सोमवार, ३० मे, २०१६

...आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले!

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



     पूर्वी तसं होतं आणि आता असं आहे, अशी भूतकाळ-वर्तमानकाळाची तुलना सातत्याने होत आली आहे. ही तुलना जीवनातील सर्वच क्षेत्रांसंबंधी केली जाते. त्याला वैद्यकीय क्षेत्रही अपवाद नाही. पूर्वी डॉक्टरला देव मानले जायचे, आज डॉक्टर रुग्णाला बकरा समजतात, अशाप्रकारचे वैद्यकीय व्यवसायाबद्दलचे शेरे वारंवार ऐकू येतात. पण नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीही उदाहरणे पहायला मिळतात. ही चांगली उदाहरणेच समाज घडवत असतात, समाजाला आणि आपल्या पेशाला दिशा देण्याचा प्रयास करीत असतात, हे डॉ. रवींद्र म्हात्रे यांच्या कार्लेखिंड येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जन डॉ. नितीन मोकल, लायनेस क्लब व लायन्स क्लब ऑफ अलिबाग, रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २१ व रविवार, २२ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरातून दिसून आले.
      जीवन फार गुंतागुतीचे, अपघातांचे असते, या अशा प्रकारांशी आपला संबंध येत नाही तोपर्यंत त्याबाबतच्या दु:खाचीही आपल्याला जाणीव नसते. आपण आपल्या सोयीचे तेच पाहत असतो, त्यामुळे शारीरिक व्यंग असलेल्या एका वर्गांच्या दुखाची, वेदनेची आपल्याला जाणीवच नसते. आपल्याला दु:खाचा स्पर्श नको असतो, आनंदाचा ध्यास मात्र आपण बाळगतो. पण दुसर्‍यांच्या आनंदाचा ध्यास आपण बाळगू तेव्हाच तेव्हाच आपल्याला त्यांच्या दु:खाची, वेदनेची जाणीव होईल, ही तळमळ असणारी माणसेही समाजात आहेत, हे प्रयासमध्ये पार पडलेल्या प्लास्टिक सर्जरी शिबिरातून दिसून आले. या शिबिरातून ५० हून अधिक जणांचे अंधारुन आलेले जीवन प्रकाशमान झाले. त्यांना प्रकाशवाट दाखवल्याबद्दल प्रयास हॉस्पिटलेच डॉ. रवींद्र म्हात्रे, प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांच्या सेवाभावाला सलाम केलाच पाहिजे. अर्थात हे शिबीर आयोजित केल्याबद्दल लायनेस क्लब व लायन्स क्लब ऑफ अलिबाग, रायगड मेडिकल असोसिएशनचेही करावे तेवढे कौतुक थोडे आहे.
       प्रयास हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वत: जावून सेवेची शर्थ पाहिली. डॉ. नितीन मोकल, डॉ. रवींद्र म्हात्रे यांच्यासह प्लास्टिक सर्जन डॉ. सागर गुंडवार, डॉ. निहार पटेल, डॉ. नयन, डॉ. महिनूर देसाई, डॉ. भरत सक्सेना, जनरल सर्जन डॉ. तिवारी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. रेखा म्हात्रे, बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. संजीव शेटकार या व प्रयासचे सर्व सहकारी यांनी भगिरथ प्रयत्न करुन दोन दिवसात ५० हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची अभावाने पहायला मिळणारी किमया केली. ध्यासाशिवाय असे प्रकल्प पूर्ण होत नाहीत. व्यंग असलेल्या १२० बाह्यरुग्णांमधून शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, अशा ५२ जणांची शुक्रवारी निवड करुन शनिवारी ३७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या, त्यानंतर रविवारी १५ जणावंर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्व शस्त्रक्रिया गुंतागुतीच्या. जन्मजात व्यंग आणि भाजल्यामुळे आलेले व्यंग या प्रकारातील सारे रुग्ण. दुभंगलेले ओठ व टाळू, भाजल्याचे व्रण व जखमा, आकसलेले स्नायू, बाह्य शरीरावरील गाठी, जन्मतःच असलेले व्यंग किंवा अपघाताने अथवा भाजल्याने आलेले व्यंग अशा प्रकारचे हे रुग्ण होते. डॉक्टरांसमोर आव्हान मोठे होते आणि रुग्णांच्या परिवाराच्या अपेक्षाही मोठ्या होत्या. या अपेक्षांचे ओझे न मानता डॉक्टरांच्या पथकाने ५२ जणांवर शस्त्रक्रिया केल्या. ३ ते ५० वयोगटातील अंगावर व्यंग बाळगत आलेली बालके, मुले-मुली, महिला, पुरुष यांची व्यंग या शस्त्रक्रियेने दूर करण्यात आल्याने त्यांच्यावरील व्यंगाचं ओझं उतरलं आहे. या प्लास्टिक सर्जरीचा फायदा आमच्या एका कलाकार मित्राने, किहीमच्या योगेश पवार यांनी घेतला. त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाचे, शौर्यचे नाक जन्मापासून दोन्ही बाजूने फाटलेले होते. या नाकावर तीन टप्प्यात सर्जरी होणार आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया २१ मे रोजी झाली. त्यामुळे योगेश पवार खुष आहेत, त्याने आमच्याजवळ भावना व्यक्त करताना म्हटले की, माझ्यासारखा नोकरी करणारा, तसेच कलाकार म्हणून वावरणारा बाप अशा संकटात त्याच्या सर्जरीसाठी पैसा उभा करु शकत नव्हता. अशा परिस्थितीत डॉ. नितीन मोकल, डॉ. रवींद्र म्हात्रे आणि लायन्स क्लब यांनी आयोजित केलेले हे शिबीर माझ्यासाठी मोलाचे ठरले आहे. प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि रुग्णांनीही हीच भावना व्यक्त केली. हे शिबीर खरोखरच अनेकांसाठी आधार ठरले आहे. 
       रायगड जिल्ह्यात अशाप्रकारचे पहिले मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करण्याचा मान रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाला जातो. ऑगस्टमध्ये धोकवडे येथे शंकरराव म्हात्रे यांच्या निवासस्थानी श्रीपंतपाडव्याचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त धोकवडे-सासवणे विभागातील ११ केंद्रशाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येतात. १९९४ साली अशाच समारंभात स्व. प्रभाकर पाटील तथा भाऊंच्या हस्ते बक्षीस वितरण होत असताना प्रमिला धनाजी म्हात्रे या विद्यार्थिनीला बक्षीस देत असताना तिचा ओठ फाटला असल्याचे व त्यामुळे वैगुण्य असल्याचे भाऊंच्या लक्षात आले व त्यांनी त्याचवेळी, मी या मुलीच्या प्लॅस्टिक सर्जरीची व्यवस्था करुन तिचे वैगुण्य दूर करीन असे जाहीर केले. त्यानंतर प्लास्टिक सर्जन डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांनी अलिबाग येथील रामनारायण पत्रकार भवनात प्लास्टिक सर्जरीचे शिबीर आयोजित केले व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने तिची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. तसेच तिच्यासोबत जिल्ह्यातील शारीरिक व्यंग असलेल्या इतर २१ मुलां-मुलींचीही प्लॅस्टिक सर्जरी करुन त्यांना दिलासा दिला. त्यावेळी आजच्यासारख्या वैद्यकीय सोयीसुविधा नसतानाही अशाप्रकारचे प्लास्टिक सर्जरी शिबीर आयोजित करणे एक धाडसच होते. पण हे धाडस केले गेल्यामुळेच त्यावेळी जिल्ह्यातील शारीरिक व्यंग असलेल्या २२ मुला-मुलींच्या जीवनाला आकार आला. या प्लास्टिक शिबिराच्या यशानंतर जिल्ह्यात सामाजिक संघटना, तसेच वैद्यकीय संघटना व शासनस्तरावर अशी शिबिरे आयोजित करण्यात येवू लागली. याचा अर्थ अशा बाबींची कुठेतरी सुरुवात करणे आवश्यक असते. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून याची सुरुवात झाली आणि तोच सामाजिक सेवेचा वारसा कार्लेखिंड येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. नितीन मोकल, अलिबाग लायन्स क्लब व रायगड मेडिकल असोसिएशनने आयोजित केलेल्या प्लास्टिक सर्जरी शिबिरातून दिसून आला. 
       या शिबिराच्या आयोजनाने प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. नितीन मोकल, प्रयास हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र म्हात्रे, अलिबाग लायन्स क्लबचे झोन चेअरमन नितीन अधिकारी, अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष नयन कवळे, रायगड मेडिकल असोसिएशन, अलिबाग शाखेचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्याकडून रायगडकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यापुढेही त्यांनी अशा शिबिरांचे आयोजन करुन रायगडकराचा विश्वास जिंकावा. इतकेच.

सोमवार, २३ मे, २०१६

ज्येष्ठ नागरिक भवन झाले हो!

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉



      अलिबाग तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांना एक हक्काचे स्थान असावे या हेतूने अलिबाग नगरपालिकेने जुन्या नगरपालिकेसमोर ज्येष्ठ नागरिक भवन ही दोन मजली इमारत उभारली आहे. या वास्तूचा हस्तांतरण सोहळा अलिबाग नगरपालिकेने मंगळवार, २४ मे रोजी राज्याचे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत बच्चू पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या हस्तातरण सोहळ्यास आ. जयंत पाटील, आ. पंडित पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, अलिबाग ज्येष्ठ संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू, रायगड शेकापचे सहचिटणीस, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, सौ. अंजली पाटील, जिल्हा परिषद सदस्य आस्वाद पाटील, शेकापच्या जिल्हा आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे गजेंद्र दळी, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष डी.डी. नाईक, सखाराम पवार, नगरिपरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर आदी मान्यवर व्यासपीठावर असणार आहेत. त्यानिमित्त हा लेख.
     अलिबाग बदलते आहे. काही बदल येथील निसर्गाचा घास घेऊन होत असले तरी काही बदल निसर्गाचा ध्यास घेऊन होत आहेत. शेवटी सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन बाबींशिवाय कुठल्याही गोष्टीला पूर्णत्व नसते. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात, याला अलिबागही अपवाद नाही. एकेकाळचे निसर्गसंपन्न अलिबाग हे निवृत्तांचे विश्रांतीचे गाव समजले जायचे. त्यावेळी अलिबाग हे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असले, तरी तेथील लोकांच्या मनात ‘आपले हे गाव भारी न्यारे’ अशीच भावना होती. आज हे गाव उलटे-सुलटे फुगले आहे. एक दिमाखदार शहर म्हणून ते ओळखले जात आहे. पण ही ओळख तयार होत असताना येथील नारळी-पोफळींच्या वाड्या जादूची कांडी फिरवावी त्याप्रमाणे नाहीशा झाल्या आणि त्याजागी सिमेंट कॉंक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या. अलिबागची निवृत्तांचे गाव ही ओळख पुसली गेली असली तरी ज्येष्ठ नागरिकांची चळवळ सुरु असलेले शहर म्हणून अलिबागचे नाव राज्यात आदराने घेतले जाते.
      निवृत्त ज्येष्ठ नागरिक अलिबागेत कालही होते आजही आहेत, फक्त आजच्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:पुरते न पाहता समाज आणि ज्येष्ठ यांच्यातील सेतू बनून ज्येष्ठांचे जीवन सुखकर बनवण्याचा चंग बांधला आहे. अलिबागेत दोन दशकभरापूर्वी ज्येष्ठ नागरिक चळवळ सुरु झाली. निवृत्त न्यायाधीश एम.एम. पारकर यांनी १९९३ साली ज्येष्ठ नागरिक संस्था अलिबागची स्थापना केली. ते या संस्थेचे पहिले संस्थापक-अध्यक्ष. त्यानंतर डी.डी. घरत व डी.डी. नाईक यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. याच्याकडे-त्याच्याकडे बसून ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कामकाज पहाणार्‍या ज्येष्ठांची अडचण ओळखून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या कारकीर्दीत अलिबाग नगरपालिकेने आपल्या जुन्या वास्तूत एक खोली अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेसाठी तात्पुरती दिली. याच जागेतून ज्येष्ठ नागरिक संस्थेचा पसारा वाढला आणि त्यांना आपल्या हक्काच्या वास्तूची गरज जाणवू लागली. विधान परिषद सदस्य आ. जयंत पाटील आणि अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ज्येष्ठांसाठी अद्ययावत ज्येष्ठ नागरिक भवन बांधण्याचे मनावर घेतले. कै. भाऊसाहेब लेले चौकात, जुन्या नगरपालिकेसमोर अलिबाग नगरपालिकेने ३५ लाखांहून अधिक खर्च करून दिमाखदार ज्येष्ठ नागरिक भवन उभारले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा प्रकारे अद्ययावत वास्तू उभारण्यासाठी निधी उपलब्ध करणारी राज्यातील क वर्गातील अलिबाग ही एकमेव नगरपालिका ठरली आहे.
      अलिबागच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हक्काचे स्थान मिळाले आहे. या वास्तूतून ज्येष्ठांच्या अडीअडचणी, ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्याचे कार्य पुन्हा नव्या जोमाने सुरु होईल. ज्येष्ठांना एकत्र बसून विचारांचे आदानप्रदान करायला, आनंद एकमेकांना वाटायला, विविध समाजपोयोगी, ज्येष्ठोपयोगी कार्यक्रम आयोजित करायला या वास्तूचा उपयोग होणार आहे. आजच्या ज्येष्ठांनी या वास्तूसाठी खूप पाठपुरावा केला आहे. त्यामुळे उद्या ज्येष्ठ होणार्‍यांच्या हाती हा वारसा आयता पडणार आहे. आजच्या ज्येष्ठांनी आपल्या कार्याने आणि या वास्तूने आदर्श घालून दिला आहे. तुम्ही एकाकी नाही, असेच ही वास्तू सुचवत आहे. म्हणूणच या वास्तूच्या एका भिंतीवर भव्य अशा वटवृक्षाचे आणि सहकार्यास तत्पर असलेल्या आश्‍वासक हातांचे चित्र चितारले आहे आणि त्याखाली बोधवाक्य लिहिले आहे, ‘एकटे... पण एकाकी नाही.’ ही वास्तू... यातील ज्येष्ठ नागरिक एक कुटुंबियच आहेत. त्यामुळे ते कधी एकाकी पडणार नाहीत.
      या ज्येष्ठ नागरिक संस्थेने एक कार्यकर्त्यांची फळीच निर्माण केली आहे. अलिबाग ज्येष्ठ नागरिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ल.नी. नातू यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काची जागा असावी असा ध्यास घेतला, गावोगावी ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन व्हाव्या यासाठी पायाला चक्र लावले. त्याचे फळ म्हणून आज अलिबाग तालुक्यात अलिबाग धरुन एकूण १८ ज्येष्ठ नागरिक संस्था आहेत. भविष्यात ज्येष्ठ नागरिक संस्थेचे जाळे दाटपणे विणले जाणार आहे. ल.नी. नातू यांच्याबरोबरच या संस्थेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष डी.डी. नाईक, गजेंद्र दळी, श्रीरंग घरत, प्रफुल्ल राऊत, दीनानाथ तरे या मान्यवरांसह दिवंगत दिनेश शेठ, प्रतापराव सरनाईक यांनी या ज्येष्ठ नागरिक संस्थेसाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागने अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. मानवी मनांची मशागत करण्यासाठी मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली आहेत. वृद्धांच्या समस्या सोडवणे, त्यांचे अधिकार समजावून देणे याबाबत ही संस्था अग्रेसर राहिली आहे. त्याबाबत तज्ज्ञांची व्याख्यानेही ज्येष्ठांसाठी लाभदायक ठरली आहेत.
      आपल्या हक्कांसाठी जगातील सारे ज्येष्ठ नागरिक जागरुक झाले आहेत. महाराष्ट्रातही या चळवळीने जोर धरला. त्यामुळे सरकारला ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकाराबद्दल संवेदनशील व्हावे लागले. त्यांच्या सोयीसुविधांबाबत सरकारला दखल घ्यावी लागत आहे. पण यासाठी ज्येष्ठांना एका वेगळ्यापातळीवर शांततामय मार्गाने संघर्ष करावा लागला आहे. संघर्ष केल्याशिवाय आपल्या देशात काही मिळत नाही, हे म्हणतात ते काही खोटे नाही. ज्येष्ठांच्या प्रश्‍नांबाबत राज्यात अजूनही संघर्ष सुरु आहे, परंतु अलिबागमध्ये मात्र ज्येष्ठ नागरिक भवनासाठी असा संघर्ष करावा लागलेला नाही. ज्येष्ठांनी पाठपुरावा केल्यानंतर आ. जयंत पाटील आणि नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी हे शिवधनुष्य उचललं आणि ज्येष्ठ नागरिक भवन ही वास्तू उभी राहिली आहे. याबाबत अलिबाग नगरपालिकेचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. तथापि अलिबागच्या वैभवात भर घालणार्‍या आणखी काही वास्तूंची अलिबागकरांना प्रतिक्षा आहे, त्याची अलिबाग नगरपालिकेने परिपूर्तता केली तर ‘सोनेपे सुहागा’ असे म्हणता येईल.

शुक्रवार, १३ मे, २०१६

माथेरान तापलेय...

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



      माथेरान थंड हवेचे ठिकाण आहे. म्हणजेच येथे गरम्याच्या दिवसातही शरीरासह डोकं थंड ठेवले जाते. पण प्रत्येकवेळी असे घडेलच असे नाही. जेव्हा जेव्हा अन्यायाचा आवाज तेथे बुलंद झाला तेव्हा तेव्हा तेथील डोकी तापली आहेत. जेव्हा डोकी तापतात तेव्हा व्यवस्थेला सळो की पळो करुन सोडले जाते. ब्रिटीश राजवटीत माथेरानमध्ये हे काम भाई कोतवाल यांनी केले. त्यामुळे त्यांच्या हौतात्म्यानंतरही ते अमर ठरले आणि थंड माथेरान मशालीसारखे तेजाळत राहिले आहे. ही तेजाची धार माथेरानकरांमध्ये सातत्याने पहायला मिळाली व आजही पहायला मिळते. माथेरानकरांची आता पुन्हा डोकी तापली आहेत, पण ती स्वदेशी राजवटीत. त्यांना आपल्याच व्यवस्थेशी लढावे लागत आहे, ही बाब दुर्दैवी आहे. व्यवस्थेनेच हे दुर्दैव त्यांच्यासमोर उभे केले आहे, हे मोठे दुर्दैव आहे. माथेरानकरांच्या मनाचा उद्रेक झाला आहे तो रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान मिनी ट्रेन आणि अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे. काही दिवसांपूर्वी या ट्रेनला अपघात झाला होता. ट्रॅकवरून ट्रेन घसरली होती. आता पुन्हा असा अपघात घडून कोणतीही जीवितहानी होऊ नये असे कारण दाखवत रेल्वेने ८ मे पासून ही ट्रेन बंद केली. त्यामुळे समस्त माथेरानच्या स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन सुरु केले आहे.
      ही मिनी ट्रेन माथेरानकरांच्या जिव्हाळ्याचा, प्रेमाचा विषय आहे. माथेरानकरांचा श्‍वास आहे. विश्‍वास आहे. या विश्‍वासामुळेच या ट्रेनचे काही अपघात झाले, तरी ही ट्रेन बंद व्हावी ही कल्पना माथेरानकरांना आणि माथेरानवर प्रेम करणार्‍या पर्यटकांना असह्य वाटणारी आहे. त्यातूनच या ‘मिनी ट्रेन बचाओ’ आंदोलनाचा जन्म झाला आहे. यात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व्यापारी संघटना, अश्वपाल संघटना, हॉटेल असो, रिक्षा संघटना, सर्व क्रिकेट संघ व स्थानिक नागरिक पक्षीय झेंडे खाली ठेवून सहभागी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी निर्णयाविरुद्ध माथेरानमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. माथेरानच्या मिनी ट्रेनचे अस्तित्व येथील पर्यटनाशी निगडीत आहे. पर्यटनाशी निगडीत व्यवसायांच्या अस्तित्वाचाही हा प्रश्‍न आहे. त्यामुळे या मुद्यावर सर्व माथेरानकर एकवटणे साहजिकच आहे. याबाबत नगरपरिषदेची विशेष सभा आयोजित करण्यात आली. त्याचे फलित म्हणजे यांच्यातूनच बंद मिनी ट्रेन सेवा पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी एक पाच सदस्यीय समिती नियुक्त केली जाणार आहे. तसेच येथील लोकभावना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. प्रभू यांनी याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे.
      डोकी तापलेली असताना संयमी निर्णय घेऊन माथेरानकरांनी आपला लढावूपणा एका वेगळ्या पातळीवर नेला असला तरी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपली पातळी सोडली आहे, हे मात्र खरे आहे. या माथेरानच्या मिनी ट्रेनला शंभर वर्षांचा इतिहास आहे, पण तो इतिहास पुसून टाकण्याचा या मिनी ट्रेनच्या काही अपघातानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रयत्न चालवला आहे. म्हणे दरवर्षी २० कोटी रुपयांचा तोटा देणारी ही गाडी कशासाठी चालवायची. निष्किय व उदासिन अधिकार्‍यांनी तोट्याची मारलेली मेख एक चलाखी आहे. तोट्याची आणि अपघाताची कारणे शोधून ती कारणे नाहीशी करता येतात, पण जर काहीच करायचे नसेल, तर मात्र या अधिकार्‍यांच्या मनोवृत्तीवर उपाय नाही.
इ.स. १९०१ साली ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय ह्यांनी स्वत:चे भारतीय रूपया १६ लाख खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय ह्याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. स्वातंत्र्यानंतर इतर सर्व खाजगी रेल्वेमार्गांप्रमाणे नेरळ-माथेरान रेल्वेदेखील भारत सरकारच्या अखत्यारीखाली आली. १९८३ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाङ्गेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. २००५ सालच्या रायगड जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरादरम्यान माथेरान रेल्वेचा बव्हंशी मार्ग वाहून गेला. तब्बल २ वर्षांनंतर ह्या मार्गाची डागडुजी पूर्ण होऊन मार्च २००७ मध्ये ही रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आली. पण आता ही ट्रेन बंद केली जाण्याची पावले उचलली जात आहे. काय गूढ आहे यामध्ये? या परिस्थितीत माथेरानसंबंधी काही बातम्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. एक बातमी म्हणजे म्हणजे माथेरान-मुंबई अशी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ उत्सुक आहे. दुसरी बातमी म्हणजे माथेरानमध्ये रोप वे प्रकल्प टाटा उद्योगसमूहाच्या आर्थिक सहाय्यातून साकारला जाणार आहे. मिनी ट्रेन बंद करण्यामागे याबाबींचा काही संबंध नाही ना, याकडेही गांभीर्याने पहाण्याची गरज आहे. 
     माथेरानचे पर्यावरण राखून आधुनिक सुविधा माथेरानकरांना मिळायलाच हव्यात. या सुविधांपासून माथेरानकरांना वंचित ठेवण्याचा हक्क कोणालाही नाही. पण माथेरानकरांमागे इको सेन्सेटिव्ह झोनचा पाश त्यांच्या जगण्यावर मर्यादा आणत आहे. त्यांच्या मूलभत सुविधा आणि अधिकारांवरच व्यवस्थेचे अतिक्रमण होत आले आहे, पण माथेरानच्या प्रेमापोटी तो सर्व काही सहन करत आला आहे. अशा परिस्थितीत माथेरानची अस्मिता असलेली ‘माथेरानची राणी’ मिनी ट्रेन बंद करुन कोणी तथाकथित विकासाचा दावा करणार असेल तर त्याला त्याच्या पायखालची जमीन हादरेल अशा पद्धतीने विरोध झाला पाहिजे. हा विरोध वेगवेगळ्या पातळ्यांवरुन डोकी तापलेली असूनही संयमीपणे सुरु झाला आहे. त्यामुळे माथेरानची अस्मिता असलेली ही मिनी ट्रेन सुरु झाल्याशिवाय राहणार नाही यात वाद नाही. यात लेखणीची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही हा प्रश्‍न महाराष्ट्राच्या मंचावर मांडत आहोत. त्याचे सकारात्मक पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. 
--

बुधवार, ११ मे, २०१६

पालकमंत्री, हाजिर हो!

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


     रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता येथील जनतेसाठी गूढ बनले आहे. त्यांच्याभोवतीचे हे गूढ वलय या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडल्यापासून आहे. कारण रायगड जिल्ह्यात ते कार्यकर्त्यांच्या हाती लागत नव्हते, की जनतेच्या हाती लागत नाहीत. पण खुद्द १ मे रोजी जिल्हा मुख्यालयाच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहुन या जिल्ह्याचे आपल्याला काही पडले नाही, हे त्यांनी दाखवून दिले. अलिबागच्या पोलीस परेड मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा वर्धापनदिन मुख्य ध्वजारोहण समारंभ  रायगड जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या अनुपस्थितीत पार पडला. पालकमंत्र्यांच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी शितल उगले यांनी ध्वजारोहण केले आणि पोलीस मानवंदना स्वीकारली. 
     १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या दिवशी जिल्हास्तरावर होणार्‍या मुख्य ध्वजारोहण समारंभाला त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी हजेरी लावावी आणि ध्वजारोहण करून मानवंदना स्वीकारावी व संचलनाची पहाणी करावी हा राजशिष्टाचाराचा भाग आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मोठ्या अभिमानाने या सोहळ्यांना हजेरी लावत आले आहेत. पण रायगड जिल्ह्यात याला अपवाद ठरले प्रकाश महेता. रायगड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ध्वजारोहण समारंभाला उपस्थित न राहणारे पालकमंत्री ठरले आहेत. यापूर्वीच्या कॉंग्रेस असो, वा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालकमंत्र्यांनी कधीही महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहुन या जाहीर कार्यक्रमाचा, उपस्थितांचा, राजशिष्टाचाराचा अवमान केला नव्हता, पण हा अवमान भाजपच्या पालकमंत्र्याकडून झाला आहे.
    पालकमंत्री प्रकाश मेहता वेळ पाळण्याबाबत प्रसिद्ध नाहीत. अनेक कार्यक्रमांत त्यांची लेटलतिफी दिसून आली आहे. पत्रकारपरिषद बोलावून स्वत: तासादोनतासांनी उपस्थित राहण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.  आपला पालकमंत्री म्हणून अनेक सामाजिक तसेच राजकीय संस्था त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करतात, ते निमंत्रण स्वीकारतात. निमंत्रण पत्रिका छापून होतात. कार्यक्रमाला येतोच म्हणून सांगतात, मात्र ऐनवेळी आपण येणार नसल्याचे आयोजकांना कळवतात. अनेकदा कळवण्याचे सौजन्यही दाखवत नाहीत. राजकारणात इतकं अविश्‍वासू बनून चालत नाही. पालकमंत्री म्हणून प्रकाश महेता यांनी जनतेचा विश्‍वास कमावला नाही, पर्यायाने याचा दुष्परिणाम जिल्ह्यातील भाजपच्या प्रसारावर होत आहे. पालकमंत्र्यांची निष्क्रियता विरोधकांच्या पथ्यावर पडत आहे. १ ऑक्टोबर २०१४ रोजी प्रकाश महेता यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना गृहनिर्माण, कामगार आणि खाण मंत्री म्हणून घोषित करण्यात आले. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी २६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अशी जबाबदारी सोपविली. पण महेता यांच्या मनाविरुद्ध ही जबाबदारी सोपवली असल्यामुळे त्यांना या जबाबदारीचं ओझं झालं आहे. 
     मुळात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना कोकणातील रत्नागिरी किंवा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे असताना त्यांना एकदम मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आले. रायगडचे खासदार अणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यातील वाद यास कारणीभूत ठरला. त्यातच कदम हे विधानसभेवर निवडून गेलेले आमदार नाहीत तर २००९ ला गुहागरमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर सदस्य करण्यात आले होते. पालकमंत्री म्हणून कदम यांचा कोकणात वावर असू नये याबाबत गीते प्रयत्नशील होते. गीते यांनी दिल्लीहून याकरिता सूत्र हलवली. त्यामुळे त्यांना कोकणाऐवजी थेट मराठवाड्यात पाठवण्यात आले.पालकमंत्रीपदी राहून कोकणात आपला जनाधार पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न रामदास कदम यांच्याकडून होणार होता. मात्र त्यांच्या या मोहिमेवर गदा आणण्यात आली. कदमांबाबत येथेही प्रेम नसल्याने त्यांची मराठवाड्यातील पाठवणी चर्चेची बाब ठरली नाही. तथापि, सिंधुदूर्गात नारायण राणेंवर चाप ठेवण्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना पालकमंत्रीपद मिळवण्यात शिवसेना यशस्वी ठरली. केसरकर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले आहेत. सिंधुदूर्गच्या व्यूहनीतीत शिवसेना यशस्वी ठरली असली तरी आपला पालकमंत्री रायगडला मिळावा म्हणून ती आग्रही राहिली नाही. शिवसेनेचा रायगडला पालकमंत्री मिळाला असता तर शेकाप-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली असती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनांही रायगडातील शिवसेनेचा वारु रोखायचाच होता, त्यात भरीसभर म्हणजे त्यांच्या रायगडातील दिग्गज विरोधक मित्र नेत्याने रायगडचे पालकत्व भाजपनेच घ्यावे असा आग्रह धरल्याने गृह निर्माणमंत्री प्रकाश महेता यांना मुंबई उपनगर जिल्हा हवा असताना त्याना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही मुंबई उपनगरसाठी आग्रही होते, मात्र त्यांना मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री करण्यात आले.
     मुबंई काही रायगडपासून दूर नाही, पण आधीच मनाने रायगडपासून दूर असलेले महेता दिवसेंदिवस रायगडपासून दुरावत गेले. कर्तव्यभावनाही त्यांच्या मनातून हद्दपार झाली आणि केवळ औपचारिकता पार पाडत असल्यामुळे रायगडच्या विकासातील त्यांची भूमिका ठिसूळ राहिली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असलं तरी पालकमंत्र्यांनी त्याचा फायदा घेऊन रायगडच्या विकासाची चक्रे गतिमान केली नाहीत. मुख्यमंत्र्यांनी प्रकाश महेता हे रायगडवर लादले आहेत. या लादलेल्या पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे खुद्द रायगड भाजपमध्ये खदखद सुरु आहे. प्रकाश महेता यांना मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याचे पालक करुन शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी जिल्ह्याचे प्रश्‍न सुटले नाहीत आणि भाजप वाढत नाही. याचा अर्थ राज्यात, केंद्रात आपल्या पक्षाची सत्ता असूनही जिल्ह्यात या दोन्ही पक्षांना आपलं वर्चस्व बनवता आलं नाही. काहीही असो, रायगडला आपला पालकमंत्री आपला वाटत नाही, हा राज्य सरकारचा, भाजप-शिवसेनेचा पराभव आहे. रायगडच्या सर्वसामान्य जनतेला पक्षीय राजकारणात रस नाही. पालकमंत्री जर रायगडात रस घेत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी महेता यांच्याकडे गांभीर्याने पहायला हवे. नाहीतर रायगडची जनता किती वेळ म्हणणार, पालकमंत्री, हाजिर हो!

मंगळवार, ३ मे, २०१६

किहीम फेस्टीवलच्या निमित्ताने...

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉




      संपूर्ण कोकण पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. आपल्या रायगड जिल्ह्यात तर पर्यटनाच्या खूप संधी आहेत. या जिल्ह्यात समुद्र पर्यटन, गडकिल्ले पर्यटन, जलदुर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, सामाजिक पर्यटन, विज्ञान पर्यटन असे वेगवेगळे पर्याय पर्यटकांसमोर उभे आहेत. अलिबाग तालुक्याला तर रेवस-मांडवा ते चौल-रेवदंडा पर्यंत समुद्राचा विलोभनीय चंद्रहार लाभला आहे आणि या चंद्रहारात येथील पौराणिक आणि ऐतिहासिक इतिहास दडला आहे. बलरामाची पत्नी रेवती ते सरखेल कान्होजी आंग्रे, असा समृद्ध इतिहास या तालुक्याला आहे. हा इतिहास इतपतच मर्यादित नाही. अशा या अलिबाग तालुक्यात किहीम येथे राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर मांडवा लायन्स क्लबने किहीम-मांडवा लायन्स फेस्टीवल २९ एप्रिल ते २ मे २०१६ दरम्यान जल्लोषात आयोजित केले होते, त्याविषयी-
      या अलिबागने, तालुक्याने स्वातंत्र्य चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, बेळगाव-भालकीपर्यंत धडक मारुन अलिबागचं पाणी कसं पेटू शकतं ते दाखवलं आहे. अलिबागचा किल्ले कुलाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असल्यामुळे त्याच्या चिरेबंदी कोटाचा (तटबंदी) कणखरपणा येथल्या भूमीपुत्रांमध्ये पहायला मिळतो. शहाळ्याच्या करवंटीसारखा येथील भूमीपुत्र रांगडा असला तरी त्यातील पाण्यासारखा त्याच्यात गोडवा आहे आणि हाच गोडवा येथील पर्यटनासाठी पुरक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. येथे पर्यटनाच्या दृष्टीने बर्‍याच उणीवा आहेत. रस्ते, इतर सोयीसुविधांचा अभाव, यांना येथे येणार्‍या पर्यटकांना तोंड द्यावे लागते, ही बाब तेवढी शोभादायक नाही. अलिबागला पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे आणायचे असेल तर पर्यटन विकासाची पावले जिल्हा प्रशासन, अलिबाग नगरपालिका यांनी एकत्रितपणे उचलली पाहिजेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी, येथील आजी-माजी आमदारांनी पर्यटन विकासाच्या दृष्टींनी चालवलेल्या प्रयत्नांना अधिक चालना देऊन ‘अभावग्रस्त पर्यटन’ ही अलिबागची काहीशी असलेली ओळख पुसली पाहिजे. हे सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत पर्यटनवाढीसाठी, व्यावसायिक वाढीसाठी, तसेच बचतगटांच्या हितासाठी अलिबाग महोत्सव, खारेपाट महोत्सव, अलिबाग लायन्स फेस्टीवल मोठ्या प्रमाणात भरवले गेले. यावर्षी याच महिन्यात किहीम येथे राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर माडवा लायन्स क्लबने किहीम-मांडवा लायन्स फेस्टीवल २९ एप्रिल ते २ मे दरम्यान जल्लोषात आयोजित केले होते. तेथे चार दिवस उसळलेल्या गर्दीने परिसरातील जनतेचा, तसेच पर्यटकांचा या फेस्टीवलला मोठा प्रतिसाद लाभला हे दिसून आले.
      या फेस्टीवलचे वेगळे महत्व आहे. तिनविराजवळील खारेपाट महोत्सव सोडल्यास भव्यदिव्यरितीने अलिबाग शहरातच हे महोत्सव झाले आहेत. तसेच छोट्या प्रमाणात कुरुळ, नागाव आदी गावांत गावपातळीवर महोत्सव झाले असले, त्यांची सुरुवात चांगली असली, तरी त्यांची व्याप्ती मर्यादित होती. ते महोत्सव कौतुकास पात्र असले तरी किहीम या छोट्याशा गावात फेस्टीवलचे भव्यदिव्य आयोजन करुन एक चांगला पायंडा पाडल्याबद्दल अलिबाग लायन्स क्लबचे झोन चेअरमन, तसेच या फेस्टीवलचे चेअरमन नितीन अधिकारी, मांडवा लायन्स क्लबचे अध्यक्ष अमीष शिरगावकर, उपाध्यक्ष सुबोध राऊत, सदस्य मानसी चेऊलकर, त्यांच्या इतर सहकार्‍यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.
       मांडवा लायन्स क्लबने या फेस्टीवलमधून कलाकारांना, व्यावसायिकांना, पर्यटनव्यावसायिकांना पर्यटनवाढीसाठी व्यासपीठ मिळवून दिले असले तरी या फेस्टीवलमागचा त्यांचा हेतू खूप सुंदर आणि सामाजिक सेवेशी बांधील आहे. त्यांना मोतीबिंदू रायगड जिल्हातून हद्दपार करायचा आहे, त्यासाठी अद्ययावत हॉस्पिटलची उभारणी चोंढी येथे चालली आहे. तसेच परहूरच्या आसपास एक अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्याचे शिवधनुष्य मांडवा लायन्स क्लबच्या या शिलेदारांनी उचलले आहे. हार्टचा रुग्ण असो कि कॅन्सरचा त्याला बरेचदा मुंबईला पोहोचेपर्यंत पुन्हा रायगड पाहण्याची संधी मिळत नाही. हार्टचा रुग्ण मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहचण्याआधीच रस्त्यात निधन पावतो. ही परिस्थिती कोणावरही ओढवू नये अशी या लायन्सची भूमिका आहे. त्या भूमिकेला या फेस्टीवलच्या उत्पन्नाचं कवच द्यायचं आहे. मांडवा लायन्स क्लब अलिबाग गेली चार वर्षे ग्रामीण भागामध्ये विविध समाजोपयोगी कार्य करित आहे. मांडवा लायन्स क्लबने जे उपक्रम राबविले त्यामध्ये प्रामुख्याने मोङ्गत नेत्रतपासणी व मोङ्गत मोतीबिंदू शस्त्रक्रीया, रक्तदान, रक्ततपासणी शिबिरांचे आयोजन, मोङ्गत औषधोपचार, आदिवासींना मोङ्गत भाजी बियाणे वाटप, अनाजदान, स्वच्छता अभियान असे अनेकविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांनी ओळखल्या जाणार्‍या मांडवा लायन्स क्लबला किहीम-मांडवा फेस्टीवलमुळे पर्यटक आणि परिसरातील जनतेच्या मनात ही ओळख पुन्हा ठळक झाली आहे.