शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१०

सेलिब्रेटी भटजी : अतुल वीरकर

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉



    बालपण! बालपणी सर्वच स्वप्न रंगवतात की, मी ड्रायव्हर, कंडक्टर होणार, परंतु कळायला लागल्यावर मात्र पायलट, डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची धडपड केली जाते. माझंही स्वप्न होतं, परंतु ते ड्रायव्हर, कंडक्टर किंवा डॉक्टर, इंजिनियर बनण्याचं नाही तर जगावेगळं काहीतरी करण्याचं. या माझ्या स्वप्नाला माझ्या नृत्याच्या आवडीने खतपाणी घातले. ही माझी नृत्याची आवड मला अभिनयापर्यंत घेऊन गेली आणि माझ्या जीवनाला एक वळण मिळाले. आज मी अभिनय आणि पौरोहित्य या दोन्हीही गोष्टी करतो, त्यामुळे निश्‍चितच मला जगावेगळं काहीतरी केल्याचा आनंद मिळतो, असे आपल्या माणगावचे चित्रपट मालिका कलाकार अतुल अशोक वीरकर म्हणतात तेव्हा त्यांच्या मनातील संतुष्टीसह त्यांच्यातील जिद्द, चिकाटी, परीश्रम करण्याची वृत्ती या सकारात्मक गोष्टी समोर येतात. त्यामुळेच त्यांची प्रगतीकडे वाटचाल चालली आहे. सध्या त्यांची ‘मन उधाण वार्‍याची’ ही स्टार प्रवाह टीव्हीवर चित्रमालिका सुरु आहे, त्यानिमित्त त्याच्याबरोबर गप्पांचा जमवलेला हा फड.
     अतुलजी, तुमचं मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील वीरपुरे. तुमचं जन्मगाव आणि शालेय शिक्षण रायगडातील माणगावचे. घरात कोणतीही नृत्याभिनयाची पार्श्वभूमी नसताना तुम्ही त्याकडे कसे वळलात?
     - घरी नृत्य-नाट्य याची पार्श्वभूमी नसली तरी शालेय जीवनात नृत्याची आवड निर्माण झाली. विविध चित्रपट गीतांवर मी नृत्य करायला शिकलो. विनोदी नृत्यप्रकार हे माझे वैशिष्ट्य आहे आणि आजपर्यंत ते मी निष्ठेने जपले आहे.
    अतुलजी, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत अनेकानेक नृत्यस्पर्धात सहभागी होऊन यश मिळवले आहे. त्याबद्दल सांना ना?
    - माझी नृत्याची आवड मी जिद्दीने जोपासली. घरची गरिबी, त्यामुळे माझ्या आवडीला घरुन प्रोत्साहन मिळण्याची शक्यताच नव्हती. नृत्य स्पर्धांत सहभागी होण्यासाठीचे शुल्क भरण्याइतपतही माझ्याकडे पैसे नसायचे. यातून मी मार्ग काढला. मी पापड, उद्बत्त्या, कॅलेडर्स घरोघरी जाऊन विकले. घरोघरी पेपर टाकले. त्यातून मिळणार्‍या पैशातून मी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय नृत्यस्पर्धांत सहभागी झालो आणि यश मिळवत गेलो. ‘एक चतुर नार’ या मेहमुद, सुनीलदत्त अभिनीत गीतनृत्याचे मी साडेचारशेहून अधिक प्रयोग महाराष्ट्रात केले आहेत. इतरही नृत्य त्याच ताकदीने मी केली आहेत, त्यामुळे अतुल वीरकर आणि विनोदी नृत्य हे समीकरण महाराष्ट्रात निर्माण झाले. या नृत्यामुळे मला प्रचंड प्रसिद्धी आणि पुरस्कारही मिळाले आहेत.
      अतुलजी, तुम्ही नृत्याकडून एकदम अभिनयाकडे कसे वळलात, या क्षेत्रातील तुमचे गॉडफादर कोण आहेत?
     - मुंबईमध्ये माझे नृत्याचे कार्यक्रम सुरु असताना सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते अरुण कदम यांनी मला पाहिले. माझी विनोदी देहबोली पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी मला सांगितले की, तू अभिनयासाठी प्रयत्न कर. इतके बोलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी दिग्दर्शक राजू देशपांडे यांना माझे नाव सुचवले, त्यामुळे ‘ई टीव्हीवरील ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक‘ ही मालिका मला मिळाली. या मालिकेत निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळी यांच्याबरोबर काम करायला मला संधी मिळाली. ही माझी पहिली टीव्ही मालिका. त्यामुळे ही मालिका मिळवून देणारे अरुण कदम हे माझे गॉडफादर आहेत, असे म्हणायला अजिबात संकोच वाटत नाही.
     अतुलजी, त्यानंतर पुन्हा तुम्ही निर्मिती सावंत आणि पंढरीनाथ कांबळी यांच्याबरोबर भूमिका केली त्याबद्दल सांगा?
     - ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’ नंतर मी झी मराठीवरील ‘वहिनीसाहेब’ या मालिकेत चारशे वर्षांपूर्वीच्या पहिल्या सेनापतीची भूमिका केली. त्यानंतर ‘साम’ मराठीवरील ‘नानीच्या नानाची’ या मालिकेत डॉक्टर आणि स्मशानातील भटजीची भूमिका केली. या मालिकेत निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळी, मी असे तिघेही असल्यामुळे निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळी आणि मी असे आम्ही पुन्हा एकत्र आलो असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही.
     अतुलजी, त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या मालिकांत तुमच्या अभिनयाचे दर्शन घडवलेत?
     - झी मराठीवरील ‘मालवणी डेज’ या मालिकेत किरवंत ब्राह्मणाची भूमिका केली. ‘साम’ मराठीवर ‘गंगा सिंधूच यमुना’ या मालिकेत वॉर्डबॉयची भूमिका केली. या मालिकेत लीना भागवत, माधवी निमकर, किशोर नांदोस्कर, आशीष पवार, इत्यादी कलाकार होते. इ टीव्हीच्या ‘गोजिरवाण्या घरात’ या मालिकेत डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत काम केले. छोटीशी असलेली भिकार्‍याची भूमिकाही माझ्या वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने रंगवली.
     अतुलजी, तुम्ही चित्रपटातही झळकलात, त्याबद्दल सांगा ना?
      - ‘स्वप्न’ हा माझा पहिला मराठी चित्रपट. यात मी विद्यार्थ्याची भूमिका केली आहे. इंदापूरचे किरण केळुसकर यांच्यामुळे हा चित्रपट मिळाला. त्यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे चित्रपट क्षेत्रात शिरकाव करु शकलो, त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. दिग्दर्शक अशोक बहादुरे यांच्या ‘हरी ओम विठ्ठला’ या चित्रपटात सतीश तारे, अरुण कदम यांच्याबरोबर मी एका बेवड्याची भूमिका केली आहे. ती भूमिका विनोदी अंगाने जाणारी असल्याने तिने रसिकांना खळाळून हसवले ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. मी अजय फणसेकरांच्या ’मुक्ती’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केली आहे. संजय दत्तच्या भावाचा मित्र म्हणून त्यात झळकलो आहे. त्यातील एका आयटम सॉंगमध्ये माझा सहभाग आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी, सोनिया मेहरा, विजू खोटे इत्यादी कलाकार आहेत.
      अतुलजी, तुमच्या आगामी चित्रपटांविषयी सविस्तर सांगा?
      - ‘हरहर महादेव’ हा माझा येणारा नवीन चित्रपट असून अरुण नलावडे यांच्या अपोझिट गावच्या मास्तराची माझी भूमिका आहे. आगामी ‘वरात आली घरात’ या चित्रपटात भरत जाधव, अंशुमन विचारे यांच्यासोबत मी एका टपोरीचा सीन केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत विजय गोखले, तसेच मंदार देवस्थळी यांच्या आगामी ‘धटिंग धिंगाणा’ या चित्रपटात हवालदाराची भूमिका केली आहे.
       अतुलजी, मागे वळून पाहिल्यावर आपल्याला काय वाटत?
      - माझी पहिली मालिका ‘गंगुबाई नॉनमॅट्रिक’ प्रसारित होण्याच्या १ वर्ष आधी म्हणजे २००३ साली माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आई आणि माझे दोन भाऊ अहमदनगरला स्थायिक झाले. मी मात्र माणगावमध्येच अभिनयाचे करिअर करण्यासाठी थांबलो. तेव्हा मला पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन माणगावचे अशोक सुर्वे आणि त्यांचे चिरंजीव अविनाश सुर्वे व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने दिले. अशोक सुर्वे यांना तीन मुले आहेत, परंतु त्यांनी मला चौथ्या मुलाप्रमाणे प्रेम दिले. माणगावचे दिलीप रातवडकर माझ्या सान्निध्यात आले. त्यांनी ’एक चतुर नार’ या नृत्यासाठी माझा मेकअप केला, नंतर ते माझे मेकअपमनच झाले. त्यांचेही प्रोत्साहन मला सतत मिळते आहे. माणगावमध्ये मला अनेकांचे प्रेम मिळते आहे, त्यामुळे तेथे मी स्वत:ला असुरक्षित आणि एकाकी समजत नाही. या सर्वांमुळे मी आतापर्यंत यशस्वी वाटचाल करु शकलो असे मागे वळून पाहता वाटते.
    अतुलजी, तुम्ही अनेक सेलिब्रेटींकडे पूजा, मुहूर्त इत्यादीचे पौरोहित्य केले आहे, त्याबद्दल सांगा?
    - सचिन पिळगावकर, महेश कोठारे, विजय पाटकर, विजय गोखले, जयवंत वाडकर, अशोक शिंदे, परी तेलंग, मैथिली जावकर, माधुरी जुवेकर, विनय येडेकर, सुदेश बेरी इत्यादी अनेकानेक सेलिब्रेटींकडे गणपती बसवले आहेत. पूजा आणि चित्रपट, मालिकांचे मुहूर्त केले आहेत.
    अतुलजी, साम मराठीवरील ‘नानीच्या नानाची’ या मालिकेसाठी पु.ल. देशपांडे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार आणि इतरही अनेकानेक पुरस्कार तुम्हाला मिळाले आहेत, आता तुमचे पुढचे ध्येय कोणते आहे?
     -वेदनेतून विनोदाचा जन्म होतो, हे अनेकानेक नामवंतांच्या जीवनचरित्रांतून दिसून येते. मीही गरिबीची वेदना सहन केली, या वेदनेनेच मला विनोदाची दृष्टी दिली. माझी देहबोलीही विनोदाला पुरक आहे, त्यामुळे उत्तम विनोदी अभिनेता बनणे हे माझे ध्येय आहे. या ध्येयाद्वारे दीनदुबळ्यांना खळखळून हसवू शकलो, तर त्यापेक्षा माझे दुसरे कोणतेही भाग्य नाही. सेलिब्रेटी भटजी आणि विनोदी अभिनेता बनणे हे माझे ध्येय आहेच, पण मला ज्या माणगावने माया दिली, त्या माणगावचेही नाव मला उज्ज्वल करायचे आहे.
      अतुल वीरकर एक साधाभोळा २९ वर्षांचा तरुण. त्यांची स्वप्ने ते आपल्या परिश्रमाने आणि जिद्दीने साकार करतील, परंतु माणगावने जे प्रोत्साहन दिलं, तसे संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्राने त्यांना द्यावं असं म्हटलं तर त्यात काहीही वावगं नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा