शुक्रवार, २६ जुलै, २०१३

खड्डे भरणार कोण?

 -उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       राज्याचे जलसंपदामंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुनील तटकरे यांचे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष गेले आहे. कदाचित त्यांच्या गाडीला या खड्ड्यांचा ‘ताप’ झाला असावा, त्यामुळेच त्यांनी आता ‘बाप दाखव, नाहीतर श्राध्द घाल’ अशी भूमिका घेतली असावी. चौपदरीकरणाचे काम सुरु असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी सुप्रिम व महावीर यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे १ ऑगस्टपर्यंत सदर खड्डे भरुन वाहतूकसुरळीत न केल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर हलगर्जीपणाबद्दल गुन्हे दाखल करण्याची तंबी ना.सुनील तटकरे यांनी दिली आहे. ती अतिशय योग्यच आहे. 
       जनतेच्या संतापाला पालकमंत्री ना.सुनील तटकरे  यांनी शब्दरुप दिले आहे, पण जिल्ह्यात रस्तोरस्ती खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे तेथेही अपघात होत आहेत. वाहने आणि पादचार्‍यांना या खड्ड्यांतून कसरत करीत मार्गक्रमण करावे लागते आहे, याकडे ना.सुनील तटकरे यांचे लक्ष नसावे, याचे आश्‍चर्य वाटते. यंदा पाऊस नियमित आहे. पण पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्ड्यांची खिंडारे पडली. मुंबई-गोवा महामार्गाची तर चाळण झालीच, पण गावोगावचे, तालुक्यांच्या राजधान्यांतील रस्तेही खड्डेयुक्त झाले, जिल्ह्याची राजधानी अलिबागही याला उपवाद ठरलेली नाही. येथेही मोठ्याप्रमाणात खड्डे आहेत आणि येथील नागरिकांनाही खड्ड्यांची मॅरेथॉन पार पाडावी लागते आहे. अर्थात, याबाबत अलिबागला पूर्णतः टार्गेट करता येणार नाही. मूलतः अलिबाग हे सुंदर आणि स्वच्छ शहर आहे. त्यामुळे येथील खड्डे दृष्ट लागू नये म्हणून तीट लावण्यासारखे असू शकतात, पण त्यात अलिबागकरांचा जीव वर खाली होतोय ही बाबही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे खड्डे लवकरच योग्यप्रकारे म्हणजे बुरुम न टाकता बुंजवले पाहिजेत. 
      तसेच जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची मॅरेथॉन संपवली पाहिजे. अन्यथा ‘भाग मिल्खा भाग’ ऐवजी ‘भाग, रायगडकर, भाग’ या शिर्षकाचा खड्ड्यांचा मॅरेथॉनमधील रायगडकरांच्या पराक्रमावरील चित्रपट काढावा लागेल. अर्थात यातील उपहास, विनोद याच्याकडे दुर्लक्ष केले तर खड्ड्यांचा प्रश्‍न जिल्ह्यासाठी किती भयानक आहे, हे लक्षात येईल. ना.सुनील तटकरे यांनी याविषयातही लक्ष घालून संबंधीतांना तंबी देऊन या रस्त्यांचे वैगुण्य असलेले खड्डे चेहर्‍यावर प्लॉस्टिक सर्जरी करावी, त्याप्रमाणे बुंजवायला भाग पाडले असते, तर जिल्ह्यातील समस्त जनतेने सुटकेचा श्‍वास सोडला असता. सध्या सिंदबादच्या म्हातार्‍याप्रमाणे हे खड्डे रायगडकरांच्या मानगुटीवर बसले आहेत आणि त्याने रायगडकर हैराण झाले आहेत. एकवेळ राजा विक्रमाच्या पाठीवर बसलेला वेताळ परवडला, तो राजाला गोष्ट ऐकवून, त्यांचे उत्तर घेतल्यानंतर निघून तरी जातो, पण सिंदबादच्या मानगुटीवर बसलेला म्हातारा निघून जाण्याचे नाव घेत नाही, तशी जिल्ह्यातील खड्ड्यांची अवस्था झाली आहे. हे खड्डे नाहीसे होण्याची चिन्हे दिसत नाहीत, उलट रस्तेच नाहीसे होऊ लागले आहेत. स्थानिक नेत्यांना या खड्ड्यांचे दुखणे का दिसत नाहीत. त्यांना हे खड्डे का खुपत नाहीत, त्यांना या खड्ड्यांचा का त्रास होत नाही, याची उत्तरे या स्थानिक नेत्यांनाच जरी माहित असली तरी आपण लोकप्रतिनिधी असल्यामुळे तारतम्याची भूमिका बजावणे आवश्यक आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. 
      मुळात हल्ली रस्ते टिकू नये याची प्रमुख काळजी घेतली जाते. पहिल्या पावसात रस्त्यांचे वस्त्रहरण होऊन खड्डे कसे पडतील आणि पुन्हा त्या रस्त्याचे कंत्राट आपल्याला कसे मिळेल हे पाहिले जाते आणि मुख्यतः ही कंत्राटे स्थानिक राजकीय नेत्यांचीच असतात, त्यामुळे त्यांना कधीही हे रस्ते खुपत नाहीत. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात नफा मिळवणे हाच मुख्य उद्देश असल्याने रस्त्याचे काम करीत असताना तांत्रिक बाबींचे पालन होत नाही. तज्ञांच्या मतानुसार रस्ते तयार करताना डांबर आणि खडीचे योग्य मिश्रण नसेल, तर रस्ते खराब होऊ शकतात. ब्रिटिशकालीन कंपन्या शंभर वर्षांची खात्री देऊन रस्ते, पुलांची बांधणी करीत होते. तेवढ्या कालावधीपर्यंत त्या बांधकामांनी टिकाव धरल्याचे आपल्या आसपासच्या उदाहरणांवरुन आपल्याला पहायला मिळाले आहे. मात्र सध्याच्या बांधकाम विभागाचे कंत्राटदारांवर नियंत्रण नसल्याने, तसेच रस्ते पाहणी समितीचेही दुर्लक्ष होत असल्याने महामार्ग तसेच जिल्ह्यातील गावोगावचे रस्ते दूरवस्थेच्या विळख्यात सापडले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, परंतु रस्त्यांची सुधारणा होत नाही.
       रस्ते खराब होण्याची अनेक कारणे आहेत. भ्रष्टाचारामुळे खराब साहित्याचा वापर केला जाणे, डांबर, खडी, यांचे थर नीट टाकले न जाणे, ६४० एमएमचे रस्ते करण्याची गरज असताना फक्त २० ते २२ एमएमचे रस्ते केले जाणे, क्षमतेपेक्षा जादा वजनाची वाहतूक, खड्डे तंत्रशुध्द पध्दतीने भरले न जाणे, मांडवांसाठी, जलवाहिनीसाठी रस्ते खोदले जाणे, ही देखील रस्ते खराब होण्याची कारणे आहेत. त्यावरही विचार होणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या विकासाची जबाबदारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यासोबतच राज्य रस्ते विकास महामंडळाकडे आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत देखील रस्त्यांची कामे केली जात आहेत. पण प्रत्यक्षात रस्ते त्या-त्या गावांशी जुळले गेेले आहेत का? रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण झाले आहे का? हा प्रश्‍न आपल्या जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात उपस्थित झाला आहे. त्यामुळे ना. सुनील तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचा दम भरला आहे. वास्तविक रस्त्यांत खड्डे होतात कसे? अशा निकृष्ट रस्ते बांधणी करणार्‍यांवर पालकमंत्र्यांनी खटले का नाही भरले? अशा खराब बांधकाम करणार्‍यांवर त्यांनी अजामीन पात्र गुन्हे दाखल केले पाहिजेत. प्रशासन स्वच्छ करा, मग बघा रस्ते कसे चांगले तयार होतात की नाही ते. आज टेंडरच्या किमतीपैकी ४० टक्के लाच देण्यात ठेकेदार खर्च करतात. २० टक्के त्याचा फायदा. बांधकामावर फक्त ४० टक्के खर्च होतात. मग रस्त्यावर ४० टक्के लाचेचे खड्डे पडतात, हे काय या राजकारण्यांना माहीत नाही. हे ठेकेही राजकारणी नाहीतर त्यांच्या हस्तकाचे असतात. ना. सुनील तटकरे यांनी ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. अमेरिका विकसित आहे, म्हणून तेथील रस्ते चांगले आहेत असे नव्हे; तर चांगल्या रस्त्यांमुळे अमेरिकेचा विकास झाला, हे खुद्द अमेरिकन अध्यक्षांचे मत आहे. भारतात हा दृष्टीकोन दिसत नाही, हे दुर्दैवाचे आहे. पण पालकमंत्री या नात्याने तरी ना.सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी येथील रस्त्यांच्या मजबुतीकडे लक्ष दिले पाहिजे. शेवटी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद त्यांच्याच पक्षाकडे आहे. तेव्हा पालकमंत्री ना.सुनील तटकरे यांनी रस्ते आणि खड्डे याकडे गांभीर्याने पहावे, इतकेच.

जिल्हा प्रशासनाची लक्तरे वेशीवर

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


      नोकरशाहीबद्दल बोलावे आणि लिहावे तेवढे कमी आहे. या नोकरशाहीत एवढे दुर्गुण आहेत की, तिच्याबद्दल कितीही लिहिले तरी ते शिल्लक राहतात. तिच्यावर विनोद केले गेले असले तरी ती सर्वसामान्यांचे आणि व्यवस्थेचे लचके तोडत असते ही वस्तुस्थिती आहे. रायगड जिल्ह्यात अनेकवेळा याचा प्रत्यय आला असला, तरी यावेळचा संदर्भ वेगळा आहे आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडीत आहे. यावेळी खुद्द रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जग्गनाथ विरकर यांचे स्वीय सहाय्यक विनोद लचके यांना लाचखोरीबद्दल जेरबंद करण्यात आले.
      विनोद लचके यांनी बिनशेती करण्यासाठी कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील कृष्णा आंबवणे यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु आंबवणे यांनी १ लाख २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. ही रक्कम मंगळवारी देण्याचे ठरले होते. परंतु आंबवणे यांनी त्याअगोदर अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मिशन जिल्हाधिकारी कार्यालय हाती घेऊन सापळा रचून मंगळवारी संध्याकाळी लचके यांना लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने यातील इतर मोठे मासे गळाला लावण्याचा प्रयत्न चालू केला आहे. ते मोठे मासे गळाला लागतील की नाही, हे माहीत नाही, पण रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाचा कसा बाजार झाला आहे आणि तेथे कशाप्रकारची दलाली होते, हे चव्हाट्यावर आले आहे. रायगड जिल्ह्यात सेझचे आक्रमण झाले आणि येथील भूमिपुत्रांच्या जमिनी कवडीमोलाने भांडवलदारांच्या घशात घातल्या जावू लागल्या. यात या कार्यालयाची दलाल म्हणूनच भूमिका असल्याचे वारंवार दिसून आले होते. दुसरीकडे बांधकाम क्षेत्राला गती आल्यामुळे जिल्ह्यातील जागांचे भाव गगनाला भिडले, त्यामुळे कागदपत्रे रंगवून होत्याचे नव्हते करणारी जमात गांडुळासारखी जिल्हाधिकारी कार्यालयात पसरली. ही नोकरशाही गांडुळासारखी दिसत असली तरी ती विषारी सापाप्रमाणे घातक होती आणि आहे. त्यामुळेच जमिनींचे अनेक गैरव्यवहार या कार्यालयातून व त्याच्याशी संबंधित कार्यालयातून सुरु झाले आणि सुरु आहेत. 
     लाचखोरीचा भस्म्या रोग झालेली ही नोकरीशाही प्रत्येक व्यवहारात पैसा ओरपू लागली. सनदशीपणे होऊ शकणारे व्यवहार अडवून तेथे पैशाची मागणी केली जात आहे आणि दुर्दैव म्हणजे त्यांना लाच देणारेही भेटत आहेत. परंतु आंबवणे यांच्यासारखे या भ्रष्ट व्यवस्थेला बळी पडत नाहीत, तेव्हाच लचकेसारखे महाभाग कायद्याच्या कचाट्यात सापडतात. लचके यांची लाचखोरी हे हिमनगाचे एक टोक आहे. जर महाभारतातल्या संजयासारखी दिव्यदृष्टी सर्वसामान्य जनता आणि कायदा राबवणार्‍या यंत्रणेला लाभली तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी काय लायकीचे आहेत, याचा प्रत्यय येईल. जिल्ह्याचे प्रशासन चालवणारी व्यवस्थाच करप्ट असेल, तर या जिल्ह्यातील जनतेने कोणाच्या तोंडाकडे पहायचे? अर्थात हे रायगड जिल्ह्याचेच रडगाणे नाही, देशातील सर्वच जिल्ह्याचे रडगाणे आहे. चांगले अधिकारी ही व्यवस्था सुधारु शकत नाही, बिघडणे हाच पर्याय त्यांच्यापुढे उभा राहतो, तेव्हा त्यांना व्यवस्थेबाहेर पडावे लागते. परंतु निलाजर्‍या अधिकार्‍यांच्या खोगीर भरतीमुळे जिल्हा प्रशासने ही खाबुगिरीची आणि बाबुगिरीची केेंद्रे झाली आहेत. अर्थात संपूर्ण नोकरशाहीचे दृश्य फारसे चांगले नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हेच चित्र आहे. त्यामुळे देशाच्या भवितव्यासमोरही प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. विनोद लचके यांच्या अलिबागमध्ये चार सदनिका आहेत. कशासाठी हव्यात त्यांना चार सदनिका? त्या त्यांना कशा मिळाल्या? त्यात त्यांनी कोणता घामाचा पैसा ओतला? याची गणितं लाचलुचपत विभाग आणि पोलिस सोडवतीलच. प्रारंभी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांचे स्वीय्य सहाय्यक म्हणून भूमिका बजावली होती, ही भूमिका त्यांना फळाला आली असणार. येथेच नाजूक आणि गुंतागुंतीचे संबंध तयार झाले असणार हे उघड आहे. त्यानंतर ते निवासी उपजिल्हाधिकार्‍यांचे स्वीय्य सहाय्यक बनले आणि त्यांनी कित्येकांना बनवले हे त्यांच्या उघड झालेल्या ‘पराक्रमा’वरुन लक्षात येते.
       सेझ, टाटा पॉवर, रिलायन्स, पटनी पॉवर, वेल्सस्पन मॅक्सस्टील कंपनीसाठी विनोद लचके यांनी केलेल्या कामगिरीवर प्रकाश पडला, तर निश्‍चितच या कंपनीराजसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कशाप्रकारची साखळी कार्यरत आहे, हे दिसून येईल. अर्थात, विनोद लचके जिल्हाधिकारी कार्यालयातील एक पायरी आहे. अशा तेथे अनेक पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवर डोके ठेवल्यानंतरच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चरणापर्यंत पोहोचता येते. या पायर्‍यांना खुश केले, त्यांना फुलं वाहिली, श्रीफळ फोडला, नैवेद्य दाखवला, तरच वरच्या नावापर्यंत पोहोचता येते आणि या बापांचे व्यवहार या पायर्‍याच पहात असतात. त्यामुळे या पायर्‍या, म्हणजेच हे स्वीय्य सहाय्यक उन्मत आणि उर्मट असल्याचे आढळते. अशांपैकी एक असलेले विनोद लचके हे स्वतःच्या मर्जीने सर्वच भ्रष्टाचार करत असणार असे मान्य करता येणार नाही. त्यांचे बोलविते धनी वेगळेच आहे. या बोलवित्या धन्यांना जेरबंद केले गेलेे तरच अर्थ आहे. अन्यथा विनोद लचके याला लाचलुचपतीवरुन अटक केल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा, लाचलुचपतीचा वारु दौडत राहील. विनोद लचके यांच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाचे शुध्दीकरण करण्याची गरज आहे. या कार्यालयातील पैसा खाणार्‍या वरिष्ठ अतृप्त आत्म्यांना बाटलीत भरण्यासाठी कोणत्याही बंगाली बाबाची गरज नाही. जिल्हा प्रशासन जर स्वच्छ असेल, तर ते स्वतःच या अतृप्त आत्म्यांना गजाआड करण्यास पुढाकार घेईल. तसे जर झाले नाही तर रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची लक्तरे वेशीवर टांगली जाऊन जिल्हा प्रशासनाचे वस्त्रहरण होईल. हे वस्त्रहरण लोकशाहीसाठी लज्जास्पद असेल, जिल्ह्यातील जनतेसाठी दुर्दैवी असेल. इतकेच.

शुक्रवार, १२ जुलै, २०१३

या सरकारला बालवाडीत टाका

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉

      महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात खेळखंडोबा चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ आणि राज्य सरकारने डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्‍न पडला आहे. राज्याची मराठी अस्मिता झोपा काढत असल्याचे हल्ली दिसत असले तरी अलिबागसारख्या छोट्या शहरातील पेशाने चाईड अकाऊंटंट असलेल्या संजय राऊत यांच्यासारखे जागरुक नागरिक भिंग हातात घेऊन शिक्षणक्रमाकडे पाहतात तेव्हा निश्‍चितच मराठी अस्मितेचा जागर जोमाने होतो. संजय राऊत यांनी गुरुवारी अलिबागेत जी पत्रकार परिषद घेतली, त्यातून त्यांनी महाराष्ट्रव्यापी प्रश्‍नाला हात घातला. हा प्रश्‍न शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राची निगडीत असल्यामुळे आणि मराठी भाषेच्या अवहेलनेचा असल्यामुळे या प्रश्‍नाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. 
     मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे जून २००९ पासून अनिवार्य केले आहे. शासनमान्य अभ्यासक्रमानुसार अमराठी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषेच्या अध्ययन अध्यापनासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने आतापर्यंत पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्र पुस्तिका व तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित स्वरुपाचे पाठ्यपुस्तक व चौथीसाठी ‘मराठी सुलभभारती’चे पुस्तक तयार केलेली आहेत. संजय राऊत यांनी कळीचा मुद्दा बनवलेल्या इयत्ता चौथीसाठीच्या सुलभभारती पुस्तकास महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग व मार्च २०१२ द्वारा मंजुरी मिळाली आहे. अमराठी शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्यात आलेल्याला तीन वर्षे उलटल्यानंतर ते पुस्तक प्रसिध्द झाले असून त्या पुस्तकात मराठीची अक्षरशः दयनीय अवस्था करण्यात आली आहे. मराठीत्तर माध्यमांतील विषयांची पुस्तके मराठीची किती आणि कशी राजवस्त्रे लेवून असतील, ती फाटकी असतील की तुटकी असतील याचा अंदाज चौथीच्या मराठी विषयांच्या पुस्तकातून येतो. हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, गुजराती, तेलगू व सिंधी या मराठीत्तर माध्यमांच्या मराठी विषयासाठी पहिली ते चौथीसाठी काढलेली पुस्तके मराठीची प्रतिष्ठा वाढविणारी आहेत, की धुळीत मिळवणारी आहेत, याचा विचार पाठ्यपुस्तक महामंडळातील पंडितांना करावासा वाटला नाही हे मराठीचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैव म्हटले पाहिजे. 
       महाभारतातील अंध ध्रुतराष्ट्राला संजयाने महाभारत युध्दाच्या बातम्या सांगितल्या, तसेच अलिबागेतील संजयला अंध शिक्षण व्यस्थेतल्या त्रुटी सांगाव्या लागल्या आहेत. ‘सुलभभारती’ ही मराठीत्तर मराठी विषयांची पुस्तके हा सर्व अजबभारती वाटण्याजोगा सर्व प्रकार आहे. त्यातील मराठी शोधण्यासाठी शेरलॉक होम्स, नाहीतर करमचंदलाच बोलवायला हवे. मराठी विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांना मराठी विषयांच्या पुस्तकातील मराठी शोधणे हे समुद्रातुन सुई काढण्यासारखे आहे. मराठी माणूस समुद्रात उडी मारुन रेती काढेलपण सुई काढू शकत नाही, त्यामुळे तो केवळ कंठशोष करु शकतो. पण त्यातील संजय राऊत यांच्यासारखी आकडेमोडीत व्यस्त असलेली माणसे मराठीसाठी झगडा प्रारंभ करतात, तेव्हा त्यांचे काम कौतुकास्पद वाटते. राज्याचे मुख्यमंत्री तर ‘सू’ची नदी करण्याइतपत पॉवरबाज मराठी व्यक्तिमत्व आहे. बहुसंख्य आमदार मराठी आहेत. दिल्लीला धाडलेले बहुसंख्य खासदार मराठी आहेत, तरी मराठीला धाड भरलेली आहे हे सर्व आक्रितच म्हणायला हवे आणि असे आक्रित उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात, केरळ इथे घडू शकत नाही, तर ते महाराष्ट्रातच घडू शकते. कारण ती राज्य भाषिक अस्मितेला प्राध्यान्य देतात आणि महाराष्ट्र मात्र मराठीच्या वस्त्रहरणाला प्राधान्य देते, त्यामुळे मराठी मायमाऊली आपले उघडे अंग झाकण्याच्या प्रयत्नात आहे आणि हे सर्व राजकीय पातळीवरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आमदार, खासदार, दिल्ली, महाराष्ट्रातील मराठी मंत्री खाली मान घालून उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, ही लज्जास्पद गोष्ट आहे. अशा वेळी मायमराठीची अबू्र झाकण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला श्रीकृष्ण बनावे लागणार आहे याची जाणीव अलिबागच्या ‘संजय उवाच’मधून प्रकर्षाने झाली असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही. 
       काय संजय राऊत यांचे मागणे आहे? त्यांचे मागणे आहे इंग्रजी माध्यमासाठी चौथीसाठी चालू शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या मराठीचे अवमूल्यन करुन समाविष्ट केलेले धडे व कविता वगळाव्या. मराठी सोडून इतर माध्यमांच्या शाळांना संपूर्ण महाराष्ट्रात एकच पुस्तक अनिवार्य करावे. खरोखरच इतकी माफक मागणी आहे आणि ती मान्य झाल्यास निश्‍चित मराठी भाषेची शैक्षणिक स्तरावर चाललेली घसरण थांबेल. चौथीच्या मराठीत्तर माध्यमांच्या मराठी विषयाच्या पुस्तकात मराठीचा लवलेश नसलेले धडे आहेत आणि मराठीचा संबंध नसलेल्या भाषेच्या अभ्यासाचे ओझे मराठीत्तर माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर ठेवून महाराष्ट्रातून शुध्द आणि सुलभ मराठी हद्दपार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. इतकेच नव्हे तर ही पुस्तके सर्व अमराठी माध्यमांचा शाळांना अनिवार्य असूनही महाराष्ट्रात बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळा आपल्या मर्जीप्रमाणे तिसरी व चौथीसाठी मराठी पुस्तके वापरत आहेत. बर्‍याचशा शाळा इयत्ता तिसरीसाठी मराठी माध्यमाकरिता असलेले इयत्ता पहिलीचे पुस्तक व इयत्ता चौथीसाठी मराठी माध्यमाकरिता असलेले इयत्ता दुसरीचे पुस्तक वापरत आहेत. म्हणजे याचा अर्थ चालू शैक्षणिक वर्षामध्ये शाळा सुरु होऊन पंधरवडा झाला असूनही मराठीत्तर माध्यमांच्या शाळांनी कुठले मराठीचे पुस्तक वापरावे याचा सावळागोंधळ सुरु आहे. यावरुन एकाच इयत्तेत विद्यार्थ्याला महाराष्ट्रात समान शैक्षणिक स्तराचे शिक्षण मिळत नाही. तसेच मराठीशी फारकत घेणारे धडे व कविता या मराठीत्तर माध्यमाच्या मराठी विषयाच्या पुस्तकात आहेत, ते धडे, कविता अर्ंतभूत केले पाहिजेत व ही पुस्तके मराठीत्तर माध्यमाच्या सर्व शाळांना अनिर्वाय व बंधनकारक करणे आवश्यक आहे. मराठी माध्यमाच्या शाळांना एकीकडे गळती लागली असताना मराठीत्तर माध्यमाच्या शाळांतील मराठीलाही गळती लागू नये याची काळजी महाराष्ट्राने घेतली पाहिजे आणि यासाठी शिक्षणमंत्र्यांनी आपली कुंभकर्णी झोप मोडून वास्तवाच्या पायरीवर आले पाहिजे. पाठ्यपुस्तकांच्या क्षेत्रातील चालू असलेली चालूगिरी वेळीच लक्षात येत आहे, त्यामुळे या चालूगिरीवर वेळीच आवर घालण्यासाठी मराठी जनतेचा दबावगट करण्याची गरज आहे, अन्यथा एक दिवस आपलेच मराठी राज्यकर्ते, या महाराष्ट्राचे कर्नाटक किंवा उत्तरप्रदेश करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.

सोमवार, १ जुलै, २०१३

रायगडातील घुसखोरी

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


       रायगड जिल्ह्याला बांग्लादेशी, नेपाळी व पाकिस्तानी, घुसखोरांचा पाश पडला आहे, परंतु तो प्रकर्षाने कोणाला जाणवत नाही. फक्त अशा घुसखोरांवर पोलिसांनी कारवाई केल्यावर लक्षात येते की, ‘अरेच्चा! हे तर घुसखोर आहेत.’ दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सामान्य लोकांना या घुसखोरीचे गांभीर्य नाही आणि लोकप्रतिनिधींनाही याचे गांभीर्य नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि या प्रश्नांचा संबंध गुन्हेगारी, घातपातांशीही आहे. 
      पोलिसांची अधूनमधून कारवाई सुरुच असते. संशयीत बांग्लादेशींना ताब्यात घेतले जाते. यावेळीही माणगाव, विळे, भागाड, औद्योगिक वसाहतीत घुसखोेर बांग्लादेशी असल्याची माहिती बांग्लादेशी घुसखोर शोध पथकाला मिळाल्यावरुन माणगाव पोलिसांनी तेथील सिंटेक्स इंजिनिअरिंग कंपनीवर छापा टाकला व या छाप्यात इतर संशयीत बांग्लादेशींना पकडले. सर्व संशयीत बांग्लादेशींना चेन्नई येथील ठेकेदाराने सिंटेक्स इंजिनिअरिंग कंपनीत कामाला आणले होते. तो ठेकेदार आता फरारी झाला आहे. या घटनेने बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच रायगडसारख्या जिल्ह्यापर्यंत या बांग्लादेशींना कसे आणले जाते, याचेही या घटनेतून उत्तर मिळते. सर्वच घुसखोर बांग्लादेशी पोटापाण्यासाठी आलेले नसतात, तर त्यांच्यात अतिरेकी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळीही असतात. यांना स्थानिक मंडळींचे सहकार्य मिळत गेल्यामुळे घातपातासारख्या गोष्टी ते सहजपणे पार पाडतात. रायगड जिल्ह्यात विविध कंपन्या आहेत. त्यांना कमी मोबदल्यात मनुष्यशक्ती आवश्यक असते, त्यांना हे घुसखोर सहज उपलब्ध होतात, तसेच जिल्ह्यात बांधकामाचा व्यवसाय भरभराटीस आला आहे, या क्षेत्रात मजूर म्हणून परप्रांतियांचा भरणा आहे अणि ते आपल्या कामात कुशल आहेत आणि त्यांच्याबद्दल फारसे आक्षेप घेता येणार नाहीत, पण या मजुरांमध्ये कोणी बांग्लादेशी, नेपाळी, पाकिस्तानी घुसखोर नाही, अशी कोणी हमी देऊ शकत नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील मजुंराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. 
     हे घुसखोर मुळात देशाची सीमा ओलांडून येथे येतात तरी कसे हा मोठा प्रश्न आहे. देशाची सीमा ओलांडणे ही सोपी बाब आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. भारतात बेकायदेशीर घुसखोरी, करुन येथेच कायमचे स्थानिक झालेल्या बांग्लादेशी नागरिकांची नेमकी मोजदाद कधीही केली गेलेली नाही. परंतु ताज्या अंदाजानुसार ही संख्या ३.५ ते ४ कोटींच्या घरात आहे. आपली जी सीमा बांग्लादेशला लागून आहे त्या ठिकाणांहून घुसखोरी करणं सोपं पडतं. त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा फारशी कडक नसल्याने घुसखोरांचं फावतं. बांग्लादेशमधून केवळ दहशतवादीच नाहीत तर सामान्य माणसंही सहज भारतात येतात. बांग्लादेशच्या आजूबाजूला असलेल्या राज्यांवर केंद्राची फारशी पकड नाही हे चित्र तर वारंवार स्पष्ट झालेले आहे. तिथे अराजकाची स्थिती आहे. दारिद्य्रही मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्यांचा फायदा घुसखोर घेतात. म्हणूनच आज भारतात ३.५ ते ४ कोटी बांग्लादेशी घुसखोर आपलं बस्तान बसवून आहेत. त्यांच्याकडे पॅनकार्ड, रेशनकार्ड, व्होटर्सकार्ड ही अधिकृत कागदपत्रे सहज उपलब्ध असतात. आज काश्मीरमध्येही घुसखोरी होते, पण बांग्लादेश सीमेच्या तुलनेत या सीमेवरुन होणारी घुसखोरी खूपच नियंत्रणात आलेली आहे. मग बांग्लादेशी घुसखोरांना भारतात येण्याची मिळालेली ही संधी कोणामुळे आहे, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. यामध्ये स्थानिक लोक, सरकार, राजकारणी, पोलिस, बीएसएफ अशा विविध स्तरांवर घुसखोरांना मदत होते, हे सिद्ध न करता येणारं तरीही उघड वास्तव आहे. 
     गेली २५ वर्षे सीमेवर बीएसएफ आहे तरी घुसखोरीवर नियंत्रण कसं आलेलं नाही, हा सामान्यांना पडणारा प्रश्न आहे. अशा पद्धतीने मिळणार्‍या पैशांच्या मोबदल्यात मग देशभक्तीची भावना सहज बासनात गुंडाळून ठेवता येते का, याचं उत्तर मात्र मिळत नाही. रात्रीच्या वेळी या घुसखोरांना सीमापार यायला मदत केली की, घुसखोराीला मदत करणार्‍यांचं काम संपतं, त्यांचे अनेक एजण्ट्स इथे बसलेले असतात, ते त्यांची पुढची सोय बघतात आणि त्यांचं भारतातलं आयुष्य सुरु होतं. माणगाव येथील सिंटेक्स इंजिनिअरींग कंपनीत संशयीत बांग्लादेशींना ज्या चेन्नई येथील ठेकेदारांनी कामास लावले, त्या ठेकेदाराशी अशा एजंटचे संधान असणार हे तर उघड आहे. असे इजंट आणि असे ठेकेदार या बांग्लादेशींचा भारतातील विविध राज्यांत, विविध जिल्ह्यांत प्रसार करीत आहेत. कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी पतपेटीचे राजकारण मोठ्या प्रमाणात केल्यामुळेही देशात बांग्लादेशी घुसखोरीचा प्रश्न उग्र बनला आहे, हेही वास्तव आहे. रायगड जिल्ह्यात असे होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. या घुसखोरांकडे पॅनकार्ड, रेशनकार्ड, मतदारकार्ड आढळल्यास हे उपल्बध करुन देणार्‍या प्रशासनातील देशद्रोह्यांवरही कठोर कारवाई होणे गरजेेचे आहे. जिल्ह्यात बांग्लादेशी घुसखोर शोध पथकाचे जे काम सुरु आहे, ते कौतुकास्पद आहेच, पण या घुसखोरांना ज्यांनी आश्रय दिला आहे, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, तरच या मोहिमेला अर्थ असणार आहे. जसे बांग्लादेशी घुसखोर आहेत, तसेच पाकिस्तानी घुसखोर जिल्ह्यात आहेत, त्यांचाही शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याची गरज आहे. बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना जेरबंद केल्यास भविष्यात जिल्ह्यात होणारे भीषण अनर्थ टळणार आहेत, जिल्हा पोलिसांनी व प्रशासनाने याची दखल घ्यावी, इतकेच.