गुरुवार, १२ एप्रिल, २०१२

पिढ्यांमध्ये सेतू असावा संवादाचा

-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉


    आज जागतिक उदारीकरणाच्या काळात ज्येष्ठांबाबत अलगतेची भावना वाढत आहे आणि तरूण पिढीकडून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासूनच ज्येष्ठांचा आदर करण्याची गौरवास्पद परंपरा असल्यामुळे ही परिस्थिती कुटुंब, समाज आणि देशासाठी शुभसंकेत नाहीत.
      आपल्या देशात ज्येष्ठांची संख्या जवळजवळ नऊ कोटी आहे. ८४ टक्के ज्येष्ठांना एकच अपत्य आहे, परंतु ३२ टक्केच आपल्या अपत्याबरोबर राहत आहेत. ही अतिशय निराशाजनक परिस्थिती आहे. गेले ३० वर्षे ज्येष्ठांसाठी काम करणार्या हेल्प एज नावाच्या एका संघटनेने नुकतंच एक सर्वेक्षण केलं होतं. सर्वेक्षणानुसार ६९ टक्के सुना आणि ४० टक्के मुलं घरातील ज्येष्ठांशी असभ्य वर्तन करतात. ५२ टक्के ज्येष्ठ अशिक्षित आहेत, ६६ टक्के आर्थिक रूपाने इतरांवर अवलंबून आहेत. अहवालानुसार ८५ टक्के ज्येष्ठ वैद्यकीय खर्चासाठी इतरांवर अवलंबून आहेत. अहवालात म्हटले आहे की, ९८ टक्के ज्येष्ठ आपल्याबरोबर होणार्या गैरवर्तनाची अधिकाधिक तक्रार करीत नाहीत आणि बिचारे ज्येष्ठ गुपचूप आपल्यावरील अन्याय सहन करीत राहतात. आपल्या देशात ज्येष्ठांची अवस्था कशी आहे, हे समजण्यासाठी हा अहवाल पुरेसा आहे. 
    ज्येष्ठावर होणार्या या गैरवर्तनापाठीमागे अनेक कारणे असू शकतात. यात तरूण पिढीची स्वकेंद्रीत विचारसरणी, महिलांचा अनावश्यक हस्तक्षेप आणि सदोष शिक्षण, घरातील संस्काराचा अभाव इत्यादी कारणे प्रमुख मानता येतील. या कारणांमुळे देशातील संयुक्त कुटुंबे आधीच विखुरली आहेत. संयुक्त चुली विझल्या आहेत. घरांपुढील अंगण छोटं होत गेलं आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ एकाकी पडू लागले आहेत. घरात असूनही ते घरात असल्यासारखे वाटत नाहीत. कित्येक घरांमध्ये तर त्यांना जुन्या सामानाप्रमाणे वेगळ्या खोलीत टाकले जाते, कारण तरूणांना म्हणजेच पती-पत्नीला त्यांची उपस्थिती देखील एक समस्याच वाटते. ज्या ज्येष्ठांनी आपल्या अपत्यांना बोट धरून चालायला शिकवलं, त्यांनी आपल्यापेक्षाही मोठं व्हावं, अशी स्वप्न पाहिली. पण आयुष्याच्या सायंकाळी आपल्या अपत्यांच्या आधाराची गरज भासली, तेव्हा त्यांनी पाठ दाखवली हे कसले दुर्दैव आहे? 
      महानगरे, शहरे यांबरोबरच गावांतही आता ज्येष्ठांची दशा खूपच दयनीय झाली आहे. जेथे एक पिता चार पुत्रांचे पालनपोषण करतो, तेथेच चार पूत्र एकत्रितपणे आपल्या आई-वडिलांची योग्य देखभाल करू शकत नाहीत. पुत्रांकडून त्यांची काळवेळेच्या हिशोबाने विभागणी केली जाते. या तरूण पिढीने ज्येष्ठांच्या उपजीविकेची अशी विचित्र व्यवस्था केली आहे, ही लज्जास्पद गोष्ट आहे. परंतु ज्येष्ठ नाईलाजाने सर्वकाही सहन करण्यास तयार असतात, मग त्यांना घराबाहेर का हाकललं जाईना, ते आपलं दु:ख सहजपणे व्यक्त करीत नाहीत. कधी कधी त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्यांचे दु:ख व्यक्त करतात. कणखर मनाचे ज्येष्ठ आपलं दु:ख हसण्याआड लपवतात.
       ज्येष्ठांना वृद्धाश्रमातही टाकले जाते किंवा त्यांना स्वत:हून ‘वृद्धाश्रमांचा मार्ग पत्करावा लागतो. ज्यांना तोही आधार नाही, त्याला रस्त्यावरच निर्वासितांसारखे जगावे लागते. टाकून दिलेल्या जेष्ठांना संबंधित कुटुंबांकडून पोटगी देण्यासाठीही नियम-कायदे बनवण्यात आले आहेत, परंतु जीवनाच्या सायंकाळी ज्येष्ठांना प्रेम, आपलेपणा आणि आधाराची सर्वाधिक गरज असते, ती गरज केवळ कुटुंबच पूर्ण करू शकते. म्हणूनच या सामाजिक समस्येवर उपाय सामाजिक पातळीवरच शोधावा लागेल. यासाठी तरूण पिढीला आपला दृष्टीकोन बदलावा लागेल. त्यांना सांगितलं जावं की, ज्येष्ठांकडे अनुभवांचा खजिना असतो. ते सुखाचा राजमार्ग असू शकतात. त्यांच्याकडे व्यावहारिक ज्ञानाबरोबरच प्रत्येक संकटाशी तोंड देण्याचा शहाणपणा असतो. त्यांच्या अनुभवांना फायदा घेतला तर तरूण पिढी आपलं जीवन अधिक समृद्ध बनवू शकेल. 
      तरूण पिढीने हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, पैशाचं महत्त्व असलं तरी ते सर्वकाही नाही. म्हणूनच आपल्या तरूणांनी नाती तोडून केवळ पैशाच्या मागे धावू नये. जगण्यासाठी किती पैशांची गरज असते? याशिवाय शिक्षणालाही संस्कारित बनवण्याची गरज आहे, कारण त्याचा स्तर खालावत आहे. सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा र्हास होत आहे. जर मुलांना नैतिकतेचे धडे दिलेच गेले नाही तर त्यांच्याकडे ज्येष्ठांचा आदर करण्याची आणि सदाचाराने वागण्याची अपेक्षा तरी कशी करता येईल?ज्येष्ठ आणि तरूण ही एका कुटुंबाची दोन चाकं असतात. ही दोन चाकं शाबूत असली, तर ते घर कोणत्याही संकटांना ताठ मानेने सामोरे जाऊ शकते. असे कुटुंब स्वत:ला आणि समाजालाही शक्ती पुरवत असते. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये आणि तरूण पिढीमधील विसंवादी सूर दूर होऊन संवादास सुरूवात झाली, तर त्यांच्यापुरते तरी हे जग सुंदर होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा