शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

जिल्ह्याच्या पर्यटन विकासात सुरु आहे अडथळ्यांची शर्यत

 -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


       आज जगभर पर्यटन दिन साजरा होत आहे, रायगड जिल्ह्यातही तो साजरा होत आहे. अलिबाग पर्यटन विकास संस्थेतर्फे मांडवा अलिबाग अशी पर्यटन मोटार रॅलीही आज आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात कृषी पर्यटन, समुद्र पर्यटन, गिरिपर्यटन, गडकिल्ले पर्यटन, विज्ञानवास्तू पर्यटन, आध्यात्मिक मंदिर पर्यटन, शिक्षणमंदिर पर्यटन, जंगल पर्यटन, बाजार पर्यटन असे विविध पर्यटन शाखांचे पर्यटकांच्या सुखासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. पण जिल्ह्यात खर्‍याअर्थाने उत्साहाचे वातावरण नाही. कारण रायगड जिल्ह्यात रस्त्यावरील खड्ड्यांच्या विणलेल्या जाळ्यांनी आणि पर्यटनस्थळांवरील सोयीसुविधांच्या अभावाने पर्यटनाचा उत्साह आणि हेतूच खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पर्यटन विकासाच्या, पर्यटनवाढीच्या गप्पा या बाजारगप्पाच ठरल्या आहेत. 
       रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण पर्यटनाची पंढरी समजली जाते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पसरलेला रायगड जिल्हा कोकणाचा एक प्रमुख भाग आहे. राजधानी मुंबई पासून १२० कि.मी.अंतरावर असलेला रायगड जिल्हा कोकण विभागीय महसूल क्षेत्रात येतो. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ७१६२ चौ.किमी आहे. उत्तरेला ठाणे व वायव्येला मुंबई हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून दक्षिणेस असलेल्या सावित्री नदीने रत्नागिरीपासून रायगड जिल्ह्याची दक्षिण सीमा निश्चित केली आहे. जिल्ह्याची पूर्वेकडील सीमा सह्याद्री पर्वताच्या लहान मोठ्या रांगांनी वेढलेली असून त्याला लागून पुणे जिल्ह्याची हद्द सुरु आहे. पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, तळा, मुरुड, अलिबाग, पेण, सुधागड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण अशा पंधरा तालुक्यांच्या या रायगड जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर पर्यटनाचा आलेख खूपच मोठा आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा, गडकिल्ले, अभयारण्ये, लेणी, जंगले, धबधबे, धरणे, माथेरानसारखे डोंगर-दर्‍या, ऐतिहासिक वास्तू, अलिबागेतील वेधशाळेसारख्या वैज्ञानिक वास्तू, शिवकालिन मंदिरे असा भरगच्च खजिना रायगड जिल्ह्यात पहायला मिळतो. रायगड जिल्ह्याची खाद्यसंस्कृतीही समृद्ध आहे. येथील वालाची पोपटी तर जगप्रसिद्ध आहे. मच्छीचे विविध प्रकार खवय्यांसाठी मेजवानीच असते. त्याताही येथल्या माणसांचं प्रेम संस्मरणीय असते. पर्यटकांशी दुर्व्यवहार, फसवणूक येथे क्चचितच पहायला मिळते. पर्यटकांच्या सेवेसाठी या जिल्ह्यात अनेक रिसॉर्ट, कॉटेजेस, फॉर्म हाऊसेस कार्यरत आहेत.
        राज्य सरकारचा रायगड जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक वाटत असला आणि राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबाबत विविध घोषणा सातत्याने होत असल्या तरी त्यात वास्तवता किती आणि शोबाजी किती हा प्रश्‍न उरतोच. या जिल्ह्यात मुख्यमंत्री आल्यावर रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अमुक अमुक इतका निधी जाहीर करतात, पालकमंत्री, विविध खात्यांचे मंत्री येतात आणि पर्यटन विकासाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करतात. पण रायगड जिल्ह्याकडे पाहताना यांची कोणती भूमिका खरी असा प्रश्‍न पडतो. राज्य सरकारला रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची खरोखरच तळमळ आहे, असे दिसत नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नेमके काय करते हेही कळत नाही. पर्यटकांच्या सेवेसाठी रिसॉर्ट, कॉटेजेस चालविणार्‍या तसेच इतर पर्यटन व्यावसायिकांच्या काही समस्या आहेत, त्यांचाही राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत नाही. त्यांच्यावर जाचक अटी लादून त्यांना गलितगात्र करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, अशाने एकप्रकारे पर्यटनवृद्धीसाठी राज्य सरकार अडसर ठरत आहे. 
       शेजारच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटन विकासात गती घेतली असताना रायगड जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. पर्यटन विकासाला मारक ठरणार्‍या सरकारी धोरणांविरुद्ध तसेच पर्यटनस्थळांवरील सोयीसुविधांसाठी सत्तेतील विरोधक प्रखर आवाज उठवताना दिसत नाहीत. सत्तेतील आणि विरोधातील लोकप्रतिनिधींच्या या उदासिनतेचे कारण पर्यटनवृद्धीसाठीच नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी मारक आहे. आज परिस्थिती अशी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये समुद्र मार्ग सोडल्यास कोणत्याही मार्गाने शिरा, रस्ते तुमची सत्वपरीक्षा घ्यायला बसले आहेत. हा या रस्त्यांचा दोष नाही, हे रस्त्यांचे ठेके घेणारे ठेकेदार आणि बांधकाम अभियंते यांचे पाप आहे. तकलादू रस्ते बनविणारे हे ठेकेदार कोण आहेत, ते कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधीत आहेत हे काही लपून राहिलेले नाही. त्यामुळे कोणा एका पक्षाच्या नेत्याला टार्गेट करण्यातही अर्थ नाही. सत्ताधारी आणि विरोधी सारेच पक्ष ‘तुम्ही आम्ही सारे भाऊ, मिळून मिसळून सर्व खाऊ’ या भूमिकेत आहेत. त्यामुळे दगड कोणी कोणावर मारावे, सगळीच घरे काचेची आहेत, हेच वास्तव आहे.
        रायगडच्या पर्यटन विकासाला तकलादू, खड्डेयुक्त रस्ते मारक ठरले आहेत. तसेच अनेक पर्यटन स्थळांकडे जायला रस्तेच नाहीत, पर्यटन स्थळी विविध सोयीसुविधांचा अभाव आहे, ही बाबही गंभीर आहे. जिल्ह्यातील सगळेच गडकिल्ले पावसाळ्यात गवताच्या ताब्यात असतात. अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्याचेच येथे उदाहरण दिले तर परिस्थिती कशी आहे, यावर प्रकाश पडेल. कुलाबा किल्ल्यात आणि किल्ल्याच्या तटबंदीवर व परिसरात गवताचे रान माजले आहे. त्यात अनेक जनजनावरांचा वावर आहे. हे गवत तटबंदीला धोकादायक आहे, कारण कोसळलेल्या तटबंदीचे मारेकरी समुद्राच्या लाटांपेक्षा हेच गवत मारेकरी होतं. असे असले तरी या तटबंदीचे प्रमुख मारेकरी मात्र मानवी अनास्थाच आहे आणि या अनास्थेचे मनसबदार या किल्ल्याला वेटोळा घालून बसलेले पुरातत्व खाते आहे. या किल्ल्यात येणार्‍या प्रत्येक पर्यटकाककडून माणशी १५ रुपये व परदेशी  पर्यटकांकडून माणशी १२५ रुपये प्रवेश फी आकारली जाते. परंतु तेथे पर्यटक-अभ्यासकांसाठी कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. या किल्ल्यावरील साधे गवत उगवू न देण्याची काळजी घ्यावी, असे या सुस्त पुरातत्व खात्याला वाटत नाही. तेथे पर्यटकांना जनजनावर चावल्यास कोणती वैद्यकीय सुविधा आहे? नाहीतर निदान तेथील स्वच्छतेकडे काळजीपूर्वक पहायला हवे ना? तेथे गवत उगवू न देण्याची व उगवलेले गवत साफ करण्याची काळजी घेतली तर किल्ल्याचे आयुष्य वाढेल आणि पर्यटकांच्या आयुष्याशीही कोणता दगा होणार नाही, पण याची काळजी राज्य सरकारला नाही की, केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकारचा पुरातत्व खात्याच्या रुपाने असलेला अजगर या किल्ल्यालाच गिंळकृत करत आहे. त्यामुळे एक दिवस येथे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा कुलाबा किल्ला होता, याची जाणीव करुन देणार्‍याच खाणाखुणा तेथे उरतील अशी भिती वाटते. अशी भिती जिल्ह्यातील सर्वच गडकिल्ल्यांबाबत वाटते.
       एकेकाळी भाताचे कोठार समजला जाणारा रायगड जिल्हा आज औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी पर्यटनावर हा जिल्हा सुजलाम-सुफलाम होऊ शकतो इतके सौंदर्य या जिल्ह्याच्या कणाकणात भरले आहे. या सौंदर्याचे योग्य मार्केटींग होणे आवश्यक आहे. नुसते मार्केटींग करुनही उपयोगाचे नाही. आधी येथे पायभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. प्रत्येक पर्यटनस्थळापर्यंत पक्का रस्ता, निवास आणि भोजन याची सोय, प्रसाधनगृहांची उपलब्धता आणि सुरक्षा या गोष्टींची पूर्तता केली गेली तर त्यातूनच जिल्ह्याच्या पर्यटनाचे हस्ते परहस्ते मार्केटींग होईल. यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, राज्य सरकार यांची कृतीशील मानसिकता आवश्यक आहे. पर्यटन दिन एक दिवस असतो, पण पर्यटनाचा माहोल मात्र बाराही महिन्यांचा असतो, त्यामुळे पर्यटनाकडे गांभीर्याने पाहून योग्य सोयीसुविधांची पूर्तता केली तर पर्यटनातूनही जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत करता येऊ शकते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.


सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

...हा तर मानवतेवर बलात्कार!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


      रायगड जिल्हा हा शिवछत्रपतींची राजधानी असलेला भूप्रदेश. इतर जिल्ह्यांच्या मानाने या जिल्ह्यात गुन्हेगारी कमी आहे, हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य मात्र गेल्या काही वर्षांत पुसले जात आहे. या जिल्ह्याच्या तथाकथित विकासाबरोबरच गुन्हेगारीचंही जाळं विणलं गेलं आहे. या गुन्हेगारीच्या जाळ्यामुळे इथले देवही सुरक्षित नाही याचा प्रत्यय श्रीवर्धनच्या सुवर्ण गणेशाच्या चोरीने संपूर्ण महाराष्ट्राला आला. त्याच रायगडमध्ये महिलांवरील अत्याचारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आम्ही दिल्लीच्या, कोपर्डीच्या  बलात्कार व हत्या प्रकरणाने संतप्त होतो, पण जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातही असाच प्रकार घडावा, एक कळी कुस्करुन तिला फेकून दिली जावी हा मोठा धक्का आहे. नैसर्गिक भूकंपात मानवी संस्कृत्या नष्ट होतात, पण वासनेच्या भूकंपात मानवी देह आणि मनाची लक्तरे होतात. हे वासनेचे भूकंप घडविणारे नराधम रायगड जिल्ह्यातही आहेत हे, अलिबाग तालुक्यातील श्रीगाणच्या घटनेवरुन दिसून येते.
    पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत अलिबाग-पेण मार्गावरील तीनविरानजिकच्या श्रीगाण आदिवासीवाडीवर ही अल्पवयीन मुलगी राहत होती. बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गावातील ही १६ वर्षांची मुलगी लहान मुलाच्या पाचवीचा कार्यक्रम आटोपून ती घरी जात असताना आरोपीने त्या मुलीला वाटेत गाठले. अंधाराचा ङ्गायदा घेत, त्याने त्या मुलीला रस्त्याशेजारी असणार्‍या मोकळ्या मैदानात नेले व तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी प्रतिकार करीत असल्याने, त्याने तिला दगडाने ठेचून ठार मारले. ही मुलगी ज्या आदिवासी वाडीवर राहात होती, त्याच आदिवासी वाडीवर आरोपी राहात होता. पोलिसांनी तातडीने तपास करुन गुरुवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान, म्हणजेच चोवीस तासांच्या आत त्या नराधमाला अटक केली.  पोलिसांनी या गंभीर गुन्हाची दखल घेऊन गुन्हेगारास जेरबंद केले हे अभिनंदनीय आहे. यात कोणतीही बडी हस्ती गुंतलेली नसल्यामुळे आणि गुन्हेगार आदिवासी असल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला वेग आला, काही का असेना पोलिस मनात आणले तर चोविस तासात गुन्हेगाराला जेरबंद करु शकतात, हे या घटनेवरुन दिसून आले आहे.
    १९९० साली २५ वर्षांपूर्वी अशीच घटना या परिसरात घडली होती, तेव्हाही पिडितेला बलात्कार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. कोळघर येथे राहणारी कै. नाना पाटील हायस्कूलची विद्यार्थीनी शाळेत येत असताना तिच्यावर एका नराधमाने बलात्कार केला आणि तिला सागरगडावरुन खाली फेकून दिले. तेव्हा तिला एका आदिवासीने वाचविले आणि या बलात्कार व जिवे मारण्याची हकीगत उजेडात आली. पण त्यावेळी गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांनी जिवाचा आकांत केला नाही. एवढी गंभीर घटना घडूनही पोलिस यंत्रणा ढिम्म राहिली, त्यावेळी स्व. प्रभाकर पाटील यांच्या कन्या मीनाक्षी पाटील यांनी रणचंडीचा अवतार धारण केला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर सुप्रिया जयंत पाटील, भारती हळदवणेकर, सुजाता पाटील यांच्यासह ना.ना. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थीनींचा मोर्चा नेऊन पोलीस अधीक्षकांना बांगड्यांचा आहेर केला. त्यानंतर यंत्रणा हलली आणि गुन्हेगार जेरबंद करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील बलात्कारितेला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा शाळकरी मुलींचा हा पहिला मोर्चा. आता कोपर्डीच्या घटनेच्या निमित्ताने २३ ऑक्टोबरला माणगाव येथे मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे, या मोर्चाची भूमिका कोपर्डीसह बलात्कार्‍यांना फाशी दिली जावी, अशी आहे. या दोन मोर्चांदरम्यान जिल्ह्यात बलात्कारांचा जो चढता आलेख राहिला आहे. त्यातून अशा नराधमांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही हेच दिसून येते. 
   श्रीगाणच्या घटनेत पोलिसांनी ताबडतोब कारवाई करुन गुन्हेगाराला जेरबंद केले, हे कौतुकास्पद असले तरी गेल्या सहा वर्षांत रायगड जिल्ह्यात बलात्कार, अल्पवयीन मुलींवर बलात्कार, विनयभंग, मुलींचे अपहरण अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, हे ठळक वास्तव आहे. महिला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांवर अंकुश बसावा यासाठी जिल्ह्यात यावर्षीपासून दामिनी पथकांची निर्मिती करण्यात आली असली तरी त्याची व्याप्ती शहरांपुरती मर्यादित असल्यामुळे महिलांसंदर्भातील गुन्हेगारीवर खर्‍या अर्थाने अंकुश बसलाच नाही. मुळांत महिलांवरील अत्याचार, विनयभंग व बलात्कार यांची खरी आकडेवारी कळत नाही. बरेच गुन्हे न्याय मिळणार नाही, किंवा बदनामी होईल, तसेच संबधितांचा दबाव यामुळे  प्रकाशात येत नाहीत. याचा अर्थ अत्याचारानंतर पीडितेचं आणि तिच्या कुटुंबियांचं मनोधैर्यच संपुष्टात येते, बरेचदा तिचेच कुटुंबिय तिच्यामागे आधारासाठी उभे रहात नाही, तर बर्‍याच प्रकरणात तिच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केली जाते, ही बाब बलात्कारितेच्या विरोधात जाते आणि त्यामुळे पोलिस ठाण्याची पायरी चढली जात नाही, परिणामी असे अनेक गुन्हे अंधारातच राहतात. याचा फायदा विकृत मनोवृत्तीला होतो आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत राहतो. त्यामुळे पोलिसांबद्दल समाजात विश्‍वास निर्माण होणे गरजेचे आहे. 
    महिलांवर अत्याचार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून संशयिताला कठोर कायदेशीर शिक्षा होणे जितके महत्वाचे आहे, तितकेच हे अत्याचारच होऊ नये अथवा ते रोखणे महत्वाचे आहे. तसेच महिलांवर होणार्‍या अन्याय-अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करून त्या कायद्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महिलांवरील लैगिंक अत्याचार व हिंसक हल्ले कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळेच थांबविता येऊ शकतील. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. पण दुर्दैवाने गुन्हेगारांना पाठिशी घातले जाते, त्यामुळे समाजाला मोर्चाचे शस्त्र वापरावे लागत असल्याचे सध्या महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने सुरु असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाने दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात हा मराठा क्रांती मूक मोर्चा निघण्याआधीच श्रीगाण येथे आदिवासी अल्पवयीन मुलींची बलात्कारानंतर हत्या केली जाणे यातून या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात येते. त्यामुळे यापुढचे आव्हान रायगड पोलीस असेच समर्थपणे पेलणार की महिलांवरील अत्याचारांची मालिका कायम सुरुच राहणार  याचे उत्तर सध्यातरी ठामपणे देता येत नाही. त्यामुळे सावधान असेच म्हणावेसे वाटते.


सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

...तर रायगडचे भोपाळ होईल!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


      रायगड जिल्ह्याला वायू गळती नवी नाही. तळोजा येथे ५ वर्षापूर्वी अमोनिया वायू गळतीने हाहाकार उडवला होता. त्यानंतर काही कारखान्यांत वायूगळतीच्या घटना घडल्या. ४ ऑक्टोबर रोजी पेझारी येथे आरसीएफमधून भरुन निघालेल्या लिक्विड अमोनियाच्या टँकरमधून वायूगळती सुरु झाली. या वायूगळतीवर नियंत्रण मिळवल्यामुळे कोणताही अनर्थ झाला नसला तरी भविष्यात सर्वच सुखद घडेल असे नाही. आपत्कालिन यंत्रणेचा अभाव, विविध वायू वाहतूक करणारे वाहन चालक यांना आपत्कालिन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण न दिले जाणे, वायूप्रदूषण, जलप्रदूषण, रासायनिक कारखान्यांचा बेफिकीरपणा, जिल्हा प्रशासनाची उदासिनता  या सर्व बाबींमुळे  रायगड जिल्हा संकटात सापडला आहे. त्यावर वेळीच इलाज केला नाही तर सगळेच नाईलाज होईल.
    रायगड जिल्हा कोकण किनारपट्टीवर असल्यामुळे त्याला अनेक संकटांनी सामोरे जावे लागते. समुद्र आहे म्हणजे शुद्ध हवेची हमी. पण तशी ती या जिल्ह्यात देता येत नाही, कारण या जिल्ह्यातील निसर्गाला चिरुन औद्योगिक विकास झाला, पण या विकासात येथील नद्या, खाड्या, समुद्र नासवला गेला. रासायनिक कारखान्यातील रासायनिक सांडपाणी नद्या-खाड्यांद्वारे समुद्रात जाते आणि समुद्राच्या खार्‍या वार्‍यालाही भयानक विषबाधा होते. अशा परिस्थितीत समुद्राकडून आता शुद्ध हवेची अपेक्षा करता येत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रदूषणकारी कारखान्यांवर नियंत्रण नियंत्रण राहिलेले नाही. या कारखानदारांशी असलेल्या ‘अर्थ’पूर्ण संबंधातून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्वत:वरच नियंत्रण राहिले नसावे, हे उघड आहे. मुळात घडत असलेले घात-अपघात पहाता येथे नियंत्रण आहे तरी कोणाचे असा प्रश्‍न उपस्थित होतो.  पेझारी येथील अमोनिया वायुगळती दुर्घटनेने रायगड जिल्हा पुन्हा एकदा कशाप्रकारच्या संकटात सामोरा जात आहे, हे दिसून आले.
    अलिबाग तालुक्यातील पोयनाडनजीकच्या पेझारी येथे राजकीय स्फोटाचा केंद्रबिंदू आहे. याच पेझारी चेकपोस्ट जवळ  मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान आरसीएफमधून लिक्विड अमोनिया भरुन पेणच्या दिशेने जाणार्‍या टँकरचा मागच्या बाजूचा व्हॉल्व्ह निघाल्याने अमोनिया वायूची मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या गळतीबाबत संबंधीतांना कळविण्याची साधी जाबाबदारी पार न पाडता टंँकर चालकाने तेथून पळ काढला. अमोनिया वायुच्या गळतीची बातमी मिळताच पोयनाड पोलीस, आरसीएफ कंपनीची रेस्न्यू टीम व फायर ब्रिगेड कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, पण भरवस्तीत असलेला हा रासायनिक बॉम्ब निर्मनुष्य ठिकाणी नेण्यासाठी यापैकी कोणीही हिंमत दाखवली नाही. ती हिमंत दाखवली पेझारी येथील चालक रोहन गजानन पाटील यांनी. त्यांनी प्रसंगावधान राखून, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तो टँकर आपले सर्व कसब पणाला लावून तीनविरा धरणाजवळ आणला. त्यानंतर रेस्न्यू टीमने गळती नियंत्रणात आणली. या घटनेने आपत्कालिन यंत्रणेचे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.
     जिल्ह्यात रायगडचे भोपाळ करु शकणारे अनेक रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांच्या रासायनिक सांडपाण्यामुळे नदी-खाड्यांतील मासे मरुन वर तरंगत असलेले नेहमी पहायला मिळतात. या कारखान्यांतून विषारी वायूंचीही गळती होत असते. त्याचे परिणामही स्थानिकांना भोगावे लागतात. पण प्रश्‍न असा आहे की आज मासे मरताहेत, जिल्हा प्रशासन माणसे मरण्याची वाट पहात आहे का? अशा प्रदूषणकारी आणि विषारी वायूंची गळती होणार्‍या कारखान्यांवर कारवाईचा बडगा महाराष्ट्र प्रदूषण मंडळ उगारणार नसेल तर त्याची मोठी किंमत या जिल्ह्याला चुकवावी लागेल. अमोनिया वायू गळतीचे भयानक हलाहल जिल्ह्याला पाच वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पचवावे लागले आहे.  तळोजात अमोनिया वायूच्या गळतीमुळे परिसराती ग्रामस्थांचा जीव तळमळला होता.
   तळोजाची घटना अशी आहे, मंगळवार, २३ नोव्हेंबर २०१० रोजी तळोजा औद्योगिक वसाहतीतील कामगारांना सुट्टी होती. परंतु प्लॉट क्रमांक एम ५ येथील रङ्गिक नायक ङ्गिश पॅकेजिंग कंपनीत काम सुरू होते. येथे दोनशेहून अधिक कामगार आहेत. काही महिलाही आहेत. मासे ताजे ठेवण्यासाठी या कंपनीत कोल्ड स्टोरेज विभाग आहे. बर्ङ्ग बनविण्यासाठी व या विभागातील थंड वातावरणासाठी अमोनिया वायूचा उपयोग केला जातो. या कंपनीत तीन टाक्यांमध्ये अमोनिया वायू साठविलेला होता. यापैकी एका टाकीतून सकाळी गळती झाली. कंपनीच्या प्लँट ऑपरेटरने तिथून पळ काढल्याने कामगारही घाबरले. तेही कंपनीबाहेर पळाले. यावेळी कंपनीत एकही जबाबदार अधिकारी नव्हता. पाहता पाहता हा वायू हवेवाटे कंपनीलगतच्या ढोंगर्‍याचा पाढा या गावात पसरला. कंपनी व गावाच्या परिसरातील झाडे अक्षरशः जळून गेली. सकाळची वेळ असल्याने मुलांची शाळेत व नोकरदारांची कामावर जाण्याची तयारी सुरू होती. काही समजण्यापूर्वीच श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला. डोळ्यांतून पाणी येऊ लागले. काही जण जागीच बेशुद्ध पडले. सुमारे ७० ग्रामस्थांना या वायूची बाधा झाली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी वायूबाधा झालेल्या ग्रामस्थांना कामोठे एमजीएम, वाशीतील एमजीएम व जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तळोजातील ही घटना भविष्यात यापेक्षाही मोठी दुर्घटना घडेल यांची घंटा होती. सुदैवाने पेझारीच्या घटनेत काही हानी झाली नाही, पण यापुढे गाफील राहून चालणार नाही.
   पेझारीच्या घटनेत आणि तळोजाच्या घटनेत साम्य शोधायचे झाले, तर दोन्ही घटनेचा वार हा मंगळवार होता. दोन्ही ठिकाणी अमोनिया वायू होता. पेझारीच्या घटनेत टँकर चालकाने तेथून पळ काढला तर तळोजाच्या घटनेत तेथील प्लँट ऑपरेटरने तेथून पळ काढला. याचा अर्थ प्रशिक्षण आणि आपत्कालिन यंत्रणेचा अभाव हेच आहे. तसे पाहिले तर टँकरमधून अमोनिया वायूची गळती होण्याचे प्रकार देशात, राज्यात सतत घडत असतात, या वायूची बाधा झालेल्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. एकप्रकारे विनाशकारी बॉम्बची बेफिकीरपणे वाहतूक होत असते आणि सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळेच अशा घटना वारंवार घडत असतात. मुळात ज्वालाग्राही, विषारी वायू वाहतूक करणार्‍या टँकर चालकांना विशेष प्रशिक्षण आवश्यक आहे. येथे केवळ वाहन चालवण्याचा अनुभव किंवा कौशल्य असून चालत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगावधान आणि आपत्कालिन यंत्रणा हाताळण्याची त्याची पात्रता असणे गरजेचे आहे. पण या चालकांमध्ये कोणतीही पात्रता निर्माण केली जात नाही. या टँकर कंपन्या खाजगी असतात, या सबबीखाली त्यांच्या प्रशिक्षणाची गरज न वाटणे म्हणजे टँकरबॉम्ब रस्तावरुन फिरवण्यासारखे आहे. पेझारीच्या घटनेने हेच सिद्ध केले आहे. 
    जर पेझारी ग्रामस्थांनी प्रंसगावधान दाखवले नसते तर अमोनिया गळतीचे भयानक दुष्परिणाम परिसराला भोगावे लागले असते. पोलीस, फायरब्रिगेड, आरसीएफची टीम यापैकी कोणाचेही अमोनिया गळती होणारा टँकर तीनविरापर्यंत चालवत नेण्याचे धाडस झाले नाही, यातून आपत्कालिन परिस्थितीवर ज्यांनी नियंत्रण मिळवायचे त्यांनीच कसे गुडघे टेकले, हे दिसून आले. उद्या जर अशी मोठी घटना घडली तर या कारखान्यांकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे कोणती आपत्कालिन व्यवस्था आहे? नसेल तर कामगार आणि येथील जनतेला मृत्यूच्या मुखात लोटण्याचा यांच्याकडे कोणता अधिकार आहे? येथील जल आणि जीवन निकोप राहिले तरच रायगडच्या औद्योगिकरणाला अर्थ आहे. जिल्ह्याला भाताचे कोठार म्हटले जाई त्यावेळी आर्थिक संपन्नता कमी होती, पण कृषीसंस्कृतीने माणसे मारली जात नव्हती, आता मात्र औद्योेगिक संस्कृतीने विकासाची व्याख्या बदलून येथील निसर्गाधारित जीवनच संपवले जात आहे. कुठे वायूगळती होते आहे, कुठे वायूबाधा होते आहे, कुठे वायूप्रदूषण होते आहे, कुठे जलप्रदूषण होते आहे, या जलप्रदूषणामुळे आज मासे मरताहेत, उद्या माणसे मरतील. सहन कुठपर्यंत करायचं हे रायगडकरांनी ठरवायची वेळ आली आहे. 



सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

... तरच लोकशाहीचा चौथा खांब मजबूत राहील

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


        रायगड जिल्ह्याला पत्रकारितेचा लढाऊ असा वारसा आहे आणि या वारशाची सुरुवात १८७०  साली रावजी हरी आठवले यांच्या साप्ताहिक ‘सत्यसदन’ या मराठी वृत्तपत्राने ज्या अलिबागेतून झाली, त्या रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबागमध्ये रविवार, २ ऑक्टोबर रोजी जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणारे, भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते महात्मा गांधी यांच्या जयंतीचे, तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील पत्रकारांचा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणे हा मोर्चा लाखोंचा नसला, तरी लाख मोलाचा होता हे निश्‍चित. पत्रकारांवर होत असलेले हल्ले, पत्रकार संरक्षण कायदा करण्यात सरकार जाणीवपूर्वक करीत असलेली टाळाटाळ आणि माध्यम प्रतिनिधीना बनावट गंभीर गुन्ह्यांखाली अडकविण्याचे राज्यात सर्रास होत असलेले प्रयत्न याच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार निर्धार मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात राज्यातील विविध पत्रकार संघटना आणि त्यांचे पंचवीसेक हजार पत्रकार सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्यातही अलिबाग येथे हा मोर्चा काढण्यात आला होता. ज्यांच्या लेखणीत क्रांती घडवायची ताकद आहे, त्या पत्रकारांना आपल्या मागण्यासाठी मोर्चा काढावा लागतो, यातून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यायला हरकत नसावी. 
       रायगड जिल्ह्याला पत्रकारितेचा लढाऊ असा वारसा आहे. या मातीने महाराष्ट्रास चांगले पत्रकार दिले. शिवराम महादेव परांजपे,  प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, नारायण मल्हार जोशी, रावजी हरी आठवले, द्वा.भ. कर्णिक, नारायण नागू पाटील, रामभाऊ मंडलिक आदी अनेकांनी पत्रकारितेची निस्पृह चळवळ राबवली. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेला एक वेगळे वलय आहे. रायगड जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक चळवळी, आंदोलने झाली. या चळवळीत, आंदोलनात येथील तत्कालिन साप्ताहिक वृत्तपत्रांनी, पत्रकारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. येथील सामाजिक सुधारणेसही येथील पत्रकारितेचा बहुमोल वाटा आहे. आज स्वातंत्र्यपूर्व काळातील कृषीवल सोडल्यास  इतर कोणतेही वृत्तपत्र सुरु नाही. असे असले तरी मुंबईच्या वृत्तपत्रांना टक्कर देऊ शकतील अशी रायगड टाइम्ससारखी दैनिके गेल्या काही वर्षात सुरु झाली आहेत. तसेच जुनी साप्ताहिके बंद पडली असली तरी अनेक नवी साप्ताहिकेही जिल्ह्यात सुरु झाली आहेत. त्यातील साप्ताहिक कोकणनामा आज संपूर्ण कोकणचेच नाही, तर महाराष्ट्राचे आपल्याकडे लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील अनेक दैनिकांची जिल्हा कार्यालये येथे सुरु झाली आहेत. या सर्व दैनिके, साप्ताहिके, तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी काम करणारे पत्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. या पत्रकारांना बदलत्या परिस्थितीत ग्रामीण, तसेच शहरी भागातही काम करताना तुटपुंजा मानधनावर काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत वस्तुस्थितीवर प्रकाशझोत टाकण्याच्या नादात समाजकंटकांनी केलेल्या मारहाणीलाही त्यांना सामोरे जावे लागत आहे.
        उर्वरित महाराष्ट्रात, तसेच देशातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. जे पत्रकार आपल्या लेखणीद्वारे समाजातील घाण वेशीवर टांगत आहेत त्या निर्भीड पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यांत व त्यात मृत्युमुखी पडणार्‍या पत्रकारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. ही बाब आपल्या लोकशाहीसाठी भूषणावह नाही. पत्रकार म्हणजे लोकशाही शासनव्यवस्थेचा चौथा स्तंभ असे मानण्याची प्रथा आहे व ती योग्यच आहे. आज या चवथ्या स्तंभावर सर्व बाजूंनी हल्ले होत आहेत. या चवथ्या स्तंभाच्या मुसक्या कशा बांधता येतील यासाठी सर्व प्रकारचे सत्ताधीश प्रयत्न करत असतात. या सत्ताधीशांत राजकारणी नेते आहेत, ज्येष्ठ नोकरशहा आहेत, भूमाङ्गिया आहेत, विविध कंत्राटदार आहेत व अधिकृत गुंडसुद्धा आहेत. थोडक्यात म्हणजे समाजात जे जे बेकायदेशीर कृत्यं व बेकायदेशीर व्यवहार करणारे आहेत त्या सर्वांना पत्रकार आपले शत्रू वाटतात. या सर्व समाजविरोधी शक्ती एकत्र येऊन पत्रकारांना दबावाखाली आणत आहेत. महाराष्ट्रात तर बलात्कार, विनयभंग, ऍट्रॉसिटी, खंडणीखोरीसारखे खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांना त्रस्त केले जात आहे. माध्यमांचे तोंड आवळण्याचे प्रयत्न चालले आहेत. 
        पत्रकारांवरील हल्ल्यांकडे गांभीर्याने पहाता, माध्यमांच्या बदलत्या प्रवाहाकडेही चिकित्सकपणे पाहणे आवश्यक आहे. पत्रकारिता व्रत आहे. तिची पैशांनी किंमत करता येणार नाही. परंतु वृत्तपत्रांकडे आता धंदा म्हणून पाहिले जाऊ लागले आहे, ही वस्तुस्थिती आहे. पूर्वी जनजागृतीसाठी, स्वातंत्र्यचळवळीला पूरक ठरण्यासाठी वृत्तपत्रे निर्माण झाली. आज परिस्थिती वेगळी आहे. आज जवळपास प्रत्येक मोठ्या उद्योगपतीचे व राजकारणी नेत्याचे स्वतःचे वृत्तपत्र आहे किंवा दूरचित्रवाणीची वाहिनी आहे. याचे कारण वृत्तपत्र किंवा चित्रवाणी चालवणे याचे काही दृश्य तर किंवा अदृश्य ङ्गायदे आहेत. म्हणूनच आजची पत्रकारिता एका बाजूने व्यावसायिक झाली आहे तर दुसर्‍या बाजूने त्यात बडे भांडवलदार आलेले आहेत. भांडवलदारांच्या हाती वृत्तपत्र गेल्यामुळे वृत्तपत्रांना दिमाखदारपणा आला, परंतु त्यांच्यात ‘राम’ राहिला नाही. लढाऊ बाणा त्यांच्यात उरला नाही. त्याच्यात ‘पॅकेज’ पत्रकारिता आल्यामुळे पत्रकारांना विकत घेता येते, असा दंभही या भांडवलदारांमध्ये निर्माण झाला. आज परस्थिती अशी आहे की, वृत्तपत्र मालक संपादकांना लाखो रुपयांची बोली लावून खरेदी करत असतात. त्यामुळे असे संपादक आपल्या पगाराशी इमानी असतात. त्यांना सहकार्‍यांच्या सुख:दुखाची किंवा जनतेवरील अन्यायाची चाड नसते. फक्त त्यांना ममता, जिव्हाळ्याची नाटके करावी लागतात. संपादक हस्तीदंती मनोर्‍यात बसून असतात. परंतु पत्रकारांना गुंडांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही लाठ्या-काठ्या खाव्या लागतात. मालकांना याच्याशी काही देणेघेणे नसते. म्हणूनच महाराष्ट्रात पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळावे या मागणीसाठी गेली आठ वर्षे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली जात आहेत. मात्र सरकार पत्रकारांना केवळ कोरडी आश्‍वासनं देत आलेले आहे. विद्यमान सरकारनेही कायद्याचा मसुदा तयार केला असला तरी तो गेली आठ महिने धूळखात पडून आहे. सरकार पत्रकार संरक्षण कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्याने दर चार दिवसाला एका पत्रकारावर राज्यात हल्ला होत आहे. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे समाजाला निर्भय करणार्‍या पत्रकाराच्या डोक्यावरच भितीची टांगती तलवार आहे. 
       २०१४ साली ६९  पत्रकारांवर हल्ले झाले, २०१५ साली दैनिकांची कार्यालयं आणि पत्रकारावरील हल्ल्याच्या ८७ घटना घडल्या तर २०१६ या चालू वर्षी गेल्या आठ महिन्यांत ६२ पत्रकारांवर हल्ले झाले आहे. सरकारी उदासिनतेमुळे ही आकडेवारी वर्षअखेरपर्यंत अधिकच फुगणार आहे. एकीकडे सरकार डॉक्टरांना कायदेशीर संरक्षण देते, जोडीला आता शासकीय अधिकार्‍यांसाठी कायदा करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असताना पत्रकारांना कायदेशीर संरक्षण द्यावे, असे सरकारला वाटत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. पत्रकार असुरक्षित राहावा, त्याचा आर्थिक स्तर खालावलेला राहावा असे प्रत्येक सरकारांमधील धुरिणांनाच वाटत नाही तर वृत्तपत्रांच्या मालकांनाही वाटते. त्यामुळे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठीच्या लढ्यात मोठ्या वृत्तपत्रांचा कोणी वृत्तपत्र मालक उतरला आहे, असे दिसत नाही. ही परस्थिती बदलली पाहिजे. आज जे पत्रकारांना भोगावे लागत आहे, ते उद्या वृत्तपत्रांच्या मालकांनाही भोगावे लागणार आहे. वृत्तपत्र कार्यालयांवरील हल्ल्यांचे रुपांतर मालकांवरील हल्ल्यांत कधी होईल हे कळणारही नाही. त्यामुळे आताच सावध झाले पाहिजे. मालक, संपादक, पत्रकार आणि वाचक यांची वज्रमुठ जर अन्याय, अत्याचार या विरुद्ध उचलली गेली तर त्यात या सर्व घटकांचे भलेच होणार आहे. राज्यात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या मार्फत विविध पत्रकार संघटनांनी पत्रकार असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशीच्या दिवशीच निषेध मोर्चाद्वारे आपल्या मूकभावनांना वाट करुन दिली, पण राज्य सरकार मुके, बहिरे, आंधळे असल्याचे ढोंग करीत आहे. सरकारला लोकशाहीचा चौथा खांब तोडायचा आहे काय? हा खांब तोडण्याचा सरकारने प्रयत्न केला तर ज्या फांदीवर बसला आहे, त्याच फांदीला तोडणार्‍या शेखचिल्लीसारखी सरकारची अवस्था होईल, हे लक्षात घ्यावे आणि आपली व आधीच्या सरकारांची चूक सुधारुन पत्रकार संरक्षण कायदा करावा. तसे केले तरच लोकशाहीचा चौथा खांब मजबूत राहील आणि इतर तिनही खांब त्यामुुळे शाबूत राहतील. इतकेच.