शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

ठगाला सक्तमजुरी

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉


      रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील लाचलुचपत घोटाळा उघडकीस आला असताना आणि या लाच- लुचपत घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून जिल्हाधिकारी होनाजी जावळे आणि निवासी जिल्हाधिकारी डॉ.जगन्नाथ वीरकर यांच्याकडे बोट रोखले गेले आहे, अशी परिस्थिती असतानाच पनवेलचे लाचखोर तहसिलदार नरहरी महादू सानप यांना रायगडचे विशेष न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांनी लाच स्वीकारल्याप्रकरणी तसेच बेकायदेशीर दारु व अपसंपदा बाळगल्याप्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे ९ महिने शिक्षा सुनावून न्यायाचा वज्राघात कसा असतो, हे समस्त लाचखोर, भ्रष्टाचारी, घोटाळेबाजांना दाखवून दिले आहे. 
       या निर्णयाचे पडसाद जिल्हाधिकारी कार्यालयातील ठगांना निश्‍चितच हादरवणारे ठरले असणार. आता आपली केव्हा पाळी, ही त्यांच्यादृष्टीने कुशंका त्यांच्या मनात भयाचे सावट घेऊन आली असणार यात नवल नाही. गेल्या काही वर्षांत रायगडचा महसूल विभाग म्हणजे राक्षसी भूक बाळगणार्‍या त्यातील ठगांसाठी चराऊ कुरण ठरले आहे. हे ठग देखील सामान्य नव्हे. तलाठी, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, अगदी जिल्हाधिकार्‍यांपासून शिपायापर्यंत ही साखळी असल्याचे आढळून आले आहे, पण हीच साखळी सर्वसामान्यांच्या गळ्याभोवतीचा फास बनला आहे आणि या साखळीने भ्रष्टाचाराची मजबुती वाढवली आहे, ही वस्तूस्थिती आहे. जिल्हाधिकारी आता वैराग्याचा आव आणू शकतात, पण त्यांचे या लाचखोरी प्रकरणात नाव येऊन जिल्हा प्रशासनाची छी थू झाली आहे त्याचे काय? जिल्हाधिकारी कार्यालयातील विनोद लचके या निवासी जिल्हाधिकारी डॉ.जगन्नाथ वीरकर यांच्या स्वीय सहाय्यकाने लाचखोरीचा उच्चांक का आणि कोणाकरिता केला. याचा त्याने तपास यंत्रणेसमोर खुलासा केला आहे. हा खुलासा नीतीमत्तेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा असल्याने रायगड जिल्ह्याचे महसूल खाते काय लायकीचे आहे, याचे उग्र प्रदर्शन घडले आहे. न्यायालय याबद्दल आरोपीला योग्य शिक्षा देऊन त्याला ज्यांनी ज्यांनी लाचखोरीची दिक्षा दिली त्या सर्वांना खडी पाठवायला पाठवेल, असा दृढ विश्‍वास सर्वसामान्यांच्या मनात असतानाच लाचखोर तहसिलदार सानपला सक्तमजुरी सुनावली जाणे हा शुभसंकेत आहे. 
        रायगडच्या विशेष न्यायालयाचे याबद्दल आम्हाला अतिविशेष कौतुक वाटते, अभिमान वाटतो. न्यायालयाने आपली भूमिका चोख बजावून भ्रष्टाचार्‍यांना न्यायाच्या दरबारी अजिबात दयामाया नाही, हे रोखठोकपणे बजावले आहे. तलाठी, तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि रजिस्टर कार्यालय यात भ्रष्टाचाराची जी दलदल निर्माण झाली आहे, त्यात सर्वसामान्य जनता गळ्यापर्यंत अडकते आहे. तिला कोणीही वाली राहिलेला नाही. अशा परिस्थितीत सानपसारख्या लाचखोरास अटकहोते आणि त्याला शिक्षाही होऊ शकते ही बाब सर्वसामान्यांसाठी सुखद आहे आणि आश्‍वासक आहे. आश्‍वासक अशाकरिता आहे की, निदान यापुढे तरी महसूल खात्याला काचद्याचा धाक राहील. यापूर्वी लाचखोरी प्रकरणात तलाठी, तहसिलदार यांची नावे आली होती, परंतु न्यायाची काठी सणकणपणे त्यांच्या पाठीवर पडली नव्हती, मात्र न्यायाची ही काठी जोरदारपणे सानपच्या पाठीवर पडल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे आर्थिक शोषण करणार्‍या सर्व मच्छरांना दुसर्‍यांचे रक्त शोषण करण्याच्याही मर्यादा असतात हे जाणवले असेल. 
       तहसिलदार सानप हे पनवेल येथे कार्यरत असताना त्यांच्याकडे विचुंबे येथील गट नं.१४३/१ या जमिनीचे हक्क सोडण्यासाठी दामू विठ्ठल पाटील व इतर यांचे अखत्यारी शशिकला पै यांनी अर्ज केला होता. त्यावेळी तहसिलदार सानप यांनी त्यांच्याकडे सुरुवातीला काम करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंति ७० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी ५० हजार रुपये २७ जुलै २००६ रोजी देण्याचे ठरले होते. याबाबत शशिकला पै यांनी २६ जुलै २००६ रोजी ऍन्टी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्याकडे सानपविरुध्द तक्रार नोंदवली होती. सानप यांनी पैसे मागितले आहेत याची खात्री करुन घेतल्यानंतर २७ जुलै २००६ रोजी पनवेल तहसिलदार कार्यालयात सापळा रचून तहसिलदार सानप याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. गुन्ह्याचा तपास करताना सानप याच्या पनवेल येथील घरात १८ विदेशी दारुच्या बाटल्या, तसेच १३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. त्याच्या कल्याण, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील बख्तरपूर येथील घरांचीही ऍन्टी करप्शन विभागाने झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे सुमारे ५३ लाख ४३ हजार रुपये तसेच १८ लाखांचे सोन्याचांदीचे दागिने सापडले होते. लाचखोर सानप याच्या कार्यालयात त्याच्याकडे असलेल्या सुटकेसमध्ये १ लाख २३ हजाार रुपये व अंगझडतीत २९ हजार रुपये मिळाले होते. याबाबत समाधानकारक खुलासा त्यावेळी तहसिलदार सानप करु शकला नव्हता. या सर्वाबद्दल न्यायालयाने सानपला त्याची खरी जागा दाखवली आहे, असे म्हटले तर त्यात काहीही वावगे नाही. 
        सार्वजनिक जीवनापासून ते शासकीय पातळीपर्यंत भ्रष्टाचार हा एका शिष्टाचाराचा भाग होत असल्याचे एकीकडे दिसत असले तरी भ्रष्ट व्यक्तीविरुध्द सामान्य नागरिकही आता तक्रारी करण्याचे धाडस करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून अनेक मोठे मासे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. सानप आणि लचके हे त्याचे उदाहरण आहे. सानपला शिक्षा झाली, आता लचके आणि त्याच्या गँगला कधी शिक्षा होईल, याची रायगड जिल्ह्यातील जनता आतुरतेने वाट पहात आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा आणि जनतेचाही विश्‍वास दृढ होऊ लागला आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील ठगांनाही कडक शिक्षेला जावे लागेल, यात दुमत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा