-उमाजी म. केळुसकर ⬑ खारावारा ⬉
‘बालगुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चोरी, मारामारी, हत्या यासारख्या घटनांमध्ये किशोरवयीन मुलांची संख्या वाढत आहे. वर्षभरातील गुन्ह्यांधील दोन टक्के गुन्ह्यांमध्ये मुलांचा सहभाग आढळला आहे. गुन्हेगार जन्माने निर्माण होत नाही. मग कोणती कारणे आहेत, जी बालगुन्हेगारी वाढविण्यासाठी उत्प्रेरकाचं काम करीत आहेत? नुकतंच एका टीव्ही वाहिनीवर आठ वर्षांच्या मुलीवर चौदा वर्षीय मुलांनी बलात्कार केल्याचे दाखवण्यात आले होते. ही घटना कुटुंब, समाज आणि देशासमोर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
बालगुन्हेगार अनेक प्रकारच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे दिसून येत आहे. परंतु यात लज्जास्पद गोष्ट अशी आहे की, एकीकडे बालगुन्हेगार तयार करण्यामागे गुन्हेगारी टोळ्यांचा मेंदू कार्यरत असतो, तर दुसरीकडे काही मुले नाईलाजाने या दलदलित अडकतात. गुन्हेगार टोळ्यांच्या भीतीने गुन्हे करीत राहतात. तसेच आपल्या समाजाची बांधणी अशाप्रकारची आहे की, मुलांकडे संशयाच्या नजरेने पाहता येत नाही.
बालगुन्हेगारीचं वास्तव काय? आणि याची मानसिकता काय आहे? यामागचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की, बालगुन्हे करविणाऱ्या टोळ्या अथवा व्यक्तींना शिक्षा कशाप्रकारे दिली जावी. गुन्हेगारांनी बेकायदेशीर कामांत मुलांचा वापर करणे अतिशय चिंताजनक आहे. हा वापर थांबविण्याची गरज आहे.
रस्त्यावरची भटकी मुले (अशी मुले आढळणे हे समाजाचे दुर्दैव) आणि गुन्हेगार टोळ्यांसाठी काम करणारी मुले यांची गुन्हेगारी बाजूला ठेवली तरी कुटुंबाचा आधार असलेली मुलेही गुन्हेगारीत अडकतात, हे भीषण वास्तव हादरविणारे आहे. विशेष मुद्दा हाच आहे की, कुटुंबात राहूनही गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावते तरी कशी? हीच बाब लक्षात घेतली पाहिजे. मुलांची मानसिकता लक्षात घेतल्याविना सुधारणेची आशा बाळगता येणार नाही. मानसोपचारतज्ज्ञांचं याविषयी म्हणणं असतं की, ‘सर्वप्रथम सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, पौगंडावस्थेत मुलांमध्ये सर्वप्रकारचे शारीरिक व मानसिक बदल होत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर विविध प्रकारची बंधने आणि अपेक्षा थोपवू नये. अति बंधनांमुळे कुठेना कुठे
त्यांच्यामध्ये अपराध भावना अंकुरीत होते. यामुळे त्यांच्यात बंडखोरीची भावनाही फोफावू लागते. असेही पाहायला मिळते की, ज्यांचे आई-वडील नोकरदार आहेत, त्यांच्यासमोर अडचणी अधिक असतात. ते मुलांची योग्य देखभाल करीत नाहीत. परिणामी, मुले आणि पालकांत संवाद कमी होतो आणि त्यामुळे मुलांच्या मनात विविध विकृतींचे घर निर्माण होते.
सध्याची जीवनशैली, टीव्ही, कल्चर आणि विभक्त कुटुंबही मुलांना नैतिक व संस्कारहीन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हाणामारी असलेले, हिंसाचार असलेले कार्यक्रम पाहून मुलांमध्ये चिडचिडेपणा निर्माण होतो. यामुळे लहान-लहान गोष्टींवर ती संतप्त होतात. अनेकदा अशा परिस्थितीत ती अतिशय घातक पावले उचलतात. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणे अवघड नाही, फक्त आई-वडिलांनी मुलांना पुरेसा वेळ दिला पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. मुलांचे बदलते वर्तन ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला पाहिजे. आई-वडिलांना मुलांवर अति बंधने न घालता प्रेमाने चांगल्या आणि वाईट गोष्टींबाबत माहिती द्यावी. चांगलं काय, वाईट काय हे त्यामुळे मुलांना समजू शकेल.परंतु दुर्दैवाने यात कुठेतरी पालक कमी पडतात आणि त्यामुळे त्यांना त्याच्या घातक परिणामांना सामोरे जावे लागते.
‘निरीक्षणातून शिकणे’ ही प्राण्यांची सहज प्रवृत्ती आहे. मुले समोर जे पाहतात, जे ऐकतात, त्याचा ठसा त्यांच्या मनावर उमटतो व तसे अनुकरण करण्यास ती प्रवृत्त होतात. आज टीव्ही वाहिन्या, वर्तमानपत्रे, मासिके यातून गुन्हेगारीच्या घटना भडकपणे रंगवलेल्या दिसतात. गुन्हेगारीपासून सावध करण्याचा त्यात आव असला, तरी त्यातून गुन्ह्याचे प्रशिक्षणच मिळते, हे वास्तव आहे. त्या घटनांमुळे होणार्या परिणामांची दखल कोणत्याच प्रसारमाध्यमांत फारशी घेतली जात नाही. आज विविध जाहिराती, प्रसारमाध्यमे याद्वारे अजाण वयात भाराभर ज्ञान मुलांना मिळत असते. काहींचा अर्थ कळतो, तर काहींचा अर्थ न कळताच ते ज्ञान माहितीच्या रुपात त्याच्याजवळ साठून राहते. कार्य, कारण, परिणाम यांची संगती त्यांना लागत नाही. सारासार विचार करण्याची कुवतही या वयात त्यांच्याजवळ नसते. साहजिकच कुतुहलाच्या सहजप्रवृत्तीमुळे साठलेल्या ज्ञानाचा वापर करुन आनंद लुटण्याचा ती प्रयत्न करतात आणि परिणामांची जाणीव नसल्याने फसतात. म्हणूनच कोणत्याही कृत्याच्या परिणामांची जाणीव मुलांना करुन दिली तर नको त्या गोष्टी करण्यापासून ती परावृत्त होतील.
मुले गुन्हेगारीकडे वळण्यास पालकांचे चुकीचे संगोपन कारणीभूत आहे. पालकांकडून दिली जाणारी फाजील लाडाची किंवा अति धाकाची वागणूक, मुलांबाबतच्या उच्च उपेक्षा, मुलांची इतर मुलांशी केलेली तुलना, मुलांना दिले गेलेले अति महत्त्व किंवा अति दुर्लक्ष या साऱ्याचा परिणाम मुलांमध्ये मानसिक विकृती व त्याद्वारे गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यात होतो. यासाठी शहरी व ग्रामीण भागात पालकांचे उद्बोधन होणे गरजेचे आहे. या पालकांच्या वर्गासाठी बालमानसशास्त्र, मुलांचे संवर्धन, बालकांचा आहार, त्यांच्या शारीरिक, मानसिक वाढीस पोषक वातावरण, मुलांच्या नैसर्गिक गरजा, त्यांच्या विविध समस्या इत्यादी अनेक विषयांचा समावेश करता येईल. मुलांना शारीरिक शिक्षा देऊन सुधारता येईल, असा जर मनात भ्रम असेल, तर तो पालकांनी मनातून काढून टाकला पाहिजे. त्यातल्या त्यात चांगली अशी गोष्ट आहे की, विकसित देशांच्या तुलनेत बालगुन्हेगारीबाबत भारताची परिस्थिती अजून चांगली आहे. तरीही बालगुन्हेगारीच्या वास्तवाकडे आपल्याला तोंड फिरवून चालणार नाही. ती संपवण्याच्या दृष्टीने सर्व पातळीवरुन प्रयत्न होणेआवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा