शुक्रवार, १३ मे, २०१६

माथेरान तापलेय...

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



      माथेरान थंड हवेचे ठिकाण आहे. म्हणजेच येथे गरम्याच्या दिवसातही शरीरासह डोकं थंड ठेवले जाते. पण प्रत्येकवेळी असे घडेलच असे नाही. जेव्हा जेव्हा अन्यायाचा आवाज तेथे बुलंद झाला तेव्हा तेव्हा तेथील डोकी तापली आहेत. जेव्हा डोकी तापतात तेव्हा व्यवस्थेला सळो की पळो करुन सोडले जाते. ब्रिटीश राजवटीत माथेरानमध्ये हे काम भाई कोतवाल यांनी केले. त्यामुळे त्यांच्या हौतात्म्यानंतरही ते अमर ठरले आणि थंड माथेरान मशालीसारखे तेजाळत राहिले आहे. ही तेजाची धार माथेरानकरांमध्ये सातत्याने पहायला मिळाली व आजही पहायला मिळते. माथेरानकरांची आता पुन्हा डोकी तापली आहेत, पण ती स्वदेशी राजवटीत. त्यांना आपल्याच व्यवस्थेशी लढावे लागत आहे, ही बाब दुर्दैवी आहे. व्यवस्थेनेच हे दुर्दैव त्यांच्यासमोर उभे केले आहे, हे मोठे दुर्दैव आहे. माथेरानकरांच्या मनाचा उद्रेक झाला आहे तो रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान मिनी ट्रेन आणि अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे. काही दिवसांपूर्वी या ट्रेनला अपघात झाला होता. ट्रॅकवरून ट्रेन घसरली होती. आता पुन्हा असा अपघात घडून कोणतीही जीवितहानी होऊ नये असे कारण दाखवत रेल्वेने ८ मे पासून ही ट्रेन बंद केली. त्यामुळे समस्त माथेरानच्या स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन सुरु केले आहे.
      ही मिनी ट्रेन माथेरानकरांच्या जिव्हाळ्याचा, प्रेमाचा विषय आहे. माथेरानकरांचा श्‍वास आहे. विश्‍वास आहे. या विश्‍वासामुळेच या ट्रेनचे काही अपघात झाले, तरी ही ट्रेन बंद व्हावी ही कल्पना माथेरानकरांना आणि माथेरानवर प्रेम करणार्‍या पर्यटकांना असह्य वाटणारी आहे. त्यातूनच या ‘मिनी ट्रेन बचाओ’ आंदोलनाचा जन्म झाला आहे. यात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व्यापारी संघटना, अश्वपाल संघटना, हॉटेल असो, रिक्षा संघटना, सर्व क्रिकेट संघ व स्थानिक नागरिक पक्षीय झेंडे खाली ठेवून सहभागी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी निर्णयाविरुद्ध माथेरानमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. माथेरानच्या मिनी ट्रेनचे अस्तित्व येथील पर्यटनाशी निगडीत आहे. पर्यटनाशी निगडीत व्यवसायांच्या अस्तित्वाचाही हा प्रश्‍न आहे. त्यामुळे या मुद्यावर सर्व माथेरानकर एकवटणे साहजिकच आहे. याबाबत नगरपरिषदेची विशेष सभा आयोजित करण्यात आली. त्याचे फलित म्हणजे यांच्यातूनच बंद मिनी ट्रेन सेवा पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी एक पाच सदस्यीय समिती नियुक्त केली जाणार आहे. तसेच येथील लोकभावना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. प्रभू यांनी याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.
      डोकी तापलेली असताना संयमी निर्णय घेऊन माथेरानकरांनी आपला लढावूपणा एका वेगळ्या पातळीवर नेला असला तरी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपली पातळी सोडली आहे, हे मात्र खरे आहे. या माथेरानच्या मिनी ट्रेनला शंभर वर्षांचा इतिहास आहे, पण तो इतिहास पुसून टाकण्याचा या मिनी ट्रेनच्या काही अपघातानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रयत्न चालवला आहे. म्हणे दरवर्षी २० कोटी रुपयांचा तोटा देणारी ही गाडी कशासाठी चालवायची. निष्किय व उदासिन अधिकार्‍यांनी तोट्याची मारलेली मेख एक चलाखी आहे. तोट्याची आणि अपघाताची कारणे शोधून ती कारणे नाहीशी करता येतात, पण जर काहीच करायचे नसेल, तर मात्र या अधिकार्‍यांच्या मनोवृत्तीवर उपाय नाही.
इ.स. १९०१ साली ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय ह्यांनी स्वत:चे भारतीय रूपया १६ लाख खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय ह्याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. स्वातंत्र्यानंतर इतर सर्व खाजगी रेल्वेमार्गांप्रमाणे नेरळ-माथेरान रेल्वेदेखील भारत सरकारच्या अखत्यारीखाली आली. १९८३ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाङ्गेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. २००५ सालच्या रायगड जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरादरम्यान माथेरान रेल्वेचा बव्हंशी मार्ग वाहून गेला. तब्बल २ वर्षांनंतर ह्या मार्गाची डागडुजी पूर्ण होऊन मार्च २००७ मध्ये ही रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आली. पण आता ही ट्रेन बंद केली जाण्याची पावले उचलली जात आहे. काय गूढ आहे यामध्ये? या परिस्थितीत माथेरानसंबंधी काही बातम्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. एक बातमी म्हणजे म्हणजे माथेरान-मुंबई अशी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ उत्सुक आहे. दुसरी बातमी म्हणजे माथेरानमध्ये रोप वे प्रकल्प टाटा उद्योगसमूहाच्या आर्थिक सहाय्यातून साकारला जाणार आहे. मिनी ट्रेन बंद करण्यामागे याबाबींचा काही संबंध नाही ना, याकडेही गांभीर्याने पहाण्याची गरज आहे. 
     माथेरानचे पर्यावरण राखून आधुनिक सुविधा माथेरानकरांना मिळायलाच हव्यात. या सुविधांपासून माथेरानकरांना वंचित ठेवण्याचा हक्क कोणालाही नाही. पण माथेरानकरांमागे इको सेन्सेटिव्ह झोनचा पाश त्यांच्या जगण्यावर मर्यादा आणत आहे. त्यांच्या मूलभत सुविधा आणि अधिकारांवरच व्यवस्थेचे अतिक्रमण होत आले आहे, पण माथेरानच्या प्रेमापोटी तो सर्व काही सहन करत आला आहे. अशा परिस्थितीत माथेरानची अस्मिता असलेली ‘माथेरानची राणी’ मिनी ट्रेन बंद करुन कोणी तथाकथित विकासाचा दावा करणार असेल तर त्याला त्याच्या पायखालची जमीन हादरेल अशा पद्धतीने विरोध झाला पाहिजे. हा विरोध वेगवेगळ्या पातळ्यांवरुन डोकी तापलेली असूनही संयमीपणे सुरु झाला आहे. त्यामुळे माथेरानची अस्मिता असलेली ही मिनी ट्रेन सुरु झाल्याशिवाय राहणार नाही यात वाद नाही. यात लेखणीची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही हा प्रश्‍न महाराष्ट्राच्या मंचावर मांडत आहोत. त्याचे सकारात्मक पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. 
--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा