-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आणि त्यांची युद्धनीती, शौर्य हे सर्व नेत्रदीपक आहे. त्यांचा हा पैलू देशाला एक वेगळेपण देतो, तसेच महाराष्ट्राला देशात मान मिळवून देतो. तत्कालिन हिंदुस्थानात माता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, ते सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी शिवरायांनी महाराष्ट्रात साकार केले. पण हे करताना त्यांनी हिंदू धर्मातील जातीपातीची उतरंड बाजूला केली आणि वेशीबाहेर असलेल्या अस्पृश्यांसह ब्राह्मण, कुणबी, मराठे, आगरी, कोळी, माळी, भंडारी, प्रभू आदी अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करुन सुराज्य राबविले. म्हणूनच शिवराय खर्या अर्थाने रयतेचे राजा ठरले. तथापि हिंदुस्थानला इंग्रजाकडून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर देशवासियांसाठी भारत आणि परदेशियांसाठी इंडिया असे नामकरण झाले. पण आज भारत आणि इंडिया दोन देश असल्यासारखे झाले आहेत. गरिबांचा भारत आणि श्रीमंतांचा इंडिया. यात शिवरायांचे सुराज्य अनुभवता येत नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील शिवरायांबाबतचे चार धडेच वगळले जाणे, हे शिवरायांच्या नावाने राज्यकारभार करणार्या केंद्र व राज्य सरकारला शोभादायक नाही. अधिक शोभा होऊ नये म्हणून राज्य सरकारने वगळलेले चार धडे व अफजलखान वधाचे चित्र पुन्हा त्या पाठ्युस्तकांत अंतर्भूत करावे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आपल्या जिल्ह्यातील रायगडावर होती, याचा रायगडकर म्हणून आपल्याला अभिमान आहे. अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला म्हणून त्याचा सातारकरांना अभिमान वाटतो. त्यांचा जन्म पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली म्हणून पुणेकरांना त्याचा अभिमान वाटतो. या पुण्याने जशी शिवशाही पाहिली, तशीच शिवरायांचे नाव घेऊन चालवलेली पेशवाईही पाहिली. आजही या पेशवाईच्या खाणाखुणा आपल्याला पुण्यात पहायला मिळतात. या खाणाखुणा आता पुण्यातच नाही, तर पुण्यातील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातही पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री मराठा आहे म्हणून शिवशाही अवतरते आणि मुख्यमंत्री ब्राह्मण आहे म्हणून पेशवाई अवतरते असे नाही. परंतु देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देदीप्यमान कारकीर्दीवरील ‘शिवरायांचे सक्षम प्रशासन’, ‘शिवरायांची युद्धनीती’, ‘जनतेचे राजा शिवाजी’, ‘प्रेरणेचा जिवंत स्रोत’ हे चार धडे वगळले गेले व मराठी माध्यम चौथीच्या पुस्तकात आधीचे अफजलखान वधाचे चित्र वगळून त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांचे आलिंगनाचा पवित्रा घेतलेले चित्र छापण्यात आले आहे. हा निव्वळ योगायोग समजाचा का? इतिहासाची ही मोडतोड पाठ्यपुस्तक मंडळाने स्वत:च्या अकलेने केलेली नसणार हे स्पष्ट आहे. मग हे काम सरकारने या मंडळाकडून का करवून घेतले असा प्रश्न निर्माण होतो. खरेतर देशाचे पंतप्रधान बनण्यापूर्वी नरेंद्र मोदी रायगडावर शिवसमाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही शिवराज्याभिषेकाचे निमित्त साधून तिसर्यांदा रायगडची धूळ मस्तकी लावण्यासाठी किल्ले रायगडावर आले. शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही रायगड वार्या केल्या आहेत. रायगडावर रायगड महोत्सव त्यांनी घडवून आणला. हे सर्व शिवप्रेम खोटे की काय असे शिवरायांचे धडे वगळले गेल्याने वाटत आहे.
इतिहास हा इतिहास असतो. इतिहास हा मार्गदर्शक असतो. तो जर माहीत नसेल आपल्या वाटचालीतील दिशांचे आकलन होत नाही. योग्य-अयोग्य याची निवड करण्याची आकलन क्षमता उरत नाही. काही निर्णय इतिहासाच्या कसोटीवर घासून घेतले तर त्याचा फायदाच होतो. शिवरायांची कारकीर्द तर इतिहासाच्या कसोटीवरील पराक्रमाचे आणि दूरदृष्टीचे वैभवसंपन्न उदाहरण आहे. ज्या मातीला शिवरायांचा गंध आहे, त्या महाराष्ट्रात जन्म घेणार्या पिढ्यांना शिवइतिहासाचे बाळकडू पाजलेच पाहिजे. या बाळकडूवरच अन्याय, अत्याचार यांच्याशी झुंजण्याचे बळ त्यांना मिळणार आहे. पण हे बळ मिळू नये म्हणून की काय हे गेल्या काही वर्षांत इतिहास बदलण्याचा प्रयत्न कॉंग्रेस, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात झाला, तोच प्रकार भाजप-सेना युती सरकारने चालू ठेवला आहे. या राज्य सरकारमध्ये शिवसेना आहे. असे असूनही येथे इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ४ थीच्या पुस्तकातून शिवरायांचे धडे वगळले जातात, तर मराठी माध्यम ४ थीच्या इतिहासाच्या पुस्तकात अफजलखान वधाच्या छायाचित्रा ऐवजी अफजलखान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आलिंगनाचा पवित्रा घेतलेले छायाचित्र दाखवले जाते, याचे आश्चर्य वाटते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा सुराज्यासाठी होता. तो अन्यायकारी सत्तांशी होता. दुष्ट शक्तींशी होता. हिंदू-मुस्लिम असा नव्हता. त्या काळात बादशहा औरंगझेबाकडे, तसेच आदिलशहाकडे विविध पदांवर हिंदू होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे विविध पदावर मुस्लीम होते. ते धर्म न पाहता एकमेकांशी लढून चाकरी बजावत होते. त्या काळात धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव हे शब्दही विकसित झाले नव्हते, या शब्दांचा शोध देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागला आणि त्याच शब्दांचा आधार घेऊन धार्मिक अनुनय केला जाऊ लागला. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता. पण मतपेटीच्या वर्चस्वासाठी धर्माकडून अपेक्षा बाळगली जाऊ लागली आणि धर्माचे लांगूलचालनही केले जाऊ लागले. धर्माचे रंग बदलत राहिले, पण अनुनय तोच राहिला. म्हणूनच सत्ताबदल होऊनही अफजलखानाचे सरकारांमधील प्रेम कायम राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिवे मारण्यास आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढल्याबद्दल त्याकाळी मुस्लीम समाजाला काही वाटले नाही आणि आजही वाटत नाही, कारण ती घटना हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी नव्हती, दोन सत्तांमधील होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजखानाचा कोथळा काढला, हा गुन्हा होता अशा थाटात माजी-आजी सरकारे वागत आली आहेत आणि अफजखानाचे उदात्तीकरण त्यांनी चालवले आहे. एका सरकारने उदात्तीकरणातूनच प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीवर अनधिकृत आलिशान वास्तू उभी राहू दिली. अफजलखानाच्या वधाच्या पोस्टरवर बंदी आणली आणि दुसर्या सरकारने पाठ्यपुस्तकातील आधीचे अफजलखान वधाचे चित्र वगळून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान आलिंगनोत्सुक असल्याचे चित्र छापले. उद्या तोही धडा वगळला तर त्याचे नवल नाही.
माजी-आजी सरकारे आणि अफजलखानप्रेमी आपण जणू अफजलखानाचे सासरे असल्यासारखे त्याची बाजू घेऊन वागत आहेत. पण अफजलखानाने शिवरायांना जिवे मारायला येण्यापूर्वी आपल्या ६४ बायकांना मारुन सर्व सासर्यांना कन्यावियोग दिला आणि शिवरायांना मारण्याऐवजी स्वत:चीच कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी खोदून गेला, हे वास्तव कसे नाकारता येईल. त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा गेली अनेक वर्षे शिवभक्त आग्रह धरत आहेत. त्यांचे काही चूक नाही. ते काही ती कबर पाडा असे म्हणत नाहीत. कारण ती शिवप्रतापाची खूण आहे. माता जिजाऊंच्या आज्ञेने ती शिवरायांनी ती कबर बांधून घेतली. तेथे दिवाबत्तीची सोयही केली. पण कबरीभोवती त्यांनी कसलेही बांधकाम केले नाही. उन्हा-पावसात ती कबर लांबूनही शत्रूला दिसावी आणि त्यामुळे त्यांच्या उरात धडकी भरावी हा त्यामागचा हेतू होता. कोणी आमच्या स्वराज्यावर चालून आले तर त्याचे धड व शिर वेगळे केले जाईल आणि अशीच कबर बांधण्यात येईल हा त्यामागचा इशारा होता. कालांतराने अङ्गझलखान याचे उदात्तीकरण सुरु झाले. त्याच्या कबरीभोवताली ५ बाय ५ या क्षेत्रङ्गळाची छोटी अनधिकृत शेड बांधली गेली, १९८५ सालानंतर वनजमिनीवर अतिक्रमण करुन खानाच्या कबरीभोवताली आजपर्यंत सुमारे पाच हजार चौरस ङ्गुटांचे अनधिकृत बांधकाम उभे राहिले आणि तेथे धार्मिक कार्यक्रमही सुरू झाले. त्या कबरीचे नामकरण दर्गा करण्यात आले आहे. अङ्गझलखान हा कोणी संत नव्हता, तर तो क्रूर आक्रमक होता. त्यामुळे त्याच्या कबरीला दर्गा संबोधणे हास्यास्पद आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रतापगड येथील अङ्गझलखान कबरीच्या परिसरातील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम तोडण्याबाबत आदेश दोन वर्षांपूर्वी दिले आहेत. परंतु त्याची कार्यवाही शासनाने अद्याप केलेली नाही. वास्तविक तेथील अनधिकृत बांधकाम पाडून अफजलखान वधाची शिल्पसृष्टी तेथे उभी करुन शिवप्रताप चिरंतन केला पाहिजे, पण अफलखान वधाचे पोस्टर लावण्यास बंदी घालणारी व पाठ्यपुस्तकातूनच अफलखान वधाचे चित्र वगळणारी सरकारे यांना या ऐतिहासिक घटनेचे वावडे आहे, त्यामुळे शिवभक्तांना तेथे अफजखान वधाची स्मृती म्हणून शिवप्रतापदिन साजरा करायला बंदी घातली जाते. सारेच दुर्दैवी आहे.
जो महाराष्ट्र शिवरायांनी घडवला, त्याच महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या ४ थीच्या पाठ्यपुस्तकातील शिवरायांबाबतचे ४ धडे वगळले जाणे, म्हणजे या विद्यार्थ्यांना शिवचरित्रापासून अंधारात ठेवण्यासारखे आहेच, पण महाराष्ट्राशीही हा कृतघ्नपणा आहे. ही चूक सुधारण्यासाठी सरकारने मराठी माध्यम इयत्ता ४ थीच्या पुस्तकात पुन्हा अफजलखान वधाचे चित्र छापावे, तसेच इंग्रजी माध्यमाच्या ४ थीच्या पुस्तकातील वगळलेले ४ धडे पुन्हा अंतर्भूत केलेले पाठ्यपुस्तक प्रसिद्ध करावे आणि चुकीचे पुस्तक मागे घ्यावे. ते धडे वगळल्याने आणि छायाचित्र बदलल्याने पुरोगामीत्व सिद्ध होत नाही. शिवराय पुरोगामी आणि प्रतिगामी विचारांपलिकडचे होते. त्यांना कोणत्याही विचारात बांधता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्शाची, त्यांच्या सक्षम राज्यकारभाराची, त्यांच्या युद्धनीतीची महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही गरज आहे, पण महाराष्ट्रातच त्यांची उपेक्षा होत आहे, यासारखा सत्ताधार्यांचा आणि विरोधकांचीही दुसरा कपाळकरंटेपणा नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा