सोमवार, २९ मे, २०१७

रायगडात ग्रंथालयांच्या प्रसाराला बसलाय चाप!

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       ‘गाव तेथे ग्रंथालय’ अशी सरकारी घोषणा आहे, पण सरकारे आपल्या या घोषणेला प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आली आहेत, असे दिसत नाहीत. उलट ग्रंथालयीन चळवळीला नख लावण्याचेच काम करीत आहे, त्यामुळेच ‘गाव तेथे ग्रंथालय’ ही संकल्पना महाराष्ट्रात प्रत्यक्षात साकार होऊ शकलेली नाही. रायगड जिल्ह्यात तर १९०८ गावे आणि ८२१ ग्रामपंचायती आहेत. पण गावनिहाय सोडा, ग्रामपंचायतनिहायही ग्रंथालये नाहीत. जिल्ह्यात फक्त ८२ ग्रंथालये आहेत. ही ग्रंथालये पूर्ण जिल्ह्याची वाचनाची भूक कशी भागवू शकतात? या ग्रंथालयांत असलेल्या सेवकांच्या समस्या सोडविण्यात कोणत्याही राज्य सरकारांना रस वाटत नाही. यातून या सरकारांचे वाचन संस्कृतीबद्दल, ग्रंथालयीन चळवळीबद्दल किती प्रेम आहे, हे लक्षात येते. आपल्यावर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, आपल्या मागण्या शासनदरबारी मांडण्यासाठी रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. याबरोबरच राज्य ग्रंथालय संघांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांत जिल्हा ग्रंथालयांच्या वतीने करण्यात येत असलेल्या धरणे आंदोलनाने सरकारचे डोळे उघडले नाही, तरी समाजासमोर ग्रंथालयीन चळवळीतील कार्यकर्त्यांच्या, सेवकांच्या व्यथा समोर येणार आहेत, त्यामुळे सरकारचेच वस्त्रहरण होणार आहे, ही बाब महत्वाची आहे.
       प्राचीन काळात राजे-राजवाड्यांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी ङ्गारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी ङ्गॉर प्रमोशन ऑङ्ग ख्रिश्चन नॉलेज या संस्थेची १६९८ मधील मद्रास व बंगालमधील ग्रंथालये, १७८४ चे कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत रॉयल एशियाटिक सोसायटी ऑङ्ग ग्रेट ब्रिटन ऍण्ड आर्यलड (मुंबई शाखा) हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल. पण त्यामध्येदेखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहिली. रायगड जिल्ह्यात उरण येथे  १८६५ मध्ये पहिली उरण नेटिव्ह जनरल लायब्ररी उभी राहिली. त्यानंतर १८६६ ला अलिबाग नेटिव्ह जनरल लायब्ररी सुरु झाली. १८६६ मध्येच पेण नेटिव्ह जनरल लायब्ररी स्थापन झाली. १८६७ मध्ये पनवेलला पनवेल नेटिव्ह लायब्ररी, त्यानंतर १८७४ मध्ये महाड, १८७८ मध्ये तळा व रोहा येथे लायब्ररी सुरु झाली. मुरुडला १८८२ मध्ये नेटिव्ह जनरल लायब्ररी सुरु झाली. माथेरानला १९०१ मध्ये कर्सनदास मुलजी ग्रंथालय स्थापन झाले. अशाप्रकारे जिल्ह्यात  बहुंताश ग्रंथालये नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली किंवा कायमची बंद पडली. सध्या सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय, अलिबाग (स्थापना- १९१७) हे एक जिल्हा ग्रंथालय, तसेच सार्वजनिक वाचनालय, मुरुड-जंजिरा (स्थापना- १८८२), सार्वजनिक वाचनालय, श्रीवर्धन (स्थापना- १८९४), सार्वजनिक वाचनालय, पाली (स्थापना- १९०६), भाटे सार्वजनिक वाचनालय, रोहा (स्थापना- १९१७), मूळचंद रामनारायण करवा वाचनालय आणि ग्रंथालय, महाड (स्थापना- १९१८), लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय, कर्जत (स्थापना- १९१९), गोपालकृष्ण वाचनालय, उरण (स्थापना- १९४३), वि.रा. मेहता सार्वजनिक वाचनालय, गोरेगाव (स्थापना- १९४३), के.गो. लिमये सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय, पनवेल (स्थापना-१९४८), महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालय, पेण (स्थापना- १९४८), तालुका वाचनालय, पोलादपूर (स्थापना- १९४९), राष्ट्रसेवा तालुका वाचनालय, खालापूर (स्थापना-१९५०), सार्वजनिक वाचनालय, म्हसळा (स्थापना- १९५३) अशी तेरा तालुका ग्रंथालये सुरु झाली. तशीच याच दरम्यान जिल्ह्यांत इतरही लहान लहान वाचनालये सुरु झाली. त्यातील सार्वजनिक वाचनालय, मुरुड-जंजिरा या वाचनालयास या वर्षी १३४ वर्षे, तर सार्वजनिक वाचनालय, श्रीवर्धनला या वर्षी १२३ वर्षे झाली आहेत. शहाबाजच्या सार्वजनिक वाचनालयाला २०१६ साली १०० वर्षे झाली आणि यावर्षी अलिबागच्या सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयास १०० वर्षे पूर्ण होत आहेत. 
        अशाप्रकारे जिल्ह्यातील ग्रंथालयीन चळवळीला उज्ज्वल पार्श्‍वभूमी असतानाही महाराष्ट्रासह जिल्ह्यात २०१२ पासून नवीन ग्रंथालयांना मान्यता नाही, तसेच वर्ग बदलही देण्यात आलेले नाहीत. तेव्हाच्या आघाडी सरकारने कागदोपत्री असणार्‍या बोगस ग्रंथालयाना चाप बसावा यासाठी ग्रंथालयांची पडताळणी केली, तेव्हा रायगड जिल्हा सोडता राज्यातील इतर जिल्ह्यांत अनुदानासाठी सुरु असलेली शेकडो बोगस ग्रंथालये सापडली. ही बोगस ग्रंथालये बंद करण्यात आली. अशा ग्रंथालयांवर झालेली कारवाई योग्यच असली तरी संपूर्ण ग्रंथालय चळवळच बोगस आहे, अशा थाटात गेल्या पाच वर्षांपासून नवीन ग्रंथालयांना शासनमान्यता, वर्ग बदल प्रस्ताव स्वीकारले गेलेले नाहीत, ही बाब ग्रंथालयीन चळवळीस मारक ठरली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आजचे युती सरकारही आघाडी सरकारच्या निर्णयाचीच री ओढत आहे. ग्रंथालय कायदा आणि संचालनालयाची निर्मिती होऊन ४९ वर्षं उलटली आहेत. पण गेल्या ६७ वर्षांच्या कालावधीत ’गाव तेथे ग्रंथालय’ या उद्दिष्टाप्रत २५ टक्केही वाटचाल झालेली नाही. या राज्यातील ग्रंथालयांची वाटचाल मंदगतीने होण्यामागील खरे कारण राज्यकर्त्यांची मनोवृत्ती त्याला अनुकूल नाही हे आहे. परिणामी राज्यातील एकूण ४०,००० गावांपैकी फक्त ११,५०० गावांमध्येच १२,१४४ ग्रंथालये आहेत. राज्य सरकारच ‘गाव तेथे ग्रंथालय’ असे ब्रीदवाक्य असताना अजून २८,५०० गावांमध्ये ग्रंथालये नाहीत. रायगड जिल्ह्यात १९०८ गावे आहेत. या गावांच्या ८२१ ग्रामपंचायती आहेत. पण या ग्रामपंचायतींच्या संख्येइतकीही ग्रंथालये जिल्ह्यात नाहीत. फक्त ८२ ग्रंथालये या जिल्ह्यातील ७० गावांत कार्यरत आहेत. त्यात ‘अ’ वर्गातील १ जिल्हा ग्रंथालय, १२ तालुका ग्रंथालये आहेत. ‘ब’ वर्गाची १९, ‘क’ वर्गाची २९, ‘ड’ वर्गाची १६, तर ‘ब’,‘क’,‘ड’ वर्गाची ५ ग्रामपंचायत ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांत ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, निर्गम सहाय्यक, लेखनिक, शिपाई अशा विविध पदांवर १७७ कर्मचारी अल्प वेतनावर काम करीत आहेत. या कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतनही नाही. हे कर्मचारी आज ना उद्या शासन आपले सर्व प्रश्‍न सोडवेल, या आशेवर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे.  
       ग्रंथालयीन कर्मचार्‍यांना सरकार देत असलेले अनुदानही एकप्रकारे चेष्टाच आहे. सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात दर ५ वर्षांनी दुप्पट वाढ करण्याचा अलिखित नियम असला तरी कधीही नियमितपणे केली गेली नाही. २००४ नंतर २००९ ला अनुदानात वाढ केले जाणे अपेक्षित होते, पण ती केलीच नाही. अनेक आंदोलने केल्यानंतर २०१२ पासून सरकारने ‘ड’ वर्गातील वाचनालयाला ३० हजार, ‘क’ वर्गासाठी १ लाख ४४ हजार, ‘ब’ वर्गासाठी २ लाख ८८ हजार आणि ‘अ’ वर्ग वाचनालयासाठी तीन लाख ८४ हजार  आणि जिल्हा ग्रंथालयासाठी ७ लाख २० हजार रुपये वार्षिक अनुदान देणे सुरु केलेेे. परंतु दीडपट वाढ करण्याचे घोषित करुन वाढीव ५० टक्के अनुदानाच्या ३१ टक्केच अनुदान देण्यात येत आहे. तो फरक अजूनही देण्यात आलेला नाही. वाचनालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या किमान १० टक्के रक्कम वाचनालयाने मासिक वर्गणी व इतर देणग्यांमधून जमा करावी लागते. सर्वसाधारणपणे एकूण उत्पन्नाच्या निम्मी रक्कम वेतनावर खर्च झाली तरी उरलेली रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींसाठी पुरवावी लागते. त्यामुळे ग्रंथालय सेवक किती तुटपुंज्या वेतनात काम करीत असतील आणि त्यामुळे त्यांची कशी दिनवाणी अवस्था असेल याची कल्पना करायला हरकत नसावी. वाचन संस्कृती टिकवायची असेल आणि त्याचा प्रचार व प्रसार करायचा असेल तर ग्रंथालये आणि त्यातील कर्मचारी यांना जगविले पाहिजे, याचा विचारच होत नाही हे दुर्दैवाचे आहे. 
        १९६७ ला ग्रंथालय कायदा झाल्यापासून ग्रंथालयीन कर्मचारी वेतनश्रेणी व सेवाशर्तीसाठी झगडत आहेत. ग्रामसेवकांप्रमाणेच ग्रंथपालांना सरकारी सेवेत सामावून घेतले जावे अशी ग्रंथालयीन कर्मचार्‍यांची मागणी आहे, पण या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र सरकारने ४९ वर्षात चार वेळा अनुदानात वाढ केली. त्यामुळे संस्था जगली, पण कर्मचारी उपेक्षितच राहिला. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रभा राव, वि. स. पागे, व्यंकप्पा पत्की आदी समित्या स्थापन झाल्या. तरीही, सरकारने विविध कारणे पुढे करून ग्रंथालयीन कर्मचार्‍यांच्या मूळ प्रश्नाला बगल दिली. ११ डिसेंबर २०११ ला हिंवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुदान दुप्पट करण्याचे ठरवले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अडती भूमिका घेतल्याने अनुदानात ५० टक्केच वाढ देण्याचा निर्णय घेऊन वेतनश्रेणी व सेवाशर्ती देण्यास नकार दिला. सार्वजनिक ग्रंथालये ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांच्या वेतनश्रेणीची जबाबदारी आपली नाही, असे कारण सरकार पुढे करीत आले आहे. याबाबतीत गत आघाडी सरकार आणि विद्यमान युती सरकारची भूमिका एकच आहे. अशा परिस्थितीत ग्रंथालय कर्मचारी संघाने २०१६ च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चा काढला असता ग्रंथालय खाते ज्यांच्याकडे आहे ते राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ग्रंथालय कर्मचार्‍यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते, पण ते आश्‍वासन काही पूर्ण करण्यात आले नाही.  त्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यात ग्रंथालय संघांतर्फे धरणे आंदोलनाचं अंहिसक पाऊल उचलण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही अलिबागेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरुन ग्रंथालय सेवक आपल्या मागण्याचा आवाज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहेत. या आंदोलनाने मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलणार नाही, पण ग्रंथालय सेवकांची पुन्हा पुन्हा कशी उपेक्षा सरकार चालवतेय, हे दिसून येणार आहे. त्यांच्या मागण्या काही जगावेगळ्या नाहीत, त्या सरकारने पूर्ण केल्या तर जिल्ह्यातील, राज्यातील ग्रंथालय चळवळीला निश्‍चितच बाळसे धरेल असे म्हटले तर त्यात काहीही अयोग्य नाही.

सोमवार, २२ मे, २०१७

उधाणाचे भय, पुराचा धसका, दरडींचा धोका...

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       जूनपासून रायगडात समुद्रातील उधाणाचे पर्व सुरु होणार असून ते सप्टेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारपट्टीच्या, तसेच खाडीकिनारी असलेल्या १२३ गावांना समुद्राच्या उधाणाचा आणि नदी किनार्‍यांवरील २३२ गावांना पूरसदृश्य स्थितीचा सामना करावा लागणार आहे. उधाणाचा फटका मोठ्या प्रमाणात भातशेतीलाही बसणार आहे. त्यामुळे या उधाणाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. खारेपाटातील शेतीला या उधाणाचा फटका वर्षानुवर्षे बसतोच आहे. पण आता या उधाणांमुळे होणार्‍या नुकसानीचे संदर्भ वेगळे आहेत. पूर्वी खारेपाटातील शेतकरी या उधाणाशी दोन हात करायला सज्ज असायचा, आता मात्र तो राजकीय उदासिनता आणि मानवनिर्मित पर्यावरण असंतुलनाने हतबल झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि आणि उधाण म्हटले की त्याचा थरकाप होतो. असे होऊ नये म्हणून खाडी, समुद्र, नदी, शेती, वने आणि डोंगर यांच्या संरक्षणाची जिल्ह्यात गरज आहे, पण मायबाप सरकारची प्राधान्ये पूर्वीपासून दुसरीच असल्यामुळे  हा जिल्हा धास्तावलेलाच असणार आहे. या जिल्ह्यात मालक अनेक आहेत, पण पालक कुणी उरलेला नाही, हे वास्तव आहे.
     महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या सुमारे ७२० कि.मी. लांबीच्या समुद्र किनार्‍यापैकी रायगड जिल्ह्याला २४० कि.मी. लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा किनारा रायगड जिल्ह्याचे वैभव असले तरी मोठ्या भरतीच्यावेळी तो शाप वाटतो हे तितकेच खरे आहे. पण हा शाप समुद्राने दिलेला नाही, तर माणसाने आपल्या स्वार्थासाठी ओढवून घेतलेला शाप आहे. समुद्रात भराव टाकून समुद्र मागे हटविण्याचा जो प्रयत्न केला जातो, त्यातून समुद्राला आपल्या सीमा ओलांडाव्या लागतात हे वास्तव आहे. खारङ्गुटीची करण्यात आलेली कत्तल आणि सध्या होत असलेली कत्तल यातून अनेक पर्यावरणीय समस्या उभ्या राहिल्या आहेत आणि त्यामुळे समुद्र आणि खाडीकिनारे धोक्यात आले आहेत. समुद्राला आलेली भरती आपल्या सीमा ओलांडून किनारपट्टीला अक्षरशः ओरबाडून टाकते. यात कोळीबांधवांचे सातत्याने नुकसान होत असते तर खाडीतील उधाणाच्या पाण्याने शेतीचा विद्ध्वंस होत असतो. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर बनते.
     यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समुद्राला १८ दिवस मोठे उधाण येणार आहे. यावेळी साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असून जून महिन्यात ६ दिवस, जुलैमध्ये ६ दिवस, ऑगस्टमध्ये ४  दिवस तर सप्टेंबरमध्ये २ दिवस उंच लाटा उसळणार आहेत. सर्वात मोठी भरती २५ जून रोजी दुपारी १ वाजून ७ मिनिटांनी येणार असून सर्वात मोठ्या ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर २६ जून रोजी दुपारी १ वाजून ५४  मिनिटांनी ४.९४ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. अशा परिस्थितीत या अठरा दिवसांत मुसळधार पाऊस पडल्यास समुद्र व खाडी किनार्‍यांवरील १२३  गावांना पूरसदृश्य स्थितीचा सामना करावा लागणार आहे. त्यातील समुद्र किनार्‍यावर असलेल्या अलिबाग तालुक्यातील १६, मुरुड ९, पनवेल ५, उरण ४, श्रीवर्धन तालुक्यात १९ अशा एकूण ५३ गावांना, तसेच खाडी किनार्‍यावर असलेल्या अलिबाग तालुक्यातील ११, मुरुड ८, पनवेल ११, उरण ५, श्रीवर्धन ११, पेण ९, माणगाव २, महाड ६, म्हसळा ९ अशा एकूण ७० गावांना उधाणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 
     समुद्र, खाड्यांतील उधाणाचा धोका समोर असतानाच जिल्ह्यातील नदी किनार्‍यांवरील २३२ गावांना पुराचा धोका संभवतो. जिल्ह्यातील सावित्री, गांधारी, काळ, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा, भोगावती, बाळगंगा, गाढी, उल्हास या पोलादपूर, महाड, माणगाव, रोहा, सुधागड, पेण, अलिबाग, खालापूर, पनवेल, कर्जत तालुक्यांतील प्रमुख नद्या व खाड्या अतिवृष्टीमुळे भरुन वाहतात. धरणे संपूर्ण भरतात. लगतच्या जिल्ह्यांमध्ये (पुणे व सातारा) अतिवृष्टी झाल्यामुळे तेथील पाणी महाड येथील सावित्री आणि पनवेल व खालापूर येथील पाताळगंगा या नद्यांना मिळून या नद्यांचे पाणी पुढे येते. त्याचवेळी समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती आल्यास त्याचे पाणी महाड, गोरेगाव, माणगाव, रोहा व अलिबाग तालुक्यातील काही भागात येऊन खाडीलगतच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. याची सुरुवात जिल्ह्यात १९८९ च्या महापुराने झाली. त्यांनंतर २६ जुलै २००५ ला जिल्हा पुन्हा पुरास सामोरा गेला. त्यावेळी आभाळ ङ्गाटल्यागत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील अनेक गावांना पुराचा ङ्गटका बसला होता. दासगाव, कोंडिवते, जुई या डोंगरपायथ्याशी आणि नदीकिनार्‍यावरील गावांना त्यावेळी सर्वाधिक झळ बसली. जुई गावात दरड कोसळून त्या दरडीखाली सापडल्याने अनेकांना मृत्यू झाला. अनेक दिवस तिथे मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. दासगावमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले. आसपासच्या खेड्यातही दासगावसारखीच परिस्थिती होती. आजही परिस्थिती तशीच आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तींमध्ये प्रचंड हानी होऊ शकणारी अनेक गावे आहेत. त्यात सुमारे ८४ गावांना दरडीपासून कमी-जास्त प्रमाणात धोका आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. यात डोंगरमाथ्यावर व डोंगराच्या पायथ्याशी दरडी कोसळण्याचा धोका असलेली ३२ गावे महाड आणि २५ गावे पोलादपूर तालुक्यातील आहेत. तर उर्वरित तालुक्यांत श्रीवर्धन १, तळा १, सुधागड १, मुरुड २, पनवेल २, माणगाव ३, कर्जत ३, म्हसळा ४, रोहा ४, खालापूर ६  या तालुक्यातील गावांना भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका आहे. हा धोका डोंगर वृक्षराईविना बोडके बनवले गेल्यामुळे निर्माण झाला आहे. माती धरुन ठेवायला झाडे शिल्लक नाहीत, अशा परिस्थितीत पूर आणि दरडी कोसळण्याच्या शक्यता निर्माण होणार नाहीत, तर काय होणार?
      रायगड जिल्हा कोकणातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत येतो. उंच पर्वतरांगामुळे ढग आडवले जाऊन उष्ण व दमट हवामानामुळे पावसाला सुरुवात होते. तथापि, डोंगरांवरील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे वने नष्ट होत आहेत. त्यामुळे माती धरुन ठेवली जात नाही. संततधार पाऊस पडल्यामुळे सह्याद्रीच्या डोंगरावरील माती सुटी, ठिसूळ होऊन ते ढिगारे व दरडी खाली येतात. त्यामुळे पायथ्याशी असणारी लोकवस्ती याची जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि यापुढेही होणार आहे. याचे कारण ईश्‍वरी कोप नाही, तर मानवी घोडचुका आहेत. या घोडचुका आपल्या रायगड जिल्ह्यात केल्या जात आहेत, म्हणून वेळीच सावध होण्याची गरज आहे. येथे पर्यावरणाला बिनदिक्कत नख लावण्यात आले आहे. पर्यावरणाचे सारे नियम धाब्यावर बसवून पर्यावरणाचा र्‍हास करणे सुरु आहे. झाडांची कत्तल, जंगलांचा र्‍हास, प्रचंड प्रमाणात नदीतील वाळू उपसा, डोंगर सपाटीकरण, मोठ्या प्रमाणात जमिनीतील दगड काढणे, मुरुम उपसणे, पशुपक्ष्यांची हत्या, वाढती कारखानदारी, त्यातून होणारे जल व वायुप्रदूषण, वाढती वाहने, वाढते सिमेंट जंगल या सर्व बाबी निसर्गाच्या विरोधात आहेत. पण त्या सर्व गोष्टी येथे केल्या जात आहेत. यामुळे निसर्ग समतोल ढासळत आहे. पर्यावरणीय अस्थिरता मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या असमतोलामुळे निसर्गात अनपेक्षित बदल घडत आहेत. रायगड जिल्ह्याला त्याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागणार आहे. जर वेळीच सावध होण्याचा प्रयत्न केला नाही, तर भविष्यात रायगड जिल्ह्याची अतिशय वाईट अवस्था होणार आहे. त्यामुळे डोंगर खाण्याची राक्षसी भूक थांबवा, जंगलांची कत्तल करण्याच्या विकृतीला चाप बसवा, खारङ्गुटी खाऊन जमिनीचे क्षेत्र वाढविण्याचा नादानपणा करु नका, असे निसर्गावर टाच आणणार्‍यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. तसे ठणकावून सांगितले तरच रायगड जिल्हा वाचेल. अन्यथा भरती आणि पाऊस यांच्या जाणीवेनेच जिल्ह्यातील जनतेच्या मनात भीतीच्या लाटा उसळू लागतील. इतकेच.


सोमवार, ८ मे, २०१७

अलिबागला चढले प्रायोगिक नाटकांचे रंग

-उमाजी म. केळुसकर ⬑ नाट्य-चित्ररंग ⬉


      रायगड जिल्ह्यात प्रथमत:च अलिबाग येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रायगड शाखेच्या वतीने आविष्कार प्रायोगिक नाट्यमहोत्सव २९ ते ३० एप्रिल असे दोन दिवस आयोजित करण्यात आला होता. शाखाध्यक्ष दिलीप जोग आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करुन घेत हा प्रायोगिक नाट्य महोत्सव यशस्वी केला. कारण आज अलिबागेत नव्हे तर सर्वत्रच ऑर्केस्ट्रा, धार्मिक समारंभ आणि राजकीय क्षेत्र सोडले तर नाटक, बौद्धिक व्याख्याने आदी समारंभांना गर्दी क्वचितच असते, अशा परिस्थितीत प्रायोगिक नाटकाचा प्रयोग लावणे हे धाडसच असते, पण नाट्यपरिषद शाखा रायगडने ते धाडस केले. हे धाडस वाया गेले नाही. अलिबागेत नाट्यपरिषदेच्या माध्यमातून नाट्य चळवळ पुनर्जीवित झाली आहे, त्याचे गोड फळ म्हणजे दर्दी रसिकांच्या गर्दीत न्हाऊन निघालेला आविष्कार नाट्यमहोत्सव म्हणावा लागेल.
      रायगडकरांसाठी आविष्कार नाट्यमहोत्सव नवा आहे. त्यामुळे आविष्कार हे प्रकरण काय आहे ते आधी सांगितले पाहिजे. ‘आविष्कार’ ही प्रयोगशील नाट्यनिर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवून ऐंशीच्या दशकाच्या अगदी सुरुवातीस म्हणजे ९ ङ्गेब्रुवारी १९७१ मुंबईतल्या विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, अरुण काकडे आदी दिग्गज नाट्यकर्मीनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था. ‘आविष्कार’ हे नाव ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिले आहे. गेली ४६ वर्षे हाडाचे कार्यकर्ते असलेले नाट्यकर्मी अरुण काकडे हे या संस्थेची धुरा समर्थपणे पेलत असून, आजही प्रायोगिक नाटकांचा झरा अविरतपणे रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ‘आविष्कार’च्या माध्यमातून सुरू आहे.
       प्रयोगशील नाट्यनिर्मितीची चळवळ अखंडित सुरू राहावी यासाठी ज्येष्ठ  नाट्यकर्मी अरुण काकडे हे ‘रंगायन’च्या काळापासून- म्हणजे गेली ६५ वर्षे अविश्रांत झटत आहेत. १९५६ साली त्यांनी विजया मेहता, विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, माधव वाटवे यांच्यासोबत ‘रंगायन’ नाट्यचळवळीत स्वत:ला झोकून दिले. श्री.पु. भागवत यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘रंगायन’ चळवळीत विविध पिंड-प्रकृतीची नाटके सादर करण्यात आली. मात्र, १९७० मध्ये संस्थेतील रंगकर्मीमधील मतभेदांमुळे ‘रंगायन’ ङ्गुटली आणि त्यातून आजची आविष्कार नाट्यसंस्था जन्माला आली. ‘आविष्कार’ स्थापन झाली व पूर्वीच्या ‘रंगायन’च्या उद्दिष्टांनुसारच प्रायोगिक व समांतर रंगभूमीच्या कार्यास सुरुवात झाली. ‘आविष्कार’ संस्थेच्या माध्यमातून अरुण काकडे यांनी आजवर २२५ नाट्यकृतींची निर्मिती केलेली असून, त्यांचे आठ हजारावर प्रयोग केले आहेत. ‘आविष्कार’च्या जोडीला ‘चंद्रशाला’ हा बालनाट्य विभागही सुरू करण्यात आला. ‘दुर्गा झाली गौरी’ हे गाजलेले बालनाट्य ही ‘चंद्रशाला’चीच निर्मिती.
   

   प्रायोगिक नाटकांची निर्मिती हे ‘आविष्कार’चे एकमेव उद्दिष्ट नसून नाट्यनिर्मितीसोबतच बाल, तरुण व प्रौढ कलावंतांसाठी नाट्यप्रशिक्षण शिबिरे, नाट्यवाचन, कथा-कवितावाचन, नृत्यनाट्ये, कठपुतळी, समूहगान अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करतानाच प्रेक्षकांमध्ये विविध कलांविषयीची प्रगल्भ जाण विकसित करण्याचेही संस्थेचे ध्येय आहे. अशा प्रायोगिक रंगभूमीवर गेली ४६ वर्षे कार्यरत असलेल्या ‘आविष्कार’ची चार नाटके अलिबागमध्ये भाग्यलक्ष्मी हॉल येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रायगड शाखेने आयोजित करुन रायगडातील रसिकांसाठी आणि कलाकारांसाठी एक पर्वणी उपलब्ध करुन दिली. ही नाटके मनोरंजनाबरोबर बौद्धिक खुराक देणारी होती. समजण्यास काहीशी जड असली तरी न समजण्याइतकी अवघडही नव्हती. त्यामुळे काहीशा बिचकत आलेल्या रसिकांनी प्रयोगानंतर मात्र रायगड शाखेचे अध्यक्ष दिलीप जोग आणि आविष्कारचे अरुण काकडे यांच्याकडे पुन्हा अलिबागेत अशा प्रायोगिक नाटकांचा महोत्सव आयोजित करण्याचा आग्रह धरला. जिल्ह्यातील काही नाट्यरसिकांनी तर आपल्या येथेही असाच प्रायोगिक नाट्यमहोत्सव आपण करणार असल्याचे जाहीर केले. नाट्यपरिषद रायगड शाखेने आयोजित केलेल्या प्रायोगिक नाट्यमहोत्सवाच्या यशाची यापेक्षा दुसरी मोठी कोणती पावती असू शकते? त्यामुळे  नाट्यपरिषद रायगड शाखेचे अध्यक्ष दिलीप जोग, उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, सचिव प्रकल्प वाणी आणि सागर नार्वेकर, डॉ. उत्तम नलावडे, राजेश बाष्टे, संतोष बोंद्रे, अमरदीप ठोंबरे, शरद कोरडे, नागेश कुळकर्णी, मानसी चेऊलकर, मनिषा आपटे, सुप्रिया जेधे, नंदू जोशी, मिलिंद मुळ्ये, विद्येश प्रधान, योगेश पवार, संदेश मयेकर, रमेश धनावडे आणि इतर सदस्यांचे या नाट्यमहोत्सवाच्या नियोजनाबाबत करावे तेवढे कौतुक थोडे आहे. 
        आविष्कार नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन शनिवार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६-३० वाजता अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार होते, परंतु ते काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे आविष्कारचे अरुण काकडे यांनी दीपप्रज्ज्वलन करुन या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी दिलीप जोग, नागेश कुळकर्णी, प्रसाद ठोसर व स्वत: मी उपस्थित होतो. सुरुवातीला ५-२५ रसिकांनी पुढच्या खुर्च्या भरल्या होत्या, परंतु पहिल्या दिवशीचे ‘ये कौन चित्रकार है’ पहिले नाटक सुरु होताच, प्रेक्षागार कधी खचाखच भरले आणि भारले ते कळलेच नाही. ही मंत्रमुग्धता पुढील तीनही नाटकांनी रसिकांना दिली.
       ‘ये कौन चित्रकार है’ हे प्रायोगिक नाटक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या २० चित्रांवर आधारित आहे. सुषमा देशपांडे यांनी लिहिलेल्या नाट्यवस्तूचा हिंदी अनुवाद प्रङ्गुल्ल शिलेदार केलेला आहे. मूळचे पुण्याचे असलेले चित्रकार सुधीर पटवर्धन मुंबईत आले तेव्हाची मुंबई आणि कालौघात तिच्यात झालेले बदल, स्थित्यंतरं, इथली नाना स्तरांतली माणसं, आर्थिक-सामाजिक बदलांनी या शहराचं आमूलाग्र बदललेलं रूपडं, माणसा-माणसांतील नातेसंबंधांत येत गेलेलं तुटलेपण, कलावंतांचं कलावंतपण आणि त्याचं व्यक्तिगत जीवन, अशा अनेक गोष्टी चित्रकार सुधीर पटवर्धन यांना भावल्या आणि त्यांनी त्या आपल्या चित्रांतून बद्ध केल्या आहेत. त्यांतून एक कलाकार म्हणून जसा त्यांचा प्रवास दिसतो, जाणवतो, तसंच त्यांच्यातल्या अतिशय संवेदनशील अशा ‘माणसा’चंही दर्शन घडतं. त्यांच्या वैविध्यपूर्ण कलाकृती एका सूत्रात बांधणं तसं अवघडच. तरीही एखादी नाट्यकृती त्यातून साकारायची तर त्याला एक समान सूत्र, समान दुवा हवा. लेखक सुषमा देशपांडे यांनी ‘चित्रकाराला घडलेलं जीवनदर्शन’ या दुव्याभोवती हा रंगाविष्कार गुंङ्गला आहे. त्यासाठी सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांतली पात्रं त्यांच्याशी संवाद करताहेत, हा ङ्गॉर्म त्यांनी निवडला. यातील देवदत्त साबळे यांनी गायलेला पोवाडा, पार्श्‍वसंगीत, प्रकाश योजना, दिग्दर्शन, रंगभूषा,नेपथ्य आणि कलाकारांची अदाकारी, हे सारेच थक्क करायला लावणारे आहे.
       यानंतर नाटककार शङ्गाअत खान यांनी ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘मुंबईचे कावळे’ या प्रायोगिक नाटकाचे सादरीकरण झाले. या नाटकातून वर्तमान सामाजिक-राजकीय व्यवस्थेची झाडाझडती घेण्यात आली असून अजूनही ते नाटक तेवढच समकालिन वाटतं. वर्तमान सामाजिक-राजकीय व्यवस्थेची झाडाझडती घेत असताना प्रायोगिक मंचावर लोकरंगभूमीच्या शक्यता तपासणारं हे नाटक आहे. त्यात आधुनिक रंगभूमीच्या तथाकथित कर्त्यांनी नाटकाच्या शास्त्रशुद्ध व्याकरणाचा गंध नसलेले लोककलावंत सादर करत असलेल्या नाटकाकडे तुच्छतेनं पाहण्याचा दृष्टिकोनही लेखकाने जाता जाता मांडला आहे. अर्थात आज तो तितकासा ठळक उरलेला नाही, हेही आजचे वास्तव आहे. या नाटकाला प्रियदर्शन जाधव यांचे दिग्दर्शन लाभले आहे. तसेच या नाटकातील गीत व संगीत, प्रकाश योजना आणि भूमिका सारेच परिणामकारक आहे. 
समारोपाच्या दिवशी रविवार, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६-३० वाजता  प्रथम ‘इन्शाअल्ला’ हे नाटक सादर करण्यात आले. ज्येष्ठ नाटककार पंडित सत्यदेव दुबे यांच्या मूळ हिंदी नाटकाच्या चेतन दातार यांनी केलेल्या या मराठी रुपांतराला अजित भगत यांनी दिग्दर्शनाचा साज चढविलेला आहे. या नाटकात प्रायोगिक नाटक, नाट्यकला, दिग्दर्शक व कलाकार यांच्या भावनिक संबंधांचे मार्मिक चित्रण आहे.  ’इन्शाअल्ला’ हा आशादर्शक शब्दप्रयोग आहे. नाटकाच्या अखेरीस नाटकाचा नायक सर्वेश्वर, आपल्या मुठीत निकराने जपलेली ’चवन्नी’ आपल्या सहकार्‍यांकडे सोपवतो आणि ’इन्शाअल्ला’ म्हणत एक्झीट घेतो. एकाअर्थी सर्वेश्वरची ही सत्त्वाची चवन्नी प्रत्येक प्रेक्षकाच्या मुठीत येते आणि ती निकराने जपण्याचं मनस्वी आवाहनही देतं. हे नाटक पाहताना एक वेगळाच बौद्धिक खुराक नाट्यरसिकांना मिळाला. या नाटकाचे नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, कलाकार  साराच एक वेगळा अनुभव होता.
      दुसरे संतोष गुजर लिखित ‘मऊ’ हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकातून एक वेगळा आणि आजच्या गतीमान, स्पर्धात्मक युगाचा प्रश्‍न मांडला आहे. सामाजिक स्थित्यंतरात कुटुंब व्यवस्थेत होत असलेले बदल, पालकांच्या मुलांबाबत वाढत चाललेल्या अपेक्षा, त्यांचे बालपण हिरावून त्यांना आधीच मोठे करण्याचा ध्यास, यातून बालमनाची चाललेली होरपळ, त्याचे झालेले दुष्परिणाम यावर हे नाटक भाष्य करते. या नाटकाने नाट्यरसिक पालकांना निश्‍चितच अंतर्मुख केले. या नाटकाचे दिग्दर्शन व नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे.
      प्रत्येक नाटकानंतर रमेश धनावडे, संतोष बोंद्रे, सागर नार्वेकर, अमरदीप ठोंबरे यांनी कलाकार आणि रसिक यांच्यामधील सेतू बनून संवाद साधला. यावेळी त्यांनी अलिबागमध्ये सिद्धराज कलामंदिरच्या माध्यमातून एक नाट्ययुग निर्माण करणारे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ सिनकर, कलेच्या प्रांतात आपल्या ब्रह्माविष्णूमहेश सिनेप्लेक्सच्या माध्यमातून मनोरंजनाचा झेंडा फडकवत ठेवणारे गजेंद्र दळी, स्थापत्याबरोबर कलेवर निखळ प्रेम करणारे प्रसाद जोग, नव्या तरुणाईचा आवाज व्यक्त करणार्‍या राही पाटील, भाट्ये वाचनालयाचे नाट्यप्रेमी संचालक नितीन प्रधान आदींची या नाटकांबाबतची मते जाणून घेतली. यातून आणि रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दोन दिवसात सादर झालेल्या या चार नाटकांनी खरोखरच इतिहास घडविलाच, पण येथील कलाकार आणि रसिक प्रेक्षकांसाठीही हा प्रायोगिक नाट्यमहोत्सव एक नवी दृष्टी आणि नवा विचार देणारी कार्यशाळा होती, हे सिद्ध झाले. आपल्या प्रायोगिक नाटकांना अलिबागेत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवून आविष्कारचे काकडे काका आणि त्यांचे कलाकार, तंत्रज्ञ आणि नाट्यपरिषद रायगड शाखेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या मेहनतीचे चीज झाल्याचे जाणवले, यात कोणतेही दुमत नाही.