सोमवार, २७ मार्च, २०१७

राज्याच्या राजकीय भूकंपाच्या केंद्रबिंदूत तडजोडीचं स्थैर्य

 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


    रायगड जिल्ह्याचा इतिहास महाराष्ट्र सरकारमध्ये भूकंप घडविणारा राहिला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू रायगड जिल्हा परिषद राहिला असून शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी आणाभाकांतील अस्थैर्य या भूकंपाचे कारण राहिले आहे. नंतरच्या काळात या आणाभाकांचे जोडीदार दोन्ही पक्षांनी बदलले. राज्याचे सत्ताकारण असो वा जिल्ह्याचे, कोणी आपल्या आणाभाकांवर ठाम नसताच, त्यामुळे याचे नवल नाही. त्यामुळे शिवसेना असो, कॉंग्रेस असो, शेकाप असो वा राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप यांच्यात केव्हा काय घडेल याचा अंदाज ब्रह्मदेवालाही बांधता येणार नाही. त्यामुळे आघाडी धर्म पाळला नाही, म्हणून २००२ साली तत्कालिन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री सुनील तटकरे यांना शेकापने मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला होता, त्याच सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना २०१७ साली आघाडीधर्म पाळून शेकापने अध्यक्षपदी आणि माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे पुत्र ऍड. आस्वाद पाटील या मुरब्बी युवानेत्याला उपाध्यक्षपदी बसवले आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शेकापला आघाडी धर्माचे कोणते कोणते ‘गीफ्ट’ भविष्यात देईल हे पहायचे. एक मात्र खरे, सुनील तटकरे यांनी १९९२ साली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाल्यावर या खुर्चीवर त्यावेळी ४ वर्षांची असलेली कन्या आदिती हिलाही बसवायचेच असे स्वप्न पाहिले. ते स्वप्न त्यांनी २५ वर्षांनी पूर्ण केले. त्यामुळे ते आता कोणत्याही त्यागाला तयार असतील यात शंका नाही. 
       २९१७ च्या जिल्हा परिषदचे वैशिष्ट्य म्हणजे आता हे सभागृह तरुणांचे झाले आहे. नेतृत्व घराणेशाहीचं असलं तरी आता घराणेशाही सर्व क्षेत्रात आली आहे. गायकाचा मुलगा गायक होतो, नटाचा मुलगा नट होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, अगदी शिक्षकाचा मुलगाही शिक्षक होतो, (अपवाद फक्त पत्रकाराचा, पत्रकाराचा मुलगा पत्रकार होऊन फकिरी पत्करत नाही.) त्यामुळे या घराण्याच्या वारशाला नाकारण्यात अर्थ नाही. पण या घराणेशाहीला राजेशाहीचा वास येऊ लागला आहे. तसेच आजच्या निवडणुका खर्चिक झाल्या आहेत, त्यामुळे लोकशाहीचा लौकिक वाढविणार्‍या निवडणूक प्रक्रियेत सर्वसामान्यांना सहभागी होणे शक्य राहिलेले नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीच्या देदीप्यमान मार्गाने अनेक सामान्य कुटुंबातील तरुण राजकारणात आले आणि उच्चस्थानी पोहोचले. पण आज मात्र सामान्य कुटुंबातील तरुण राजकारणात सर्वोच्च स्थानी पोहोचू शकत नाही अशी व्यवस्था झाली आहे. राजकीय घराण्यांची अभेद्य अशी फळी या सामान्य कुटुंबातील तरुणांची वाट अडवून आहे. रायगड जिल्हा परिषदेत हे चित्र सुरुवातीच्या कालखंडात दिसून आले नाही. पण कालांतराने राज्यात ते जिल्ह्यात, असे चित्र तयार झाले. निवडणुका पैशांच्या जोरावर जिंकल्या जाऊ लागल्यावर घराणेशाही आली आणि राजकीय घराणी उदयास आली. तोर्यंत हिंदुस्थानी शास्त्रीय गायनामधील किराणा, आग्रा, जयपूर, ग्वाल्हेर अशी संगीत घराणी माहीत होती. नंतर राजकीय घराणी माहिती झाली. राजकारण हे प्रत्येक क्षेत्रात शिरलं. खेळ, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र सर्वत्र राजकारण शिरलं. राजेशाहीतील राजकारणात वापरायची ‘साम-दाम-दंड-भेद’ ही अस्त्रे चाणक्याने सांगितली आहेत. त्याचा वापर लोकशाही राजकारणातही होऊ लागला. लोकशाहीत वेगळे राजकारण अपेक्षित होते, पण ते ‘साम-दाम-दंड-भेद’ यावरच आधारित राहिले, हेही कारण लोकशाहीचे राजेशाहीकरण होण्यामागे आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी निवडणुकीतही गेल्या काही वर्षांत साम-दाम-दंड-भेद याचाच अधिक बोलबाला झाला आहे.
      १९६२ रोजी त्रिस्तरीय पद्धतीचा स्वीकार महाराष्ट्र शासनाने केला. सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची स्थापना झाली. कुलाबा जिल्हा परिषदेचीही स्थापना झाली. कुलाबा जिल्ह्याच्या मुख्यालयाचा वाद अनिर्णित असल्याने अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी इ. कार्यालये अलिबागला तर शिक्षण व आरोग्य खाती पेणला अशी वाटणी करण्यात आली. समुद्र किनार्‍यावरची स्कूल बोर्डाची इमारत जि.प.साठी घेण्यात आली. ती इमारत अपुरी पडत असल्याने गावात इतरत्र भाड्यांच्या इमारतीमध्ये काही खात्यांची कार्यालये थाटण्यात आली. पेणच्या शेतकरी सदनात शिक्षण खात्याच्या कार्यालयाचे काम सुरु झाले. तेव्हाच्या कुलाबा जि.प.चे पहिले अध्यक्ष होण्याचा मान कॉंग्रेसचे नेते केशवराव गोविंद तथा दादासाहेब लिमये यांना मिळाला. त्यांनी १५ ऑगस्ट १९६२ ते २९ सप्टेंबर १९६७ असा कारभार केला.
       मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जात असल्यामुळे सुरुवातीपासूनच तत्कालिन कुलाबा जिल्हा परिषदेवर म्हणजेच रायगड जिल्हा परिषदेवर वर्चस्व गाजवण्यासाठी कॉंग्रेस, शेकापची धडपड राहिली. सत्ता आलटून पालटून कॉंग्रेस-शेकापच्या हातात राहिली. तोपर्यंत आघाडी-युतीचे सत्ताकारण सुरु झाले नव्हते. यात पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोन लागले. स्पर्धा वाढली. आघाडी-युतीचे पर्व सुरु झाले आणि तत्वनिष्ठ राजकारणाची होळी झाली. पण सुरुवातीच्या काळात कॉंग्रेसचे नेते केशवराव गोविंद तथा दादासाहेब लिमये (१२ ऑगस्ट १९६२ ते २९ सप्टेंबर १९६७), शेकापचे तुकाराम हरी वाजेकर (३० सप्टेंबर १९६७ ते २९ सप्टेंबर १९७२), कॉंग्रेसचे हुसेन महंमद वांगारे (३० सप्टेंबर १९७२ ते २५ जानेवारी १९७९), शेकापचे प्रभाकर पाटील (१८ जून १९७९ ते ३० जून १९९०) यांनी  जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेची आपल्या कार्यशैलीने वेगळी उंची वाढवली. तो काळ सीमित साधन सुविधांचा होता. रायगडच्या विकासाची किल्ली अशा प्रतिकूल परिस्थितीत या अध्यक्षांनी फिरवली. त्यात  १९७९ ते १९९० अशी अकरा वर्षे अध्यक्षपद भूषविलेल्या प्रभाकर पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. कारण रायगड जिल्हा परिषदेची शिवतीर्थ ही इमारत त्यांच्या कार्यकतृत्वाचे चिरंतन उदाहरण आहे.
   
 
      १८ जून १९७९ साली प्रभाकर पाटील यांनी तत्कालिन कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जि.प.ची सर्व खाती अलिबागलाच असावी, असा शासनाचा निर्णय झाला. जिद्दी स्वभावाच्या प्रभाकर पाटील यांनी ऑगस्ट १९७९ मध्ये शिक्षण व आरोग्य खात्याची कार्यालये अलिबागला आणली. अलिबागला सर्व कार्यालये आल्याने जागेचा प्रश्‍न अधिकच जटील झाला. जिल्हा परिषदेचा पैसा मोठ्या प्रमाणावर भाड्यापायी जात होता. जि.प.कडे सुसज्ज सभागृह नव्हते, या सर्वांची खंत प्रभाकर पाटील यांना होती. त्यामुळे १९८२-८३ मध्ये जि.प.ची जुनी इमारत पाडून त्या भूखंडावर नवीन वैभवशाली इमारत बांधायचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा आर्थिक विवंचना असूनही प्रभाकर पाटील यांनी अलिबागेत जिल्हा परिषदेची भव्य दिव्य वास्तू उभारण्याचा संकल्प सोडला आणि भूमीपूजनही केलं. अलिबागमध्ये जिल्हा परिषदेची इमारत ही मुंबईच्या मंत्रालयाची छोटी प्रतिकृती असेल असेही त्यांनी जाहीर केले. सद्य:परिस्थिती पाहता ही इमारत पूर्ण होणारच नाही असं अनेकांना वाटायचं. प्रभाकर पाटील मात्र जिद्दीने कामाला लागले. अखेर १९८५-८६ मध्ये त्यांचे स्वप्न साकार झाले. रायगड जि.प.च्या अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटण्यासारखी सुसज्ज इमारत, सभागृह, समिती कक्ष इत्यादीची निर्मिती झाली. कर्मचार्‍यांना, अधिकार्‍यांना, पदाधिकार्‍यांना बसायला ङ्गर्निचर, खोल्या मिळाल्या. सर्व विभाग एकमेकांशी इंटरकॉमने जोडले गेले. कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी चांगल्या उपहारगृहाची व्यवस्था देखील झाली.
प्रभाकर पाटील १८ जून १९७९ ते ३० जून १९९० असे ११ वर्षे अध्यक्षपदी होते. याच काळात १९८२ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री बॅ.अ.र. अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे केले. त्यानंतर कॉंग्रेस सरकारने १ जुलै १९९० रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदा बरखास्त करुन टाकल्या आणि सर्वत्र प्रशासकीय राजवट जारी केली. रायगड जिल्हा परिषदेवर १ जुलै १९९० ते २० मार्च १९९२ अशी प्रशासकीय राजवट लागू झाली. प्रशासकीय राजवट २३ मार्च १९९२ ला संपुष्टात आली आणि जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेस सत्तेवर आली. कॉंग्रेसचे सुनील तटकरे हे अध्यक्ष झाले. ते या पदावर २३ मार्च १९९२ ते २१ मार्च १९९५ या काळात कार्यरत होते. याच दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्यासह सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्या मीनाक्षी पाटील, विवेक पाटील हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. सुनील तटकरे आमदार झाल्याने तत्कालिन उपाध्यक्ष प्रकाश धुमाळ यांनी २३ मार्च १९९५ ते २१ जून १९९५ असे ३ महिने प्रभारी अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला.
        प्रभाकर पाटील यांच्या जिद्दीने उभ्या राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीत १९९२ ते २०१७ या तत्कालिन कॉंग्रेसचे सुनील तटकरे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आदिती सुनील तटकरे यांच्या अध्यक्षपदादरम्यान कॉंग्रेसचे अनंत सुदाम पाटील (२३ जून १९९२ ते २२ जानेवारी १९९६), कॉंग्रेसचे बंडखोर (शेकापचा पाठिंबा) रमेश डाऊर (१९ फेब्रुवारी १९९६ ते २० मार्च १९९७), कॉंग्रेसचेे (कॉंग्रेस-शेकाप आघाडी) विठ्ठल लोहकरे (२१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८), कॉंग्रेसचे (कॉंग्रेस-शिवसेना आघाडी) अब्दुल सत्तार अंतुले (२१ मार्च १९९८ ते २० मार्च १९९९), शेकापच्या (शेकाप-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी) सुप्रिया जयंत पाटील (२१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२), शिवसेनेच्या (राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस, शिवसेना आघाडी) अपेक्षा कारेकर (२१ मार्च २००२ ते १७ फेब्रुवारी २००५), शेकापचे (शेकाप-शिवसेना आघाडी) बाळाराम पाटील (१८ फेब्रुवारी २००५ त २० मार्च २००७), शेकापच्या (शेकाप-शिवसेना आघाडी) निलिमा पाटील (२१ मार्च २००७ ते २९ नोव्हेंबर २००९), शेकापचे (शेकाप-शिवसेना आघाडी) विद्यमान आमदार पंडितशेठ पाटील (३० नोव्हेंबर २००९ ते २० मार्च २०१२), शेकापच्या (शेकाप-शिवसेना-आरपीआय महाआघाडी) कविता गायकवाड (२१ मार्च २०१२ ते २० सप्टेंबर २०१४), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (राष्ट्रवादी कॉंग्रेस-शेकाप आघाडी) सुरेश टोकरे (२१ सप्टेंबर २०१४ ते २१ मार्च २०१७) यांनी अध्यक्षपद भूषविले आहे.
       १९९७ साली त्यावेळी युती सरकारने ७२ व्या राज्य घटनेच्या दुरुस्तीनुसार अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करुन अध्यक्षपदाचा कार्यकाल १ वर्ष असा केला होता. १९९९ मध्येच शरद पवार यांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली. सुनील तटकरे शरद पवार यांच्या सोबत राहिले. याच वर्षी राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसं पहिलं आघाडी सत्तेवर आलं. या सरकारमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा सहभाग होता. यावेळी सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यकाल एक वर्षांऐवजी अडीच वर्षे केला होता. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री सुनील तटकरे यांनी शिवसेनेला हाताशी धरून २००२ साली रायगड जिल्हा परिषदेतील शेकापला बाजूला सारुन राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता आणली. शिवसेनेच्या अपेक्षा कारेकर जिल्हा परिषद अध्यक्ष बनल्या. आघाडीधर्म न पाळता प्रतिगामी पक्षाशी राष्ट्रवादीने हातमिळवणी केली, हा अपमान सहन न झाल्याने विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व तत्कालिन मंत्री सुनील तटकरे यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा तरच शेकाप पुन्हा सत्तेत सहभागी होईल, असा इशारा दिला. शेकापच्या पाठिंब्यावर सरकार तरलं होतं. सरकार टिकवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सामंजस्य दाखवून सुनील तटकरे यांचा राजीनामा घेऊन त्यांना काही काळ मंत्रीपदावरून दूर केले आणि शेकापच्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन तो पेच सोडवला. गमतीचा भाग म्हणजे पुढे शिवसेनेबरोबर शेतकरी कामगार पक्षाने आघाडी केली, नंतर आघाडी तोडली, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी केली. आघाड्या-बिघाड्या यांचे नंतर नवल राहिले नाही. परंतु एक मात्र खरे की या रायगड जिल्हा परिषदेने देशाला खासदार आणि राज्याला उमदे आमदार, मंत्री पुरविले आहेत.
       असा इतिहास असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सभागृहात पुन्हा एकदा युवा वर्गाचा वावर सुरु झाला आहे. ज्या सुनील तटकरे यांनी घड्याळाच्या गजरात शेकापचा अध्यक्ष नाकारुन रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष बसविला, त्याच सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना शेकापने राजिपच्या अध्यक्षपदी बसविले आहे. यामागे निश्‍चितच वेगवेगळी समीकरणे आहेत. कोणी कोणावर उपकार करीत नसतो. भविष्यातील राजकीय वळणे याची प्रचिती देतीलच. पण आदिती तटकरे यांची अध्यक्षपदी आणि ऍड. आस्वाद पाटील यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड ही नवे युवायुग निर्माण करणारी ठरली आहे. त्यांच्या हाती रायगडच्या विकासाची चावी असली तरी सुत्रे वेगळ्याच लोकांच्या हाती असणार आहेत. शेवटी ही आघाडीची सत्ता आहे. या आघाडीत कॉंग्रेसही आहे. जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला अध्यक्षपद-उपाध्यक्षपद निवडणुकीत बोलल्याप्रमाणे कोणताही चमत्कार करता न आल्याने ती विरोधी बाकावर आहे. यावेळी भाजप तठस्थ राहिला. शेकाप-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीकडे बहुमत आहे.  कोणतीही कटुता न आणता या तरुण मंडळींनी काम करायचे आहे. जिल्हातील जनतेचा विश्‍वास जिंकायचा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांमध्ये निश्‍चितच ती धमक आहे. ही धमक लोककल्याण आणि जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार निपटण्यात दाखवली तर निश्‍चितच रायगडकरांना या युवा नेतृत्वाचा अभिमान वाटेल. इतकेच. 

सोमवार, २० मार्च, २०१७

डोलवीच्या जेएसडब्ल्यूचा पर्यावरणाला फास

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉    



      पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू इस्पात इस्पात स्टील लि. कंपनीच्या प्रदूषणाच्या विळख्यात आजूबाजूची १० किमी परिघातील सर्व गावे सापडली आहेत आणि त्यांची प्रचंड घुसमट सुरु आहे. ही घुसमट त्यांनी मोठ्या प्रमाणात व्यक्त करु नये म्हणून कंपनीने आपल्या सीएसआर फंडाचे शिंतोडे या परिसरावर उडवून आपण मोठे सामाजिक काम करीत असल्याचे भासवत आहे. मुळात असा निधी खर्च करणे हे नव्या कंपनी कायद्यानुसार  उद्योगजगतावर बंधनकारक आहे. त्यामुळे हे सर्व करुन जेएसडब्ब्यू काही या परिसरावर उपकार करीत नाही. या कंपनीमुळे या परिसरातील हवा, आकाश आणि पाणी प्रदूषित झाले आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हे कधीही भरुन न येणारे पर्यावरणाचे नुकसान आहे. इतकेच नव्हे तर येथील भूमीपुत्रांची खाडीआधारित उपजीविकेची व्यवस्थाच मोडीत काढण्यात आली आहे. येथील मत्स्यवैविध्य, पक्षीवैविध्य नष्ट झाले आहे आणि भातशेतीलाही ग्रहण लागले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ थंड आहे. त्यामुळे व्यवस्थेत नेमके षंढ कोण आहे? हा कुतुहलाचा प्रश्‍न आहे.
     या इस्पात स्टील कंपनीचे मालक बदलत आलेत, पण त्यांनी निर्माण केलेल्या समस्या मात्र कायम आहेत.  १९९१ साली मित्तल उद्योग समुहाच्या ‘निप्पॉन डेन्रो इस्पात लिमिटेड’ या कंपनीने  डोलवी येथे आपला कारखाना उभारायला सुरुवात केली. लोखंडावर आवश्यक असणार्‍या सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी, एकात्मिक रितीने केल्या जाव्यात यासाठी डोलवीचा कारखाना महाकाय स्वरुपाचाच उभारण्यात आला. काही काळाने या कारखान्याच्या भागीदारीत बदल झाल्याने त्याचे नाव ‘इस्पात इंडस्ट्रीज लिमिटेड’ असे झाले. या कंपनीचा स्पॉंज आर्यन प्रकल्प १९९४ साली, तर स्टील प्लँट १९९९ साली सुरु झाला. २०१० साली या इस्पात इंडस्ट्रीजला जिंदाल उद्योग समुहाच्या जेएसडब्ल्यू स्टीलने खरेदी केलं आणि जेएसडब्ल्यू इस्पात स्टील लि. कंपनी असे ठेवले. हे झाले मालकी बद्दल. पण या कारखान्याची उभारणी ज्या बेमुर्वतखोरपणे झाली, तीच येथील पर्यावरण आणि आरोग्याची हानी करणारी ठरली.
     डोलवी गावातली जमीन विकत घेऊन हा कारखाना उभारण्यास सुरुवात झाली तेव्हा या भागात येणार्‍या अनेक कारखान्यांपैकी हा एक, असाच स्थानिकांचा समज झाला. सुरुवातीला कारखान्याच्या बांधकामात अनेकांना वेगवेगळी कंत्राटं मिळाली. शेकडो स्थानिक मजुरांना रोजगार मिळाला. पैसेही चांगले मिळाले. सगळ्यांच्या तोंडी विकासाकडे वाटचाल सुरू झाल्याची भाषा होती. पुढे कारखान्याने इथे स्वतंत्र धक्का (जेट्टी) बांधला. याच धक्क्यावरून कारखान्यापर्यंत एक ङ्गिरता पट्टाही (कन्व्हेयर बेल्ट) बांधला गेला. हे बांधकाम पूर्ण झालं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं, की धरमतर खाडीतून वाहून आणलेला कच्चा माल उतरवण्यासाठी हा स्वतंत्र धक्का बांधण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच ३००० ते ३५०० टन लोखंड वाहून आणणर्‍या मोठ्या बोटी (बार्जेस) धरमतर खाडीत दाखल झाल्या. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाला तेव्हा ३५,००० टनांच्या अजस्र बोटी न्हावाशेवा बंदरात दाखल होऊ लागल्या आणि त्यांनी आणलेलं खनिज लोखंड बार्जेसमधून धरमतर धक्क्यावर येऊ लागलं. या बोटींबद्दल कारखान्याने कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती किंवा सरकारनेही कोणती अधिसूचना काढली नव्हती. बोटी येण्यास सुरुवात झाल्यावर मच्छीमारांनी खाडीच्या मध्यभागी लावलेली जाळी तटातट तुटली. रोजच बोटींची ये-जा सुरू झाल्याने तिथे जाळी लावणं मच्छीमारांना अशक्य झालं. या खाडीतली मासेमारी प्रामुख्याने मधल्या खोल भागात चालायची. तिथे डोल लावणं अशक्य झालं. शिवाय या महाकाय बोटींसमोर छोट्या बोटींतून मासेमारी करायला जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखंच होतं. त्याचप्रमाणे बोटींच्या प्रचंड आवाजांमुळे माशांचे कळप दूर जाऊ लागले. खाडीत मासळी येणं बंद झालं आणि इथल्या मत्स्यव्यवसायाला ग्रहण लागलं. धरमतर खाडीत आणि उपखाड्यांतल्या मच्छिमारांवर मोठा अन्याय झाला. त्यांची उपजीविकाच हिरावली गेली. त्यांना अजून न्याय मिळालेला नाही.
     वास्तविक १९९१ साली कोस्टल रेग्युलेटरी झोन (सीआरझेड) या कायद्याच्या तरतुदी अधिक कडक करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पर्यावरणाबरोबर देशाचे संरक्षण व सीमा सुरक्षिततेचाही विचार होता. या कायद्यानंतर किनारी क्षेत्राच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्याचे निरनिराळे वर्ग पाडण्यात आले आहेत धरमतर खाडी ही सीआरझेड वर्ग १ मध्ये मोडते. वर्ग १ च्या क्षेत्रात उधाणाच्या भरती रेषेपासून ५०० मीटर अंतरामध्ये कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसते (पारंपरिक कच्च्या घरांना फक्त त्यातून सूट मिळते.) कंपनीने तर आपला धक्का आणि अवडज यंत्रसामुग्री खाडीच्या काठावरच उभारली होती आणि सीआरझेड कायद्याचे सरळसरळ उल्लंघन केले होते.  धरमतर खाडी सीआरझेड वर्ग १ मध्ये होती याचे एक कारण खाडीच्या दोन्ही बाजूला असणारी खारफुटीची विस्तृत जंगले (मॅनग्रोव्हज). खारफुटीची जंगले हा एक अतिशय नाजूक असा पर्यावरणाचा ठेवा मानला जातो. या जंगलामुळे खाडीचे तर रक्षण होतेच, पण खाडीमधल्या गुंतागुंतीच्या जैविक सृष्टीचेही पोषण होते. खाडीचा उपयोग खनिज वाहतुकीसाठी होऊ लागल्याने खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले.  धक्का आणि फिरता पट्टा बांधताना कंपनीने या वनस्पतींची बेसुमार तोड केली. तसेच कंपनीसाठी भराव टाकताना खाडीला मिळणारे अनेक ओढे-नाले बुजवले. आजूबाजूचे सीआरझेड क्षेत्रातील खारफुटीचे जंगलही नष्ट केले.  खारफुटीची जंगले ही माशांची अंडी घालण्याची ठिकाण. ती नष्ट होऊ लागल्यामुळे माशांचे पुनरुत्पादन थांबले. खाडीतील प्रंचड बोटीच्या वर्दळीने निर्माण झालेल्या प्रचंड लाटांनी बाहेरकाठे फुटून भरतीचे खारे पाणी आजूबाजूंच्या गावात, भातशेतीत शिरु लागले. या परिसरात हवेचे आणि पाणी प्रदूषण वाढले. हे प्रदूषण आजही कायम आहे. 
    आज जर कोणी अलिबागहून मुंबईला निघाले तर धरमतरवरुन जाताना प्रदूषण म्हणजे काय असते याची जाणीव होते. एसटीमध्ये असाल अथवा मोटार सायकलमधून जात असाल तर तेथील हवेतील बदल चटकन जाणवतो. कपड्यावर आणि चेहर्‍यावर जेएसडब्ल्यू इस्पात इस्पात स्टील लि. कंपनीच्या कारखान्यातील लोहमिश्रित धूळ बसते आणि चेहरा व कपडे काळे बनतात. एक उग्र वास सतत तेथे पाठलाग करतो. हा वास मळमळ, उलटी अशा प्रकारांना आवाहन करतो. हा तेथून प्रवास करणार्‍यांना जाणवणारा नेहमीचा प्रकार आहे. तेथे काम करणार्‍यांची कशाप्रकारचे सुरक्षा होत असेल हा कुतुहलाचा प्रश्‍न आहे. पण आजूबाजूच्या गावांना मात्र या कारखान्यातून होणार्‍या प्रदूषणाचा त्रास कायम आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या या भयानक प्रदूषणामुळे या परिसरातील नागरिकांना दमा, खोकला यांसारख्या विविध प्रकारच्या श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. कंपनीच्या प्रदूषणामध्ये हवेतून लोहमिश्रीत धूळ बाहेर पडत असल्याने त्याचा या परिसरातील भातशेतीवर देखील विपरित परिणाम होऊ लागला आहे. अशा प्रकारे या कंपनीने जनतेच्या जीवनाशी खेळ मांडलेला आहे. तरीदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करतेय. त्यामुळे शासनाने या कंपनीवर कारवाई करावी व डोलवी परिसरात प्रदूषण मापक यंत्र बसवावे अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. उघड उघड प्रदूषणाचा वेढा असताना कंपनीनेने आपल्या संवेदना जागृत असल्याचे दाखवत खारफुटी व वृक्ष लागवडीची नाटकं चालवली आहेत. सीएसआर फंडाचा शिडकावा करुन आपण आजूबाजूच्या गावातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्‍न सोडवत आहोत असा आव आणला जात असला तरी वस्तुस्थिती भीषण आहे. ही भीषण परिस्थिती सरकारची दोन तपे दिसून येत असलेली अनास्था, कंपनीचा बेमुर्वतखोरपणा व जनतेतीलच काही स्वार्थी लोकांमुळे निर्माण झाली आहे. यामगच्या राजकीय ‘अर्थ’शास्त्रामुळे या परिसराचं पर्यावरण आणि स्थानिकांच्या जीवनयापनाची घडी विस्कटली आहे. जेएसडब्ल्यूचे धरमतर-डोलवी परिसरात पर्यावरण शास्त्राचा विचार न करता जे साम्राज्य उभे आहे, त्याचा पायाच चुकलेला आहे. हे झालेले नुकसान भरुन न येणारे आहे. पण पुढे हे नुकसान होऊ नये म्हणून ठोस कृती केली जाणार आहे की नाही? या परिसरात प्रदूषणरोधक यंत्रणा बसवून येथील जनतेला मोकळा श्‍वास घेता येणार आहे की नाही? कंपनीच्या अनेक कच्च्या दुव्यांबद्दल सविस्तर लिहिता येणे शक्य आहे, पण गेंड्याच्या कातडीसारख्या निबर झालेल्या या कंपनीमध्ये खर्‍याखुर्‍या संवेदना जाग्या करण्यासाठी तूर्तास हा शब्दांचा मार पुरेसा आहे. इतकेच.

सोमवार, १३ मार्च, २०१७

आश्रमशाळा नव्हे, अव्यवस्थेचा खुळखुळा!

  -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉  


    आदिवासी मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, याच हेतूने सरकारने राज्यभरात आदिवासींच्या मुलांसाठी आश्रमशाळा सुरू केल्या. पण, काही आश्रमशाळा सोडल्यास या आश्रमशाळांचा कारभार मात्र आदिवासी मुला-मुलींच्या कल्याणाचा राहिलेला नाही. सरकारच्या आश्रम शाळांतही मुला-मुलींची हेळसांड झाल्याच्या अनेक घटना चव्हाट्यावर यापूर्वी आलेल्या आहेत. गेल्या पंधरा वर्षात सरकारी आणि अनुदानित आश्रमशाळातील अकराशे विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मृत्यू सर्पदंश आणि आजाराने झाले आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले आहे. रायगड जिल्ह्यातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. २०१७ च्या जानेवारी महिन्यात खालापूर तालुक्यातील डोलवली येथील आश्रमशाळेत ११ वर्षांच्या यमुना वासुदेव खोडके या आदिवासी मुलीच्या झालेल्या मृत्यूचे कारण अजूनही समोर आलेले नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना अनास्था, लैंगिक शोषण, अनारोग्य, मृत्यू यांना सामोरे जायला लावणार्‍या आश्रमशाळा या अव्यवस्थेचा खुळखुळाच आहेत, हे सिद्ध होते.
     राज्यातील चौदा आदिवासी जिल्ह्यांत जवळपास एक कोटीहून अधिक आदिवासी लोकसंख्या आहे. या आदिवासींमध्येही ४५ जातीजमाती असून या आदिवासींची बहुतेक मुले ही शासकीय व अनुदानित आश्रमशाळांत शिकत असतात. सरकारच्या ५२९ आश्रमशाळात १ लाख ९१ हजार मुले आणि ९४ हजार मुली शिकतात. तर अनुदानित ५५६  आश्रमशाळात २ लाख मुले आणि १ लाख ५० हजार मुली शिकतात. सरकार अनुदानित आदिवासी आश्रमशाळांना दरवर्षी ५०० कोटी रुपयांचे अनुदान देते. प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीमागे सरकार दरमहा ९०० रुपयांचे अनुदान संस्था चालकांना देते. अशाप्रकारे आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांसाठी सरकार दरवर्षी ७०० कोटी रुपयांचा खर्च करते. तरीही या आश्रमशाळांत शिकणार्‍या लाखो विद्यार्थ्यांना दयनीय जीवन जगावे लागत असून या मुलांना पुरेशा आरोग्याच्या, आहाराच्या तसेच शिक्षणाच्याच्या सुविधाही मिळत नसल्याने गेल्या तीन वर्षांत या आश्रमशाळांत वर्षाला १५० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून २००१ ते २०१६ या पंधरा वर्षांच्या कालावधीत एकूण १०७७ आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत. रायगड जिल्हातही यापेक्षा काही वेगळा प्रकार दिसत नाही. खालापूर तालुक्यातील डोलवली येथील आदिवासी आश्रमशाळेत २०१७ च्या जानेवारी महिन्यात ११ वर्षांच्या यमुना वासुदेव खोडके या आदिवासी मुलीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अहवाल घटनेला दीड महिना झाला तरी अजूनही आला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे संबंधित आदिवासी विकास विभागही या मृत्यू प्रकरणाबाबत गंभीर नाही. गेल्या वर्षी याच आश्रमशाळेतील त्रासाला कंटाळून सोमनाथ वाघमारे या १२ वर्षांच्या विद्यार्थ्याने रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. मात्र, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे या विद्यार्थ्याचा जीव वाचला. पण यमुना खोडके या आदिवासी मुलीच्या वाट्याला जीव वाचण्याचे भाग्य आलेच नाही. जिल्ह्यातील आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी कर्जत तालुक्यातील भालीवाडी मुलींच्या आश्रमशाळेत अशीच घटना घडली होती. रसायनी आणि नागोठणे येथे अशा घटना घडल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रामुख्याने अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाच्या घटना सातत्याने घडतच असतात.  
    रायगड जिल्ह्यात २०११ च्या जनगणणेप्रमाणे आदिवासी लोकसंख्या ३ लाख ५ हजार १२५ आहे. लोकसंख्येच्या मानाने शिक्षणाचे प्रमाण लक्षणीय नसले तरी आदिवासींमध्ये शिक्षणाचा रस वाढला आहे. हे जिल्ह्यातील आश्रमशाळांतील त्यांच्या संख्येवरुन लक्षात येते. कर्जत तालुक्यात ५ (पाथरज, चाङ्गेवाडी, भालिवडी, पिंगळस व कळंब) शासकीय आश्रमशाळा, पेण ३ (वरसई, सावरसई व वरवणे),  अलिबाग १ (कोळघर), रोहा १ (सानेगाव), खालापूर १ (डोलीवली), सुधागड तालुक्यामध्ये १ (नेनवली), माणगाव १ (नांदवी) आणि पनवेल १ (साई) अशा एकूण १४ शासकीय शासकीय आश्रमशाळांमध्ये ५६६७ आदिवासी विद्यार्थी शिकत आहेत. 
   कर्जत तालुक्यामध्ये १ (माणगाववाडी), पनवेल २ (चिखले आणि वाकडी),  सुधागड ३ (वावळोली, चिवे आणि पडसरे), पेण १ (रानपाखरं), उरण १ (चिरनेर), खालापूर १ (उंबरे), माणगाव १ (उत्तेखोल), महाड  १ (तळोशी) अशा एकूण ११ अनुदानित आश्रमशाळांमध्ये ५२५० आदिवासी विद्यार्थी शिकत आहेत. तसेच पेण तालुक्यामध्ये २ (पेण मुलाचे व मुलींचे),  पनवेल ३ (पनवेल मुलांचे जुने, मुलांचे नवीन व मुलींचे), सुधागड-पाली  २ (मुलांचे व मुलींचे), कर्जत ३ (नेरळ मुलांचे, नेरळ मुलींचे व कर्जत मुलांचे), महाड १ (मुलांचे), अशा एकूण ११ शासकीय वसतीगृहांमध्ये ११०२ पेक्षा अधिक आदिवासी विद्यार्थी राहत आहेत.
    अशाप्रकारे जिल्ह्यात आदिवासींमध्ये शिक्षणाबाबत जागरुकता वाढत असतानाच त्यांच्यामध्ये असुरक्षिताही वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे, ते अतिशय चिंताजनक आहे.  पनवेल येथील कल्याणी महिला व बाल सेवा संस्थेच्या आश्रमशाळेत २०१० मध्ये पाच मतिमंद मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर २०१४ मध्ये कर्जत  तालुक्यात चंद्रप्रभा चॅरिटेबल ट्रस्टच्या खासगी आश्रमशाळेत मुले आणि मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. २०१६ मध्ये रसायनीजवळील चांभार्ली येथील शांती अनाथालय आश्रमातील ८ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याने जिल्हा हादरला होता. या घटना उघडकीस आल्यामुळे कळल्या. याचा अर्थ अशाप्रकारच्या घटना या आश्रमशाळांत सर्रास घडत आहेत. जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांतील १३६ पदे रिक्त असून यात मुख्यतः स्त्री अधीक्षका, अधीक्षक ही महत्वाचे पदे रिक्त आहेत. प्रामुख्याने या आश्रमशाळांतील मंजूर महिला अधीक्षकपदे भरण्याबाबत उदासिनता दाखवली जात आहे. हीच उदासिनता अनेक पातळ्यांवर दाखवली जात असल्यामुळे आश्रमशाळांतील आदिवासी मुलींच्या शोषणाला मोकळी वाट मिळाली आहे. या आश्रमशाळा तेथील मुला-मुलींच्या लैंगिक शोषणाची केंद्रे झाली आहेत. अशा परिस्थितीत आदिवासी मुला-मुलींमध्ये असुरक्षितता निर्माण करणार्‍या घटनांमुळे त्यांच्यामध्ये शिक्षणाचा आलेख वाढेल का? की भितीचा आलेख वाढेल? याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. हा विषय या जिल्ह्यापुरताच मर्यादित नाही, तर तो राज्यस्तरिय आहे.
    आश्रमशाळांचे व्यवस्थापन कसे असावे, मुलांना चांगले शिक्षण कसे दिले जावे, यासाठी सरकारने ‘आदिवासी आश्रमशाळा संहिता’ ही १५० पानांची पुस्तिकाही प्रसिद्ध केली आहे. या संहितेत विद्यार्थ्यांना भोजन कसे असावे, इमारत कशी असावी, पिण्याचे पाणी यासह विविध तरतुदींबाबत नियमावली असली तरी, आश्रमशाळात शिकणार्‍या आदिवासी मुलींच्या संरक्षणाबाबत मात्र एकही ओळ नाही आणि ज्या तरतुदी आहेत, त्यांचेही पालन होत नाही. २० प्रकारचे आजार, व्यंग व आरोग्याबाबत प्रत्येक विद्यार्थ्यांची नियमित तपासणी होणे आवश्यक असते. परंतु ५०० ते ८०० विद्यार्थ्यांची तीही केवळ वर्षातून एकदा व त्यातही ३ ते ४ तासांत तपासणी उरकून टाकली जाते, हे वास्तव आहे. आश्रमशाळांत आरोग्य तपासणीबाबत असे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. आश्रमशाळांमधील मुलांच्या मृत्यूस आरोग्य तपासणीमधील निष्काळजीपणाही तितकाच कारणीभूत असतो, हे नाकारता येणार नाही. याबरोबरच आश्रमशाळांमधील गैरसोयीबाबत गंभीर मुद्दाही आहेच. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे निकृष्ट अन्न, अपुरी तसेच नादुरुस्त शौचालये, स्नानगृहे, पिण्याचे पाणी उपलब्ध नसणे, सर्पदंश, वैद्यकीय सुविधांचा अभाव आदी बाबींबरोबरच मुलींना नदी, ओढ्याच्या ठिकाणी उघड्यावर आंघोळ व शौचाला जावे लागणे, जेवणात चपाती आणि भाज्यांचा सर्रास अभाव असणे, अनेक ठिकाणी विजेअभावी अंधारात राहावे लागणे, वसतिगृहातील घाणीच्या साम्राज्यामुळे मुलांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागणे, हे नित्याचे झाले आहे. राज्यातील आश्रमशाळांत आदिवासी मुलां-मुलींच्या दुर्दैवाचे दिसून येणारे दशावतार रायगड जिल्ह्यातील आश्रमशाळांतही गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने दिसून आले आहेत. त्यामुळे सरकारने राज्यासह जिल्ह्यातील सर्वच सरकारी आणि अनुदानित खाजगी आश्रमशाळांची तपासणी अत्यंत कठोरपणे विशेष चौकशी समितीद्वारे करायला तर हवीच, पण आदिवासी मुलींच्या संरक्षणासाठी या आश्रमशाळात विशेष यंत्रणाही तातडीने निर्माण करायला हवी. महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलिसांकडून अशा आश्रमशाळांची तपासणी वेळावेळी होणे, आश्रमशाळातील मुला-मुलींना चांगले भोजन, आरोग्य सेवा मिळेल यासाठी सरकारने विशेष लक्ष पुरविणे आवश्यक आहे. तसे नाही झाले तर आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे प्रयत्न फसवे आहेत, हेच सिद्ध होईल.