सोमवार, ५ ऑगस्ट, २०१३

मैत्रीची बाराखडी

-उमाजी म. केळुसकर ⬑ दादागिरी ⬉



     रविवारी मैत्रीदिन साजरा झाला. पण त्याच्या आदल्या दिवशी शनिवारी अलिबागेत हॉटेल रॅडिसन आणि त्याच्या आदल्याच्या आदल्या दिवशी मुंबईत विधानपरिषदेत राज्याचे जलसंपदामंत्री व रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे आणि विधानपरिषद सदस्य आ.जयंत पाटील यांच्या मैत्रीचे अनोखे रंग पहायला मिळाले या दोघांची मैत्री अशी तशी नाही तर परममैत्री आहे. तशी कबुलीही आ.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली आहे. पण हा सर्व भूतकाळ आहे. याची जाणीव महाराष्ट्रातील आम आदमीला आहे. रोह्यात ‘आम आदमी’च्या टोप्या दिसू लागल्या आणि तेथे जाहीर सभेतून आम आदमीचे पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडून सुनील तटकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आणि जलसिंचन घोटाळ्यावरुन शेकापचा मोर्चा रोह्यात थडकला, त्यावरुन आ.जयंत पाटील हे कसे खेळीचे आणि परममित्र आहेत याचे दर्शन घडले.
       सत्तेच्या साठमारीत ही परममैत्री कधी परमशत्रुत्वात बदलली हे कळलेच नाही. हे जेव्हा कळले तेव्हा आ.जयंत पाटील यांच्या हातात जलसिंचन घोटाळ्याचे शस्त्र होतं, पण ते ब्रह्मास्त्र मात्र ठरु शकलं नाही, कारण सुनील तटकरे आजही आपल्या पदावर ठाम आहेत. नंतर भाजपचे किरीट सोमय्यारुपी अस्त्रही सुनील तटकरे यांच्यावर अधून मधून चालून येत असते. ते कोणाच्या सुचनेवरुन हे सांगण्याची गरज नाही. आ.जयंत पाटील यांचा सुनील तटकरे यांच्या विरुद्धचा तोफखाना मंद होऊन किरीट सोमय्या यांचा तोफखाना सुनील तटकरे यांच्यावर भडीमार करीत आहे. सोमय्या यांच्या दृष्टीने सुनील तटकरे हेच एकमेव भ्रष्टाचाराचे प्रतिक असावे. त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना सर्व स्वच्छ वातावरण होते आणि इतर राज्यांत जिथे सत्ता आहे, तेथील वातावरण स्वच्छ आहे. सत्तेत असताना कोणीही स्वतःच्या अंगावर भ्रष्टाचाराचा चिखल उडविला नाही. केंद्रात पुन्हा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी येऊ शकली नाही, याचे एक कारण त्या पक्षाचा भ्रष्टाचार तर नाही का? किरीट सोमय्यांना मात्र सुनील तटकरेच दिसतात, यात काहीतरी वेगळा अर्थ आहे. त्यांना कुणीतरी सुनील तटकरे यांच्या अंगावर सोडले आहे. सुनील तटकरे यांना रायगडच्या राजकारणातून हद्दपार करून किरीट सोमय्यांचा किंवा भाजपचा काहीही फायदा नाही. मग फायदा कोणत्या पक्षाचा आहे हे सर्वांना माहीत आहे. असे असले तरी सुनील तटकरे यांची रविवारी किरीट सोमय्या यांना मैत्रीच्या बँड बांधायलाच हवा होता, पण शनिवारी अलिबागेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील महिला पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शन शिबीरात आ. जयंत पाटील यांच्या नावाने बँडबाजा वाजवला. 
      राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे पण राज्यात डावी विचारसरणी मजबूत करण्याचा निर्धार करणारे आ.जयंत पाटील जिल्ह्यात उजव्या आघाडीला सोबत घेऊन निवडणुका लढवत आहेत. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आगामी निवडणुकांत चांगला धडा शिकवेल असा टोला सुनील तटकरे यांनी मारला. विधानपरिषदेत सुनील तटकरे यांच्यावर प्रेम दाखवणार्‍या आ. जयंत पाटील यांच्याविरूध्द अशी घड्याळाची टिकटिक व्हायला नको होती पण महिला आणि पुरूष पदाधिकार्‍यांत जोश यावा म्हणुन ही कानठळ्या बसवणारी टिकटिक झालीच. अर्थात विधानपरिषदेत आ. जयंत पाटील यांनी जे सुनील तटकरे यांच्यावर प्रेम व्यक्त केलं, ते पुतना मावशीचं प्रेम म्हणता येणार नाही, पण ते प्रेम मायावी आणि राजकारणाचा एक भाग होता. ते प्रेम उपहासात्मक होते, हे मात्र खरे आहे. तटकरे यांच्यावरील प्रेम व्यक्त करताना आ. जयंत पाटील यांनी म्हटले, तटकरेंवर आरोप होत आहेत याचे मला दुःख होते. ते माझे परममित्र आहेत. त्यांच्यावर आरोप झाल्याने आमच्या जिल्ह्याची बदनामी होत आहे. ते निर्दोष सुटावेत अशी आमची इच्छा आहे. पण त्यासाठी चौकशी झाली पाहिजे. माजी मुख्यमंत्री अंतुले साहेबांवर न्यायालयात याचिका दाखल होताच त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते पुन्हा सत्तेवर आले. तटकरेंसाठी हा पर्याय आहे. दादा, खरोखरच आमच्या परमित्राला वाचवा असे आ.जयंत पाटील यांनी सभागृहात म्हटले. सोडा, धरा, मारा अशा प्रकारचे आ.जयंत पाटील यांचे भाषण उपसाहात्मक पण ही परममैत्री कशाप्रकारची आहे हे दाखवून देणारे ठरले. 
     सुनील तटकरे दोषी असतील तर त्यांना त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे, पण ज्यांचे पेपरवर्क बिनचूक आहे असे भ्रष्टाचारी बाहेर मोकळेपणाने फिरत आहेत, किंवा ज्यांच पेपरवर्क बिनचूक आहे, अशीही माणसे भ्रष्टाचाराविरुध्द बोंबा मारत आहेत हेही एक वास्तव नाकारता येणार नाही. सुनील तटकरे यांच्यामुळेच रायगडचे नाव बदनाम होत आहे असे नाही, रायगडचे नाव बदनाम होईल अशा अनेक घटना गेल्या काही वर्षांत येथे घडल्या आहेत. जिल्ह्यावर अंकुश ठेवणारे जिल्ह्याचे प्रशासन मग ते जिल्हाधिकारी कार्यालय असो वा जिल्हा परिषद असो यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍नचिन्ह उभी राहिलेली आहेतच. मागील जि.प. अध्यक्षांचे पी.ए. मंगेश जुईकर आणि निवासी जिल्हाधिकार्‍यांचे पी.ए. लचके यांनी दोन्ही संस्थाची जी शोभा करुन ठेवली आहे ती विसरता येणार नाही. या भ्रष्टाचार, घोटाळ्यांमुळे रायगड जिल्हा बदनाम झाला आहे. आ.जयंत पाटील यांच्यावर माजी आमदार मधुकर ठाकूर नेहमी भ्रष्टाचाराचे आरोप करीत असतात ते सर्व आरोप खोटे असतील नसतील पण या सर्व आरोप प्रत्यारोपानेेे वातावरण संदिग्ध बनले आहे. जिल्ह्याचे वातावरण खराब झाले आहे. जिल्हा बदनाम होत आहे. काचेची घरे असल्याने एकमेकांवर दगडफेक केली तर सर्वसामान्यांचे कसे होणार हा मोठा प्रश्‍न आहे. सुनील तटकरे आणि आ.जयंत पाटील एकमेकांवर तोफा डागत राहिले तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत उन्माद संचारेल, उत्साह वाढेल, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळेच मैत्रीच्या धाग्याला यांनी काट्याचे स्वरूप दिले आहे. परममैत्री परमशत्रुत्वात बदलली आहे. परंतु अजून तरी कोणाचीही राजकारणातून हद्दपारी झाली असे वाटत नाही. झालेच तर कोणीतरी वयपरत्वे राजकारणातून निवृत्त होईल, साठीत आपण राजकारणातून निवृत्ती पत्करु असे आ.जयंत पाटील यांनी आधीच जाहीर केले आहे. तशी घोषणा सुनील तटकरे यांनी केलेली नाही. मात्र दोघांचीही साठी एकाच वर्षात असणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे. एकूण काय तर पुढे मैत्री पूर्वीसारखी जुळली नाही, तरी दोघांची साठी मात्र जुळणार आहे. जुलै २०१५ ला दोघांची साठी साजरी करण्याचे भाग्य दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या चाहत्यांना लाभणार आहे. इतकेच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा