शनिवार, १६ जानेवारी, २०१०

अलिबागचे अक्षय धन : यतीन घरत

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉



       होय! काया-वाचा- मनाने मी कलाक्षेत्राला समर्पित झालो आहे. तेथे माझी नम्र उपासकाची भूमिका असल्यामुळे मी कलाक्षेत्राची एक एक शिखरे पादाक्रांत करु शकलो. माझ्यामध्ये जसा कलाकार आहे, तसाच तंत्रज्ञही आहे, त्यामुळे रंगभूमी असो, व्हिडिओ चित्रपट असो, अथवा अल्बम असो माझी सर्जकता फुलपाखरासारखी विहार करीत असते. या सर्जकतेमुळेच ‘यतीन घरत’ या माझ्या नावाला एक वलय लाभले आहे. परंतु हे वलय बाजूला ठेवून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की, मी सच्चा कलाकार मित्र आहे, असे प्रांजळ उद्गार अलिबागेतील कलाकारांसाठी हक्काचे स्थान असलेल्या, अक्षय टीव्हीचे यतीन घरत काढतात, तेव्हा त्यांच्या सर्जकतेचं फुलपाखरु सदैव यशाचे इंद्रधनुष्य चितारीत राहील याची खात्री पटते.
         
यतीन घरत यांचे वडील रमेश घरत आणि आई प्रतिभा घरत हे दोन्हीही डॉक्टर. त्यामुळे यतीन घरतही डॉक्टर बनले असते तर त्यात नवल नसते. परंतु तसे झाले नाही. बालपणापासूनच त्यांचा ओढा कलाक्षेत्राकडे होता आणि नियतीने व त्यांच्या जिद्दीने त्यांनी त्याच क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली. आज ते नवीन कलाकार, तंत्रज्ञ तयार करणारी कार्यशाळाच बनले आहेत. ते अक्षय टीव्हीचे निर्मिती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत, त्यांच्याशी मारलेल्या या मनसोक्त गप्पा.
      यतीनजी, माणसाच्या जीवनात एखादा टर्निंग पॉईंट येतो आणि तेथे त्याच्या जीवनाला एक दिशा मिळते, एखाद्या विषयाबाबत गोडी निर्माण होते आणि तो त्या विषयाला स्वत:ला वाहून घेतो आणि विशेषज्ञ बनतो. आज तुम्ही कुशल दिग्दर्शक आणि व्हिडीओ संकलक आहात, तुमच्यात एक अभिजात कलाकार दडलेला आहे. या त्रिगुणाकडे ओढले जाण्यास कोणते निमित्त घडले?
     - चौथीत असताना मी सावकाराचा एकपात्री कार्यक्रम शाळेच्या गॅदरिंगमध्ये केला. सगळ्यांनी माझ्या एकपात्री प्रयोगाचे भरभरुन कौतुक केले आणि आई-वडिलांनीही मला प्रोत्साहन दिले. तेव्हाच माझ्या मनात कलाक्षेत्राविषयी जवळीक निर्माण झाली. शाळा व महाविद्यालयीन जीवनात गॅदरिंगमध्ये मी माझ्या कलागुणांना मुक्त वाट करुन दिली आणि या क्षेत्रातच कारकीर्द घडवण्याचे ठरवले.
      यतीनजी, तुमच्या अंगभूत कलेला मोठ्या प्रमाणात व्यासपीठ केव्हा मिळाले?
      - मी वयाच्या 20 व्या वर्षी 1992 साली अलिबागेतील स्वरश्री वाद्यवृंदाद्वारे ‘मृद्गंध’ या नृत्य- नाट्य- संगीत, शॅडोप्ले यांचे मनोवेधक मिश्रण असलेल्या रंगमंचीय कलाकृतीचे दिग्दर्शन केले. या कलाकृतीत 28 कलाकार होते आणि या कलाकृतीची संकल्पनाही माझी होती. ही कलाकृती गाजली. हा वाद्यवृंद प्रसिद्ध होताच. अशा वाद्यवृंदाद्वारे माझ्याही प्रसिद्धीला पंख फुटले.
       तुम्ही रंगमंचावर कल्पनेचे पंख लावून वावरलात. या पंखांनीच तुम्हाला व्हिडीओ तंत्राकडे कसे वळवले, त्याबाबत सांगा?
       - मला मूलत:च संगणकाची आवड होती. स्वाफ्टवेअर मॅनेजमेंटचा डिप्लोमा केल्यानंतर मी डिझायनिंगकडे वळलो. त्यानंतर अलिबागचे तत्कालीन नगराध्यक्ष आणि अक्षय टीव्ही या स्थानिक वाहिनीचे सर्वेसर्वा प्रशांत नाईक यांनी अक्षय टीव्हीची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तेथूनच खर्‍या अर्थाने माझी या क्षेत्रातील तंत्रज्ञानाची वाटचाल सुरु झाली. अक्षय टीव्हीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली गेल्यामुळे मी मुंबईत ‘जस्ट व्हिडीओ’ येथे व्यावसायिक व्हिडिओ संकलनाचे प्रशिक्षण घेतले. अक्षय टीव्हीच्या माध्यमातून किशोर म्हात्रे यांच्या रुपाने मला एक उत्तम लेखक, दिग्दर्शक नित्र लाभला. तेव्हा आम्ही ‘इनबॅलन्स जर्नी’ नावाचा स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करणारा लघुचित्रपट बनवला. या लघुचित्रपटाचे सर्वस्तरातून कौतुक झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
        यतीनजी, अक्षय टीव्हीच्या माध्यमातून आपण आणखी कोणते उपक्रम राबविले?
        - कुलाबा किल्ल्यातील माघी गणेशोत्सवाबाबतचा माहितीपट तयार केला याचे लेखन सुनील ठोंबरे यांनी व मी स्वत: दिग्दर्शन केले. त्यानंतर 2009 च्या दिवाळीला ‘दिवाळी पहाट’ हा स्थानिक गायक, वादकांना घेऊन एक संगीतमय कार्यक्रम तयार केला. यात बारापेक्षाही अधिक गायक-वादकांना संधी दिली. हा कार्यक्रमही रसिकांच्या पसंतीस उतरला आणि आमचा हुरुप अधिकच वाढला. विशेष म्हणजे रायगड भूषण मुग्धा वैशंपायन हिला सारेगम लिटीलचॅम्प स्पर्धेत विजय मिळावा म्हणून वेगवेगळ्या कॅम्पेन केल्या. त्याचा तिला बराच फायदा झाला आणि आमच्या कॅम्पेननेही बरेच कौतुक मिळवले.
आम्ही अलिबागेतील वात्सल्य ट्रस्टच्या कार्याची माहिती देणारा माहितीपट तयार केला आणि तो अक्षय टीव्हीवरुन प्रसारित केला. रस्त्यावर टाकलेल्या अनाथ मुलांना मायेने वाढवणार्‍या देवदुतांची माहिती त्याद्वारे समाजाला मिळाली आणि त्यामुळे अजूनही समाजात माणूसकीची ज्योत तेवती आहे, हे दिसून आले. हा आमचा आमच्या सामाजिक जाणिवेला एक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न होता, त्यात आम्ही यशस्वी झालो.
        यतीनजी, तुम्ही कलाकार, वादक, तंत्रज्ञांची एक फळीच निर्माण केलीत, त्याबद्दल सविस्तर सांगा?
        - आपल्या स्थानिक कलाकारांकडे टॅलेंट आहेत. परंतु ते प्रदर्शित करण्याचे त्यांच्याकडे व्यासपीठ नव्हते. अक्षय टीव्हीने ते व्यासपीठ त्यांना मिळवून दिले. स्थानिक कलाकारांना संधी देणे, प्रशिक्षित करणे हा अक्षय टीव्हीचा हेतू आहे. या हेतूची पूर्तता करण्यासाठी मी अथक प्रयत्न करीत आहे. आज अक्षय टीव्हीशी 16 कॅमेरामन तरुण सलग्न आहेत. कसल्याही शुटिंगमध्ये आमचे कॅमेरामन, तंत्रज्ञ कलात्मकता दाखवत असतात. त्याचबरोबर अक्षय टीव्ही चित्रीकरणाच्या दर्जाबाबत अत्यंत काटेकोर आहे, त्यात कोणतीही तडजोड केली जात नाही. अक्षय टीव्हीचे एक ब्रीद आहे. मिळणार्‍या कामाचा मोबदला जरी कमी असला तरी आमच्याकडे असलेले ज्ञान आणि उपलब्ध असलेली साधने यामधून उत्कृष्ट दर्जाचे काम देण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्यात आम्ही फार दक्ष आहोत. लवकरच अक्षय टीव्हीतर्फे आमच्या कॅमेरामन, तंत्रज्ञांसाठी ‘हायडेफीनेशन’ या नवीन व्हिडिओ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
        अक्षय टीव्हीने एका चॅनेलपासून सुरुवात केली. आज अक्षय टीव्ही पूर्णपणे संगणकीकृत झाले आहे. गेल्या वर्षीपासून अजून एक ऑन डिमांड चॅनेल सुरु केले आहे. त्यात इंटरनेट आणि टेलिफोनच्या माध्यमातून दर्शक त्यांना हवे असलेले गाणे किंवा अक्षय टीव्हीचा कार्यक्रम दाखवण्याची मागणी करु शकतात. तसेच अक्षय टीव्ही आणि कृषीवलच्या संयुक्त विद्यमाने रोज बातम्याही प्रसृत करण्यात येत आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
       गेली 3 वर्षे चेंढरे सन्मान सोहळा आयोजित केला जातो. याहीवर्षी चौथा चेंढरे सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा भव्यदिव्य असतो आणि याचा इव्हेन्ट डायरेक्टर मी आहे याचा मला निश्‍चितच अभिमान वाटतो.
       यतीनजी, हे सर्व उपक्रम सुरु असतानाच तुम्ही चित्रपट समन्वयकाची जबाबदारी पार पाडणे सुरु केलेत, त्याबद्दल सांगा?
       - होय, शंतनू रोडे यांच्याबरोबर ‘रावस’ नावाच्या बालचित्रपटाचा कोऑर्डिनेटर (समन्वयक) म्हणून मी काम केले. त्याच लिंकमधून ‘क्षणभर विश्रांती’ या मराठी चित्रपटाचे कोऑर्डिनेटर आणि असिस्टंट प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून मी काम पाहिले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘साडे माडे तीन’ चित्रपटाची टीम ‘क्षणभर विश्रांती’साठी होती. दिग्दर्शक सचित पाटील, मराठी चित्रपटांना एक नवीन रुप देण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे असे संजय जाधव यांच्याबरोबर ‘क्षणभर विश्रांती’साठी काम करण्याची मला संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, त्याचा फायदा मला पुढे होणार आहे.
कोऑर्डिनेटर ही मोठी जबाबदारी असते. शुटिंग, शुटिंगस्थळी कलाकरांना नेणे, कलाकारांचे व्यवस्थापन करणे, इतर चित्रपटविषयक लागणार्‍या गोष्टींची पूर्तता करणे, इत्यादी बाबींची धावपळ कोऑर्डिनेटरला करावी लागते. शुटिंगच्या वेळी काडेपेटीपासून मोठ्या बसपर्यंत कशाचीही गरज भासू शकते, अशा परिस्थितीत अलिबाग, मुरुड, काशीद, रेवदंडा, सासवणे इत्यादी ठिकाणी ‘क्षणभर विश्रांती’चेे झालेले शुटिंग मी कोऑर्डिनेटर म्हणून एकही दिवस कोणत्याही कारणांनी खोळंबू दिले नाही. यासाठी माझे सहकारी मित्र दीपक पाटील, राजेश बाष्टे, श्रीकांत कातकर यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. या चित्रपटासाठी 130 जणांचे युनिट काम करीत होते. त्यांना कोऑर्डिनेट करताना अतिशय तारांबळ उडत होती. पण हा चित्रपट करताना खूप आनंद मिळाला. या चित्रपटात अलिबागच्या दहा कलाकारांना छोट्यामोठ्या भूमिकाही मिळाल्या आहेत. या चित्रपटासाठी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रेवदंड्याचे उपसरपंच राजन वाडकर, गणेश मोरे यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत.
        मी दहा-बारा अल्बमसाठी काम केले आहे. अक्षय टीव्हीसाठी प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर व शकुंतला जाधव यांना घेवून ‘झुमका’ हा गाण्याचा अल्बम काढला, त्यात स्थानिक गायक-वादकांना संधी दिली. त्याचा व्हिडीओ अल्बम काढण्याचे काम लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच 2009 साली ‘कलादर्पण’ पुरस्कार या आयबीएन लोकमतच्या लाइव्ह टेलिकास्टसाठी ऑनलाईन एडिटर म्हणूनही काम केले आहे. माझ्या या वाटचालीबद्दल मी अक्षय टीव्ही परिवाराचा कृतज्ञ आहे. अक्षय टीव्हीमध्ये गेली पंधरा वर्षे दीपक पाटील माझ्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. त्यांचाही माझ्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा आहे. त्याबरोबरच किशोर म्हात्रे, सुनिल ठोंबरे, सागर नार्वेकर, विक्रांत वार्डे, अनिल म्हात्रे, सचिन कांबळे, नरेंद्र ठाकूर, प्रदीप नारंगीकर, महेश काठे, संदेश मयेकर ही सगळी मित्रमंडळी माझ्यामागे खंबीरपणे असतात. म्हणूनच मी विविध जबाबदार्‍या पेलू शकलो हे सांगायला मला संकोच वाटत नाही.
       यतीनजी, भविष्यात आपल्याला खूप काही करायचे आहे, आताच त्याबाबत मनात योजना आखल्या असतील?
        - मला ‘व्हीआर बर्निंग’ या शीर्षकाचा एक लघुपट करायचा आहे. ग्लोबल वार्मिंगला सर्वसामान्य जनताही आपआपल्या पातळीवरुन तोंड देऊ शकते. याबाबत प्रबोधन करणारा हा लघुपट असणार आहे. त्याबरोबर ‘पुन्हा एकदा’ या शीर्षकाची चित्रपट कथा लिहितोय. या चित्रपटासाठी मी प्रयत्न करणार आहे, पाहू या पुढे काय होते ते! प्रामुख्याने मला चित्रपट संकलनात महारथ प्राप्त करायची आहे. चांगला ऍनिमेटर बनायचे आहे. या क्षेत्रात शिक्षण कधी संपत नाही. त्यामुळे मला सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे. निश्‍चितच मी लवकरच या क्षेत्रात माझा ठसा उमटवीन.
मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा रायगड जिल्हा शाखेचा उपाध्यक्ष आहे. ‘क्षणभर विश्रांती’ हा चित्रपट आणि इतर उपक्रमांमध्ये मी गेले वर्षभर गुंतलेला असल्यामुळे या वर्षी काही उपक्रम करता आले नाही, परंतु पुढच्या वर्षी मात्र भरपूर उपक्रम राबवून रसिकांशी असलेले माझे नाते अधिकच वृद्धिंगत करणार आहे.
      यतीन घरत यांची अभ्यासूवृत्ती, काम करण्याची अथक प्रवृत्ती यातून निश्‍चितच ते आपलं ध्येय गाठू शकतील यात वाद नाही. यासाठी त्यांना आपल्या आई-वडिलांचे आणि बंधू सचिन, वहिनी नीता यांचे सहकार्य आहेच. परंतु खंबीर साथ पत्नी सौ. ज्योती घरत यांची आहे. त्या घरसंसार, मुलांचे शिक्षण समर्थपणे सांभाळत आहेत, त्यामुळेच यतीन घरत सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शुभम आणि यश या मुलांनाही आपल्या बाबांचा अभिमान वाटतो. यतीन घरत यांच्या मनातील सर्व संकल्पना पूर्ण होवोत ही शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा