रकाश मेहता यांच्यासारखे पालकमंत्री रायगडला मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे रायगड जिल्ह्यासमोर अनंत अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या अकार्यक्षम पालकमंत्र्याला पदावरुन दूर करुन जिल्हाला कार्यक्षम, विनयशील, व्यसनांपासून दूर असणारा पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिला तर रायगडकरांसाठी ही बाब वाईटातून चांगली ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा