-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉
कलाप्रांतातील मी यात्रिक आहे. पेशाने मी हॉटेल व्यावसायिक आहे, परंतु मनाने कलाकार आहे. कलासक्त प्रवृत्तीमुळे जे सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहे, त्या त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रेम करतो. माझं चित्रकलेवर जसं प्रेम आहे, तसंच नाट्यकलेवरही प्रेम आहे. या कलांवर मी केवळ प्रेमच करीत नाही, तर माझे समग्र जीवनच कलामय बनले आहे. विविध वाद्यवादनात मी पारंगत आहे. गिटार वादनात मी विशेष निपुण आहे, ती मी रसिकांना रिझवण्यासाठी वाजवतो, तर स्वत:ला रिझवण्यासाठी आणि इतरांना आनंद देण्यासाठी चित्ररेखाटन करतो. कॅन्व्हासवर चित्रांचे रंगलेपन करता करता माझ्या चेहर्यावर रंगलेपन कधी झाले आणि मी नाट्य-चित्रपट कलाकार कधी बनलो ते कळलेच नाही, असे अलिबागेतील ‘रुची तरंग’ हॉटेलचे युवा मालक व अभिनेते राहुल बोडस सांगतात तेव्हा आपल्यासमोर चैतन्याचा सागर उभा असल्याचे जाणवते.
अभिनेते राहुल बोडस याचं प्राथमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवली येथे तर माध्यमिक शिक्षण अलिबाग येथे झाले. वडील दत्तात्रेय बोडस यांचा डोंबिवली येथे कॅटरींगचा व्यवसाय आहे. आई सौ. मेधा दत्तात्रेय बोडस या अलिबागच्या नारायण बाम यांच्या कन्या. त्यामुळे अलिबाग हे राहुल बोडस यांचे आजोळ. आजोबांना संगीताची विशेष आवड. तबला, हार्मोनियम इत्यादी वाद्यवादनात त्यांचा हातखंडा होता. या सर्वाचे कळत-नळकत संस्कार राहुल बोडस यांच्यावर झाले. त्यामुळेच ते कलाप्रांतात ओढले गेले. नृत्यनाटिका, नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, मॉडेलिंग, अल्बम या सर्व क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांचा ‘तिचं चुकलं तरी काय?’ हा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला त्यानिमित्त मांडलेली ही गप्पांची मैफल.
राहुलजी, तुम्ही स्वत:विषयी काही सांगा?
- नाटक, चित्रपट हा माझा ध्यास असला तरी हॉटेल व्यवसाय हा माझा श्वास आहे. कलाक्षेत्रात मी वावरत असलो तरी माझ्या व्यवसायाशी मी प्रामाणिक राहणार आहे. अभिनय क्षेत्रात वावरत असतानाही मी माझ्या व्यवसायाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. मी कॅटरिंग डिप्लोमा केला आहे. ताज हॉटेलमध्ये 3 महिने मी सर्व्हिसही केली आहे. भ्रंमतीच्या आवडीमुळे ट्रॅव्हल इन टुरिझम मॅनेजमेंट डीग्रीही मी मिळवली आहे. अनुभव ट्रॅव्हल एजन्सीमध्ये 2 महिने मी हिमाचल प्रदेशात ट्रेनिंगलाही गेलो होतो. त्यानंतर मी स्वत:च्या हॉटेल व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले. मी मिळवलेल्या अनुभवाचा फायदा निश्चितच माझ्या हॉटेल व्यवसायाला होतो. आई-वडिलांनी अलिबागेत लावलेल्या हॉटेल रुची तरुंगच्या रोपट्याचा कल्पवृक्ष करायचा आहे. हे सर्व करताना मी अभिनयाचा छंदही जोपासत आहे आणि मी निश्चितच या क्षेत्रातील यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करीन.
राहुलजी, अभिनय क्षेत्रात तुम्ही कसे ओढले गेलात?
- खरंच सारे नकळत घडले. मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना 1998 साली पर्सनालिटी शोजमध्ये सहभागी होऊन ‘डोंबिवली चर्मिंग प्रिंस’ हा किताब मिळवला. त्यानंतर मासिकांसाठी मॉडेलिंग करण्याच्या मला संधी मिळाल्या. मी विविध जाहिरातींत झळकू लागलो. मॉडेलिंग करीत असतानाच कुसुमाग्रज यांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या काव्यरचनेवर आधारीत ‘वसुंधरा’ या नृत्यनाटिकेत डॉ. मीना नेरुरकर यांनी मला अभिनयाची संधी दिली. त्यानंतर मोहन वाघांच्या ‘चंद्रलेखा’ नाट्यसंस्थेत विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या नाटकात गारद्याची भूमिका करण्याची संधी मिळाली. या नाटकाचे 60 ते 70 प्रयोग झाले. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लावणीप्रधान कार्यक्रमात डॉ. मीना नेरुरकर यांनी पुन्हा मला आमंत्रित केले. यापूर्वी त्यांच्या ‘वसुंधरा’ नृत्यनाटिकेत मी काम केले असल्यामुळे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कार्यक्रमात मी गायकाची भूमिका कोणत्याही दडपणाविना रंगवली. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ग्रुपमध्ये कोणतेही काम करण्यास मी कधी संकोच केला नाही. कोणी कलाकार कमी असेल, तर त्यांची आम्ही कधी उणीव भासू दिली नाही. ‘कमी तेथे आम्ही’ ही माझी सकारात्मक भूमिका असल्यामुळे तेथे मला खूप काही शिकायला मिळाले आणि त्याचा मला पुढे खूपच फायदा झाला.
राहुलजी, तुम्ही नंतर चित्रपटांकडे कसे वळलात?
- मी अलिबागेत माझ्या ‘रुची तरंग’ हॉटेलवर लक्ष केंद्रीत केले, तेव्हा माझ्या लक्षात आले की, हॉटेल व्यवसाय करताना मी कलाप्रांताचाही आनंद लुटू शकतो. रायगड जिल्ह्यात जशी पर्यटनस्थळे आहेत, तशीच चित्रपटांसाठी चित्रीकरण करण्यायोग्य नयनरम्य स्थळेही आहेत. या स्थळावर चित्रपट निमार्त्यांना खेचून आणण्याच्या दृष्टीने मी कामाला लागलो. माझ्या प्रयत्नांत मी यशस्वी झालो. संजय सूरकर माझ्या संपर्कात आले. त्यांच्या आई शपथ, चाहूल, आव्हान, तांदळा इत्यादी चित्रपटांची लोकेशनची कामे मी केली आणि त्यांच्या ‘आई शपथ’ या चित्रपटात मी ‘श्रीरंग’ या गायकाची भूमिकाही केली. या भूमिकेला रसिकांनी डोक्यावर घेतले.
सुमीतच्या ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटात गाढव बनलेल्या गंधर्वाची मी भूमिका केली. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे, सोनाली कुलकर्णी, संजय खापरे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाचीही रसिकांनी वाहव्वा केली.
प्रशांत भेलांडे निर्मित, अशोक कार्लेकर दिग्दर्शित ‘सौभाग्यवती भव’ या चित्रपटात मी प्रमुख भूमिका केली. या चित्रपटात शरद पोंक्षे आणि आशा साठे यांच्या मुलाचे पात्र मी रंगवले आहे. हा चित्रपट धुमधडाक्यात सुरु आहे.
‘तिचं चुकलं तरी काय?’ या चित्रपटात मी नायकाची भूमिका रंगवली आहे. या चित्रपटात डॉ. गिरीश ओक, मोहन जोशी, वंदना गुप्ते, दीपज्योती नायक इत्यादी दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटात ‘एड्स’बाबत सामाजिक वास्तव दाखवले आहे. या चित्रपटाची कथा मी येथे सांगत नाही. रसिकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघावा अशी मी नम्र विनंती करतो.
राहुलजी, तुमच्या या चित्रपटाला आमच्या शुभेच्छा! आता तुम्ही तुमच्या आगामी चित्रपटांविषयी सांगा?
- सिद्धविजय संस्था निर्मित, एन. रेळेकर दिग्दर्शित ‘नवनाथ महात्म्य’ या आगामी चित्रपटात मी गोरक्षनाथांची भूमिका केली आहे, ती निश्चितच सर्वांना आवडेल.
राहुलजी, तुम्ही कोणत्या टीव्ही मालिकेत भूमिका केली आहे?
- संजय सूरकर यांच्या ‘अभिलाषा’ या झी मराठीवरील मालिकेत मी ‘अनिकेत मुजुमदार’ ही भूमिका केली. वंदना गुप्ते, आदिती सारंगधर, उदय टिकेकर इत्यादी कलाकार या मालिकेत होते. स्मिता तळवळकर यांच्या ‘अस्मिता चित्र’ची ही मालिका खूपच लोकप्रिय होती.
राहुलजी, लोकेशन गाईड आणि तुमची अभिनय कारकीर्द कशी समांतर सुरु राहिली त्याबाबत सांगा?
- मी चित्रपट, मालिका निर्मात्या-दिग्दर्शकांना जिल्ह्यात नवनवी लोकेशन्स मिळवून देऊ लागलो. त्यासाठी प्रशासनाच्या परवानग्या, साहित्याची ने-आण ही किचकट कामेही मी केली आहेत, त्यामुळे आता मी यात वाक्बगार झालो आहे. योगेश भारद्वाज यांच्या ‘अपराध एक सरगना’ चित्रपटासाठी रेवस ते कार्लेखिंड या मी दाखविलेल्या लोकेशनवर चित्रीकरण झाले. गंमतीचा भाग म्हणजे रेवस ते कार्लेखिंड हा भाग उत्तर प्रदेशातील एक विभाग म्हणून चित्रित करण्यात आला होता.
मंदार देवस्थळी यांच्या चित्रपटाचे शुटिंग मांडवा येथे झाले, त्या चित्रपटात मी ‘न्यूजरिडर’ म्हणून भूमिका केली आहे. ‘दिवानगीने हद करली’ या जितेंद्र पुरोहित निर्मित, दिग्दर्शित हिंदी चित्रपटासाठी कासा किल्ल्याचं रिस्की चित्रीकरण करण्यास मी मदत केली. हे लोकेशन त्या चित्रपटात वापरायला लावून मी चित्रपटात रंगत आणली.
‘स्टार प्रवाह‘वरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेसाठी मी रेवदंडा येथील लोकेशन मिळवून दिले. तसेच श्रीरंग गोडबोले यांच्या कॉसमॉस बँकेच्या जाहिरातीसाठी कोर्लईच्या समुद्र किनार्यांचे लोकेशन मीच मिळवून दिले. तर कृणाल म्युझिकच्या ‘गंध गारवा’ या अल्बमसाठी अलिबागेतील सिद्धेश्वर भागाचे लोकेशन उपलब्ध करुन दिले आणि त्यात भूमिकाही केली. या अल्बममध्ये अविनाश नारकर, सुबोध भावे, अमोल कोल्हे आणि मी धम्माल केली आहे. त्यानंतर कृणाल म्युझिकचे तीन चार अल्बम मी केले. एक अलिबाग कोळीवाड्यात केला. त्याच्यातही काम केले.
राहुलजी, तुमचे ध्येय काय आहे?
- नाट्य-चित्रपट अभिनय हा माझा छंद आहे, त्यात मला एक वेगळी उंची गाठायची आहे, यासाठी मला माझे आई-वडील यांचे आशीर्वाद आणि पत्नी सौ. ऋचा बोडस, मुले अथर्व, सई यांचा पाठिंबा आहेच. परंतु आई-वडिलांनी माझ्या हाती जो ‘रुची तरंग’ हॉटेलचा व्यवसाय विश्वासाने दिला आहे, तो मला वाढवायचा आहे. आज माझ्या हॉटेलमध्ये मोठमोठे कलाकार उतरल्याविना पुढे जात नाहीत. त्यामुळे कलाकारांचे हॉटेल हे गुडविल मला अबाधित ठेवायचे आहे.
खरेच, ‘रुची तरंग’ हे हॉटेल कलाकारांचे हॉटेल आहे, कारण त्याचा मालकच कलासक्त आणि कलाकार आहे. राहुल बोडस यांनी मराठी, हिंदी चित्रपट, मालिका यांच्यासाठी रायगड जिल्ह्यातील नयनरम्य लोकेशन्स देऊन रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडावे, रायगडच्या जनतेला निश्चितच याचा आनंद होईल.
-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉
अभिनयाचं सामर्थ्य मी कळत्या वयात जाणलं, तेव्हा रंगभूमी ठरली माझ्यासाठी एक मोहक विश्व. या नाट्यविश्वात जेव्हा मला शब्दांचा लळा लागला, तेव्हा मी अभिनयाला मुक्तपणे संवादाचा साज चढवला. प्रकाशाचा झोत माझ्यावर राहिला आणि मीही प्रकाश बनलो. या प्रकाशातूनच माझ्या बहुरुपाने मिळवल्या रसिकांच्या अगणित टाळ्या. मी बहुरुपी रंगभूमीवरचा. कधी राजा, तर कधी रंक, कधी पोलीस अधिकारी, तर कधी चोर, कधी नायक, तर कधी खलनायक, माझ्यासाठी कधीही ठरले नाही कोणतेही रुप वर्ज, असे जेव्हा रंगकर्मी प्रकाश नागू म्हात्रे म्हणतात, तेव्हा त्यांच्या चेहर्यावर एक वेगळंच तेज पाहायला मिळते.
प्रकाश नागू म्हात्रे हे पेझारी-आंबेपूर येथील नवीन वसाहतीत वास्तव्यास आहेत. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत आपल्या अभिनयाची नाममुद्रा उमटवली आहे, त्याचबरोबर दूरदर्शन मालिकेतही भूमिका केली आहे. चित्रपट निर्मिती सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे, इतकेच नव्हे, तर त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यही वाखाणण्याजोगे आहे, अशा चतुरस्त्र व्यक्तीमत्वाला बोलते करण्याचा हा एक प्रयत्न.
प्रकाशजी, रंगभूमीने तुमच्या मनात कधी रुंजी घालायला सुरुवात केली?
-आमच्या गावात ढोलपाडा-आंबेपूर येथे हनुमान जयंतीच्या दुसर्या दिवशी नाटक केले जायचे. हे नाटक हनुमान नाट्य मंडळातर्ङ्गे सादर केले जायचे. या नाटकात माझे वडील कै. नागू रामा म्हात्रे नायकाचे काम करायचे. तेव्हा ते मुंबईत सेंच्युरी मिलमध्ये कामाला होते. गावचं नाटक म्हणून ते हनुमान जयंतीच्या दुसर्या दिवशी सादर होणार्या नाटकाच्या तालमीसाठी आठवड्यातून दोन दिवस रजा टाकून गावी यायचे. त्यावेळी संगीत नाटके केली जायची. या नाटकांच्या तालमी बघतच मी मोठा झालो. या तालमीतच माझ्यामध्ये नाटकांची आवड निर्माण झाली. माझे वडील कै. नागू रामा म्हात्रे, कै. बाबू आंबाजी पाटील, कै. बाळाराम मास्तर, कै. हिराजी पाटील, कै. संभाजी पाटील, कै. काशिनाथ ठाकूर, कै. जनार्दन पाटील, सदानंद शंकर पाटील, गजानन ठाकूर, सीताराम पाटील, सदू राघो पाटील यांच्या अभिनयाच्या टॉनिकने माझा रंगभूमीवरील प्रवास सुकर झाला.
प्रकाशजी, तुमची नाटकाची पहिली आठवण कुठली?
- ते १९७८ साल होते. दहावीचे माझे शिक्षण पूर्ण झाले होते. त्याच सुमारास हनुमान नाट्य मंडळाच्या ‘दिधले दान सौभाग्याचे’ या नाटकात मला एका शेतकर्याची छोटीशी भूमिका मिळाली. त्या नाटकातील माझ्या पहिल्या एंट्रीची आठवण आली की, मला आजही हसू येते. या नाटकात मी रंगभूमीवर एंट्री केली, तेव्हा दरवाजाच्या चौकटीला माझं डोकं लागून माझी टोपी खाली पडली. एंट्रीलाच माझी अशी ङ्गसगत झाली होती, परंतु मी घाबरलो नाही. मी न डगमगता तेव्हा चांगल्या पद्धतीने अभिनय केला आणि मी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात वाहव्वा मिळविली.
प्रकाशजी, त्यावेळी हनुमान नाट्य मंडळातर्ङ्गे सादर करण्यात आलेल्या नाटकांचे दिग्दर्शन कोणी कोणी केले?
- हनुमान नाट्य मंडळातर्ङ्गे सादर करण्यात आलेल्या प्रत्येक नाटकाचे दिग्दर्शन मुंबई येथील गजानन पाटील यांचेच असायचे. मूळचे ते शहाबाजचे, पण कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांना ग्रामस्थ मानधन देऊन ढोलपाड्यात दिग्दर्शनासाठी बोलवायचे आणि तेही दोन महिने कलाकारांवर मेहनत घ्यायचे. या भागातील ज्येष्ठ लेखक कै. म.ना. पाटील गुरुजी हे प्रॉमटींग द्यायचे. मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं, म्हणून मी अभिनयाचे विविध पैलू साकार करु शकतो.
प्रकाशजी, तुम्ही खर्या अर्थाने रंगभूमीवर वावरायला केव्हा सुरुवात केली?
- १९८५ साली हनुमान नाट्य मंडळाच्या जुन्या कलाकारांनी नव्या तरुण कलाकारांकडे नाट्यमंडळाची सूत्रे दिल्यानंतर गणेश हिर्लेकर यांचे ‘जन्मठेप’ हे नाटक त्याचवर्षी गावात सादर केले. तेथे या नाटकाला आणि माझ्याही भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याचवर्षी नारंगी येथे झालेल्या जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आणि या नाटकातील माझ्या ‘राम’ या व्यक्तीरेखेच्या भूमिकेसाठी अभिनयाचे पारितोषिक मिळाले. या नाटकाचे प्रयोग हेमनगर, शहाबाज इत्यादी ठिकाणी करण्यात आले आणि प्रत्येक ठिकाणी या नाटकास नाट्यरसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यामुळे माझ्यातील कलाकारालाही प्रोत्साहन मिळाले. आणि आमच्या नाट्यमंडळाचेही कौतुक होऊ लागले. त्यानंतर भाग्यविधाता, दिधले दान सौभाग्याचे, दीप तुझ्या वंशाचा, शेवटी तूच अपराधी या नाटकात विविध भूमिका केल्या.
प्रकाशजी, तुम्ही नाट्य आणि सामाजिक क्षेत्रातही काम केले आहे आणि करीत आहात, ते कसे काय?
- जि.प. मधील नोकरी सांभाळून जेवढे शक्य होईल त्या फावल्या वेळेत मी सामाजिक काम करणे सुरु केले. आंबेपूर येथील सर्वोदय युवक मंडळाच्या अध्यक्षस्थानी आल्यावर मी या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले. एकपात्री अभिनय स्पर्धा, नृत्य स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा, नेत्रचिकित्सा शिबीर, लसीकरण मोहीम, वृक्षारोपण मोहीम, ज्येष्ठांचा सत्कार, विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असे उपक्रम मी माझे एक सामाजिक दायित्व या भूमिकेतून राबवले. आज २६ वर्षे जि.प.च्या सेवेत आहे. मी करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल २००३ साली पेझारी येथील पंतभक्त मंडळाचा आमच्या सर्वोदय युवक मंडळाला सामाजिक सेवा पुरस्कार देण्यात आला.
प्रकाशजी, तुम्ही सर्वोदय मंडळातर्फे राज्य नाट्य स्पर्धेत आपली नाटके उतरवलीत त्याबद्दल सांगा?
- २००१ साली सर्वोदय मंडळातर्फे एड्स जनजागृतीवर आधारित ‘शिकार’ हे विजया कुडव लिखित व दिग्दर्शित नाटक राज्य नाट्य स्पर्धेत मुलुंड येथे कालिदास नाट्यगृहात सादर केले. या नाटकात मी, प्रकाश जयराम पाटील, योजना पाटील, निनाद पाटील, राजन पांचाळ, बाळू पाटील, विजया कुडव इत्यादींनी भूमिका केल्या. यात स्त्री अभिनयासाठी विजया कुडव यांना प्रथम क्रमांक मिळाला. २००२ साली मी ‘संघर्ष जीवनाचा’ या विजया कुडव लिखित, दिग्दर्शित कौटुंबिक नाटकात प्रमुख भूमिका केली. या नाटकात पराग नागले, राजन पांचाळ, जितेंद्र पाटील, सुरेंद्र टेमकर, निनाद पाटील, प्रकाश जयराम पाटील, राजेंद्र म्हात्रे, मोरेश्वर मोकल, कै. संभाजी पाटील, विजया कुडव यांच्या भूमिका होत्या. या नाटकाचे प्रयोग ढोलपाडा, शहाबाज इत्यादी ठिकाणी केले आणि ४१ व्या राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर हे नाटक सादर केले. २००३ साली दिलीप परदेशी लिखित ‘निष्पाप’ हे नाटक ४२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत कल्याण येथे आचार्य अत्रे नाट्यगृहात सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन विजया कुडव यांनी केले. त्यात त्यांनी केलेली गौरीची भूमिका अविस्मरणीय होती. या सर्व नाटकांचा निर्मिती प्रमुख म्हणून मीच काम केले.
प्रकाशजी, त्यानंतर तुम्ही एकांकिका स्पर्धांतही धडक मारलीत, त्याबाबत सांगा?
- हँगर स्ट्राईक, प्रतिशोध, भोग, दी मेन विदाऊट शॅडो इत्यादी विजया कडव दिग्दर्शित एकांकिका विविध ठिकाणी सादर केल्या, तसेच पेण येथील ‘सन्मित्र’सारख्या राज्यस्तरीय स्पर्धांतही या एकांकिकांनी आपला ठसा उमटविला.
प्रकाशजी, तुम्ही नंतर दूरदर्शन मालिकेकडे कसे वळलात?
- योगायोगाने विजया कुडव यांनी निर्माते दिग्दर्शक (कै.) चिंटू ढवळे व स्नेहल ढवळे यांच्याशी माझी ओळख करुन दिली. चिंटू ढवळे यांनी ‘तुमचं आमचं जमलं’ या दूरदर्शन मालिकेचे चित्रीकरण पेझारी परिसरात करण्याचे ठरवले व त्यांनी आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भावना पाटील, ऍड. आस्वाद पाटील व ना.ना. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक गावडे यांच्या सहकार्याने ही दूरदर्शन मालिका पेझारी परिसरातच पूर्ण केली. या मालिकेसाठी मी अथपासून इतिपर्यंत त्यांना सहकार्य केले. सुमारे २५ ते ३० भागांचे चित्रीकरण माझ्या घरातच झाले. यात मी विविध भूमिका केल्याच, पण माझी पत्नी सौ. प्राची म्हात्रे, मुलगा प्रज्ज्वल म्हात्रे, कन्या रचना म्हात्रे, तसेच धाकटे बंधू सुरेश म्हात्रे यांनीही या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका केल्या. या मालिकेत अंकुश चौधरी, विजय चव्हाण, श्रीकांत देसाई, जयवंत वाडकर, जयराज नायर, असीत रेडीज, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाणगांवकर यासारखे दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. या मालिकेच्या श्रेयनामावलीत माझा निर्मिती प्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आला होता.
प्रकाशजी, तुम्ही पेझारी येथे एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीही सहकार्य केलेत, त्याबद्दल सांगा?
- ‘तुमचं आमचं जमलं’ या दूरदर्शन मालिकेतील पेझारी परिसरातील निसर्गाने मोहित होऊन येथे एखादा चित्रपट काढावा या हेतूने निर्माते दिग्दर्शक मंदार शिंदे हे पेझारी येथे माझ्या घरी आले व आम्ही चित्रपटाची निर्मिती करीत आहोत. त्यासाठी आम्हाला सहकार्य कराल का अशी त्यांनी माझ्याकडे विचारणा केली, तेव्हा मी ‘होय’ म्हणून उत्तर दिले. त्यानुसार ‘नो प्रॉब्लेम’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त ना.ना. पाटील हायस्कूल, पोयनाड येथे करण्यात आला. या चित्रपटासाठी मी सर्व प्रकारचे तनामनाने सहाय्य केले व त्यात छोटीशी भूमिकाही केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत निर्मिती प्रमुख म्हणून माझे नाव देण्यात आले आहे.
प्रकाशजी, तुमच्या नाट्यप्रेमाला पत्रकारितेचीही जोड कशी मिळाली?
- दहावी पास झाल्यावर जसा मी नाट्यप्रेमात आकंठ बुडालो, तसाच मी अक्षरांच्या प्रेमातही पडलो. कमळाकर नागू म्हात्रे माझे मोठे बंधू यांनी पेझारी येथे असलेल्या छोट्या आकारातील दैनिक कृषीवलमध्ये मला नोकरीस लावले. तेथे बातम्यांची अक्षरजुळणी करता करता खर्या अर्थाने माझ्यात वृत्तलेखनाची आवड निर्माण झाली. नंतर ९ मे १९८५ रोजी मी जि.प.च्या नोकरीत रुजू झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अलिबाग परिसरातील कार्यक्रमांचे वृत्तलेखन करु लागलो. १९९५ साली मी मोठ्या आकारातील दैनिक कृषीवलचा सामाजिक वृत्त लिखाण बातमीदार बनलो. माझी पत्रकारितेतील वाटचाल गेली पंधरा वर्षे सुरुच आहे. २००४ साली तत्कालिन जि.प. अध्यक्ष बाळाराम पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनी प्रथमत:च ‘गुणवंत कर्मचारी’ पुरस्कार सुरु केला. पहिलाच पुरस्कार मला मिळाला. या पुरस्काराने मला सपत्नीक गौरविण्यात आले.
प्रकाश, नाट्यक्षेत्रात पुढे कोणती कामगिरी करण्याची तुमची इच्छा आहे?
- ग्रामीण नाट्यसंस्कृती पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावागावात अभंग राहावी यासाठी मी प्रयत्नरत राहणार आहे. कारण खर्या अर्थाने ग्रामीण भागाने नाट्यसंस्कृती रुजवली आणि जपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावोगावीच्या नाट्य मंडळांना ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन देण्यात मला आनंद वाटतो. क्रीडा क्षेत्राबरोबरच गावोगावी नाट्यचळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
प्रकाश, तुमच्या नाट्यप्रेमाचं अमरफुल टवटवीत ठेवण्यासाठी घरातून प्रोत्साहन मिळाले असेलच, त्याबाबत सांगा?
- निश्चितच माझं नाट्यप्रेम घरातील प्रोत्साहनामुळे वाढले आणि जोपासलेही गेले. माझ्या वडिलांचे- तसेच आईचे आशीर्वाद माझ्यामागे होतेच आणि त्यांचे गुण माझ्यात उतरले. हा अभिनयाचा वारसा आता माझ्या कन्येकडे, म्हणजे रचना प्रकाश म्हात्रे हिच्याकडे गेला आहे. तिने पेण येथील ‘सन्मित्र’ एकांकिका स्पर्धेत अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळविले आहे. तिने गुजरात येथे झालेल्या महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत स्त्री पात्र म्हणून राज्याचे नेतृत्व केले आहे. मुलगा प्रज्ज्वल यालाही अभिनयाची आवड आहे आणि माझ्या प्रत्येक कार्याला त्याचा पाठिंबा असतो. मी नोकरी करत असताना नाटक आणि सामाजिक कार्य यात स्वत:ला झोकून दिले, ते पत्नी माझी प्राची म्हात्रे हिच्यामुळेच. तिची प्रेरणा व प्रोत्साहन मला सतत बळ देत राहिले, त्यामुळे तिचा माझ्या प्रगतीत सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही. आईचे आशीर्वाद आणि सहकार्यांनी व रसिकांनी दिलेले प्रेम यामुळे हा ‘प्रकाश’ सततच दैदीप्यमान बनला आहे.
अर्थात प्रकाश म्हात्रे यांचा परिचय येथे संपत नाही. रायगड जिल्हा परिषदेत प्रामाणिक सेवा बजावत असताना जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटना, शाखा रायगडचे ते गेली २० वर्षे अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हास्तरावर केलेले काम बघून राज्य कार्यकारिणीने १५ मार्च २००५ रोजी मुंबईतील काळाघोडा मैदानात झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात त्यांची महाराष्ट्र राज्य संघटनेचा अध्यक्ष म्हणून निवड केली. त्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय दौरे करुन व मंत्रालयीन कामकाज तडीस नेऊन संबंधित संघटनेच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. चालू वर्षात पुन्हा त्यांची रायगड जिल्हा वाहन चालक संघटनेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. तसेच राजिप कर्मचारी सहकारी पतपेढीचे २००३ पासून चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक अशा विविध पदांवर ते कार्यरत असताना त्यांची प्रत्येकाशी वागणूक आदराची, सहकार्याची असते. त्यांना ग्रामीण रंगभूमी सशक्त करायची आहे, ते आपलं सामाजिक काम करताना ग्रामीण रंगभूमीसाठीही भरीव योगदान देतील यात वाद नाही. त्यांना उर्वरीत आयुष्यात सामाजिक कार्यास शुभेच्छा!
-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉
एक पायरी नाटकाची, एक पायरी चित्रपटाची. या पायर्यांवर मी कधी अडखळले नाही, पडले नाही. हा माझा प्रवास आवडीचा होता, त्यामुळे मी परिश्रम घेतले तरी माझी दमछाक झाली नाही. रंगभूमीवरील तिसर्या घंटेने माझ्या श्वासाला आत्मविश्वास दिला. माझ्या चित्रपटांना पडलेल्या टाळ्यांनी माझ्या अभिनयाला कौतुकाचा साज चढवला. आज जरी माझी ओळख नाट्य-चित्रपट विश्वात एक अभिनेत्री म्हणून असली तरी मी मात्र एक सच्ची कलायात्री आहे. माझा कलाप्रवास रसिकांच्या प्रेमामुळे सतत उंचावतच राहिला आहे, असे नाट्य-चित्रपट अभिनेत्री वीणा जामकर म्हणतात, तेव्हा त्यांच्यातील कलाकाराचा आवाका अमर्यादित असल्याचे जाणवते.
वीणा जामकर. उरण येथील मनोहर जामकर यांच्या कलासक्त कन्या. चार दिवस प्रेमाचे, एक रिकामी बाजू दलपतसिंग येता गावा अशा व्यावसायिक नाटकांत आणि वळू, गाभ्रीचा पाऊस, विहीर, जन्म, लालबाग परळ अशा चित्रपटात आपल्या अप्रतिम अभिनयाने वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीने जो स्वत:चा ठसा उमटविला आहे, तो कधीही पुसला जाणारा नाही. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे वीणा जामकर यांनी एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजले आहेत. ‘पलतडचो मुनिस’ हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोकणी चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरांटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचं पारितोषिक मिळालं. अशा या गुणी अभिनेत्रीबरोबरील ही गप्पांची मैफल.
वीणाजी, कलाक्षेत्रात तुम्ही कधी पाऊल टाकले?
- माझे संपूर्ण कुटुंबच कलासक्त आहे. माझी आई अलका जामकर शिक्षिका आहे आणि ती उत्तम गाते. ती नाटकात कामही करायची. माझे वडील चित्रकार आहेत. ते उत्कृष्ट तबला वाजवतात. अशा वातावरणात मी वाढले आहे. अडीच वर्षांची असताना मी पहिलं नाटक केलं. मग पाच वर्षाची असताना एकपात्री अभिनयही केला. आईच्या कडेवर बसून. त्या वयात आपले पालक आपल्याला सांगतात की, असं असं कर आणि आपण तसं करतो. तसं मी केलं आणि माझ्याही नकळत मला ते जमलं. लोकांना माझं काम आवडलं. आई-बाबांना आवडलं. त्यानंतर मग आई-बाबांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं. बाबा मला बालनाट्य शिबिरात घेऊन जायचे. मला नृत्याची आवड होती, म्हणूनच मला कथ्थक शिकायला पाठवलं. अभ्यास सांभाळून नाटक, नृत्य करायला मला आई-बाबांनी कायम प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत असताना ‘वैरी’ नावाची एकांकिका केली. त्या नाटकासाठी मला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बालकलाकाराचंही पारितोषिक मिळालं होतं. यानंतर पुढच्या काळात काही संस्थांच्या एकांकिका, उरणच्या संस्थांसाठी एकांकिका केल्या.
वीणाजी, नाटकात कारकीर्द करावी असं केव्हा ठरवलत?
- दहावी झाल्यानंतर मी ठरवलं की, याच क्षेत्रात काहीतरी करायचं, कारण नाटकात काम करणं मला मनापासून आवडत होतं. मला तेव्हा केंद्र सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळण्याची सातवीपासून ते पदवीधर होईपर्यंत मला ती मिळणार होती. मात्र त्यासाठी दर दोन वर्षांनी मुलाखत द्यावी लागे. दहावीनंतर कमलाकर सोनटक्के यांनी माझी मुलाखत घेतली होती. ‘मला अभिनयाची आवड आहे, नाटकात काम करायचं आहे, मी काय करु? असं मी त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी मला मुंबईला येण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मग मी रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतला.
वीणाजी, रुपारेल कॉलेजचे व्यासपीठ तुमच्या कलेला कसे पोषक ठरले?
- रुपारेल कॉलेज एकूणच सांस्कृतिक घडामोंडीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असताना मग मी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. मी आणि अद्वैत दादरकरने एका युवा महोत्सवात शफाअत खानाची ‘क’ नावाची एकांकिका केली होती. तेव्ही मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते. या स्पर्धेसाठी चेतन दातार परीक्षक होता. मला आणि अद्वैतला अभिनयासाठी सुवर्णपदकं मिळाली होती. चेतन दातारनं आमच्या या एकांकिकेचा प्रयोग ‘आविष्कार’ला ठेवला. मुंबईत येऊन तेव्हा मला दोन वर्षे झाली होती आणि ‘आविष्कार’मध्ये कसा प्रवेश मिळवायचा, याच धडपडीत मी होते आणि योगायोगाने १० जुलै २००३ रोजी, माझ्या वाढदिवशीच सुलभाताई देशपांडे यांच्यासमोर ‘आविष्कार’च्या रंगमंचावर एकांकिका सादर करण्याचे भाग्य मला लाभले.
वीणाजी, तुमचा आविष्कारच्या निमित्ताने जो प्रायोगिक नाटकांचा प्रवास झाला, तो कसा झाला?
- ‘क’ या एकांकिकेनंतर चेतन दातार याने ‘जंगल में मंगल’ हे नाटक केलं. ते माझं पहिलं प्रायोगिक नाटक. तेव्हा त्यातली एक प्रमुख भूमिका मला दिली होती. शेक्सपीअरच्या ‘अ मिडसमर नाईटस् ड्रीम’वर हे नाटक आधारित होतं. या नाटकाची मजा म्हणजे सर्व मुलांनी स्त्री भूमिका केल्या होत्या आणि सर्व मुलींनी पुरुषांची काम केली होती. माझ्या व्यक्तीरेखेचं नाव ‘पक्या’ होतं, म्हणजे मूळ नाटकातला ‘पक’ खूप एनर्जी असलेलं हे नाटक होतं. त्यानंतर ‘खेळ मांडियेला’ नावाचं नाटक केलं. चेतनने एका क्रोएशियन नाटकाचं हे भाषांतर केलं होतं. पं. सत्यदेव दुबे आणि सोनाली कुलकर्णी यांनी हे नाटक इंग्रजीत केलं होतं. मी आणि मंगेश भिडेने ते मराठीत केलं. एक व्यावसायिक नाटकातली मोठी अभिनेत्री आणि प्रायोगिक नाटकाचा दिग्दर्शक या दोन पात्राचं हे नाटक होतं. ही भूमिका तशी कठीण होती. तेव्हा मी फक्त एकोणीस वर्षांची होते. चेतनने भाषांतर व दिग्दर्शन करताना अनेक खरे संदर्भ वापरले होते. अनेक खर्या अभिनेत्रींच्या लकबी मला दिल्या होत्या. त्यावेळी जशी पेलली तशी मी ती भूमिका केली, पण माझं त्या भूमिकेमुळे खूप कौतुक झालं. त्या भूमिकेसाठी मला त्या वर्षी ‘नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार’ आणि ‘मामा वरेरकर पुरस्कार’ असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.
वीणाजी, व्यावसायिक नाटकातही तुम्ही दमदार पदार्पण केलेत त्याबाबत सांगा?
- २००४ साली मी ‘एवढंच ना’ हे पहिले व्यावसायिक नाटक केले. यात माझी प्रमुख भूमिका होती. त्यानंतरचे दुसरे व्यावसायिक नाटक ‘चार दिवस प्रेमाचे’ सुयोगसारखी संस्था आणि प्रशांत दामले, सविता प्रभुणे, अरुण नलावडे हे सहकलाकार. खूप मजा यायची हे नाटक करताना या नाटकाचा शंभर प्रयोगात मी भूमिका केल्या. ‘हिच ती दिवाळी’ या इरावती कर्णिक लिखित व अद्वैत दादरकर लिखित नाटकाच्या ३५ प्रयोगात मी भूमिका केल्या. ‘एक रिकामी बाजू’ या नाटकातील भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. या नाटकात माझ्याबरोबर गीतांजली कुलकर्णी होती. स्तनाचा कर्करोग झालेल्या एका तरुणीची ही कथा होती. या नाटकात मी वेगवेगळ्या आठ भूमिका केल्या आहेत. थिट्रीक संस्थेच्या या नाटकास २००९ साली झी गौरवचा प्रायोगिक विभागाचा पुरस्कार मिळाला. इतर सात पुरस्कारांबरोबरच वैयक्तिक मलाही अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. या नाटकाचे ३७ प्रयोग झाले आहेत. मकरंद साठे लिखित व अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेलं ‘दलपतसिंग येती गावा’ हे नाटक माझ्याासाठी विशेष महत्त्वाचे आहे. माहितीच्या अधिकारासंदर्भातलं ते नाटक होतं. चळवळीचं नाटक होतं. या नाटकात अलकाताई या नावाची माझी भूमिका होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, कणकवली, मावळ, पुणे, मुंबईतील गोरेगाव, माटुंगा, रायगड जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेले गागोदे, साने गुरुजी स्मारक ट्रस्ट, वडघर इत्यादी ठिकाणीच या नाटकाचे प्रयोग झाले नाहीत तर केरळ राज्यातील तिरुअनंतपूर येथील राष्ट्रीय महोत्सवातही या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. या नाटकाला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ३० पेक्षा अधिक प्रयोग या नाटकाचे झाले. मनोरंजनातून परिवर्तन घडवणारे हे नाटक आहे.
वीणाजी, तुम्ही चित्रपटाचा मोठा पडदाही व्यापून टाकलात, त्याबद्दल सांगा?
- राजेंद्र बडे लिखित, दिग्दर्शित ‘बेभान’ हा माझा पहिला चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील निशा या भूमिकेसाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मला मिळाला. २००८ मध्ये उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ या चित्रपटात तानीची भूमिका केली. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ या चित्रपटातही सीमा मावशी नावाची भूमिका केली. सतीश मनवर दिग्दर्शित ‘गाभ्रीचा पाऊस’ या त्याच्या पहिल्या चित्रपटात ‘अंजना’ ही शेतकर्याच्या बायकोची भूमिका केली. ‘निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटात सावित्री नावाची भूमिका केली. याशिवाय ‘मर्मबंध’ हा चित्रपट केला. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा झीचा पुरस्कार मला मिळाला. ‘जन्म’ हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होत आहे, पण २०१० च्या राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण निर्मितीचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर हा चित्रपट आधारलेला आहे. मुलीला रक्ताचा कर्करोग होतो आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती आई किती धडपड करते हे या चित्रपटात दाखवलं आहे. कर्करोग झालेल्या मुलीची भूमिका मी केली आहे आणि माझ्या आईच्या भूमिकेत रिमा लागू आहेत. ‘लालबाग परळ’ चित्रपट मला खूप समाधान देणारा ठरला. जयंत पवार यांच्या ‘अधांवर’ या नाटकावर हा चित्रपट बेतला आहे आणि हे नाटक मी शाळेत असताना पाहिलं होतं. त्यातल्या मंजूच्या भूमिकेसाठी कुठलीही अभिनेत्री एका पायावर तयार झाली असती, इतकी सुंदर भूमिका आहे ती जयंत पवारांनीच अगदी सुरुवातीला माझं नाव महेश मांजरेकर यांना सुचवलं. या चित्रपटामुळे मला मांजरेकर यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करता आलं. शिवाय ही भूमिका इतकी सशक्त होती की, ती साकारताना माझा खरा कस लागला. ‘पलतडचो मुनिस’ (पलिकडचा माणूस) या कोकणी भाषेतील चित्रपटात माझी एका वेड्या बाईची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट अनेक महोत्सवात गाजला. बर्लिन चित्रपट महोत्सवात या चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळाला. टोरंटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला विशेष पुरस्कारही मिळाला. अशा प्रकारे चित्रपट क्षेत्रातही मी चमक दाखवू शकले, याबद्दल मला समाधान वाटते.
वीणाजी, तुम्ही लघु चित्रपटही केले त्याबद्दल सांगा?
- नंदू जाधव दिग्दर्शित ‘श्वेत अंगार’ या माझ्या लघु चित्रपटाचा २००७ साली फ्रान्सच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये समावेश झाला होता. ‘चंमतग्’ हा एक ४८ मिनिटांचा लघुचित्रपटही मी केला. ‘होले होले’ या हिंदी लघु चित्रपटातही मी भूमिका केली आहे. या माझ्या सर्व भूमिकांचे प्रचंड कौतुक झाले.
वीणाजी, टीव्ही माध्यमातून तुम्ही फारशा दिसत नाहीत, असं का?
- मला मालिकांच्या ऑफर्स बी.ए.ला असल्यापासून येत होत्या. झी मराठीवरील ‘घडलंय बिघडंल’ , ‘इ टीव्हीवरील पापण्यांना हसलात का?’ अशा मालिकांतून भूमिका केल्या. परंतु तेथे माझं मन रमलं नाही. तसेच चित्रपट नाटक यामुळे मला फारसा वेळ मिळत नाही, जो वेळ मिळतो तो मी वाचन-मननात घालवते, त्यामुळे मी टी.व्ही. मालिका फारशा करीत नाही.
वीणाजी, , तुमच्या एकंदरीत आयुष्याकडे पहाता तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं ध्येय कोणते आहे?
- मी स्वत:ला फार नशीबवान समजते कारण माझ्या आई-वडिलांचा मला पूर्ण पाठिंबा होता. किंबहुना त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी इथवर येऊ शकले. नाट्य-चित्रपट क्षेत्रात खूप संघर्ष करणारे मी रोज पाहते. कित्येकांना घरचा पाठिंबा नसतो म्हणून काम करता येत नाही. सुदैवाने माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. मी अगदी लहानपणापासून काम करत गेले आणि मला चांगल्या भूमिका मिळत गेल्या. उत्तम नाट्यसंस्था, दिग्दर्शक, सहकलाकार मला लाभले. प्रेक्षकांनाही माझं काम आवडलं. यापुढेही असंच चांगलं काम मला करायला मिळावं, हेच माझे ध्येय आहे.
खरेच, वीणा जामकर या विचारी, अभ्यासू अभिनेत्री आहेत. त्या बालपणी नकळत नाट्यक्षेत्रात ओढल्या गेल्या आणि कळत्या वयात त्यांनी आपल्या नाट्यक्षेत्रातील आणि चित्रपट क्षेत्रातील सहज वावराने कळस चढवला. आज त्या एक गुणी अभिनेत्री म्हणून परिचित आहेत, हा परिचय म्हणजेच त्यांच्या या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीला मिळालेली एक पावतीच आहे.
-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉
पाण्याविना मासा नाही आणि नृत्याविना वीज नाही, असं म्हणतात. माझीही काय वेगळी परिस्थिती आहे? बालपण ते तारुण्य या मार्गादरम्यान नृत्य आणि नृत्य हाच मी विचार केला. नृत्याशिवाय मी नाही आणि नृत्य माझ्याशिवाय नाही, या जाणीवेने माझी जबाबदारी सतत वाढत राहिली. नृत्याची वीज माझ्या अंगात मुक्तपणे खेळतेय. म्हणूनच ती वीजच बनलेय माझ्या जीवनातील नितांतसुंदर कविता. ती आहे गंगेसारखी निर्मळ आणि हिमालयाइतकी उत्तुंग. नृत्याने केले माझे जीवन समृद्ध आणि अभिनयाने आणले त्यात वैविध्य. याच नृत्याभिनयाने मी चढले एक-एक पायरी यशाची. त्यामुळे आज बनले आहे मी अभिनेत्री ‘रॅगिंग’ एक विकृती’ या मराठी चित्रपटाची, असे मनोगत नृत्यांगना, टीव्ही-चित्रपट अभिनेत्री पूजा जे. व्यक्त करते तेव्हा तिच्यातील कलाक्षेत्राची अभ्यासूवृत्ती आणि त्याबाबतची निष्ठा प्रकर्षाने दिसून येेते.
पूजा जे. पनवेल येथील खांदा कॉलनीत राहणारी सुशील युवती. सौंदर्य आणि विनय या आभूषणांनी अलंकृत पूजा जे. हिने बालपणापासून नृत्याचा ध्यास घेतला आणि त्यातून आपली वाटचाल सुरु ठेवली. तिचे जन्मगाव मुरुड-नांदगाव. आजोळ हे तिचे आवडते ठिकाण. टीव्ही वाहिन्यांवरील नृत्याच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांतून तिने सातत्याने आपली चमक दाखवली, इतकेच नव्हे, तर काही टीव्ही मालिकांत आणि चित्रपटांतही भूमिका केल्या. अशा या पूजा जे. हिची नायिकेची भूमिका असलेला ‘रॅगिंग एक विकृती’ हा मराठी चित्रपट मार्चमध्ये महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे, त्यानिमित्त तिच्याशी मारलेल्या या गप्पा.
पूजा, रॅगिंग एक विकृती’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून दमदार पदार्पण करत आहेस, तुला कसं वाटतंय आणि या चित्रपटाच्या कथेची कशी बांधणी केली आहे, याबद्दल सांग?
- या चित्रपटाद्वारे मी अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं आहे, त्याबद्दल मला छान-छान वाटतंय. या चित्रपटाचा कथाविषय कॉलेजविश्व आणि तेथील रॅगिंग याभोवती फिरणारा आहे. समाजाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या एका गावात शिंदे कुटुंब राहतेय. या कुटुंबातील ओंकार शिंदे आणि ऋषीकेश शिंदे हे दोन हुशार भाऊ आहेत. शिकून मोठं व्हायचं. आई-वडिलांना सुखी ठेवायचं. इंजिनिअर व्हायचं हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं आहे. परंतु परिस्थितीमुळे वडील एका भावाला शिकवण्याचा विचार करतात. ऋषीकेश शिंदे (हर्ष कुलकर्णी) हा मोठा भाऊ स्वत:च्या स्वप्नाचा विचार न करता आपला छोटा भाऊ ओंकार शिंदे (किरण साष्टे- अलिबाग) याला शहरातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवतो. पण तोच ओंकार शिंदे कॉलेजमधील ‘रॅगिंग’ या विकृतीचा बळी ठरतो. म्हणूनच आपल्या भावाचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी व रॅगिंग या विकृतीला मुळापासून संपविण्यासाठी ऋषीकेश शिंदे इंजिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि ऋषीकेशच्या या सार्या रॅगिंग विरोधी लढ्यात जी प्रेमाची, धीराची साथ मिळते ती संचिता हिची. ही संचिताची भूमिका मी साकारली आहे. रॅगिंगमुळे एका मुलीचा बळी जातो तेव्हासुद्धा संचिता म्हणजे मी तीव्र संताप व्यक्त करते. मुलींची रॅगिंग करणार्या मोना (पूजा खंडारे- अलिबाग) या सिनिअर विद्यार्थिनीस जाब विचारते व मोनाचं मानसिक परिवर्तन घडवून आणते. थोडक्यात म्हणजे संचिता ही मी साकारलेली भूमिका नायक ऋषीकेश शिंदे याची प्रेयसी म्हणून एक नाजूक प्रेमाचा धागा पुढे घेऊन जाते व वेळोवेळी नायकाला वास्तवाची जाणीव करुन देते. नायक ऋषीकेश शिंदे खलनायक इशांत (ऋषीकेश करमळकर) याला त्याच्या गुन्ह्याबद्दल सरळ मार्गावर आणून पोलिसांच्या हवाली करतो आणि इंजिनिअरिंगची पदवी मिळवून आपल्या भावाचं स्वप्न पूर्ण करतो.
पूजा, हा चित्रपट तुला कसा मिळाला?
- २००९ साली या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय शिंदे यांच्याबरोबर एका मोबाईल फोनच्या जाहिरातीत काम केले होते, त्यांनी या चित्रपटातील मुख्य नायिकेसाठी माझी निवड केली. अनुज क्रिएशन्स/प्रेम एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माता आहेत अजित काकडे. या चित्रपटाची कथा, पटकथा- संवाद सचिन औटी यांचे आहेत, तर अलिबागच्या अनुराग गोडबोले यांचे संगीत आहे व त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. अलिबाग-थळ येथील मनिष अनसूरकर यांची गीते आहेत तर प्रकल्प वाणी, किरण साष्टे, पूजा खंडारे, संदेश गायकवाड, रणजीत घरत या अलिबागच्या तसेच हर्ष कुलकर्णी (कोल्हापूर), श्रद्धा कांबळी (मुंबई), ऋषीकेश करमळकर (नगर) या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
पूजा, या चित्रपटासाठी तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा! या क्षेत्रातील तुझा प्रवास सुखाचा होवो, पण तुला कलाक्षेत्राची आवड कशी निर्माण झाली?
- लहानपणीच कळत नकळत मला नृत्याची आवड निर्माण झाली. ही आवड जोपासली माझ्या मम्मीनी. ती सतत लहानपणापासून माझ्या बरोबर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहायची. तसेच माझ्या यशात पप्पांचाही मोठा वाटा आहे. मम्मी-पप्पांच्या प्रेरणेमुळेच माझी कलाक्षेत्रातील वाटचाल सुकर झाली. ज्युनिअर केजीमध्ये असताना वयाच्या तिसर्या वर्षी मी ‘मेंदी लगा के रखना, डोली सजा के रखना’ या गीतावर नृत्य केले आणि उपस्थित पालक- प्रेक्षकवर्गाची वाहव्वा मिळवली. त्यानंतर डोंबिवलीच्या मंजिरी क्लासमध्ये कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. वेस्टर्न डान्सची आवड असल्याने वयाच्या सहाव्या वर्षी डोंबिवली येथील पेसमेकर डान्स ऍकॅडमीत नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तेथे कोरिओग्राफर योगेश पाटकर यांचे मला मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर खर्या अर्थाने माझा नृत्यप्रवास सुरु झाला. पहिलीपासून नववीपर्यंत शालेय पातळीवरच्या राज्यस्तरीय नृत्यांजली स्पर्धात मी सोलो आणि ग्रुपमध्ये नृत्य सादर करुन पहिल्या आणि दुसर्या क्रमाकांची बक्षिसे सोडली नाहीत. त्यामुळे १० वीला असताना माझ्या डोंबिवली येथील मॉडेल इंग्लिश स्कूलने माझा सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल सत्कार केला. या वयात माझा सत्कार केल्याने मला प्रोत्साहन मिळाले आणि जबाबदारीही वाढली.
पूजा, तू टीव्हीचा छोटा पडदाही आपल्या नृत्याने भारुन टाकलास, त्याबद्दल सांग?
- मी वयाच्या आठव्या वर्षी सोनी टीव्हीवरील ‘बुगीबुगी’ या नृत्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रथम सोलो आणि आणि दोन वेळा ग्रुपमध्ये असं तीनवेळा मी नृत्याचं सादरीकरण केलं, तेव्हा सोसोला दुसरं आणि ग्रुपला पहिलं बक्षीस मिळालं. जावेद जाङ्गरी, प्रीती झांगियांनी व मिथुन चक्रवर्ती यांच्यासारख्या दिग्गज परीक्षकांनी माझं मोकळेपणानं कौतुक केलं. त्याच वर्षी सह्याद्री वाहिनीवरील ‘दमदमादम’ या नृत्याच्या कार्यक्रमात मी सहभागी झाले. प्रथम सोलो आणि चारवेळा ग्रुपमध्ये नृत्य केले. तेथे मी सोलोमध्ये प्रथम आणि ग्रुपमध्येही प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळविली.
वयाच्या ९ व्या वर्षी इ टीव्हीवरील ‘नुपूर’ या नृत्याच्या कार्यक्रमात मी सोलो आणि ग्रुपमध्ये नृत्य सादर केली. तेथे मेगा फायनलला मी प्रथम क्रमांक मिळविला. १० वर्षाची असताना झारखंड येथे राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत मी सोलोमधील लावणीनृत्य आणि चित्रपटगीतावर नृत्य केले, तेथे मला पहिल्या क्रमांकाने गौरवण्यात आले. त्याचवर्षी स्टार प्लस टीव्हीवरील ‘क्या मस्ती, क्या धूम’ या कार्यक्रमात ग्रुप डान्स केला. तेथे पहिला क्रमांक मिळाला. तेव्हा परीक्षकांनी माझे तोंडभरुन कौतुक केले. या सुमारास नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे असिस्टंट महेश दवंडे यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण सुरु केले. मी परिपूर्ण आहे असा कधी दावा केला नाही, म्हणून जिथून जिथून मला नृत्य शिकता आले, तेथून ते मी शिकत गेले. या माझ्या शिकण्याच्या वृत्तीचा फायदा झाला. पनवेल-खांदा कॉलनी येथील महात्मा महाविद्यालयात १२ वीत असताना नॅशनल चॅनेलवरील ‘क्रेझी किया रे’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात टॉप फायनल लिस्टमध्ये गेले. परंतु त्यास सुमारास बारावीची परीक्षा आल्यामुळे मला ती स्पर्धा सोडावी लागली. या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून सुधा चंद्रन, बख्तियार आणि कृष्णा अभिषेक यांनी काम पाहिले होते. त्यांनी बर्याचवेळा मला उभी राहून विशेष दाद दिली. दहा पैकी दहा गुणांची बरसात करुन माझे कौतुक केले तेव्हा सागर म्हांडोळकर हे माझे कोरिओग्राफर होते.
पूजा, तू कर्नाळा स्पोर्टस् ऍकॅडमीमध्येही आपल्या नृत्यकलेची छाप उमटवलीस त्याबद्दल सांग?
- होय, कर्नाळा स्पोर्टस् ऍकॅडमी माझ्या नृत्यकलेसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरली. तेथे २००० ते २००६ या सहा वर्षांदरम्यान मी सतत लावणीनृत्य आणि चित्रपटगीत नृत्य या दोन्ही नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला आहे. याच ऍकॅडमीमध्ये सादर करण्यात आलेल्या ‘संभवामी युगे युगे’ या महानाट्यातही मी नृत्य करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. तसेच कर्नाळा स्पोर्टस् ऍकॅडमीतील विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या समारंभात ‘मराठमोळ गाणं, लाखमोलाचं सोनं’ या ‘माहेरची साडी’ या चित्रपटातील गीतावर मी सोलो नृत्य केलं होतं तेव्हा परदेशातील कबड्डीपटू, त्यांचे प्रशिक्षक व त्यांच्याबरोबर अधिकारी यांनी माझे प्रचंड कौतुक केले. माझ्याबरोबर आपले फोटो काढून घेतले, तसेच मला भेटवस्तूही दिल्या.
पूजा, तू टीव्ही मालिकांत, तसेच चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले आहेस, त्याबद्दल सांग?
- मी प्रथम कथ्थक नृत्य शिकले आहे. कथक म्हणजे कथाकथन करणारे नृत्य. त्यात भावभावना, अभिनय या सर्व बाबी अधोरेखित केल्या जातात. या नृत्याचे संस्कार माझ्यावर झाले आणि माझे कुठल्याही प्रकारचे नृत्य अभिनयप्रधान बनले. मी जेव्हा विविध नृत्य स्पर्धात सहभागी होत गेले तेव्हा परीक्षकांनी विशेषत: माझ्या नृत्याभिनयाचे कौतुक केले. या कौतुकामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मुळात अभिनयाची आवड असल्यामुळे पनवेल येथील मल्हार ऍकॅडमीत मंदार शिंदे वगैरेंकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर एका लघुचित्रपटात प्रमुख भूमिका केली. ‘शक्तीमान’ या मालिकेतील एका मुलाच्या वाढदिवसाच्या समारंभात मी नृत्य केले आहे. त्याप्रसंगी मुकेश खन्ना, वैष्णवी यांचा संस्मरणीय असा सहवास लाभला.
मी दहा वर्षाची असताना ‘छत्रपती शिवाजी’ या मालिकेत भूमिका केली, तसेच बाराव्या वर्षी ‘तोबा- तोबा’ हा हिंदी चित्रपट केला. त्यात जुगल हंसराज यांच्याबरोबर शालेय गणवेशात नृत्य केले आहे. त्यानंतर ११ वीत असताना ‘दोष कुणाचा’? हा मराठी चित्रपट केला. त्यातही माझे नृत्य होते. २०१० च्या अखेरीस सोनी टीव्हीवरील सीआयडी मालिकेत काही भागात मी काम केले आहे. आता मी डान्स इंडिया डान्सफेम टेरेन्स लुईस यांच्याकडे कंटेपरी नृत्यप्रकार शिकते आहे.
पूजा, पुढे चित्रपट क्षेत्रातच कार्यरत रहायचे आहे काय?
- सध्या मी एसआयएस कॉलेज, नेरुळ येथे आयटीमध्ये दुसर्या वर्षाला आहे. त्यामुळे शिक्षण हे माझे प्रथम ध्येय आहे, तथापि, चांगल्या चित्रपटात, चांगल्या भूमिका मिळाल्या तर त्या मी निश्चित करीन.
पूजा, रॅगिंग एक विकृती’ या चित्रपटापासून तुझ्या काय अपेक्षा आहेत?
- महाविद्यालयीन जीवनात युवक-युवतींना कमी जास्त प्रमाणात ‘रॅगिंग’ला सामोरे जावे लागते. वैद्यकीय व अभियांत्रिकीसह अन्य उच्च शिक्षणाच्या विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगचे प्रकार चालतात. रॅगिंगची चेष्टामस्करी कोणाच्या जीवावर बेतली, तर त्याचे कोणते कौटुंबिक गंभीर परिणाम होतात याची मांडणी या चित्रपटात आहे, या चित्रपटापासून बोध घेऊन रॅगिंग करणार्यांनी रॅगिंगपासून परावृत्त व्हावे अशी अपेक्षा आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चित्रपट रसिकांनी थिएटर्समध्ये जावे असे मी विनम्र आवाहन करते.
खरोखरच, पूजा जे. हिच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘रॅगिंग...एक विकृती’ या चित्रपटाला चित्रपट रसिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा. ती तिच्या शाळेची, कॉलेजचीच नाही, तर संपूर्ण जिल्ह्याची लाडकी आहे. आ. विवेक पाटील यांचा वरदहस्त सतत तिच्या मस्तकावर असतो. तसेच जे.एम. म्हात्रे, बाळाराम पाटील, रवीशेठ पाटील, काशिनाथ पाटील, सईद उस्मानी, सदाशिव साबळे ही मान्यवर मंडळी तिच्यामागे पहाडासारखी उभी आहेत, त्यामुळे निश्चितच तिचा प्रवास सुकर झाला आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी आणि ‘रॅगिंग... एक विकृती’ चित्रपटास माझ्या शुभेच्छा!
-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉
बालपण! बालपणी सर्वच स्वप्न रंगवतात की, मी ड्रायव्हर, कंडक्टर होणार, परंतु कळायला लागल्यावर मात्र पायलट, डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची धडपड केली जाते. माझंही स्वप्न होतं, परंतु ते ड्रायव्हर, कंडक्टर किंवा डॉक्टर, इंजिनियर बनण्याचं नाही तर जगावेगळं काहीतरी करण्याचं. या माझ्या स्वप्नाला माझ्या नृत्याच्या आवडीने खतपाणी घातले. ही माझी नृत्याची आवड मला अभिनयापर्यंत घेऊन गेली आणि माझ्या जीवनाला एक वळण मिळाले. आज मी अभिनय आणि पौरोहित्य या दोन्हीही गोष्टी करतो, त्यामुळे निश्चितच मला जगावेगळं काहीतरी केल्याचा आनंद मिळतो, असे आपल्या माणगावचे चित्रपट मालिका कलाकार अतुल अशोक वीरकर म्हणतात तेव्हा त्यांच्या मनातील संतुष्टीसह त्यांच्यातील जिद्द, चिकाटी, परीश्रम करण्याची वृत्ती या सकारात्मक गोष्टी समोर येतात. त्यामुळेच त्यांची प्रगतीकडे वाटचाल चालली आहे. सध्या त्यांची ‘मन उधाण वार्याची’ ही स्टार प्रवाह टीव्हीवर चित्रमालिका सुरु आहे, त्यानिमित्त त्याच्याबरोबर गप्पांचा जमवलेला हा फड.
अतुलजी, तुमचं मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील वीरपुरे. तुमचं जन्मगाव आणि शालेय शिक्षण रायगडातील माणगावचे. घरात कोणतीही नृत्याभिनयाची पार्श्वभूमी नसताना तुम्ही त्याकडे कसे वळलात?
- घरी नृत्य-नाट्य याची पार्श्वभूमी नसली तरी शालेय जीवनात नृत्याची आवड निर्माण झाली. विविध चित्रपट गीतांवर मी नृत्य करायला शिकलो. विनोदी नृत्यप्रकार हे माझे वैशिष्ट्य आहे आणि आजपर्यंत ते मी निष्ठेने जपले आहे.
अतुलजी, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत अनेकानेक नृत्यस्पर्धात सहभागी होऊन यश मिळवले आहे. त्याबद्दल सांना ना?
- माझी नृत्याची आवड मी जिद्दीने जोपासली. घरची गरिबी, त्यामुळे माझ्या आवडीला घरुन प्रोत्साहन मिळण्याची शक्यताच नव्हती. नृत्य स्पर्धांत सहभागी होण्यासाठीचे शुल्क भरण्याइतपतही माझ्याकडे पैसे नसायचे. यातून मी मार्ग काढला. मी पापड, उद्बत्त्या, कॅलेडर्स घरोघरी जाऊन विकले. घरोघरी पेपर टाकले. त्यातून मिळणार्या पैशातून मी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय नृत्यस्पर्धांत सहभागी झालो आणि यश मिळवत गेलो. ‘एक चतुर नार’ या मेहमुद, सुनीलदत्त अभिनीत गीतनृत्याचे मी साडेचारशेहून अधिक प्रयोग महाराष्ट्रात केले आहेत. इतरही नृत्य त्याच ताकदीने मी केली आहेत, त्यामुळे अतुल वीरकर आणि विनोदी नृत्य हे समीकरण महाराष्ट्रात निर्माण झाले. या नृत्यामुळे मला प्रचंड प्रसिद्धी आणि पुरस्कारही मिळाले आहेत.
अतुलजी, तुम्ही नृत्याकडून एकदम अभिनयाकडे कसे वळलात, या क्षेत्रातील तुमचे गॉडफादर कोण आहेत?
- मुंबईमध्ये माझे नृत्याचे कार्यक्रम सुरु असताना सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते अरुण कदम यांनी मला पाहिले. माझी विनोदी देहबोली पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी मला सांगितले की, तू अभिनयासाठी प्रयत्न कर. इतके बोलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी दिग्दर्शक राजू देशपांडे यांना माझे नाव सुचवले, त्यामुळे ‘ई टीव्हीवरील ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक‘ ही मालिका मला मिळाली. या मालिकेत निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळी यांच्याबरोबर काम करायला मला संधी मिळाली. ही माझी पहिली टीव्ही मालिका. त्यामुळे ही मालिका मिळवून देणारे अरुण कदम हे माझे गॉडफादर आहेत, असे म्हणायला अजिबात संकोच वाटत नाही.
अतुलजी, त्यानंतर पुन्हा तुम्ही निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळी यांच्याबरोबर भूमिका केली त्याबद्दल सांगा?
- ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’ नंतर मी झी मराठीवरील ‘वहिनीसाहेब’ या मालिकेत चारशे वर्षांपूर्वीच्या पहिल्या सेनापतीची भूमिका केली. त्यानंतर ‘साम’ मराठीवरील ‘नानीच्या नानाची’ या मालिकेत डॉक्टर आणि स्मशानातील भटजीची भूमिका केली. या मालिकेत निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळी, मी असे तिघेही असल्यामुळे निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळी आणि मी असे आम्ही पुन्हा एकत्र आलो असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही.
अतुलजी, त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या मालिकांत तुमच्या अभिनयाचे दर्शन घडवलेत?
- झी मराठीवरील ‘मालवणी डेज’ या मालिकेत किरवंत ब्राह्मणाची भूमिका केली. ‘साम’ मराठीवर ‘गंगा सिंधूच यमुना’ या मालिकेत वॉर्डबॉयची भूमिका केली. या मालिकेत लीना भागवत, माधवी निमकर, किशोर नांदोस्कर, आशीष पवार, इत्यादी कलाकार होते. इ टीव्हीच्या ‘गोजिरवाण्या घरात’ या मालिकेत डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत काम केले. छोटीशी असलेली भिकार्याची भूमिकाही माझ्या वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने रंगवली.
अतुलजी, तुम्ही चित्रपटातही झळकलात, त्याबद्दल सांगा ना?
- ‘स्वप्न’ हा माझा पहिला मराठी चित्रपट. यात मी विद्यार्थ्याची भूमिका केली आहे. इंदापूरचे किरण केळुसकर यांच्यामुळे हा चित्रपट मिळाला. त्यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे चित्रपट क्षेत्रात शिरकाव करु शकलो, त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. दिग्दर्शक अशोक बहादुरे यांच्या ‘हरी ओम विठ्ठला’ या चित्रपटात सतीश तारे, अरुण कदम यांच्याबरोबर मी एका बेवड्याची भूमिका केली आहे. ती भूमिका विनोदी अंगाने जाणारी असल्याने तिने रसिकांना खळाळून हसवले ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. मी अजय फणसेकरांच्या ’मुक्ती’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केली आहे. संजय दत्तच्या भावाचा मित्र म्हणून त्यात झळकलो आहे. त्यातील एका आयटम सॉंगमध्ये माझा सहभाग आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी, सोनिया मेहरा, विजू खोटे इत्यादी कलाकार आहेत.
अतुलजी, तुमच्या आगामी चित्रपटांविषयी सविस्तर सांगा?
- ‘हरहर महादेव’ हा माझा येणारा नवीन चित्रपट असून अरुण नलावडे यांच्या अपोझिट गावच्या मास्तराची माझी भूमिका आहे. आगामी ‘वरात आली घरात’ या चित्रपटात भरत जाधव, अंशुमन विचारे यांच्यासोबत मी एका टपोरीचा सीन केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विजय गोखले, तसेच मंदार देवस्थळी यांच्या आगामी ‘धटिंग धिंगाणा’ या चित्रपटात हवालदाराची भूमिका केली आहे.
अतुलजी, मागे वळून पाहिल्यावर आपल्याला काय वाटत?
- माझी पहिली मालिका ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ प्रसारित होण्याच्या १ वर्ष आधी म्हणजे २००३ साली माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आई आणि माझे दोन भाऊ अहमदनगरला स्थायिक झाले. मी मात्र माणगावमध्येच अभिनयाचे करिअर करण्यासाठी थांबलो. तेव्हा मला पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन माणगावचे अशोक सुर्वे आणि त्यांचे चिरंजीव अविनाश सुर्वे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने दिले. अशोक सुर्वे यांना तीन मुले आहेत, परंतु त्यांनी मला चौथ्या मुलाप्रमाणे प्रेम दिले. माणगावचे दिलीप रातवडकर माझ्या सान्निध्यात आले. त्यांनी ’एक चतुर नार’ या नृत्यासाठी माझा मेकअप केला, नंतर ते माझे मेकअपमनच झाले. त्यांचेही प्रोत्साहन मला सतत मिळते आहे. माणगावमध्ये मला अनेकांचे प्रेम मिळते आहे, त्यामुळे तेथे मी स्वत:ला असुरक्षित आणि एकाकी समजत नाही. या सर्वांमुळे मी आतापर्यंत यशस्वी वाटचाल करु शकलो असे मागे वळून पाहता वाटते.
अतुलजी, तुम्ही अनेक सेलिब्रेटींकडे पूजा, मुहूर्त इत्यादीचे पौरोहित्य केले आहे, त्याबद्दल सांगा?
- सचिन पिळगावकर, महेश कोठारे, विजय पाटकर, विजय गोखले, जयवंत वाडकर, अशोक शिंदे, परी तेलंग, मैथिली जावकर, माधुरी जुवेकर, विनय येडेकर, सुदेश बेरी इत्यादी अनेकानेक सेलिब्रेटींकडे गणपती बसवले आहेत. पूजा आणि चित्रपट, मालिकांचे मुहूर्त केले आहेत.
अतुलजी, साम मराठीवरील ‘नानीच्या नानाची’ या मालिकेसाठी पु.ल. देशपांडे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार आणि इतरही अनेकानेक पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत, आता तुमचे पुढचे ध्येय कोणते आहे?
-वेदनेतून विनोदाचा जन्म होतो, हे अनेकानेक नामवंतांच्या जीवनचरित्रांतून दिसून येते. मीही गरिबीची वेदना सहन केली, या वेदनेनेच मला विनोदाची दृष्टी दिली. माझी देहबोलीही विनोदाला पुरक आहे, त्यामुळे उत्तम विनोदी अभिनेता बनणे हे माझे ध्येय आहे. या ध्येयाद्वारे दीनदुबळ्यांना खळखळून हसवू शकलो, तर त्यापेक्षा माझे दुसरे कोणतेही भाग्य नाही. सेलिब्रेटी भटजी आणि विनोदी अभिनेता बनणे हे माझे ध्येय आहेच, पण मला ज्या माणगावने माया दिली, त्या माणगावचेही नाव मला उज्ज्वल करायचे आहे.
अतुल वीरकर एक साधाभोळा २९ वर्षांचा तरुण. त्यांची स्वप्ने ते आपल्या परिश्रमाने आणि जिद्दीने साकार करतील, परंतु माणगावने जे प्रोत्साहन दिलं, तसे संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्राने त्यांना द्यावं असं म्हटलं तर त्यात काहीही वावगं नाही.
-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉
होय! काया-वाचा- मनाने मी कलाक्षेत्राला समर्पित झालो आहे. तेथे माझी नम्र उपासकाची भूमिका असल्यामुळे मी कलाक्षेत्राची एक एक शिखरे पादाक्रांत करु शकलो. माझ्यामध्ये जसा कलाकार आहे, तसाच तंत्रज्ञही आहे, त्यामुळे रंगभूमी असो, व्हिडिओ चित्रपट असो, अथवा अल्बम असो माझी सर्जकता फुलपाखरासारखी विहार करीत असते. या सर्जकतेमुळेच ‘यतीन घरत’ या माझ्या नावाला एक वलय लाभले आहे. परंतु हे वलय बाजूला ठेवून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की, मी सच्चा कलाकार मित्र आहे, असे प्रांजळ उद्गार अलिबागेतील कलाकारांसाठी हक्काचे स्थान असलेल्या, अक्षय टीव्हीचे यतीन घरत काढतात, तेव्हा त्यांच्या सर्जकतेचं फुलपाखरु सदैव यशाचे इंद्रधनुष्य चितारीत राहील याची खात्री पटते.
यतीन घरत यांचे वडील रमेश घरत आणि आई प्रतिभा घरत हे दोन्हीही डॉक्टर. त्यामुळे यतीन घरतही डॉक्टर बनले असते तर त्यात नवल नसते. परंतु तसे झाले नाही. बालपणापासूनच त्यांचा ओढा कलाक्षेत्राकडे होता आणि नियतीने व त्यांच्या जिद्दीने त्यांनी त्याच क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली. आज ते नवीन कलाकार, तंत्रज्ञ तयार करणारी कार्यशाळाच बनले आहेत. ते अक्षय टीव्हीचे निर्मिती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत, त्यांच्याशी मारलेल्या या मनसोक्त गप्पा.
यतीनजी, माणसाच्या जीवनात एखादा टर्निंग पॉईंट येतो आणि तेथे त्याच्या जीवनाला एक दिशा मिळते, एखाद्या विषयाबाबत गोडी निर्माण होते आणि तो त्या विषयाला स्वत:ला वाहून घेतो आणि विशेषज्ञ बनतो. आज तुम्ही कुशल दिग्दर्शक आणि व्हिडीओ संकलक आहात, तुमच्यात एक अभिजात कलाकार दडलेला आहे. या त्रिगुणाकडे ओढले जाण्यास कोणते निमित्त घडले?
- चौथीत असताना मी सावकाराचा एकपात्री कार्यक्रम शाळेच्या गॅदरिंगमध्ये केला. सगळ्यांनी माझ्या एकपात्री प्रयोगाचे भरभरुन कौतुक केले आणि आई-वडिलांनीही मला प्रोत्साहन दिले. तेव्हाच माझ्या मनात कलाक्षेत्राविषयी जवळीक निर्माण झाली. शाळा व महाविद्यालयीन जीवनात गॅदरिंगमध्ये मी माझ्या कलागुणांना मुक्त वाट करुन दिली आणि या क्षेत्रातच कारकीर्द घडवण्याचे ठरवले.
यतीनजी, तुमच्या अंगभूत कलेला मोठ्या प्रमाणात व्यासपीठ केव्हा मिळाले?
- मी वयाच्या 20 व्या वर्षी 1992 साली अलिबागेतील स्वरश्री वाद्यवृंदाद्वारे ‘मृद्गंध’ या नृत्य- नाट्य- संगीत, शॅडोप्ले यांचे मनोवेधक मिश्रण असलेल्या रंगमंचीय कलाकृतीचे दिग्दर्शन केले. या कलाकृतीत 28 कलाकार होते आणि या कलाकृतीची संकल्पनाही माझी होती. ही कलाकृती गाजली. हा वाद्यवृंद प्रसिद्ध होताच. अशा वाद्यवृंदाद्वारे माझ्याही प्रसिद्धीला पंख फुटले.
तुम्ही रंगमंचावर कल्पनेचे पंख लावून वावरलात. या पंखांनीच तुम्हाला व्हिडीओ तंत्राकडे कसे वळवले, त्याबाबत सांगा?
- मला मूलत:च संगणकाची आवड होती. स्वाफ्टवेअर मॅनेजमेंटचा डिप्लोमा केल्यानंतर मी डिझायनिंगकडे वळलो. त्यानंतर अलिबागचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि अक्षय टीव्ही या स्थानिक वाहिनीचे सर्वेसर्वा प्रशांत नाईक यांनी अक्षय टीव्हीची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तेथूनच खर्या अर्थाने माझी या क्षेत्रातील तंत्रज्ञानाची वाटचाल सुरु झाली. अक्षय टीव्हीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली गेल्यामुळे मी मुंबईत ‘जस्ट व्हिडीओ’ येथे व्यावसायिक व्हिडिओ संकलनाचे प्रशिक्षण घेतले. अक्षय टीव्हीच्या माध्यमातून किशोर म्हात्रे यांच्या रुपाने मला एक उत्तम लेखक, दिग्दर्शक नित्र लाभला. तेव्हा आम्ही ‘इनबॅलन्स जर्नी’ नावाचा स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करणारा लघुचित्रपट बनवला. या लघुचित्रपटाचे सर्वस्तरातून कौतुक झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
यतीनजी, अक्षय टीव्हीच्या माध्यमातून आपण आणखी कोणते उपक्रम राबविले?
- कुलाबा किल्ल्यातील माघी गणेशोत्सवाबाबतचा माहितीपट तयार केला याचे लेखन सुनील ठोंबरे यांनी व मी स्वत: दिग्दर्शन केले. त्यानंतर 2009 च्या दिवाळीला ‘दिवाळी पहाट’ हा स्थानिक गायक, वादकांना घेऊन एक संगीतमय कार्यक्रम तयार केला. यात बारापेक्षाही अधिक गायक-वादकांना संधी दिली. हा कार्यक्रमही रसिकांच्या पसंतीस उतरला आणि आमचा हुरुप अधिकच वाढला. विशेष म्हणजे रायगड भूषण मुग्धा वैशंपायन हिला सारेगम लिटीलचॅम्प स्पर्धेत विजय मिळावा म्हणून वेगवेगळ्या कॅम्पेन केल्या. त्याचा तिला बराच फायदा झाला आणि आमच्या कॅम्पेननेही बरेच कौतुक मिळवले.
आम्ही अलिबागेतील वात्सल्य ट्रस्टच्या कार्याची माहिती देणारा माहितीपट तयार केला आणि तो अक्षय टीव्हीवरुन प्रसारित केला. रस्त्यावर टाकलेल्या अनाथ मुलांना मायेने वाढवणार्या देवदुतांची माहिती त्याद्वारे समाजाला मिळाली आणि त्यामुळे अजूनही समाजात माणूसकीची ज्योत तेवती आहे, हे दिसून आले. हा आमचा आमच्या सामाजिक जाणिवेला एक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न होता, त्यात आम्ही यशस्वी झालो.
यतीनजी, तुम्ही कलाकार, वादक, तंत्रज्ञांची एक फळीच निर्माण केलीत, त्याबद्दल सविस्तर सांगा?
- आपल्या स्थानिक कलाकारांकडे टॅलेंट आहेत. परंतु ते प्रदर्शित करण्याचे त्यांच्याकडे व्यासपीठ नव्हते. अक्षय टीव्हीने ते व्यासपीठ त्यांना मिळवून दिले. स्थानिक कलाकारांना संधी देणे, प्रशिक्षित करणे हा अक्षय टीव्हीचा हेतू आहे. या हेतूची पूर्तता करण्यासाठी मी अथक प्रयत्न करीत आहे. आज अक्षय टीव्हीशी 16 कॅमेरामन तरुण सलग्न आहेत. कसल्याही शुटिंगमध्ये आमचे कॅमेरामन, तंत्रज्ञ कलात्मकता दाखवत असतात. त्याचबरोबर अक्षय टीव्ही चित्रीकरणाच्या दर्जाबाबत अत्यंत काटेकोर आहे, त्यात कोणतीही तडजोड केली जात नाही. अक्षय टीव्हीचे एक ब्रीद आहे. मिळणार्या कामाचा मोबदला जरी कमी असला तरी आमच्याकडे असलेले ज्ञान आणि उपलब्ध असलेली साधने यामधून उत्कृष्ट दर्जाचे काम देण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्यात आम्ही फार दक्ष आहोत. लवकरच अक्षय टीव्हीतर्फे आमच्या कॅमेरामन, तंत्रज्ञांसाठी ‘हायडेफीनेशन’ या नवीन व्हिडिओ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अक्षय टीव्हीने एका चॅनेलपासून सुरुवात केली. आज अक्षय टीव्ही पूर्णपणे संगणकीकृत झाले आहे. गेल्या वर्षीपासून अजून एक ऑन डिमांड चॅनेल सुरु केले आहे. त्यात इंटरनेट आणि टेलिफोनच्या माध्यमातून दर्शक त्यांना हवे असलेले गाणे किंवा अक्षय टीव्हीचा कार्यक्रम दाखवण्याची मागणी करु शकतात. तसेच अक्षय टीव्ही आणि कृषीवलच्या संयुक्त विद्यमाने रोज बातम्याही प्रसृत करण्यात येत आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
गेली 3 वर्षे चेंढरे सन्मान सोहळा आयोजित केला जातो. याहीवर्षी चौथा चेंढरे सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा भव्यदिव्य असतो आणि याचा इव्हेन्ट डायरेक्टर मी आहे याचा मला निश्चितच अभिमान वाटतो.
यतीनजी, हे सर्व उपक्रम सुरु असतानाच तुम्ही चित्रपट समन्वयकाची जबाबदारी पार पाडणे सुरु केलेत, त्याबद्दल सांगा?
- होय, शंतनू रोडे यांच्याबरोबर ‘रावस’ नावाच्या बालचित्रपटाचा कोऑर्डिनेटर (समन्वयक) म्हणून मी काम केले. त्याच लिंकमधून ‘क्षणभर विश्रांती’ या मराठी चित्रपटाचे कोऑर्डिनेटर आणि असिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून मी काम पाहिले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘साडे माडे तीन’ चित्रपटाची टीम ‘क्षणभर विश्रांती’साठी होती. दिग्दर्शक सचित पाटील, मराठी चित्रपटांना एक नवीन रुप देण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे असे संजय जाधव यांच्याबरोबर ‘क्षणभर विश्रांती’साठी काम करण्याची मला संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, त्याचा फायदा मला पुढे होणार आहे.
कोऑर्डिनेटर ही मोठी जबाबदारी असते. शुटिंग, शुटिंगस्थळी कलाकरांना नेणे, कलाकारांचे व्यवस्थापन करणे, इतर चित्रपटविषयक लागणार्या गोष्टींची पूर्तता करणे, इत्यादी बाबींची धावपळ कोऑर्डिनेटरला करावी लागते. शुटिंगच्या वेळी काडेपेटीपासून मोठ्या बसपर्यंत कशाचीही गरज भासू शकते, अशा परिस्थितीत अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा, सासवणे इत्यादी ठिकाणी ‘क्षणभर विश्रांती’चेे झालेले शुटिंग मी कोऑर्डिनेटर म्हणून एकही दिवस कोणत्याही कारणांनी खोळंबू दिले नाही. यासाठी माझे सहकारी मित्र दीपक पाटील, राजेश बाष्टे, श्रीकांत कातकर यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. या चित्रपटासाठी 130 जणांचे युनिट काम करीत होते. त्यांना कोऑर्डिनेट करताना अतिशय तारांबळ उडत होती. पण हा चित्रपट करताना खूप आनंद मिळाला. या चित्रपटात अलिबागच्या दहा कलाकारांना छोट्यामोठ्या भूमिकाही मिळाल्या आहेत. या चित्रपटासाठी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रेवदंड्याचे उपसरपंच राजन वाडकर, गणेश मोरे यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत.
मी दहा-बारा अल्बमसाठी काम केले आहे. अक्षय टीव्हीसाठी प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर व शकुंतला जाधव यांना घेवून ‘झुमका’ हा गाण्याचा अल्बम काढला, त्यात स्थानिक गायक-वादकांना संधी दिली. त्याचा व्हिडीओ अल्बम काढण्याचे काम लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच 2009 साली ‘कलादर्पण’ पुरस्कार या आयबीएन लोकमतच्या लाइव्ह टेलिकास्टसाठी ऑनलाईन एडिटर म्हणूनही काम केले आहे. माझ्या या वाटचालीबद्दल मी अक्षय टीव्ही परिवाराचा कृतज्ञ आहे. अक्षय टीव्हीमध्ये गेली पंधरा वर्षे दीपक पाटील माझ्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. त्यांचाही माझ्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा आहे. त्याबरोबरच किशोर म्हात्रे, सुनिल ठोंबरे, सागर नार्वेकर, विक्रांत वार्डे, अनिल म्हात्रे, सचिन कांबळे, नरेंद्र ठाकूर, प्रदीप नारंगीकर, महेश काठे, संदेश मयेकर ही सगळी मित्रमंडळी माझ्यामागे खंबीरपणे असतात. म्हणूनच मी विविध जबाबदार्या पेलू शकलो हे सांगायला मला संकोच वाटत नाही.
यतीनजी, भविष्यात आपल्याला खूप काही करायचे आहे, आताच त्याबाबत मनात योजना आखल्या असतील?
- मला ‘व्हीआर बर्निंग’ या शीर्षकाचा एक लघुपट करायचा आहे. ग्लोबल वार्मिंगला सर्वसामान्य जनताही आपआपल्या पातळीवरुन तोंड देऊ शकते. याबाबत प्रबोधन करणारा हा लघुपट असणार आहे. त्याबरोबर ‘पुन्हा एकदा’ या शीर्षकाची चित्रपट कथा लिहितोय. या चित्रपटासाठी मी प्रयत्न करणार आहे, पाहू या पुढे काय होते ते! प्रामुख्याने मला चित्रपट संकलनात महारथ प्राप्त करायची आहे. चांगला ऍनिमेटर बनायचे आहे. या क्षेत्रात शिक्षण कधी संपत नाही. त्यामुळे मला सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे. निश्चितच मी लवकरच या क्षेत्रात माझा ठसा उमटवीन.
मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा रायगड जिल्हा शाखेचा उपाध्यक्ष आहे. ‘क्षणभर विश्रांती’ हा चित्रपट आणि इतर उपक्रमांमध्ये मी गेले वर्षभर गुंतलेला असल्यामुळे या वर्षी काही उपक्रम करता आले नाही, परंतु पुढच्या वर्षी मात्र भरपूर उपक्रम राबवून रसिकांशी असलेले माझे नाते अधिकच वृद्धिंगत करणार आहे.
यतीन घरत यांची अभ्यासूवृत्ती, काम करण्याची अथक प्रवृत्ती यातून निश्चितच ते आपलं ध्येय गाठू शकतील यात वाद नाही. यासाठी त्यांना आपल्या आई-वडिलांचे आणि बंधू सचिन, वहिनी नीता यांचे सहकार्य आहेच. परंतु खंबीर साथ पत्नी सौ. ज्योती घरत यांची आहे. त्या घरसंसार, मुलांचे शिक्षण समर्थपणे सांभाळत आहेत, त्यामुळेच यतीन घरत सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शुभम आणि यश या मुलांनाही आपल्या बाबांचा अभिमान वाटतो. यतीन घरत यांच्या मनातील सर्व संकल्पना पूर्ण होवोत ही शुभेच्छा!
-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉
मी आणि नृत्य, जणू नाण्याच्या दोन बाजू. पण फरक इतकाच की मी आणि नृत्य एकच आहोत. दुधात ज्याप्रमाणे साखर मिसळते, त्याप्रमाणे माझ्या जीवनात नृत्य मिसळले आहे. नृत्याची आराधना मी कधी करायला लागलो, ते मला कळलेच नाही. अगदी बालपणीच मला नटराजांचे आशीर्वाद लाभले. त्यामुळे माझा नृत्यप्रवास लक्षवेधक ठरला आहे, असे उरण तालुक्यातील मोठ्या जुईचा पपन कमलाकर पाटील, हा पीएनपी हायस्कूलचा इयत्ता नववीमधील विद्यार्थी म्हणतो, तेव्हा त्याच्यातील ठासून भरलेला आत्मविश्वास दिसून येतो.
खरेतर पपनच्या घरात कलेचा वास आहे. वडील कमळाकर पाटील कमर्शिअल आर्टिस्ट आहेत. साईन बोर्ड पेंटिंगचा गेली 15 वर्षे ते स्वत:चा व्यवसाय चालवताहेत. त्यांनीच पपन जेथे-जेथे नृत्यस्पर्धात गेला तेथे-तेथे पपनची रंगभूषा आणि वेशभूषा केली आहे. त्यांनी अनेक नाटकांसाठीही रंगभूषा केली आहे. पपन अशी कलादृष्टी असलेल्या पित्याचा मुलगा आहे, त्यामुळे तोही कलाकार बनला, नृत्यपारंगत झाला. त्याच्याशी मांडलेली ही गप्पांची मैफिल.
पपन, तुला नृत्याची आवड कशी निर्माण झाली?
- आमच्या गावात नृत्याच्या स्पर्धा व्हायचा, मी त्यावेळी अगदी लहान होतो, असं असूनही आपणही नृत्य करावं असं माझ्या मनात आलं. पहिलीत असताना मी वडिलांकडे मलाही नृत्य करायचे असल्याचा हट्ट धरला, तेव्हा माझ्या वडिलांनी काकांकडे नृत्य शिक असं सांगितलं. माझे काका किशोर पाटील नृत्य बसवायचे. त्यांनी मला नृत्य शिकवले आणि आजही त्यांचे मला नृत्याबाबत मार्गदर्शन मिळते आहे.
पपन, तू शेकडो नृत्यस्पर्धात शेकडो बक्षीस मिळवलीस, परंतु पहिल्या बक्षिसाचे प्रत्येकाला अप्रुप असते. तू पाहिले बक्षीस कुठे मिळवलेस?
- गावात फ्रेन्डस ग्रुपने नृत्यस्पर्धा आयोजित केली होती. त्यात मी ‘यशवंत’ चित्रपटातील ‘कडकलक्ष्मी’ या गीतावर नृत्य केले आणि पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही मी मिळवले. पहिलीत असतानाचे हे माझे पहिले बक्षीस, त्यानंतर आतापर्यंत मी नृत्यस्पर्धांत मागे वळून पाहिलेच नाही.
पपन, तू राष्ट्रीय पातळीवरील नृत्यस्पर्धेतही आपली चमक दाखवलीस त्याबद्दल सांग?
- 2005 साली मी नऊ वर्षांचा असताना नेहरु युवा केंद्र, अलिबागचे हितेंद्र वैद्य यांनी माझे नृत्य पाहून अनॉकुलम- केरळ येथील ऑल इंडिया नृत्य स्पर्धेसाठी माझी निवड केली. तेथे मी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलं. या स्पर्धेत 13 राज्यांनी भाग घेतला होता. त्यांच्यामधून मला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. नृत्यातून मी महाराष्ट्राची शान वाढविली याचा मला आजही अभिमान वाटतोय. नंतर एकता सांस्कृतिक महोत्सवात, मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय नृत्यस्पर्धेत 200 कसलेल्या स्पर्धकांमधून मला प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळाले.
पपन, तू टीव्ही वाहिन्यांवरही आपल्या नृत्याची छाप पाडलीस, त्याबद्दल सविस्तर सांग?
- इ टीव्हीवरील ‘फूल टू धमाल’ नृत्यस्पर्धेत मी विजेता ठरलो. सह्याद्री वाहिनीवरील ‘दमदमादम’ या नृत्यस्पर्धेत प्राथमिक फेरी आणि उपान्त्य फेरीमध्ये मी विजेता ठरलो आणि अंतिम फेरीत सव्वाशे स्पर्धकांमधून मला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. नंतर ‘मी मराठी’ वाहिनीवर ‘तालावर ताल दे धमाल’ या कार्यक्रमात उपविजेता ठरलो. ‘मी मराठी’वरील ‘छोटे चॅम्पियन’ नृत्यस्पर्धेत रसायनीच्या ऋतुजा सुपेकर हिच्याबरोबर तीन गाण्यांवर नृत्य केली, परंतु ही स्पर्धा मी काही खाजगी कारणाने अर्ध्यावरच सोडली. 2008 साली सोनी वाहिनीवर ‘इंटरमेंटके लिये कुछ भी करेगा’ या कार्यक्रमात ‘रुखीसुखी रोटी’ या गाण्यावर पेणमधील रुपम पाटील हिच्याबरोबर बुजगावणे नृत्य केले. त्याला अनु मलिक आणि फरहा खान यांच्या हस्ते दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. माझ्या नृत्याची व्हीनस कंपनीने ‘विरारवाली जीवदानी मैय्या’ ही भोजपुरी डीव्हीडी काढली आहे. तर श्रेयस व्हिडीओ कंपनीने ‘गणपती सण गाजतंय’ ही व्हिसीडी काढली आहे.
पपन, एकापेक्षा एकचा तुझा प्रवास कसा झाला?
- झीच्या या नृत्याच्या या कार्यक्रमात हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून गुणवत्तेनुसार केवळ 25 स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि या 25 स्पर्धकांमधून मी आता टॉपटेनमधील पोहोचलो आहे. आतापर्यंत मी 11 गाण्यांवर नृत्यं केली आहेत. कटस्वामी (तामिळगाणं), यही सपना, चांगभलं, रात है नशिली, ही नवरी असली, आयत्या घरात घरोबा, या या मैय्याया (उंदिरमामा आयलो), भागम भाग, हनुमान चालिसा, डिपांडी डिपांग, ढ्याटड्यांग या गाण्यावर मी एकापेक्षा एक सरस नृत्य करण्याचा प्रयत्न केला. ‘चांगभलं’ वरील नृत्यासाठी ‘बेस्ट परफार्मर ऑफ डे’ चे बक्षीस मला अभिनेता अशोक सराफ यांच्या हस्ते मिळाले आहे. तर ‘डिपांडी डिपांग’ या नृत्यासाठी महागुरु सचिन पिळगावकर यांनी आसनावरुन उठून माझ्यापर्यंत येऊन मला शंभर रुपयांचे बक्षीस दिले आणि पाठीवर कौतुकाची थाप मारली. तू कोणत्याही प्रकारची नृत्यं सफाईने करतोस असे माझ्याबद्दल कौतुगोद्गारही काढले.
पपन, तू या वयात आतापर्यंत अनेकानेक पुरस्कार मिळवलेस त्याबद्दल सांग?
- उरण येथे गणेश नाईक यांच्या हस्ते मला ‘राष्ट्रवादी’ पुरस्कार देण्यात आला आहे. द्रोणागिरी स्पोर्टस् असोसिएशन, उरणने पुष्कर श्रोत्री यांच्या हस्ते मला द्रोणागिरी पुरस्कार दिला आहे. तसेच उरण टाऊन हॉल येथे सतीश पुळेकर, कविता जोशी यांच्या हस्ते मला सह्याद्री भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. सांगण्यासारखं म्हणजे कर्नाळा स्पोर्टस् ऍकॅडमी, पनवेलमध्ये सलग सातवेळा छोट्यांच्या नृत्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्याचा विक्रम केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील नृत्यस्पर्धांमधून साडेतीनशे-चारशे बक्षिसे मी मिळवली आहेत.
पपन, तुझ्या नृत्यप्रवासात तुला आई-वडिलांचं जे उत्तेजन भेटलं, त्याबद्दल सांग ना?
- माझी आई मीना कमलाकर पाटील हिचे प्रोत्साहन मला मोलाचे आहे. वडिलांनी तर मला प्रत्येक नृत्यस्पर्धेत सहभागी केले. माझ्याबरोबर सतत खंबीरपणे उभे राहिले. काका किशोर पाटील यांचे मार्गदर्शन सतत लाभले. कोरिओग्राफर सचिन ठाकूर, सहकोरिओग्राफर अक्षय पाटील आणि मुंबईतील इतर कोरिओग्राफरचे सहकार्य मिळत आहे. या सर्वांच्यामुळे मी आज आत्मविश्वासाने नृत्यक्षेत्रात खंबीरपणे उभा आहे.
पपन, तू सध्या लहान आहेस, भविष्यात तुला विहार करण्यासाठी मोठं आकाश उपलब्ध आहे, परंतु तुझं भविष्यातील ध्येय कोणते आहे?
- मला अभिनेता बनायचे आहे, जर अभिनयात मी कारकीर्द केली नाही, तर मला नृत्यदिग्दर्शक बनायला आवडेल. त्यासाठी मी लागेल तितके कष्ट घ्यायला तयार आहे.
पपन निश्चितच एक ध्येयासक्त मुलगा आहे. नकळत्या वयापासून तो नृत्यामध्ये मेहनत करीत आहे, भविष्यातही तशीच मेहनत तो करत राहणार आहे. अभिनयात त्याला चमकायची इच्छा असली तरी नृत्य हा पपनचा पाया आहे, त्यामुळे तो कलेच्या प्रांतात अढळ राहणार आहे त्याला खूप खूप शुभेच्छा!