शनिवार, १४ मे, २०११

अनोखे रक्षा कवच

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


      ताईत. एखाद्याच्या गळ्यातील ताईत बनणे आणि स्वत:च्या दंडाला ताईत बांधणे, यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एखाद्याच्या गळ्यातील ताईत बनणे, म्हणजे त्याचा लाडका असणे आणि स्वत:च्या दंडात ताईत बांधणे याचा अर्थ, आपल्याला कोणाचीही नजर लागू नये, भूतबाधा होऊ नये, याची काळजी घेणे, असा आहे. देवस्थान परिसरात अशा ताईतांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. परंतु तीस वर्षांपूर्वी लोकांकडे गंडेदोरे, ताईत पाहायला मिळायचे, ते हल्ली मात्र पाहायला मिळत नाहीत. गंडेदोर, ताईत बनवणार्या तांत्रिक-मांत्रिकांचे, भगतांचे धंदे मंदावले आहेत. याचे कारण आता लोकांना भूत-प्रेतांची भीती वाटत नाही, हे आहे. तशी भीती वाटूही नये, कारण भीषण महागाईसमोर भूत-प्रेताची काय कथा? अशा परिस्थितीत हायटेक ज्योतिषी व भविष्यवेत्ते टीव्ही आणि टेलिशॉपमध्ये येऊन कधी फेंगशुई टिप्स विकताना दिसून येतात, तर कधी वास्तूशास्त्र समजवताना दिसतात. 
     तसं पहाता टीव्हीवर सर्वात जास्त मार्केटिंग ‘रक्षा कवचाची’ होते. याचा अर्थ आधुनिक काळात ताईताची जागा या रक्षा कवचाने घेतली आहे. हे रक्षा कवच अंगावरही बाळगायची गरज नसते. घराच्या दारावर ते लावले की बस्स. भूतबाधा, नजर लागणे, अपयश या गोष्टींची मग भीती नाही, असे म्हटले जाते. परंतु या रक्षा कवचाचा खरा फायदा काय आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. रक्षा कवच विकणारे मात्र छातीठोकपणे म्हणतात की, हे रक्षा कवच आपल्या जीवनातील सर्व अशुभ बाबींपासून रक्षण करेल. हे रक्षा कवच खरेदी करणारा विचार करतो की, जर टर्म इन्शुरन्समध्ये कोणत्याही रिटर्नची अपेक्षा नसताना दहा-वीस हजार रूपये फुंकता येऊ शकतात तर, रक्षा कवचावर हजार-पाचशे रूपये खर्च करण्यात काय हरकत आहे? कोणास ठाऊक, कोणती दैवी शक्ती केव्हा किमया करेल. परंतु, आता रक्षा कवचवाल्यांसाठी आपल्या मार्केटिंगला मॉर्डनाईझ करण्याची वेळ आली आहे. यात फायदेच फायदे आहेत. उदाहरणार्थ, रेल्वे रक्षा कवचाच्या मार्केटिंगमध्ये सध्या प्रचंड शक्यता आहेत, कारण रेल्वेगाड्या नेहमी रूळावरून घसरत आहेत आणि एकमेकांवर चढत आहेत. हे रक्षा कवच डब्यांच्या हिशोबाने विकता येऊ शकते. म्हणजे एसी डब्याचं रक्षा कवच शंभर रूपयांत आणि जनरल डब्याचं रक्षा कवच दहा रूपयांना. याला स्पेसिफीकही करता येऊ शकतं. राजधानीचं रक्षा कवच विशेष नावाने आणि अभिमंत्रित करून हजार रुपयांपर्यंत विकता येऊ शकतं. 
      आणखी एका रक्षा कवचाची डिमांड मोठ्या प्रमाणात आहे आणि ते आहे विमान रक्षा कवच. विश्वास ठेवा, याची विक्री विमानाच्या तिकिटापेक्षा अधिक होईल. हे रक्षा कवच विमानातून उड्डाण करणारे कमी आणि ज्या गावावरून विमान जाईल, त्या गावांतील लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतील. खरेतर जेव्हा विमान कोसळतं, तेव्हा ते एखाद्या गावावरच कोसळतं. ट्रक, बाईक आणि बस रक्षा कवचाच्या विक्रीचीही अशीच अवस्था असणार. ही वाहनेही केव्हा एकमेकांना धडकतील हे सांगता येणार नाही. 
       कोणाला वाटलं तर, वक्तव्य रक्षा कवचही सिद्ध करून विकू शकतं. एकमेकांविरुद्ध वक्तव्य करणारे नेता असे रक्षा कवच खरेदी करतील. फ्लॅट बुकिंग रक्षा कवचालाही खूप मार्केटिंग स्कोप आहे. नाईट ड्युटी रक्षा कवच आणि कोर्ट-कचेरी रक्षा कवचाची मागणी तर सेल लावूनही पूर्ण करता येणार नाही. आपल्या देशात घरगुती रक्षा कवच तर मुलांचा जन्म होताच सुरु होतात. मुलाला काळं तीट लावणे, अभिमंत्रित गंडादोरा बांधणे हे घरगुती उपाय झाले. पण, मार्केटवाल्या रक्षा कवचाची गोष्ट ही दुसरी आहे. जे आपण पैसे देऊन खरेदी करतो, त्यावर विश्वास जास्त असतो. विज्ञानाने कितीही प्रगती करो आणि सुरक्षाव्यवस्था कितीही कडक असल्याचे कितीही दावे केले जावोत, रक्ष कवचाविना घराबाहेर पडणे धोकादायक आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्यासाठी नव्या प्रकारच्या रक्षा कवचांची विक्री होऊ लागली. तर त्यात काय हरकत आहे? आजचे जीवन धकाधकीचे असल्यामुळे केंद्रीय व राज्याच्या गृहमंत्र्यांनी या रक्षा कवचाच्या विक्रीला प्रोत्साहन दिले, तर सरकारेही संकटात सापडणार नाहीत, हेच खरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा