-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
रायगड जिल्हा हा इतिहास, भूगोल आणि सृष्टीसौंदर्य यांनी संपन्न असा जिल्हा आहे. या जिल्ह्याला अनेक ऐतिसिक-पौराणिक मंदिरे लाभली आहेत. अष्टविनायकातील पालीचे बल्लाळेश्वर मंदिर तर जगप्रसिद्ध आहे. या मंदिराचे कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग न होताही भाविकांच्या ह्रदयात त्याचे अढळस्थान आहे. साळाव येथे बिर्ला उद्योग समुहाने बांधलेले विक्रम विनायक मंदिर मात्र भांडवलदारांच्या उत्कृष्ट मार्केटिंगचे उदाहरण आहे, म्हणूनच मुरुडच्या ऐतिहासिक मंदिरांकडे पाठ फिरवून भाविक-पर्यटक या मंदिराला भेट देतात आणि आणि तेथील जाचक नियमांनाही तोंड देतात. बिर्ला उद्योग समूहाची विक्रम इस्पात कंपनी वेलस्पन मॅक्सस्टीलकडे हस्तांतरित झाल्यानंतरही साळावला विघ्नहर्त्याच्या नावावर दिशाभूल सुरुच आहे.
मुरुड तालुक्यातील साळाव येथे बिर्ला उद्योग समुहाने १९८८ साली स्थापन केलेल्या विक्रम इस्पात कंपनीने तेथे स्पॉज आर्यन उत्पादन सुरु केले. बिर्ला समुहाच्या या कंपनीने या ठिकाणी टेकडीवर सुंदर देऊळ बांधलं, पण ते स्व. आदित्य बिर्ला यांच्या स्मरणार्थ आणि तिथेच बागेत त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. या भागातील गरीब, देवभोळ्या कोळी समाजाचं लक्ष या मंदिराच्या कळसाकडे आकर्षित करुन कंपनीने साळाव खाडीत आपले पाय कधी घट्ट केले हे कोळी बांधवांना कळलेच नाही. २००७ साली हे कळले तेव्हा त्यांना निदर्शनं करावी लागली आणि पोलिसांच्या अमानुष दंडुकेशाहीला त्यांना सामोरं जावं लागलं. हा स्वतंत्र इतिहास आहे, तो प्रसंगोपात स्वतंत्रपणे हाताळता येईल. विक्रम इस्पात नंतर वेलस्पन मॅक्सस्टील कंपनीकडे हस्तांतरीत झाली. आताही परिस्थिती तीच आहे. विकासाच्या नावावर खाडी प्रदूषित करुन कोळीबांधवाना उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र सुरुच आहे. वेलस्पन मॅक्सस्टील कंपनीच्या विस्तार प्रकल्पाअंतर्गत स्वत:साठी आवश्यक ३३० मेगावॅट क्षमचेच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पास शासनाने २०११ साली मान्यता दिल्याने साळावच्या कोळीबांधवांवर मोठे संकट कोसळले आहे.
बिर्ला समुहाच्या विक्रम इस्पात या तत्कालिन कंपनीने तेथील टेकडीवर विक्रम विनायक मंदिर बांधले आहे. पांढर्याशुभ्र संगमरवरातून साकारण्यात आलेला मंदिराचा भव्य कळस दूरनही नजरेस पडतो. टेकडीवर मंदिराच्या संभोवताली नयनरम्य बगीच्या असून त्यातील फुलझाडे, रंगीत कारंजी मन आकर्षित करतात. बागेचा परिसर व मंदिर यांत मोठ्याप्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हे मंदिर काही ऐतिहासिक नाही, तसेच वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे, असेही नाही. तरीही या मंदिराला प्रचंड प्रसिद्धी दिली गेल्यामुळे अलिबाग-चौल-रेवदंडा, मुरुडमधील ऐतिहासिक व वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या मंदिरांकडे पाठ करुन पर्यटक व भाविक साळावचे विक्रम विनायक मंदिर पाहण्यास वेळ काढतात. जमाना मार्केटिंगचा आहे. या मंदिराच्या प्रसिद्धीचे मार्केटिंग पद्धतशीर केले गेले आहे. त्यामुळे बिर्ला मंदिर हे नावही लोकांच्या जीभेवर रुळले आहे आणि रुजले आहे. गणेशाचे दर्शन घेतल्यावर आपोआपच बागेकडे पाय वळतात आणि तेथे स्व. आदित्य बिर्ला यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन होते. मुळात या भूमीशी स्व. आदित्य बिर्ला यांचा काही संबध नाही. त्यामुळे हा पुतळा येथे अप्रस्तुत आहे. सामान्य पर्यटक आणि आणि भाविकांच्या विनायक मंदिराची त्यांना बुटी दिल्यामुळे हे लक्षात येत नाही. बिर्ला उद्योग समूहाने दिल्ली, हैदराबाद येथेही अशीच मंदिरे उभारली आहेत. त्यांना बिर्ला मंदिर म्हणूनच ओळखले जाते. त्या देवतेच्या नावाने ती ओळखली जातच नाहीत. देवळा आडून स्वत:च्या घराण्याचे नाव जागते ठेवणे यात बिर्ला उद्योग समुह यशस्वी ठरला आहे. इतकेच नव्हे तर आपण धार्मिक कार्यात विशिष्ठ रक्कम खर्च करतो हेही त्यांनी समाजमनावर ठसवले आहे. खरेतर या भागातील ऐतिहासिक मंदिरांची दूरवस्था झाली आहे. त्यांच्या जीर्णोद्धारासाठी बिर्ला उद्योगसमुह खर्च करु शकला असता, तेवढी त्यांची ताकद आहे, परंतु या ऐतिहासिक मंदिरांना बिर्ला मंदिर म्हणून नामानिधान मिळाले नसते, याचमुळे दातृत्वात त्यांनी हात आखडले घेतले. स्वार्थाविण प्रिती नाही हे त्यांनी दाखवून दिले.
स्वत:चे नाव आणि उद्योग चालवायला स्वनिर्मित मंदिरांचा आसरा घेऊन बिर्ला समूह समाजाला मूर्ख बनवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गडकिल्ले दुरुस्त केले, तर अनेक गडकिल्ले नव्याने बांधले, पण कुठेही स्वत:च्या नावाची पाटी लावली नाही की त्या गडकिल्ल्यावर आपल्या पूर्वजांचे किंवा स्वत:चे पुतळे उभारले नाहीत. तरीही हे सर्व गडकिल्ले पाहिले, त्यांचा विषय निघाला की छत्रपती शिवाजी महाराज आठवण येतेच. बिर्ला यांनी चांगले काम केले तर त्यांचीही आठवण सदैव राहील, त्यासाठी आपण बांधलेल्या मंदिरांना ओेढूनताणून बिर्ला मंदिर या नावाची प्रसिद्धी करण्याची गरज नव्हती की स्व. आदित्य बिर्ला यांचा पुतळा उभारण्याची गरज नव्हती. तथापि, स्व. आदित्य बिर्ला यांच्या शिल्पप्रतिमेचे आम्ही कौतुक करतो. ज्यांनी त्या पुतळ्याची रचना केली आहे, त्या कलाकाराचे हात खरोखरच थोर. पुतळा अगदी जीवंत भासतो. पुतळ्याला मेघडंबरी आहे. राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन मेघडंबरीविना पुतळे उभारुन त्यांना कावळ्यांच्या हवाली करणार्यांनी बिर्ला उद्योग समुहाचा हा आदर्श घ्यायला हवा. असो. ही मंदिर आणि पुतळा असलेली टेकडी बिर्ला उद्योग समुहाची खाजगी मालमत्ता आहे. ही टेकडी बिर्ला उद्योग समुहाला कशी मिळाली, हा संशोधनाचा भाग आहे. आमच्या आदिवासी बांधवांना चतकोर जागेसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो, पण भांडवलदारांना मंदिराच्या नावावर स्वत:चे पुतळे उभारायला टेकड्याही सहज उपलब्ध होतात. सर्व नियमात असेल नसेल, पण वस्तुस्थिती अशी आहे. या मंदिरातील देवतांची गम्मत आहे. श्रीगणेशाबाबत समजू शकतो, परंतु वैरागी असलेल्या असलेल्या श्रीशंकराला अलंकारांनी असा मढवला आहे की पर्यटक आणि भाविक त्याला ओळखूच शकत नाहीत. देवांना अलंकारांच्या झगमगाटात लपवण्यापूर्वी त्या देवाचे महात्म्य लक्षात घेणे आवश्यक असते, पण तसे ते बिर्ला उद्योग समुहाला लक्षात घेण्याची गरज वाटली नाही किंवा आयात करण्यात आलेल्या पुजार्यांनी ते महात्म्य सांगण्याचे कष्ट घेतले नाहीत. पगाराशी इमानी राहून देवांशी बेईमानी केलेली त्यांना चालत असावी.
या मंदिराकडे येण्यासाठी व्हीआयपींना स्वतंत्र गाडीमार्ग आहे आणि सर्वसामान्यांना पायर्यांचा मार्ग आहे. देवासमोर कसले व्हीआयपी? त्यांना चार पावले चालवत नाही? ते अपंग नाहीत, तरी त्यांच्यासाठी अपंगांकरिता असतो तसा थेट गाडीरस्ता आणि खर्या अपंगांना मात्र काहीही सवलत नाही. काय म्हणावे याला? बिर्ला उद्योग समुहाचे डोके ठिकाणावर आहे काय? मोबाईल फोन आणि कॅमेर्यांना तिथे बंदी घालण्यात आलेली आहे. या बंदीची तेथील सुरक्षा रक्षक काटेकोर अंमलबाजावणी करतात. त्यांचे काम ते करतात. परंतु ही बंदी घालून काय साध्य झाले आहे, असा प्रश्न पडतो. दिवेआगरचा सोन्याचा गणपती सीसीटीव्ही असतानाही चोरीस गेला, येथे तर देव किंवा आदित्य बिर्ला यांचा पुतळा कोणी कॅमेर्यात अथवा मोबाईलमध्ये घालून चोरुन नेण्याची शक्यता नाही. येथील छायाचित्र काढल्यास त्यांचा दूरपयोगही होऊ शकत नाही, तरीही ही बंदी आहे. अलिबाग-मुरुड पर्यटनाच्या नकाशावरील महत्वाचे केंद्र आहे. अशा ठिकाणी टेकडीवर विकसित केलेल्या बागेत आपली व परिसराची छायाचित्रे काढून, आपली तेथील भेट संस्मरणीय करण्याच्या पर्यटक व भाविकांच्या हेतूकडे गलिच्छ नजरेने पाहून त्यांच्यावर बंदी घालणे ही बिर्ला उद्योग समुहाची हुकुमशाही आहे. त्यामुळे बिर्ला उद्योग समुह व मंदिर प्रशासनाबद्दल पर्यटक व भाविकांमध्ये असंतोष आहे. कोणी म्हणेल ही बिर्ला उद्योग समुहाची खाजगी मालमत्ता आहे. काय करावे, काय करु नये हा त्यांचा अधिकार आहे. निश्चितच त्याचा तो अधिकार आहे. मग त्याच अधिकारात त्यांनी हे मंदिर व बगीचा भाविक-पर्यटकांकरिता बंद करुन आपले खाजगीपण जपावे, पण भाविक-पर्यटकांचा अवमान करु नये. आणि या भूमीत आपण उपरे आहोत हे बिर्ला उद्योग समुहाच्या धुरिणांनी लक्षात घ्यावे आणि आपला हट्ट सोडावा व सरळ व्हावे. वेलस्पननेही हे लक्षात घ्यावे की या भूमीकडे ‘सब भूमी गोपालकी’ या भावनेने बघू नये, ही भूमी येथील कोळीबांधवांची, येथील विविध समाजातील भूमीपुत्रांची आहे. इतकेच.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा