सोमवार, २० मार्च, २०१७

डोलवीच्या जेएसडब्ल्यूचा पर्यावरणाला फास

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉    



      पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू इस्पात इस्पात स्टील लि. कंपनीच्या प्रदूषणाच्या विळख्यात आजूबाजूची १० किमी परिघातील सर्व गावे सापडली आहेत आणि त्यांची प्रचंड घुसमट सुरु आहे. ही घुसमट त्यांनी मोठ्या प्रमाणात व्यक्त करु नये म्हणून कंपनीने आपल्या सीएसआर फंडाचे शिंतोडे या परिसरावर उडवून आपण मोठे सामाजिक काम करीत असल्याचे भासवत आहे. मुळात असा निधी खर्च करणे हे नव्या कंपनी कायद्यानुसार  उद्योगजगतावर बंधनकारक आहे. त्यामुळे हे सर्व करुन जेएसडब्ब्यू काही या परिसरावर उपकार करीत नाही. या कंपनीमुळे या परिसरातील हवा, आकाश आणि पाणी प्रदूषित झाले आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हे कधीही भरुन न येणारे पर्यावरणाचे नुकसान आहे. इतकेच नव्हे तर येथील भूमीपुत्रांची खाडीआधारित उपजीविकेची व्यवस्थाच मोडीत काढण्यात आली आहे. येथील मत्स्यवैविध्य, पक्षीवैविध्य नष्ट झाले आहे आणि भातशेतीलाही ग्रहण लागले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ थंड आहे. त्यामुळे व्यवस्थेत नेमके षंढ कोण आहे? हा कुतुहलाचा प्रश्‍न आहे.
     या इस्पात स्टील कंपनीचे मालक बदलत आलेत, पण त्यांनी निर्माण केलेल्या समस्या मात्र कायम आहेत.  १९९१ साली मित्तल उद्योग समुहाच्या ‘निप्पॉन डेन्रो इस्पात लिमिटेड’ या कंपनीने  डोलवी येथे आपला कारखाना उभारायला सुरुवात केली. लोखंडावर आवश्यक असणार्‍या सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी, एकात्मिक रितीने केल्या जाव्यात यासाठी डोलवीचा कारखाना महाकाय स्वरुपाचाच उभारण्यात आला. काही काळाने या कारखान्याच्या भागीदारीत बदल झाल्याने त्याचे नाव ‘इस्पात इंडस्ट्रीज लिमिटेड’ असे झाले. या कंपनीचा स्पॉंज आर्यन प्रकल्प १९९४ साली, तर स्टील प्लँट १९९९ साली सुरु झाला. २०१० साली या इस्पात इंडस्ट्रीजला जिंदाल उद्योग समुहाच्या जेएसडब्ल्यू स्टीलने खरेदी केलं आणि जेएसडब्ल्यू इस्पात स्टील लि. कंपनी असे ठेवले. हे झाले मालकी बद्दल. पण या कारखान्याची उभारणी ज्या बेमुर्वतखोरपणे झाली, तीच येथील पर्यावरण आणि आरोग्याची हानी करणारी ठरली.
     डोलवी गावातली जमीन विकत घेऊन हा कारखाना उभारण्यास सुरुवात झाली तेव्हा या भागात येणार्‍या अनेक कारखान्यांपैकी हा एक, असाच स्थानिकांचा समज झाला. सुरुवातीला कारखान्याच्या बांधकामात अनेकांना वेगवेगळी कंत्राटं मिळाली. शेकडो स्थानिक मजुरांना रोजगार मिळाला. पैसेही चांगले मिळाले. सगळ्यांच्या तोंडी विकासाकडे वाटचाल सुरू झाल्याची भाषा होती. पुढे कारखान्याने इथे स्वतंत्र धक्का (जेट्टी) बांधला. याच धक्क्यावरून कारखान्यापर्यंत एक ङ्गिरता पट्टाही (कन्व्हेयर बेल्ट) बांधला गेला. हे बांधकाम पूर्ण झालं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं, की धरमतर खाडीतून वाहून आणलेला कच्चा माल उतरवण्यासाठी हा स्वतंत्र धक्का बांधण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच ३००० ते ३५०० टन लोखंड वाहून आणणर्‍या मोठ्या बोटी (बार्जेस) धरमतर खाडीत दाखल झाल्या. कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाला तेव्हा ३५,००० टनांच्या अजस्र बोटी न्हावाशेवा बंदरात दाखल होऊ लागल्या आणि त्यांनी आणलेलं खनिज लोखंड बार्जेसमधून धरमतर धक्क्यावर येऊ लागलं. या बोटींबद्दल कारखान्याने कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती किंवा सरकारनेही कोणती अधिसूचना काढली नव्हती. बोटी येण्यास सुरुवात झाल्यावर मच्छीमारांनी खाडीच्या मध्यभागी लावलेली जाळी तटातट तुटली. रोजच बोटींची ये-जा सुरू झाल्याने तिथे जाळी लावणं मच्छीमारांना अशक्य झालं. या खाडीतली मासेमारी प्रामुख्याने मधल्या खोल भागात चालायची. तिथे डोल लावणं अशक्य झालं. शिवाय या महाकाय बोटींसमोर छोट्या बोटींतून मासेमारी करायला जाणं म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखंच होतं. त्याचप्रमाणे बोटींच्या प्रचंड आवाजांमुळे माशांचे कळप दूर जाऊ लागले. खाडीत मासळी येणं बंद झालं आणि इथल्या मत्स्यव्यवसायाला ग्रहण लागलं. धरमतर खाडीत आणि उपखाड्यांतल्या मच्छिमारांवर मोठा अन्याय झाला. त्यांची उपजीविकाच हिरावली गेली. त्यांना अजून न्याय मिळालेला नाही.
     वास्तविक १९९१ साली कोस्टल रेग्युलेटरी झोन (सीआरझेड) या कायद्याच्या तरतुदी अधिक कडक करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पर्यावरणाबरोबर देशाचे संरक्षण व सीमा सुरक्षिततेचाही विचार होता. या कायद्यानंतर किनारी क्षेत्राच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्याचे निरनिराळे वर्ग पाडण्यात आले आहेत धरमतर खाडी ही सीआरझेड वर्ग १ मध्ये मोडते. वर्ग १ च्या क्षेत्रात उधाणाच्या भरती रेषेपासून ५०० मीटर अंतरामध्ये कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसते (पारंपरिक कच्च्या घरांना फक्त त्यातून सूट मिळते.) कंपनीने तर आपला धक्का आणि अवडज यंत्रसामुग्री खाडीच्या काठावरच उभारली होती आणि सीआरझेड कायद्याचे सरळसरळ उल्लंघन केले होते.  धरमतर खाडी सीआरझेड वर्ग १ मध्ये होती याचे एक कारण खाडीच्या दोन्ही बाजूला असणारी खारफुटीची विस्तृत जंगले (मॅनग्रोव्हज). खारफुटीची जंगले हा एक अतिशय नाजूक असा पर्यावरणाचा ठेवा मानला जातो. या जंगलामुळे खाडीचे तर रक्षण होतेच, पण खाडीमधल्या गुंतागुंतीच्या जैविक सृष्टीचेही पोषण होते. खाडीचा उपयोग खनिज वाहतुकीसाठी होऊ लागल्याने खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले.  धक्का आणि फिरता पट्टा बांधताना कंपनीने या वनस्पतींची बेसुमार तोड केली. तसेच कंपनीसाठी भराव टाकताना खाडीला मिळणारे अनेक ओढे-नाले बुजवले. आजूबाजूचे सीआरझेड क्षेत्रातील खारफुटीचे जंगलही नष्ट केले.  खारफुटीची जंगले ही माशांची अंडी घालण्याची ठिकाण. ती नष्ट होऊ लागल्यामुळे माशांचे पुनरुत्पादन थांबले. खाडीतील प्रंचड बोटीच्या वर्दळीने निर्माण झालेल्या प्रचंड लाटांनी बाहेरकाठे फुटून भरतीचे खारे पाणी आजूबाजूंच्या गावात, भातशेतीत शिरु लागले. या परिसरात हवेचे आणि पाणी प्रदूषण वाढले. हे प्रदूषण आजही कायम आहे. 
    आज जर कोणी अलिबागहून मुंबईला निघाले तर धरमतरवरुन जाताना प्रदूषण म्हणजे काय असते याची जाणीव होते. एसटीमध्ये असाल अथवा मोटार सायकलमधून जात असाल तर तेथील हवेतील बदल चटकन जाणवतो. कपड्यावर आणि चेहर्‍यावर जेएसडब्ल्यू इस्पात इस्पात स्टील लि. कंपनीच्या कारखान्यातील लोहमिश्रित धूळ बसते आणि चेहरा व कपडे काळे बनतात. एक उग्र वास सतत तेथे पाठलाग करतो. हा वास मळमळ, उलटी अशा प्रकारांना आवाहन करतो. हा तेथून प्रवास करणार्‍यांना जाणवणारा नेहमीचा प्रकार आहे. तेथे काम करणार्‍यांची कशाप्रकारचे सुरक्षा होत असेल हा कुतुहलाचा प्रश्‍न आहे. पण आजूबाजूच्या गावांना मात्र या कारखान्यातून होणार्‍या प्रदूषणाचा त्रास कायम आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या या भयानक प्रदूषणामुळे या परिसरातील नागरिकांना दमा, खोकला यांसारख्या विविध प्रकारच्या श्वसनाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. कंपनीच्या प्रदूषणामध्ये हवेतून लोहमिश्रीत धूळ बाहेर पडत असल्याने त्याचा या परिसरातील भातशेतीवर देखील विपरित परिणाम होऊ लागला आहे. अशा प्रकारे या कंपनीने जनतेच्या जीवनाशी खेळ मांडलेला आहे. तरीदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करतेय. त्यामुळे शासनाने या कंपनीवर कारवाई करावी व डोलवी परिसरात प्रदूषण मापक यंत्र बसवावे अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. उघड उघड प्रदूषणाचा वेढा असताना कंपनीनेने आपल्या संवेदना जागृत असल्याचे दाखवत खारफुटी व वृक्ष लागवडीची नाटकं चालवली आहेत. सीएसआर फंडाचा शिडकावा करुन आपण आजूबाजूच्या गावातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्‍न सोडवत आहोत असा आव आणला जात असला तरी वस्तुस्थिती भीषण आहे. ही भीषण परिस्थिती सरकारची दोन तपे दिसून येत असलेली अनास्था, कंपनीचा बेमुर्वतखोरपणा व जनतेतीलच काही स्वार्थी लोकांमुळे निर्माण झाली आहे. यामगच्या राजकीय ‘अर्थ’शास्त्रामुळे या परिसराचं पर्यावरण आणि स्थानिकांच्या जीवनयापनाची घडी विस्कटली आहे. जेएसडब्ल्यूचे धरमतर-डोलवी परिसरात पर्यावरण शास्त्राचा विचार न करता जे साम्राज्य उभे आहे, त्याचा पायाच चुकलेला आहे. हे झालेले नुकसान भरुन न येणारे आहे. पण पुढे हे नुकसान होऊ नये म्हणून ठोस कृती केली जाणार आहे की नाही? या परिसरात प्रदूषणरोधक यंत्रणा बसवून येथील जनतेला मोकळा श्‍वास घेता येणार आहे की नाही? कंपनीच्या अनेक कच्च्या दुव्यांबद्दल सविस्तर लिहिता येणे शक्य आहे, पण गेंड्याच्या कातडीसारख्या निबर झालेल्या या कंपनीमध्ये खर्‍याखुर्‍या संवेदना जाग्या करण्यासाठी तूर्तास हा शब्दांचा मार पुरेसा आहे. इतकेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा