मंगळवार, १८ जून, २०१९

विषाणूंचे आव्हान

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉  


      मानवाची जितकी प्रगती झाली तितक्याच जोमाने विज्ञान, संशोधन आणि वैद्यकशास्त्रालाही वाकविणार्‍या काही प्राणघातकी आजारांचा बागुलबुवा त्याच्यासमोर सातत्याने उभा राहिला. १९९० चे दशक एड्सच्या (एचआयव्ही) दहशतीमध्ये राहिले. त्यानंतर सार्स, बर्ड फ्लू आणि ‘इबोला’ या रोगाचा बोलबाला सर्वत्र वेगाने पसरला, गेल्यावर्षीपासून मिपाह रोगाने केरळमध्ये थैमान घातले आहे. यापूर्वी या विषाणूने पश्चिम बंगालमध्ये हाहाकार उडवला होता. या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे सध्यातरी याचा संसर्ग रोखण्याचे प्रयत्न करणे हाच एक उपाय आहे. देशाच्या आरोग्य यंत्रणेचा यामुळे कस लागतो आहे. विषाणूजन्य रोगांविरुद्ध जागतिक पातळीवरुनही ठोस लढा पुकारण्याची गरज आहे.
     माणसाला आतापर्यंत सुमारे पाच हजार विषाणू ज्ञात आहेत. त्या प्रत्येकापासून उद्भवणारे काही ना काही आजार आहेतच. सर्वच विषाणू जीवघेणे आहेत असं नाही, मात्र कित्येक विषाणूंनी पसरवलेल्या आजारांनी माणसाकडे थेट मृत्युचंच निमंत्रण पाठवल्याचं दिसतंय. सध्या भारतातील केरळ राज्यामध्ये पुन्हा निपाह विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तपासणीनंतर केरळमध्ये काही रुग्ण या विषाणूने संक्रमित झाल्याची पुष्टी केली आहे. गेल्या वर्षी तेथील कोहीकोड आणि मलप्पुरम या ठिकाणी निपाह  विषाणूची लागण झाल्याने सोळा रुग्ण मृत्युमुखी पडले होते. निपाह विषाणू हा मुख्यत्वे ‘ङ्ग्रुट बॅट्स’, किंवा अन्य प्रजातीच्या मायक्रोबॅट्स, म्हणजेच वटवाघुळे किंवा डुकरांपासून उद्भवतो. तेथे हा  विषाणू वटवाघुळापासून पसरला आहे. पक्षी-प्राण्यांतून माणसात संक्रमित होणार्‍या  विषाणूचे प्रकरण किती गंभीर आहे आणि त्यातून वाचणे किती अवघड आहे, हे निपाह विषाणूने लक्षात येते. गेल्या काही वर्षांपासून भारत, ब्राझीलसहित अनेक विकसनशील आणि विशेषत्वाने आङ्ग्रिकी देश कोणत्या ना कोणत्या  विषाणूच्या हल्ल्याच्या तडाख्यात सापडत आहेत. विषाणूचा हा हल्ला वेगाने होतो आणि लवकरच लोकसंख्येच्या मोठ्या भागाभोवती तो वेढा आवळतो, ही चिंताजनक बाब आहे. निपाह विषाणूचे पहिले प्रकरण भारतात २००१ साली समोर आले होते, तेव्हा तो विषाणू मलेशियातून भारतात पोहोचला होता. २००१ आणि २००७ साली पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये ही या आजाराने ग्रस्त ६६ रुग्ण आढळले होते, त्यांतील ४५ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
         गोवर (मिझल), कावीळ, पोलिओ,  एचआयव्ही, फ्लू, जापनीज मेंदूज्वर, रेबिज, डेंग्यू, चिकुनगुन्या, अतिसार,  देवी, कांजण्या, सर्दी, गालफुगी, जर्मन गोवर आदी विषाणूच्या संसर्गानेच होतात.  बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, इबोला,  डेंग्यू, आणि एचआयव्ही या विषाणूंमुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये गेल्या तीन-चार दशकांत अनेक पटींनी वाढ झाली आहे. पोलिओ, टायफाईड आणि कांजिण्या यासारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार कमी होत आहे. तरीही विषाणूंमुळे होणारे रोग मानवासाठी गंभीर आव्हान आहे.१९७३ नंतर ३० नव्या विषाणूजन्य आजारांनी मानव ग्रस्त झाला आहे. हिवताप किंवा फ्लू हा जुनाच विषाणूजन्य तापाचा प्रकार आहे; पण हे विषाणू संपवण्यात मोठी अडचण आहे, ती या विषाणूंमध्ये होणारे बदल. विषाणू मानवापेक्षा हुशार आहेत. कदाचित, म्हणूनच अनेक भीषण आजारांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या लसी अजून पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत. निपाहचा सामना करू शकणारी एकही लस नाही. त्यामुळे हे सर्व विषाणू नष्ट होण्यास किती काळ लागेल आणि बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला, झिका, एचआयव्ही-एडस आदिपासून आङ्ग्रिका, आशिया तसेच युरोप कधी मुक्त होईल, हा मोठा प्रश्न आहे.
          झिका विषाणू १९४७ साली आफ्रिका खंडातील युगांडामधील झिका जंगलात उगम पावला, तो २०१५ मध्ये दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप पार करीत आशियापर्यंत पोहोचला आणि त्याने जगाची झोप उडवली. २०१४ मध्ये इबोला विषाणूच्या हल्ल्यानेही जग हादरले होते. तथापि त्याचा प्रकोप थोपविण्यात आला होता. इबोला विषाणू संक्रमित माकड, डुक्कर अथवा एक विशेष प्रजातीच्या रक्त अथवा शरीरातील तरल द्रावाच्या संपर्कात आल्याने सर्वत्र पसरतो. विशेष म्हणजे तो वटवाघळे व माकडे यांच्यात राहतो, पण त्यांना त्याचा काही त्रास होत नाही. मात्र हा विषाणू पसरवण्याचे ते माध्यम ठरतात. जेव्हा हा विषाणू माणसांत पसरतो तेव्हा प्रचंड हाहाकार माजवतो. यातून वाचण्याचा मार्ग म्हणजे संक्रमित माकडे, डुक्करांकडून या विषाणूचा संसर्ग माणसाला होऊ देऊ नये. प्राण्यांमध्ये संसर्गाची तपासणी करणे आवश्यक आहे तसेच संसर्ग आढळल्यास त्यांच्या शरीराला योग्यरित्या नष्ट करुनच या विषाणूला थोपवता येऊ शकतो. परंतु अशा संक्रमित प्राण्यांना नष्ट करणे सोपे नाही. अनेक कारणांनी त्यांना मारण्यास बंदी आहे. कुत्री, माकडे चावली, तर त्यावर उपाय म्हणून योजली जाणारी औषधेही सरकारी रुग्णालयात साधारणपणे उपलब्ध नसतात. यातून आपल्या देशातील आरोग्य सज्जता लक्षात येते. विषाणूजन्य रोगांचा जेव्हा भारतात जेव्हा प्रादुर्भाव होतो, त्यावेळी आरोग्यसेवेची त्रेधातिरपीट पहायला मिळते. हे विषाणू रोखण्याबातही आपण ङ्गार मागे आहोत हे दिसून येते.
         संसर्गजन्य रोग कोणालाही आणि कधीही होऊ शकतात. परंतु साधारणपणे पावसाळ्यात संसर्गजन्य रोग पसरतात. तथापि याचा संबंध पावसाशी कमी, स्वच्छतेशी अधिक आहे. स्वच्छता नसल्यामुळेच पावसाळ्यात सगळीकडे अस्वच्छता पसरलेली असते. विषाणू संसर्सागासाठी हाच सर्वाधिक उपयुक्त काळ असतो. चांगला, सकस आहार नसलेल्या लोकांंची रोगप्रतिरोधक  क्षमताही क्षीण झालेली असते. म्हणूनच पावसाळ्यात हे विषाणूजन्य रोग मोठ्याप्रमाणात पसरतात. सावधगिरी बाळगली तर काही प्रमाणात या पासून वाचता येणे शक्य आहे, असे तांत्रिकदृष्ट्या म्हणता येऊ शकते. स्वच्छता आपण आपली आणि आपल्या घराची करु शकतो, परंतु घराच्या आसपास आणि रस्ते, नाले, बाजार आणि हास्पिटलमधून निघणारा कचरा गंभीर समस्या आहे.
         एक मोठी समस्या अज्ञान आणि अङ्गवांपासून वाचण्याचीही आहे. शिक्षण नसल्याने लोक अज्ञानामुळे अङ्गवांच्या सापळ्यात अलगद अडकतात आणि याचा परिणाम असा होतो की ज्या रोग आणि विषाणूंपासून बचाव करण्यासाठी लसीकरण अथवा औषधे उपलब्ध आहेत, लोक त्यांचंही सेवन करीत नाहीत. सरकारी मोहिमांना विरोध केला जातो आणि सरकार या विरोधाला योग्यरित्या मोडून काढू शकत नाही. यामुळे नुकसान हेच होतं की सर्व समस्यांकडे कानाडोळा केला जातो आणि अनुकलू परिस्थितीची वाट पाहिली जाते, ही गंभीर बाब आहे. त्यामुळेच नेहमी परिस्थिती चिघळते.
        भारतात प्राणघातक रोगांचे विषाणू येतच राहतात. इतर देशांतून आलेले संक्रमित लोक, खाद्यपदार्थ अथावा इतर कशाही प्रकारे भारतात अशा विषाणूंचा हल्ला होतो. काही विषाणू आपला प्रताप दाखवितात, काहींचा ताप होत नाही. परंतु सर्व सरकारी यंत्रणेने याबाबत सावध राहिले पाहिजे. गेल्या वर्षी याच दिवसात दक्षिण भारतातील राज्यांत निपाह विषाणूची चर्चा होती. तेव्हा त्यापासून वाचण्याचे उपाय सांगितले गेले होते. तथापि या व्हायरसच्या संक्रमाणासाठी काही निश्चित प्रभावी औषधोपचार अद्याप उपलब्ध नाहीत. या रोगावर केले जाणारे उपचार मुख्यत्वे संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने केले जात असतात. या रोगाची लागण एका रुग्णापासून दुसर्‍या निरोगी व्यक्तीला होत असल्याने या रोगाचे संक्रमण नियंत्रित ठेवणे अतिशय महत्वाचे ठरते. या रोगाचे निश्चित निदान करण्यासाठी विविध चाचण्या उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारी पातळीवरुन, तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही विषाणूजन्य आजारांबाबत जनजागृती घडविणे आवश्यक आहे. विषाणूंनी होणारे संक्रमण एक मोठे आव्हान आहे. त्याला सर्वपातळ्यांवरुन सर्वशक्तीने तोंड देण्याची आणि या विषाणूंचा संसर्ग रोखण्याची गरज आहे. आज हा प्रश्न काही खंडांपुरता मर्यादित असला तरी याकडे जागतिक पातळीवर गांभीर्याने न पाहिल्यास जगलाच याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा