बुधवार, १३ मार्च, २०१३

मंतरलेले अलिबाग

 -उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉



     सरखेल कान्होजी आंग्रे खरेतर इतिहासातील एक वादळी, झंजावाती आणि सोनेरी पान!  समुद्रावरील शिवाजी अशी त्यांची ओळख. फिरंग्यांचा धोका ओळखून छत्रपती शिवरायांनी कोकण किनारपट्टीवर आरमाराची उभारणी केली. त्या आरमाराचे पुढे कान्होजी आंग्रे प्रमुख बनले. इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्दी हे सारे आंग्रे यांच्या सागरी सत्तेला घाबरत होते. अशा या आंग्रे यांनी अलिबागची नव्याने उभारणी केली. अशा या ऐतिहासिक अलिबागमध्ये अनेक महान व्यक्तीमत्वांनी वास्तव्य केले, जन्म घेतला, त्यांची संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर आपला ठसा उमटविला. यात समाजसुधारक आहेत, राजकीय नेते आहेत, अभिनेते आहेत, नाटककार आहेत, पत्रकार आहेत, गायक आहेत, संगीतकार आहेत,  साहित्यिक आहेत, खेळाडू आहेत, विधीज्ञ आहे, डाॅक्टर आहेत, लष्कर प्रमुख आहेत, एकूण आपला अलिबाग अष्ट्पैलू आहे. समतेने आणि ममतेने चालणारा अलिबाग आहे. विशेषकरुन अलिबागकर प्रामाणिक, जीवाला जीव देणारा, भोळा, शांतताप्रिय, संयमी आहे. ही शुराची लक्षणे आहेत, ती अलिबागकरांमध्ये ठासून भरली आहेत, त्यामुळे तो कुठेही आत्मविश्वासाने, ताठ मानेने उभा राहू शकतो. त्यादृष्टीने ही भूमी मंतरलेली आहे. हा मंत्र शिवप्रभूंचा आहे, सरखेल कान्होजी आंग्रेच्या पराक्रमाचा आहे.
       आदिलशाहीच्या कालखंडात मूळ श्रीबागेत कोणीतरी अली लावाचा धनाढ्य व्यापारी येऊन राहिला. त्याने इथे विहिरी खोदल्या, झाडे लावली आणि बागा उभ्या केल्या, त्यावरुन अलिबाग अशी ओळख मिळाली असा अलिबागच्या निर्मितीचा इतिहास सांगितला जातो, तसा तो असेलही. पण अली हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ भुंगा, भ्रमर असा आहे. स्पष्ट शब्दात सांगायचे तर अलिबागचा अर्थ भ्रमरबाग असा आहे. बागेत भुंगे असणारच, ते समृद्धीचे प्रतिक आहे. श्री म्हणजे वैभव, समृद्धी-सुबत्ता. त्यामुळेच अलिबागचे मूळ नाव श्रीबाग आहे, असे म्हटले जाते. असे असले तरी अलिबाग असे संस्कृतप्रचूर नाव ठेवणार्‍याचे खरोखरच कौतुक वाटते आणि हे नाव निश्‍चितच आंग्रे घराण्यातील कोणातरी सिद्ध पुरुषाने ठेवलेले आहे यात शंका नाही. अलिबाग हे नाव जातीय, धार्मिक नाही, तर ते भौगोलिक आहे. भ्रमराचा वावर असणार्‍या नारळी-पोफळींच्या बागा म्हणजेच अलिबाग, हीच अलिबागची खरी ओळख आहे.
      अशा या अलिबागच्या समुद्रात शिवसामर्थ्याची ग्वाही देणारा आणि सरखेलांच्या पराक्रमाची पताका फडकविणारा कुलाबा किल्ला आहे. या कुलाबा किल्ल्यावरुनच या जिल्ह्याचे नाव कुलाबा असे होते. बॅ. ए.आर. अंतुले यांनी १ मे १९८१ रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत रायगड असे जिल्ह्याचे नामांतर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या गडाचे नाव जिल्ह्यास देणे औचित्याचे असले तरी या प्रक्रियेत कुलाबा हे नाव अंधारात लोटले गेले. हे नाव पुन्हा प्रकाशात आणण्यासाठी अलिबाग तालुक्याचे नाव कुलाबा ठेवणे आवश्यक आहे. तसे झाले तरच अलिबागच्या समुद्रात असणार्‍या कुलाबा किल्ल्याचे सामर्थ्य प्रतिबिंबित होणार आहे. कोणतीही नावे न पुसता हा बदल होण्याजोगा आहे. अलिबागचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव अबाधित ठेवणे आपल्या, अलिबागकरांच्या हातात आहे. अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने नकाशावर आलेले शहर आहे. परंतु पर्यटक समुद्रकिनार्‍यावर जाऊन, जमल्यास किल्ल्यात जाऊन मग पुढे काशीद, मुरुड-जंजिरा पाहून आपल्या घरी परततात. अलिबागेत शिरल्यावर पर्यटक देवदर्शनाला लागलेल्या रांगेप्रमाणे दारुच्या दुकानांसमोर रांगा लावून असल्याचे आपल्याला पहायला मिळते, परंतु ही पर्यटक मंडळी अलिबागेतील आंग्रेकालिन मंदिरांसमोर रांग लावताना दिसत नाहीत. हा पर्यटकांचा दोष नाही. हा आपला, अलिबागकरांचा दोष आहे. आपण आपल्या मंदिरांचे पावित्र्य जपत नाही आणि आपल्या मंदिरांची महती आपण पर्यटकांपर्यंत पोहोचवत नाही. त्यामुळेच पर्यटकांना अलिबाग हे केवळ मौजमजेचे ठिकाण वाटते. 
     अलिबाग हे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाचे पावनतीर्थ आहे. इथे त्याच्या स्मृती जागवणार्‍या ज्या-ज्या वास्तू आहेत, मंदिरे आहेत, तेथपर्यत पर्यटकांना नेण्यासाठी एक पर्यटन पथ निर्माण केला गेला पाहिजे. पर्यटन पथ म्हणजे पर्यटकांना फिरण्यासाठी वेगळा रस्ता असा याचा अर्थ काढू नये, तर पर्यटन पथ म्हणजे अलिबागमध्ये कसे कसे आणि कुठे कुठे जावे याचा एक निश्चित मार्ग, टप्प्या टप्प्याने पर्यटकांना अलिबागमधील ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्याचा मार्ग. आज पर्यटक थेट समुद्र किनारी जातात किंवा भरकटल्यासारखे अलिबागमध्ये फिरतात. असे होऊ नये म्हणून कसे कसे आणि कुठे कुठे जावे याचे मार्गदर्शन त्याला झाले पाहिजे आणि त्यासाठी आकर्षक माहिती फलकांची योजनाही या मार्गांवर करण्यात आली पाहिजे. तसे केले गेले तरच अलिबागचे संपूर्ण दर्शन पर्यटकांना होऊ शकेल आणि अलिबागच्या समुद्राइतकाच येथला इतिहास सुंदर, प्रेरणादायी आहे, इथली संस्कृती प्रेरक आहे याची जाणीव पर्यटकांना होईल. यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा