सोमवार, ९ मे, २०११

सोयीचे स्मरण-विस्मरण

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


    विस्मरण ही काही आश्चर्याची बाब नाही, कारण ती आजच्या काळाची देणगी नाही. याची मुळे थेट पौराणिक काळात जाऊन पोहोचतात. मेनकेला विश्वामित्रापासून झालेली कन्या ती टाकून देते, तेव्हा शकुंत पक्षी तिचे रक्षण करतो. कण्वऋषीच्या नजरेस ती पडते, तेव्हा तिला घेऊन ते आपल्या आश्रमात आणतात आणि शकुंत पक्ष्याने तिचे रक्षण केले, म्हणून तिचे नाव ते शकुंतला ठेवतात. ही शकुंतला तिथेच लहानाची मोठी होते. राजा दुष्यंत तेथे आला असता दोघांचे प्रेम होते, तो तिच्याशी गांधर्व विवाह करतो. त्यांच्यात शरीरसंबंधही होतो. ‘मी तुला सन्मानाने घेऊन जाण्यास येईन’ असे आश्वासन देऊन राजा दुष्यंत तेथून जातो. पण, तो काही तिला नेण्यास येत नाही
    शकुंतलेच्या पोटी त्याचा अंकुर वाढत असल्यामुळे कण्वऋषी तिला राजा दुष्यंताकडे घेऊन जातात, परंतु दुष्यंत आपल्या आयुष्यात कधी काळी शकुंतला आली असल्याचे नाकारतो. त्याला तिचा सोयीस्कर विसर पडतो. शकुंतला हिरमुसली होऊन परत कण्वआश्रमात येते. तेथे तिला पुत्र होतो. त्याचे नाव भरत ठेवले जाते. नंतर दुष्यंताचे डोळे उघडतात आणि त्या दोघांना तो आपल्या राजवाड्यात सन्मानाने आणतो. अशी ही ढोबळमानाने मला आठवणारी कथा आहे. शकुंतला आणि दुष्यंताच्या पुत्राच्या भरत या नावावरुनच आपल्या देशाचं नाव भारत पडलेलं आहे. याचा अर्थ, भारत हे नाव ज्याच्यावरुन या देशाला प्राप्त झाले आहे, त्या भरताच्या पित्याच्या विस्मरणाची परंपरा आधुनिक भारतातही कायम आहे. आजही सर्व काही झाल्यावर आजच्या शकुंतलांचा विसर आजच्या दुष्यंताना होतो. त्यामुळे शकुंतलेच्या मातेने तिला जसे टाकून दिले, तसेच शकुंतलांना आपल्या नवजात अर्भकांना उकिरड्यावर टाकावे लागत आहे. हे आधुनिक भरत दुष्यंताच्या भरताप्रमाणे नशिबवान नसल्यामुळे त्यांना स्वतंत्र भारतात अनाथ म्हणून लहानाचे मोठे व्हावे लागते. येथे लग्न करुन शकुंतला आणि दुष्यंत स्वत:चे पप्रंच वाढवत राहतात आणि भरत मात्र ‘लावारिस’पणाचं जीणं जगत राहतात. आधुनिक विस्मरणाचं हे जळजळीत उदाहरण. 
     प्रेमात ‘कुचूक्कू’ करणार्यांनाच विस्मरण होते असे नाही, तर राजकारणातल्या लोकांना तर विस्मरण ही देणगी वाटते. घोटाळे करणार्यांना विस्मरण हे एक प्रकारचे वरदानच असते, त्यामुळे तिहारमध्ये आराम करणारे सुरेश कलमाडी आपल्याला विस्मरण झाल्याचे सांगू शकतात. अर्थात, हा त्यांचा दोष नाही, हा दोष कोणाचाच नाही. कारण विस्मरणाचा जो शाप दुष्यंताला होता, तो आपल्या येथील प्रियकरांना, राजकारण्यांना, सर्वसामान्यांनाही आहे. त्यामुळे प्रसंग येताच ‘मला काही आठवत नाही’ असं म्हणायला उशीर केला जात नाही. हा विस्मरणाचा शाप मोठ्या प्रमाणात नेत्यांमागे आहे. कोणत्या नेत्याला निवडणुकीत विजयी झाल्यावर आपण जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आठवतात? शपथविधी समारंभानंतर त्यांना आपण निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे विस्मरण होते. ‘घर कसे भरावे आणि घोटाळे कसे करावे’ या शीर्षकाची पुस्तके त्यांना चांगली वाटू लागतात. जनताही अशा नेत्यांना वर्ष-दोन वर्ष सहन केल्यावर निश्चय करते की, सार्वत्रिक किंवा मध्यावधी निवडणुकीत त्यांना आपला चांगलाच इंगा दाखवू. जनता त्यांना आपला इंगा दाखवते, परंतु आपल्या विसराळूपणामुळे ती त्यांना पुन्हा निवडून आणते, ज्यांना गेल्या निवडणुकीत आपला इंगा दाखवला होता. 
     यापूर्वी लोक कुठे गेले की, आपला चष्मा, छत्री अथवा सायकल तेथेच विसरुन येत. एका महात्म्याची सायकल चोरीस गेली. शिष्याने सुचवले, ‘महाराज, आज आपण चोरीच्या दुर्गुणावर प्रवचन द्या. चोराने जर ते ऐकले, तर निश्चितच पश्चातापाने तो आश्रमात सायकल सोडून जाईल.’ महात्मा चोरीच्या दुर्गुणावर बोलू लागले तेव्हा ते अचानक व्यभिचारावर आले आणि ताबडतोब आपलं प्रवचन समाप्त केलं. शिष्य चकीत झाले आणि म्हणाले, ‘महाराज, हे काय केलं?’ महात्मा म्हणाले, ‘जेव्हा मी चोरीवरुन व्यभिचाराकडे वळलो, तेव्हा मला आठवलं की, मी सायकल कुठे विसरुन आलो आहे.’ ही एक स्मरण-विस्मरणाची गंमत होती, परंतु हल्ली मात्र लोक वरील तीन वस्तूंबरोबरच आपला मोबाइल, डेबिट-क्रेडिट कार्डही विसरुन येतात. आजकाल मोबाइल देवाच्या कृपेने लोक इतरांचे नंबर डोक्यात ठेवण्याचा त्रास घेत नाहीत. लँडलाईनच्या काळात हे नंबर पाढ्यांप्रमाणे पाठ करावे लागत असत. परंतु मोबाइलमुळे नंबर डोक्यात ठेवण्याची गरज नसली, तरी मोबाइलची बॅटरी उतरल्यावर मात्र माणसाची गोची होते. अगदी शकुंतलेच्या दुष्यंतासारखी त्याची अवस्था होते. त्यावेळी शकुंतलेच्या बोटात घातलेली अंगठी हरवल्यामुळे त्याला तिचे विस्मरण झाले, इकडे मोबाइलची बॅटरी उतरल्यामुळे माणसाला विस्मरण होते. यंत्राच्या आहारी गेलेल्याचे विस्मरण एक वेळ समजू शकतो, पण रोज बदाम तेलाने डोक्याची मालिश करणारे दुसर्याकडून उधार घेतलेले त्याला परत करण्यास विसरतात. बोलल्याप्रमाणे करण्यास विसरतात. दुर्व्यवहार लक्षात ठेवतात, उपकार विसरतात. तक्रार शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहते, सत्काराचे विस्मरण होते. या सर्वाला काय म्हणावे? भरताच्या भारतात विस्मरणाचे पीक असले, तरी जगही याला अपवाद नाही, हेही खरे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा