-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉
रायगड हा लढवय्यांचा जिल्हा आहे. येथे छत्रपती शिवाजी महारांजानी क्रांतीची बिजे पेरली, त्यामुळे स्वातंत्र्य लढा असो, वा देशरक्षणाचा विडा असो, रायगडच्या भूमीपुत्रांनी तन-मन-धन आपला सहभाग नोंदविला आहे. रायगडच्या लढवय्यांची ही परंपरा तानाजी मालुसरे, सरखेल कान्होजी आंग्रे ते हुतात्मा भाई कोतवाल, जनरल अरुणकुमार वैद्य अशी आहे. आजचा दिवस, म्हणजे १० ऑगस्ट रायगडकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरला, भारताचे १३ वे लष्करप्रमुख, अलिबागचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांची, पुण्यात ते निवृत्तीचं जीवन जगत असताना १० ऑगस्ट १९८६ रोजी दोन खलिस्तानवादी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. आज या घटनेस ३१ वर्षे होत आहेत. अलिबागमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या इंडस्ट्रियल हायस्कुलचे जनरल अरुणकुमार वैद्य असे नामकरण कोकण एज्युकेशन सोसायटीने करुन त्यांचे स्मरण ठेवले असले तरी अलिबागमध्ये त्यांचे यथोचित शौर्यस्मारक झाले, तर ते रायगड जिल्ह्याच्या शौर्यशाली इतिहासाच्या वैभवात भर घालणारेच ठरेल.
अलिबागमधील इंडस्ट्रियल हायस्कुल या औद्योगिक शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी देशप्रेमाने प्रेरित होऊन भारतीय लष्करात दाखल होतो... १९६५ आणि १९७१ च्या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवतो... १ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६ पर्यंत भारतीय लष्कर प्रमुख म्हणून वावरतो... दोन वेळा महावीरचक्र, एक परम विशिष्ट सेवा पदक, एक अति विशिष्ट सेवा पदक, मरणोत्तर पद्मविभूषण मिळवतो... हे सारेच स्वप्नवत. पण हेच वास्तव होते आणि हे वास्तव रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. २७ जानेवारी १९२६ चा त्यांचा जन्म. वडील श्रीधर वैद्य सरकारी अधिकारी. आईचे नाव इंदिरा तर पत्नीचे नाव भानुमती. त्यांचे शालेय शिक्षण अलिबागनंतर पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन विद्यालयात झाले. एल्फिन्स्टन विद्यालयात उच्च शिक्षण घेत असतानाच त्यांनी १९४५ मध्ये लष्करात कॅडेट म्हणून प्रवेश मिळविला. पुढे त्यांनी लष्करात विविध पदांवर आपली छाप पाडली आणि अखेर ते जनरल या हुद्यावर पोहोचले. जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जीवनप्रवास थांबला निवृत्तीनंतर अवघ्या ७ महिन्यांनी १० ऑगस्ट १९८६ थांबला. अतिरेक्यांच्या गोळ्या झेलत वीरमरण पत्करणारा हुतात्मा हीच त्यांची अखेरची ओळख. आज त्यांचा ३१ वा स्मृतीदिन असल्यामुळे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शरण घेतलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ या नावाने केलेल्या कारवाईचेही स्मरण होणे साहजिकच आहे.
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हा जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या कारकिर्दीतील अत्यंत कठीण आणि निर्णायक प्रसंग होता. स्वत: अरुणकुमार वैद्य यांनी या प्रसंगाचे वर्णन ‘अत्यंत कटू आणि अपरिहार्य परिस्थितीत घेतलेला निर्णय’ असे केलेले आहे. पंजाबमधील खलिस्तान चळवळीने उग्र स्वरूप धारण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात फुटीरतावाद वाढीस लागला. भिद्रनवालेंनी सुवर्णमंदिरात शस्त्रांची मोर्चेबांधणी करून देशाच्या घटनेस आव्हान दिले. सामोपचाराचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. या वेळेस अरुणकुमार वैद्य लष्करप्रमुख होते आणि भिद्रनवालेंच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांवर केलेल्या कारवाईचे आरेखन त्यांनी केले.
ही लष्करी कारवाई सुवर्ण मंदिरावर नसून देशाच्या एकसंधतेस बाधा आणणार्या अतिरेक्यांविरुद्ध होती. ५ जून १९८४ रोजी सुरू झालेल्या कारवाईत प्रथम आपल्या लष्करास हानी सोसावी लागली. भिद्रनवाले गटाची सर्व योजना १९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या आणि ढाक्यात आपल्या सैन्यातर्ङ्गे प्रथम पाऊल ठेवलेल्या आणि खलिस्तान चळवळीस पाठिंबा देऊन लष्कर सोडलेल्या मेजर जनरल शहाबेगसिंग यांच्याकडे होती. आपल्या सैन्याचा अंदाज होता की ङ्गार तर ५०० अतिरेकी असतील, परंतु प्रत्यक्षात २००० हून जास्त अतिरेकी उखळी तोफा मीडियम मशीनगन, ग्रेनेडसह अकाल तख्त आणि हरिमदर सिंगसाहेब यांच्या भवती मोर्चेबांधणी करून होते.
आपल्या सैन्याची हानी होत होती आणि सैन्याने ‘सुवर्ण मंदिरावर’ हल्ला केल्याचा अपप्रचार झाल्याने सर्व शीख समाज सुवर्ण मंदिराभोवती गोळा होऊन आपले सैन्य वेढले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे ऑपरेशन लवकर संपवण्याच्या हेतूने रणगाडे वापरण्याचा ऐतिहासिक आणि दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आणि ७ जूनच्या सकाळपर्यंत सर्व अतिरेक्यांचा खातमा होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. या कारवाईत अकाल तख्तचे जे नुकसान झाले त्यास अरुणकुमार वैद्य यांना दोष दिला जातो; परंतु ते चुकीचे असून भिद्रनवालेंनीच एक प्रकारे अकाल तख्तभोवती शस्त्रे उभी करून त्या पवित्र जागेचा अपमान केला होता, हे सत्य नाकारून चालणार नाही.
या कारवाईमुळे अरुणकुमार वैद्य यांच्याविषयी विशिष्ट समाजात आकस निर्माण झाला आणि या आकसातूनच १० ऑगस्ट १९८६ रोजी निवृत्त जीवन जगणार्या जन. वैद्य यांची जिंदा आणि सुखा या अतिरेक्यांनी पुण्यात हत्या केली. जनरल वैद्य हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर होते आणि त्याआधी चार वेळा हत्येचा प्रयत्न होऊनदेखील त्यांनी संरक्षण नाकारले होते. सदैव देशाच्या संरक्षणाचा विचार करणार्या या सेनानीला आपल्याच देशात आपणच संरक्षण घेणे मान्य नसावे. असा हा सेनानी अलिबागमध्ये बालपणी अलिबागमध्ये वावरला... अलिबागमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले... देशासाठी त्यांनी बलिदान दिले. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या एका शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. पण अलिबागमध्ये त्यांचे कोणतेही शौर्यस्मारक नाही. अलिबागकरांनी त्यांच्या स्मृती जपल्या नाहीत, तर त्यासारखा दुसरा कपाळकरंटेपणा दुसरा नसेल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले तर अलिबागमध्ये जनरल अरुणकुमार वैद्य यांचे शौर्यस्मारक होणे अशक्य नाही. हे शौर्यस्मारकच अलिबागकरांची, रायगडकरांची त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.