मंगळवार, ३० जुलै, २०१९

नद्यांच्या पुराचा देशाला वेढा

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉  


       भारतात पुरांचा धोका कायमचाच आहे. विशेषतः उत्तर व पूर्व भारतांतील ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, कोसी, गंडक, दामोदर इत्यादी नद्यांना प्रचंड पूर येतात. त्यामुळे देशातील पुरांमुळे होणार्‍या एकूण नुकसानीच्या ९० टक्के नुकसान त्या  प्रदेशात होते. तापीचे व नर्मदेचे खालचे खोरे तसेच महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांतही पुराचे धोके संभवतात. पंजाब-हरयाणांत, विशेषतः रोहटक, हिस्सार, गुरगाव इत्यादी निकृष्ट जलवहन प्रदेशांत, अतिवृष्टीमुळे पूर येतात. भारतात ६७ लक्ष हेक्टर क्षेत्र पुराच्या धोक्याच्या कक्षेत येते. देशातील सु. ६० टक्के नुकसान नदीच्या पुरांमुळे व सुमारे ४० टक्के नुकसान अतिवृष्टी व वादळे यांमुळे होते. दरवर्षी साधारणपणे सरासरी ७८ लक्ष हेक्टर क्षेत्रङ्गळातील २.४ कोटी लोकसंख्येला पुराचा तडाखा बसतोच. सुमारे २३ ते ७८ लक्ष हेक्टर जमिनीतील पीक वाहून जाते. त्यामुळे दरवर्षी सरासरी २४० कोटी किंमतीच्या मालमत्तेची हानी होते. याही वर्षी आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामधील बहुतांश जिल्ह्यांत नद्यांना आलेल्या पुरामुळे जनतेचा श्वासच गुदमरला आहे. अर्थात याच्या कारणांकडे गांभीर्याने पहायला हवे.
        देशात दरवर्षीप्रमाणे मुसळधार पावसामुळे यावेळीही अर्ध्याहून अधिक भागात पूर आला आहे. आसाममधील पुरामुळे पन्नासहून अधिक जिल्हे पूर्णपणे जलमय झाले आहेत. तेथे २६ लाख लोकांना पुराचा ङ्गटका बसला तर यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आसाम, बिहार, उत्तरप्रदेश तर पावसाळ्यात अतिशय गलितगात्र बनतात. याहीवेळी बिहारमधील पुरामुळे सहाशे गावे पाण्याखाली गेली. तेथील अठरा लाख लोकांना पुराचा ङ्गटका बसला आहे. यावेळी जम्मू-काश्मीर, गुजरातचा सौराष्ट्र आणि राजस्थानच्या शेखावटी विभागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झालेली पहायला मिळत आहे. मुसळधार पावसाचा ङ्गटका पंजाब आणि हरियाणातील देखील बहुतांश भागाला बसला आहे. महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांतील नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भीषण दुष्काळाने अस्वस्थ बनलेल्या मध्यप्रदेशच्या सुमारे बारा जिल्ह्यातील लहान नद्या आषाढाच्या पहिल्या पावसातच ङ्गुगून उसळू लागल्या. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर दिसून येते की, पावसाचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी पुराने उद्ध्वस्त झालेल्या विभागांत अनेकपट वाढ झाली आहे. काही दशकांपूर्वी ज्या विभागांना पूरमुक्त क्षेत्र मानले जात होते, आता तेथील नद्याही ङ्गुगून वाहत आहेत आणि पावसाळा संपताच त्या विभागांत पुन्हा जल संकट निर्माण होते. पूर हा काही दिवसांचाच विद्ध्वंस आणत नाही, तर तो त्या विभागाच्या विकासाला काही वर्षे मागे घेऊन जातो.
        सरकारी आकडेवारीनुसार १९५१ मध्ये एक कोटी हेक्टर भूमी पूरग्रस्त होती. १९६० मध्ये ती वाढून साडेतीन हेक्टर झाली. त्यानंतर १९७८ मध्ये ३.४ कोटी हेक्टर भूमी उद्ध्वस्त झाली होती आणि १९८० ला ती चार कोटींवर पोहोचली होती. आता हा विद्ध्वंस सात कोटी हेक्टर असल्याची शंका आहे. गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे साडे नऊशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले, तीन लाख घरे वाहून गेली आणि चार लाख हेक्टरमधील पीक उद्ध्वस्त झाली. दुष्काळाचा ङ्गटका खाणारा मरुप्रदेश राजस्थानही नद्यांच्या क्रोधापासून मुक्त राहूू शकत नाही. देशात पुराचे संकट प्रथम आसाममध्ये निर्माण होते. आसामचे जीवन समजली जाणारी ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या मे-जूनच्या मध्यातच विद्ध्वंस पसरवू लागतात. प्रत्येक वर्षी लाखो पूरग्रस्तांची इकडे-तिकडे पळापळ होते. पुरामुळे उघड्यावर पडलेल्या लोकांना पुनर्वसनाच्या नावावर पुन्हा तेथेच वसविले जाते, जेथे सहा महिन्यांनी पुन्हा पूरपरिस्थितीला तोंड द्यावे लागणार असते. तेथील पर्वतांचे अतिरेकी खनन करुन झालेले अनियोजित शहरीकरण आणि रस्त्यांची निर्मितीही या राज्यात पुराने होणार्‍या विद्ध्वंसासाठी काही प्रमाणात दोषी आहे, वृक्षहीन धरतीवर पावसाचे पाणी थेट कोसळते आणि जमिनीवरील मातीच्या वरच्या थराला खोलवर चिरते. ही माती वाहून नदी-नाल्यांना उथळ बनवते आणि अल्प पावसाने त्या दुथडी भरुन वाहू लागतात. त्यातूनच पुराचे संकट उभे राहते.
       देशाचे एकूण पूरग्रस्त विभागाचा सोळा टक्के भाग बिहारमध्ये आहे. तेथे कोशी, गंडक, बुढी गंडक, बागमती, कमला, महानंदा, गंगा आदी नद्या विद्ध्वंस करतात. पूर नियंत्रणाच्या नावाखाली तेथील नद्यांवर बांधण्यात आलेल्या तटबंधांमुळे पुराचे क्षेत्र अनेक पटींनी वाढले आहे. पूर्वी, कोसी नदीला बांधलेले नसताना सुमारे सव्वाशे किलोमीटर्स क्षेत्रात पाणी साठत असे. आता हेच पाणी साडेचार लाख हेक्टर्स इतक्या क्षेत्रावर हाहाकार माजवते. प्रचंड प्रमाणावर गाळ वाहून आणणारी ही नदी आपला प्रवाह सतत बदलत असते. तिला बांधण्यात अर्थ नाही हे तिच्या काठावरील लोक जाणतात. तेथील पुराचं मुख्य कारण नेपाळमध्ये हिमालयातून उगम पावणार्‍या नद्या आहेत. कोशी नदीच्या वरील भागावर सत्तर किलोमीटर लांबीचा तटबंध नेपाळमध्ये आहे. परंतु त्याची देखभाल आणि सुरक्षा यावर होणार्‍या वार्षिक वीस कोटी रुपये खर्चाचं ओझं बिहार सरकारला सहन करावं लागतं. हे तटबंधही पुराला तोंड देण्यात यशस्वी ठरलेले नाहीत. त्यांची अनेक वेळा पडझड होऊन पुराचा ङ्गटका बसला आहे. कोशीच्या तटबंधांमुळे तिच्या किनारी वसलेली सहाशे गावांच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार कायमच असते. कोशीच्या उपनद्या कमला-बलान नदीच्या तटबंधाचा तळ गाळ साचून उंच झाल्यामुळे पुराचा विद्ध्वंस पूर्वीपेक्षा अधिक तीव्र असतो. ङ्गरक्का धरणाच्या सदोष रचनेमुळे भागलपूर, नौगछिया, कटिहार, मुंगेर, पूर्णिया, सहरसा आदीमध्ये पुरग्रस्त  क्षेत्र वाढत चालले आहे. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकारने पूरनियंत्रणासाठी मोठी धरणे, अथवा तटबंधांना तांत्रिकदृष्ट्या योग्य मानले नव्हते. तत्कालिन गव्हर्नर हेल्ट यांच्या अध्यक्षतेखआली पाटण्यात झालेल्या एका संमेलनात डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेक विद्वानांनी पूरनियंत्रणासाठी पर्याय म्हणून तटबंधांचा उपयोग नाकारला होता. तरीही स्वातंत्र्यानंतर प्रत्येक लहान-मोठ्या नद्या बांधण्याचे काम अविरत सुरु आहे. त्याच्या दुष्परिणामाची अनेक उदाहणे संपूर्ण देशात पहायला मिळत आहेत.
      शहरीकरण, जंगल विनाश आणि खनन ही तीन कारणे पूरपरिस्थितीसाठी उत्प्रेरकाचे काम करत आहेत. जेव्हा निसर्गाची कत्तल करुन सिमेंट कॉंक्रिटची जंगले निर्माण केली जातात, तेव्हा जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता कमी होतेच, त्याबरोबरच पृष्ठभागावरील पाण्याच्या प्रवाह क्षमतेतही अनेक पटींनी वाढ होते. याबरोबरच शहरीकरणाच्या कचर्‍याने समस्येला वाढविलं आहे. ही कचरा नाल्यांद्वारे नदीपर्यंत पोहोचतो. परिणामी नदीची जल ग्रहण क्षमता कमी होते आणि पूर येतो. काश्मीर, पंजाब आणि हरियाणामधील पुराचं कारण जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेले अनियंत्रित शहरीकरणच आहे. यामुळे तेथे भूस्खलनाच्या घटना वाढत आहेत आणि त्याचा राडारोडाही नद्यांमध्येच जातो. पर्वतांवरील खननाने दुहेरी नुकसान होतं. यामुळे तेथील वृक्षराजी नष्ट होते आणि खाणींतील निघालेली धूळ आणि राडारोडा नदी-नाल्यांमध्ये अडथळा निर्माण करतो. हिमालयातून उगम पावणार्‍या नद्यांच्या बाबतीत तर प्रकरण अधिकच गंभीर बनतं. हिमालय पृथ्वीवरील सर्वात कमी वयाचा पर्वत आहेत. त्याची विकास प्रक्रिया सतत सुरु आहे, त्यामुळेच त्याला जीवित पर्वतही म्हटले जाते. त्याच्या नवोदित परिस्थितीमुळे तेथील सर्वात मोठा भाग कठोर खडक नसून मातीच आहे. पावसात अथवा बर्ङ्ग वितळण्यावर, जेव्हा पाणी खालच्या बाजूस वाहू लागतं तेव्हा ते स्वत:बरोबरच पर्वतावरील मातीही वाहून आणते. पर्वतीय नद्यांमध्ये आलेल्या पुरामुळे ही माती नदीकिनारी पसरते. या नद्यांचं पाणी ज्या वेगाने वाढतं, त्याच वेगाने कमी होतं. या मातीमुळे नदीकिनारचा भाग अतिशय कसदार असतो. परंतु  आता या नद्यांना जागोजागी बांधले जात आहे. यामुळे माती त्या तटबंधाजवळ अडकते आणि नद्या उथळ बनवत राहते.
       सद्यपरिस्थिती पूर केवळ एक नैसर्गिक प्रकोप नाही, तर मानवजन्य साधनांनी निर्माण झालेलं संकट आहे. वास्तवात नद्यांचे नैसर्गिक प्रवाह, पद्धती, विविध नद्यांची उंची-पातळीतील ङ्गरक यासारख्या विषयी आपल्या येथे कधी निष्पक्ष अभ्यास करण्यातच आला नाही आणि याचाच ङ्गायदा घेऊन ठराविक मंडळी धरणे आणि तटबंधांमार्ङ्गत मलिदा खात राहतात. पाण्याला स्थानिक पातळीवर रोखणे, नद्या उथळ होऊ न देणे, मोठ्या धरणांवर बंदी, नद्याजवळील डोंगरावरील खनन रोखणे आणि नद्यांच्या नैसर्गिक मार्गाशी छेडछाड करण्यापासून रोखणे, या काही साध्या बाबींची पूर्तता करण्यात आली, तर पुरासारख्या संकटापासून वाचता येईल.

मंगळवार, २३ जुलै, २०१९

गधड्यांनो, अलिबागच्या कुचेष्ठेला तुम्ही विनोद कसे समजता?

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       उच्च न्यायालयाने अलिबागकरांची याचिका फेटाळल्याने काहीजणांना हर्षोन्माद झाला आहे. काही चक्क अलिबागकरांविरुद्ध लेखण्या सरसावून बसले आहेत. पण उच्च न्यायालयापर्यंत अलिबागकरांच्या तीव्र भावना न पोहचल्यानेच त्यांना न्याय मिळाला नाही, हे स्पष्ट आहे. अलिबागकरांवर जो लेकी बोले सुने लागे या पद्धतीने जो विनोद केला जातो, तो वास्तवात विनोद नसून अलिबागकरांची कुचेष्टा आहे, हे समजाविण्यात आणि समजून घेण्यात दोन्ही बाजू कमी पडल्या आहेत हे स्पष्ट आहे. न्यायालयाला विनोद आणि कुचेष्टा यामध्ये एक सीमारेषा असते याची जाणीव नसेल असे कसे म्हणता येईल. तरीही अलिबागकरांना वाटाण्याच्या अक्षता न्यायालयाने लावल्या आहेत. यासाठी प्रचलित विनोदांची उदाहणे दिली. त्याच्याशी अलिबागकरांचा काही संबंध नाही. अलिबागकरांचेही विनोदाशी काही वाकडे नाही. अलिबागकरांना निखळ विनोद समजतो आणि त्याला ते दादही देतात. पण अलिबागकरांना विनोदाच्या नावावर टार्गेट केले जाते, तो कोणत्याही ऍगलने विनोद वाटत नाही, तर त्यातून अलिबागकरांची कुचेष्टा, अवमान दिसून येते. त्या वाक्यात कोणता विनोद दडला आहे, हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, न्यायालयाला त्यात विनोद दिसला हाच एक मोठा विनोद आहे. 
       अलिबागकर समजूतदार आहेत, संयमी आहेत, तसेच पराक्रमीही आहेत. त्यांनी आतापर्यंत समजूतदारपणा आणि संयम दाखवला, म्हणूनच न्यायासाठी आधी न्यायालयात धाव घेतली. पण आता घाव घालण्याची वेळ आली आहे. अलिबागकरांची तथाकथित विनोदाचा आस्वाद घेऊन कोणी कुचेष्टा केली तर त्याला अलिबागकरांचा पराक्रमही पहायला मिळेल. अलिबागकर कोणत्याही जाती धर्माचे असले तरी एक अलिबागकर म्हणून ते वाढले आहेत, अलिबागकर म्हणून अन्यायाविरुद्ध एकत्र होतात. आम्हा अलिबागकरांची विनाकारण विनोदाच्या नावावर कुचेष्ठा केली तर त्यांना अलिबागी हिसका दाखवायलाच लागेल. त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील. अलिबागकरांच्या नावाने कुचेष्ठा करण्याएवजी स्वत:च्या घरी असा तथाकथित विनोद निपजून तरी पहा, कसं वाटतंय?
         अलिबागवर निसर्गसौंदर्याची पखरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेल्या मिश्रदुर्ग कुलाब्याची श्रीमंती अलिबागला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची सावली, नव्हे आशीर्वाद अलिबागवर आहे. अलिबागवर अगदी महात्मा गांधी, सानेगुरुजी, देशातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी, तसेच अनेक थोरांनी प्रेम केले आणि आजचे अलिबागबाहेरचे चोर अलिबागकरांची कुचेष्ठा करत आहेत. या मातीने जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या रुपाने देशाला लष्कर प्रमुख दिले, अनेक संत, कलाकार, लेखक, राजकारणी, समाजकारणी दिले. अलिबाग आणि अलिबागकर समृद्ध आहेत. पर्यटकांना येथील निसर्ग व येथील माणसेही आवडत असताना विनोदाच्या नावावर अलिबागकरांचा कुचेष्ठा करुन त्यांचे भान का सुटावे, याचे आश्चर्य वाटते.
      कोण एक कादरखान आपल्या चित्रपटात अलिबागबद्दल एक वाक्य काय टाकतो, सवंग विनोदाच्या नावावर त्याचा बाजार करणे सुरु झाले. कादरखानच्या वेळी अलिबागकरांना त्याचे गांभीर्य वाटले नाही. तो विषय तिथेच संपला असता तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. आज कोणीही लल्लूपंजू चित्रपट, मालिकांत, नाटकांत अलिबागची बदनामी विनोदाच्या नावावर बेछूट करतो. या बिनबापाच्या अवलादींना अलिबागकर समजले असते तर अलिबागची त्यांनी आपल्या तथाकथित विनोदाने बदनामी केली नसती.  मठ्ठांनो, तो विनोद नाही, ती कुचेष्ठा आहे. ही कुचेष्ठा न्यायालय संपवणार नसेल तर अलिबागकरांनाच ती संपवावी लागणार आहे. मग अलिबागकरांच्या या न्याय्य लढ्यात कोणी बरोबर नाही आलं तरी चालेल. 

तलावांच्या देशाला पाणी टंचाईचा शाप

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉ 


      कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जाणारे तलाव हे एकेकाळी ग्रामीण संस्कृतीचीच नाही, तर खेडी, गावे आणि शहरांची ओळख होती. भारतात असं एखादं गाव, एखादं खेडं आणि शहर नाही, जेथे मोठ्या संख्येने तलाव नाहीत. विशेषत्वाने राजेशाहीच्या काळात तलाव राज्याच्या शेतीसाठीच नाही, तर तहान भागविणारे सर्वोत्तम जलस्रोत म्हणून उपलब्ध होते. परंतु स्वातंत्र्यानंतर विकासाचे नवे मापदंड स्वीकारल्याने तलावांचा लोकांचा वापर आणि संरक्षणाची परंपरा नष्ट होऊ लागली. गेल्या सत्तर वर्षांत देशातील लाखो तलाव कोरडे पडले, अथवा त्यांच्यावर अतिक्रमण करुन त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकण्यात आलं आहे. जे तलाव कृषी, ङ्गलझाडे-ङ्गुलझाडे, जीवन संस्कार आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी आधार बनले होते, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये उपेक्षेची अशी नकारात्मकता निर्माण झाली की पहाता पहाता तलाव आपलं अस्तित्वच गमावून बसले आहेत. जनतेने त्यांच्या संरक्षणासाठी आपली परंपरा चालवली नाही, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस काही केले नाही. आता तरी नव्या जलशक्ती मंत्रालयाने या पुनरुज्जीवनाच्या बाबी बाबीकडे गांभीर्याने पहावे.
        भारतात दोन-चार शतकांपूर्वीच नव्हे तर पारतंत्र्यात जाण्याआधी  ग्रामीण विभागांत तलाव विकास आणि रोजच्या गरजांचा महत्वाचा भाग असत. गाव, खेड्यांतील प्रत्येक माणूस तलावाच्या आधाराने आपल्या पाण्यासंबंधी रोजच्या आवश्यकता पूर्ण करीत असे. त्याकाळी तलाव आणि इतर स्रोत हे योग्य जागा शोधून आणि विचार करून नीट बांधून वापरात आणले गेले आणि सांभाळले गेले. त्याकाळात राजा, अधिकारी आणि धनिक मंडळी सर्वसामान्य लोकांच्या सोयीसाठी पाणी साठवण्यासाठी खर्च करून सुविधा निर्माण करत होते. हे चांगले आणि पुण्याचे काम समजले जात असे. जलसंधारण आणि व्यवस्थापन हे लोकसहभागातून करायचे काम होते, ते सांभाळण्यात तत्कालीन राजव्यवस्थेचा थेट सहभाग नसे. बांधलेल्या तलावात जोपर्यंत पाणी असायचे, तोपर्यंत गावातल्या बहुतांश विहिरींना पाणी असायचे. परंतु स्वातंत्र्यानंतर विकासाच्या नव्या मापदंडानुसार तलाव आपले अस्तित्व गमावत गेले. याची सुरुवात इंग्रजांच्या राजवटीपासून झाली.
      इंग्रजांनी महसूल वाढविण्याच्या हेतूने तलावांबाबत एक वेगळ्या प्रकारची पद्धत अंगीकारली. त्यांनी गावांतून अधिक महसूल मिळवण्यासाठी तलावांना आपल्या हातात घेतले. यामुळे खेडे, गाव आणि शहरांत तलाव संस्कृती संरक्षित करण्याची परंपरा हळूहळ समाप्त झाली. याचा दूरगामी परिणाम झाला. इंग्रज गेल्यानंतर लोकांमधील तलावांची देखभाल करण्याच्या कर्तव्याची जाणीव नाहीसी झाली. याच कारणामुळे स्वातंत्र्यानंतर तलावांबाबत लोकांमध्ये उपेक्षा आणि नकारात्मक भावना दिसू लागली, ती आजही तशीच दिसते. आकडेवारी नुसार १९४७ मध्ये देशात एकूण चोवीस लाख तलाव होते. तेव्हा देशाची लोकसंख्या सद्य लोकसंख्येच्या एक चतुर्थांश होती. आता २०१८-१९ मध्ये तलावांची संख्या घटून जवळपास पाच लाखांवर आली आहे. यांतील वीस टक्के तलावांचा वापर होत नाही, परंतु चार लाख ऐंशी हजार तलावांचा वापर कोणत्या ना कोणत्या रुपात होत आहे. ज्या राज्यांत पाण्याची टंचाई सर्वाधिक आहे, तिथे तलाव मोठ्या संख्येने आढळायचे. आज अशी परिस्थिती आहे आहे की देशाच्या अधिकांश राज्यांत पाणी टंचाई बारा महिने कायम असते. याचं कारण पाण्याची नासाडी, पाण्याचा अधिकाधिक उपसा आणि त्याचे संरक्षण न होणे हे आहे. 
        स्वातंत्र्यापूर्वी तीन वर्षे आधी १९४४ मध्ये देशात दुष्काळाचा अभ्यास करण्यासाठी दुष्काळ अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाने आपल्या अहवालात म्हटले की, जर जल समस्येवर परिणामकारक तोडगा काढला नाही, तर भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आयोगाने सर्वात परिणामकारक तोडगा तलावांची निर्मिती आणि त्यांच्या संरक्षणावर जोर दिला होता. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या मापदंडात तलावांचे पाणी उपलब्ध करण्याचा सर्वात उत्तम स्रोत मानण्यात आलं नाही. याचा परिणाम असा झाला की तलाव कुठे अतिक्रमण, कुठे अस्वच्छता, तर कुठे तांत्रिक ज्ञानाच्या अभावाने कोरडे पडत गेले. आजही त्यांच्या देखभालीसाठी कोणीही जबाबदार नाही.
        तलावांवर अतिक्रमण सार्वत्रिक बाब आहे. याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने २००६ मध्ये एका प्रकरणात म्हटले होते की, गुणवत्तापुरक जीवन प्रत्येक नागरिकाचा मूळ अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक जल स्रोतांचे संरक्षण करणे भारत सरकारचे कर्तव्य आहे. घटनेच्या कलम २१ अंतर्गत गुणवत्तापुरक जीवनाच्या परिघात जल अधिकाराची हामीही देण्यात आली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाद्वारे केंद्र सरकारला त्याच्या कर्तव्याची आठवण दिली जाण्यातून केंद्र सरकारची पाण्यासारख्या जीवनाचा पर्याय समजल्या जाणार्‍या बाबींचा प्रत्येक नागरिकाच्या गरजेप्रमाणे पुरवठा करणे जबाबदारी आहे, हे अधोरेखित केले होते.
         भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेत जल संरक्षण करणे प्रत्येक व्यक्तीचं परम कर्तव्य आहे. जोपर्यंत ही परंपरा चालू होती, तोपर्यंत देशात पाण्याची काही टंचाई नव्हती. देशात येणारा पाऊस हा चार महिन्यांमध्ये आणि तो ही अनेक ठिकाणी जेमतेम १०-१२ दिवस पडतो. त्या १०-१२ दिवसांत तो साठविला गेला नाही तर एखाद्या गृहिणीने सकाळी उठायचा आळस करुन जर तासभर येणारे नगरपालिकेच्या नळाचे पाणी घरात साठवून ठेवले नाही तर दिवसभर जशी त्रेधतिरपिट उडते तशी समाजाची त्रेधातिरपिट उडू शकते. याची आपल्याला अतिशय खोल जाणीव असल्यामुळे पाण्याच्या सांठवणीला आपल्या सगळ्या व्यवहारांमध्ये आदराचे स्थान दिलेले आहे. याबद्दल आपल्या वाङमयांतही अनेक उदाहरणे पहायला मिळतात. येवढे प्रचंड महाभारताचे युद्ध झाले, अत्यंत घनघोर युद्ध झाले. त्याच्या नंतर सर्व स्थिरस्थावर होत असतांना नारदमुनी हे युधिष्ठीरांना भेटायला आले. राज्याची सगळी घडी नव्याने कशी बसविणार? म्हणून भेटायला आल्यानंतर नारदमुनींनी युधिष्ठीराला एक प्रमुख प्रश्न काय केला ? इतर अनेक गोष्टी राज्य व्यवहाराच्या म्हणून आहेतच. पण त्याबरोबर अरे, तुझ्या राज्यामध्ये अनेक तलाव काठोकांठ भरलेले आहेत ना? हा प्रश्न त्यांनी केला. म्हणजे राज्याची नवीन घडी बसवितांना पहिल्यांदा कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे, याची नारदांनी युधिष्ठीराला आठवण करुन दिली. पण आता याचे भान सुटल्याने पाणी टंचाईस देशाला सामोरे जावे लागते आहे.
        पाण्याचा अतिशय उपसा आणि पाण्याचा खप वाढण्याच्या कारणामुळे गेल्या तीस-चाळीस वर्षांत पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या पाण्याची मागणी प्रति व्यक्ती १०० ते ११० लिटर दरम्यान आहे, ती २०२५ पर्यंत वाढून १२५ लिटर किंवा त्यापेक्षा अधिक होऊ शकते. त्यावेळी भारताची लोकसंख्या वाढून ती एक अब्ज अडतीस कोटी होईल. त्यावेळी पाण्याची मागणी जवळजवळ आठ हजार कोटी लिटर असेल, पण ते याच्या अर्धेच उपलब्ध होईल. केंद्रीय हवामान खात्याच्या अनुसार देशभर एकूण वार्षिक पाऊस १,१७० मिमी पडतो, आणि तोही केवळ तीन महिन्यांत. परंतु या प्रचंड पाण्याचा आपण २० टक्केच वापर करु शकतो, म्हणजेच ८० टक्के पाण्याला आपण वापर न करताच असच वाहून समुद्रात जाऊ देतो. धरणांवर ४ ट्रिलीयन रुपये खर्च केले आहेत, परंतु त्याचे हवेतसे परिणाम पहायला मिळाले नाहीत. पारंपरिक जल व्यवस्था म्हणजेच तलाव, विहिरी यांच्या पुनरुज्जीवनासाठी कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही. सरकारांचं स्वस्त आणि सामान्य उपायांवर विश्वास नाही, ती नेहमी महागड्या, मोठ्या प्रकल्पांकडे पहात राहतात. त्यामुळेच १९६० नंतर लाखो जल व्यवस्थांची उपेक्षा झाली आहे.
       जोपर्यंत आपण मान्सूनच्या काळात जल संचय करत नाही, तोपर्यंत आपल्याला जल संकटाशी सामना करावाच लागेल. तथापि जर पावसाचे पाणी संरक्षित करण्याची चोख व्यवस्था करण्यात आली तरच पाणी टंचाईपासून मुक्ती मिळेल. इतकेच नाही तर पाण्यावरुन होणार्‍या राजकारणापासूनही कायमची सुटका मिळेल. ज्या विभागांत पाऊस ङ्गार कमी पडतो, तेथे तर पाताळातील पाणीच एकमेव स्रोत आहे, तेथे कसं पाणी टंचाईपासून बाहेर पडता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालय स्थापन करुन गांभीर्याने पाणीप्रश्नाकडे पहायला सुरुवात केली आहे, पण या परिघात त्यांनी तलाव आणि विहिरींचा पुनरुद्धाराची बाब हाताळायला हवी, तसेच पाण्याला राष्ट्रीय संपदा म्हणून घोषित करुन जल संकटावर तोडगा काढला पाहिजे. तरच भविष्यात देशातील नागरिकांचं जीवन सुरक्षित राहील.

मंगळवार, १६ जुलै, २०१९

जल संरक्षणातच आहे सजीवसृष्टीचे रक्षण

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉  



   भारतीय संस्कृतीने नद्यांना केवळ जलस्रोत मानलेले नसून, त्यांना ‘जीवनस्रोत’ मानलेले आहे. पाणी म्हणजेच जीवन अशी भारतीय लोकमानसाची पूर्वापार धारणा असून त्यासाठी त्यांनी शेकडो वर्षांपासून त्यांना ‘लोकमातां’चे स्थान बहाल केलेले आहे. पिण्याचे पाणी, जलसिंचन, जलविद्युत निर्मिती तसेच स्वस्तात जलवाहतुकीची सुविधा पुरविणार्‍या नद्यांवरती औद्योगिकरणाचे अत्याचार सुरु आहेत. या नद्यांच्या शाश्वत अस्तित्वासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. विहिरी, तलावही मोठ्या प्रमाणात बुंजवण्यात आले आहेत. यासह इतर अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांत भारताला पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. या परिस्थितीवर लवकरच नियंत्रण मिळविले नाही, तर भविष्यात भीषण परिणामांना सामोरे जावे लागेल.
      भारत जगातील एक जलसमृद्ध देश आहे, परंतु देशातील अनेक राज्यांत आज पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. यासाठी आंदोलने आणि संघर्ष पहायला मिळतो. जवळजवळ ७०-७५ टक्के घरांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. सहा कोटींहून अधिक लोकांना फ्लोराइडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. जवळपास चार कोटी लोक दरवर्षी दूषित पाण्यामुळे आजारी पडतात. देशातील १८-१९ हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथे  पावसाने जवळजवळ चार हजार अब्ज घनमीटर पाणी धरतीवर येते. त्यातील १० ते १५ टक्केच पाण्याचा वापर होतो. ७५ ते ९० टक्के पावसाचे पाणी नद्यांच्या मार्गे समुद्रात निघून जातं. अशा परिस्थितीत लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याचा खपही वाढला, त्यामुळे काही वर्षे देशाला पावसाळा संपतो न संपतो तोच भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात मात्र कोणाला दरवर्षीच्या पाणी टंचाईबद्दल चिंता आणि चिंतन करावेसे वाटत नाही. याबाबत गाङ्गील राहिल्याने त्याचा ङ्गटका संपूर्ण देशालाच बसतो आहे.
       जल संरक्षणाच्या बाबतीत आधीच खूप उशीर झाला आहे. सध्या देशातील बंहुतांश नद्या औद्योगिक प्रदूषणामुळे कचराग्रस्त झाल्या आहेत. देशातील ३२५ नद्यांचे पाणी विषाक्त झाले आहे. जवळजवळ १५० नद्या कोरड्या पडल्या आहेत. नद्या पुनर्जीवित करण्याच्या योजनेवर युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे. याबरोबरच पाण्याचा वापर जबाबदारीने होत नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. पावसाचे पाणी साठवण्याचा नागरी पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाही. नळाने पाणी येते म्हटल्यावर या तलाव आणि विहिरींची किंमत कमी झाली. त्यांना कचराकुंड्या बनवून त्यांना बुंजवण्यात आले. विहिरी बुंजवण्यात आल्या, तलाव बुंजवून त्यावर गृहप्रकल्प उभारण्यात आले. नागरीकरणात पाण्याचे भान राहिले नाही. जवळचे पाणीस्रोत सोडून शेकडो-हजारो कोसांवरील धरणांच्या पाण्याला नागरीकरणात महत्व आले. धरणाचे पाणी शेती, पिण्याचे पाणी, त्यानंतर औद्योगिकीकरणासाठी महत्वाचे आहे. पण या औद्योकीकरणाने नद्यांचे प्रदूषण केले आहे आणि धरणांतील पावसाच्या पाण्यावरच नागरिकांना विसंबून राहावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
      धरणांच्या पाण्याचा नागरिकरणासाठी ङ्गायदा होत असताना विहिरी, तलावांचाही ङ्गायदा घेणे आवश्यक आहे. तसा तो न घेतल्यामुळे १९४७ मध्ये देशात जे ३० लाख विहिरी आणि तलाव होते, त्यांची संख्या आज ५ लाखांवर आली आहे. या पाच लाखांचाही काही उपयोग केला जात नाही. यात भरीस भर म्हणून शहरांत, महानगरांत सिमेंटकॉंक्रिटीकर होऊ लागले आणि या आणखी एका कारणाने पावसाचे पाणी भूगर्भापर्यंत पोहचणे अवघड झाले. भारताच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत भूगर्भ जल आहे. भूगर्भ जलस्तर दरवर्षी ०.३ मीटर या दराने कमी होत आहे. अशी परिस्थिती असताना भरीस भर देशातील जनतेने नद्यांची कचाकुंडी करुन टाकली आहे. या नद्यांत काय टाकले जात नाही, अगदी कचर्‍यापासून मृतदेहापर्यंत टाकले जाते. औद्योगिक रासायनिक कचरा आहेच, या सर्वाचे मोल देशातील नागरिकांनाच चुकवावे लागतेय आणि लागणार आहे. पाणी संरक्षणासाठी कठोर पावले उचलली नाही, तर उद्याचा काळ मोठा परीक्षेचा असणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
    वने पर्यावरण चक्राचा मुख्य घटक आहे. देशातील वनक्षेत्र कमी होत आहे. वनविभागाद्वारे सरकारी मोहिमांत दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. या मोहिमांनंतर अधिकांश झाडे मरुन जातात, परंतु ती सरकारी नोंदीत जिवंतच असतात. म्हणूनच वनक्षेत्र कमी होणे चिंतेचा विषय बनत नाही. जेथे घनदाट वने नाहीत, झाडे नाहीत तेथे पाऊस कसा पडेल? जेथे पाऊस पड नाही, तेथे झाडे उगवत नाहीत. वनस्पती आणि पाऊस यांचे परस्परावलंबन आहे. हे लक्षात घेऊन गांभीर्याने वृक्षारोपण मोहिमा राबविणे आवश्यक आहे. दाट वृक्षांनी केवळ पावसालाच आकर्षित केले जात नाही, तर भूगर्भात पाण्याचे साठे तयार करण्याचे कामही हे वृक्ष करतात. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम न ठरता ती जीवनशैली बनली तर त्याचा ङ्गायदा माणसालाच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीला होणार आहे. त्यादृष्टीने सामाजिक पातळीवर जागृती होणे आवश्यक आहे.
     एकीकडे भूगर्भातील पाणी कमी होत आहे, तर दुसरीकडे पाण्याची मागणी वाढत आहे. आधुनिक जीवनशैलीमुळेही पाण्याचा बेसुमार उपसा होतो आहे. पाण्याचा उपयोग आणि दुरुपयोग वाढला आहे. नद्या जलहीन होत आहेत. ऋतूचक्र बिघडले आहे. लोकसंख्या वेगाने वाढते आहे. २०१९ मध्येच मागणीनुसार पाणी उपलब्ध होत नाही. पाण्याचा अभाव आहे. आगामी सहा-सात वर्षांनंतरच्या भीषण पाणी टंचाईचा सहजच अंदाज बांधता येतो. भारताकडे कोणताही पर्याय नाही. म्हणूनच आपणा सर्वांना पाणीवापराबाबत नवीन आचार शास्त्र ताबडतोब अमलात आणावे लागेल. पाण्याचा दुरुपयोग आणि जल प्रदूषणाच्या सर्व सवयी तात्काळ सोडाव्या लागतील. पाण्याच्या नासाडीवर तातडीने प्रतिबंध आणि जल संचयाची पावले उचलण्याचे आव्हान आहे. केंद्र सरकारने समग्र जल व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रीत केले आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आहे. त्यांनी पेयजल, स्वच्छता आणि गंगा योजना विभागांना एकत्रित करुन ’जलशक्ती मंत्रालय’ बनविले आहे. आता केंद्राने देशाच्या २५६ जिल्ह्यातील १५९२ विभागांत जलसंरक्षणाची योजना जाहीर केली आहे. ’जलशक्ती मंत्रालय’ यापुढे कशाप्रकारे काम करते आणि त्यातून काय निष्पन्न होते, हे आपल्याला पहायचे आहे. असे असे तरी आपणही पाण्याबाबत सजग असायला हवे याची खूणगाठ भारतीय नागरिकांनी मनाशी बांधली पाहिजे.

मंगळवार, ९ जुलै, २०१९

धरण सुरक्षिततेच्या कायद्याचं बोला!

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉  


       अमेरिका आणि चीन यांच्या पाठोपाठ सर्वाधिक धरणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. नद्या आणि डोंगरांची संख्या मुबलक असल्यामुळे प्रत्येक राज्यात धरणे बांधणे शक्य झाले आहे. आपल्या देशात ५७०१ मोठी धरणे असून, ४५० मोठ्या धरणांची कामे प्रगतिपथावर आहेत. याखेरीज मध्यम आणि लहान आकाराची हजारो धरणे देशात आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रात  ३००० मोठी व मध्यम धरणे (देशातील एकूण धरणांच्या एकेचाळीस टक्के) आहेत. भारतातील अनुकूल जलवायू आणि भौगोलिक परिस्थितीमुळेच इतक्या मोठ्या संख्येने धरणे बांधणे शक्य झाले आहे. दुर्दैवाने गेल्या काही दशकांमध्ये देशातील ३६ धरणे ङ्गुटली आणि मंगळवार, ३ जुलै रोजी रात्री ९-३० वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील, चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण ङ्गुटल्याने या धरणांची संख्या ३७ झाली आहे. तरीही आजही या धरणांच्या सुरक्षिततेसाठी या देशात कायदा नाही ही संतापजनक बाब आहे.
      नद्यांवर बांधलेली धरणे ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत, असे उद्गार देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी काढले होते. कारण पावसाळ्यात पुरेसा साठा करून जेव्हा पाण्याची मागणी ज्या प्रमाणात आवश्यक असेल त्या वेळेला त्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे हे धरणामुळे साधते. धरणांमुळे शेतीला पाणी, पेयजल, विद्युतनिर्मिती यांच्यासारखे अनेक लाभ मिळतात. तथापि, धरणे भरणार्‍या नद्यांची आज अवस्था काय आहे आणि धरणांचीही काय अवस्था आहे हा प्रश्न उरतोच. देशभरात १० वर्षांपूर्वी एकूण १५ हजार नद्या होत्या. यादरम्यान सुमारे ३० टक्के म्हणजे साडेचार हजार नद्या कोरड्या पडल्या, त्या ङ्गक्त पावसाळ्यातच वाहतात. गेल्या ७० वर्षांत ३० लाखांपैकी २० लाख तलाव, विहिरी, सरोवरे पूर्णपणे गायब झाली आहेत. भूजलाची स्थितीही अत्यंत खराब आहे. देशातील अनेक राज्यांत काही ठिकाणी भूजल पातळी ४० मीटरपर्यंत खाली गेली आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पाणीसाठा पोटात बाळगणार्‍या धरणांची सुरक्षा अग्रस्थानी हवी, पण तशी ती आहे असे कधी दिसली नाही. त्यामुळे धरणांच्या मागचे दूष्टचक्र थांबायचे नाव घेत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण ङ्गुटल्याने धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे येणे साहजिकच आहे.
     धरणे ही आधुनिक भारताची मंदिरे असली तरी गेल्या काही दशकांपासून या मंदिरांचे मसनवट करण्याचे पातक व्यवस्था करीत आहे. खरे तर या  धरणांचा इतिहास पुरातन आहे. प्राचीन काळी म्हणजे इ.स.पूर्व काळातही इजिप्त,चीन येथे धरणे बांधली गेली होती. नाईल नदीवरील कोशेस येथे इ.स.पूर्व २९०० च्या सुमारास बांधले गेलेले १५ मी उंचीचे धरण हे सर्वात प्राचीन मानले जाते. इ.स.पूर्व २७०० मध्ये त्याच नदीवर बांधलेले ‘साद एल काङ्गारा’ या दगडी धरणाचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. भारतातही इ.स. ५००-१८०० च्या काळात अनेक मातीची धरणे बांधली गेली. मातीच्या धरणाच्या उतरत्या भागावर तासलेले दगड बसवण्याच्या पद्धतीप्रमाणे इ.स. १०११-१०३७ मध्ये तामिळनाडूमध्ये वीरनाम धरण बांधले गेले. महाराष्ट्रात पहिले मोठे दगडी धरण पुण्याजवळ खडकवासला येथे १८७९ साली बांधले गेले. रोमन लोकांनीही पाणीपुरवठा आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी इटली, उ. आङ्ग्रिका, स्पेन मध्ये दगडी धरणे बांधली. पहिले केबर नावाचे कमानी धरण इराणमध्ये १४ व्या शतकात बांधले गेले. रोमन साम्राज्य लयास गेल्यावर १६ व्या शतकापर्यंत ङ्गारशी प्रगती नसली तरी नंतर स्पानिश स्थापत्याविशारदानी मोठी धरणे बांधण्यात यश मिळवले. १९-२० व्या शतकात बांधकाम तंत्र, यंत्रसामग्री, कॉंक्रीटचा उपयोग, मृदअभियांत्रिकी यात झालेल्या संशोधनामुळे धरण बांधणीचा उच्चांक गाठला गेला.
        स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये भारतात हरित क्रांती सुरु झाली आणि पाण्याची गरज वाढली आणि नवे धरण प्रकल्प साकार झाले. आज देशात जी धरणे आहेत त्यातील १६४ धरणे शंभर वर्षांपूर्वीची आहेत. ७५ टक्के धरणे २५  वर्षांपेक्षा अधिक जुनी आहेत. धरणांची देखभाल योग्य पद्धतीने न झाल्याने गेल्या काही दशकांमध्ये ३७ धरणे ङ्गुटली. धरणे ङ्गुटल्यामुळे केवळ पर्यावरणाचीच हानी झाली; असे नाही, तर हजारो लोकांचा मृत्यूही झाला. गावे आणि शेतीही उद्ध्वस्त झाली. ङ्गुटलेल्या धरणांमध्ये ११ राजस्थानातील, १० मध्य प्रदेशातील, ५ गुजरातमधील, ५ महाराष्ट्रातील, २ आंध्र प्रदेशातील तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तमिळनाडू, ओडिशामधील प्रत्येकी एका धरणाचा समावेश आहे. १९७९ मध्ये गुजरातमधील मच्छू-२ धरण ङ्गुटल्यामुळे १८०० लोकांचा मृत्यू झाला होता. धरणङ्गुटीत आघाडीवर पहिल्या क्रमांकावर राजस्थान, दुसर्‍या क्रमांकावर मध्यप्रदेश आणि तिसर्‍या क्रमांकावर गुजरात आणि महाऱाष्ट्र राहिला आहे. महाराष्ट्रातील जलसंपदा विभागाची तर धरणाचे पाणी मुरवण्याची ख्याती सर्वत्र आहे. हा जलसंपदा विभाग अनेक घोटाळे, भ्रष्टाचार यांनी बदनाम झालेला आहे. अशा परिस्थितीत तिवरे धरणाला पडलेले भगदाड माहीत असूनही हा विभाग मुर्दाड राहिला, त्यामुळेच ते धरण ङ्गुटले आणि मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. म्हणजे जलसंपदा विभागाचे सरकार बदलले तरी मागील पानावरुन पुढे चालू आहे हेच दिसून आले. तिवरे धरण बांधून जेमतेम १० वर्षे झाली होती, ते धरण ङ्गुटल्याने धरणात कसा भ्रष्टाचार असतो आणि धरणाची देखभाल, दुरुस्ती करण्यात जलसपंदा विभागाची कशी अनास्था असते हे दिसून येते.  पण या अनास्थेने जी जीवितहानी, वित्तहानी झाली आहे, ती भरुन येणार आहे काय? पुन्हा ही जीवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून गंभीरपणे ठोस पावले उचलली जाणार आहेत का?
       नाही म्हणायला तिवरे धरण ङ्गुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जलसंपदा विभागाला जाग आली असल्याचे दाखवले जात आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यातील एकूण १६७ धरणांची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यासाठी विश्व बँकेचे सहकार्य लाभणार आहे. ९४० कोटींच्या निधीतून ही सुरक्षा साधली जाणार आहे. यात ७० टक्के वाटा विश्व बँकेचा, तर ३० टक्के वाटा राज्य सरकारचा आहे. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण व नाशिक अशा चार  धरणसुरक्षा पुनर्लोकन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या आता जुलैअखेर स्थानिक अधिकार्‍यांना बरोबर घेऊन धरणांची पाहणी करणार असून, त्यानंतर ते अहवाल देणार आहेत. त्यानंतर या धरणाच्या कामाला मंजुरी देऊन ते काम केले जाणार आहे. या समितीत धरणाची माहिती असणारे सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ असणार आहे. महाराष्ट्रात धरण सुरक्षेसाठी उशिरा का होईना पाऊले उचलली जात आहेत हे समाधानकारक असले तरी यासाठी उपलब्ध होणारा ९४० कोटींचा निधी सत्कारणी लागणार की नाही, ही शंका उरतेच. कारण सरकारे बदलली तरी त्या त्या विभागांची बकासुरी वृत्ती बदलत नाही. ही वृत्ती बदलली तरच धरणे आणि माणसे सुरक्षित राहतील.
    धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राष्ट्रीय आहे. धरण सुरक्षा विधेयक २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर झाले होते. त्याचे काय झाले हे कळले नाही. या विधेयकानुसार सध्या सल्लागार यंत्रणा म्हणून कार्यरत असलेल्या केंद्रीय धरण सुरक्षा संघटना (सीडीएसओ) आणि राज्य धरण सुरक्षा संघटना (एसडीएसओ) या यंत्रणांच्या ऐवजी प्रत्येक राज्यात नियामक यंत्रणा म्हणून राज्य धरण सुरक्षा प्राधिकरण (एनडीएसए) आणि राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाची (एनडीएसए) स्थापना केली जाणार आहे. एनडीएसएमार्ङ्गत दिशादर्शनाचा एक आराखडा तयार करण्यात येईल. त्यानुसार धरणांची सुरक्षा आणि देखभाल होणे बंधनकारक ठरेल. धरणांचे बांधकाम करणार्या सरकारी, खासगी संस्थांकडून बेजबाबदारपणा दिसल्यास संबंधितांना शिक्षा करण्याची तरतूदही या विधेयकात आहे. वस्तुतः प्रत्येक राज्यातील धरणांच्या सुरक्षिततेसाठी एसडीएसएची स्थापना केली जाणार आहे. एका राज्याची मालकी असलेली धरणे, दोन किंवा अधिक राज्यांमध्ये विस्तारलेले धरण प्रकल्प किंवा केंद्रीय लोकसेवा उपक्रमांतर्गत (सीपीएसयू) येणारी धरणे एनडीएसएच्या कार्यक्षेत्रात येतील. त्यामुळे तमिळनाडूसारख्या काही राज्यांमधून या विधेयकाला विरोध होत आहे. कारण तमिळनाडूकडून केरळमधील काही धरणांचे व्यवस्थापन करण्यात येते. धरणे हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्यामुळे तेलुगू देसम पक्ष, अण्णा द्रमुक आणि बीजू जनता दल अशा पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे. या सर्व बाबींमुळे धरणांच्या सुरक्षिततेसाठी भारतात कायदा बनू शकला नाही. परिणामी या धरण ङ्गुटल्यावर त्याची जबाबदारी जलसंपदा विभाग, सरकार घेत नाही, उलट तिवरे धरणङ्गुटीनंतर त्याची जबाबदारी खेकड्यांवर टाकण्यात आली. ही जबाबदारी सरकार कितीकाळ झटकणार?
     धरणङ्गुटीच्या घटना वाढत असताना राज्य सरकारे आणि केंद्र सरकारने अधिक संवेदनशील व्हायला हवे, कारण त्यांची कातडी निश्चितच गेंड्याची नाही. तसे असते तर गेल्यावर्षी धरण सुरक्षा विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले नसते. हे विधेयक प्रत्यक्षात आले पाहिजे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी सत्ताधार्‍यांनी आणि विरोधकांनीही सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. धरण सुरक्षा कायदा झाल्यास निश्चितच बेजबाबदार व्यवस्थेला आणि सत्तेच्या झारीतील शुक्राचार्यांना चाप बसेल आणि नवीन बांधण्यात येणारी धरणे स्वत:च्या व आपल्या आसपासच्या गावांतील नागरिकांच्या जीवित-वित्ताची हमी देऊ शकतील. हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत खेकड्यांना बळ येत राहील आणि धरणे ङ्गुटत राहतील आणि या धरण बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात भरपेट मलिदा खाल्लेल्या व्यवस्थेतील राजकीय-बिगर राजकीय बेडकांची ङ्गुगलेली पोटे पाहण्याचेच जनतेच्या नशिबी येईल. या बेडकांची पोटे ङ्गुटली तरी काही हरकत नाही, पण धरणे ङ्गुटू नयेत. धरणांमागे विस्थापितांचा त्याग आहे. त्यांचे प्रश्न सरकार कधीही सोडवू शकले नाही, त्यांना पुनर्वसनासाठी अजूनही वणवण करावी लागते, त्यांच्या पिढ्यान् पिढ्या अश्वस्थामाप्रमाणे भटकताहेत आणि या धरणांच्या जीवावर भलत्यांचीच पोटे भरताहेत. कमकुवत धरणे बांधून धरण परिसरातील गावांनाही बरबाद करण्याची त्यांची कृती राक्षसी आहे. या कृतीला वेसण घालण्यासाठी धरण सुरक्षा कायदा आवश्यक आहे. तो लवकर व्हावा आणि त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी व्हावी. इतकेच.

मंगळवार, २ जुलै, २०१९

अंतराळातही भारताचा दबदबा!

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉


      सध्याचे युग हे विज्ञानाचे आहे. युद्ध झाले, तर ते जमिनीपेक्षा आवकाशातूनच होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे देशाच्या जमिनीवरील सीमा आणि समुद्रातील सुरक्षा मजबूत करीत असतानाच अंतराळातील सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देशाला मजबूत करण्यासाठी भारताने तयारीला सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात ए सॅट क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी केली होती. या महिन्यात पहिल्यांदाच भारत आभासी अंतराळ युद्धाभ्यास करणार आहे. भारताच्या या नव्या योजनेला इंडोस्पेसएक्स असे नाव देण्यात आले आहे. याबरोबरच भारताने स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करण्याची योजना आखली आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प गगनयान मोहिमेचाच विस्तार असणार आहे. याच महिन्यात १५ जुलैला चांद्रयान-२ श्रीहरीकोटाहून रवाना करण्यात येणार आहे.
        २०२१ मध्ये सूर्याच्या अभ्यासासाठी इस्रोचे मिशन आदित्य सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर २०२३ पर्यंत शुक्र ग्रहापर्यंत पोहचण्याचं इस्रोचं उद्दिष्ट आहे. चांद्रयान-२ मोहिमेची तारीख जाहीर केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतासमोर आणखी एक स्वप्न मांडले. भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक असावे, हे ते स्वप्न होय. २०२९ पर्यंत भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करण्याचे उद्दिष्ट ’इस्रो’ने ठेवले आहे. अमेरिका आणि रशियाने उभारलेल्या अंतराळ स्थानकात युरोपीय महासंघ आणि जपानचाही सहभाग आहे. चीनचे तिआनगग-२ अंतराळ स्थानक स्वतंत्रपणे काम करीत आहे. या पार्शवभूमीवर अन्य देशांच्या सहकार्याने अंतराळ स्थानक न उभारता भारत स्वत:चे स्थानक उभारण्याची घोषणा करतो, याकडे जगाने डोळे विस्ङ्गारून पाहणे साहजिकच आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केल्यानंतर अधिक संख्येने मानवाला अंतराळात पाठविणे भारताला शक्य होईल. आयएसएस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा भारत हा भागीदार बनणार नाही, तर स्वत:चे स्थानक उभारेल. हा प्रकल्प गगनयान योजनेचाच विस्तारित प्रकल्प असणार आहे. गगनयान ही मानवयुक्त अंतराळ मोहीम २०२२ मध्ये प्रस्तावित आहे. तर त्यानंतर सात वर्षांनी भारताचे अंतराळ स्थानक कार्यरत होईल, अशी सध्याची योजना आहे. गगनयान मोहिमेद्वारे मानवयुक्त अंतराळ यान पाठविणे एवढेच भारताचे मर्यादित उद्दिष्ट असणार नाही, तर एकदा मानवयुक्त मोहीम ङ्गत्ते झाली, की अशा मोहिमा वारंवार आखून अंतराळाची अधिकाधिक रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाणार आहे. तसेच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे उद्दिष्ट आतापर्यंत आपल्या नागरिकांना विविध सुविधांचा लाभ देण्यापर्यंतच मर्यादित राहिले आहे. भारतीय मच्छीमार असोत वा शेतकरी असोत, त्यांना अंतराश संशोधन कार्यक्रमातून मोठा लाभ झाला आहे. एवढेच नव्हे, तर तुम्ही-आम्ही आज एटीएममधून पैसे काढू शकतो, ते याच संशोधन कार्यक्रमाच्या आणि भारताने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांच्या आधारावर, हेही विसरुन चालणार नाही.
     भारताचे अंतराळ स्थानक छोटे असेल आणि त्याचा वापर मायक्रोग्रॅव्हिटी विषयावरील प्रयोगांसाठी केला जाईल. भारताच्या अंतराळ स्थानकाचे वजन सुमारे वीस टन असण्याची शक्यता आहे. अंतराळ स्थानकाची रचना करताना अंतराळ पर्यटनाचा विचार ’इस्रो’ने केलेला नाही. २०२२ मध्ये गगनयान मोहीम पूर्ण झाल्यानंतर अंतराळ स्थानकाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. स्थानकाच्या उभारणीसाठी पाच ते सात वर्षांचा कालावधी लागणार आहे. अंतराळ स्थानक म्हणजे एक अंतराळ यानच (स्पेस क्राफ्ट) असते आणि चालक समूहाच्या राहण्याची व्यवस्था त्यात असते. अंतराळात प्रदीर्घ काळ मुक्काम करता येईल, अशा रीतीने त्याचे डिझाइन तयार केले जाते. अंतराळ स्थानकाला आणखी एक अंतराळ यान जोडले जाऊ शकते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सध्या जगात सर्वाधिक लोकप्रिय आहे. पृथ्वीच्या अगदी जवळच्या कक्षेतून भ्रमण करणारे हे स्थानक नुसत्या डोळ्यांनीही स्पष्टपणे दिसू शकते. भारतीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून चारशे किलोमीटरवर प्रस्थापित केले जाईल. अंतराळवीर या स्थानकात पंधरा ते वीस दिवस राहू शकतील.
      अंतराळवीरांना एका स्पेस क्राफ्टमधून दुस-या स्पेस क्राफ्टमध्ये पाठविता यावे, अशा तंत्रज्ञानावर ’इस्रो’ काम करीत असला तरी या मोहिमेचा उद्देश अंतराळ यानांमध्ये इंधन भरण्याची सुविधा निर्माण करणे हाच आहे. अंतराळात यापूर्वी पाठविलेल्या यानांनी दीर्घ काळ सेवेत राहावे, यासाठी ही तरतूद आहे. याखेरीज अंतराळ संशोधनासाठी उपयुक्त उपकरणेही पृथ्वीवरून पाठविता यावीत, हाही एक उद्देश आहे. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास भारतीय अंतराळ स्थानक हे मानवयुक्त यानाप्रमाणेच असेल. यामुळे भारताची पृथ्वीसह अंतराळात टेहळणी करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढेल. जीएसएलव्ही रॉकेटचा वापर अंतराळ स्थानक तयार करण्यासाठी केला जाईल. हे रॉकिट पृथ्वीच्या सर्वात जवळच्या कक्षेत दहा टन इतके वजन वाहून नेण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त अंतराळ स्थानकात कॅमेरे लावता येतात आणि त्याद्वारे उत्कृष्ट गुणवत्तेची छायाचित्रे प्राप्त करता येतात. भारत आपल्या शत्रूवर बारीक नजर ठेवू शकेल. पूर्वी सोडलेल्या उपग्रहांत इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वारंवार नवे उपग्रह सोडण्यावर येणारा खर्चही वाचेल. अंतराळ स्थानक एखाद्या प्रयोगशाळेप्रमाणे काम करते. गेल्या काही वर्षात ’इस्रो’ने लागोपाठ यशस्वीरीत्या उपग्रहांचे प्रक्षेपण करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळेच अंतराळ स्थानकाचे स्वप्न ’इस्रो’ नक्कीच पूर्ण करेल, याची खात्री पटते.
    अंतराळात शत्रूचा उपग्रह नष्ट करण्याची क्षमता असो वा टेहळणी करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता असो, अशा सर्वच बाबतीत  ’इस्रो’चे शास्त्रज्ञ गाजावाजा न करता ज्या वेगाने काम करीत आहेत, ते प्रशंसनीय आहे. अमेरिकेने अंतरिक्ष युद्धाची शक्यता गृहीत धरून या युद्धासाठी लष्कराची वेगळी तुकडी तयार करण्याचीही तयारी चालविली आहे. कारण, भविष्यातील युद्धे तंत्रज्ञानावर आधारित असतील, आपण ही क्षमता वेळेत विकसित केली नाही, तर आपण या दृष्टीने खूप पिछाडीवर राहू शकतो. अशा परिस्थितीत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भारत जो इंडोस्पेसएक्स  या नावाने आभासी अंतराळ युद्धाभ्यास करणार आहे, त्याचे महत्व लक्षात येते. ही एकप्रकाराची स्पर्धा आहे जी सिम्युलेटरचा वापर करून कंप्युटरद्वारे खेळली जाणार. त्यात लष्करी आणि वैज्ञानिक समुदायातले सर्व भागधारक सहभागी होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड डिङ्गेन्स स्टाङ्ग याच्या अधीन हा युद्धाभ्यास असणार आहे. यात हवाईदल, नौदल, भूदलाचे अधिकारी सहभागी असणार आहेत.  या अभ्यासाचा मुख्य उद्देश म्हणजे आपली राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे होय. तचेस अंतराळात काउंटर स्पेच क्षमतेचे मोजमाप करणे हे होय, यामुळे आपल्या सशस्त्र दलाची विश्वासार्हता वाढणार आहे तसेच राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होणार आहे. इंडोस्पेसएक्समुळे अंतराळातील आव्हाने समजून घेण्यात मदत मिळणार आहे.
     भारत मागील बर्‍याच वर्षांपासून अंतराळ तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करीत आहे. आजवर चीनने दळणवळण, पृथ्वीनिरीक्षण अशा विविध शंभर उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे; भारत त्याबाबतीत चीनच्या पिछाडीवर आहे. चीनने त्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला (समुद्रात एका जहाजावरून ७ सॅटेलाइट लॉंच)  ६ जून रोजी  लॉंच केले आहे. भारत सध्या अन्य काउंटर-स्पेस क्षमतेला विकसीत करण्यासाठी काम करीत आहे.  भारताने ‘मिशन शक्ती’द्वारे २७ मार्चला पृथ्वीच्या कक्षेत २८३ किमी उंचीवरील ७४० किलोग्रामच्या मायक्रो-आर उपग्रहाला नष्ट करणारे १९ टन वजनाचे इंटरस्पेस-एक्स मिसाईल लॉन्च केले होते. यामुळे भारताची अंतराळ महाशक्ती म्हणून नोंद झाली आणि भारत अशी क्षमता प्राप्त करणारा जगातील चौथा देश बनला. यापूर्वी अमेरिका, रशिया, चीनने ही क्षमता प्राप्त केली होती. अशाप्रकारे या क्षेत्रातील भरारीसाठी भारताची सिद्धता झाली आहे, तथापि भारताला अंतराळात विरोधकांची टेहळणी, दळणवळण, क्षेपणास्त्रांचा पूर्व इशारा आणि अचूक लक्ष्यवेध यात नैपुण्य मिळविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत इंडोस्पेसएक्स आपल्याला अंतराळातील रणनीतीक आव्हाने योग्यरित्या उमगण्यास मदतगार ठरणार आहे. भविष्यात ज्याच्या ताफ्यात अंतराळ युद्ध जिंकण्याचे ब्रम्हास्त्र असेल तोच जगावर राज्य करणार आहे, हे यातून लक्षात येते.
      भविष्यात युद्ध पारंपरिक युद्धांपेक्षा वेगळी अंतराळ सामर्थ्यावरअवलंबून असणार आहेत. त्यादृष्टीने भारताची भक्कम पावले पडत आहेत. अंतराळ आणि त्याच्याशी निगडित तंत्रज्ञानाबाबतीत भारत स्पेस इंडस्ट्रीमध्ये जगातील काही निवडक देशाच्या दबदब्याला आव्हान देत आहे. ए सॅट क्षेपणास्त्रांच्या क्षमतेचे प्रदर्शन आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार्‍या आभासी अंतराळ युद्धाभ्यासाने  हे आव्हान अधिकच कडवे बनले आहे. २०१८ मध्ये स्पेस इंडस्ट्रीचा आकार ३६० अब्ज डॉलर्सचा होता, तो २०२६ मध्ये ५५८ अब्ज डॉलर्सचा होईल. भारताची स्पेस मोहीम चालवणारी सरकारी संस्था इस्रोचा जवळजवळ ३३ देशांच्या बहुराष्ट्रीय संस्थांबरोबर स्पेस प्रोजेक्टबाबत करार आहे आणि ती जगभरच्या अंतराळ मोहिमांसाठी लॉंचपॅड उपलब्ध करुन देणारी संस्था ठरली आहे. इस्रोची ही यशाची उंचावती कमान भारतीय संरक्षणसिद्धतेसाठी पुरक ठरत आली आहे. अंतराळ संरक्षण सिद्धता हवाईदल इस्रोच्याच सहकार्याने करणार आहे. जल, जमिनीवरील संरक्षण सिद्धता कधीच झाली आहे. अंतराळातही भारताचा दबदबा वाढत आहे. त्यामुळे यापुढे भारताकडे वाकडे डोळे करुन पाहण्याची कोणाचीच हिम्मत होणार नाही, हे नक्की!