-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
रायगड जिल्ह्याला वायू गळती नवी नाही. तळोजा येथे ५ वर्षापूर्वी अमोनिया वायू गळतीने हाहाकार उडवला होता. त्यानंतर काही कारखान्यांत वायूगळतीच्या घटना घडल्या. ४ ऑक्टोबर रोजी पेझारी येथे आरसीएफमधून भरुन निघालेल्या लिक्विड अमोनियाच्या टँकरमधून वायूगळती सुरु झाली. या वायूगळतीवर नियंत्रण मिळवल्यामुळे कोणताही अनर्थ झाला नसला तरी भविष्यात सर्वच सुखद घडेल असे नाही. आपत्कालिन यंत्रणेचा अभाव, विविध वायू वाहतूक करणारे वाहन चालक यांना आपत्कालिन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण न दिले जाणे, वायूप्रदूषण, जलप्रदूषण, रासायनिक कारखान्यांचा बेफिकीरपणा, जिल्हा प्रशासनाची उदासिनता या सर्व बाबींमुळे रायगड जिल्हा संकटात सापडला आहे. त्यावर वेळीच इलाज केला नाही तर सगळेच नाईलाज होईल.
रायगड जिल्हा कोकण किनारपट्टीवर असल्यामुळे त्याला अनेक संकटांनी सामोरे जावे लागते. समुद्र आहे म्हणजे शुद्ध हवेची हमी. पण तशी ती या जिल्ह्यात देता येत नाही, कारण या जिल्ह्यातील निसर्गाला चिरुन औद्योगिक विकास झाला, पण या विकासात येथील नद्या, खाड्या, समुद्र नासवला गेला. रासायनिक कारखान्यातील रासायनिक सांडपाणी नद्या-खाड्यांद्वारे समुद्रात जाते आणि समुद्राच्या खार्या वार्यालाही भयानक विषबाधा होते. अशा परिस्थितीत समुद्राकडून आता शुद्ध हवेची अपेक्षा करता येत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रदूषणकारी कारखान्यांवर नियंत्रण नियंत्रण राहिलेले नाही. या कारखानदारांशी असलेल्या ‘अर्थ’पूर्ण संबंधातून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्वत:वरच नियंत्रण राहिले नसावे, हे उघड आहे. मुळात घडत असलेले घात-अपघात पहाता येथे नियंत्रण आहे तरी कोणाचे असा प्रश्न उपस्थित होतो. पेझारी येथील अमोनिया वायुगळती दुर्घटनेने रायगड जिल्हा पुन्हा एकदा कशाप्रकारच्या संकटात सामोरा जात आहे, हे दिसून आले.
अलिबाग तालुक्यातील पोयनाडनजीकच्या पेझारी येथे राजकीय स्फोटाचा केंद्रबिंदू आहे. याच पेझारी चेकपोस्ट जवळ मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान आरसीएफमधून लिक्विड अमोनिया भरुन पेणच्या दिशेने जाणार्या टँकरचा मागच्या बाजूचा व्हॉल्व्ह निघाल्याने अमोनिया वायूची मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या गळतीबाबत संबंधीतांना कळविण्याची साधी जाबाबदारी पार न पाडता टंँकर चालकाने तेथून पळ काढला. अमोनिया वायुच्या गळतीची बातमी मिळताच पोयनाड पोलीस, आरसीएफ कंपनीची रेस्न्यू टीम व फायर ब्रिगेड कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, पण भरवस्तीत असलेला हा रासायनिक बॉम्ब निर्मनुष्य ठिकाणी नेण्यासाठी यापैकी कोणीही हिंमत दाखवली नाही. ती हिमंत दाखवली पेझारी येथील चालक रोहन गजानन पाटील यांनी. त्यांनी प्रसंगावधान राखून, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तो टँकर आपले सर्व कसब पणाला लावून तीनविरा धरणाजवळ आणला. त्यानंतर रेस्न्यू टीमने गळती नियंत्रणात आणली. या घटनेने आपत्कालिन यंत्रणेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
जिल्ह्यात रायगडचे भोपाळ करु शकणारे अनेक रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांच्या रासायनिक सांडपाण्यामुळे नदी-खाड्यांतील मासे मरुन वर तरंगत असलेले नेहमी पहायला मिळतात. या कारखान्यांतून विषारी वायूंचीही गळती होत असते. त्याचे परिणामही स्थानिकांना भोगावे लागतात. पण प्रश्न असा आहे की आज मासे मरताहेत, जिल्हा प्रशासन माणसे मरण्याची वाट पहात आहे का? अशा प्रदूषणकारी आणि विषारी वायूंची गळती होणार्या कारखान्यांवर कारवाईचा बडगा महाराष्ट्र प्रदूषण मंडळ उगारणार नसेल तर त्याची मोठी किंमत या जिल्ह्याला चुकवावी लागेल. अमोनिया वायू गळतीचे भयानक हलाहल जिल्ह्याला पाच वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पचवावे लागले आहे. तळोजात अमोनिया वायूच्या गळतीमुळे परिसराती ग्रामस्थांचा जीव तळमळला होता.
तळोजाची घटना अशी आहे, मंगळवार, २३ नोव्हेंबर २०१० रोजी तळोजा औद्योगिक वसाहतीतील कामगारांना सुट्टी होती. परंतु प्लॉट क्रमांक एम ५ येथील रङ्गिक नायक ङ्गिश पॅकेजिंग कंपनीत काम सुरू होते. येथे दोनशेहून अधिक कामगार आहेत. काही महिलाही आहेत. मासे ताजे ठेवण्यासाठी या कंपनीत कोल्ड स्टोरेज विभाग आहे. बर्ङ्ग बनविण्यासाठी व या विभागातील थंड वातावरणासाठी अमोनिया वायूचा उपयोग केला जातो. या कंपनीत तीन टाक्यांमध्ये अमोनिया वायू साठविलेला होता. यापैकी एका टाकीतून सकाळी गळती झाली. कंपनीच्या प्लँट ऑपरेटरने तिथून पळ काढल्याने कामगारही घाबरले. तेही कंपनीबाहेर पळाले. यावेळी कंपनीत एकही जबाबदार अधिकारी नव्हता. पाहता पाहता हा वायू हवेवाटे कंपनीलगतच्या ढोंगर्याचा पाढा या गावात पसरला. कंपनी व गावाच्या परिसरातील झाडे अक्षरशः जळून गेली. सकाळची वेळ असल्याने मुलांची शाळेत व नोकरदारांची कामावर जाण्याची तयारी सुरू होती. काही समजण्यापूर्वीच श्वसनाचा त्रास जाणवू लागला. डोळ्यांतून पाणी येऊ लागले. काही जण जागीच बेशुद्ध पडले. सुमारे ७० ग्रामस्थांना या वायूची बाधा झाली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी वायूबाधा झालेल्या ग्रामस्थांना कामोठे एमजीएम, वाशीतील एमजीएम व जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तळोजातील ही घटना भविष्यात यापेक्षाही मोठी दुर्घटना घडेल यांची घंटा होती. सुदैवाने पेझारीच्या घटनेत काही हानी झाली नाही, पण यापुढे गाफील राहून चालणार नाही.
पेझारीच्या घटनेत आणि तळोजाच्या घटनेत साम्य शोधायचे झाले, तर दोन्ही घटनेचा वार हा मंगळवार होता. दोन्ही ठिकाणी अमोनिया वायू होता. पेझारीच्या घटनेत टँकर चालकाने तेथून पळ काढला तर तळोजाच्या घटनेत तेथील प्लँट ऑपरेटरने तेथून पळ काढला. याचा अर्थ प्रशिक्षण आणि आपत्कालिन यंत्रणेचा अभाव हेच आहे. तसे पाहिले तर टँकरमधून अमोनिया वायूची गळती होण्याचे प्रकार देशात, राज्यात सतत घडत असतात, या वायूची बाधा झालेल्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. एकप्रकारे विनाशकारी बॉम्बची बेफिकीरपणे वाहतूक होत असते आणि सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळेच अशा घटना वारंवार घडत असतात. मुळात ज्वालाग्राही, विषारी वायू वाहतूक करणार्या टँकर चालकांना विशेष प्रशिक्षण आवश्यक आहे. येथे केवळ वाहन चालवण्याचा अनुभव किंवा कौशल्य असून चालत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगावधान आणि आपत्कालिन यंत्रणा हाताळण्याची त्याची पात्रता असणे गरजेचे आहे. पण या चालकांमध्ये कोणतीही पात्रता निर्माण केली जात नाही. या टँकर कंपन्या खाजगी असतात, या सबबीखाली त्यांच्या प्रशिक्षणाची गरज न वाटणे म्हणजे टँकरबॉम्ब रस्तावरुन फिरवण्यासारखे आहे. पेझारीच्या घटनेने हेच सिद्ध केले आहे.
जर पेझारी ग्रामस्थांनी प्रंसगावधान दाखवले नसते तर अमोनिया गळतीचे भयानक दुष्परिणाम परिसराला भोगावे लागले असते. पोलीस, फायरब्रिगेड, आरसीएफची टीम यापैकी कोणाचेही अमोनिया गळती होणारा टँकर तीनविरापर्यंत चालवत नेण्याचे धाडस झाले नाही, यातून आपत्कालिन परिस्थितीवर ज्यांनी नियंत्रण मिळवायचे त्यांनीच कसे गुडघे टेकले, हे दिसून आले. उद्या जर अशी मोठी घटना घडली तर या कारखान्यांकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे कोणती आपत्कालिन व्यवस्था आहे? नसेल तर कामगार आणि येथील जनतेला मृत्यूच्या मुखात लोटण्याचा यांच्याकडे कोणता अधिकार आहे? येथील जल आणि जीवन निकोप राहिले तरच रायगडच्या औद्योगिकरणाला अर्थ आहे. जिल्ह्याला भाताचे कोठार म्हटले जाई त्यावेळी आर्थिक संपन्नता कमी होती, पण कृषीसंस्कृतीने माणसे मारली जात नव्हती, आता मात्र औद्योेगिक संस्कृतीने विकासाची व्याख्या बदलून येथील निसर्गाधारित जीवनच संपवले जात आहे. कुठे वायूगळती होते आहे, कुठे वायूबाधा होते आहे, कुठे वायूप्रदूषण होते आहे, कुठे जलप्रदूषण होते आहे, या जलप्रदूषणामुळे आज मासे मरताहेत, उद्या माणसे मरतील. सहन कुठपर्यंत करायचं हे रायगडकरांनी ठरवायची वेळ आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा