बुधवार, ४ एप्रिल, २०१८

लोककलांना लाभलेय भाषेचं समृद्ध वाण

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉


     मानवाचा आजपर्यंतचा प्रवास पाहिला तर तो चित्र-विचित्र घटनांनी भरलेला दिसून येईल. आदिमानव ते आधुनिक मानव या दरम्यान जीवनासाठी संघर्ष, संस्कृती, शिक्षण यात स्वत:ला बंदिस्त करुन मानवाने आपला विकास करुन घेतला आहे. या कालखंडादरम्यान नृत्य, नाट्य, शिल्पकला बहरली, त्यांची एक स्वत:ची भाषा निर्माण झाली.तथापि, कला आधी की भाषा आधी असा प्रश्‍न निर्माण झाला, तर कला आधी हेच त्याचे उत्तर देता येईल. आदिमानव आधी मुद्राभिनयातूनच एकमेकांशी बोलायचे. त्यांच्या खाणाखुणा हीच त्यांची भाषा असायची. या मुद्राभिनयाच्या कलेतूनच भाषेचा उगम झाला. संकेतांना त्यांनी शब्दांचे रुप दिले आणि त्या त्या समूहाची एक भाषा निर्माण झाली. मानव एकमेकांशी बोलू लागला. यामुळे आज जगात शेकडो भाषांचा वापर केला जात आहे. त्यात बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांचा समावेश आहे.
        कला ही स्वयंभू आहे, पण तिच्यावर भाषेचा साज चढला की ती तेजस्वी बनते. कलेतून जसा भाषेचा जन्म झाला, तसेच भाषेतून कलेची निर्मिती झाली. वाल्मीकी तमसा नदीच्या तीरी ङ्गिरत असताना तेथे प्रणयरत क्रौंच पक्ष्याच्या एका जोडीतील नराला एक पारधी बाण मारतो. त्या पक्ष्याची मादी आक्रोश करू लागते. तो ऐकून वाल्मीकींचे हृदय शोकाकुल होते व अगदी सहजस्ङ्गूर्तीने एक श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडतो. तो असा-
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः
यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम्
        हे जगातील पहिले आद्य काव्य समजले जाते. म्हणजेच या श्‍लोकाबरोबर काव्यकलेचा प्रथमत:च उगम झाला. त्यामुळे भाषेतून कलेची निर्मितीही घडते हे दिसून येते. नाट्य आणि नृत्य या कला भाषेच्या आणि अभिनयाच्या अंगाने फुलल्या, त्यामुळे त्याला एक वेगळे महत्व आहे. शिल्पकला ही स्वत: बोलते. परंतु तो जर शिलालेख असेल तर तो वाचणार्याशी संवाद साधतो. चित्राचे आकलन व्हावे लागते आणि भाषा आत्मसात असावी लागते, हीही बाब येथे तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्यांना भाषेचे आकलन आहे अशांसाठी अनेक शिलालेखांत चित्रांबरोबर भाषेला महत्व देण्यात आलेला आहे. वर उल्लेख केलेला आक्षी येथील मराठीतील पहिला शिलालेख हीच बाब दर्शवते. शिलाहारकालात शके ९३४ ला, म्हणजेच इसवी सन १०१२ साली स्थापन केलेल्या शिलालेखात वरच्या बाजूला चंद्र-सूर्याचे शिल्प असून त्याचा आशय राजा केसीदेवराय यांचे राज्य चंद्र-सूर्य असेपर्यंत कायम राहो, असा आहे, तर खालच्या बाजूचे गद्धेगाळ शिल्प शापवाणी दर्शवते. या सांकेतिक चित्रांबरोबरच त्यावर भाषेची मांडणी करण्यात आली आहे. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती, श्री. केसीदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई यांनी शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. त्यासंदर्भात त्यांनीच हा शिलालेख आक्षीला मंदिराशेजारी स्थापन केला. भाषेची मांडणी आणि त्यासोबतची शिल्प हा शिलालेखकर्त्याच्या आणि करवित्याच्या दूरदृष्टीचाच एक भाग म्हटला पाहिजे. यात कला आणि भाषेचा सुरेख समन्वय पाहायला मिळतो. जिल्ह्यातील कलेच्या अंगाने भाषिक विकास आणि भाषिक विकासाच्या अंगाने कलेचा विकासही आक्षी येथील शिलालेखाच्या रुपाने पाहायला मिळतो, तसाच तो दिवेआगराच्या पहिल्या मराठी ताम्रपटातूनही पाहायला मिळतो.
       कला आणि भाषेचा विकास हा सातत्याने सुरु असतो, तसा तो जिल्ह्यातही झाला आहे. भाषा आणि कला यांचा अन्योन्य संबंध आहे. भाषा ही देखील एक कलाच आहे. त्यामुळे कलेत आणि भाषेत द्वैत माजवण्याचे कारण नाही. कला आणि भाषा ही अद्वैत स्वरुप आहे. म्हणूनच या दोन्ही बाबी कधीही लोप पावू शकत नाहीत. कलेचे स्वरुप बदलू शकेल, भाषेचे स्वरुपही बदलू शकेल, परंतु त्यातील मूलतत्व तीच असल्यामुळे या दोन्ही बाबी कायम असणार आहेत. कला या ६४ समजल्या जातात. जर त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप टाकला तर या कलांशी भाषेचा संबंध आहे, असे लक्षात येईल. अर्थात काही कला या स्वत: भाष्य करतात. हे भाष्य त्यांच्या रचनेत असते. येथील घारापुरीची लेणी, कुडे, मांदाडची लेणी आपल्या रचनेतून भाष्य करतात. त्यांची स्वत:ची एक भाषा आहे आणि त्या भाषेचाच अभ्यासकांना मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
       जिल्ह्यातील गडकिल्ले हे दुर्गकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. अर्थात दुर्गकलेमागे एक उन्नत शास्त्र आहे. पण दुर्गाला एक स्वतंत्र भाषा असते, ती काही लिखित स्वरुपात नाही. ती त्या त्या गडकिल्ल्यांच्या रचनेत पाहायला मिळते. त्यातूनच दुर्गसाहित्य आकारास आले आहे. साहित्य ही देखील कलाच, त्यामुळे भाषेद्वारे कलाच कलेचं प्रसंगी प्रकटन करते असे म्हटले तर त्यात काही वावगे नाही. येथल्या लोककला तर भाषेचं समृद्ध वाण घेऊन प्रगटल्या आहेत. येथील आगरी, कोळी, भंडारी, माळी, आदिवासी, ठाकूर अथवा अन्य जमाती असोत, या सर्व जातीजमातींकडे कलेचं समृद्ध भांडार आहे. त्यांच्याकडे लोकनृत्य, लोकनाट्य, लोकगीते या कलांचा खजिना मोठ्या प्रमाणात आहे. या कलांत काळानुरुप बदल झाले असले, काही कला लुप्त होतील असे वाटत असले तरी कलेचा प्रवास हा चक्राकार असल्यामुळे ती लोप पावल्यासारखी वाटत असले तरी आपल्या जागी स्तब्ध असते. कालांतराने तिच्यात चैतन्य ङ्गुंकले जाते. त्यामुळेच आगरी गीते, कोळी गीते, आदिवासी गीत आणि नृत्यांना पूर्वीची झळाळी लाभली आहे. या सर्व कलांना बोलीभाषांचा साज मोठ्या प्रमाणात चढलेला आहे. या बोलीभाषेची गोडी त्या कलांच्या प्रगटीकरणास सहाय्यक ठरते.
      कलेच्या प्रांतात रायगडचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे, देशाचे नाव जागतिक पातळीवर नेणारे सासवन्याचे नानासाहेब करमरकर यांनी कलेच्या प्रांतात मराठी माणसाचे कर्तृत्व किती मोठे आहे हे दाखवून दिले, असाही या कलेशी एकप्रकारे मराठीचा संबंध आहे. नानासाहेब करमरकरांच्या शिल्पप्रतिमांना बाह्य भाषेची गरज वाटत नाही, कारण त्यांनी आपल्या शिल्पप्रतिमांची स्वतंत्र अशी भाषा निर्माण केली आहे, ती या शिल्पप्रतिमा पाहणार्यांना चटकन समजते. त्या शिल्पप्रतिमांतील जिवंतपणा हीच त्यांची भाषा असते. नानासाहेबांसारखा कलाकारच आपल्या शिल्पप्रतिमांतून अशी भाषा तयार करु शकतात. म्हणूनच त्यांची कला आणि ते श्रेष्ठ दर्जाचे म्हणून गणले गेले.
      कलेला स्वत:ची अशी भाषा असते कारण ती स्वयंभू असते, तरीही आवश्यक तेथे बाह्य भाषेचा साज चढवावा लागतो. असे जरी असले तरी कला भाषेशिवाय अपूर्ण आहे आणि भाषा कलेशिवाय अपूर्ण आहे, असे नाही. दोन्ही परिपूर्ण आहेत. त्यांचा एकमेकांशीचा संबंध एकमेकांसाठी प्रेरकच आहे. मग ती भाषा मराठी असो अथवा जगातील कोणतीही भाषा असो, कला आणि भाषा एकमेकांचे स्वत्व जपत असतात, म्हणून त्यांच्याकडे अद्वैत भावनेनेच पाहिले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा