-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
हिंदवी सुराज्याची गडकिल्ले हे शक्तीस्थळे. त्यामुळे बहुतांश गडांवर महादेव, मारोती किंवा भवानीमातेची मंदिरे आढळत असली तरी विघ्नहर्ता गणराय देखील तेथे आपल्या भक्तांना दर्शन देत असतात. आपल्या अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यात सिद्धीविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे, तसेच महाराष्ट्रातील इतरही गडकिल्ल्यांवर गणराज विराजमान असल्याचे दिसून येते. माघी गणेशोत्सवानिमित्त गडकिल्ल्यांवरील श्रीगणेशाची ही ओळख.
महाराष्ट्रात गडकोट किती? नेमके सांगता यायचे नाही. पण चार-पाचशे तरी नक्कीच असतील. वेगवेगळ्या कालखंडात तयार झालेल्या या गडकोटांमध्ये मात्र ङ्गारच थोड्यांना स्वत:ची अशी खास ओळख आहे. अशीच खास ओळख असलेला, रायगड जिल्ह्यामधील अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ला आहे. या किल्ल्यात आंग्रेकालीन ‘गणेश पंचायतन’ मंदिर आहे. किल्ल्यातील पोखरणीच्या पश्चिमेस हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या गाभार्यात मध्यभागी दगडी चौथर्यावर उजव्या सोंडेचा श्री सिद्धीविनायक गणपती, पुढील बाजूस डावीकडे सांब तर उजवीकडे विष्णु आणि मागील बाजूस डावीकडे सूर्य तर उजवीकडे देवी अशा एकूण पाच मूर्तींच्या समूहास गणेश पंचायतन असे संबोधले जाते. उजव्या सोंडेच्या श्री सिद्धीविनायक गणपतीसह सर्व मूर्ती संगमरवरी आहेत. गणपतीची मूर्ती ६० सेमी उंच, उजव्या सोंडेची व सुबक आहे.
पुणे जिल्ह्यातील राजगडच्या सुवेळा माचीवर विराजमान झालेल्या या बाप्पांना वंदन करून मगच राजगडची ङ्गेरी पूर्ण होते. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनगडावर काळ्या संगमरवरातील गणेशमूर्ती आहे. विशेष म्हणजे महादेव मंदिरात सहसा गणेश आढळत नाहीत पण इथे आपल्या वडिलांबरोबर गणपतीबाप्पा आपले स्थान राखून आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर अत्यंत अनघड ठिकाणी बांधलेल्या सुबक हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात विराजमान झालेली गणेशमूर्ती आहे आणि तिथून जवळच असलेल्या गुंहेतही गणेशमूर्ती आहे. या गुहेला नावच गणेश गुहा आहे. अहमदनगर जिल्ह्यातीलच रतनगडावरील गणेश दरवाजात गणेशाची चतुर्भुज मूर्ती कोरलेली आहे.
नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्यावर गणेशप्रतिमा आहे. त्याच जिल्ह्यातील मुल्हेर माचीवर एक सुरेखसे गणेशमंदिर आहे. त्या मंदिराच्या बाहेर विराजमान झालेले अजून एक बाप्पा आहेत. सातारा जिल्ह्यातील किल्ले अजिंक्यताराच्या बळकट प्रवेशद्वारावर बाप्पा विराजमान आहेत.
रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या गणेशपट्टीवरील बाप्पा आहेत. वसईतील किल्ले अर्नाळा, नाशिक जिल्ह्यातील कुलंग दूर्ग, पुणे जिल्ह्यातील दुर्ग तिकोना, रायगड जिल्ह्यातील सुधागडावरील पंतसचिव वाड्यातील शिवमंदिरात इतर देवतांसह बाप्पाही आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा