रविवार, २९ जानेवारी, २०१७

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वाढविला महाराष्ट्राचा गौरव

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


     महाराष्ट्राचे स्वच्छतादूत, थोर निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, देशात, जगभर दिवाळीसारखा उत्साह श्रीभक्तांमध्ये संचारला आहे. रायगड जिल्ह्यात तर या उत्साहाला सीमा नाही, कारण रायगड जिल्ह्याला हा सातवा पद्म पुरस्कार लाभला आहे. तर दोन भारतरत्न पुरस्कारांचाही हा जिल्हा मानकरी ठरला होता. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रुपाने जिल्ह्याला पुन्हा पद्मपुरस्काराने सन्मान लाभत आहे, ही विशेष बाब ठरते. 
आचार्य बिनोबा भावे
     रायगड जिल्हा हा संत, समाजसुधारक, कलावंत आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांमुळे ओळखला जातो. या दिग्गजांमुळे जिल्ह्याचे नाव देशात आणि जगात चमकते राहिले आहे. त्यात साध्यासोप्या भाषेत दासबोध ग्रंथाचे निरूपण करून आपले लाखो अनुयायी निर्माण करणारे रेवदंड्याचे ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्रभूषण नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे सुपुत्र डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव आदराने घेतले जाते. नानासाहेबांनी त्यांच्या निरूपणातून लाखो भाविकांना अध्यात्माची गोडी लावली.  त्यांच्या निधनानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. समाजातील जातीभेद गाडून सगळ्यांना बरोबर घेऊन समाजसुधारणेचे, समाजातील सर्व स्तरातील जनतेला सोबत घेऊन जाण्याचे काम आप्पासाहेब करीत आहेत.
पांडुरंगशास्त्री आठवले
समाजातील हुंडाबंदी, जातीयता आदीना दूर सारून महिलांसाठी समानतेचा हक्काचा पुरस्कार नानासाहेब व आप्पासाहेबानी केला. समाजसुधारणेचे, प्रबोधनाचे मोठे काम या कुटुंबाकडून होत आहे. एक सशक्त मनाचा आणि चांगल्या विचारांचा समाज निर्माण करण्याचे काम आप्पासाहेब करीत आहेत. त्यांचे कार्य महान असून रायगड भूषण, शिवसमर्थ पुरस्कार, जगतगुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार आदी पुरस्कारानी त्याना गौरवण्यात आलेले आहे. संत पुरस्काराने मोठे होत नसतात, ते आपल्या कार्याने मोठे असतात, त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी पद्मभूषण पुरस्काराकडे त्याच भावनेने पहात आहेत. केंद्र सरकारने आपणाला जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार हा नानासाहेबांच्या विचारांचा गौरव आहे, ही त्यांची प्रतिक्रिया त्याच तठस्थ भावनेचे प्रतिक आहे, असे म्हटले तर त्यात काही चुकीचे नाही.
सी.डी. देशमुख
      विशेष म्हणजे डॉ. आप्पासाहेबाच्या रुपाने अलिबाग तालुक्याला हा तिसरा पद्मश्री पुरस्कार आहे. पहिला पद्मश्री पुरस्कार सासवणे येथील जागतिक कीर्तीचे शिल्पकार नानासाहेब करमरकर यांना  १९६४ साली  मिळाला होता. त्यानंतर अलिबागच्या प्रा. रमेश तेंडुलकर याचे पुत्र क्रिकेटमधील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर यांना १९९९ साली पद्मश्री पुरस्कार, २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर २०१४ साली त्यांचा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानेही सन्मान झाला होता. सचिन तेंडुलकर यांचा अलिबागला रहिवास नसला तरी सचिन तेंडुलकर अलिबागला कधी परके नसल्यामुळे हा पुरस्कार अलिबागकरांसाठी जवळचा होता. त्यानंतर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना
पद्मश्री पुरस्कार जाहीर होणे म्हणजे ‘सोनेपे सुहागा’च म्हटले पाहिजे. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर
नानासाहेब करमरकर
रोह्याचे सुपुत्र, रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी.डी. देशमुख यांचा १९७५ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान झाला आहे. रोह्याचेच सुपुत्र, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचा १९९९ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान झाला आहे. पेण तालुक्यातील गागोद्याचे सुपुत्र, भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा १९८३ साली मरणोत्तर सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कामगार चळवळीतील कवी नारायण सुर्वे अखेरीस कर्जतला वास्तव्यास होते, त्यांचाही १९९८ साली पद्मश्री पुरस्काराने गौरव झाला होता.
      देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांचा यादीत रायगड जिल्ह्यातील तीन तालुके ठळकपणे समोर येतात. अलिबाग तालुक्याला एक भारतरत्न, एक पद्मविभूषण,
नारायण सुर्वे
तीन पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने अलिबाग
तालुक्याचे यश लख्ख दिसून येते. पेण तालुक्यालाही एक भारतरत्न पुरस्कार
सचिन तेंडुलकर
मिळाल्याने हा तालुकाही अव्वल ठरला आहे. रोहे तालुक्याला दोन पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने रोह्याचा वेगळाच दबदबा देशात आहे. कर्जतला एक पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने कर्जतही मान उंचावली आहे. अशा प्रकारे देशात सातत्याने रायगड जिल्ह्याचा सन्मान होत राहिला आहे, ही या जिल्ह्यातील प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे नाही.


सोमवार, २३ जानेवारी, २०१७

येथे रस्त्यावरुन मृत्यू धावतोय!

 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


      रायगड जिल्हा असो, वा उर्वरित महाराष्ट्र, वा संपूर्ण देश, हा दहशतवादापेक्षाही रस्त्यांवरील अपघातांनी गलितगात्र झाला आहे. रस्त्यांना विकासाचा मार्ग म्हटले जाते, पण तेच रस्ते जीवघेणे ठरत आहेत. या रस्ते अपघातात आणि अपघाती मृत्यूच्या बाबतीत देशात महाराष्ट्रही उत्तर प्रदेश, तामिळनाडूच्या बरोबरीने बदनाम झाला आहे. एकूणच रस्ते अपघात ही भारतात मोठी चिंताजनक बाब बनली आहे. रस्त्यातील खड्ड्यांनी आणि बेशिस्त, भरधाव वाहतुकीने अनेकांचे बळी जात आहेत. एकाच जागेवर, एकाच मार्गावर अनेक अपघाती मृत्यू होत आहेत. अनेकांच्या आयुष्यांची, सुखी संसाराची, ध्येयाची क्षणात माती होतेय. होत्याचे नव्हते होतेय. कोणी मुलगा, सुन, आई-वडील, मावशी, काका, काकू, चिमुकले, अजून कितीतरी नात्यातील प्रियजनांना गमवतोय. या रस्ते अपघातात माणसांच्या चुकांनी आणि खराब रस्त्याने माणसे मृत्यूमुखी पडताहेत, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती बदलत नाही, चांगले रस्ते आणि वाहतूक सुरक्षिततेची काळजी जोपर्यंत खर्‍याअर्थाने घेतली जात नाही, तोपर्यंत हे रस्त्यावरील मृत्यूचे थैमान थांबणारे नाही.
     ९ ते २३ जानेवारी २०१७ या कालावधीत २८ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला. या निमित्त रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी या उपक्रमांचे आयोजन केले जाते, पण त्यांची परिणामकारकता किती असते आणि त्यातून काय निष्पन्न होतेे, किती जनजागृती होते याचा काही थांगपत्ता लागत नाही. याही वर्षी तसेच झाले. रायगड जिल्ह्यातही जनजागृतीचा फक्त सोपस्कार पार पाडला. वस्तुस्थिती अशी आहे की परिणामकारक उपायांअभावी जिल्ह्यात रस्ते अपघातात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकट्या मुंबई-गोवा महामार्गाचेच उदाहरण घेतले तर परिस्थिती कशी भयानक आहे हे दिसून येईल. २०१० वर्षात या महामार्गावर जिल्ह्यात एकूण २०२ अपघात, १६२ मृत्यू, ५८७ जखमी, २०११ ला ६११ अपघात, १३६ मृत्यू, ६१९ जखमी, २०१२ ला ६४९ अपघात, १२४ मृत्यू, ५५८ जखमी, २०१३ ला ४७४ अपघात, १२२ मृत्यू, ४६७ जखमी, २०१४ ला ४६२ अपघात, ९३ मृत्यू, ४३९ जखमी, २०१५ ला ४९७ अपघात, ९९ मृत्यू, ६२४ जखमी, २०१६ ला ४६० अपघात, ११० मृत्यू, ८२७ जखमी झाले. या मुंबई-गोवा अरुंद महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी पत्रकारांनी दीर्घकाळ आंदोलन केले. त्याचे फळ म्हणून या महामार्गाच्या चौपदरीकरणास मान्यता मिळाली. जिल्ह्यातून पळस्पे ते इंदापूर या १५४ किलोमीटर दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो, त्यापैकी पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटर मार्गाचे काम सुरु झाले आणि ४० टक्के काम पूर्ण झाल्यावर ते रखडले आणि महामार्गाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. अरुंद महामार्ग, कडेला वाढलेले वृक्ष, प्रचंड वळणे, क्षमतेपेक्षा जास्त चाललेली वाहतूक, भरधाव वेगाने जाणारी वाहने, रस्त्यावरील खड्डे व खचलेल्या व खडे पडलेल्या साईडपट्ट्या, सुरक्षेच्या दृष्टीने उपाय नसणे, रस्त्यावर वाहतूक पोलिस नसणे, अपघातप्रवण भागाकडे सुरक्षितेच्या दृष्टीने काहीच उपाय योजना नसणे, ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. महामार्गाची वाहतुक क्षमता २३ मेट्रीक टन पण वाहतूक होेते क्षमतेपेक्षा जास्त. अरुंद पूल, अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक संख्या, महामार्गावर झालेली अतिक्रमणे या कारणांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असते. हे कमी म्हणून काही वाहनांचे चालक मद्यपान करुन भर वेगात वाहने चालवून अपघाताला आमंत्रण देत असतात. तसेच अपघात झाल्यास पर्यायी मार्गही नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी नेहमी होत असत आणि असे प्रकार दररोज घडत असतात. या महामार्गावर अपघात झाल्यानंतर जागेवरच मृत्युमुखी पडणार्‍याचे प्रमाण २० टक्के तर ७० टक्के मृत्यू जखमींना रुग्णालयात नेताना झालेले आहेत. या महामार्गावर कोठेही अद्ययावत आणि सुसज्ज रुग्णालय नाही. शासकीय रुग्णवाहिका जलद उपलब्ध होवू शकत नाहीत. चौपदरीकरणाचा पाठपुरावा करण्याबाबतची राजकीय उदासिनता, चौपदरीकरणाबाबतची सरकारी अनास्था, वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा अभाव यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास सुखाचा न ठरता अपघातांचा ठरला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग टोलवसुलीची दुभती गाय ठरला आहे, रस्ता सुरक्षेची मात्र तेथे काळजी घेतली जात नाही. त्यामुळे तोही महामार्ग अपघाती ठरला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही वाहतूक नियमांच्या पायमल्लीने मृत्यू धावता असतो. येथे रस्ता सुरक्षा पंधरवडा आणि रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रम तुटपुंजे ठरतात हे वास्तव आहे.
        महामार्ग सोडल्यास रायगड जिल्ह्यातील इतर रस्त्यांवरील अपघातांचे आणि त्यात होणार्‍या मृत्यूचे प्रमाण लक्षणिय आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा हा विषय एका दिवसाचा किंवा पंधरवड्यापुरता मर्यादित नाही तर रोजच्या जगण्यातला अविभाज्य भाग आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. रस्ता सुरक्षेबाबत विचार करताना दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रस्त्याची सुरक्षा आणि रस्त्यावरून वाहने हाकणार्‍यांच्या जीवाची सुरक्षा. या दोन्हीपैकी रस्त्याची सुरक्षा राखण्याबाबत काय बोलावे? लाखो रुपये खर्चून दरवर्षी रस्ते बांधण्यात येतात. त्यांची दुरुस्ती करण्यात येते. हॉटमिक्स, डांबरीकरण केले जाते. पण मृग नक्षत्राच्या एकाच पावसाने या रस्त्यांची धूप होते. नद्यांना पूर येऊन प्रवाहाबरोबर वृक्ष-वल्ली वाहून जातात, हे समजण्यासारखे आहे. पण पावसाळ्यात पाण्यात रस्तेच वाहून जातात. उरल्या सुरल्या खड्ड्यांत मग वृक्षारोपण करून निषेध करण्याची कामगिरीही काही नागरिकांना करावी लागते. अशा परिस्थितीत रस्त्यांची सुरक्षा कोण, कशी राखणार? या खराब रस्त्यांमुळे, रस्त्यांतील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या सातत्याने वाढते आहे, या बाबीकडे कसे दुर्लक्ष करता येणार? 
       आता रस्त्यावरून वाहने हाकणार्‍यांच्या जीवाची सुरक्षा राखण्याच्या प्रश्‍नावर विचार करता अनेक गोष्टी तपासून पाहाव्या लागतील. अपघाताविषयीच्या आकडेवारीनुसार ८५ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे घडतात, असे आढळून आले आहे. ङ्गक्त १०  टक्के  रस्त्यामुळे आणि केवळ ५  टक्के अपघात तांत्रिक कारणामुळे होतात. या माहितीच्या आधारे विचार केला असता अपघातांचे प्रमाण वाढण्यास वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होत नाही, हेच दिसून येते. अपघात मोठ्याप्रमाणात घडतात ते मानवी चुकांमुळे. कुठे बेफाम गाडी चालविली म्हणून तर कोठे रस्ता ओलांडताना काळजी घेतली नाही म्हणून अपघात होतो. वाहनचालक जसे अपघाताला कारणीभूत असतात तसेच पादचारीही. बहुतेकवेळा रस्ता वाहतुकीबाबतचे अज्ञान व चूक अपघाताला कारणीभूत ठरते. वाहतूक नियमांचे पालन न करणारे जसे दोषी आहेत तसेच नियमांची अंमलबाजवणी न करवून घेणारेही दोषी आहेत. वाहतुकीचे नियम नीटपणे समजून घेतले, अनावश्यक घाई टाळली, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलले नाही, मद्यपान केले नाही, पुरेशी खबरदारी घेतली तर बरेचसे अपघात टाळले जाऊ शकतात. यासाठी शाळेपासूनच मुलांना सुरक्षेचे, वाहतूक नियमांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. केवळ पंधरवडा साजरा करुन या विषयाला थेट भिडता येणार नाही. या विषयाला थेट भिडायचे असेल प्रत्येक दिवस हा रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यादृष्टीने रस्ते अपघाताकडे गांभीर्याने पाहिले आणि त्याबाबत ठोस उपाययोजनांची निग्रहाने अंलबजावणी केली गेली तरच रस्त्यांवरचा मन सून्न करणारा दररोजचा आक्रोश थांबेल.



सोमवार, १६ जानेवारी, २०१७

पुन्हा एकदा खांदेरी...

 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


       अर्वाचीन भारताच्या इतिहासात आरमाराचे महत्व ज्यांनी पहिल्या प्रथम ओळखले, ते छत्रपती शिवाजी महाराज यांनीच. केवळ भूदलाचेच सामर्थ्य वाढविण्याकडे लक्ष न देता त्यांनी सागरी सामर्थ्य वाढविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले. राज्याचे रक्षण करण्यासाठी प्रबळ आरमार पाहिजे, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज इत्यादी परकीयांना शह देण्यासाठी आरमार सामर्थ्यशाली असले पाहिजे, हे ओळखून त्यांनी आरमाराची आणि सागरी किल्ल्यांची उभारणी केली आणि दर्यावरही वचक निर्माण केला. या आरमारी सामर्थ्याची प्रतिकं कोकणात जागोजागी पहायला मिळतात, त्यापैकी एक खांदेरी जलदुर्ग (सरखेल कान्होजी आंग्रे बेट) आहे. भारतीय नौदलाने शिवरायांच्या युद्धनितीला सलाम करण्यासाठी १९६८ साली आपल्या एका पाणबुडीला  ‘खांदेरी’ असे नाव दिले होते. त्यानंतर २०१७ साली या जानेवारी महिन्यात आपल्या पूर्णपणे देेशी बनावटीच्या पाणबुडीला  ‘खांदेरी’ असे नाव देऊन पुन्हा सागरी अभिमानाची परंपरा नौदलाने चालू ठेवली आहे.
         अथांग सागरावर जो आपले अधिराज्य सिद्ध करील तोच बाजूच्या भूभागावर आपली सत्ता सुयोग्य प्रकारे प्रस्थापित करून रयतेस सक्षम सुरक्षितता देऊ शकेल, अशी दूरदृष्टी बाळगून आरमाराची आणि जलदुर्गांची उभारणी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरीमार्गे होणार्‍या परकीयांच्या घुसखोरीस प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला. या आरमाराच्या उभारणीने मराठ्यांच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरु झाले. पूर्वी समुद्रातील संचाराला पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागे; परंतु छत्रपतींच्या आरमाराचे सामर्थ्य पाहिल्यावर पोर्तुगीजांची मराठी आरमाराला परवान्यासाठी अडविण्याची छाती झाली नाही. किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग इत्यादी जलदुर्ग बांधले. कुलाबा, अंजनवेल, रत्नागिरी, विजयदुर्ग येथे कसबी सुतार व कारागीर आणून कल्याण, भिवंडी व पनवेल येथील जंगलातील चांगल्या लाकडांचा वापर करून लढाऊ जहाजे बांधण्यास सुरुवात केली. गुराब, तरांडी, गलबते, दुबारे, शिहाडे (शिबाडे), पगार, बाथोर, तिरकटी, पाल, मचवे अशा जातीच्या सुमारे चारपाचशे युद्धनौका तयार झाल्याने महाराजांच्या सागरी शत्रूंना चांगलीच दहशत बसली. महाराजांच्या आरमारात ‘बारकश’ (ङ्गरगाद) म्हणजे मोठी लढाऊ जहाजे नव्हती. याचे कारण म्हणजे, कोकणच्या उथळ व आतील किनारपट्टीत अशा मोठ्या युद्धनौकांना आत नेता येत नसे. यासाठी त्यांना लहान व जलद हालचाली करू शकणारी व वेळप्रसंग आल्यास उथळ पाण्याच्या भागात सुरक्षिततेसाठी आश्रय घेता येण्याजोगी जहाजे उपयुक्त ठरत असत. हाही त्यांच्या कुशल आरमारी युद्धनीतीचा व दूरदर्शीपणाचा भाग होता. आरमारी लढाईत भांडी (तोफा), जंबुरे (लहान तोफा), बंदुकी व टुक्के यांचा प्रामुख्याने वापर होई. इ. स. १६६५ ते १६७९ मध्ये फ्रिगेट्स श्रेणीच्या मोठ्या युद्धनौकाही बांधण्यास सुरुवात झाली. इ.स. १६७९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ ६६ मोठी लढाऊ गलबते होती असा उल्लेख सापडतो. महाराजांनी मराठा आरमाराचा असा पाया घातला आणि पुढे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी त्यावर कळस चढविला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक किल्ला, एक एक जलदुर्ग त्यांच्या युद्धनितीचे एक एक उत्कृष्ट प्रतिक आहे. त्यातील इंग्रजांच्या उरावर बसविलेला  ‘खांदेरी’ जलदुर्ग हा एक आहे आणि त्याचेच स्मरण ठेवण्यासाठी भारतीय नौदलाने पहिली  ‘खांदेरी’ पाणबुडी ६ डिसेंबर १९६८ रोजी सागरी सुरक्षेसाठी दाखल केली होती. ती २० वर्षे सेवा केल्यानंतर १८ ऑक्टोबर १९८९ रोजी नौदलातून निवृत्त झाली. त्यानंतर नौदलाने पुन्हा एकदा २८ वर्षांनी उशिरा का होईना पण आपल्या पूर्णपणे देशी बनावटीच्या पाणबुडीला  ‘खांदेरी’ हे नाव देवून शिवरायांच्या युद्धनितीला वंदन केले आहे. 


       अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर या देशाच्या तिन्ही बाजूंचे खात्रीशीर रक्षण करण्यासाठी प्राप्त परिस्थितीत भारतीय नौदलाकडे कमीत कमी २४ पाणबुड्या असणे सामरिकदृष्ट्या आवश्यक आहे. आश्वासक परिस्थितीसाठी ३० पाणबुड्या आवश्यक आहेत. पण प्रत्यक्षात भारतीय नौदलाकडे केवळ १३ पाणबुड्या आणि दोन आण्विक पाणबुड्या आहेत. अशा परिस्थितीत प्रोजेक्ट-७५ अंतर्गत सहा पाणबुड्या तयार करण्यात आल्या असून ते प्रोजेक्ट -७५ सन २०२० पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यापैकी ‘कलवरी’ पहिली आणि दुसरी  ‘खांदेरी’ ही पाणबुडी आहे. मुंबईच्या माझगाव गोदीत तयार झालेल्या ‘खांदेरी’ या पाणबुडीचे जलावतरण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते गुरुवार,१२ जानेवारी २०१७ रोजी माझगाव डॉकमध्ये करण्यात आले. या पाणबुडीच्या बांधणीचे आव्हान भारतीय तंत्रज्ञांनी यशस्वीपणे पेलले आहे. अर्थात ही पाणबुडी नौदलात सक्रिय होण्यापूर्वी अनेक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. परंतु या निमित्ताने भारताने पाणबुडी निर्मितीच्या क्षेत्रात टाकलेले पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.  ‘खांदेरी’ ही पाणबुडी ६१ मीटर लांब आणि ६ मीटर रुंद आहे. तर वजन १५६५ टन आहे. समुद्रात ही पाणबुडी ६० किलोमीटर वेगाने शत्रूवर चाल करू शकते. ही पाणबुडी डिझेल आणि वीजेवर चालणारी आहे. ही पाण्याच्या आतमधून किंवा पृष्ठभागावरुन शत्रूच्या जहाजाला टोर्पिडो आणि जहाज विरोधी क्षेपणास्त्र वापरुन लक्ष करु शकते, तसेच उष्ण कटिबंधासह कोणत्याही वातावरणात कार्य करु शकते.  ही अद्ययावत उपकरणांनी सज्ज आहे. तिच्यामधून नौदलाच्या इतर घटकांसह संपर्क केला जाऊ शकतो. तिच्यामधून पाणबुडी विरोधी युद्धसामुग्री, पृष्ठभागविरोधी युद्धसामुग्री वाहून नेणे, गुप्तचर संकलन, पाळत ठेवणे, माइन बसवणे अशा विविध मोहिमा हाती घेतल्या जाऊ शकतात. 
         भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान करण्यात आलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण करारानुसार डीसीएनएस या उत्पादन प्रकल्पाच्या सहकार्याने माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून स्कोर्पियन वर्गातील ६ पाणबुड्या तयार करण्यात येत आहेत. पाणबुड्या, जहाज आदींच्या बांधणीत माझगाव डॉकचे योगदान अतिशय महत्त्वाचे राहिले आहे. २०० वर्षांचा इतिहास असलेल्या माझगाव डॉकची स्थापना १८ व्या शतकात करण्यात आली. सुरूवातीला ब्रिटीश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी असे त्याचे नाव होते. ही पब्लिक लिमिटेड कंपनी होती. १९६० मध्ये ही कंपनी भारत सरकारने ताब्यात घेतली. माझगाव डॉकमध्ये बांधलेल्या पहिल्या ‘आयएनएन निलगिरी’ या जहाजाचे जलावतरण  १५ ऑक्टोबर १९६६ रोजी करण्यात आले. त्यानंतर या गोदीत अनेक विशाल जहाजांची निर्मिती करण्यात आली आहे. ८ डिसेंबर १९६७ साली देशाची पहिली पाणबुडी ‘आयएनएस कलवरी’ भारतीय नौदलाच्या सेवेत सामील करण्यात आली होती. त्यामुळे ८ डिसेंबर हा दिवस दरवर्षी पाणबुडी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी ८ डिसेंबर रोजी या घटनेला ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. ७ फेब्रुवारी १९९२ रोजी ‘आयएनएस शाल्की’ ही पहिली भारतीय बांधणीची पाणबुडी सेवेत आणून पाणबुडी बांधणी करणार्‍या देशांच्या समुहात सामील झाली. ‘आयएनएस शंकुल’ ही दुसरी स्वदेशी बनविलेली पाणबुडी १९९४ मध्ये सेवेत रुजू झाली. या दोन्ही पाणबुड्या अजूनही सेवेत आहेत. मात्र १९९३ नंतर भारतात पाणबुडीनिर्मिती थांबली होती ती २०१५ साली स्कोर्पियन प्रकल्पाद्वारे सुरु करण्यात आली. स्कोर्पिन प्रणालीतील पहिली ‘कलवरी’ पाणबुडी गुरुवार, २९ ऑक्टोबर २०१५ मध्ये भारतीय नौसेनेत दाखल झाली असून तिची नुकतीच चाचणी घेण्यात आली. ‘कलवरी’ पाणबुडी जूनपर्यंत नौसेनेत कार्यरत होणार आहे. तर दुसर्‍या स्कोर्पिन क्षेणीतील ‘आयएनएस खांदेरी’ पाणबुडीची डिसेंबरपर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर ‘खांदेरी’ भारतीय नौसेनेत कार्यरत होणार आहे. ‘आयएनएस खांदेरी’ नंतर उर्वरित चार पाणबुड्या नऊ महिन्याच्या अंतराने तयार केल्या जाणार आहेत. 
       छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ म्हणून अभ्यासले जाते. त्यासाठी खास आयएनएस ‘शिवाजी‘ नावाने एक नौदल प्रशिक्षण केंद्र लोणावळा येथे तयार करण्यात आले आहे. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मराठा नौदलाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या नावानेही फोर्ट-मुंबई येथे आंग्रे नौदल तळाची स्थापना करण्यात आली आहे. त्याबरोबरच ‘आयएनएस आंग्रे’ असे एका युद्धनौकेला नावही देण्यात आले आहे. मराठा आरमाराचा असा गौरव झाला असताना पुन्हा एका पाणबुडीला ‘खांदेरी’ हे नाव देणे ही रायगडकरांसाठी, तसेच देदीप्यमान इतिहास लाभलेल्या माझगाव गोदीत ‘खांदेरी’ या पाणबुडीची बांधणी होणे ही तेथील तंत्रज्ञ, अधिकारी तसेच कर्मचार्‍यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.