रविवार, २८ मार्च, २०१०

रंगभूमीवरचा बहुरुपी : प्रकाश म्हात्रे

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉



     अभिनयाचं सामर्थ्य मी कळत्या वयात जाणलं, तेव्हा रंगभूमी ठरली माझ्यासाठी एक मोहक विश्‍व. या नाट्यविश्‍वात जेव्हा मला शब्दांचा लळा लागला, तेव्हा मी अभिनयाला मुक्तपणे संवादाचा साज चढवला. प्रकाशाचा झोत माझ्यावर राहिला आणि मीही प्रकाश बनलो. या प्रकाशातूनच माझ्या बहुरुपाने मिळवल्या रसिकांच्या अगणित टाळ्या. मी बहुरुपी रंगभूमीवरचा. कधी राजा, तर कधी रंक, कधी पोलीस अधिकारी, तर कधी चोर, कधी नायक, तर कधी खलनायक, माझ्यासाठी कधीही ठरले नाही कोणतेही रुप वर्ज, असे जेव्हा रंगकर्मी प्रकाश नागू म्हात्रे म्हणतात, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळंच तेज पाहायला मिळते.
       प्रकाश नागू म्हात्रे हे पेझारी-आंबेपूर येथील नवीन वसाहतीत वास्तव्यास आहेत. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत आपल्या अभिनयाची नाममुद्रा उमटवली आहे, त्याचबरोबर दूरदर्शन मालिकेतही भूमिका केली आहे. चित्रपट निर्मिती सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे, इतकेच नव्हे, तर त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यही वाखाणण्याजोगे आहे, अशा चतुरस्त्र व्यक्तीमत्वाला बोलते करण्याचा हा एक प्रयत्न.
       प्रकाशजी, रंगभूमीने तुमच्या मनात कधी रुंजी घालायला सुरुवात केली?
       -आमच्या गावात ढोलपाडा-आंबेपूर येथे हनुमान जयंतीच्या दुसर्‍या दिवशी नाटक केले जायचे. हे नाटक हनुमान नाट्य मंडळातर्ङ्गे सादर केले जायचे. या नाटकात माझे वडील कै. नागू रामा म्हात्रे नायकाचे काम करायचे. तेव्हा ते मुंबईत सेंच्युरी मिलमध्ये कामाला होते. गावचं नाटक म्हणून ते हनुमान जयंतीच्या दुसर्‍या दिवशी सादर होणार्‍या नाटकाच्या तालमीसाठी आठवड्यातून दोन दिवस रजा टाकून गावी यायचे. त्यावेळी संगीत नाटके केली जायची. या नाटकांच्या तालमी बघतच मी मोठा झालो. या तालमीतच माझ्यामध्ये नाटकांची आवड निर्माण झाली. माझे वडील कै. नागू रामा म्हात्रे, कै. बाबू आंबाजी पाटील, कै. बाळाराम मास्तर, कै. हिराजी पाटील, कै. संभाजी पाटील, कै. काशिनाथ ठाकूर, कै. जनार्दन पाटील, सदानंद शंकर पाटील, गजानन ठाकूर, सीताराम पाटील, सदू राघो पाटील यांच्या अभिनयाच्या टॉनिकने माझा रंगभूमीवरील प्रवास सुकर झाला.
    प्रकाशजी, तुमची नाटकाची पहिली आठवण कुठली?
- ते १९७८ साल होते. दहावीचे माझे शिक्षण पूर्ण झाले होते. त्याच सुमारास हनुमान नाट्य मंडळाच्या ‘दिधले दान सौभाग्याचे’ या नाटकात मला एका शेतकर्‍याची छोटीशी भूमिका मिळाली. त्या नाटकातील माझ्या पहिल्या एंट्रीची आठवण आली की, मला आजही हसू येते. या नाटकात मी रंगभूमीवर एंट्री केली, तेव्हा दरवाजाच्या चौकटीला माझं डोकं लागून माझी टोपी खाली पडली. एंट्रीलाच माझी अशी ङ्गसगत झाली होती, परंतु मी घाबरलो नाही. मी न डगमगता तेव्हा चांगल्या पद्धतीने अभिनय केला आणि मी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात वाहव्वा मिळविली.
      प्रकाशजी, त्यावेळी हनुमान नाट्य मंडळातर्ङ्गे सादर करण्यात आलेल्या नाटकांचे दिग्दर्शन कोणी कोणी केले?
- हनुमान नाट्य मंडळातर्ङ्गे सादर करण्यात आलेल्या प्रत्येक नाटकाचे दिग्दर्शन मुंबई येथील गजानन पाटील यांचेच असायचे. मूळचे ते शहाबाजचे, पण कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांना ग्रामस्थ मानधन देऊन ढोलपाड्यात दिग्दर्शनासाठी बोलवायचे आणि तेही दोन महिने कलाकारांवर मेहनत घ्यायचे. या भागातील ज्येष्ठ लेखक कै. म.ना. पाटील गुरुजी हे प्रॉमटींग द्यायचे. मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं, म्हणून मी अभिनयाचे विविध पैलू साकार करु शकतो.
       प्रकाशजी, तुम्ही खर्‍या अर्थाने रंगभूमीवर वावरायला केव्हा सुरुवात केली?
- १९८५ साली हनुमान नाट्य मंडळाच्या जुन्या कलाकारांनी नव्या तरुण कलाकारांकडे नाट्यमंडळाची सूत्रे दिल्यानंतर गणेश हिर्लेकर यांचे ‘जन्मठेप’ हे नाटक त्याचवर्षी गावात सादर केले. तेथे या नाटकाला आणि माझ्याही भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्याचवर्षी नारंगी येथे झालेल्या जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आणि या नाटकातील माझ्या ‘राम’ या व्यक्तीरेखेच्या भूमिकेसाठी अभिनयाचे पारितोषिक मिळाले. या नाटकाचे प्रयोग हेमनगर, शहाबाज इत्यादी ठिकाणी करण्यात आले आणि प्रत्येक ठिकाणी या नाटकास नाट्यरसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यामुळे माझ्यातील कलाकारालाही प्रोत्साहन मिळाले. आणि आमच्या नाट्यमंडळाचेही कौतुक होऊ लागले. त्यानंतर भाग्यविधाता, दिधले दान सौभाग्याचे, दीप तुझ्या वंशाचा, शेवटी तूच अपराधी या नाटकात विविध भूमिका केल्या.
       प्रकाशजी, तुम्ही नाट्य आणि सामाजिक क्षेत्रातही काम केले आहे आणि करीत आहात, ते कसे काय?
        - जि.प. मधील नोकरी सांभाळून जेवढे शक्य होईल त्या फावल्या वेळेत मी सामाजिक काम करणे सुरु केले. आंबेपूर येथील सर्वोदय युवक मंडळाच्या अध्यक्षस्थानी आल्यावर मी या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले. एकपात्री अभिनय स्पर्धा, नृत्य स्पर्धा, शरीरसौष्ठव स्पर्धा, नेत्रचिकित्सा शिबीर, लसीकरण मोहीम, वृक्षारोपण मोहीम, ज्येष्ठांचा सत्कार, विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असे उपक्रम मी माझे एक सामाजिक दायित्व या भूमिकेतून राबवले. आज २६ वर्षे जि.प.च्या सेवेत आहे. मी करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल २००३ साली पेझारी येथील पंतभक्त मंडळाचा आमच्या सर्वोदय युवक मंडळाला सामाजिक सेवा पुरस्कार देण्यात आला.
      प्रकाशजी, तुम्ही सर्वोदय मंडळातर्फे राज्य नाट्य स्पर्धेत आपली नाटके उतरवलीत त्याबद्दल सांगा?
      - २००१ साली सर्वोदय मंडळातर्फे एड्स जनजागृतीवर आधारित ‘शिकार’ हे विजया कुडव लिखित व दिग्दर्शित नाटक राज्य नाट्य स्पर्धेत मुलुंड येथे कालिदास नाट्यगृहात सादर केले. या नाटकात मी, प्रकाश जयराम पाटील, योजना पाटील, निनाद पाटील, राजन पांचाळ, बाळू पाटील, विजया कुडव इत्यादींनी भूमिका केल्या. यात स्त्री अभिनयासाठी विजया कुडव यांना प्रथम क्रमांक मिळाला. २००२ साली मी ‘संघर्ष जीवनाचा’ या विजया कुडव लिखित, दिग्दर्शित कौटुंबिक नाटकात प्रमुख भूमिका केली. या नाटकात पराग नागले, राजन पांचाळ, जितेंद्र पाटील, सुरेंद्र टेमकर, निनाद पाटील, प्रकाश जयराम पाटील, राजेंद्र म्हात्रे, मोरेश्‍वर मोकल, कै. संभाजी पाटील, विजया कुडव यांच्या भूमिका होत्या. या नाटकाचे प्रयोग ढोलपाडा, शहाबाज इत्यादी ठिकाणी केले आणि ४१ व्या राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर हे नाटक सादर केले. २००३ साली दिलीप परदेशी लिखित ‘निष्पाप’ हे नाटक ४२ व्या राज्य नाट्य स्पर्धेत कल्याण येथे आचार्य अत्रे नाट्यगृहात सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन विजया कुडव यांनी केले. त्यात त्यांनी केलेली गौरीची भूमिका अविस्मरणीय होती. या सर्व नाटकांचा निर्मिती प्रमुख म्हणून मीच काम केले.
         प्रकाशजी, त्यानंतर तुम्ही एकांकिका स्पर्धांतही धडक मारलीत, त्याबाबत सांगा?
         - हँगर स्ट्राईक, प्रतिशोध, भोग, दी मेन विदाऊट शॅडो इत्यादी विजया कडव दिग्दर्शित एकांकिका विविध ठिकाणी सादर केल्या, तसेच पेण येथील ‘सन्मित्र’सारख्या राज्यस्तरीय स्पर्धांतही या एकांकिकांनी आपला ठसा उमटविला.
          प्रकाशजी, तुम्ही नंतर दूरदर्शन मालिकेकडे कसे वळलात?
         - योगायोगाने विजया कुडव यांनी निर्माते दिग्दर्शक (कै.) चिंटू ढवळे व स्नेहल ढवळे यांच्याशी माझी ओळख करुन दिली. चिंटू ढवळे यांनी ‘तुमचं आमचं जमलं’ या दूरदर्शन मालिकेचे चित्रीकरण पेझारी परिसरात करण्याचे ठरवले व त्यांनी आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भावना पाटील, ऍड. आस्वाद पाटील व ना.ना. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक गावडे यांच्या सहकार्याने ही दूरदर्शन मालिका पेझारी परिसरातच पूर्ण केली. या मालिकेसाठी मी अथपासून इतिपर्यंत त्यांना सहकार्य केले. सुमारे २५ ते ३० भागांचे चित्रीकरण माझ्या घरातच झाले. यात मी विविध भूमिका केल्याच, पण माझी पत्नी सौ. प्राची म्हात्रे, मुलगा प्रज्ज्वल म्हात्रे, कन्या रचना म्हात्रे, तसेच धाकटे बंधू सुरेश म्हात्रे यांनीही या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका केल्या. या मालिकेत अंकुश चौधरी, विजय चव्हाण, श्रीकांत देसाई, जयवंत वाडकर, जयराज नायर, असीत रेडीज, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाणगांवकर यासारखे दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. या मालिकेच्या श्रेयनामावलीत माझा निर्मिती प्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आला होता.
        प्रकाशजी, तुम्ही पेझारी येथे एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीही सहकार्य केलेत, त्याबद्दल सांगा?
       - ‘तुमचं आमचं जमलं’ या दूरदर्शन मालिकेतील पेझारी परिसरातील निसर्गाने मोहित होऊन येथे एखादा चित्रपट काढावा या हेतूने निर्माते दिग्दर्शक मंदार शिंदे हे पेझारी येथे माझ्या घरी आले व आम्ही चित्रपटाची निर्मिती करीत आहोत. त्यासाठी आम्हाला सहकार्य कराल का अशी त्यांनी माझ्याकडे विचारणा केली, तेव्हा मी ‘होय’ म्हणून उत्तर दिले. त्यानुसार ‘नो प्रॉब्लेम’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त ना.ना. पाटील हायस्कूल, पोयनाड येथे करण्यात आला. या चित्रपटासाठी मी सर्व प्रकारचे तनामनाने सहाय्य केले व त्यात छोटीशी भूमिकाही केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत निर्मिती प्रमुख म्हणून माझे नाव देण्यात आले आहे.
       प्रकाशजी, तुमच्या नाट्यप्रेमाला पत्रकारितेचीही जोड कशी मिळाली?
       - दहावी पास झाल्यावर जसा मी नाट्यप्रेमात आकंठ बुडालो, तसाच मी अक्षरांच्या प्रेमातही पडलो. कमळाकर नागू म्हात्रे माझे मोठे बंधू यांनी पेझारी येथे असलेल्या छोट्या आकारातील दैनिक कृषीवलमध्ये मला नोकरीस लावले. तेथे बातम्यांची अक्षरजुळणी करता करता खर्‍या अर्थाने माझ्यात वृत्तलेखनाची आवड निर्माण झाली. नंतर ९ मे १९८५ रोजी मी जि.प.च्या नोकरीत रुजू झाल्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अलिबाग परिसरातील कार्यक्रमांचे वृत्तलेखन करु लागलो. १९९५ साली मी मोठ्या आकारातील दैनिक कृषीवलचा सामाजिक वृत्त लिखाण बातमीदार बनलो. माझी पत्रकारितेतील वाटचाल गेली पंधरा वर्षे सुरुच आहे. २००४ साली तत्कालिन जि.प. अध्यक्ष बाळाराम पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी यांनी प्रथमत:च ‘गुणवंत कर्मचारी’ पुरस्कार सुरु केला. पहिलाच पुरस्कार मला मिळाला. या पुरस्काराने मला सपत्नीक गौरविण्यात आले.
         प्रकाश, नाट्यक्षेत्रात पुढे कोणती कामगिरी करण्याची तुमची इच्छा आहे?
         - ग्रामीण नाट्यसंस्कृती पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावागावात अभंग राहावी यासाठी मी प्रयत्नरत राहणार आहे. कारण खर्‍या अर्थाने ग्रामीण भागाने नाट्यसंस्कृती रुजवली आणि जपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावोगावीच्या नाट्य मंडळांना ग्रामीण कलाकारांना प्रोत्साहन देण्यात मला आनंद वाटतो. क्रीडा क्षेत्राबरोबरच गावोगावी नाट्यचळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
         प्रकाश, तुमच्या नाट्यप्रेमाचं अमरफुल टवटवीत ठेवण्यासाठी घरातून प्रोत्साहन मिळाले असेलच, त्याबाबत सांगा?
         - निश्‍चितच माझं नाट्यप्रेम घरातील प्रोत्साहनामुळे वाढले आणि जोपासलेही गेले. माझ्या वडिलांचे- तसेच आईचे आशीर्वाद माझ्यामागे होतेच आणि त्यांचे गुण माझ्यात उतरले. हा अभिनयाचा वारसा आता माझ्या कन्येकडे, म्हणजे रचना प्रकाश म्हात्रे हिच्याकडे गेला आहे. तिने पेण येथील ‘सन्मित्र’ एकांकिका स्पर्धेत अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळविले आहे. तिने गुजरात येथे झालेल्या महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत स्त्री पात्र म्हणून राज्याचे नेतृत्व केले आहे. मुलगा प्रज्ज्वल यालाही अभिनयाची आवड आहे आणि माझ्या प्रत्येक कार्याला त्याचा पाठिंबा असतो. मी नोकरी करत असताना नाटक आणि सामाजिक कार्य यात स्वत:ला झोकून दिले, ते पत्नी माझी प्राची म्हात्रे हिच्यामुळेच. तिची प्रेरणा व प्रोत्साहन मला सतत बळ देत राहिले, त्यामुळे तिचा माझ्या प्रगतीत सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही. आईचे आशीर्वाद आणि सहकार्‍यांनी व रसिकांनी दिलेले प्रेम यामुळे हा ‘प्रकाश’ सततच दैदीप्यमान बनला आहे.
      अर्थात प्रकाश म्हात्रे यांचा परिचय येथे संपत नाही. रायगड जिल्हा परिषदेत प्रामाणिक सेवा बजावत असताना जिल्हा परिषद वाहन चालक व यांत्रिकी कर्मचारी संघटना, शाखा रायगडचे ते गेली २० वर्षे अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्हास्तरावर केलेले काम बघून राज्य कार्यकारिणीने १५ मार्च २००५ रोजी मुंबईतील काळाघोडा मैदानात झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात त्यांची महाराष्ट्र राज्य संघटनेचा अध्यक्ष म्हणून निवड केली. त्या माध्यमातून अनेक राज्यस्तरीय दौरे करुन व मंत्रालयीन कामकाज तडीस नेऊन संबंधित संघटनेच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. चालू वर्षात पुन्हा त्यांची रायगड जिल्हा वाहन चालक संघटनेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. तसेच राजिप कर्मचारी सहकारी पतपेढीचे २००३ पासून चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक अशा विविध पदांवर ते कार्यरत असताना त्यांची प्रत्येकाशी वागणूक आदराची, सहकार्याची असते. त्यांना ग्रामीण रंगभूमी सशक्त करायची आहे, ते आपलं सामाजिक काम करताना ग्रामीण रंगभूमीसाठीही भरीव योगदान देतील यात वाद नाही. त्यांना उर्वरीत आयुष्यात सामाजिक कार्यास शुभेच्छा!

शनिवार, १३ मार्च, २०१०

सच्ची अभिनेत्री : वीणा जामकर

-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचे रंगकर्मी ⬉


    एक पायरी नाटकाची, एक पायरी चित्रपटाची. या पायर्‍यांवर मी कधी अडखळले नाही, पडले नाही. हा माझा प्रवास आवडीचा होता, त्यामुळे मी परिश्रम घेतले तरी माझी दमछाक झाली नाही. रंगभूमीवरील तिसर्‍या घंटेने माझ्या श्‍वासाला आत्मविश्‍वास दिला. माझ्या चित्रपटांना पडलेल्या टाळ्यांनी माझ्या अभिनयाला कौतुकाचा साज चढवला. आज जरी माझी ओळख नाट्य-चित्रपट विश्‍वात एक अभिनेत्री म्हणून असली तरी मी मात्र एक सच्ची कलायात्री आहे. माझा कलाप्रवास रसिकांच्या प्रेमामुळे सतत उंचावतच राहिला आहे, असे नाट्य-चित्रपट अभिनेत्री वीणा जामकर म्हणतात, तेव्हा त्यांच्यातील कलाकाराचा आवाका अमर्यादित असल्याचे जाणवते.
      वीणा जामकर. उरण येथील मनोहर जामकर यांच्या कलासक्त कन्या. चार दिवस प्रेमाचे, एक रिकामी बाजू दलपतसिंग येता गावा अशा व्यावसायिक नाटकांत आणि वळू, गाभ्रीचा पाऊस, विहीर, जन्म, लालबाग परळ अशा चित्रपटात आपल्या अप्रतिम अभिनयाने वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीने जो स्वत:चा ठसा उमटविला आहे, तो कधीही पुसला जाणारा नाही. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे वीणा जामकर यांनी एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजले आहेत. ‘पलतडचो मुनिस’ हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोकणी चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरांटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचं पारितोषिक मिळालं. अशा या गुणी अभिनेत्रीबरोबरील ही गप्पांची मैफल.
      वीणाजी, कलाक्षेत्रात तुम्ही कधी पाऊल टाकले?
     - माझे संपूर्ण कुटुंबच कलासक्त आहे. माझी आई अलका जामकर शिक्षिका आहे आणि ती उत्तम गाते. ती नाटकात कामही करायची. माझे वडील चित्रकार आहेत. ते उत्कृष्ट तबला वाजवतात. अशा वातावरणात मी वाढले आहे. अडीच वर्षांची असताना मी पहिलं नाटक केलं. मग पाच वर्षाची असताना एकपात्री अभिनयही केला. आईच्या कडेवर बसून. त्या वयात आपले पालक आपल्याला सांगतात की, असं असं कर आणि आपण तसं करतो. तसं मी केलं आणि माझ्याही नकळत मला ते जमलं. लोकांना माझं काम आवडलं. आई-बाबांना आवडलं. त्यानंतर मग आई-बाबांनी मला भरपूर प्रोत्साहन दिलं. बाबा मला बालनाट्य शिबिरात घेऊन जायचे. मला नृत्याची आवड होती, म्हणूनच मला कथ्थक शिकायला पाठवलं. अभ्यास सांभाळून नाटक, नृत्य करायला मला आई-बाबांनी कायम प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत असताना ‘वैरी’ नावाची एकांकिका केली. त्या नाटकासाठी मला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बालकलाकाराचंही पारितोषिक मिळालं होतं. यानंतर पुढच्या काळात काही संस्थांच्या एकांकिका, उरणच्या संस्थांसाठी एकांकिका केल्या.
       वीणाजी, नाटकात कारकीर्द करावी असं केव्हा ठरवलत?
      - दहावी झाल्यानंतर मी ठरवलं की, याच क्षेत्रात काहीतरी करायचं, कारण नाटकात काम करणं मला मनापासून आवडत होतं. मला तेव्हा केंद्र सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळण्याची सातवीपासून ते पदवीधर होईपर्यंत मला ती मिळणार होती. मात्र त्यासाठी दर दोन वर्षांनी मुलाखत द्यावी लागे. दहावीनंतर कमलाकर सोनटक्के यांनी माझी मुलाखत घेतली होती. ‘मला अभिनयाची आवड आहे, नाटकात काम करायचं आहे, मी काय करु? असं मी त्यांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी मला मुंबईला येण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मग मी रुपारेल कॉलेजला प्रवेश घेतला.
        वीणाजी,  रुपारेल कॉलेजचे व्यासपीठ तुमच्या कलेला कसे पोषक ठरले?
       - रुपारेल कॉलेज एकूणच सांस्कृतिक घडामोंडीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे असताना मग मी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. मी आणि अद्वैत दादरकरने एका युवा महोत्सवात शफाअत खानाची ‘क’ नावाची एकांकिका केली होती. तेव्ही मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते. या स्पर्धेसाठी चेतन दातार परीक्षक होता. मला आणि अद्वैतला अभिनयासाठी सुवर्णपदकं मिळाली होती. चेतन दातारनं आमच्या या एकांकिकेचा प्रयोग ‘आविष्कार’ला ठेवला. मुंबईत येऊन तेव्हा मला दोन वर्षे झाली होती आणि ‘आविष्कार’मध्ये कसा प्रवेश मिळवायचा, याच धडपडीत मी होते आणि योगायोगाने १० जुलै २००३ रोजी, माझ्या वाढदिवशीच सुलभाताई देशपांडे यांच्यासमोर ‘आविष्कार’च्या रंगमंचावर एकांकिका सादर करण्याचे भाग्य मला लाभले.
       वीणाजी,  तुमचा आविष्कारच्या निमित्ताने जो प्रायोगिक नाटकांचा प्रवास झाला, तो कसा झाला?
       - ‘क’ या एकांकिकेनंतर चेतन दातार याने ‘जंगल में मंगल’ हे नाटक केलं. ते माझं पहिलं प्रायोगिक नाटक. तेव्हा त्यातली एक प्रमुख भूमिका मला दिली होती. शेक्सपीअरच्या ‘अ मिडसमर नाईटस् ड्रीम’वर हे नाटक आधारित होतं. या नाटकाची मजा म्हणजे सर्व मुलांनी स्त्री भूमिका केल्या होत्या आणि सर्व मुलींनी पुरुषांची काम केली होती. माझ्या व्यक्तीरेखेचं नाव ‘पक्या’ होतं, म्हणजे मूळ नाटकातला ‘पक’ खूप एनर्जी असलेलं हे नाटक होतं. त्यानंतर ‘खेळ मांडियेला’ नावाचं नाटक केलं. चेतनने एका क्रोएशियन नाटकाचं हे भाषांतर केलं होतं. पं. सत्यदेव दुबे आणि सोनाली कुलकर्णी यांनी हे नाटक इंग्रजीत केलं होतं. मी आणि मंगेश भिडेने ते मराठीत केलं. एक व्यावसायिक नाटकातली मोठी अभिनेत्री आणि प्रायोगिक नाटकाचा दिग्दर्शक या दोन पात्राचं हे नाटक होतं. ही भूमिका तशी कठीण होती. तेव्हा मी फक्त एकोणीस वर्षांची होते. चेतनने भाषांतर व दिग्दर्शन करताना अनेक खरे संदर्भ वापरले होते. अनेक खर्‍या अभिनेत्रींच्या लकबी मला दिल्या होत्या. त्यावेळी जशी पेलली तशी मी ती भूमिका केली, पण माझं त्या भूमिकेमुळे खूप कौतुक झालं. त्या भूमिकेसाठी मला त्या वर्षी ‘नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार’ आणि ‘मामा वरेरकर पुरस्कार’ असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.
       वीणाजी,  व्यावसायिक नाटकातही तुम्ही दमदार पदार्पण केलेत त्याबाबत सांगा?
       - २००४ साली मी ‘एवढंच ना’ हे पहिले व्यावसायिक नाटक केले. यात माझी प्रमुख भूमिका होती. त्यानंतरचे दुसरे व्यावसायिक नाटक ‘चार दिवस प्रेमाचे’ सुयोगसारखी संस्था आणि प्रशांत दामले, सविता प्रभुणे, अरुण नलावडे हे सहकलाकार. खूप मजा यायची हे नाटक करताना या नाटकाचा शंभर प्रयोगात मी भूमिका केल्या. ‘हिच ती दिवाळी’ या इरावती कर्णिक लिखित व अद्वैत दादरकर लिखित नाटकाच्या ३५ प्रयोगात मी भूमिका केल्या. ‘एक रिकामी बाजू’ या नाटकातील भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. या नाटकात माझ्याबरोबर गीतांजली कुलकर्णी होती. स्तनाचा कर्करोग झालेल्या एका तरुणीची ही कथा होती. या नाटकात मी वेगवेगळ्या आठ भूमिका केल्या आहेत. थिट्रीक संस्थेच्या या नाटकास २००९ साली झी गौरवचा प्रायोगिक विभागाचा पुरस्कार मिळाला. इतर सात पुरस्कारांबरोबरच वैयक्तिक मलाही अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. या नाटकाचे ३७ प्रयोग झाले आहेत. मकरंद साठे लिखित व अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेलं ‘दलपतसिंग येती गावा’ हे नाटक माझ्याासाठी विशेष महत्त्वाचे आहे. माहितीच्या अधिकारासंदर्भातलं ते नाटक होतं. चळवळीचं नाटक होतं. या नाटकात अलकाताई या नावाची माझी भूमिका होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, कणकवली, मावळ, पुणे, मुंबईतील गोरेगाव, माटुंगा, रायगड जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेले गागोदे, साने गुरुजी स्मारक ट्रस्ट, वडघर इत्यादी ठिकाणीच या नाटकाचे प्रयोग झाले नाहीत तर केरळ राज्यातील तिरुअनंतपूर येथील राष्ट्रीय महोत्सवातही या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. या नाटकाला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ३० पेक्षा अधिक प्रयोग या नाटकाचे झाले. मनोरंजनातून परिवर्तन घडवणारे हे नाटक आहे.
       वीणाजी,  तुम्ही चित्रपटाचा मोठा पडदाही व्यापून टाकलात, त्याबद्दल सांगा?
       - राजेंद्र बडे लिखित, दिग्दर्शित ‘बेभान’ हा माझा पहिला चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटातील निशा या भूमिकेसाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मला मिळाला. २००८ मध्ये उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ या चित्रपटात तानीची भूमिका केली. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ या चित्रपटातही सीमा मावशी नावाची भूमिका केली. सतीश मनवर दिग्दर्शित ‘गाभ्रीचा पाऊस’ या त्याच्या पहिल्या चित्रपटात ‘अंजना’ ही शेतकर्‍याच्या बायकोची भूमिका केली. ‘निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटात सावित्री नावाची भूमिका केली. याशिवाय ‘मर्मबंध’ हा चित्रपट केला. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा झीचा पुरस्कार मला मिळाला. ‘जन्म’ हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होत आहे, पण २०१० च्या राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण निर्मितीचा पुरस्कार या चित्रपटाला मिळाला आहे. आई आणि मुलीच्या नातेसंबंधावर हा चित्रपट आधारलेला आहे. मुलीला रक्ताचा कर्करोग होतो आणि आपल्या मुलीला वाचवण्यासाठी ती आई किती धडपड करते हे या चित्रपटात दाखवलं आहे. कर्करोग झालेल्या मुलीची भूमिका मी केली आहे आणि माझ्या आईच्या भूमिकेत रिमा लागू आहेत. ‘लालबाग परळ’ चित्रपट मला खूप समाधान देणारा ठरला. जयंत पवार यांच्या ‘अधांवर’ या नाटकावर हा चित्रपट बेतला आहे आणि हे नाटक मी शाळेत असताना पाहिलं होतं. त्यातल्या मंजूच्या भूमिकेसाठी कुठलीही अभिनेत्री एका पायावर तयार झाली असती, इतकी सुंदर भूमिका आहे ती जयंत पवारांनीच अगदी सुरुवातीला माझं नाव महेश मांजरेकर यांना सुचवलं. या चित्रपटामुळे मला मांजरेकर यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करता आलं. शिवाय ही भूमिका इतकी सशक्त होती की, ती साकारताना माझा खरा कस लागला. ‘पलतडचो मुनिस’ (पलिकडचा माणूस) या कोकणी भाषेतील चित्रपटात माझी एका वेड्या बाईची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट अनेक महोत्सवात गाजला. बर्लिन चित्रपट महोत्सवात या चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळाला. टोरंटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला विशेष पुरस्कारही मिळाला. अशा प्रकारे चित्रपट क्षेत्रातही मी चमक दाखवू शकले, याबद्दल मला समाधान वाटते.
      वीणाजी,  तुम्ही लघु चित्रपटही केले त्याबद्दल सांगा?
      - नंदू जाधव दिग्दर्शित ‘श्‍वेत अंगार’ या माझ्या लघु चित्रपटाचा २००७ साली फ्रान्सच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये समावेश झाला होता. ‘चंमतग्’ हा एक ४८ मिनिटांचा लघुचित्रपटही मी केला. ‘होले होले’ या हिंदी लघु चित्रपटातही मी भूमिका केली आहे. या माझ्या सर्व भूमिकांचे प्रचंड कौतुक झाले.
      वीणाजी,  टीव्ही माध्यमातून तुम्ही फारशा दिसत नाहीत, असं का?
       - मला मालिकांच्या ऑफर्स बी.ए.ला असल्यापासून येत होत्या. झी मराठीवरील ‘घडलंय बिघडंल’ , ‘इ टीव्हीवरील पापण्यांना हसलात का?’ अशा मालिकांतून भूमिका केल्या. परंतु तेथे माझं मन रमलं नाही. तसेच चित्रपट नाटक यामुळे मला फारसा वेळ मिळत नाही, जो वेळ मिळतो तो मी वाचन-मननात घालवते, त्यामुळे मी टी.व्ही. मालिका फारशा करीत नाही.
        वीणाजी, , तुमच्या एकंदरीत आयुष्याकडे पहाता तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं ध्येय कोणते आहे?
- मी स्वत:ला फार नशीबवान समजते कारण माझ्या आई-वडिलांचा मला पूर्ण पाठिंबा होता. किंबहुना त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी इथवर येऊ शकले. नाट्य-चित्रपट क्षेत्रात खूप संघर्ष करणारे मी रोज पाहते. कित्येकांना घरचा पाठिंबा नसतो म्हणून काम करता येत नाही. सुदैवाने माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. मी अगदी लहानपणापासून काम करत गेले आणि मला चांगल्या भूमिका मिळत गेल्या. उत्तम नाट्यसंस्था, दिग्दर्शक, सहकलाकार मला लाभले. प्रेक्षकांनाही माझं काम आवडलं. यापुढेही असंच चांगलं काम मला करायला मिळावं, हेच माझे ध्येय आहे.
      खरेच, वीणा जामकर या विचारी, अभ्यासू अभिनेत्री आहेत. त्या बालपणी नकळत नाट्यक्षेत्रात ओढल्या गेल्या आणि कळत्या वयात त्यांनी आपल्या नाट्यक्षेत्रातील आणि चित्रपट क्षेत्रातील सहज वावराने कळस चढवला. आज त्या एक गुणी अभिनेत्री म्हणून परिचित आहेत, हा परिचय म्हणजेच त्यांच्या या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीला मिळालेली एक पावतीच आहे.