-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
ज्येष्ठ पत्रकार, रत्नागिरी टाइम्सच्या रायगड आवृत्तीच्या अलिबाग कार्यालयातील उपसंपादक सुभाष श्यामराव पंडित यांचे सोमवार, २२ जानेवारी रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. २८ ऑगस्ट २०१७ रोजी पंडित कुटुंबियांनी त्यांचा अमृतमहोत्सव साजरा केला होता. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांत त्यांचे निधन होणे ही जशी पंडित कुटुंबियांसाठी धक्कादायक बाब आहे, तशीच ती रायगडच्या पत्रकारिता क्षेत्रासाठीही धक्कादायक, विषण्ण करणारी बाब आहे. त्याच्या जाण्याने राजकारण, क्रीडा, पत्रकारिता श्रेत्रात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरुन निघणार नाही.
माणूस गेल्यावर त्यांची किंमत कळते, परंतु पत्रकार विश्वातील ज्यांची आम्हा स्नेह्यांना किंमत माहिती होती तो अमूल्य हिरा म्हणजे आमचे पोयनाडचे भाऊ, सुभाष श्यामराव पंडित. मुळातच पंडित घराणं म्हणजे पोयनाडमधील मोठं प्रस्थ. पण पंडित भाऊ मात्र या प्रस्थाबिस्थाच्या पलिकडचे होते. लहान-थोरात मिसळून जाणारे, गरिबा-श्रीमंतात कोणताही फरक न करणारे, क्रीडाप्रेमी पंडित भाऊ राजकारणात विशेष रस घेत, त्यात त्यांचा दांडगा अभ्यासही होता. भाऊंची पात्रता असूनही राजकारणात त्यांनी मोठ्या पदाची हाव धरली नाही, फक्त पोयनाड विभाग कॉंग्रेसचे २० वर्षे अध्यक्षपद सांभाळले. पण त्यांची खरी आवड ही पत्रकारिता आणि क्रीडाक्षेत्र हेच होते.
पोयनाडला पंडित भाऊंच्या निवासस्थानाच्या तळमजल्यावरील दिवाणखाण्यात हंडे-झुंबराबरोबर मोठमोठी विविध पदके, चषके तेथील काचेच्या कपाटात, तसेच कपाटावर रस्त्यावरुन जाणार्या-येणार्यांना आकर्षित करुन घ्यायची. अपरिचितांना त्या घराचे कुतुहल वाटायचे. मी तर पोयनाडचाच, त्या आकर्षक पदके, चषकांचे मला कुतुहल फार. ही पदके झुंजार युवक मंडळाची कमाई आहे आणि या मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष पंडित भाऊ आहेत, हे जेव्हा मला समजले, तेव्हा पंडित भाऊंचा केव्हढा अभिमान आणि आदर माझ्या मनात निर्माण झाला. हा आदर कधीही कमी झाला नाही, उलट तो दिवसेंदिवस वाढतच गेला. कबड्डी, क्रिकेट आदींमध्ये झुंजार युवक मंडळाचे दबदबा अगदी राज्यपातळीवर पसरला होता. या मंडळातील अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांना नोकर्या मिळाल्या. त्या कंपन्यांच्या कबड्डी संघांतून चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांनी त्या कंपन्यांचेच नाही तर झुंजार युवक मंडळ आणि पोयनाडचेही नाव उज्ज्वल केले. भाऊ, हे तुमच्यामुळे झाले.
पंडित भाऊंच्या आयुष्यातील कारकीर्दीचे तीन भाग करावे लागतील. भाऊंचे जीवन राजकारण, क्रीडा आणि पत्रकारिता या तीन टप्प्यांत विभागले आहे. या तीनही क्षेत्रात भाऊ ‘मास्टर’च ठरले. क्रीडा क्षेत्र हा भाऊंचा ध्यास असल्यामुळे त्यांनी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या स्थापनेत महत्वाची भूमिका तर बजावलीच, परंतु या असोसिएशनच्या सचिवपदाची जबाबदारीही समर्थपणे सांभाळली. भाऊंनी तेथे आपला स्वतंत्र ठसा उमटविला. त्यामुळे या संस्थेच्या इतिहासात भाऊंचे नाव आदराने घ्यावे लागते.
पोयनाडमध्ये कॉंग्रेस आणि शेकापचे राजकारण मी जवळून बघितले आहे. माझे वडील राजकारणी नसले तरी शेकापचे काम करायचे, तर पंडित भाऊ कॉंग्रेसचे. पण या दोघांमध्ये चांगले संबंध होते, तोच वारसा माझ्याकडे आला आहे. त्यामुळे पंडित भाऊंकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन नेहमी मोठ्या भावाकडे बघण्याचाच राहिला आणि तेही नेहमी मोठ्या भावाच्याच भूमिकेत माझ्याशी वागले. हे करताना आमचे भिन्न राजकीय विचार आपुलकीच्या आड आले नाहीत. तसाही टोकाची भूमिका घेणारा पंडित भाऊंचा स्वभाव नव्हता. मृदू पण कणखर असा त्यांचा स्वभाव होता. आजच्या राजकारणाबद्दल त्यांची परखड भूमिका राहिली आहे. कॉंग्रेस असो, शेकाप असो वा शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे, यांच्याबद्दल भाष्य करताना त्यांची भूमिका टिकाकाराची आणि शल्यचिकित्सकाचीच राहिली. माजी मंत्री ऍड. दत्ताजी खानविलकर यांचे ते जवळचे होते. तोच जवळकीचा धागा परखडपणाचे रुप घेऊन, तो त्यांच्यातून नेहमी पाझरताना दिसायचा. अर्थात भाऊंचा परखडपणा हा काही द्वेषमूलक नव्हता, त्यांच्या परखडपणात मार्गदर्शक दडलेला असायचा, त्यामुळे भाऊंचे ‘मत’ महत्वाचे आणि आवश्यक ठरायचे. दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या रायगड आवृत्तीत त्यांचा प्रसंगोपात प्रसिद्ध होणारा ‘माझे मत’ हा स्तंभ वाचकांसाठी राजकीय विश्लेषणाची भूक भागविणारा असायचा तर राजकारण्यांसाठी आपलं काय चुकलंय हे दाखविणारा आरसा असायचा. भाऊंनी हा आरसा मोठमोठ्या नेत्यांना आपल्या पत्रकारितेच्या भूमिकेतून दाखविला आहे.
पंडित भाऊ आधी साप्ताहिक निर्धारमध्ये लिहायचे. निर्धार दैनिक झाल्यावर भाऊ चक्क संपादकीय विभागात उपसंपादक म्हणून कार्यरत झाले. दुर्दैवाने निर्धार बंद पडला तरी भाऊंचा पत्रकारितेचा निर्धार अधिकच पक्का झाला होता. पूर्णवेळ पत्रकारिता करायची असा निश्चय त्यांनी केला. त्यामुळे १९९८ साली दै. रत्नागिरी टाइम्सच्या रायगड आवृत्तीच्या अलिबाग कार्यालयात ते रुजू झाले आणि त्यांनी कार्यालय प्रमुख महेश पोरे आदी सहकार्यांच्या सहाय्याने रत्नागिरी टाइम्स लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात ते यशस्वीही झाले. महेश पोरे यांचे रत्नागिरी टाइम्समधील योगदान वादातीत आहे. मी त्यांना २० वर्षांहूनही अधिक काळ पहात आहे. रत्नागिरी टाइम्स हा त्यांचा श्वास आणि ध्यास आहे. भाऊंच्या जाण्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे.
मी पेझारीचा दैनिक कृषीवल १९८९ सालापासून अलिबागेतून मोठ्या आकारात निघायला लागल्यापासून संपादकीय विभागात उपसंपादक, पुरवणी संपादक, सहसंपादक अशा विविध पदांवर काम केले. आज स्वत:च्या साप्ताहिक कोकणनामाचा संपादक म्हणून पत्रकारिता करीत आहे. पंडित भाऊंना माझे फार कौतुक असायचे. माझी वृत्तपत्रांतील सदरे, दादाची गोष्ट, दादागिरी, भ्रमंती, पुस्तक परिचय, ठसा आणि ठोसा, खारावारा, अग्रलेख या दैनंदिन व साप्ताहिक सदरांबद्दल ते आवर्जून अभिप्राय द्यायचे. मी लिहिलेल्या पुस्तकांबाबतही त्यांना अभिमान वाटायचा. पोयनाडहून अलिबागला एसटीने येताना गाडीत नेहमी आमचा संवाद व्हायचा. ते निर्धार, रत्नागिरी टाइम्समध्ये असताना त्यांचा एसटीतील माझ्याबरोबरचा प्रवास सुरु झाला. २००२ साली मी पोयनाडहून अलिबागला राहायला आलो त्यामुळे माझी एसटी सुटली, भाऊंची एसटी मात्र सुरुच राहिली. भाऊंनी एसटीची साथ सोडली नाही, मात्र आयुष्याने त्यांची साथ सोडली. असे असले तरी भाऊ शेवटपर्यंत पत्रकारिता जगले.
भाऊंचे क्रीडाप्रेम, राजकारणातील विचकक्षणपणा त्यांचे चिरंजीव ऍड. पंकज सुभाष पंडित यांच्यात आला आहे. त्यांना पत्रकारितेचीही आवड आहे. त्यामुळे वडिलांचा वारसा ते निश्चितच चालवतील. कन्या पल्लवी काशिनाथ वर्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आपले वैवाहिक आयुष्य सुखात जगत आहे, पण आमच्या वहिनी, उषा यांच्यावर मात्र डोंगराएवढे दु:ख कोसळले आहे. पंडित कुटुंबाच्या त्या माऊली आहेत, वात्सल्यमूर्ती आहेत. पण त्यांच्यातील चैतन्याचा झराच काळाने हिरावून नेला. पंडित कुटुंबियांचे दु:ख शब्दांच्या फुंकरीने शमणारे नाही. त्यासाठी काळाचा मलम उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्यांना शाब्दिक, भावनिक श्रद्धांजली वाहताना, या कुटुंबाला या दु:खातून बाहेर पडण्याचे बळ मिळावे, अशी त्या सर्वशक्तीमान परमेश्वराकडे प्रार्थना करतानाच पंडित भाऊ यांच्या कार्याचा, समाजसेवेचा वारसा त्यांचे चिरंजीव ऍड. पंकज सुभाष पंडित यांनी असाच चालू ठेवावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा