शुक्रवार, २६ जुलै, २०१३

जिल्हा प्रशासनाची लक्तरे वेशीवर

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


      नोकरशाहीबद्दल बोलावे आणि लिहावे तेवढे कमी आहे. या नोकरशाहीत एवढे दुर्गुण आहेत की, तिच्याबद्दल कितीही लिहिले तरी ते शिल्लक राहतात. तिच्यावर विनोद केले गेले असले तरी ती सर्वसामान्यांचे आणि व्यवस्थेचे लचके तोडत असते ही वस्तुस्थिती आहे. रायगड जिल्ह्यात अनेकवेळा याचा प्रत्यय आला असला, तरी यावेळचा संदर्भ वेगळा आहे आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडीत आहे. यावेळी खुद्द रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जग्गनाथ विरकर यांचे स्वीय सहाय्यक विनोद लचके यांना लाचखोरीबद्दल जेरबंद करण्यात आले.
      विनोद लचके यांनी बिनशेती करण्यासाठी कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील कृष्णा आंबवणे यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु आंबवणे यांनी १ लाख २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. ही रक्कम मंगळवारी देण्याचे ठरले होते. परंतु आंबवणे यांनी त्याअगोदर अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मिशन जिल्हाधिकारी कार्यालय हाती घेऊन सापळा रचून मंगळवारी संध्याकाळी लचके यांना लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने यातील इतर मोठे मासे गळाला लावण्याचा प्रयत्न चालू केला आहे. ते मोठे मासे गळाला लागतील की नाही, हे माहीत नाही, पण रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाचा कसा बाजार झाला आहे आणि तेथे कशाप्रकारची दलाली होते, हे चव्हाट्यावर आले आहे. रायगड जिल्ह्यात सेझचे आक्रमण झाले आणि येथील भूमिपुत्रांच्या जमिनी कवडीमोलाने भांडवलदारांच्या घशात घातल्या जावू लागल्या. यात या कार्यालयाची दलाल म्हणूनच भूमिका असल्याचे वारंवार दिसून आले होते. दुसरीकडे बांधकाम क्षेत्राला गती आल्यामुळे जिल्ह्यातील जागांचे भाव गगनाला भिडले, त्यामुळे कागदपत्रे रंगवून होत्याचे नव्हते करणारी जमात गांडुळासारखी जिल्हाधिकारी कार्यालयात पसरली. ही नोकरशाही गांडुळासारखी दिसत असली तरी ती विषारी सापाप्रमाणे घातक होती आणि आहे. त्यामुळेच जमिनींचे अनेक गैरव्यवहार या कार्यालयातून व त्याच्याशी संबंधित कार्यालयातून सुरु झाले आणि सुरु आहेत. 
     लाचखोरीचा भस्म्या रोग झालेली ही नोकरीशाही प्रत्येक व्यवहारात पैसा ओरपू लागली. सनदशीपणे होऊ शकणारे व्यवहार अडवून तेथे पैशाची मागणी केली जात आहे आणि दुर्दैव म्हणजे त्यांना लाच देणारेही भेटत आहेत. परंतु आंबवणे यांच्यासारखे या भ्रष्ट व्यवस्थेला बळी पडत नाहीत, तेव्हाच लचकेसारखे महाभाग कायद्याच्या कचाट्यात सापडतात. लचके यांची लाचखोरी हे हिमनगाचे एक टोक आहे. जर महाभारतातल्या संजयासारखी दिव्यदृष्टी सर्वसामान्य जनता आणि कायदा राबवणार्‍या यंत्रणेला लाभली तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी काय लायकीचे आहेत, याचा प्रत्यय येईल. जिल्ह्याचे प्रशासन चालवणारी व्यवस्थाच करप्ट असेल, तर या जिल्ह्यातील जनतेने कोणाच्या तोंडाकडे पहायचे? अर्थात हे रायगड जिल्ह्याचेच रडगाणे नाही, देशातील सर्वच जिल्ह्याचे रडगाणे आहे. चांगले अधिकारी ही व्यवस्था सुधारु शकत नाही, बिघडणे हाच पर्याय त्यांच्यापुढे उभा राहतो, तेव्हा त्यांना व्यवस्थेबाहेर पडावे लागते. परंतु निलाजर्‍या अधिकार्‍यांच्या खोगीर भरतीमुळे जिल्हा प्रशासने ही खाबुगिरीची आणि बाबुगिरीची केेंद्रे झाली आहेत. अर्थात संपूर्ण नोकरशाहीचे दृश्य फारसे चांगले नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हेच चित्र आहे. त्यामुळे देशाच्या भवितव्यासमोरही प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. विनोद लचके यांच्या अलिबागमध्ये चार सदनिका आहेत. कशासाठी हव्यात त्यांना चार सदनिका? त्या त्यांना कशा मिळाल्या? त्यात त्यांनी कोणता घामाचा पैसा ओतला? याची गणितं लाचलुचपत विभाग आणि पोलिस सोडवतीलच. प्रारंभी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांचे स्वीय्य सहाय्यक म्हणून भूमिका बजावली होती, ही भूमिका त्यांना फळाला आली असणार. येथेच नाजूक आणि गुंतागुंतीचे संबंध तयार झाले असणार हे उघड आहे. त्यानंतर ते निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचे स्वीय्य सहाय्यक बनले आणि त्यांनी कित्येकांना बनवले हे त्यांच्या उघड झालेल्या ‘पराक्रमा’वरुन लक्षात येते.
       सेझ, टाटा पॉवर, रिलायन्स, पटनी पॉवर, वेल्सस्पन मॅक्सस्टील कंपनीसाठी विनोद लचके यांनी केलेल्या कामगिरीवर प्रकाश पडला, तर निश्‍चितच या कंपनीराजसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कशाप्रकारची साखळी कार्यरत आहे, हे दिसून येईल. अर्थात, विनोद लचके जिल्हाधिकारी कार्यालयातील एक पायरी आहे. अशा तेथे अनेक पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवर डोके ठेवल्यानंतरच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चरणापर्यंत पोहोचता येते. या पायर्‍यांना खुश केले, त्यांना फुलं वाहिली, श्रीफळ फोडला, नैवेद्य दाखवला, तरच वरच्या नावापर्यंत पोहोचता येते आणि या बापांचे व्यवहार या पायर्‍याच पहात असतात. त्यामुळे या पायर्‍या, म्हणजेच हे स्वीय्य सहाय्यक उन्मत आणि उर्मट असल्याचे आढळते. अशांपैकी एक असलेले विनोद लचके हे स्वतःच्या मर्जीने सर्वच भ्रष्टाचार करत असणार असे मान्य करता येणार नाही. त्यांचे बोलविते धनी वेगळेच आहे. या बोलवित्या धन्यांना जेरबंद केले गेलेे तरच अर्थ आहे. अन्यथा विनोद लचके याला लाचलुचपतीवरुन अटक केल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा, लाचलुचपतीचा वारु दौडत राहील. विनोद लचके यांच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाचे शुध्दीकरण करण्याची गरज आहे. या कार्यालयातील पैसा खाणार्‍या वरिष्ठ अतृप्त आत्म्यांना बाटलीत भरण्यासाठी कोणत्याही बंगाली बाबाची गरज नाही. जिल्हा प्रशासन जर स्वच्छ असेल, तर ते स्वतःच या अतृप्त आत्म्यांना गजाआड करण्यास पुढाकार घेईल. तसे जर झाले नाही तर रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची लक्तरे वेशीवर टांगली जाऊन जिल्हा प्रशासनाचे वस्त्रहरण होईल. हे वस्त्रहरण लोकशाहीसाठी लज्जास्पद असेल, जिल्ह्यातील जनतेसाठी दुर्दैवी असेल. इतकेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा