सोमवार, २३ मे, २०१६

ज्येष्ठ नागरिक भवन झाले हो!

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉



      अलिबाग तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांना एक हक्काचे स्थान असावे या हेतूने अलिबाग नगरपालिकेने जुन्या नगरपालिकेसमोर ज्येष्ठ नागरिक भवन ही दोन मजली इमारत उभारली आहे. या वास्तूचा हस्तांतरण सोहळा अलिबाग नगरपालिकेने मंगळवार, २४ मे रोजी राज्याचे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत बच्चू पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या हस्तातरण सोहळ्यास आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, अलिबाग ज्येष्ठ संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू, रायगड शेकापचे सहचिटणीस, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, सौ. अंजली पाटील, जिल्हा परिषद सदस्य आस्वाद पाटील, शेकापच्या जिल्हा आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे गजेंद्र दळी, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष डी.डी. नाईक, सखाराम पवार, नगरिपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर आदी मान्यवर व्यासपीठावर असणार आहेत. त्यानिमित्त हा लेख.
     अलिबाग बदलते आहे. काही बदल येथील निसर्गाचा घास घेऊन होत असले तरी काही बदल निसर्गाचा ध्यास घेऊन होत आहेत. शेवटी सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन बाबींशिवाय कुठल्याही गोष्टीला पूर्णत्व नसते. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात, याला अलिबागही अपवाद नाही. एकेकाळचे निसर्गसंपन्न अलिबाग हे निवृत्तांचे विश्रांतीचे गाव समजले जायचे. त्यावेळी अलिबाग हे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असले, तरी तेथील लोकांच्या मनात ‘आपले हे गाव भारी न्यारे’ अशीच भावना होती. आज हे गाव उलटे-सुलटे फुगले आहे. एक दिमाखदार शहर म्हणून ते ओळखले जात आहे. पण ही ओळख तयार होत असताना येथील नारळी-पोफळींच्या वाड्या जादूची कांडी फिरवावी त्याप्रमाणे नाहीशा झाल्या आणि त्याजागी सिमेंट कॉंक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या. अलिबागची निवृत्तांचे गाव ही ओळख पुसली गेली असली तरी ज्येष्ठ नागरिकांची चळवळ सुरु असलेले शहर म्हणून अलिबागचे नाव राज्यात आदराने घेतले जाते.
      निवृत्त ज्येष्ठ नागरिक अलिबागेत कालही होते आजही आहेत, फक्त आजच्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:पुरते न पाहता समाज आणि ज्येष्ठ यांच्यातील सेतू बनून ज्येष्ठांचे जीवन सुखकर बनवण्याचा चंग बांधला आहे. अलिबागेत दोन दशकभरापूर्वी ज्येष्ठ नागरिक चळवळ सुरु झाली. निवृत्त न्यायाधीश एम.एम. पारकर यांनी १९९३ साली ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागची स्थापना केली. ते या संस्थेचे पहिले संस्थापक-अध्यक्ष. त्यानंतर डी.डी. घरत व डी.डी. नाईक यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. याच्याकडे-त्याच्याकडे बसून ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कामकाज पहाणार्‍या ज्येष्ठांची अडचण ओळखून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या कारकीर्दीत अलिबाग नगरपालिकेने आपल्या जुन्या वास्तूत एक खोली अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेसाठी तात्पुरती दिली. याच जागेतून ज्येष्ठ नागरिक संस्थेचा पसारा वाढला आणि त्यांना आपल्या हक्काच्या वास्तूची गरज जाणवू लागली. विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील आणि अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ज्येष्ठांसाठी अद्ययावत ज्येष्ठ नागरिक भवन बांधण्याचे मनावर घेतले. कै. भाऊसाहेब लेले चौकात, जुन्या नगरपालिकेसमोर अलिबाग नगरपालिकेने ३५ लाखांहून अधिक खर्च करून दिमाखदार ज्येष्ठ नागरिक भवन उभारले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारे अद्ययावत वास्तू उभारण्यासाठी निधी उपलब्ध करणारी राज्यातील क वर्गातील अलिबाग ही एकमेव नगरपालिका ठरली आहे.
      अलिबागच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हक्काचे स्थान मिळाले आहे. या वास्तूतून ज्येष्ठांच्या अडीअडचणी, ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्याचे कार्य पुन्हा नव्या जोमाने सुरु होईल. ज्येष्ठांना एकत्र बसून विचारांचे आदानप्रदान करायला, आनंद एकमेकांना वाटायला, विविध समाजपोयोगी, ज्येष्ठोपयोगी कार्यक्रम आयोजित करायला या वास्तूचा उपयोग होणार आहे. आजच्या ज्येष्ठांनी या वास्तूसाठी खूप पाठपुरावा केला आहे. त्यामुळे उद्या ज्येष्ठ होणार्‍यांच्या हाती हा वारसा आयता पडणार आहे. आजच्या ज्येष्ठांनी आपल्या कार्याने आणि या वास्तूने आदर्श घालून दिला आहे. तुम्ही एकाकी नाही, असेच ही वास्तू सुचवत आहे. म्हणूणच या वास्तूच्या एका भिंतीवर भव्य अशा वटवृक्षाचे आणि सहकार्यास तत्पर असलेल्या आश्‍वासक हातांचे चित्र चितारले आहे आणि त्याखाली बोधवाक्य लिहिले आहे, ‘एकटे... पण एकाकी नाही.’ ही वास्तू... यातील ज्येष्ठ नागरिक एक कुटुंबियच आहेत. त्यामुळे ते कधी एकाकी पडणार नाहीत.
      या ज्येष्ठ नागरिक संस्थेने एक कार्यकर्त्यांची फळीच निर्माण केली आहे. अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ल.नी. नातू यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काची जागा असावी असा ध्यास घेतला, गावोगावी ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन व्हाव्या यासाठी पायाला चक्र लावले. त्याचे फळ म्हणून आज अलिबाग तालुक्यात अलिबाग धरुन एकूण १८ ज्येष्ठ नागरिक संस्था आहेत. भविष्यात ज्येष्ठ नागरिक संस्थेचे जाळे दाटपणे विणले जाणार आहे. ल.नी. नातू यांच्याबरोबरच या संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष डी.डी. नाईक, गजेंद्र दळी, श्रीरंग घरत, प्रफुल्ल राऊत, दीनानाथ तरे या मान्यवरांसह दिवंगत दिनेश शेठ, प्रतापराव सरनाईक यांनी या ज्येष्ठ नागरिक संस्थेसाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागने अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. मानवी मनांची मशागत करण्यासाठी मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली आहेत. वृद्धांच्या समस्या सोडवणे, त्यांचे अधिकार समजावून देणे याबाबत ही संस्था अग्रेसर राहिली आहे. त्याबाबत तज्ज्ञांची व्याख्यानेही ज्येष्ठांसाठी लाभदायक ठरली आहेत.
      आपल्या हक्कांसाठी जगातील सारे ज्येष्ठ नागरिक जागरुक झाले आहेत. महाराष्ट्रातही या चळवळीने जोर धरला. त्यामुळे सरकारला ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकाराबद्दल संवेदनशील व्हावे लागले. त्यांच्या सोयीसुविधांबाबत सरकारला दखल घ्यावी लागत आहे. पण यासाठी ज्येष्ठांना एका वेगळ्यापातळीवर शांततामय मार्गाने संघर्ष करावा लागला आहे. संघर्ष केल्याशिवाय आपल्या देशात काही मिळत नाही, हे म्हणतात ते काही खोटे नाही. ज्येष्ठांच्या प्रश्‍नांबाबत राज्यात अजूनही संघर्ष सुरु आहे, परंतु अलिबागमध्ये मात्र ज्येष्ठ नागरिक भवनासाठी असा संघर्ष करावा लागलेला नाही. ज्येष्ठांनी पाठपुरावा केल्यानंतर आ. जयंत पाटील आणि नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी हे शिवधनुष्य उचललं आणि ज्येष्ठ नागरिक भवन ही वास्तू उभी राहिली आहे. याबाबत अलिबाग नगरपालिकेचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. तथापि अलिबागच्या वैभवात भर घालणार्‍या आणखी काही वास्तूंची अलिबागकरांना प्रतिक्षा आहे, त्याची अलिबाग नगरपालिकेने परिपूर्तता केली तर ‘सोनेपे सुहागा’ असे म्हणता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा