रविवार, २८ मार्च, २०१०

रंगभूमीवरचा बहुरुपी : प्रकाश म्हात्रे

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉



     अभिनयाचं सामर्थ्य मी कळत्या वयात जाणलं, तेव्हा रंगभूमी ठरली माझ्यासाठी एक मोहक विश्‍व. या नाट्यविश्‍वात जेव्हा मला शब्दांचा लळा लागला, तेव्हा मी अभिनयाला मुक्तपणे संवादाचा साज चढवला. प्रकाशाचा झोत माझ्यावर राहिला आणि मीही प्रकाश बनलो. या प्रकाशातूनच माझ्या बहुरुपाने मिळवल्या रसिकांच्या अगणित टाळ्या. मी बहुरुपी रंगभूमीवरचा. कधी राजा, तर कधी रंक, कधी पोलीस अधिकारी, तर कधी चोर, कधी नायक, तर कधी खलनायक, माझ्यासाठी कधीही ठरले नाही कोणतेही रुप वर्ज, असे जेव्हा रंगकर्मी प्रकाश नागू म्हात्रे म्हणतात, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळंच तेज पाहायला मिळते.
       प्रकाश नागू म्हात्रे हे पेझारी-आंबेपूर येथील नवीन वसाहतीत वास्तव्यास आहेत. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत आपल्या अभिनयाची नाममुद्रा उमटवली आहे, त्याचबरोबर दूरदर्शन मालिकेतही भूमिका केली आहे. चित्रपट निर्मिती सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे, इतकेच नव्हे, तर त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यही वाखाणण्याजोगे आहे, अशा चतुरस्त्र व्यक्तीमत्वाला बोलते करण्याचा हा एक प्रयत्न.
       प्रकाशजी, रंगभूमीने तुमच्या मनात कधी रुंजी घालायला सुरुवात केली?
       -आमच्या गावात ढोलपाडा-आंबेपूर येथे हनुमान जयंतीच्या दुसर्‍या दिवशी नाटक केले जायचे. हे नाटक हनुमान नाट्य मंडळातर्ङ्गे सादर केले जायचे. या नाटकात माझे वडील कै. नागू रामा म्हात्रे नायकाचे काम करायचे. तेव्हा ते मुंबईत सेंच्युरी मिलमध्ये कामाला होते. गावचं नाटक म्हणून ते हनुमान जयंतीच्या दुसर्‍या दिवशी सादर होणार्‍या नाटकाच्या तालमीसाठी आठवड्यातून दोन दिवस रजा टाकून गावी यायचे. त्यावेळी संगीत नाटके केली जायची. या नाटकांच्या तालमी बघतच मी मोठा झालो. या तालमीतच माझ्यामध्ये नाटकांची आवड निर्माण झाली. माझे वडील कै. नागू रामा म्हात्रे, कै. बाबू आंबाजी पाटील, कै. बाळाराम मास्तर, कै. हिराजी पाटील, कै. संभाजी पाटील, कै. काशिनाथ ठाकूर, कै. जनार्दन पाटील, सदानंद शंकर पाटील, गजानन ठाकूर, सीताराम पाटील, सदू राघो पाटील यांच्या अभिनयाच्या टॉनिकने माझा रंगभूमीवरील प्रवास सुकर झाला.
    प्रकाशजी, तुमची नाटकाची पहिली आठवण कुठली?
- ते १९७८ साल होते. दहावीचे माझे शिक्षण पूर्ण झाले होते. त्याच सुमारास हनुमान नाट्य मंडळाच्या ‘दिधले दान सौभाग्याचे’ या नाटकात मला एका शेतकर्‍याची छोटीशी भूमिका मिळाली. त्या नाटकातील माझ्या पहिल्या एंट्रीची आठवण आली की, मला आजही हसू येते. या नाटकात मी रंगभूमीवर एंट्री केली, तेव्हा दरवाजाच्या चौकटीला माझं डोकं लागून माझी टोपी खाली पडली. एंट्रीलाच माझी अशी ङ्गसगत झाली होती, परंतु मी घाबरलो नाही. मी न डगमगता तेव्हा चांगल्या पद्धतीने अभिनय केला आणि मी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात वाहव्वा मिळविली.
      प्रकाशजी, त्यावेळी हनुमान नाट्य मंडळातर्ङ्गे सादर करण्यात आलेल्या नाटकांचे दिग्दर्शन कोणी कोणी केले?
- हनुमान नाट्य मंडळातर्ङ्गे सादर करण्यात आलेल्या प्रत्येक नाटकाचे दिग्दर्शन मुंबई येथील गजानन पाटील यांचेच असायचे. मूळचे ते शहाबाजचे, पण कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांना ग्रामस्थ मानधन देऊन ढोलपाड्यात दिग्दर्शनासाठी बोलवायचे आणि तेही दोन महिने कलाकारांवर मेहनत घ्यायचे. या भागातील ज्येष्ठ लेखक कै. म.ना. पाटील गुरुजी हे प्रॉमटींग द्यायचे. मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं, म्हणून मी अभिनयाचे विविध पैलू साकार करु शकतो.
       प्रकाशजी, तुम्ही खर्‍या अर्थाने रंगभूमीवर वावरायला केव्हा सुरुवात केली?
- १९८५ साली हनुमान नाट्य मंडळाच्या जुन्या कलाकारांनी नव्या तरुण कलाकारांकडे नाट्यमंडळाची सूत्रे दिल्यानंतर गणेश हिर्लेकर यांचे ‘जन्मठेप’ हे नाटक त्याचवर्षी गावात सादर केले. तेथे या नाटकाला आणि माझ्याही भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याचवर्षी नारंगी येथे झालेल्या जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आणि या नाटकातील माझ्या ‘राम’ या व्यक्तीरेखेच्या भूमिकेसाठी अभिनयाचे पारितोषिक मिळाले. या नाटकाचे प्रयोग हेमनगर, शहाबाज इत्यादी ठिकाणी करण्यात आले आणि प्रत्येक ठिकाणी या नाटकास नाट्यरसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यामुळे माझ्यातील कलाकारालाही प्रोत्साहन मिळाले. आणि आमच्या नाट्यमंडळाचेही कौतुक होऊ लागले. त्यानंतर भाग्यविधाता, दिधले दान सौभाग्याचे, दीप तुझ्या वंशाचा, शेवटी तूच अपराधी या नाटकात विविध भूमिका केल्या.
       प्रकाशजी, तुम्ही नाट्य आणि सामाजिक क्षेत्रातही काम केले आहे आणि करीत आहात, ते कसे काय?
        - जि.प. मधील नोकरी सांभाळून जेवढे शक्य होईल त्या फावल्या वेळेत मी सामाजिक काम करणे सुरु केले. आंबेपूर येथील सर्वोदय युवक मंडळाच्या अध्यक्षस्थानी आल्यावर मी या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले. एकपात्री अभिनय स्पर्धा, नृत्य स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा, नेत्रचिकित्सा शिबीर, लसीकरण मोहीम, वृक्षारोपण मोहीम, ज्येष्ठांचा सत्कार, विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असे उपक्रम मी माझे एक सामाजिक दायित्व या भूमिकेतून राबवले. आज २६ वर्षे जि.प.च्या सेवेत आहे. मी करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल २००३ साली पेझारी येथील पंतभक्त मंडळाचा आमच्या सर्वोदय युवक मंडळाला सामाजिक सेवा पुरस्कार देण्यात आला.
      प्रकाशजी, तुम्ही सर्वोदय मंडळातर्फे राज्य नाट्य स्पर्धेत आपली नाटके उतरवलीत त्याबद्दल सांगा?
      - २००१ साली सर्वोदय मंडळातर्फे एड्स जनजागृतीवर आधारित ‘शिकार’ हे विजया कुडव लिखित व दिग्दर्शित नाटक राज्य नाट्य स्पर्धेत मुलुंड येथे कालिदास नाट्यगृहात सादर केले. या नाटकात मी, प्रकाश जयराम पाटील, योजना पाटील, निनाद पाटील, राजन पांचाळ, बाळू पाटील, विजया कुडव इत्यादींनी भूमिका केल्या. यात स्त्री अभिनयासाठी विजया कुडव यांना प्रथम क्रमांक मिळाला. २००२ साली मी ‘संघर्ष जीवनाचा’ या विजया कुडव लिखित, दिग्दर्शित कौटुंबिक नाटकात प्रमुख भूमिका केली. या नाटकात पराग नागले, राजन पांचाळ, जितेंद्र पाटील, सुरेंद्र टेमकर, निनाद पाटील, प्रकाश जयराम पाटील, राजेंद्र म्हात्रे, मोरेश्‍वर मोकल, कै. संभाजी पाटील, विजया कुडव यांच्या भूमिका होत्या. या नाटकाचे प्रयोग ढोलपाडा, शहाबाज इत्यादी ठिकाणी केले आणि ४१ व्या राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर हे नाटक सादर केले. २००३ साली दिलीप परदेशी लिखित ‘निष्पाप’ हे नाटक ४२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत कल्याण येथे आचार्य अत्रे नाट्यगृहात सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन विजया कुडव यांनी केले. त्यात त्यांनी केलेली गौरीची भूमिका अविस्मरणीय होती. या सर्व नाटकांचा निर्मिती प्रमुख म्हणून मीच काम केले.
         प्रकाशजी, त्यानंतर तुम्ही एकांकिका स्पर्धांतही धडक मारलीत, त्याबाबत सांगा?
         - हँगर स्ट्राईक, प्रतिशोध, भोग, दी मेन विदाऊट शॅडो इत्यादी विजया कडव दिग्दर्शित एकांकिका विविध ठिकाणी सादर केल्या, तसेच पेण येथील ‘सन्मित्र’सारख्या राज्यस्तरीय स्पर्धांतही या एकांकिकांनी आपला ठसा उमटविला.
          प्रकाशजी, तुम्ही नंतर दूरदर्शन मालिकेकडे कसे वळलात?
         - योगायोगाने विजया कुडव यांनी निर्माते दिग्दर्शक (कै.) चिंटू ढवळे व स्नेहल ढवळे यांच्याशी माझी ओळख करुन दिली. चिंटू ढवळे यांनी ‘तुमचं आमचं जमलं’ या दूरदर्शन मालिकेचे चित्रीकरण पेझारी परिसरात करण्याचे ठरवले व त्यांनी आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भावना पाटील, ऍड. आस्वाद पाटील व ना.ना. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक गावडे यांच्या सहकार्याने ही दूरदर्शन मालिका पेझारी परिसरातच पूर्ण केली. या मालिकेसाठी मी अथपासून इतिपर्यंत त्यांना सहकार्य केले. सुमारे २५ ते ३० भागांचे चित्रीकरण माझ्या घरातच झाले. यात मी विविध भूमिका केल्याच, पण माझी पत्नी सौ. प्राची म्हात्रे, मुलगा प्रज्ज्वल म्हात्रे, कन्या रचना म्हात्रे, तसेच धाकटे बंधू सुरेश म्हात्रे यांनीही या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका केल्या. या मालिकेत अंकुश चौधरी, विजय चव्हाण, श्रीकांत देसाई, जयवंत वाडकर, जयराज नायर, असीत रेडीज, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाणगांवकर यासारखे दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. या मालिकेच्या श्रेयनामावलीत माझा निर्मिती प्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आला होता.
        प्रकाशजी, तुम्ही पेझारी येथे एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीही सहकार्य केलेत, त्याबद्दल सांगा?
       - ‘तुमचं आमचं जमलं’ या दूरदर्शन मालिकेतील पेझारी परिसरातील निसर्गाने मोहित होऊन येथे एखादा चित्रपट काढावा या हेतूने निर्माते दिग्दर्शक मंदार शिंदे हे पेझारी येथे माझ्या घरी आले व आम्ही चित्रपटाची निर्मिती करीत आहोत. त्यासाठी आम्हाला सहकार्य कराल का अशी त्यांनी माझ्याकडे विचारणा केली, तेव्हा मी ‘होय’ म्हणून उत्तर दिले. त्यानुसार ‘नो प्रॉब्लेम’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त ना.ना. पाटील हायस्कूल, पोयनाड येथे करण्यात आला. या चित्रपटासाठी मी सर्व प्रकारचे तनामनाने सहाय्य केले व त्यात छोटीशी भूमिकाही केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत निर्मिती प्रमुख म्हणून माझे नाव देण्यात आले आहे.
       प्रकाशजी, तुमच्या नाट्यप्रेमाला पत्रकारितेचीही जोड कशी मिळाली?
       - दहावी पास झाल्यावर जसा मी नाट्यप्रेमात आकंठ बुडालो, तसाच मी अक्षरांच्या प्रेमातही पडलो. कमळाकर नागू म्हात्रे माझे मोठे बंधू यांनी पेझारी येथे असलेल्या छोट्या आकारातील दैनिक कृषीवलमध्ये मला नोकरीस लावले. तेथे बातम्यांची अक्षरजुळणी करता करता खर्‍या अर्थाने माझ्यात वृत्तलेखनाची आवड निर्माण झाली. नंतर ९ मे १९८५ रोजी मी जि.प.च्या नोकरीत रुजू झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अलिबाग परिसरातील कार्यक्रमांचे वृत्तलेखन करु लागलो. १९९५ साली मी मोठ्या आकारातील दैनिक कृषीवलचा सामाजिक वृत्त लिखाण बातमीदार बनलो. माझी पत्रकारितेतील वाटचाल गेली पंधरा वर्षे सुरुच आहे. २००४ साली तत्कालिन जि.प. अध्यक्ष बाळाराम पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनी प्रथमत:च ‘गुणवंत कर्मचारी’ पुरस्कार सुरु केला. पहिलाच पुरस्कार मला मिळाला. या पुरस्काराने मला सपत्नीक गौरविण्यात आले.
         प्रकाश, नाट्यक्षेत्रात पुढे कोणती कामगिरी करण्याची तुमची इच्छा आहे?
         - ग्रामीण नाट्यसंस्कृती पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावागावात अभंग राहावी यासाठी मी प्रयत्नरत राहणार आहे. कारण खर्‍या अर्थाने ग्रामीण भागाने नाट्यसंस्कृती रुजवली आणि जपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावोगावीच्या नाट्य मंडळांना ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन देण्यात मला आनंद वाटतो. क्रीडा क्षेत्राबरोबरच गावोगावी नाट्यचळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
         प्रकाश, तुमच्या नाट्यप्रेमाचं अमरफुल टवटवीत ठेवण्यासाठी घरातून प्रोत्साहन मिळाले असेलच, त्याबाबत सांगा?
         - निश्‍चितच माझं नाट्यप्रेम घरातील प्रोत्साहनामुळे वाढले आणि जोपासलेही गेले. माझ्या वडिलांचे- तसेच आईचे आशीर्वाद माझ्यामागे होतेच आणि त्यांचे गुण माझ्यात उतरले. हा अभिनयाचा वारसा आता माझ्या कन्येकडे, म्हणजे रचना प्रकाश म्हात्रे हिच्याकडे गेला आहे. तिने पेण येथील ‘सन्मित्र’ एकांकिका स्पर्धेत अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळविले आहे. तिने गुजरात येथे झालेल्या महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत स्त्री पात्र म्हणून राज्याचे नेतृत्व केले आहे. मुलगा प्रज्ज्वल यालाही अभिनयाची आवड आहे आणि माझ्या प्रत्येक कार्याला त्याचा पाठिंबा असतो. मी नोकरी करत असताना नाटक आणि सामाजिक कार्य यात स्वत:ला झोकून दिले, ते पत्नी माझी प्राची म्हात्रे हिच्यामुळेच. तिची प्रेरणा व प्रोत्साहन मला सतत बळ देत राहिले, त्यामुळे तिचा माझ्या प्रगतीत सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही. आईचे आशीर्वाद आणि सहकार्‍यांनी व रसिकांनी दिलेले प्रेम यामुळे हा ‘प्रकाश’ सततच दैदीप्यमान बनला आहे.
      अर्थात प्रकाश म्हात्रे यांचा परिचय येथे संपत नाही. रायगड जिल्हा परिषदेत प्रामाणिक सेवा बजावत असताना जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटना, शाखा रायगडचे ते गेली २० वर्षे अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हास्तरावर केलेले काम बघून राज्य कार्यकारिणीने १५ मार्च २००५ रोजी मुंबईतील काळाघोडा मैदानात झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात त्यांची महाराष्ट्र राज्य संघटनेचा अध्यक्ष म्हणून निवड केली. त्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय दौरे करुन व मंत्रालयीन कामकाज तडीस नेऊन संबंधित संघटनेच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. चालू वर्षात पुन्हा त्यांची रायगड जिल्हा वाहन चालक संघटनेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. तसेच राजिप कर्मचारी सहकारी पतपेढीचे २००३ पासून चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक अशा विविध पदांवर ते कार्यरत असताना त्यांची प्रत्येकाशी वागणूक आदराची, सहकार्याची असते. त्यांना ग्रामीण रंगभूमी सशक्त करायची आहे, ते आपलं सामाजिक काम करताना ग्रामीण रंगभूमीसाठीही भरीव योगदान देतील यात वाद नाही. त्यांना उर्वरीत आयुष्यात सामाजिक कार्यास शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा