सोमवार, ३१ जुलै, २०१७

समुद्र पर्ससीन जाळ्याने घुसमटतोय... प्रदूषणाने तळमळतोय...

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


    रायगड जिल्ह्याला २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. सुमारे २१,००० चौ.कि.मी. सागरी क्षेत्र (सुमारे १०० फॅदम खोलीपर्यंत) मासेमारीसाठी उपलब्ध आहे. पण वाढते प्रदूषण, नष्ट होणार्‍या काही माशांच्या प्रजाती, घटलेलं उत्पादन, शीतगृहांची कमतरता आणि सरकारी उदासीनता याचा ङ्गटका मत्स्य व्यवसायाला बसलाय. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छिमार अस्वस्थ आहे. अर्थात या अस्वस्थततेने संपूर्ण राज्याच्या ७२० किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीला ग्रासले आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात सागरी जिल्ह्यांत ३ लाख ८६ हजार लोक मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. या सार्‍यांमध्ये ही अस्वस्थता पहायला मिळते आहे. सात जिल्ह्यांत मासे उतरवण्यासाठी १७३ केंद्रे असून, त्या माध्यमातून सुमारे पाच लाख मेट्रिक टन मत्स्योत्पादन केले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत हे कमी आहे. पावसाळ्यात  माशांचा प्रजननकाळ असल्याने दरवर्षी १ जून ते ३१ जुलै असे दोन महिने, म्हणजे ६१ दिवस शासनाच्या वतीने ट्रॉलर्स व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी लागू करण्यात येते. ही बंदी संपुष्टात आल्याने आज, १ ऑगस्टला ट्रॉलर्स व यांत्रिक नौका मच्छिमारीस सज्ज झाल्या  आहेत. त्यात पारंपरिक मासेमारी नौका, यांत्रिक नौका, ट्रॉलरची मासेमारी, निर्बंध घातलेले पर्ससीननेट, प्रदूषण असे विविध कंगोरे आहेत. दुखरी नस त्यातच आहे.
    भारतात १९६४ साली ट्रॉलर पद्धतीच्या मासेमारीची सुरुवात केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यांत प्रथमत: झाली. त्याने निश्चितच मत्स्योद्योगाला चालना मिळाली. रोजगार वाढला. पण कालांतराने पारंपरिक मच्छिमार आणि ट्रॉलरधारक यांच्यातील आर्थिक दरी वाढत गेल्याने स्थानिक संघर्ष वाढू लागले. त्यातच १९७२ मध्ये भर पडली ती पर्ससीन जाळ्याची. हे जाळे कमी भोकाचे असून २ ते ५ कि.मी. लांबीचे असते. बटव्यासारखे असणारे हे जाळे भर समुद्रात यंत्राच्या साहाय्याने ओढले जाते आणि मोठ्या प्रमाणात मासळीचे साठे ओढले जातात. त्यातच प्रगत तंत्रज्ञानामुळे वेबसाइटच्या साहाय्याने समुद्रातील मत्स्यसाठे शोधून काढणे सुलभ होऊ लागले. यांत्रिक बोटी माठ्या प्रमाणात मासेमारी करू लागल्या. पण या प्रगतीबरोबरच पावसाळी हंगामातील अंड्यावरील मासा जाणे, पर्ससीनसारख्या जाळ्यांचा पारंपरिक सागरी क्षेत्रात अनियंत्रित शिरकाव, मत्स्यबीजांचा नाश आणि सागरी प्रदूषण यामुळे मत्स्यव्यवसायातील घट वाढत गेली आणि त्याचे गंभीर आणि दूरगामी परिणाम सागरी परिसंस्थेवरही होत राहिले. पर्ससीन ट्रॉलर्समुळे महाराष्ट्राच्याही पारंपरिक मच्छिमारांच्या १२ हजार यांत्रिक व ११ हजार बिगर यांत्रिक अशा एकूण २३ हजार मच्छिमार नौकांच्या व्यवसायास ग्रहण लागले. सागरी किनारपट्टीवरील सात जिल्ह्यांत ४५६ मासेमारी गावे आहेत. या गावांतील ८१ हजार ४९२ कुटुंबांतील जवळपास ३ लाख ८६ हजार लोक मासेमारीच्या आनुषंगिक व्यवसायांत आहेत. या सर्वांना पर्ससीन ट्रॉलर्सविरुद्ध लढा उभारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दीर्घकाळ लढा दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील पर्ससीननेट मासेमारी (अतिशय कमी आकाराच्या आसाची जाळी ज्यामुळे प्रजननक्षम मत्स्यबीजांचा नाश होतो) व तिचा पारंपरिक मासेमारीवर व राज्याच्या सागरी किनार्‍याच्या पर्यावरणावर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी २०११ साली डॉ. व्ही.एस. सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शोध समितीची स्थापना केली. या समितीने तयार केलेला अहवाल स्वीकारुन महाराष्ट्र शासनाने ५ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यासंदर्भात अधिसूचना पारित केली. 
    अधिसूचनेनुसार पर्ससीन ट्रॉलर्सची संख्या ४९५ ऐवजी ङ्गक्त १८२ पर्यंत ठेवण्यात आली. पर्ससीननेटवर निर्बंंध घातले. डहाणू ते मुरुड-जंजिरापर्यंत कायमस्वरूपी पर्ससीननेट मासेमारीला बंदी घालण्यात आली, तर मुरुड जंजिरा ते बुरंडी, बुरंडी ते जयगड व जयगड ते बांदा पट्ट्यात सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांसाठी पर्ससीन मासेमारीला परवानगी दिली. हायड्रॉलिक विंचच्या साह्याने पर्ससीन जाळे ओढण्यास तसेच रसायनांचा वापर करून माशांना भूल देऊन पकडण्यास बंदी घातली. पर्ससीननेट मासेमारीला बंदी घातल्याने अशी मासेमारी पूर्णपणे बंद झालेली नाही. अनधिकृतपणे ती सुरुच आहे. त्यावरुन स्थानिक सरकारी यंत्रणेच्या कारवाईअभावी या यंत्रणांमध्ये आणि मच्छिमारांमध्ये संघर्ष दिसून येतो. असे असले तरी काही प्रमाणात या बंदीने पारंपरिक मच्छिमारांना मोठा आधार वाटतो आहे. एकीकडे असे काहीसे आश्‍वासक वातावरण असतानाच प्रदूषणाने मत्स्य उत्पादनाला फटका बसत असल्याचे दिसत आहे. समुद्रकिनार्‍यांवर थेट सोडण्यात येणार्‍या सांडपाणी आणि केमिकलयुक्त पाण्यामुळे मासळीसाठे नष्ट होत आहेत, ही बाबही गांभीर्याने घेतली पाहिजे. रायगड जिल्ह्याला लाभलेला समुद्र आणि खाड्याही अनेक रासायनिक कंपन्यांतून होणार्‍या प्रदूषणामुळे तळमळत आहेत. त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होतोय. माशांच्या काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पापलेट, झिंगा, सुरमई, माकुल या माशांचं उत्पादन घेतलं जात असलं तरी जिताडे, पाला, रावस, दाडा, ताम, वाम आणि शेवंड या माशांचं उत्पादन कमी झालंय. सागरी प्रदूषण असंच चालू राहील, तर या माशांचं उत्पादन थांबेल आणि त्याचे दुष्परिणाम मत्स्य व्यवसायावर होतील. 
    जिल्ह्यातील समुद्र आणि खाड्यालगतची सुमारे १०३ गावे या मत्स्यव्यवसायात गुंतलेली आहेत. त्यातील ११ हजार ६२० कुटुंबांतील ६९ हजार ४७ जण मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. यात पूर्ण वेळ मासेमारी करणारे १६ हजार ५२३  मच्छिमार असून अर्धवेळ मासेमारी करणारे १३ हजार ५२१ मच्छिमार आहेत. एकूण ३९ मासेमारी केंद्रांतून मासे पकडणे व विक्रीचे व्यवहार होतात. मोरा-करंजा, अलिबाग, रेवदंडा, मुरुड आणि श्रीवर्धन हे पाच मासेमारी विभाग आहेत. मासेमारीसाठी वावरी, सारंगा, घोळ, बुढी, रामपान, करेल, धनगड, डोल, म्होर, चिराटे, कात्रा, माजोला, खोला, पाग आणि गळांच्या आकड्याची जाळी वापरतात. ही जाळी नॉयलॉनच्या धाग्यापासून तयार करतात. या व्यवसायासाठी ४ हजार ९४३ नौका वापरात आहेत. यामध्ये १ हजार ४९९ बिगर यांत्रिकी, तर ३ हजार ४४४ यांत्रिकी नौका आहेत. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ४५ हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जात असे. गेल्या पाच वर्षांत मात्र मत्स्य उत्पादनात सातत्याने घट झाली आहे. २०११-२०१२ मध्ये रायगड जिल्ह्यात ४६ हजार ९१२ मेट्रिक टन असणारे मत्स्य उत्पादन, २०१५-२०१६ मध्ये घटून ३९ हजार ५३ मेट्रिक टनावर आले आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांंत जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात तब्बल आठ हजार मेट्रिक टनाची घट झाली आहे. मत्स्योत्पादनात घट होण्याच्या प्रदूषणाखेरीजच्या अन्य कारणांमध्ये प्रजोत्पादनाच्या काळातच मासे पकडले जाणे, प्रजोत्पादनयोग्य होण्याआधीच मासे पकडले जाणे, तिवरांची कत्तल यासुद्धा प्रमुख बाबी आहेत. या बाबींकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 
    ३० टक्के माशांची युरोप, जपानसारख्या देशात निर्यात केली जात असली तरी मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणारा एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही. शीतगृह, मत्स्य प्रक्रिया केंद्र सुरू होऊ शकलेलं नाही. नाही म्हणायला केंद्र शासनाच्या साह्याने ७५ टक्के अनुदानावर जिल्ह्यातील करंजा येथे राज्यातील मच्छिमारांनी पकडलेली मासळी किनार्‍यावर उतरविणे, त्यांच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज, खरेदी विक्री व्यवहारासाठी निवारा व इतर मुलभूत सुविधासह एकाचवेळी सुमारे ८०० मासेमारी नौकांद्वारे २७ हजार मेट्रिक टन मत्स्यसंपदा उतरवू शकणारे अद्ययावत असे सुसज्ज मासेमारी बंदर उभारण्याचे शासनाने पाऊल उचलले. २ नोव्हेंबर २०१२ ला बंदराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हे बंदर २०१७ ला पूर्ण होणार होते. मात्र २०१७ साल उजाडले तरी ब्रेक वॉटर बंधारा वगळता इतर कामे अपूर्ण आहेत. ६८ कोटींचा हा प्रकल्प आता दोनशे कोटींच्या घरात गेला आहे आणि केंद्र शासनाने हात वर केले आहेत. त्याने प्रकल्पाला अर्थसाहाय्य करण्याचे सूत्र आता ५०-५० टक्के असे केले आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार आहे, देवेंद्र सरकारने राज्यातील पर्ससीन नेटचा प्रश्‍न आधीच सोडविला आहे. त्यामुळे करंजा बंदराचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागायला हरकत नाही. रायगड जिल्ह्यात मच्छिमारांसाठी एकही मोठे मासेमारी बंदर नसल्याने आजही बहुतांश  मच्छिमार हे व्यापारासाठी मुंबईतील ससून डॉकवर अवलंबून आहेत. करंजा येथे सुसज्ज मच्छिमारांसाठी बंदर झाल्यास मच्छिमारांना हक्काचे बंदर मिळेल. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन येथील बंदरेही सुसज्ज केली तर ती जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी फायद्याची ठरतील. पण त्यासाठी राजकीय आणि शासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
    शासनाचे ठोस मत्स्यधोरण नसल्याने जिल्ह्यातील मच्छिमारांसमोर अनंत अडचणी आहेत. सातत्याने होणारे हवामानातील बदल, वाढते औद्योगिकरण, आधुनिकतेचा ढळलेला समतोल आणि सरकारी उदासीनता याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना संकटाच्या खाईत ढकलले आहे. शेतीपाठोपाठ आता मासेमारी व्यवसायही धोक्यात आला आहे. सर्व मच्छिमार मग ते छोटे असोत की मोठे, त्यांनी या धोक्याला तोंड देताना सागरी परिसंस्थेचे संवर्धन, संरक्षण करणे ही ङ्गक्त पूर्वापार छोट्या प्रमाणात मासेमारी करणार्‍या मच्छिमारांची जबाबदारी नसून आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात मासेमारी करणार्‍या मत्स्य व्यावसायिकांची पण तितकीच जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अशा प्रकारची सांघिक जबाबदारी दाखवल्याखेरीज समुद्र वाचणार नाही. मासा जगला तर मच्छिमार जगेल, पण त्यासाठी मच्छिमारांकडून नैतिक जबाबदारीयुक्त वर्तन अपेक्षित आहे. तसेच सरकारकडूनही सागरी प्रदूषणाविरुद्धच्या नैतिक वर्तनाची अपेक्षा आहे. तसे झाले तरच समुद्र आणि मच्छिमार वाचेल. 


बुधवार, २६ जुलै, २०१७

समाजाला पर्यटन साक्षर करण्याची गरज

 -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


     रायगड जिल्ह्याला निसर्गाचा संपन्न असा वारसा असल्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढतो आहे. पावसाळा असो, हिवाळा असो, वा उन्हाळा असो, रायगड जिल्हा पर्यटकांनी बहरलेला असतो. जिल्ह्यात पर्यटन वाढतेय ही आनंदाची बाब आहे, परतु या आनंदाला पर्यटकांचा अतिउत्साह आणि जिल्हा प्रशासनाची पर्यटनविषयक अनास्था यामुळे अपघातांची काळी किनार लागत असल्याचे गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने दिसून येत आहे. या पंधरवड्यात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी निसर्गाची अती सलगी केल्यामुळे एकट्या कर्जत तालुक्यात ११ जणांचे बळी गेले आहेत. इतर तालुक्यांमधूनही दुर्घटनांमध्ये पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. गेल्या पंधरा महिन्यात जिल्ह्यामध्ये ३० पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे ही जिल्हा प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालून हा प्रश्‍न सुटणार नाही. या दुर्घटना थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुऱक्षिततेसाठी भक्कम पावले उचलली पाहिजेत, त्याबरोबरच जिल्हा प्रशासन आणि पर्यटनविषयक संस्था, तसेच विविध सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे समाजात पर्यटन साक्षरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
      रायगड जिल्हा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी विव्हळतोय, प्रवाशांची हाडं या खड्ड्यांमुळे खिळखिळी बनताहेत, या खड्ड्यांमुळे पर्यटकांना जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी काही मर्यादा पडत असल्या तरी येथील धबधबे, धरणे, तलाव, नद्या, समुद्र किनारे, डोंगरदर्‍या पर्यटकांसाठी आकर्षणकेंद्रे ठरत आहेत, त्यामुळे सगळ्या अडचणींवर मात करुन ते तिकडे धाव घेत आहेत. शनिवार, रविवारी तर अशा ठिकाणांना जत्रेचे स्वरुप येते. फरक इतकाच असतो की खर्‍या जत्रेत आकाशपाळणे, मेवामिठाईची दुकाने असतात, या पर्यटकांच्या जत्रेत ठाई ठाई निसर्गसौंदर्याची नवलाई असते. अशा निसर्गाचा मान राखत, मर्यादा राखत आस्वाद घेऊन, एक वेगळीच ऊर्जा रोमारोमात साठवून पर्यटक परतीची वाट चालतात. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वच पर्यटक या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेले नसतात. निसर्गातून त्यांना ऊर्जा नको असते, तर दारुतून त्यांना ऊर्जा पाहिजे असते, त्यामुळे दारु पिऊन बेभान होऊन तेथे धिंगाणा घालतात, दारुच्या बाटल्या फोडून तेथेच टाकून तेथील परिसराचा अक्षरश: उकिरडा बनवतात, जणू काही ही माणसं नाही, तर डुकरं आहेत असे त्यांचे वर्तन असते. त्या वर्तनाचा त्रास बहुसंख्य पर्यटकांना होतो. फुटलेल्या दारूच्या बाटल्यांनी जखमी होण्याच्या घटना सर्रास घडतात. हे बेवडे येथील शेतांत, समुद्र किनारी दारुच्या बाटल्या फोडून टाकून जातात, त्याचा त्रास शेतकर्‍यांना, शेतमजुरांना, समुद्रकिनारी फिरायला येणार्‍यांना अतोनाच त्रास होतो. बेवड्या पर्यटकांमुळे पर्यटन बदनाम होते, त्यात अतीउत्साही पर्यटकांनीही पर्यटन बदनाम होत आहे. समुद्र, नद्या, धबधबे, डोंगरदर्‍या यांच्याशी उतावीळपणे दंगामस्ती करू नये, याचे भान राखले जात नसल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात दुर्घटनांत पर्यटकांचे बळी जात आहेत. यातून पर्यटकांनीही धडा घेणे आवश्यक आहे, पण तसा तो घेतला जात नाही. 
      विविध वयोगटातील, स्तरातील पर्यटक पहायला मिळतात. काहीजण तर आपल्या पालकांना न सांगता पर्यटनासाठी येतात. महाविद्यालयीन, तसेच विविध कंपन्यांतील तरुण-तरुणी, समूहाने पावसाळी निसर्गाचा आनंद लुटाण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी येतात. तो परिसर त्यांना पूर्णपणे माहितीही नसतो. अशा परिस्थितीत तारुण्याच्या मस्तीत काही तरुण-तरुणी धोकादायक धबधब्याखाली स्नान करणे, नदीच्या-ओढ्याच्या प्रवाही पाण्यात उतरणे, समुद्राच्या पाण्यात खोलवर शिरणे, अशी दंगामस्ती करतात. गेल्या काही वर्षात वाहनांची मुबलकता झाल्यामुळे, पाच दहा जणांची टोळकी वाहनांतून पावसाळी सहलीचा आनंद लुटायसाठी येतात. भरधाव वेगाने वाहने चालवणे. डोंगरातल्या कड्याकपारीतून चालत जाणे, वाटा माहिती नसलेल्या जंगलात घुसणे, असे प्रकार नित्यनियमाने घडतात. पावसाळ्यात डोंगरवाटा निसरड्या झाल्यामुळे, पाय घसरून दरीत कोसळायचा धोका अधिक असतो. त्या परिसरातील लोकही अमक्या ठिकाणी जावू नका, ती वाट धरू नका, असे पर्यटकांना आवर्जून सांगतात. पण, त्यांचा सल्ला धुडकावून काही तरुण-तरुणी त्या बाजूला जातात आणि अपघातांचे बळी होतात. त्यामुळे या सर्वाचे खापर पूर्णपणे जिल्हा प्रशासनावर फोडणे योग्य होणार नाही, हेही खरे आहे.
      पर्यटकांनी आपण पर्यटनासाठी आलो आहोत, निसर्गात रममाण होण्यासाठी आलो आहोत, धिंगाणा घालण्यासाठी नाही, मर्यादांचे उल्लंघन करण्यासाठी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. पण धोक्याचा इशारा देणारेे फलक न वाचणे, वाचूनही धोक्याच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष करणे, स्थानिक नागरिकांचा सल्ला धुडकावणे असे प्रकार पर्यटक करतात आणि त्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. समुद्रस्नानाचा आनंद लुटू पाहणार्‍या पर्यटकाचा बुडून मृत्यू अशा आशयाच्या बातम्या पूर्वीच्या तुलनेत अधिक वाचायला मिळतात. समुद्र तोच आहे, तेच समुद्र किनारे आहेत. त्यांच्या मर्यादा पर्यटक ओलांडतात आणि समुद्राला दोष दिला जातो. अनेक ठिकाणी पर्यटक पिऊन समुद्रात उतरतात, किंवा समुद्रस्नान करताना पिण्याचा आनंद लुटतात. मोठ्याप्रमाणात पर्यटक तरुण आणि तरुणी असा एन्जॉय करताना सगळीकडे पाहायला मिळतात. समुद्राच्या भरती-ओहटीचा अभ्यास न करता खोलवर समुद्रात घुसल्यामुळेही पर्यटकांना आपल्या जीवास मुकावे लागते. काही ठिकाणी लाइफगार्ड ठेवण्यात आले असले तरी अशा घटना घडतातच. पर्यटकांनी आपली बेपर्वा वृत्तीही सोडली तर बर्‍याच दुर्घटनांवर अंकुश बसेल यात वाद नाही. स्थानिकांनीही पर्यटक आपले वैरी असल्यासारखे त्यांच्याशी वर्तन करु नये आणि पर्यटकांनीही स्थानिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. रायगडच्या महसुलात पर्यटनामुळे भर पडत आहे, अनेक व्यवसाय त्यामुळे भरभराटीस आले असून बेरोजगारांना रोजगाराच्या संधीही प्राप्त झाल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
    पर्यटन ही गोष्ट वाईट नाही, पर्यटन हे जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी, जीवनातील मरगळ घालवण्यास उपयोगी पडते. पर्यटनाचा उद्देशही तोच असावा, पण हा उद्देश विसरुन निसर्गाची छेडछाड केली जाते आणि येथूनच शोकांतिकेला सुरुवात होते. पर्यटन दारु पिण्यासाठी आणि धिंगाणा घालण्यासाठी असेल तर सुरक्षितता तरी कोण आणि कशी देईल? पर्यटकांनीही आपल्या सुरक्षेची काळजी घेतली तर ती त्यांच्याच हिताची आहे. मुळात रायगड जिल्ह्यात पर्यटनाकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. पर्यटनाच्या माध्यमातून रायगडचा विकास करता येणे शक्य आहे. पण सरकारची रायगडच्या विकासाबाबतची माध्यमे वेगळी आहेत. त्यात पर्यटन बसत नाही. औद्योगिकरण हेच जिल्ह्याचे भले करेल, मग भले रासायनिक कारखानदारीने येथील समुद्र, नद्या-नाले नासवले तरी चालेल ही तिची भावना आहे. भाताचं कोठार म्हणून ओळखला जात असतानचा संपूर्ण रायगड जिल्हा कृषीपर्यटनाचं केंद्र होतं. आता मात्र औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगडमध्ये कृषीपर्यटन असं असतं हे सांगावं लागत आहे. त्यासाठी अशी केंद्रे विकसित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील शेतीक्षेत्र प्रचंड प्रमाणात घटलं, उद्या तथाकथित विकासाच्या वाटेवर आजचा उरलासुरला निसर्गसंपन्न रायगड जिल्हा बेचिराख झाला, तर या जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्राचे काय होईल ही चिंताही मोठी आहे. रायगडच्या पर्यटनाला चिंतेचे वेगवेगळे कंगोरे आहेत. या कंगोर्‍यात आता गेल्या काही वर्षांपासून दुर्घटनांची वाढ झाली आहे. ही वाढ रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी पर्यटन साक्षरतेची मोहीम पर्यटन संस्था, सामाजिक संस्थाच्या सहकार्याने राबविली पाहिजे. ही मोहीम राज्यपातळीवरही राज्यशासनाने राबवून पर्यटनविषयक जागृती घडविली पाहिजे. कारण पर्यटन निरक्षरतेचा प्रश्‍न हा रायगडपुरताच मर्यादित नाही आणि पर्यटन साक्षरतेची मोहीम जिल्ह्याबाहेरही राबविला गेली तर निदान रायगडातच नव्हे तर इतर जिल्ह्यांतही पर्यटनसाक्षर पर्यटकांचा वावर सुरु होऊन दुर्घटनांचे प्रमाण कमी होईल आणि जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा यावर ताण पडणार नाही. 


मंगळवार, ११ जुलै, २०१७

पेण अर्बन बँक घोटाळ्याच्या ग्रहणाविरूद्ध सुरु आहे निकराचा संघर्ष

 -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


     ७५ वर्षांच्या इतिहासाची बिरुदावली मिरवणार्‍या रायगड जिल्ह्यातील पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या संचालकांनी २०१० साली ७५८ कोटी रुपयांच्या घोटाळा करुन रायगडमधील गोरगरिबांच्या आयुष्यभराच्या जमापुंजीला कुलूप लावलं. कुणी जमीन विकून आलेले पैसे बँकेत ठेवलेले, कुणी मुलीच्या लग्नासाठी, कुणी मुलाच्या शिक्षणासाठी, तर कुणी उतारवयात उपयोगी येतील म्हणून ठेवलेल्या सार्‍या पैशांची संचालकांनी खुद्द रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने लूट केली. अशाप्रकारे पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक ही गेल्या २० वर्षांत ठेवीदारांना बुडवणारी रायगड जिल्ह्यातली तिसरी सहकारी बँक ठरली. याआधी रोहा अष्टमी अर्बन बँक आणि गोरेगाव अर्बन बँकेच्या गैरव्यवहारापायी लाखो ठेवीदार कंगाल झाले. पेण अर्बन बँकेचे ठेवीदार-खातेदार मात्र या पेण अर्बन बँकेतील घोटाळेबाजांविरुद्ध संघटित झाले. त्यांनी आपल्या ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीद्वारेे गेली साडेसहा वर्षे लढा चालू ठेवला आहे. या त्यांच्या लढ्यामुळेच या बँकेचे भ्रष्ट अध्यक्ष शिशिर धारकर आणि त्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या गेल्या, आज ते जामिनावर बाहेर असले तरी सर्वसामान्यांनी संघटितपणे मनात आणले घोटाळेबाज राजकारण्यांना तुरुंगाचे गज दाखवू शकतो, हे दाखवून दिले. त्यानंतर आता ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीच्या अथक प्रयत्नांनी, संघर्षांनी लहान खातेदार-ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. त्याबद्दल या संघर्ष समितीचे, नरेंद्र जाधव, आ. धैर्यशील पाटील व त्यांच्या सहकार्‍यांचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे. 
       पेण अर्बन बँक ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीचे सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुरावा हा या बँकेच्या छोट्या-मोठ्या ठेवीदार-खातेदारांसाठी भरभक्कम आधार राहिला आहे. वास्तविक त्यांनी स्वत: संघटित होऊन स्वत:ला आधार दिला आहे. पेण अर्बन बँक अवसायनात काढण्याचा आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी २९ एप्रिल २०१४ रोजी पारित केलेला आदेश राज्याचे तत्कालिन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रद्द केल्यामुळे आणि पेण अर्बन बँक ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे नियमित कर्जदारांच्या कर्जाच्या वसुलीतून २०१५ ला १२ हजार ५८३ ठेवीदारांना त्यांच्या काही हजारांच्या ठेवी परत मिळाल्या असल्या, तसेच २०१७ या चालू वर्षांत  १८ हजार ठेवीदारांना त्यांच्या काही हजारांच्या ठेवी परत मिळणार असल्या तरी लाखो ठेवीदार-खातेदारांचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही. त्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागतो आहे. ठेवीदार संघर्ष समिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायर्‍या झिजवून प्रशासनाला सतत जागे ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. उपोषण, मोर्चे, लॉगमार्च, मंत्र्यांना निवेदने, इतके करुनही तत्कालिन आणि विद्यमान राज्यशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासिन भूमिकेने आजही त्यांना अथक संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष केला नसता तर आज जी काही रक्कम सर्वसामान्य ठेवीदारांना-खातेदारांना मिळते आहे, तीही मिळाली नसती, हे भयानक वास्तव आहे.
       २३ सप्टेंबर २०१० चा दिवस पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या १८ शाखांतील १,९२,००० लाख खातेदार व ठेवीदारांच्या जीवनातील काळाकुट्ट दिवस ठरला. रिझर्व्ह बँकेने नोटीस पाठवून बँकेचे व्यवहार अचानक ठप्प करुन टाकले. कारण या बँकेच्या अध्यक्षाने, संचालक मंडळाने स्वत: पैशांची चंगळ करुन बँक कंगाल करुन टाकली होती. पेण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने ही बँक जणू काही आपलीच खासगी मालमत्ता आहे, अशा रीतीने कर्जवाटप केले होते. त्यासाठी खोटे दस्तऐवज तयार केले गेले, अस्तित्वात नसलेल्या कर्जदारांना कर्ज दिली गेली, कर्जदार असणार्‍या व्यक्तीला दुसर्‍या कर्ज प्रकरणात जामीनदार दिले गेले. अशाप्रकारे अनेक नियम धाब्यावर बसवून कोट्यवधी रुपयांची कर्जे वितरित केली गेली. हा सर्व आर्थिक घोटाळा सुमारे ७५८ कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी १२८ बनावट कर्जप्रकरणे केली गेली. या आर्थिक घोटाळ्याला २०००-०१ साली सुरुवात झाली होती. असे असूनही सरकारी ऑडिटर्सनी आपल्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये बँकेला सातत्याने ‘अ’ वर्ग दर्जा दिला होता. रिझर्व्ह बँकेनेही पेण अर्बन बँकेला २००९ अखेर पर्यंत दुसरा वर्ग दिला होता. याचा अर्थ रिझर्व्ह बँकही पेण अर्बन बँकेबाबत उदार होती. या बँकेचा कारभार व्यवस्थित चालला आहे, असे स्पष्ट चित्र दिसत असल्यामुळे खातेदार आणि ठेवीदारांना अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या घोटाळ्याची शंका येण्याचे कारणच नव्हते. पण शंका नसलेलेच घडले आणि ते घडणाच होते, परंतु त्याने सहकारासमोरच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले.
       रिझर्व्ह बँकेने पेण अर्बन बँकेच्या आर्थिक व्यवहारावर २३ सप्टेंबर २०१० रोजी निर्बंध घातले. ७ ऑक्टोबर २०१० ला पेण बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. प्रशासकांनी १२८ बोगस कर्जदारांची यादी जाहीर केली. ताबडतोब ८ ऑक्टोबर २०१० ला  ठेवीदार-खातेदारांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आणि आपले पैसे परत मिळावेत यासाठी लढा सुरू झाला. १४ ऑक्टोबर २०१० ला सर्व राजकीय पक्षांनी ‘रायगड बंद’ आंदोलन केले. २० मार्च २०११ रोजी पेण अर्बन बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी संघर्ष समितीने आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर २१ मार्च २०११ रोजी बँकेचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी व लेखा परीक्षक यांच्याविरुद्ध ङ्गौजदारी गुन्हा दाखल केला. २५ मार्च २०११ ला वडगाव येथील रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकून १४ संचालकांना अटक केली. ३० मार्च २०११ ला  ऍलन धारकर आणि संतोष श्रृंगारपुरे यांच्यासह १० संचालकांना आणि कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली. २ एप्रिल २०११ ला बँकेचे अध्यक्ष शिशिर धारकर आणि बँकेचे मुख्याधिकारी पुरुषोत्तम जोशी यांना मुंबईतून अटक करण्यात आली. त्यानंतर २८ एप्रिल २०११ ला ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २८ सप्टेंबर २०११ ला ऑडिटर जैथवार यांना अटक करण्यात आली. पण १९ ऑक्टोंबर २०११ ला शिशिर धारकर यांना जामीन मंजूर झाला. असा हा वेगवान घटनाक्रम दिसत असला तरी त्यासाठी ठेवीदार-खातेदार यांनी प्रंचड संघर्ष करावा लागला. प्रदीर्घ लढ्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बँकेच्या नियमित कर्जदाराच्या कर्जवसुलीतून सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ या काळात रु.१०,०००/- पर्यंत ठेवी असणार्‍या १२ हजार ५८३ ठेवीदारांना ४ कोटी ६८ लाख २५ हजार रुपये परत करण्यात आले. त्यामुळे काही ठेवीदारांना दिलासा मिळाला, पण असंख्य ठेवीदार न्यायापासून वंचित होते आणि आहेत, ही बाब लक्षात घेता ठेवीदार संघर्ष समितीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील २८ एप्रिल २०१७ रोजीच्या सुनावणीच्या वेळी २५ हजार रुपये मुद्दल जमा असलेल्या ठेवीदारांना रक्कम वाटप करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार ही प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जवळपास १८ हजार खातेदारांना २७ कोटी २५ हजार रुपये इतकी रक्कम मिळू शकणार आहे. ही रक्कम नियमित कर्जदारांच्या कर्जाच्या ५७ कोटीच्या वसुलीतून दिली जाणार असली तरी तत्कालिन आणि विद्यमान राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे १२८ बोगस कर्जखात्यातील ७५८ कोटी रुपयांची वसुली झालेली नाही. ती होण्याबाबत न्यायालयाच्या निर्णयानंतरही वेगवान पावले उचलली जात नाही, त्यामुळे न्याय अजून दृष्टीक्षेपात आला आहे, असे म्हणता येणार नाही.
       १२८ बोगस कर्ज खात्यांद्वारे ७५८ कोटी रुपयांची लूट करून दोन लाख ठेवीदार-खातेदारांना रस्त्यावर आणणार्‍या अध्यक्ष, संचालक, अधिकारी, पदाधिकारी, ऑडिटर या सर्व महाघोटाळेबाजांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया चालू आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे संबंधित मालमत्तांची विक्री वा लिलाव करून ठेवीदारांना त्यांंच्या ठेवी परत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्याच आदेशान्वये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली पेण अर्बन बँक विशेष कृती समिती स्थापन करण्यात आली. पण जिल्हाधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे तपास आणि जप्तीची कार्यवाही अतिशय संथ गतीने सुरु आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनेकवेळा तपासाच्या प्रगतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून अनेक निर्देश दिले आहेत. वास्तविक पनवेल नैना प्रकल्पामधील पेण अर्बन बँकेच्या ३९ मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण केली तर ५८१ कोटी बँकेत जमा होतील. या मालमत्तांच्या विक्रीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता देखील दिली आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाने या मालमत्तांवरील अंमलबजावणी संचालनालयाचे बोजे उतरवण्याचे आदेश ७ ऑक्टोबर २०१६ रोजी दिले आहेत. अशा परिस्थितीत या मालमत्ताची विक्री करून पैसे बँकेत जमा करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देणे शक्य आहे, परंतु ही कार्यवाहीच करण्यात येत नाही, यात कसले पाणी मुरते आहे, हा मोठा प्रश्‍न आहे. विद्यमान राज्यशासन एकेबाजूला सकारात्मक दिसत असले तरी दुसर्‍याबाजूला कृती अतिशय संथ आहे, त्यामुळे ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीला अजूनही संघर्षाशिवाय पर्याय नाही. यांचा संघर्ष अहिंसक आहे, न्यायालयीन लढाई आणि उपोषण, आंदोलने यावर आधारित आहे. त्यांच्यामध्ये राजकीय फूट पाडण्याचेही प्रयत्न झाले आहेत. पण या सर्वांना ही संघर्ष समिती पुरुन उरली आहे. ही संघर्ष समितीच पेण अर्बन बँकेच्या लाखो ठेवीदार-खातेदारांना न्याय देणार आहे, यात शंका नाही.