बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

हुतात्मा स्मारके अश्रू ढाळताहेत...

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉   


      दीडशे वर्षे भारतावर राज्य करणार्‍या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! ब्रिटिशांच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यविरांनी स्वातंत्र्याच्या समरात उडी घेतली. घरदार, संसार सार्‍याला तिलांजली दिली. भारतमाता स्वतंत्र व्हावी हीच त्यांची इच्छा होती. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. यासाठी अनेकांना हौतात्म पत्करावे लागले. दुर्दैवाने स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी आणि सत्ताधार्‍यांसाठी स्वातंत्र्याची मशाल पेटविणारे क्रांतिवीर ‘अनोळखी’ झाले आहेत. सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे. त्यामुळेच रायगडसह संपूर्ण राज्यातील हुतात्मा स्मारकांची दूरवस्था झाली आहे. ही हुतात्मा स्मारके आपल्यात दुर्दशेवर अश्रू ढाळताहेत. हे अश्रू पुसण्याची गरज आहे.
     रायगड ही छत्रपती शिवाजी महाराज निर्मित हिंदवी स्वराज्याची राजधानी. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे ‘रायगड’ असे नामाभिदान होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा आणि आदर्श या जिल्ह्याला लाभलेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे ब्रिटिशांबरोबर सशस्त्र लढा देताना हुतात्मा झालेले व इंग्रजांना हैराण करुन सोडणारे शूरवीर याच जिल्ह्यात जन्माला आले. त्यानंतच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही अभिनव भारत संस्थेती स्थापना केली. त्यातही रायगड जिल्ह्याने- विशेषत: पेणमधील मंडळींनी कृतीशील सहभाग घेतला. लोकमान्य टिळकांनीही रायगड जिल्ह्यात येऊन स्वराज्याचा त्रिसुत्री मार्ग सांगितला. त्यातही रायगड जिल्हा मागे राहिला नाही.
     गांधीयुगात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९२० चा असहकार लढा, १९२८ चा सायमन कमिशन चालते व्हा लढा, १९३० चा मिठाचा सत्याग्रह, १९३२ चा कायदेभंग, १९४१ चा वैयक्तिक सत्याग्रह, १९४२ चा चले जाव लढा, एवढ्यावरच न थांबत १९४७ साली स्वराज्य मिळाल्यानंतरही रायगड जिल्ह्यातील महाड येथील नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली झालेला जंजिरा संस्थान मुक्ती लढा आणि १९५५ चा गोवा मुक्ती लढा या सर्व संग्रामांत रायगड जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. या सर्व लढ्यांच्या स्मृती रायगड जिल्ह्यात १६ हुतात्मा स्मारकांच्या रुपाने जागत्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्रातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अशा हुतात्म्यांची स्मारके उभारण्याची कल्पना रायगड जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांची आहे. १९८० साली ते सातारा येथील वडूज येथे गेले असताना तेथे त्यांना हुतात्मा स्मारकाची कल्पना सुचली. हुतात्मा स्मारकाची वास्तू लोकोपयोगी, प्रेरणादायी, आकर्षक व्हावी. युवकांना स्वातंत्र्य प्रेरणेचा उगम कळावा, अशी अंतुले यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी राज्यातील पाच वास्तू शिल्प संस्थांच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित केली. त्यात तीन आर्किटेक्चर कॉलेजेस आणि दोन ऍकेडेमिजमधील विद्यार्थ्यांनी दोनशे प्रवेश पत्रिका पाठवल्या होत्या. त्यातील एकाचे डिझाईन बक्षिसपात्र ठरले, त्यावरच राज्यातील २१६ हुतात्मा स्मारके उभी राहिली आहेत. पण यातील बहुसंख्य हुतात्मा स्मारकांची आज दूरवस्था झाली आहे. रायगड जिल्हाही याला अपवाद नाही.
     रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यामध्ये शिरढोण येथे हुतात्मा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, पनवेल येथे हुतात्मा तुळशीराम बाळकृष्ण हिरवे (गुरुजी), पेण येथे हुतात्मा विनायक पांडुरंग कोल्हटकर, उरण तालुक्यातील पाणदिवे येथे हुतात्मा परशुराम माया पाटील, चिरनेर येथे हुतात्मा धाकू गवत्या फोफेरीकर, मोठी जुई येथे हुतात्मा रामा बामा कोळी, धाकटी जुई येथे हुतात्मा आनंद माया पाटील, दिघोडे येथे हुतात्मा आलु बेमट्या म्हात्रे, कोप्रोली येथे हुतात्मा परशुराम मोरेश्‍वर शिंदे, खोपटे येथे हुतात्मा हसुराम बुधाजी घरत, महाड तालुक्यातील शेलटोली येथे हुतात्मा नथु दौलत टेकावले, महाड येथे हुतात्मा कमलाकर विठ्ठल दांडेकर, नडगाव तर्फ बिरवाडी येथे हुतात्मा अर्जुन कानू भोई, कर्जत तालुक्यामधील माथेरान येथे हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण तथा भाई कोतवाल, मानिवली येथे हिराजी गोमा पाटील, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे हुतात्मा शेषनाथ नानाभाई पितळे तथा शेषनाथ वाडेकर यांची स्मारके आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या हुतात्मा स्मारकांची अवस्था बिकट आहे.
      राज्यात बहुतेक ठिकाणी ही स्मारके गावात एका बाजूला, अगर गावाच्या बाहेर उभारली गेली आहेत. याचा फायदा समाजकंटकांनी घेतला आणि अनेक स्मारके जुगाराचे अड्डे, दारुबाजांच्या नशापानाची ठिकाणे अगर प्रेमीयुगुलांच्या मीलनाची स्थाने बनली. ही स्थिती नजरेस आणल्यावर शासनाने ती देखभालीसाठी स्वयंसेवी सार्वजनिक संस्थांकडे दिली. ३४-३५ वर्षांपूर्वी बांधलेली ही स्मारके आता दुरुस्तीला आली आहेत. गावातील ज्या स्वयंसेवी संस्थांनी या स्मारकांच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली आहे, त्या संस्थांची आर्थिक स्थिती या स्मारकांची दुरुस्ती करण्याइतपत नाही. त्यामुळे शासनाने या संदर्भात निर्णय घेतला की या स्मारकांच्या दुरुस्तीची अंदाजपत्रके शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार करावीत आणि प्रत्यक्ष दुरुस्ती त्या त्या जिल्ह्यातील आमदार-खासदारांना दिल्या जाणार्‍या स्थानिक विकास निधीतून केली जावी. मात्र बहुतेक ठिकाणी दुरुस्ती लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून अद्यापी झालेली नाही. रायगड जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. येथील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था होऊ लागलेली आहे. ही स्मारके अडगळीत पडली आहेत. त्यांच्यापासून देशप्रेमाची प्रेरणा घेणे तर दूर, त्यांची साधी देखभाल सुद्धा केली जात नाही. गेल्यावर्षी चिरनेर येथील हुतात्मा स्मारकातील हुतात्मा स्तंभाची ज्योत कोसळली. ती बसवून घेण्यासाठी चिरनेरकरांना बराच संघर्ष करावा लागला. या हुतात्मा स्मारकांची दूरवस्था गौरवशाली परंपरा सांगणार्‍या या रायगड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा किंवा सुसज्ज स्मारके ठेवण्याचा विचार राज्य सरकारने करावा.
     ‘नाही दिवा, नाही पणती’ अशा अवस्थेत असणार्‍या हुतात्मा स्मारकांच्या देखभालीसह तेथील जागेचा योग्य उपयोग झाल्यास हुतात्मा स्मारकाची निश्चितच अभ्यास केंद्रे, पर्यटनस्थळ बनतील. त्यासाठी त्यांची कायमस्वरूपी देखभाल ग्रामपंचायतीकडे देण्याची, तसेच त्यासाठी दर वर्षी एकरकमी अनुदान देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने नुकतेच पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एकमताने माजी आमदारांचे निवृत्ती वेतन, आमदार, मंत्र्यांचे वेतन वाढवून घेतले, पण ज्यांच्यामुळे आपण सत्ता उपभोगतो आहोत आणि या सत्तेचे विरोधक म्हणूनही वावरतो आहोत, त्या हुतात्म्यांच्या स्मारकांच्या देखरेखीसाठी दरवर्षी एकरकमी अनुदान दिले जावे यासाठी कधी त्यांनी विधानसभा, विधानपरिषेदत आपली एकी दाखवली नाही. त्यामुळे हे खरेच आपले लोकप्रतिनिधी आहेत की, त्यांच्याच घराण्याचे, कुटुंबाचे प्रतिनिधी आहेत याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा