सोमवार, १७ ऑक्टोबर, २०१६

...हा तर मानवतेवर बलात्कार!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


      रायगड जिल्हा हा शिवछत्रपतींची राजधानी असलेला भूप्रदेश. इतर जिल्ह्यांच्या मानाने या जिल्ह्यात गुन्हेगारी कमी आहे, हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य मात्र गेल्या काही वर्षांत पुसले जात आहे. या जिल्ह्याच्या तथाकथित विकासाबरोबरच गुन्हेगारीचंही जाळं विणलं गेलं आहे. या गुन्हेगारीच्या जाळ्यामुळे इथले देवही सुरक्षित नाही याचा प्रत्यय श्रीवर्धनच्या सुवर्ण गणेशाच्या चोरीने संपूर्ण महाराष्ट्राला आला. त्याच रायगडमध्ये महिलांवरील अत्याचारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आम्ही दिल्लीच्या, कोपर्डीच्या  बलात्कार व हत्या प्रकरणाने संतप्त होतो, पण जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातही असाच प्रकार घडावा, एक कळी कुस्करुन तिला फेकून दिली जावी हा मोठा धक्का आहे. नैसर्गिक भूकंपात मानवी संस्कृत्या नष्ट होतात, पण वासनेच्या भूकंपात मानवी देह आणि मनाची लक्तरे होतात. हे वासनेचे भूकंप घडविणारे नराधम रायगड जिल्ह्यातही आहेत हे, अलिबाग तालुक्यातील श्रीगाणच्या घटनेवरुन दिसून येते.
    पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत अलिबाग-पेण मार्गावरील तीनविरानजिकच्या श्रीगाण आदिवासीवाडीवर ही अल्पवयीन मुलगी राहत होती. बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गावातील ही १६ वर्षांची मुलगी लहान मुलाच्या पाचवीचा कार्यक्रम आटोपून ती घरी जात असताना आरोपीने त्या मुलीला वाटेत गाठले. अंधाराचा ङ्गायदा घेत, त्याने त्या मुलीला रस्त्याशेजारी असणार्‍या मोकळ्या मैदानात नेले व तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी प्रतिकार करीत असल्याने, त्याने तिला दगडाने ठेचून ठार मारले. ही मुलगी ज्या आदिवासी वाडीवर राहात होती, त्याच आदिवासी वाडीवर आरोपी राहात होता. पोलिसांनी तातडीने तपास करुन गुरुवारी संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान, म्हणजेच चोवीस तासांच्या आत त्या नराधमाला अटक केली.  पोलिसांनी या गंभीर गुन्हाची दखल घेऊन गुन्हेगारास जेरबंद केले हे अभिनंदनीय आहे. यात कोणतीही बडी हस्ती गुंतलेली नसल्यामुळे आणि गुन्हेगार आदिवासी असल्यामुळे पोलिसांच्या कारवाईला वेग आला, काही का असेना पोलिस मनात आणले तर चोविस तासात गुन्हेगाराला जेरबंद करु शकतात, हे या घटनेवरुन दिसून आले आहे.
    १९९० साली २५ वर्षांपूर्वी अशीच घटना या परिसरात घडली होती, तेव्हाही पिडितेला बलात्कार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. कोळघर येथे राहणारी कै. नाना पाटील हायस्कूलची विद्यार्थीनी शाळेत येत असताना तिच्यावर एका नराधमाने बलात्कार केला आणि तिला सागरगडावरुन खाली फेकून दिले. तेव्हा तिला एका आदिवासीने वाचविले आणि या बलात्कार व जिवे मारण्याची हकीगत उजेडात आली. पण त्यावेळी गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांनी जिवाचा आकांत केला नाही. एवढी गंभीर घटना घडूनही पोलिस यंत्रणा ढिम्म राहिली, त्यावेळी स्व. प्रभाकर पाटील यांच्या कन्या मीनाक्षी पाटील यांनी रणचंडीचा अवतार धारण केला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर सुप्रिया जयंत पाटील, भारती हळदवणेकर, सुजाता पाटील यांच्यासह ना.ना. पाटील हायस्कूलच्या विद्यार्थीनींचा मोर्चा नेऊन पोलीस अधीक्षकांना बांगड्यांचा आहेर केला. त्यानंतर यंत्रणा हलली आणि गुन्हेगार जेरबंद करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील बलात्कारितेला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा शाळकरी मुलींचा हा पहिला मोर्चा. आता कोपर्डीच्या घटनेच्या निमित्ताने २३ ऑक्टोबरला माणगाव येथे मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे, या मोर्चाची भूमिका कोपर्डीसह बलात्कार्‍यांना फाशी दिली जावी, अशी आहे. या दोन मोर्चांदरम्यान जिल्ह्यात बलात्कारांचा जो चढता आलेख राहिला आहे. त्यातून अशा नराधमांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही हेच दिसून येते. 
   श्रीगाणच्या घटनेत पोलिसांनी ताबडतोब कारवाई करुन गुन्हेगाराला जेरबंद केले, हे कौतुकास्पद असले तरी गेल्या सहा वर्षांत रायगड जिल्ह्यात बलात्कार, अल्पवयीन मुलींवर बलात्कार, विनयभंग, मुलींचे अपहरण अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, हे ठळक वास्तव आहे. महिला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांवर अंकुश बसावा यासाठी जिल्ह्यात यावर्षीपासून दामिनी पथकांची निर्मिती करण्यात आली असली तरी त्याची व्याप्ती शहरांपुरती मर्यादित असल्यामुळे महिलांसंदर्भातील गुन्हेगारीवर खर्‍या अर्थाने अंकुश बसलाच नाही. मुळांत महिलांवरील अत्याचार, विनयभंग व बलात्कार यांची खरी आकडेवारी कळत नाही. बरेच गुन्हे न्याय मिळणार नाही, किंवा बदनामी होईल, तसेच संबधितांचा दबाव यामुळे  प्रकाशात येत नाहीत. याचा अर्थ अत्याचारानंतर पीडितेचं आणि तिच्या कुटुंबियांचं मनोधैर्यच संपुष्टात येते, बरेचदा तिचेच कुटुंबिय तिच्यामागे आधारासाठी उभे रहात नाही, तर बर्‍याच प्रकरणात तिच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केली जाते, ही बाब बलात्कारितेच्या विरोधात जाते आणि त्यामुळे पोलिस ठाण्याची पायरी चढली जात नाही, परिणामी असे अनेक गुन्हे अंधारातच राहतात. याचा फायदा विकृत मनोवृत्तीला होतो आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत राहतो. त्यामुळे पोलिसांबद्दल समाजात विश्‍वास निर्माण होणे गरजेचे आहे. 
    महिलांवर अत्याचार झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून संशयिताला कठोर कायदेशीर शिक्षा होणे जितके महत्वाचे आहे, तितकेच हे अत्याचारच होऊ नये अथवा ते रोखणे महत्वाचे आहे. तसेच महिलांवर होणार्‍या अन्याय-अत्याचारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करून त्या कायद्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महिलांवरील लैगिंक अत्याचार व हिंसक हल्ले कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळेच थांबविता येऊ शकतील. गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. पण दुर्दैवाने गुन्हेगारांना पाठिशी घातले जाते, त्यामुळे समाजाला मोर्चाचे शस्त्र वापरावे लागत असल्याचे सध्या महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने सुरु असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाने दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात हा मराठा क्रांती मूक मोर्चा निघण्याआधीच श्रीगाण येथे आदिवासी अल्पवयीन मुलींची बलात्कारानंतर हत्या केली जाणे यातून या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात येते. त्यामुळे यापुढचे आव्हान रायगड पोलीस असेच समर्थपणे पेलणार की महिलांवरील अत्याचारांची मालिका कायम सुरुच राहणार  याचे उत्तर सध्यातरी ठामपणे देता येत नाही. त्यामुळे सावधान असेच म्हणावेसे वाटते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा