बुधवार, ११ मे, २०१६

पालकमंत्री, हाजिर हो!

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


     रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता येथील जनतेसाठी गूढ बनले आहे. त्यांच्याभोवतीचे हे गूढ वलय या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडल्यापासून आहे. कारण रायगड जिल्ह्यात ते कार्यकर्त्यांच्या हाती लागत नव्हते, की जनतेच्या हाती लागत नाहीत. पण खुद्द १ मे रोजी जिल्हा मुख्यालयाच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहुन या जिल्ह्याचे आपल्याला काही पडले नाही, हे त्यांनी दाखवून दिले. अलिबागच्या पोलीस परेड मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापनदिन मुख्य ध्वजारोहण समारंभ  रायगड जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या अनुपस्थितीत पार पडला. पालकमंत्र्यांच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी शितल उगले यांनी ध्वजारोहण केले आणि पोलीस मानवंदना स्वीकारली. 
     १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या दिवशी जिल्हास्तरावर होणार्‍या मुख्य ध्वजारोहण समारंभाला त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हजेरी लावावी आणि ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारावी व संचलनाची पहाणी करावी हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मोठ्या अभिमानाने या सोहळ्यांना हजेरी लावत आले आहेत. पण रायगड जिल्ह्यात याला अपवाद ठरले प्रकाश महेता. रायगड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ध्वजारोहण समारंभाला उपस्थित न राहणारे पालकमंत्री ठरले आहेत. यापूर्वीच्या कॉंग्रेस असो, वा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालकमंत्र्यांनी कधीही महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहुन या जाहीर कार्यक्रमाचा, उपस्थितांचा, राजशिष्टाचाराचा अवमान केला नव्हता, पण हा अवमान भाजपच्या पालकमंत्र्याकडून झाला आहे.
    पालकमंत्री प्रकाश मेहता वेळ पाळण्याबाबत प्रसिद्ध नाहीत. अनेक कार्यक्रमांत त्यांची लेटलतिफी दिसून आली आहे. पत्रकारपरिषद बोलावून स्वत: तासादोनतासांनी उपस्थित राहण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.  आपला पालकमंत्री म्हणून अनेक सामाजिक तसेच राजकीय संस्था त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करतात, ते निमंत्रण स्वीकारतात. निमंत्रण पत्रिका छापून होतात. कार्यक्रमाला येतोच म्हणून सांगतात, मात्र ऐनवेळी आपण येणार नसल्याचे आयोजकांना कळवतात. अनेकदा कळवण्याचे सौजन्यही दाखवत नाहीत. राजकारणात इतकं अविश्‍वासू बनून चालत नाही. पालकमंत्री म्हणून प्रकाश महेता यांनी जनतेचा विश्‍वास कमावला नाही, पर्यायाने याचा दुष्परिणाम जिल्ह्यातील भाजपच्या प्रसारावर होत आहे. पालकमंत्र्यांची निष्क्रियता विरोधकांच्या पथ्यावर पडत आहे. १ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रकाश महेता यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना गृहनिर्माण, कामगार आणि खाण मंत्री म्हणून घोषित करण्यात आले. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी २६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अशी जबाबदारी सोपविली. पण महेता यांच्या मनाविरुद्ध ही जबाबदारी सोपवली असल्यामुळे त्यांना या जबाबदारीचं ओझं झालं आहे. 
     मुळात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना कोकणातील रत्नागिरी किंवा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे असताना त्यांना एकदम मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले. रायगडचे खासदार अणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यातील वाद यास कारणीभूत ठरला. त्यातच कदम हे विधानसभेवर निवडून गेलेले आमदार नाहीत तर २००९ ला गुहागरमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर सदस्य करण्यात आले होते. पालकमंत्री म्हणून कदम यांचा कोकणात वावर असू नये याबाबत गीते प्रयत्नशील होते. गीते यांनी दिल्लीहून याकरिता सूत्र हलवली. त्यामुळे त्यांना कोकणाऐवजी थेट मराठवाड्यात पाठवण्यात आले.पालकमंत्रीपदी राहून कोकणात आपला जनाधार पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न रामदास कदम यांच्याकडून होणार होता. मात्र त्यांच्या या मोहिमेवर गदा आणण्यात आली. कदमांबाबत येथेही प्रेम नसल्याने त्यांची मराठवाड्यातील पाठवणी चर्चेची बाब ठरली नाही. तथापि, सिंधुदूर्गात नारायण राणेंवर चाप ठेवण्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना पालकमंत्रीपद मिळवण्यात शिवसेना यशस्वी ठरली. केसरकर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले आहेत. सिंधुदूर्गच्या व्यूहनीतीत शिवसेना यशस्वी ठरली असली तरी आपला पालकमंत्री रायगडला मिळावा म्हणून ती आग्रही राहिली नाही. शिवसेनेचा रायगडला पालकमंत्री मिळाला असता तर शेकाप-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली असती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनांही रायगडातील शिवसेनेचा वारु रोखायचाच होता, त्यात भरीसभर म्हणजे त्यांच्या रायगडातील दिग्गज विरोधक मित्र नेत्याने रायगडचे पालकत्व भाजपनेच घ्यावे असा आग्रह धरल्याने गृह निर्माणमंत्री प्रकाश महेता यांना मुंबई उपनगर जिल्हा हवा असताना त्याना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही मुंबई उपनगरसाठी आग्रही होते, मात्र त्यांना मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री करण्यात आले.
     मुबंई काही रायगडपासून दूर नाही, पण आधीच मनाने रायगडपासून दूर असलेले महेता दिवसेंदिवस रायगडपासून दुरावत गेले. कर्तव्यभावनाही त्यांच्या मनातून हद्दपार झाली आणि केवळ औपचारिकता पार पाडत असल्यामुळे रायगडच्या विकासातील त्यांची भूमिका ठिसूळ राहिली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असलं तरी पालकमंत्र्यांनी त्याचा फायदा घेऊन रायगडच्या विकासाची चक्रे गतिमान केली नाहीत. मुख्यमंत्र्यांनी प्रकाश महेता हे रायगडवर लादले आहेत. या लादलेल्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे खुद्द रायगड भाजपमध्ये खदखद सुरु आहे. प्रकाश महेता यांना मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याचे पालक करुन शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी जिल्ह्याचे प्रश्‍न सुटले नाहीत आणि भाजप वाढत नाही. याचा अर्थ राज्यात, केंद्रात आपल्या पक्षाची सत्ता असूनही जिल्ह्यात या दोन्ही पक्षांना आपलं वर्चस्व बनवता आलं नाही. काहीही असो, रायगडला आपला पालकमंत्री आपला वाटत नाही, हा राज्य सरकारचा, भाजप-शिवसेनेचा पराभव आहे. रायगडच्या सर्वसामान्य जनतेला पक्षीय राजकारणात रस नाही. पालकमंत्री जर रायगडात रस घेत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी महेता यांच्याकडे गांभीर्याने पहायला हवे. नाहीतर रायगडची जनता किती वेळ म्हणणार, पालकमंत्री, हाजिर हो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा