-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
समुद्रातील शिंपल्यात जो नैसर्गिक मोती बनतो, तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो, पण डोळ्यात जो नैसर्गिक मोती बनतो, म्हणजेच जो मोतीबिंदू बनतो, तो कोणालाही नकोनकोसाच असतो. या मोतीबिंदूचा प्रश्न आपल्या देशालाच नाही, तर सार्या जगाला भेडसावत आहे. रायगड जिल्ह्यात याच मोतीबिंदूविरोधात अलिबागच्या लायन्स हेल्थ फाऊंडेशनने लढा उभारला आहे. तीन वर्षांत जिल्ह्यातून मोतीबिंदू हद्दपार करण्यासाठी चोंढी येथे लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने अद्ययावत मोतीबिंदू शस्त्रक्रिया हॉस्पिटलही उघडण्यात आले असून तेथे सोमवार, १२ सप्टेंबर २०१६ पासून तेथे मोतीबिंदू रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऑपरेशनस् सुरु झाली आहेत, हे रायगड जिल्ह्यासाठी शुभवर्तमान आहे.
देहदान, अवयवदान, नेत्रदान करण्यासाठी सामाजिक भान आणि सिंहाची छाती लागते. समाजात या कार्याची चळवळ सुरु आहे. हे काम समाजात सुरु असतानाच अलिबाग तालुक्यातील अलिबाग, मांडवा, पोयनाड, चौल-रेवदंडा, तसेच मुंबईतील लायन्स क्लब ऑफ चेंबुर डायमंड हे पाच लायन्स क्लब रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचा ध्यास घेतात, त्यासाठी लायन हेल्थ फाऊंडेशन स्थापन करतात आणि त्याच्या माध्यमातून एक अद्ययावत मोतीबिंदू शस्त्रक्रिया हॉस्पिटल उघडतात, हे सारे स्वप्नवत आहे. पण हेच वास्तव आहे. हे काम तळमळ आणि खरोखरच लायन असल्याशिवाय होत नाही. ही तळमळ आणि तन-मन-धनाने झपाटून काम करण्याची समर्पण वृत्ती या मोहिमेचे नेतृत्व करणारे लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव आणि उपाध्यक्ष, तसेच लायन्स क्लबचे रिजन पर्सन नितीन अधिकारी यांच्यामध्ये प्रकर्षाने पाहायला मिळते. डॉ. अनिल जाधव यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या अफाट माणसाने आपल्या सहकार्यांच्या सहाय्याने रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचे मनावर घेतले आणि त्यासाठी स्वत:ला पूर्णवेळ वाहून घेतले. हा प्रकल्प उभारण्यासाठी योग्य जागा उपलब्ध न झाल्यामुळे स्वत:ची जागा या प्रकल्पासाठी वापरासाठी दिली. या जागेतील आपल्या तीन भव्य वास्तू तीन वर्षांकरिता मोतीबिंदू शस्त्रक्रिया हॉस्पिटलसाठी दिल्या. त्याच तीन वास्तूंत अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग, आंतररुग्ण विभाग आणि बाह्यरुग्ण विभाग असे सुसज्ज विभाग तयार करण्यात आले आहेत. हा प्रकल्प तीन वर्षांसाठीच आहे. यासाठी डॉ. अनिल जाधव यांच्यासहीत उपाध्यक्ष नितीन अधिकारी आणि त्यांच्या सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले आहे. चोरोंडे येथील नितीन अधिकारी हे उद्योजक आहेत, पण त्यांनी आपल्या उद्योगापेक्षा लायन्स क्लब आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशनला झुकते माप दिले. ही जिंदादीली सर्वांनाच दाखवता येत नाही, पण ती नितीन अधिकारी यांनी दाखवली आहे.
रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी लायन्स फाऊंडेशन, अलिबागला लायन्स इंटरनॅशनल, अमेरिकेतील हेल्प मी सी, हाजी बच्चुअली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या सेवाभावी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या मोतीबिंदुविरोधात उभालेल्या लढ्याचा पहिला टप्पा गुरुवार, १० डिसेंबर २०१५ रोजी सुरु झाला होता. या टप्प्याचा प्रारंभ रायगडच्या जिल्ह्याधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आला होता. तर ९ ऑगस्ट २०१६ रोजी, क्रांती दिनी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य ऍड. आस्वाद पाटील व लायन्स क्लबचे डिस्ट्रीक गव्हर्नर सुभाष भलवार यांच्या हस्ते शस्त्रक्रिया कक्ष, आंतररुग्ण कक्ष आणि बाह्यरुग्ण कक्षाचे उद्घाटन करुन मोतीबिंदूविरुद्धच्या लढ्याचा दुसरा टप्पा गाठण्यात आला. आता तिसरा आणि अंतिम टप्पा सोमवार,१२ सप्टेंबरपासून सुरु झाला असून तो पुढील तीन वर्षे सुरु असणार आहे. या तीन वर्षांत २० ते २५ हजार मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन रायगड मोतीबिंदुमुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोतीबिंदू रुग्ण शोधण्यासाठी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच आरोग्य सेविका आशा व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी संगणकीय उपकरणे पुरविण्यात येणार आहेत. या मोतीबिंदू रुग्णांच्या डोळ्यांवर मोफत आंतरराष्ट्रीय दर्जाची शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहे. तसेच मोफत जेवणाची सोय करण्यात येणार आहे. या रुग्णालयात २४ तास सेवा मिळणार असल्यामुळे या सेवेपासून कोणताही मोतीबिंदूरुग्ण वंचित राहणार नाही.
मांडवा, पोयनाड, चौल-रेवदंडा हे अलिबाग लायन्स क्लबशी संलग्नीत लायन्स क्लब आपल्या केंद्रीय लायन्स क्लबच्या बरोबरीने सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. या क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. अलिबाग लायन्स महोत्सव, किहीम-मांडवा लायन्स महोत्सव, नेत्रचिकित्सा-मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, मोफत चष्मेवाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे व मोफत औषध वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता मोहिमा, योगशिबीर, प्लास्टिक सर्जरी शिबीर अशा अनेक उपक्रमांनी या चारही लायन्स क्लबचा दबदबा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचे पुढचे पाऊल उचलले आहे. यासाठी त्यांच्या पाठिमागे लायन्स इंटरनॅशनल, महाराष्ट्रातील, देशातील लायन्स क्लब भक्कमपणे उभे आहेत. अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे रायगडकर जनतेच्या आरोग्याबाबतचे अनेक संकल्प आहेत, त्यांच्याकडे अनेक योजना आहेत. त्या योजना साकार झाल्या तर अपुर्या आरोग्यसेवेमुळे ज्या समस्या उभ्या राहतात, त्या समस्या दूर होतील.
लायन हेल्थ फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल जाधव, उपाध्यक्ष व लायन्स क्लबचे रिजन चेअरपर्सन नितीन अधिकारी, सुकाणू समितीचे प्रवीण सरनाईक, अनिल म्हात्रे, झोन चेअरपर्सन राहुल प्रधान, अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष नयन कवळे, मांडवा लायन्स क्लबचे अध्यक्ष अमीष शिरगावकर, पोयनाड लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गाटे, चौल-रेवदंडा लायन्स क्लबचे अध्यक्ष निलेश खोत, या चारही लायन्स क्लबचे पदाधिकारी रमेश धनावडे, अभिजित पाटील, महेंद्र पाटील, सुबोध राऊत, सतीश पाटील, मानसी चेऊलकर, जगदीश सावंत, अरविंद अग्रवाल, अरविंद घरत, ऍड. शिरीष लेले, प्रदीप सिनकर आणि इतर लायन्सच्या शेकडो सदस्यांनी हा जो रायगडातील मोतीबिंदूविरुद्ध लढा पुकारला आहे, त्या लढ्यामुळे रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त होणार आहे, ही बाब या जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा