मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

मराठा मोर्चाने रायगडातही होतेय क्रांती!

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


    रायगड जिल्हा व नवी मुंबईतील मराठा समाजाचा मराठा क्रांती (मूक) मोर्चा आपल्या मोजक्या मागण्यांसाठी २१ सप्टेंबर रोजी खारघर येथून कोकणभवनवर थडकणार आहे. यापूर्वी उस्मानाबाद, जळगाव, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, सांगली, लातूर, जालना, अकोला, फलटण, गुहागर येथेही हे मोर्चे लाखोंच्या संख्येने निघाले होते. या मोर्चांनी समाजात कोणतेही अराजक पसरले नाही, कोणत्याही राष्ट्रीय प्रतिकांना लाथाडले नाही की लुटालूट, झुंडगिरी, गुंडगिरी केली नाही. या मोर्चांनी शिस्तीचा आदर्श घालून दिला. मोर्चाच्या नावावर आतापर्यंत छुपे जातीचे-धर्माचे मोर्चे निघाले आहेत, पण मराठा समाजाचा मोर्चा जातीच्या नावावर निघत आहे. निदान मराठा समाज ताकाला जाऊन भांड लपवण्याचा प्रयत्न करीत नाही, हे कौतुकास्पद आहे. मराठा समाजाच्या मोर्चानंतर जातीय तणाव वाढेल, असा ज्यांना साक्षात्कार झालाय, त्यांनी छुपे जातीय मोर्चे काढले नाहीत काय? किंबहुना हीच मंडळी जातीय तणाव वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, या मोर्चाला उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चाची तयारी करीत आहेत. मुळात मराठा समाज या मोर्चांतून व्यक्त होत असला, तरी त्यांच्या मागण्या बहुजनांच्या फायद्याच्याच आहेत. त्यामुळे हा मोर्चा बहुजनांचे प्रतिनिधीत्व करणारा आहे, तो एकप्रकारे महाराष्ट्र धर्म वाढवतोय, असे म्हटले तर त्यात काहीही अयोग्य नाही.
     कोपर्डी घटनेसह महिलांवर बलात्कार करणार्‍या नराधमांना तात्काळ ङ्गाशी द्या, ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती करा,  मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण त्वरीत लागू करा, तसेच आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इबीसी उत्पन्न मर्यादा ६ लाख करा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती व शेतीमाल उत्पादन खर्चाव आधारित कायद्याने हमी बाजारभाव मिळावा, या मागण्यांसाठी रायगड जिल्हा व नवी मुंबईतील मराठा समाजाचा मराठा क्रांती (ंमूक) मोर्चा ज्यांनी गेली ६०-७० वर्षे मराठा समाजाची उपेक्षा केली त्या राजकीय-सामाजिक मराठा नेत्यांच्या नाकावर टिच्चून कोकणभवनवर निघत आहे. मराठा क्रांती (मूक) मोर्चा या नावाने निघणारा हा मोर्चा ब्राह्मण द्वेष अथवा मुस्लीम द्वेष, नवबौद्ध द्वेष अथवा इतर जाती-धर्माचा द्वेष पसरविण्यासाठी नाही, असे या आधी उस्मानाबाद, जळगाव, परभणी, बीड, हिंगोली येथे आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाने आधीच सिद्ध केले आहे. या मोर्चाद्वारे मराठा समाजाने महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार काढून घ्या अशी मागणी करुन ब्राह्मण द्वेष केलेला नाही, कारण छत्रपती शिवरायांनी आपले अष्टप्रधान मंडळ नेमले ते ब्राह्मणांचे होते. शिवरायांच्या लष्करात मराठ्या-मावळ्यांबरोबर मुस्लीमही होते. महार, मांग, चांभार, कुंभार, माळी, साळी, आगरी, कोळी, धनगर, सुतार, न्हावी, लोहार, ब्राह्मण, सारस्वत, बारा आलूते-बलूतेदार, बारा मावळ, सर्व जाती, धर्म, पंथ, वंश शिवरायांच्या मराठा या एका छत्राखाली हिंदवी स्वराज्यासाठी लढत होते. शिवरायांची जशी विशाल दृष्टी होती तशीच ती या मोर्चेकर्‍यांची असल्याची जाणवते. मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारावर चालतो, तो औरंगझेब अथवा अफजलखान यांच्या विचारावर चालत नाही की त्यांच्या थडग्यांचे उदात्तीकरण करत नाही. शत्रूच्या छातीत धडकी भरविण्यासाठी थडगी बांधून मित्रांशी सलगी देणार्‍या शिवरायांचा मराठा समाज आहे, हा जो मराठा क्रांती मोर्चाचा विचार आहे, तो खरोखरच प्रामाणिक असल्याचे जाणवते. उस्मानाबाद, जळगाव, परभणी, बीड, हगोली, नांदेड, सांगली, लातूर, जालना, अकोला, फलटण, गुहागर येथील या मोर्चांची भव्यता आणि शिस्त पाहून काहीजणांना पोटशूळ उठला आहे आणि या मोर्चाबद्दल त्यांनी संभ्रम पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जातीतील माणूस मराठा आहे, असा युक्तीवाद संभ्रम पसरविण्यासाठी केला जातो आहे. महाराष्ट्रात राहतो, जो मराठी बोलतो, तो मराठा अशी सरधोपट मराठ्याची व्याख्या केली जाते, ती चुकीची नाही. पण मराठा ही एक जात आहे हेही विसरुन चालणार नाही. त्या जातीच्या काही मागण्या असतील तर अनेक प्रकारच्या लोकशाही मार्गाने त्या मागण्या शासनासमोर मांडण्याचा त्यांना हक्क आहे आणि तीच बाब काही पोटशुळी प्रवृत्ती नाकारत आहे, पण ही वृत्ती म्हणजे सरकार नाही की लोकशाही नाही. त्यामुळे या वृत्तीचा धिक्कारच झाला पाहिजे.
       जात आणि धर्म हे आजच्या काळातील एक खूळच आहे, पण कायद्याने ते या देशातील जनतेच्या मानगुटीवर बसले आहे. शाळा, कॉलेज, नोकरीत जात दाखवावीच लागते. जात दाखवा आणि फायदे मिळवा किंवा सोडा असा प्रकार आहे. जातीमुळे फायदा होतो याची जाणीव झालेल्यांनी मागास जातीत जाऊन फायदे लाटायला कमी केलेले नाही. जात कोणती आहे हे पाहिले जात असल्याने गुणवत्ता, बुद्धिमत्ता ही बाजुला पडली. त्यामुळे त्यातील उच्च दर्जाची गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता परदेशाकडे सातत्याने वळत आली आहे. जाती ऐवजी आर्थिक निकषावर आरक्षणे असती तर गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता इतक्या मोठ्याप्रमाणात परदेशात वळली नसती. आरक्षणाला विरोध असायला कारण नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विशिष्ठ कालावधीसाठी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. पण या आरक्षणाचा फायदा ज्यांना आरक्षण मिळतेय, त्याच कुटुंबाने परंपरेने घेतला. त्यांच्या समाजातील उर्वरित होतकरु तरुणांना त्याचा फायदा झाला नाही, त्यामुळे या समाजाची दूरवस्था संपलीच नाही. उलट या दरम्यान दुसरीच समस्या मोठ्याप्रणात निर्माण झाली. एका विशिष्ठ वर्गाकडे पैसा केंद्रीत झाला आणि बहुसंख्य वर्ग कफल्लक राहिला. एक वेगळी आर्थिक दरी निर्माण झाली. त्यामुळे ही दरी मिटवण्यासाठी कालांतराने आर्थिक निकषावर आरक्षण ठेवणे गरजेचे होते. पण तशी घटनेत तरतूद करण्याऐवजी आरक्षणासाठी विविध जात समुहांचाच विचार होत राहिला. अशाप्रकारे जातीचे महत्व कमी झाले नाही. या जातीय वास्तवात बहुसंख्य मराठा समाज भरडला गेला. तो आर्थिक पातळीवर दुबळा ठरत गेला. मराठा आहे म्हणून या समाजाला जातीचा फायदा मिळाला नाही आणि आज ‘आम्हीही मराठा आहोत’ असे म्हणणार्‍या इतर जातींमधील धुरिण वर्षानुवर्षे आरक्षणाची फळे चाखत आली आहेत. मराठा समाजाला इतर जातींना मिळणार्‍या आरक्षणाची पोटदुखी नाही. आर्थिक निकषावर जर सरकार कोणत्याही जाती-समाजाला आरक्षण देत नसेल तर जातीय निकषावर तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावे इतकीच या समाजाची अपेक्षा आहे, त्यात चुकीचे काही आहे असे समजण्याचे कारण नाही. जिथे धर्मावर आधारित आरक्षण मागीतले जाते, तेथे जातीच्या निकषावर आरक्षण मागीतले जाण्यात कोणतेही नवल नाही.
       राहिला विषय ऍट्रॉसिटी कायद्याचा. या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. युनोने मानवी हक्क जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आणि भारताला स्वातंत्र्य मिळून चार दशके झाल्यावर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ देशबांधवांसाठी करावा लागला या कायद्यान्वये त्यांना त्यांच्याविरुद्ध होणारे गुन्हे, अपमान, छळ आणि बदनामी यापासून संरक्षण मिळाले, पण राज्यघटनेच्या प्रस्तावनेत उल्लेख केलेल्या सर्वांना न्याय आणि आत्मसन्मान ही संकल्पना अपयशी ठरण्याची कारणे काय याचा विचार कधी झालाच नाही. हा कायदा जम्मू-काश्मीर सोडून संपूर्ण भारतभर आहे, जम्मू-काश्मीरच्या विशेषाधिकाराने या कायद्याला तेथे अडकाठी केली. ऍट्रॉसिटी कायद्याबाबत नामवंत साहित्यिक, विचारवंत संजय सोनवणी यांनी रविवार, ११ सप्टेंबरच्या आपल्या ब्लॉगवर ‘ऍट्रॉसिटी घटनाबाह्य’ या शीर्षकाचा एक विचारप्रवर्तक लेख लिहिला आहे. त्या लेखाकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यातील एका परिच्छेदात ते लिहितात, ‘ऍट्रॉसिटी ऍक्ट हा कायदा १९८९ साली बनवण्यात आला. पुढे त्यात दोन वेळा भर घालण्यात आली. पण या कायद्यामुळे कायद्याच्या नजरेत सर्व नागरिक समान असतील. या घटनेच्या आर्टिकल १४ ने दिलेल्या समानतेच्या ग्वाहीच्या तत्वालाच छेद मिळतो.  कारण हा कायदा ङ्गक्त अनुसुचित जाती-जमातींना अन्य समाजघटकांपासून रक्षण देण्यासाठी बनवण्यात आला आहे. एक विशिष्ट समाजच केवळ दुसर्‍या समाजघटकावर अन्याय-अत्याचार करु शकतो हे गृहितत्व या कायद्यात आहे. पण समजा एखाद्या अनुसुचीत जातीतील कोणी अनुसुचित समाजाच्या व्यक्तीवर जातीय कारणांनीच अत्याचार केला तर तेथे मात्र हा कायदा संरक्षण देत नाही. ङ्गार कशाला अनुसुचित जातीतीलच एखाद्याने अनुसुचित दुसर्‍या जातीतील व्यक्तीवर अत्याचार केला तरी त्यालाही संरक्षण नाही. मिर्चपूर दलित हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य आरोपी नायब तहसीलदार असूनही त्याला कमी शिक्षा मिळाली, कारण तो अनुसुचित जातीतील होता. यावर खंत व्यक्त करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश कामिनी लौ यांनी हा कायदा विषमतेचे तत्व अंगिकारतो, कारण तो ङ्गक्त विशिष्ट जाती-जमातींच्याच बाबतीत आहे. मानवतेविरुद्धचे गुन्हे असे जाती-जमातीच्या आधारावर वाटता येत नाहीत. गुन्हेगाराला जात-जमात नसते. सर्वांनाच समान शिक्षा असायला हवी. न्यायाधीशांचे हे मत २०११ सालचे. पण सरकारने मतपेढ्यांवर लक्ष ठेवत उलट २०१४ व आता २०१६ मध्ये त्यात भरच घातली. कायद्यासमोर सर्व समान हे तत्व बासनात गुंडाळून ठेवण्यात आले.’ संजय सोनवणी यांच्या या विचारावर ऍट्रॉसिटी समर्थक, विरोधकांची मतमतांतरे असू शकतात, तशीच याबाबाबत मराठा समाजाची मते आहेत.
        मराठा समाजाला ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे, असे वाटते आहे, त्यामुळे त्यात दुरुस्ती करण्यात यावी अशी सरकारकडे मागणी आहे. सरकारकडे मागणी केली म्हणजे कायदे बदलत नसतात, त्याला एक प्रक्रिया असते. त्यामुळे या कायद्याच्या समर्थकांनी आपल्या घरचा हा कायदा असल्याच्या थाटात मराठा समाजावर आगपाखड करण्यात काहीच अर्थ नाही. कोपर्डी, जि. अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील सर्व आरोपींना १ वर्षांच्या आत फाशीची शिक्षा व्हावी, अशीही मराठा समाजाची मागणी आहे, ही मागणी चुकीची नाही, त्यामुळे या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात काही अर्थ नाही. सरकारने यासाठी आपली तपास आणि न्याययंत्रणा जलद गतीने राबवली पाहिजे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण त्वरीत लागू करावे तसेच आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इबीसी उत्पन्न मर्यादा ६ लाख करावी. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती व शेतीमाल उत्पादन खर्चाव आधारित कायद्याने हमी बाजारभाव मिळालाच पाहिजे, अशीही मराठा समाजाची मागणी आहे. या सर्व मागण्या मराठा समाजाच्याच फायद्याचा नाही तर सर्व जाती-धर्माच्या समाजाच्या हिताच्या आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाही. 
     मोर्चाच्या नावावर आतापर्यंत छुपे जातीचे-धर्माचे मोर्चे निघाले आहेत, पण मराठा समाजाचा मोर्चा जातीच्या नावावर निघत आहे. निदान मराठा समाज ताकाला जाऊन भांड लपवण्याचा प्रयत्न करीत नाही, हे कौतुकास्पद आहे. मराठा समाजाच्या मोर्चानंतर जातीय तणाव वाढेल, असा ज्यांना साक्षात्कार झालाय, त्यांनी छुपे जातीय मोर्चे काढले नाहीत काय? किंबहुना हीच मंडळी जातीय तणाव वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, या मोर्चाला उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चाची तयारी करीत आहेत. मराठा समाजाच्या मोर्चानंतर या मंडळीचे शिवप्रेम उतू जाणे हेच मोठे षडयंत्र आहे. मुळात शिवराय हे मराठा असले तरी ते समाजापुरते मर्यादित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन नायक आहेत, हे मराठा समाजही मानतो. पण इतर जातीतील महापुरुष त्या त्या जातीने विभागून घेतलेत त्याचे काय? मग मराठ्यांनी शिवराय आपले असून आपले समजले तर त्यात त्यांचे काय चुकले? त्यामुळे सदैव मराठा समाजाच्या डोक्यावर चुकीची खापरं फोडण्याचा प्रयत्न निश्‍चितच बंद झाला पाहिजे. मराठा समाज या मूक मोर्चाद्वारे सनदशीरपणे, सुसंस्कृतपणे आपल्या मागण्या मांडत आहे. त्या मागण्यांसाठी धुडगुस घालत नाहीत. हे आपल्यासारखे धुडगुसे नाहीत, ही पोटदुखीही मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधामागचे मोठे कारण असेल तर विरोधकांनी आतातरी सुधारावे, त्यांनी सैराट न होता आपल्या मनातील जातीय-धार्मिक द्वेषाची फोफवलेली विषवल्ली समूळ उपटून टाकावी.


मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशनचा मोतीबिंदूविरोधात लढा सुरु

 -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     समुद्रातील शिंपल्यात जो नैसर्गिक मोती बनतो, तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो, पण डोळ्यात जो नैसर्गिक मोती बनतो, म्हणजेच जो मोतीबिंदू बनतो, तो कोणालाही नकोनकोसाच असतो. या मोतीबिंदूचा प्रश्‍न आपल्या देशालाच नाही, तर सार्‍या जगाला भेडसावत आहे. रायगड जिल्ह्यात याच मोतीबिंदूविरोधात अलिबागच्या लायन्स हेल्थ फाऊंडेशनने लढा उभारला आहे. तीन वर्षांत जिल्ह्यातून मोतीबिंदू हद्दपार करण्यासाठी चोंढी येथे लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या वतीने अद्ययावत मोतीबिंदू शस्त्रक्रिया हॉस्पिटलही उघडण्यात आले असून तेथे सोमवार, १२ सप्टेंबर २०१६ पासून तेथे मोतीबिंदू रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऑपरेशनस् सुरु झाली आहेत, हे रायगड जिल्ह्यासाठी शुभवर्तमान आहे.
     देहदान, अवयवदान, नेत्रदान करण्यासाठी सामाजिक भान आणि सिंहाची छाती लागते. समाजात या कार्याची चळवळ सुरु आहे. हे काम समाजात सुरु असतानाच अलिबाग तालुक्यातील अलिबाग, मांडवा, पोयनाड, चौल-रेवदंडा, तसेच मुंबईतील लायन्स क्लब ऑफ चेंबुर डायमंड हे पाच लायन्स क्लब रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचा ध्यास घेतात, त्यासाठी लायन हेल्थ फाऊंडेशन स्थापन करतात आणि त्याच्या माध्यमातून एक अद्ययावत मोतीबिंदू शस्त्रक्रिया हॉस्पिटल उघडतात, हे सारे स्वप्नवत आहे. पण हेच वास्तव आहे. हे काम तळमळ आणि खरोखरच लायन असल्याशिवाय होत नाही. ही तळमळ आणि तन-मन-धनाने झपाटून काम करण्याची समर्पण वृत्ती या मोहिमेचे नेतृत्व करणारे लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव आणि उपाध्यक्ष, तसेच लायन्स क्लबचे रिजन पर्सन नितीन अधिकारी यांच्यामध्ये प्रकर्षाने पाहायला मिळते. डॉ. अनिल जाधव यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या अफाट माणसाने आपल्या सहकार्‍यांच्या सहाय्याने रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचे मनावर घेतले आणि त्यासाठी स्वत:ला पूर्णवेळ वाहून घेतले. हा प्रकल्प उभारण्यासाठी योग्य जागा उपलब्ध न झाल्यामुळे स्वत:ची जागा या प्रकल्पासाठी वापरासाठी दिली. या जागेतील आपल्या तीन भव्य वास्तू तीन वर्षांकरिता मोतीबिंदू शस्त्रक्रिया हॉस्पिटलसाठी दिल्या. त्याच तीन वास्तूंत अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग, आंतररुग्ण विभाग आणि बाह्यरुग्ण विभाग असे सुसज्ज विभाग तयार करण्यात आले आहेत. हा प्रकल्प तीन वर्षांसाठीच आहे. यासाठी डॉ. अनिल जाधव यांच्यासहीत उपाध्यक्ष नितीन अधिकारी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले आहे. चोरोंडे येथील नितीन अधिकारी हे उद्योजक आहेत, पण त्यांनी आपल्या उद्योगापेक्षा लायन्स क्लब आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशनला झुकते माप दिले. ही जिंदादीली सर्वांनाच दाखवता येत नाही, पण ती नितीन अधिकारी यांनी दाखवली आहे. 
    रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी लायन्स फाऊंडेशन, अलिबागला लायन्स इंटरनॅशनल, अमेरिकेतील हेल्प मी सी, हाजी बच्चुअली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या सेवाभावी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या मोतीबिंदुविरोधात उभालेल्या लढ्याचा पहिला टप्पा गुरुवार, १० डिसेंबर २०१५ रोजी सुरु झाला होता. या टप्प्याचा प्रारंभ रायगडच्या जिल्ह्याधिकारी शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आला होता. तर ९ ऑगस्ट २०१६ रोजी, क्रांती दिनी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य ऍड. आस्वाद पाटील व लायन्स क्लबचे डिस्ट्रीक गव्हर्नर सुभाष भलवार यांच्या हस्ते शस्त्रक्रिया कक्ष, आंतररुग्ण कक्ष आणि बाह्यरुग्ण कक्षाचे उद्घाटन करुन मोतीबिंदूविरुद्धच्या लढ्याचा दुसरा टप्पा गाठण्यात आला. आता तिसरा आणि अंतिम टप्पा सोमवार,१२ सप्टेंबरपासून सुरु झाला असून तो पुढील तीन वर्षे सुरु असणार आहे. या तीन वर्षांत २० ते २५ हजार मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन रायगड मोतीबिंदुमुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोतीबिंदू रुग्ण शोधण्यासाठी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच आरोग्य सेविका आशा व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी संगणकीय उपकरणे पुरविण्यात येणार आहेत. या मोतीबिंदू रुग्णांच्या डोळ्यांवर मोफत आंतरराष्ट्रीय दर्जाची शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहे. तसेच मोफत जेवणाची सोय करण्यात येणार आहे. या रुग्णालयात २४ तास सेवा मिळणार असल्यामुळे या सेवेपासून कोणताही मोतीबिंदूरुग्ण वंचित राहणार नाही.
      मांडवा, पोयनाड, चौल-रेवदंडा हे अलिबाग लायन्स क्लबशी संलग्नीत लायन्स क्लब आपल्या केंद्रीय लायन्स क्लबच्या बरोबरीने सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. या क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. अलिबाग लायन्स महोत्सव, किहीम-मांडवा लायन्स महोत्सव, नेत्रचिकित्सा-मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, मोफत चष्मेवाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे व मोफत  औषध वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, स्वच्छता मोहिमा, योगशिबीर, प्लास्टिक सर्जरी शिबीर अशा अनेक उपक्रमांनी या चारही लायन्स क्लबचा दबदबा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचे पुढचे पाऊल उचलले आहे. यासाठी त्यांच्या पाठिमागे लायन्स इंटरनॅशनल, महाराष्ट्रातील, देशातील लायन्स क्लब भक्कमपणे उभे आहेत. अलिबाग लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे रायगडकर जनतेच्या आरोग्याबाबतचे अनेक संकल्प आहेत, त्यांच्याकडे अनेक योजना आहेत. त्या योजना साकार झाल्या तर अपुर्‍या आरोग्यसेवेमुळे ज्या समस्या उभ्या राहतात, त्या समस्या दूर होतील.
     लायन हेल्थ फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल जाधव, उपाध्यक्ष व लायन्स क्लबचे रिजन चेअरपर्सन नितीन अधिकारी, सुकाणू समितीचे प्रवीण सरनाईक, अनिल म्हात्रे, झोन चेअरपर्सन राहुल प्रधान, अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष नयन कवळे, मांडवा लायन्स क्लबचे अध्यक्ष अमीष शिरगावकर, पोयनाड लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप गाटे, चौल-रेवदंडा लायन्स क्लबचे अध्यक्ष निलेश खोत, या चारही लायन्स क्लबचे पदाधिकारी रमेश धनावडे, अभिजित पाटील, महेंद्र पाटील, सुबोध राऊत, सतीश पाटील, मानसी चेऊलकर, जगदीश सावंत, अरविंद अग्रवाल, अरविंद घरत, ऍड. शिरीष लेले, प्रदीप सिनकर आणि इतर लायन्सच्या शेकडो सदस्यांनी हा जो रायगडातील मोतीबिंदूविरुद्ध लढा पुकारला आहे, त्या लढ्यामुळे रायगड जिल्हा मोतीबिंदूमुक्त होणार आहे, ही बाब या जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. 

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

विघ्नहर्त्याच्या नावावर चाललेय साळावला दिशाभूल

    -उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


     रायगड जिल्हा हा इतिहास, भूगोल आणि सृष्टीसौंदर्य यांनी संपन्न असा जिल्हा आहे. या जिल्ह्याला अनेक ऐतिसिक-पौराणिक मंदिरे लाभली आहेत. अष्टविनायकातील पालीचे बल्लाळेश्‍वर मंदिर तर जगप्रसिद्ध आहे. या मंदिराचे कोणत्याही प्रकारचे मार्केटिंग न होताही भाविकांच्या ह्रदयात त्याचे अढळस्थान आहे. साळाव येथे बिर्ला उद्योग समुहाने बांधलेले विक्रम विनायक मंदिर मात्र भांडवलदारांच्या उत्कृष्ट मार्केटिंगचे उदाहरण आहे, म्हणूनच मुरुडच्या ऐतिहासिक मंदिरांकडे पाठ फिरवून भाविक-पर्यटक या मंदिराला भेट देतात आणि आणि तेथील जाचक नियमांनाही तोंड देतात. बिर्ला उद्योग समूहाची विक्रम इस्पात कंपनी वेलस्पन मॅक्सस्टीलकडे हस्तांतरित झाल्यानंतरही साळावला विघ्नहर्त्याच्या नावावर दिशाभूल सुरुच आहे.
       मुरुड तालुक्यातील साळाव येथे बिर्ला उद्योग  समुहाने १९८८ साली स्थापन केलेल्या विक्रम इस्पात कंपनीने तेथे स्पॉज आर्यन उत्पादन सुरु केले. बिर्ला समुहाच्या या कंपनीने या ठिकाणी टेकडीवर सुंदर देऊळ बांधलं, पण ते स्व. आदित्य बिर्ला यांच्या स्मरणार्थ आणि तिथेच बागेत त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. या भागातील गरीब, देवभोळ्या कोळी समाजाचं लक्ष या मंदिराच्या कळसाकडे आकर्षित करुन कंपनीने साळाव खाडीत आपले पाय कधी घट्ट केले हे कोळी बांधवांना कळलेच नाही. २००७ साली हे कळले तेव्हा त्यांना निदर्शनं करावी लागली आणि पोलिसांच्या अमानुष दंडुकेशाहीला त्यांना सामोरं जावं लागलं. हा स्वतंत्र इतिहास आहे, तो प्रसंगोपात स्वतंत्रपणे हाताळता येईल. विक्रम इस्पात नंतर वेलस्पन मॅक्सस्टील कंपनीकडे हस्तांतरीत झाली. आताही परिस्थिती तीच आहे. विकासाच्या नावावर खाडी प्रदूषित करुन कोळीबांधवाना उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र सुरुच आहे. वेलस्पन मॅक्सस्टील कंपनीच्या विस्तार प्रकल्पाअंतर्गत स्वत:साठी आवश्यक ३३० मेगावॅट क्षमचेच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पास शासनाने २०११ साली मान्यता दिल्याने साळावच्या कोळीबांधवांवर मोठे संकट कोसळले आहे.
      बिर्ला समुहाच्या विक्रम इस्पात या तत्कालिन कंपनीने तेथील टेकडीवर विक्रम विनायक मंदिर बांधले आहे. पांढर्‍याशुभ्र संगमरवरातून साकारण्यात आलेला मंदिराचा भव्य कळस दूरनही नजरेस पडतो. टेकडीवर मंदिराच्या संभोवताली नयनरम्य बगीच्या असून त्यातील फुलझाडे, रंगीत कारंजी मन आकर्षित करतात. बागेचा परिसर व मंदिर यांत मोठ्याप्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हे मंदिर काही ऐतिहासिक नाही, तसेच वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे, असेही नाही. तरीही या मंदिराला प्रचंड प्रसिद्धी दिली गेल्यामुळे अलिबाग-चौल-रेवदंडा, मुरुडमधील ऐतिहासिक व वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या मंदिरांकडे पाठ करुन पर्यटक व भाविक साळावचे विक्रम विनायक मंदिर पाहण्यास वेळ काढतात. जमाना मार्केटिंगचा आहे. या मंदिराच्या प्रसिद्धीचे मार्केटिंग पद्धतशीर केले गेले आहे. त्यामुळे बिर्ला मंदिर हे नावही लोकांच्या जीभेवर रुळले आहे आणि रुजले आहे. गणेशाचे दर्शन घेतल्यावर आपोआपच बागेकडे पाय वळतात आणि तेथे स्व. आदित्य बिर्ला यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन होते. मुळात या भूमीशी स्व. आदित्य बिर्ला यांचा काही संबध नाही. त्यामुळे हा पुतळा येथे अप्रस्तुत आहे. सामान्य पर्यटक आणि आणि भाविकांच्या विनायक मंदिराची त्यांना बुटी दिल्यामुळे हे लक्षात येत नाही.  बिर्ला उद्योग समूहाने दिल्ली, हैदराबाद येथेही अशीच मंदिरे उभारली आहेत. त्यांना बिर्ला मंदिर म्हणूनच ओळखले जाते. त्या देवतेच्या नावाने ती ओळखली जातच नाहीत. देवळा आडून स्वत:च्या घराण्याचे नाव जागते ठेवणे यात बिर्ला उद्योग समुह यशस्वी ठरला आहे. इतकेच नव्हे तर आपण धार्मिक कार्यात विशिष्ठ रक्कम खर्च करतो हेही त्यांनी समाजमनावर ठसवले आहे. खरेतर या भागातील ऐतिहासिक मंदिरांची दूरवस्था झाली आहे. त्यांच्या जीर्णोद्धारासाठी बिर्ला उद्योगसमुह खर्च करु शकला असता, तेवढी त्यांची ताकद आहे, परंतु या ऐतिहासिक मंदिरांना बिर्ला मंदिर म्हणून नामानिधान मिळाले नसते, याचमुळे दातृत्वात त्यांनी हात आखडले घेतले. स्वार्थाविण प्रिती नाही हे त्यांनी दाखवून दिले.
         स्वत:चे नाव आणि उद्योग चालवायला स्वनिर्मित मंदिरांचा आसरा घेऊन बिर्ला समूह समाजाला मूर्ख बनवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गडकिल्ले दुरुस्त केले, तर अनेक गडकिल्ले नव्याने बांधले, पण कुठेही स्वत:च्या नावाची पाटी लावली नाही की त्या गडकिल्ल्यावर आपल्या पूर्वजांचे किंवा स्वत:चे पुतळे उभारले नाहीत. तरीही हे सर्व गडकिल्ले पाहिले, त्यांचा विषय निघाला की छत्रपती शिवाजी महाराज आठवण येतेच. बिर्ला यांनी चांगले काम केले तर त्यांचीही आठवण सदैव राहील, त्यासाठी आपण  बांधलेल्या मंदिरांना ओेढूनताणून बिर्ला मंदिर या नावाची प्रसिद्धी करण्याची गरज नव्हती की स्व. आदित्य बिर्ला यांचा पुतळा उभारण्याची गरज नव्हती. तथापि, स्व. आदित्य बिर्ला यांच्या शिल्पप्रतिमेचे आम्ही कौतुक करतो. ज्यांनी त्या पुतळ्याची रचना केली आहे, त्या कलाकाराचे हात खरोखरच थोर. पुतळा अगदी जीवंत भासतो.  पुतळ्याला मेघडंबरी आहे. राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन मेघडंबरीविना पुतळे उभारुन त्यांना कावळ्यांच्या हवाली करणार्‍यांनी बिर्ला उद्योग समुहाचा हा आदर्श घ्यायला हवा. असो. ही मंदिर आणि पुतळा असलेली टेकडी बिर्ला उद्योग समुहाची खाजगी मालमत्ता आहे. ही टेकडी बिर्ला उद्योग समुहाला कशी मिळाली, हा संशोधनाचा भाग आहे. आमच्या आदिवासी बांधवांना चतकोर जागेसाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो, पण भांडवलदारांना मंदिराच्या नावावर स्वत:चे पुतळे उभारायला टेकड्याही सहज उपलब्ध होतात. सर्व नियमात असेल नसेल, पण वस्तुस्थिती अशी आहे. या मंदिरातील देवतांची गम्मत आहे. श्रीगणेशाबाबत समजू शकतो, परंतु वैरागी असलेल्या असलेल्या श्रीशंकराला अलंकारांनी असा मढवला आहे की पर्यटक आणि भाविक त्याला ओळखूच  शकत नाहीत. देवांना अलंकारांच्या झगमगाटात लपवण्यापूर्वी त्या देवाचे महात्म्य लक्षात घेणे आवश्यक असते, पण तसे ते बिर्ला उद्योग समुहाला लक्षात घेण्याची गरज वाटली नाही किंवा आयात करण्यात आलेल्या पुजार्‍यांनी ते महात्म्य सांगण्याचे कष्ट घेतले नाहीत. पगाराशी इमानी राहून देवांशी बेईमानी केलेली त्यांना चालत असावी. 
         या मंदिराकडे येण्यासाठी व्हीआयपींना स्वतंत्र गाडीमार्ग आहे आणि सर्वसामान्यांना पायर्‍यांचा मार्ग आहे. देवासमोर कसले व्हीआयपी? त्यांना चार पावले चालवत नाही? ते अपंग नाहीत, तरी त्यांच्यासाठी अपंगांकरिता असतो तसा थेट गाडीरस्ता  आणि खर्‍या अपंगांना मात्र काहीही सवलत नाही. काय म्हणावे याला? बिर्ला उद्योग समुहाचे डोके ठिकाणावर आहे काय?  मोबाईल फोन आणि कॅमेर्‍यांना तिथे बंदी घालण्यात आलेली आहे. या बंदीची तेथील सुरक्षा रक्षक काटेकोर अंमलबाजावणी करतात. त्यांचे काम ते करतात. परंतु ही बंदी घालून काय साध्य झाले आहे, असा प्रश्‍न पडतो. दिवेआगरचा सोन्याचा गणपती सीसीटीव्ही असतानाही चोरीस गेला, येथे तर देव किंवा आदित्य बिर्ला यांचा पुतळा कोणी कॅमेर्‍यात अथवा मोबाईलमध्ये घालून चोरुन नेण्याची शक्यता नाही. येथील छायाचित्र काढल्यास त्यांचा दूरपयोगही होऊ शकत नाही, तरीही ही बंदी आहे. अलिबाग-मुरुड पर्यटनाच्या नकाशावरील महत्वाचे केंद्र आहे. अशा ठिकाणी टेकडीवर विकसित केलेल्या बागेत आपली व परिसराची छायाचित्रे काढून, आपली तेथील भेट संस्मरणीय करण्याच्या पर्यटक व भाविकांच्या हेतूकडे गलिच्छ नजरेने पाहून त्यांच्यावर बंदी घालणे ही बिर्ला उद्योग समुहाची हुकुमशाही आहे. त्यामुळे बिर्ला उद्योग समुह व मंदिर प्रशासनाबद्दल पर्यटक व भाविकांमध्ये असंतोष आहे. कोणी म्हणेल ही बिर्ला उद्योग समुहाची खाजगी मालमत्ता आहे. काय करावे, काय करु नये हा त्यांचा अधिकार आहे. निश्‍चितच त्याचा तो अधिकार आहे. मग त्याच अधिकारात त्यांनी हे मंदिर व बगीचा भाविक-पर्यटकांकरिता बंद करुन आपले खाजगीपण जपावे, पण भाविक-पर्यटकांचा अवमान करु नये. आणि या भूमीत आपण उपरे आहोत हे बिर्ला उद्योग समुहाच्या धुरिणांनी लक्षात घ्यावे आणि आपला हट्ट सोडावा व सरळ व्हावे. वेलस्पननेही हे लक्षात घ्यावे की या भूमीकडे ‘सब भूमी गोपालकी’ या भावनेने बघू नये, ही भूमी येथील कोळीबांधवांची, येथील विविध समाजातील भूमीपुत्रांची आहे. इतकेच.