सोमवार, २९ एप्रिल, २०१९

इराणच्या कच्च्या तेलाला अमेरिकेचा चाप

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉


      साधारणतः सामान्य माणसाला जगात काय चालले आहे ते कळतच नाही. जागतिक घडामोडी सामान्य माणसाच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम करतात. कच्च्या तेलाचे भाव वाढले तर सर्वच वस्तू महाग होतात आणि गरिबांचे प्रचंड हाल होतात. ते जीवनाश्यक वस्तूंनाही पारखे होतात. डॉलरची किंमत रुपयाच्या मानाने वाढली तर देशात येणार्‍या सर्वच वस्तूंच्या किंमती वाढतात. टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, वाहने, मोबाईल, कोका-कोला वगैरे या सर्वांचीच किंमत वाढते. कारण या सर्वात परदेशातून आयात केलेले भाग असतात. अमेरिकेने इराणविरुद्ध फौजदारकी करत इराणवर पूर्ण बहिष्कार टाकून २ मे नंतर कोणत्याही देशांनी इराणकडून तेल आयात करू नये, असा आदेश दिला. भारतालाही या आदेशापुढे मान तुकवावी लागणार असल्याने त्याला तेलाचे पर्याय शोधावे लागणार आहेत. तोपर्यंत येथील जनतेची फरफट होणार आहे. 
      अमेरिका जगाला आपल्या बोटावर नाचवू इच्छिते, जगातील तेलसंपन्न देश अंकीत केले की इतरांनाही नाचवता येते. त्यासाठी अमेरिकेने काय काय केले नाही? तेल साठ्यावर कब्जा करण्यासाठी अङ्गगाणिस्तानवर हल्ला केला. नंतर कारण नसताना इराकवर हल्ला केला. अल कायदाबरोबर सिरीयामध्ये यादवी युद्ध निर्माण केले. आता त्याला इराणवर हल्ला करायचा आहे. तेलावर कब्जा केला तर जगावर कब्जा करता येतो. इराणने देखील अणु अस्त्र बनवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याबरोबर अमेरिकेने सौदी अरेबिया व इस्राईलला जवळ केले. अमेरिकेने इराण विरुद्ध जागतिक बंदी घातली. भारतासकट सर्व जगातील देशांना बजावले कि इराणशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. इराणवर पूर्ण बहिष्कार घातला. त्यावर तोडगा काढण्यासाठी इराणने अण्वस्त्र बनवणे बंद करण्याचे ठरवले. मग अमेरिका आणि इराणमध्ये ओबामाने २०१५ ला करार केला. इराणवरचा बहिष्कार मागे घेतला. पण ८ मे २०१८ ला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार रद्द केला आणि पुन्हा इराणवर बहिष्कार टाकण्याचा जगाला आदेश दिला.  त्यानंतर गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर २०१८ ला अमेरिकेने ८ देशांना इराणकडून तेल आयात करण्याच्या बदल्यात अन्य पर्याय शोधण्यासाठी १८० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत २ मे २०१९ रोजी संपत आहे. या आठ देशांपैकी युनान, इटली आणि तैवाने आधीच इराणकडून तेल आयात करणं बंद केलं आहे. तर भारत, चीन, तुर्कस्थान, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी इराणकडून तेल आयात करणं थांबवलेलं नाही, त्यामुळे त्यांनी २ मेनंतरही तेल आयात करणं बंद नाही केल्यास अमेरिकेच्या प्रतिबंधाचा सामना करावा लागणार आहे.
     इराणकडून भारत आणि चीन सर्वाधिक तेल आयात करतो. २ मेनंतरही या दोन्ही देशांनी इराणकडून तेल आयात करणं सुरूच ठेवल्यास अमेरिकेबरोबरच्या द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. अमेरिकेबरोबरच्या व्यापारासह इतर सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इराणकडून तेल आयात करण्याच्या बाबतीत अमेरिकेकडून मुदतवाढ मिळेल असं भारताला वाटत होतं, पण अमेरिकेने सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगात कच्च्या तेलाचे दर ७४.३८ डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. हे नोव्हेंबरनंतर सर्वाधिक दर आहेत. हे दर वाढून ८५  डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. तथापि भारत आपल्या गरजेचं ८० टक्के कच्चे तेल आयात करतो, त्यातील ५० टक्के कच्चे तेल इराणकडून आयात करतो, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीबाबततीत भारताच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याच कारणामुळे २२ एप्रिलला सेसेक्समध्ये २०१९ ची सर्वात मोठी घसरण पहायला मिळाली.
      निश्चितच यावेळी अमेरिकेच्या आर्थिक पवित्र्याने भारतासमोर तेलाच्या किमती वेगाने वाढण्याची आर्थिक चिंता उभी केली आहे. इराणशी व्यापार करणार्‍या देशांशी आपण व्यवहार करणार नाही या अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतासह अन्य देशांमध्येही चिंतेचे वातावरण पसरणे साहजिकच आहे. इंधन आणि त्यावर होणारा खर्च हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. इराणकडून कच्चे तेल घेणे भारतासाठी ङ्गायदेशीर आहे. कारण इराणकडून करण्यात येणार्‍या तेल खरेदीचे पैसे आदा करण्यासाठी आपल्याला मिळणारी चार महिन्यांची मुदत अन्य देश तशी देत नाहीत. तिथे आपल्याला जास्तीत जास्त दोन आठवड्यांत देय रक्कम आदा करावी लागते. भारताला मध्य आशियातून तेलाचा पुरवठा होतो आणि त्यातील ५० टक्के तेल हे इराणकडून येते. भारत आणि इराण यांच्यादरम्यान १५ अब्ज हजार डॉलर्स इतका वार्षिक व्यापार आहे. त्यापैकी साधारणतः १२ अब्ज डॉलर्सचे तेल प्रतिवर्षी भारत इराणकडून आयात करतो.  २०१८-१९ या वर्षामध्ये भारताने इराणकडून २.४ कोटी टन क्रूड तेल आयात केले. तसेच २.५ अब्ज डॉलर्सच्या वस्तू भारत इराणला निर्यात करतो. जर इराणची अर्थव्यवस्था डळमळीत झाली तर आपल्या निर्यातीवर दुष्परिणाम होईल. त्याचबरोबर भारतासाठी ङ्गायदेशीर असणार्‍या इराणमधील चाबहार बंदर विकासाच्या  अनेक महत्वाच्या प्रकल्पांवर त्याचा परिणाम होईल.
       अशा परिस्थितीत एकीकडे भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा वाढविण्यासाठी मेक्सिकोकडून ७ लाख टन अतिरिक्त कच्चे तेल घेण्याचा पर्याय लक्षात ठेवावा लागेल, तसेच संयुक्त अरब अमिरातीकडून १० लाख टन, कुवेतकडून १५ लाख टन आणि सौदी अरेबियाकडून २० लाख टन कच्चे तेल आयात करण्याच्या पर्यायावर लक्ष द्यावे लागेल तर दुसरीकडे भारताला कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या उपयुक्त आणि ङ्गायदेशीर पर्यायांच्या धोरणाबाबतही आघाडी घ्यावी लागेल.
      गेल्या वर्षी १५ ऑक्टोबरला नवी दिल्लीत तेल निर्यातक देशांबरोबर तेलाची किंमत रुपयात आदा करण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, तिला प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्नही होणे गरजेचे आहे. जागतिक अर्थतज्ज्ञांचं म्हणणे आहे की महाग होत असलेल्या कच्च्या तेलाकडे पहाता डॉलरच्या वाढत्या चिंतेपासून वाचण्यासाठी भारतला इराणबरोबरच  व्हेनेझुएलाकडून रुपयात व्यवहार करण्याच्या शक्यता प्रत्यक्षात उतरवण्याच्या धोरणावर चालावे लागेल.
    आता इराणकडून कच्च्या तेलाची आयात बंद होण्याच्या शक्यतेदरम्यान कच्च्या तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी निश्चितपणे जगातील तीनपैकी दोन सर्वात मोठे तेल ग्राहक देश चीन आणि भारत एकत्रितपणे तेल उत्पादक देशांवर कच्च्या तेलाची योग्य किंमत लावण्याचा दबाव निर्माण करण्यासाठी संयुक्त रणनीती आखू शकतात. विशेष म्हणजे आशियायी देशांसाठी तेल पुरवठा दुबई अथवा ओमानच्या कच्च्या तेल बाजारांसंबधित असते. परिणामी कच्च्या तेलाच्या किंमती अपेक्षेपेक्षाही जास्त घेतल्या जातात. कच्च्या तेलाच्या खरेदीत युरोप व उत्तर अमेरिकेच्या देशांच्या तुलनेत आशियायी देशांना काहीशी जास्त किंमत आदा करावी लागते, तिला आशियायी प्रीमिअम असे नाव देण्यात आले आहे.
     इराणकडून भारताचा तेल पुरवठा बंद झाल्यामुळे भारत आणि चीनमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढणार. अशात भारत आणि चीनने तेल उत्पादक देशांचा समूह ओपेकवर तेलाच्या किमती कमी करण्यासाठी दबाव बनविला पाहिजे. चीन आणि भारत जगातील मोठे तेल आयातक देश आहेत, म्हणून त्यांच्याकडून कोणताही आशियायी प्रीमिअम वसूल करण्याऐवजी त्यांना मोठ्या प्रमाणात तेल खरेदीसाठी विशेष डिस्काऊंट दिले जावे.
     भारत वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि याची अर्थव्यवस्था ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे ढकलून जगाची पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता जागतिक सर्वेक्षणातून समोर येत आहे, अशा परिस्थितीत तेलाच्या वाढत्या किंमतीच्या चिंतेपासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत सरकारने एकीकृत ऊर्जा धोरण तयार केले पाहिजे. सरकारने विजेवर चालणार्‍या वाहनांवर भर दिला पाहिजे. इलेक्ट्रीक चारचाकी वाहनांचा टॅक्स कमी करुन त्यांना उत्तेजन दिले पाहिजे. सरकारने इलेक्टीक वाहने आणि गॅसवर चालणार्‍या वाहनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. जगातील विकसनशील देशांमध्ये सर्वाधिक वाढणार्‍या चारचाकी वाहनांची संख्या भारतात आहे. दुचाकी, चारचाकी आणि अवजड अशी सर्वप्रकारची २० कोटी वाहने रस्त्यावरुन धावत आहेत. देशात दरमहा जवळजवळ दोन लाखांपेक्षाही अधिक चारचाकी वाहनांची विक्री होते.
      निश्चितपणे ट्रम्पच्या निर्णयानंतर इराणकडून तेल न घेतल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम सर्वसामान्य माणसांवर होणार आहे. महाग तेल उचलल्यावर महागाईही तेवढीच वाढणार आहे आणि अमेरिकेच्या या दादागिरीने भारतातील सर्वसामान्य जनता भरडली जाणार आहे. म्हणूनच इतर काही महत्वाच्या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे.  तसेही आपला देशा रोज अंदाजे १ दशलक्ष बॅरल्सचे उत्खनन करते. आपली कच्च्या तेलाची रोजची गरज अंदाजे ४.१ दशलक्ष बॅरल्स आहे. त्यामुळे आजही आपला देश कच्च्या तेलाच्या एकूण गरजेपैकी सुमारे ८० टक्के आयात करत आहेे. यावरुन आपले कच्च्या तेलाबाबतचे आयातीवरील अवलंबित्व स्पष्ट होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यावर खडबडून जागे होणे आणि तत्कालिक उपाय करणे हा काही प्रभावी उपाय नव्हे. उत्तम आर्थिक विकास साधायचा असेल तर ऊर्जा आणि इंधन सुरक्षा करणे आवश्यक आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या वापरापासून परावृत्त होण्यासाठी निती आयोगाने सार्वजनिक परिवहनाचे नवे धोरण सादर करण्याबाबत जे म्हटले आहे, ते ताबडतोब मांडले गेले पाहिजे.
      सार्वजनिक परिवहनासाठी इलेक्ट्रीक, इथेनॉल, मेथेनॉल, सीएनजी आणि हायड्रोजन इंधन यासारखी परिवहनाची प्रदूषणविरहीत साधनांचे वापरली गेली तर प्रदूषणात घट आणता येऊ शकेल आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढणार्‍या मागणीतही घट होईल. जैव इंधनाचा वापर वाढवावा लागेल. सध्या पैट्रोल व डिझेलमध्ये १० टक्के इथेनॉलचं मिश्रण केले जाते. २०३० पर्यंत ते वाढवून २० टक्के केलं जाण्याचं लक्ष्य ठरविण्यात आले आहे, त्यादिशेने वेगाने पावले उचलावी लागतील, यातून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ४ ते ५ रुपये प्रति लिटरची घट करता येऊ शकते.
     एकीकडे इराणकडून तेलाची आयात बंद करण्याच्या ट्रम्पच्या आदेशानंतर भारत तात्कालिकपणे मेक्सिको, अरब अमिरात, कुवेत आणि सौदी अरेबियाकडून कच्चे तेल घेण्याच्या पर्यायाचा वापर करेल आणि दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेला कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीच्या धोक्यापासून वाचविण्याची, तसेच विकासाच्या मार्गावरुन पुढे वाटचाल करण्यासाठी नवी धोरणात्मक पावले उचलली जातील. पण इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या नादात अमेरिकेने जी तेलबंदीची तलवार उगारली आहे, तिने भारतासह इतर आयातक देशांना जखमा होणार आहेत. यात अमेरिकेचे काहीही नुकसान होत नाही, पण तिने भारताचा एक चांगला मित्र तोडला आहे, त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

नक्षलवादाचा हेतू चांगला, पण दिशाहीन चळवळ

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉


    गरीब शेतमजूर आणि वनवासी, आदिवासी लोकांचे होणारे शोषण, धनाढ्य जामीनदारांकडून गरिबांवर, विशेषतः शेतमजुरांवर होणारे अत्याचार. सरकारचे भांडवलशाही धार्जिणे धोरण याचा विरोध म्हणून आणि तमाम शोषित, पिडीत जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी १९६७ साली देशात साम्यवादी संघटना एकत्र आल्या. सरकारने धनदांडग्यांच्या मदतीने चालवलेल्या या अत्याचाराला माओने दाखवलेल्या सशस्त्र  क्रांतीच्याच एकमेव मार्गाने संपवता येईल या विचारसरणीतून नक्षलवादाची रक्तरंजित चळवळ सुरु झाली. पश्चिम बंगाल मधल्या नक्षलबारी येथून सुरु झालेली ही तथाकथित क्रांती आजतागायत सुरु आहे आणि देशाच्या अनेक भागात पसरली आहे. १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी दहशत पसरविणे चालू ठेवले आहे. लोकशाही मार्गाने न लढता ते हिंसेच्या मार्गाने लढत असल्याने त्यांची चळवळ भरकटली होती, ती अजूनही तशीच आहे.
      नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराशी अनेक दशके झुंजल्यानंतरही केंद्र आणि राज्य सरकारे नक्षल धोरणाची दिशा ठरवण्याच्या आव्हानांशी तोंड देत आहेत. नक्षलवादाच्या समस्येवर तोडगा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रयत्नात आहे की कायदा सुव्यवस्थेशी निगडीत बाब आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. नक्षलग्रस्त भागातील ही हिंसा गेल्या पाच  दशकांपासून सुरु आहे.  देशातील दहा राज्यांतील ६८ जिल्हे नक्षलवादाने प्रभावित असून नक्षलवाद्यांच्या ९० टक्के कारवाया ३५ जिल्ह्यांमध्ये होत होत असतात. महाराष्ट्र, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि मध्य प्रदेश या दहा राज्यांवर परिणाम करणारे नक्षवाद्यांचे विभाग अंतर्गत सुरक्षिततेसाठी मोठं आव्हान ठरलेले आहेत. या विभागांत अपहरण, खंडणी, दरोडे, बॉम्बस्ङ्गोट, अमानूष हत्या, विकासात अडथळा आणण्याचे प्रयत्न,  लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याची इच्छा आणि समांतर सरकार चालवण्याचे उद्योग सुरु असतात.
     देशाच्या अंतर्गच सुरक्षिततेसाठी मोठं आव्हान ठरलेल्या नक्षलवाद्यांना राज्य आणि केंद्र सरकारे नेहमी भरकटलेले जाहीर करण्याची चूक करतात आणि नेहमी त्याचे उत्तर अतिशय भ्याड असे मिळत राहिले आहे. २५ मे २०१३ ला छत्तीसगढमधील दर्भा खोर्‍यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्याने संपूर्ण देशाल हादरविलं होतं. नक्षलवाद्यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या परिवर्तन रॅलीवर आत्मघाती हल्ला केला होता. त्यात महेंद्र कर्मा, विद्याचरण शुक्ल, नंदकुमार पटेलसारख्या वरिष्ठ नेत्यांसहीत तीसपेक्षा अधिक कॉंग्रेसी मारले गेले होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात नेत्यांना लक्ष्य बनविण्याचं हे सर्वात क्रूर कृत्य होतं. यापूर्वी छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्यात सर्वांत मोठा नक्षलवादी हल्ला ६ एप्रिल २०१० ला झाला होता. त्यात ७६ जवान शहीद झाले होते.  मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी जवानांना चारी बाजूने घेरुन त्यांच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडला बोता. २००९ मध्ये कोलकातापासून साडेतीनशी किलोमीटरवरील लालगड जिल्ह्यावर नक्षलवाद्यांनी ताबा मिळवण्याचा घटनाक्रमही थक्क करायला लावणारा आहे. माओवाद्यांनी या विभागाला ताब्यात घेऊन तो स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अनेक महिने त्यांच्याशी झुंजल्यानतर सुरक्षा दल त्यांची बंडखोरी मोडून काढण्यात यशस्वी झाले.
      खरेतर सामाजिक न्यायाच्या स्थापनेच्या नावावर अस्तित्वात आलेली नक्षलवादी विचारधारा आता हिंसा, रक्तपात आणि घटनात्मक सत्तेविरुद्ध काम करणारी अशी संघटना बनली आहे की तिच्यात नरसंहार हा मान्य आहे. पश्चिम बंगालमधील नक्षलबारीत जमीनदारांविरोधात आंदोलनाने ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात पेट घेतला. या असमानतेविरोधातील आंदोलनालाच पुढे ‘नक्षलवाद’ असे संबोधले जाऊ लागले. त्याचं मोठं आणि हिंसक रुप देशाच्या अनेक भागांत सातत्याने पहायला मिळत आहे. १९६७ मध्येच ऑल इंडिया कमेटी ऑन रिव्होल्युशनरीची स्थापना करण्यात आली, त्यात पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ आणि जम्मू-काश्मीरमधील नेते सामिल झाले आणि त्यांनी संघटना मजबूत करण्याचा, सशस्त्र संघर्ष करण्याचा आणि बिगर संसदीय मार्ग स्वीकारण्याचा निर्ण घेतला. यातून स्पष्ट होते की वंचित, गरीब आणि शोषितांच्या हिताच्या नावावर स्थापन झालेल्या या संघटनेने लोकशाहीच्या घटनात्मक व्यवस्थेला आव्हान देत हिंसक आणि लोकशाहीबाह्य मार्ग निवडला.
      स्वातंत्र्यानंतर जेव्हा देश मोठ्या परिवर्तनासाठी तयार होत होता आणि सरकारे भूदान, योजना आयोग, पंचवार्षिक योजना, पंचायती राज आणि अन्य लोक कल्याणकारी कामांनी देशाची पुनर्बांधणी करण्यास संकल्पबद्ध होती, तेव्हाच नक्षलवादाचा उदय होणे सुरु झाले होते. हा नक्षलवाद हिंसक विचारधारेचं पोषण करणारा होता. १९६९ मध्ये माओवादी कम्युनिस्ट सेंटर नावाच्या हिंसक गटाच्या स्थापनेतून नक्षलवाद अंतर्गत सुरक्षिततेसाठी मोठे आव्हान बनत असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा परिणाम दक्षिणेतही झाला आणि तेथे जमीनदारांविरुद्ध हिंसक आंदोलनासाठी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुपची (पीडब्ल्यूजी) स्थापना झाली. या वेळी नक्षलवादाचा परिणाम स्थानिक पातळीवर वाढत होता आणि त्यात कामगार व गरीब लोकांना सहभागी करण्याचे प्रयत्न चालले होते. हा भारतासाठी राजकीय पातळीवर अस्थैर्याचा आणि प्रादेशिक पक्षांच्या उगवण्याचाही काळ होता. यावेळी माकपा देखील अस्तित्वात आली होती, ती लोकशाहीतही आपली भागिदारी निश्चित करु इच्छित होती. १९७७ नंतर भाकपाने माकपा आणि इतर लहान कम्युनिस्ट पक्षांबरोबर मिळून डाव्या आघाडीची स्थापना केली. व्यावहारीक पातळीवर केरळसह अधिकांश ठिकाणी ही पार्टी माकपाच्या एका छोट्या सहकारी पक्षात बदलली. पश्चिम बंगाल आणि केरळ सारख्या राज्यांत डावे पक्ष सत्तेतही आले. तथापि, नक्षलवादाच्या हिंसक विचारधारेला राजकीय कारणांनी स्थानिक पाठिंबा मिळण्याने ही समस्या वाढत गेली. नक्षलवाद्यांनी पोलिस आणि निमलष्करी दलाल लक्ष्य बनवून नव्वदच्या दशकात या समस्येला देशासमोरील मोठं आव्हान बनविलं. नक्षलवाद्यांनी  मागास आणि भौगोलिकदृष्ट्या नागरीकरणापासून तुटलेल्या विभागांवर आपला प्रभाव राखला.
      भारत सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नक्षलवाद निपटण्यासाठी ग्रे हाऊंडस आणि कोब्रा सारखी पथकं तयार केली. नक्षलवाद्याच्या नायनाटासाठी ऑपरेशन ग्रीन हंट चालवले. युपीए राजवटीत नक्षलवाद्यांवर त्वरीत कारवाई आणि आत्मसमर्पणाच्या योजनांसारखी रणनीती आखण्यात आली. नंतर नक्षलविरोधी मोहीम आणि नक्षलग्रस्त विभागांसाठी दळणवळणाची माध्यमे विकसित करणे आणि आत्मसमर्पण करणार्‍या माओवाद्यांना भत्ता देण्यासाठी सुरक्षा संबंधी खर्चाची योजना आखण्यात आली. या योजनेतर्गत हा भत्ता केंद्र सरकार राज्यांना देते. याअंतर्गत नक्षलग्रस्त विभागांत तैनात सुरक्षा दले आणि ठाण्यांसाठीही निधीची तरतूद केली जाते.
       छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहीमेत २५ जवान शहीद झाल्यानंतर ८ मे २०१७ ला माओवादी हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या १० राज्यांनी एकत्रितपणे संयुक्त रणनीती आखून आठ कलमी तोडगा तयार केला. त्याअंतर्गत कुशल नेतृत्व, आक्रमक रणनीती, प्रशिक्षण, प्रभावी तंत्रज्ञान, प्रभावी गुप्तहेर यंत्रणा, नक्षलवाद्यांची आर्थिक रसद तोडणे याची गरज व्यक्त करण्यात आली. तथापि, नक्षलवाद संपविण्याच्या सरकारी योजना आणि त्यांच्या अंमलबाजणीत खूप ङ्गरक दिसून येतो, या बाबीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. छत्तीसगढमध्ये आत्मसमर्पण करणार्‍या नक्षलवाद्यांसाठी पोलिसांच्या पुनर्वसन धोरणांतर्गत आश्वासने तर आकर्षक देण्यात आली, परंतु धोरणांची अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश काही लपून राहिलेले नाही. सरकार आत्मसमर्पण करणार्‍या नक्षलवाद्यांमधील  दहा टक्केंनाही आतापर्यंत रोजगार पुरवण्यात अपयशी ठरले आहे.
      नक्षलवाद संपविण्यासाठी केंद्र आणि राज्ये विकासाला आपलं ध्येय बनविण्याचा दावा करतात, नक्षलग्रस्त विभागांना भली मोठी मदतही केली जात आहे, परंतु मूलभूत परिस्थितीत कोणताही बदल दिसून येत नाही. हे विभाग आजही वीज, पाणी आणि रस्त्यांपासून वंचित आहेत आणि आरोग्यसेवांबाबतीत ग्रामीण नक्षलवाद्यांवर अवलंबून असतात. यावेळी देशातील साठ टक्के राज्ये नक्षलवादग्रस्त आहेत. या राज्यांत कुठे नक्षली हल्ल्यांची तीव्रता अधिक आहे तर कुठे कमी आहे. नक्षलवाद्यांसाठी मागास विभाग पोषक ठरतात. म्हणूनच सरकारने मागास विभागात विकास आणि आदिवासींमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्याची गरज आहे. त्याबरोबरच नक्षलग्रस्त विभागांत योग्य निधी, निमलष्करी दलाचे आधुनिकीकरण आणि आत्मसमर्पण करणार्‍यांचे पुनर्वसन सारख्या धोरणांवर सातत्याने प्रामाणिकपणे काम करुन नव्या नक्षलवाद्यांचं पीक थांबविता येईल.

सोमवार, १५ एप्रिल, २०१९

जनतेस लाभलेय आणखी एक अनमोल संधी

 -उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉



       लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ७ टप्प्यात मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल झाले. आता पुढचे मतदान १८, २३, २९ एप्रिल, तर ६, १२ आणि १९ मे रोजी सहा टप्प्यात होणार आहे. या टप्प्यांत मतदारांचा कस लागणार आहे. आपण कोणाला, कोणत्या पक्षाला मत देतोय हा विचार आता मतदारांना करावाच लागणार आहे. लोकशाहीची धुरा खांद्यावर घेतलेले पक्ष आपली दिशाभूल करताहेत का? याचा विचार प्रत्येक मतदाराला करावाच लागणार आहे. जनतेच्या लायकीप्रमाणे सरकार लाभते, असे म्हटले जाते, त्यात काही खोटे नाही. त्यामुळे जर नालायक सरकार बनवले तर दोष जनतेचा असणार आहे. त्यामुळे जनतेला आपली लायकी वाढविण्याची ही पाच वर्षांतून एकदा येणारी संधी लाभली आहे. भ्रष्टांना आणि विकासद्रोही पक्षांना बाजूला ठेवण्यास आपले एक मत पुरेसे आहे.
       लोकसभा निवडणूक प्रक्रियेस प्रत्यक्ष मतदानाने ११ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. ही रणधुमाळी १९ मे रोजी संपणार आहे. २३ मेला कोण बाजीगर ठरणार याचे उत्तर मिळणार आहे. आत्ता मात्र पाच वर्षांपासून सत्ताधारी असलेले देशाचा कायाकल्प करण्यासाठी आणखी एक संधी मागत आहेत, तर त्यापूर्वी दहा वर्षे सत्तास्थानी असलेले आता संधी मिळाल्यास धरतीवर स्वर्गात आणण्याची स्वप्न दाखवित आहेत. प्रत्येक निवडणुकीत देश-समाजाचे चित्र बदलण्याची अशी आश्वासने दिली जातात, परंतु सत्तेवर येताच पुढील निवडणुकीपर्यंत ते मुद्दे बासनात बांधले जातात. देशाच्या सुरुवातीच्या काही निवडणुका तर नव्या नव्या मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरच्या निवडणुका होत्या. देशाने फाळणीच्या वेदना सहन केलेल्या होत्या आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरु भारताला स्वप्न दाखवत होते. लोकांना ती स्वप्न चांगलीही वाटत होती, शहरकेंद्रीत औद्योगिकरण आणि गगनचुंबी इमारतींच्या माध्यमांतून ती पूर्णही झाली असतील, पण देश-समाजाचे व्यापक चित्र बदलले काय? नवा भारत बनला काय? मोदी सरकारही नव्या भारताचे स्वप्न दाखवित राहिले आहे.
       १९६४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाला. त्यानंतर १३ दिवस गुलझारीलाल नंदा यांना कार्यवाहक पंतप्रधान बनवण्यात आले. आणि १९६६ मध्ये पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या मृत्यूनंतरही त्यांना १३ दिवस देशाचे कार्यवाहक पंतप्रधान नेमण्यात आले. लालबहादूर शास्त्री यांच्या अकाली निधनानंतर इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. निश्चितच इदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे बंद करण्यापासून १४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, पोखरण येथे पहिली अणुचाचणी, बांगलादेशची निर्मिती, ऑपरेशन ब्ल्यू स्टारपर्यंत अनेक मोठी पावले उचलली, परंतु गरीबी हटावची त्यांची प्रसिद्ध घोषणा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आली नाही. त्यांनी त्याबाबतीत काही केलं नाही असं नाही. परंतु निवडणूक जिंकण्यासाठी जी सोनेरी स्वप्न दाखवली होती, ती प्रत्यक्षात साकार करता आली नाहीत. तथापि इंदिरा गांधी यांना दीर्घ कार्यकाळ मिळाला आणि सत्तेवर पूर्ण अधिकारही मिळाला, त्यांचा अधिकार इतका अमर्याद होता की २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात त्यांनी देशात अंतर्गत आणीबाणीच्या नावावर घटनात्मक सर्व नागरी हक्क स्थगित केले. इंदिरा गांधी यांनी राज्यघटना, संसद, मूलभूत अधिकार गुंडाळून ठेवले, सर्व विरोधी पक्ष संघटनांना तुरुंगात ठेवलं. विचारांची, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली.
       आणीबाणी मागे घेतल्यानंतर मार्च १९७७ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात जनता पक्षाला बहुमत मिळाले आणि २४ मार्च १९७७ रोजी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता सरकार स्थापन झाले. अनेक पक्षांचे कडबोळे असलेले हे सरकार दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा आणि चरणसिंग यांची राजकीय महत्त्वाकांक्षा अशा काही मुद्यांमुळे कोसळले. इंदिरा गांधी यांनी चरणसिंग यांना पाठिंबा दिला आणि ते २८ जुलै १९७९ रोजी पंतप्रधान झाले. सहा महिन्यांपेक्षा कमी काळातच इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढला. नव्याने निवडणुका झाल्या आणि १४ जानेवारी १९८० रोजी पुन्हा इंदिरा गांधी प्रधानमंत्रीपदी विराजमान झाल्या. यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षकांनी त्यांची ३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी हत्या केली आणि राजीव गांधी त्यांचा पुत्र असण्याच्या एकमेव पात्रतेवर पंतप्रधान बनले. संसदेचा कालावधी संपत असल्याने त्यांनी निवडणूक घेण्याची शिफारस केली. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे सहानभूतीची लाट होती. निवडणुकीत काँग्रेसचे भरघोस उमेदवार निवडून आले आणि ३१ डिसेंबर १९८४ रोजी राजीव गांधी पंतप्रधान झाले.
       सुरुवातीला राजीव गांधी यांची प्रतिमा एका चांगल्या माणसाची होती. पण लवकरच ते वेगाने लोकप्रियता गमावणारे पंतप्रधानही ठरले. मुख्यत: बोफोर्स आणि शहाबानो प्रकरणात सुप्रीम कोर्टानं दिलेला अत्यंत उत्तम, प्रगतीशील घटनात्मक निर्णय संसदेतलं आपलं पाशवी बहुमत वापरून उलटवून टाकणारं ‘मुस्लिम महिला विधेयक’ यामुळे संगणीकीकरणाच्या माध्यमातून नवा भारत बनविण्याचा दावा करणाऱ्या राजीव गांधींच्या सरकारला १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत नाकारलं. तेव्हा राष्ट्रीय मोर्चाने भाजप आणि डावे पक्ष यांच्याशी आघाडी करून बहुमत मिळविले. विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान म्हणून निवडले गेले. ७ नोव्हेंबर १९९० रोजी भाजपने सरकारचा पाठिंबा काढला आणि विश्वनाथ प्रताप सिंह यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला. राजीव गांधी यांनी पाठिंबा दिल्याने चंद्रशेखर यांच्या नेतृत्वात १० नोव्हेंबर १९९० रोजी नवीन सरकार स्थापन झाले. जेमतेम चार महिने ते सरकार चालले.
        ६ मार्च १९९१ रोजी काँग्रेसने पाठिंबा काढल्यामुळे चंद्रशेखर यांचे सरकार कोसळले. पुन्हा निवडणुका लागल्या आणि निवडणूक प्रचारादरम्यान तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांची लिट्टे या श्रीलंकन तामिळ अतिरेकी गटाच्या मानवी बाॅम्बने आत्मघाती हल्ल्यात हत्या केली. त्यानंतर २१ जून १९९१ रोजी निवडून आलेले अल्पमतातील काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्याचे नेतृत्व नेहरु घराण्याबाहेरील पी.व्ही. नरसिंह राव यांना मिळाले. ते पंतप्रधान झाले. त्यांच्याच काळात आर्थिक उदारीकरणास सुुरुवात झाली आणि यावेळी मनमोहनसिंग अर्थमंत्री होते.
        १९९६ मध्ये देशाने पुन्हा दोन कमकुवत सरकारे पाहिली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला असला, तरी भाजपकडे बहुमत नव्हते. त्यामुळे भाजपचे वाजपेयी सरकार केवळ १३ व्या दिवशी कोसळल्यानंतर केंद्रात तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) प्रमुख एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान झाले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. पण अनेक प्रसंगी ते सरकार दिशाहिन कळसूत्री असल्याचे दिसून आले. याची सर्व सूत्र काँग्रेसच्या हातात होती. अशा संधीसाधू प्रयोगांची जी अवस्था व्हायची तीच झाली. दहा महिन्यातच २१ एप्रिल १९९७ ला एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधान पद सोडावे लागले. त्यानंतर तिसऱ्या आघाडीचेच इंद्रकुमार गुजराल यांना नेतेपदी नेमले आणि २१ एप्रिल १९९७ रोजी त्यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
         १९९८ च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली. मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले. विशेष म्हणजे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांनंतरही वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळी व्यापार व विदेशी गुंतवणूकीच्या रूपात शंभर हजार करोडपर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात 'कर्जबाजारी' हे देशाला लागलेले विशेषण गळून पडले. १९९८ च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला.
        १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घवघवीत यश मिळाले आणि अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात २००४ मध्ये काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापन करुन अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या बड्या नेत्याच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मागे सारुन सत्तेत पुनरागमन केलं आणि सरकारची सूत्र मनमोहन सिंग यांच्याकडे सोपविण्यात आली. २००९ मध्ये मतदारांनी त्यांना पुन्हा एक संधी दिली. परंतु २०१४ मध्ये नरेंद्र मोदी या नावावर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या जबरदस्त जनादेशातून काँग्रेसच्या सरकारची वाटचाल कशी राहिली असेल यांचे चित्र पहायला मिळाले. काँग्रेसने आपल्या इतिहासात सर्वात लज्जास्पद कामगिरी केली आणि लोकसभेत केवळ तिला ४४ जागांवर समाधान मानावे लागले. मावळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुण-दोष, त्यांची कामगिरी मतदारांसमोर आहेच, त्याबाबत पुन्हा येथे उहापोह करण्याची गरज नाही. त्याचा अस्त होणार की उगवणार त्यांची जागा दुसरा कोणी घेणार हे २३ मे रोजी कळेलच.
         मुळात मुद्दा असा आहे की, १९४७ ते १९१९ या ७२ वर्षांच्या कालावधीत १४ पंतप्रधान झाले. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी,अटल बिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग आणि आता नरेंद्र मोदी वगळता सर्वांचा कालावधी अल्प होता. मोरारजी देसाई सुमारे सव्वादोन वर्ष, चरण सिंग सहा महिन्यांपेक्षाही कमी काळ, विश्वनाथ प्रताप सिंह जवळपास ११ महिने तर चंद्रशेखर आणि एच.डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांनी प्रत्येकी केवळ साडेसात महिने इतक्या थोड्या काळासाठी सरकारचे नेतृत्व करत होते. याचा परिणाम राजकीय अस्थिरतेत झाला. अनेक पक्ष, अनेक नेते आणि प्रत्येक पक्ष आणि नेत्याची मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे सत्तेत असलेल्यांना दीर्घकालीन विचार करायला, धोरण ठरवायला सवडच मिळाली नाही, अंमलबजावणी तर दूरच राहिली. प्रशासनावर पकड ढिली झाली. राजकोषीय शिस्त बिघडली. अनुनयाच्या राजकारणाने वेग घेतला. देशाच्या आर्थिक विकासापेक्षा व्यक्ती आणि पक्ष यांच्या भल्याकडे जास्त लक्ष दिले गेले. यामुळे देशाचा विकास ज्याप्रकारे व्हायला हवा तसा तो झाला नाही.
         काँग्रेसने देश सशक्त केला, तेव्हढ्याच चुकाही केल्या, भाजपनेही देश सशक्त केला, तेवढ्याच चुका केल्या आहेत. मतदार चुकांना माफी करत नाहीत. हे या दोन्ही पक्षांना, त्यांच्या सहयोगी पक्षांना माहित आहे. त्यामुळे त्यांची धांदल उडाली आहे. त्यांना मतदारांसमोर मतासाठी आपली झोळी पसरवितांनाच तुमचा विकास आम्हीच करु असे भासविले जात आहे. आत मतदान करताना मतदारांनी विचार केलाच पाहिजे, पक्ष कोणताही असो, तो खरेच लोकहिताच्या दृष्टीने काम करतोय का? उमेदवार कोणाचाही असो, तो सर्व अर्थाने स्वच्छ आहे का? त्याने यापूर्वी मतदार संघाचं प्रतिनिधीत्व केलं असेल तर त्या मतदारसंघाच्या विकासात किती भरीव कामगिरी केली आहे. नवा उमेदवार असेल तर त्याची कुवत मतदारांना विकत घेण्याऐवजी विकास पुरक आहे का? तो भ्रष्ट नाही ना? याचा गांभीर्याने विचार करुनच आपले मत दिले पाहिजे. मतदारांनी स्वत:च आपल्याला कसे सरकार हवे आणि कशाकरिता हवे हे ठरवले पाहिजे. अशासाठी कि अशी संधी त्यांना पाच वर्षांनी एकदाच मिळते.
  

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

भारतही बनला अंतराळ महाशक्ती

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉


       ‘मिशन शक्ती’ अंतर्गत भारताने २७ मार्च रोजी उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. भारताच्या शास्त्रज्ञांनी ‘मिशन शक्ती’ ऑपरेशन यशस्वी करत लो अर्थ ऑरबिट या उपग्रहाला ए सॅट (अँटी सॅटेलाईट) क्षेपणास्त्राद्वारे नष्ट केले. या मिशनमुळे अमेरिका, रशिया, चीन प्रमाणेच भारत अंतराळ महाशक्ती बनला आहे. त्यामुळे या देशांना पोटदुखी झाली आहे त्यामुळे  ही चाचणी कशी चुकीची होती, हे भासवण्याचा आपले ‘शेजारी’ चीन व पाकिस्तान प्रयत्न करताहेत. अमेरिकेनेही त्याबाबतची मळमळ व्यक्त केलीच. निमित्त केले अंतराळ कचर्‍याचे. पण यालाही भारतीय शास्त्रज्ञांनी चोख उत्तर देऊन अमेरिकेचा कचराच केला.
        भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या दोन संस्थांनी ‘ए-सॅट’ हे कृत्रिम     उपग्रहभेदी क्षेपणास्त्र विकसित केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘मिशन शक्ती’ मोहिमेवर काम सुरू होते. ओडिशातील बालासोर येथील ‘डीआरडीओ’च्या परीक्षण केंद्रावरून २७ मार्च रोजी सकाळी ११-१६ वाजता ‘ए-सॅट’ प्रक्षेपित करण्यात आले आणि सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील उपग्रह अवघ्या तीन मिनिटांत टिपला आणि भारत शत्रू राष्ट्राचा उपग्रह पाडण्याची क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला. भारत आता ३०० किमीहून २ हजार किमी उंचीवरील कोणत्याही सक्रिय उपग्रहाला पाडू शकतो. चाचणीसाठी वापरलेला ‘एलईओ’ (लो अर्थ ऑर्बिट) उपग्रह भारताचाच निकामी झालेला उपग्रह होता.  या चाचणीने भारताची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र क्षमता सिद्ध झाल्यामुळे देशावर अवकाशातून ‘वक्रदृष्टी’ ठेवण्याची हिंमत यापुढे कोणी करणार नाही.
      २०३० पर्यंत अंतराळात सुसज्ज असे लष्कर सज्ज करण्याचे मोहिम अमेरिकेने हाती घेतली आहे. तर, अंतराळातील उपग्रहांमध्येच अणुबॉम्ब किंवा अन्य शस्त्रास्त्र ठेवता येतील का? जेणेकरून तेथूनच शत्रूवर हल्ला चढविता येईल, अशा प्रकारची तयारी रशिया आणि चीन यांच्याकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून अण्वस्त्रांप्रमाणेच अमेरिकेने सर्वात प्रथम उपग्रहाचा लक्ष्यभेद करणारे अस्त्र निर्मितीचे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान (ए-सॅट) सर्वप्रथम विकसित केले.  अमेरिकेने १९५९ साली, रशियाने (तत्कालीन सोव्हिएत संघ) १९६० साली तर चीनने २००७ साली तर उपग्रह पाडण्याची चाचणी यशस्वीपणे पार पाडली होती. चीनचा हेतू अंतराळातील भारताच्या उपग्रहांवर धाक ठेवण्याचा होता. कारण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युद्ध प्रत्यक्ष जमिनीवर लढले जात असले तरी त्यात उपग्रहांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. कारण, लढाऊ विमाने, रडार, सीमारेषेवरील पोस्ट, मुख्यालय ही सारीच यंत्रणा उपग्रहाच्या माध्यमातूनच एकमेकाच्या संपर्कात राहते. तसेच संदेशवहन, हवामान, दळणवळण या सर्वांसाठी आवश्यक गोष्टी आणि गरजा ही उपग्रह भागवत असतात. त्यामुळे उपग्रहांची सुरक्षा राहिली तर जमिनीवरील युद्धही जिंकणे शक्य असते. अशा परिस्थितीत तुमची उपग्रह नष्ट करण्याची आमची क्षमता आहे, असा धाक कोणी दाखवत राहिले, तर ते गंभीर असते. हे उपग्रह नष्ट केले तर कोणाही देशाची आंधळ्यासारखी अवस्था होऊ शकते. भारताला आपली अवस्था अशी होऊ द्यायची नव्हती, त्याला आपल्या उपग्रहांची सुरक्षा महत्वाची होती आणि आहे म्हणूनच भारतानेही आपल्या उपग्रहांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतरांना, मुख्यत्वे चीनच्या ए सॅट क्षमतेला उत्तर म्हणून आपल्या ए सॅटची चाचणी केली. या यशस्वी चाचणीमुळे चीन अस्वस्थ झाला आहे. भारताचा धाक आता चीनला असणार आहे. गोष्टी बदलतात त्या अशा.
          भारताने चाचणीसाठी आपला ‘एलईओ’ (लो अर्थ ऑर्बिट) उपग्रह ए-सॅट उपग्रहभेदी क्षेपणास्त्राने नष्ट केले. लो अर्थ ऑर्बिट ही एक अंतराळविज्ञानातली संज्ञा आहे. ऑर्बिट या शब्दाचा अर्थ होतो कक्षा. पृथ्वीपासून ते अवकाशापर्यंतच्या अंतराचे विविध टप्पे असतात. त्या टप्प्यांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार संज्ञा दिली जाते. लो अर्थ ऑर्बिट ही त्यातीलच एक संज्ञा आहे. ही कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळची कक्षा म्हणून ओळखली जाते. ही कक्षा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते अवकाशात १६० किलोमीटर ते २००० किलोमीटरपर्यंत पसरलेली असते. या अंतराळ परिक्षेत्राचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी असल्यामुळे इथे कनेक्शन सगळ्यात चांगलं मिळतं. त्यामुळे बहुतांश उपग्रह याच ठिकाणी असतात. या कक्षेत असलेल्या उपग्रहांना पृथ्वीवरच्या हालचाली सुस्पष्टपणे टिपता येतात. म्हणूनच या कक्षेची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. लो ऑर्बिट व्यतिरिक्त मीडियन अर्थ ऑर्बिट, जियोसिन्क्रोनस ऑर्बिट आणि त्यानंतर असलेली हाय अर्थ ऑर्बिट असे या कक्षांचे प्रकार आहत. हाय अर्थ ऑर्बिट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ३५,७८६ किलोमीटरवर आहे.
       भारताने ए सॅट (अँटी सॅटेलाईट) उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी  ‘एलईओ’ (लो अर्थ ऑर्बिट) उपग्रह पाडून घेणे अंतराळ संरक्षण सिद्धतेचे पहिले पाऊल आहे. यामुळे चीनची साथ असणार्‍या पाकिस्तानलाही धाक बसणार आहे. चीनने भारतावर धाक रहावा म्हणून पाकिस्तानला अणुबॉम्बसारखे विध्वंसक शस्त्र बनवण्याचे तंत्रज्ञान हस्तांतरित केले आहे. पाकिस्तानमधून सूत्र हलविणार्‍या दहशतवादी संघटनांना आंतरराष्ट्रीय कारवाईपासून वाचविण्यासाठी चीन अजूनही त्यांची ढाल बनला आहे. पाकिस्तान परंपरागत सैन्य क्षमतेच्या बाबतीत भारतासमोर टिकाव धरु शकत नाही. हा न्यूनगंड तो वारंवार अण्वस्त्रांची धमकी देऊन व्यक्त करत आला आहे. भारताविरुद्ध अणवस्त्रांचा प्रथम वापर करण्यासा आपण मागेपुढे पहाणार नाही असा त्यांचा अणुसिद्धांत आहे. त्याआडून तो जिहादी दहशतवादी तयार करुन भारताच्या विरुद्ध छुपे युद्ध करत आहे. आता भारत आपल्याकडे येणार्‍या क्षेपणास्त्रांना पूर्ण क्षमतेने नष्ट करु शकतो आणि यामुळे पाकिस्तानच्या हेकडीतील हवा बाहेर निघाली आहे.
       भारताचा स्वसुरक्षेच्या आपल्या उपग्रहांच्या सुरक्षेच्या दृष्टीने  ए सॅट (अँटी सॅटेलाईट) उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीचे योग्य पाऊल उचलले, त्यात नेत्रदीपक यशही मिळाले, पण हे यशाबरोबरच अंतराळ कचर्‍याचा प्रश्न उपस्थित झाला. भारताने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या केलेल्या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोका निर्माण झालाय. भारताने पाडलेल्या उपग्रहाचे सुमारे ६० तुकडे आतापर्यंत सापडले आहेत. त्यापैकी २४ तुकडे आयएसएसच्या कृत्रिम उपग्रहाच्या कक्षेतील पृथ्वीपासून सर्वात दूर असलेल्या बिदूच्या बाहेर सापडले आहेत. अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असा शेरा नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टीन यांनी मारला. त्यामुळे भारताचं खरंच चुकलंय का, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, इस्रोनं लगेचच त्याचं निरसन केलं आहे. देशाची मान खाली जाईल असं कुठलंही काम आपण केलं नसल्याचंही इस्रो अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी स्पष्ट केलं. भारताने अंतराळात ३०० किमी उंचीवर चाचणी केली. तिथे हवेचा दाब खूपच कमी असतो. तेथे निर्माण झालेला कचरा पुढील सहा महिन्यात जळून नष्ट होईल. चीनने ८०० किलोमीटर उंचीवर ए सॅट क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. तिथे हवेचा दाब जवळपास नसतोच. त्यामुळे या चाचणीनंतर निर्माण झालेला कचरा, पाडलेल्या उपग्रहाचे ३००० तुकडे अजूनही अंतराळात तरंगत आहेत. तसा प्रकार होऊ नये यादृष्टीने भारताने पूर्ण काळजी घेतल्याचं तपन मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भारताविरुद्ध बोंब मारणार्‍यांचा कचराच झाला असे म्हटले तर त्यात वावगे नाही.
      १९५७ साली रशियाने स्पुटनिक हा पहिला उपग्रह अंतराळात सोडला तेव्हापासून अंतराळात कचरा निर्माण होण्यास सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत युरोपीय देश, जपान, चीन आणि भारत यांसह जवळ जवळ १९ देश अवकाशमोहीम राबवत आहेत. त्यामुळे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती ङ्गिरत आहेत. संदेश दळणवळण, हवामान अंदाज आदी क्षेत्रांसाठी उपग्रह आवश्यकच आहेत. अंतराळात सोडण्यात आलेल्या प्रत्येक उपग्रहाचा कालावधी ठरलेला असतो. हे उपग्रह कालान्तराने सौरवात किंवा तापमानातील प्रचंड ङ्गरकांमुळे किंवा नियोजित काम संपल्याने निकामी होतात. ते उपग्रह खाली न पडता अवकाशात ङ्गिरत राहतात. एकामागे एक असे अनेक उपग्रह सोडले जातात आणि कालांतराने ते निरुपयोगी होऊन ङ्गिरत राहतात आणि साठत राहतो अंतराळातील कचरा. उपग्रहांवरील आच्छादने, बॅटर्‍या, इंधनाच्या छोट्या-मोठ्या टाक्या, नटबोल्ट, रंगाचे पापुद्रे यासारखा ८ ते १० हजार टन इतका कचरा अंतराळात साठलेला आहे. या कचर्‍यामुळे इतर उपग्रहांना, अवकाश मोहिमांना धोका निर्माण होणे साहजिकच आहे. हा धोका कमी करण्यासाठी आणि अंतराळ सिद्धता राखण्यासाठी भारताने ए सॅट (अँटी सॅटेलाईट) उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यामुळे भारताने पाडलेल्या लो अर्थ ऑर्बिट उपग्रहाचा अतराळात कचरा कायम राहणार नसून त्याचे हवेतच ज्वलन होणार आहे. अंतराळ स्वच्छतेच्या बाबतीत भारत अतिशय जागरुक आहे. भारताला शिकवावे लागत नाही, तो आदर्श घालून देतो.
      १९६७ मध्ये संयुक्त राष्ट्राने या मुद्द्यावर आऊटर स्पेस ट्रिटी (अंतराळाच्या बाह्य सुरक्षेसाठी करार) तयार केली होती. त्यानुसार एखाद्या उपग्रहाची हानी होणे किंवा जगातील मोठ्या प्रदेशावर विपरीत परिणाम करू शकणार्‍या शस्त्राच्या चाचणीवर बंदी आहे. त्यात उपग्रहरोधी क्षेपणास्त्र चाचणी व जमिनीवरून डागण्यात येणार्‍या लेझरवरील बंदीचा समावेश आहे. या करारात बड्या देशांची दादागिरी असल्यामुळे भारताने ए सॅट क्षमता असणार्‍या कोणत्याही देशाबरोबर सुरक्षा करार केलेला नाही. चीनने सर्व सुरक्षा करार मोडून चाचणी केली होती, पण थोड्या टिकेनंतर या बड्या देशांनी चीनला पदरात घेतले होते. भारत कोणत्याही बंधनात नसल्याने तो ही चाचणी घेऊ शकला. अणुचाचणीच्या बाबतीतही भारताने असेच पाऊल उचलले होते. भारत जर अमेरिकेसारख्या बड्या देशांना दबून राहिला तर चीन आणि पाकिस्तानसारखे शेजारील देश बड्या खोड्या काढायला कमी करणार नाही. असे होऊ नये यासाठी भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या दोन संस्थांनी ‘ए सॅट’ हे कृत्रिम उपग्रहभेदी क्षेपणास्त्र विकसित करुन देशाला भक्कम केले, यामुळे जगात भारताचा दबदबा वाढला आहे यात दुमत नाही.

सोमवार, १ एप्रिल, २०१९

धनशाहीच्या विळख्यात अडकलेय लोकशाही

-उमाजी म. केळुसकर ⬑ विश्वभरारी ⬉


     १७ वी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतदार ५४३ खासदारांची निवड करणार आहेत, तर निवडणुकीसाठी हजारो पक्षीय, तसेच अपक्ष उमेदवार उभे राहणार आहेत. देशात २,००० हून अधिक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत, त्यांना आपल्या उत्पन्नावर आयकराची सवलत मिळते. या सर्व पक्षांनी २ हजार रुपयांपर्यंत रोख देणगी स्वीकारण्याच्या नियमाच्या आडून गुप्त देणगीदारांची देणगी दाखवून अब्जावधी रुपयांचा काळा पैसा राजकारणात पचवला जातो. उद्योजक, उद्योजक घराणी यांच्याकडून देणग्यांचा ओघ सुरु असतो. नियमानुसार एक उमेदवार ७० लाख रुपयांहून अधिक खर्च करु शकत नाही. पण त्यांचा खर्च ५ ते १० कोटीपर्यंत सहज जातो. सत्ताधारी आणि विरोधक हे एका माळेचे मणी असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या नाकावर टिच्चून मतदारांना खरेदी करणे चालू असते. या लोकसभेच्या निवडणुकांत कडक आचारसंहिता असूनही धनशाहीच्या विळख्यात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होणार आहे. त्यामुळे समंजस मतदार आणि उमेदवार यांनी सावध राहण्याची वेळ आली आहे.
       लोकशाही म्हणजे, प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य. या लोकशाहीचा संंबंध राज्यव्यवस्थेबरोबरच एका सामाजिक व्यवस्थेशीही आहे. प्रत्येक नागरिक इतर कोणत्याही नागरिकासारखा समजला जातो आणि सर्व माणसे जात, वर्ण, लिंग, संपत्ती आणि धर्माच्या भेदभावाविना समान अधिकार आणि संधी मिळवतात त्या व्यवस्थेलाही लोकशाही म्हणतात. 'लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरीता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही' अशी अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची केलेली व्याख्या प्रसिद्धच आहे. परंतु परिस्थिती तशी आहे काय? ज्याला आपण लोकशाही समजतो ते मोठमोठ्या व्यापारी आणि धनदांडग्यांचं राज्य आहे. दुसरं काही नाही. निवडणुकीत ज्यांच्याकडे पैसा आहे तोच विजयी होतो. पैशाच्या बळावर त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा निर्माण होतात. यात नागरिकांकडे फक्त मतदारांचीच भूमिका असते. दोन निवडणुकांमधील कालावधीत नागरिकांकडे काहीच काम नसतं. त्यामुळे कार्यपद्धतीत नागरिकांचा सक्रिय सहभाग नसतो आणि काही निवडक लोकच प्रत्यक्षात राज्यकारभार करीत असतात व त्यांचं समाजावर वर्चस्व असतं. हे निवडक लोक धनदांडगे असतात आणि राज्यकारभारातूनही धनच वाढवत असतात. हे मंत्री, खासदार, आमदार यांच्या वाढत्या संपत्तीवरुन लक्षात येते आणि इतकी सेवा केल्याची बक्षिसी त्यांना निवृत्तीनंतर पेन्शनद्वारे दरमहा मिळत राहते. हे लोकप्रतिनिधी आजचे पहिल्या क्रमांकाचे भूमाफियाही झाले आहेत. हे भूमाफिया राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर कोण कोण आहेत हे जनतेला ठाऊक आहे, पण जनता दबलेली आहे.
      लोकशाहीचा आधार निवडणूक आहे आणि निवडणूक इतकी खर्चिक बनली आहे की त्याबाबत सामान्य माणसाने विचार करणेही कठीण आहे. जर एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याने एखाद्या राजकीय पक्षातून निवडणूक लढवण्याचं ठरवलं ठरवलं तर आधी पक्षासाठी निधीची सोय करावी लागते किंवा एखाद्या मोठ्या नेत्याचं कृपाक्षत्र मिळवावे लागते आणि त्यानंतर निवडणुकीत खर्च होणाऱ्या कोट्यवधी रुपयांची व्यवस्था करावी लागते. या प्रक्रियेत मतदाराला प्रत्येकी ५०० ते ५००० या दराने विकत घेण्याची प्रथा राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी सुरु केली आहे आणि मतदारही 'चोरांचा माल का सोडा' या भावनेने स्वत:ची विक्री करुन घेऊन या पक्ष आणि उमेदवारांच्या लोकशाहीच्या विटंबनेत सहभागी होत आहेत. याला काही पक्ष, उमेदवार आणि मतदार अपवाद आहेत. ते प्रामाणिकपणे लोकशाही रथ ओढत आहेत, पण पैसाच बोलतो हे वास्तव आहे. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत एका एका उमेदवाराचा छुपा खर्च ५०-५० लाखापर्यंत पोहचला आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली जातात. निवडणुकीत कोट्यवधी रुपये उडवणारे लोक देशसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन इतका पैसा खर्च करतात काय की तो पुन्हा अनेकपट मिळवण्याचा बिझनेस करतात? असा प्रश्न उपस्थित झाल्यास लोकप्रतिनिधीत्व एक बिझनेस झाला असल्याचेच लक्षात येते. त्यामुळे विकास, देशसेवा हे आभासी शब्द झाले आहेत. देशाचा विकास कासवगतीने होण्याचे हेच कारण आहे.
      कोट्यवधी रुपये खर्च करुन जेव्हा हे धनदांडगे सदनात जाऊन बसतात तेव्हा ते सर्वसामान्य माणसाच्या हिताचे कायदे करणार, निर्णय घेणार की आपल्यासारख्या धनदांडग्यांच्या बाजूचे निर्णय घेणार? साहजिकच ते धनदांडग्यांच्या बाजूचे कायदे करतात, निर्णय घेतात आणि हे वेळोवेळी दिसून आले आहे. याचा परिणाम असा होतो की सदनात केवळ धनदांडगेच पोहोचण्याची शक्यता अधिक निर्माण होते. राजकारणात सातत्याने धनदांडग्यांची संख्या वाढत चालली आहे. भूकबळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कालाहंडीच्या ओरिसा विधानसभा निवडणुकीत १०-२० नाही तर १०३ कोट्यधीश उमेदवार होते. हे आकडे एका अशा देशाचे आहेत की जेथे योजना आयोग दिवसाला ३२ आणि २६ रुपये कमविणाऱ्या लोकांना श्रीमंत मानते.
      लोकशाहीचं सर्वात महत्वाचं काम लोकाचे जीवनमान उंचावणे, लोकांमधील वाढती असमानता कमी करणे आहे. परंतु जर एखादी लोकशाही व्यवस्था असं करण्यास असमर्थ ठरली असेल तर आपल्याला विचार करावाच लागेल की अशी व्यवस्था लोकशाहीचा आभास तर निर्माण करत नाही ना? भारतीय लोकशाही मजबूत राहिली आहे, हे खरे आहे परंतु ती सर्व सर्वसामान्यांच्या कसोटीस उतरली नाही, हे देखील वास्तव आहे. भारतातील लोकांना सरकारे बदलण्याची संधी मिळाली, परंतु त्यानंतरही त्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. याचं कारण जनतेत जागरुकतेची कमतरता आणि खालच्या पातळीवर घसरलेलं राजकारण आणि पर्याय नसणे हे आहे. यात लोकशाहीच्या रचनेचा दोष नाही. परंतु आतापर्यंतच्या अनुभवातून बाहेर आलेलं सत्य असं आहे की, निवडणूक आणि सत्तेची रचना अशीही आहे की ती बदलोच्छुक, प्रामाणिक व जनतेची बाजू उचलून धरणारे नेते आणि पक्ष यांना तग धरु देत नाही. निवडणूक इतकी महागडी झाली आहे की सामान्य आणि प्रामाणिक व्यक्ती निवडणूक लढण्याता विचारच करु शकत नाही.
       महागड्याबाबत ज्येष्ठ भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कबुली दिली होती. त्यांनी वाढत्या निवडणूक खर्चाबाबत चिंता व्यक्त करून आपण खासदार होण्यासाठी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ८ कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले होते. त्याची स्वत:हून गंभीर दखल घेत निवडणूक खर्चाच्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याच्या कारणावरुन लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम १० ए नुसार आयोगाने अपात्रतेची नोटीस पाठविली होती. खासदारकी धोक्यात आल्यामुळे कोलांटउडी मारत त्यांनी आपले वक्तव्य निवडणुकीतील वाढत्या खर्चाबाबत होते. राज्यात पक्ष आणि सर्व उमेदवारांनी केलेल्या खर्चाच्या आकडेवारीबाबत आपण बोललो होतो. वैयक्तिरित्या आपल्या मतदारसंघात हा खर्च मी केलेला नसून आयोगाला दिलेल्या शपथपत्रातील माहिती खरी असल्याचा दावा मुंडे यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई रद्द करण्याचा निर्णय निर्णय आयोगाने घेतला. पण याबरोबरच वक्तव्ये करताना योग्य ती काळजी घेण्याची सूचना आयोगाने मुंडे यांना दिली. मुंडे हे खरेच बोलले होते. त्यातून भारतीय निवडणुकीच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट झाले होते. हे जे चित्र आहे ते आपली लोकशाही दीर्घकाळ सहन करेल का? निवडणूक खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यात भाजप आणि काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्षच नाही, तर इतर छोटे आणि प्रादेशिक पक्षही मागे नाहीत, परंतु जेव्हा आपण एखाद्या पक्षाचा हिशोब पहातो तेव्हा आदर्श दिसून येतो. परंतु वास्तव वेगळंच असतं. अधिकांश उमेदवार आपली खरी संपत्ती दाखवतच नाहीत आणि त्यांच्या खर्चात पक्षाचा खर्च सामिल केला जात नाही. पक्षाव्यतिरिक्त कार्यकर्त्यांचा खर्च आणि सर्व प्रचारसंस्थांवर होणाऱ्या खर्चाची तर वेगळीच गोष्ट आहे.
      २००४-०५ पासून २०११-१५ पर्यंत देशी-विदेशी कंपन्यांकडून मिळालेल्या देणग्यांच्या आकड्यांकडे पाहिले, तर या देणग्या घेण्यात आणि देण्यात सर्व राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि सर्व देशी-विदेशी कंपन्यांचा मिले सूर मेरा तुम्हारा असल्याचेच दिसून येते. या अकरा वर्षांमध्ये राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांना अधिकृतरीत्या ११,३६७ कोटी ३४ लाखांच्या देणग्या मिळाल्या होत्या. (या अधिकृत देणग्या, अनधिकृत देणग्यांचा हिशोबच नाही. त्यातर अवाढव्य आहेत) यात काँग्रेसला मिळालेल्या देणगीतील ९२ टक्के, भाजपला मिळालेल्या देणगीतील ८५ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या देणगीतील ९९ टक्के आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला मिळालेल्या देणगीतील ३७ टक्के भाग मोठे उद्योजक आणि औद्योगिक घराण्यांकडून मिळालेला आहे. त्याकडे पाहून आपण सहज अंदाज बांधू शकतो की सदनात बसलेल्या लोकांची निष्ठा सर्वसामान्य माणसांबरोबर असेल की ज्यांच्यामुळे ते लोक सदनात पोहोचतात त्या उद्योजक घराण्याशी असणार?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हटले गेले की काँग्रेसने आपल्या आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमा निर्मितीसाठी तेव्हा पाचशे कोटी रुपये उधळले. त्यानंतरही ती या सर्व व्यवस्थेत भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला प्रचारात मागे टाकू शकली नाही, यातून भाजपने केलेल्या खर्चाचा सहज अंदाज बांधता येतो. निवडणुकीत उधळला जाणारा अमाप पैसा ठेकेदार, उद्योजक, औद्योगिक घराणी आदींच्या माध्यमातून येतो आणि याबदल्यात ते आपल्या हिताची धोरणे सरकारने राबवावित आणि गरीब जनतेपेक्षा अधिक आपल्याला सवलती मिळाव्या अशी अपेक्षा बाळगतात. या व्यवस्थेत जे निवडले जातात, त्यांच्यावर मतदारांचं कोणतही नियंत्रण असत नाही आणि राहतही नाही. सत्तेची केद्रं आणि जनतेमध्ये अंतरही खूप आहे. आपल्या लोकशाहीत 'लोक' कुठेतरी दबलेला राहतोय आणि एक विकृत व भ्रष्ट 'शाही' उन्मत्त झालेली आहे. देशाचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल, खरी लोकशाही आणायची असेल तर लोकप्रतिनिधींनी सत्तेपेक्षा देश, देशातील माणसे आणि देशाचा विकास मोठा मानून निवडणुकीस सामोरे गेले पाहिजे आणि मतदारांनीही आपले हक्क ओळखून देश, देशातील माणसांचे हित आणि देशाचा विकास अग्रस्थानी ठेऊन आपले लोकप्रतिनिधी निवडले पाहिजे. आपले अमूल्य मत विवेकाने देऊन कोणत्याही निवडणुकीला सामोर गेले पाहिजे. या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून अपेक्षा केली नाही, तरी मतदारांकडून ही अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही. मतदारांचा नैतिक अंकुश राहिला तरच आपल्या लोकशाहीचा दबदबा राहील.