शुक्रवार, २ सप्टेंबर, २०११

राखीची लगीनघाई

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉

  
   राम... राम... योगगुरु रामदेवबाबांशी राखी सावंतला लग्न करायचेय! एखाद्या वृद्धाला खोकल्याची उबळ यावी तशी सावंताच्या राखीला लग्नाची उबळ येते. पण ठसका लागतो, पळ पळ करणाऱ्या बिचाऱ्या वर मंडळींना. या वर मंडळींत रामदेवबाबा स्वत:हून सामील झाले नाहीत आणि होणारही नाहीत. म्हणून राखीनेच त्यांच्यामागे वरमाला घेऊन धावायचं ठरवलं असावं. आपण म्हणाल, राखी रामदेवबाबांना राखी बांधो नाहीतर लग्न करो, त्यात आमचं काय जातेय? कोणाचंच काही जात नाही; पण एक पेच तर निर्माण झाला ना? राखीने रामदेवबाबांच्या ब्रह्मचर्याला खिंडार पाडायचं ठरवलंय म्हटल्यावर कॉंग्रेसनेही सुटकेचा श्वास टाकला आहे. 
     आपल्याला घाम फोडणार्या रामदेवबाबांना राखी सावंत लग्नाची बेडी घालून माणसाळवणार आहे, याचे काँग्रेसला अप्रूप वाटते आहे आणि समाधानही वाटत आहे. ती विचार करते आहे की, रामलीला मैदानावर रामदेवबाबांच्या उपोषणाचा फियास्को करण्यासाठी दिल्ली पोलिसांना कामाला लावण्यापेक्षा एकट्या राखी सावंतला तेथे पाठवलं असतं, तर कोणतीही जीवित आणि वित्तहानी न करता रामदेवबाबांवर लगाम घालता आला असता. त्यामुळे उपोषण पोलिसी बळाने उधळून लावण्याच्या नाचक्कीपासूनही आपण वाचलो असतो. काँग्रेस चुकीचा विचार करीत नाही, परंतु ती आधीच अविचार करुन बसल्याने चूक सुधारायला तिला वाव नाही. अशा परिस्थितीत राखी सावंतच्या निमित्ताने परस्पर काटा निघतोय म्हटल्याने कॉंग्रेस खुश आहे. ब्रह्मचारी बाबा गृहस्थाश्रमी बनला तर त्याला अनुल्लेखानेच मारता येईल, असा कॉंग्रेसचा तर्क असावा. काहीही असो, राखीच्या सैराट मेंदूत हा रामदेवबाबाशी लग्न करण्याचा विचार कसा आला, हे कळणे सोपे नाही, परंतु याप्रसंगाने पुन्हा एकदा इंद्रदेवाने विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यास पाठविलेली अप्सरा-मेनकेची आठवण आली. काळा पैसा परत आणण्याच्या आणि भ्रष्टाचार संपवण्याच्या मोहिमेत गुंतलेल्या बाबांचं ध्यानभंग करण्यासाठी कोण जाणे कोणत्या आधुनिक इंद्राने राखीकडे हे काम सोपवलं असावं. पूर्वी इंद्र तर एकच होता आणि जगजाहीर होता, परंतु आजच्या अति आधुनिक युगात याचा छडा लावणे सोपं काम नाही. कारण आज आपण ज्याला इंद्र समजत असाल, तोही इंद्राचा डमी असणे शक्य आहे. असंही असू शकतं की, आधी टीव्हीमार्फत स्वत:चं एक स्वयंवर केलेली राखी आताही त्याच मूडमध्ये असावी आणि तिला वाटत असावे की, जो प्रसिद्ध, पण अविवाहित आहे, त्याच्याशी लग्न करुन स्वत:चे एक जग निर्माण करावे. यापूर्वी तिच्या रडारवर आजचे सर्वात हॉट तरुण काँग्रेसी पदयात्री होते. तिने सांगितलं की, आधी ती राहुल गांधी यांच्यावर आसक्त होती आणि त्यांच्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहात होती. परंतु हे चांगलं झालं की, तिच्या वास्तव लवकरच लक्षात आलं की, राहुलच्या मम्मीबरोबर तिची डाळ शिजणार नाही. यानंतर रामदेवबाबांच्या योगाने राखीच्या जीवनावर असा परिणाम केला की, ती त्यांची दिवानी झाली. रामदेवबाबांचं तिला वेड लागलं. हे एकतर्फी प्रेम असलं तरी प्रेमच आहे ना! तिला स्वत:ला किती योग माहीत आहे, हे ती स्वत:च सांगू शकेल, परंतु तिचं म्हणणं आहे की, लग्नाची माला योगगुरुंच्या गळ्यात टाकते, मग पहा. भारतात सौंदर्यवती प्राचीन काळापासूनच योगी आणि संन्याशाकडे आकर्षित होत आल्या आहेत. राखीनेही रामदेवबाबा यांची निवड अशीच केलेली नाही, ती त्यांना सर्वात हॉट मानते. दुसरीकडे, रामदेवबाबाच जाणो, त्यांना या राखीच्या इच्छेबाबत काय वाटते? आपली इच्छा जाहीर करण्यापूर्वी याबाबत रामदेवबाबांचा काय विचार आहे हे राखीने समजून घेतलंच नाही. राखी नावाची कुणीतरी आयटम गर्ल आहे आणि ती तिची आपल्याबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे, हे ऐकून रामदेवबाबांनी काही प्रतिक्रिया दिली नसली, तरी ते मनातून धास्तावलेच असतील. मिकाने तिचा मुका घेतला तर तिने आकांडतांडव केला; पण तिच जर आपल्यासमोर तोंडाचा चंबू करुन आली तर आपण काय करणार? बरं आहे, ती महाराष्ट्रात आहे. आपल्याकडे येईपर्यंत आपल्याला पलायन करता येईल. पलायन करण्याचा आपल्याला सरावही आहे, असे रामदेवबाबा मनातल्या मनात म्हणत असतील. तथापि, राखीलाही माहीत असावे की, रामदेवबाबा काही आपल्या गळाला लागणार नाहीत, त्यामुळे तिच्या यादीतलं आणखी एक नाव काही दिवसाने पुढे आलं तर त्यात नवल वाटणार नाही. राखीला अशी प्रसिद्धी मिळत आहे, त्यामुळे त्याचा फायदा ती उठवतच राहणार आहे. त्यामुळे तिच्या बोलण्याचं टेन्शन रामदेवबाबांनी घेऊ नये आणि वाचकांनीही घेऊ नये. राखीची वन साइडेड स्टोरी चाललेय ती चालू द्यावी, दुसरं काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा