शनिवार, २३ जुलै, २०११

आत्मचरित्र लिहायचंय?

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


    सांगतो ऐका! तुम्हाला एखादं आदर्श आत्मचरित्र वाचायचं आहे? थोडी कळ काढा. त्याची सोय होतेय. गेल्या चाळीस वर्षांत लिहिले गेले नाही, असे आत्मचरित्र लिहिले जाणार आहे. १९७० साली, म्हणजे ४० वर्षांपूर्वी ‘सांगत्ये ऐका’ म्हणून हंसा वाडकर यांनी आपल्या आत्मचरित्रातून आपल्या जीवनाचं कटू वास्तव मांडलं. आता ‘बोलतो ऐका’ म्हणून यावर्षी एक नवीन आत्मचरित्र लिहिलं जाणार आहे आणि त्यात कटुवास्तवाऐवजी केवळ आणि केवळ साखरपेरणी असणार आहे. त्यामुळे सुखांताची अपेक्षा असलेल्या वाचकांना गोड गोड वाटणार आहे किंवा गोड वाटून घ्यावे लागणार आहे. पुणेकरांचं लाडकं व्यक्तिमत्त्व आणि भारतातील ‘महान’ व्यक्तिमत्त्व सुरेश कलमाडी हे आपले आत्मचरित्र लिहिणार आहेत. 
     लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’ लिहिलं, तर सुरेश कलमाडी तिहार तुरुंगात आपल्या आत्मचरित्रातून आयुष्याचा गुंता सोडवणार आहेत. त्यांनी गुंता सोडवो अथवा वाढवो, वाचकांच्या हाती तुरुंग परंपरेतील एक पुस्तक पडणार आहे, हे नक्की! पंडित नेहरुंनी तुरुंगातच ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ लिहून खर्या अर्थाने ‘भारताचा शोध’ घेतला. सुरेश कलमाडी यांनी आपले आत्मचरित्र लिहून स्वत:चा शोध घेतला तरी पुरेसे आहे. परंतु ते तसं करतील असं वाटत नाही. कारण आत्मचरित्रात खरं लिहून नागडं व्हायचं नसतं, मग भले आपण समाजात कितीही उघडे पडलेलो का असेना. याच्या टिप्स त्यांना मिळाल्याच असतील आणि खरं सांगायला ते इतके निर्बुद्ध नाहीत. ते तसे असते, तर १६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार त्यांच्याकडून झालाच नसता. तो त्यांना पचला नाही, ही वेगळी गोष्ट आहे. सुरेश कलमाडी सध्या तिहार तुरुंगात आराम करीत आहेत. राष्ट्रकुल घोटाळ्यांचं त्यांच्यावर ओझं असलं, तरी ते तसं अजिबात जाणवू देत नाहीत. तुरुंगवासातील आपला वेळ ते पंचतारांकीत उपक्रम राबवण्यात घालवू शकत नाहीत. कारण ते कैदी आहेत. व्हीआयपी कैदी आहेत, म्हणून ते तिहार तुरुंगाधिकार्यांच्या कार्यालयात बसून चहापाणी पिऊ शकतात. तुरुंगातील इतर कैद्यांशी मनमोकळ्या गप्पा मारु शकतात. पण, तुरुंगाधिकारी तर व्हीआयपी नाहीत ना, त्यामुळे त्या बिचार्या तुरूंगाधिकाऱ्यांची अंदमानला तुरुंगाधिकारी म्हणून बदली केली जाते. 
     कोणाचं केव्हा काय होईल, हे सांगता येत नाही. पूर्वी स्वातंत्र्य योद्ध्यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची, परंतु २०११ मध्ये कलमाडी यांच्या पायगुणामुळे तुरुंगाधिकार्यांची पार्सल थेट अंदमानला पाठवली जाते, यापेक्षा दुसरी कुठची गंमत नसेल. अशा गंमतीजमती कदाचित कलमाडी लिहितील, पण ‘माडी’च्या गोष्टी त्या लिहितील काय हा प्रश्नच आहे. कलमाडी यांना सुरसुरी आली आहे. त्यामुळे ते आत्मचरित्र लिहितीलच. त्यासाठी त्यांनी संगणकासाठी तुरूंग प्रशासनाची परवानगीही मागितली आहे. पण चार-दोन दिवसातच कलमाडी यांनी आपल्याला स्मृतिभ्रंश झाला असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे तसा अहवालच त्यांच्या एमआरआय चाचणीतून मिळाला आहे. त्यामुळे कलमाडी यांनी पूर्ण विस्मरण होण्यापूर्वी आत्मचरित्र लिहावे. तथापि, ते आत्मचरित्रात काय आणि कसं लिहितील याची थोडी जरी कल्पना केली, तरी गंमत वाटते. म्हणून गमती गमतीतच त्यांच्या खर्याखोट्या चरित्राचा पट अलगदपणे उलगडावासा वाटतो. 
     कलमाडी लिहितील, ‘मी जर महाराष्ट्रात जन्माला आलो नसतो, तर कर्नाटकात जन्माला आलो असतो. माझे वडील कर्नाटकातून पुण्यात वैद्यकीय व्यवसायासाठी स्थायिक झाले, म्हणून माझा जन्म पुण्यात झाला. कानडी विठ्ठलु जर पंढरपुरी राहून महाराष्ट्राच्या भक्तीचा मळा फुलवत आहे तर मी महाराष्ट्रात क्रीडेचा मळा फुलवला, यात नवल ते काय? तत्पूर्वी माझे शिक्षण पुण्यातील उच्चभ्रू शाळा-महाविद्यालयात झाले. त्यानंतर मी भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून देशाच्या सेवेसाठी रुजू झालो. १९६५ च्या भारत-पाक युद्धात भाग घेण्याची मला संधी मिळाली. हवाई दलाच्या सेवेत आठ पदकांची मी घवघवीत कमाई केली. ती मला तेव्हा लाखो-कोट्यवधी रुपयांपेक्षा मोठी वाटली. नंतर मात्र माझा दृष्टीकोन बदलला. मी कॉंग्रेसमध्ये आलो. तेथे मी अर्थपूर्ण राजकारण केलं. मी राज्यमंत्री झालो. खासदार बनलो. या दरम्यान मी क्रीडाक्षेत्रात माझा ठसा निर्माण केला. मी डोळस बनलो होतो. मला कळलं होतं की, हजारो कोटींचा भ्रष्टाचार या देशातील नागरिकांना आता नवा राहिलेला नाही. ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायाने आपल्या देशातील उच्चपदस्थ व्यक्ती बिनबोभाट भ्रष्टाचार करू लागल्या आहेत. पण, भ्रष्टाचाराच्या या मांदियाळीत आपल्या महाराष्ट्राचा कोणी नाही याची मला शरम वाटली. म्हणूनच मी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात तब्बल १६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी मी हे सर्व केलं, पण माझी ही सद्भावना कोणी लक्षात घेतली नाही आणि मला थेट तिहार तुरुंगात कोंबलं.’ कलमाडी आपलं अर्ध खरं आणि अर्ध खोटं आत्मचरित्र कसं लिहितील. याची ही एक चुणूक दाखवली आहे. ज्यांना आत्मचरित्र लिहायचं आहे त्यांनी या लेखाचा अभ्यास केला तरी ते कलमाडींपेक्षा भन्नाट आत्मचरित्र लिहू शकतील यात शंका नाही.

सोमवार, ११ जुलै, २०११

सरकारी अधिकारी आणि तणाव?

-उमाजी म. केळुसकर ⬑ ठसा आणि ठोसा ⬉


   सरकारी अधिकारी आणि तणाव? होय, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तणावग्रस्त झाले आहेत. हा तणाव कसला हे त्यांनाच विचारले पाहिजे. तथापि, या तणावामुळे राज्याचे प्रशासन संतप्त झाले आहे. राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी यावर उपाय शोधला आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताणतणावातून मुक्त होण्यासाठी विपश्यना प्रशिक्षण घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्ट्या इत्यादी सवलती देण्यात येणार आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणार्या पायाभूत प्रशिक्षण वर्गात विपश्यना प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील ‘विपश्यना रिसर्च धम्मगिरी इन्स्टिट्यूट’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विपश्यना शिबिरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे परिपत्रक मुख्य सचिवांनी ५ जुलै रोजी जारी केले आहे. ‘यशदा’ व अन्य सरकारी संस्थांमार्फत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांतही विपश्यनेचा समावेश करण्याचा आदेश दिला आहे. मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांचा हेतू प्रामाणिक आहे. विपश्यना प्रशिक्षणही चांगले आहे, पण हे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिक आणि चांगले आहेत का, हा प्रश्न आहे.
     कोणतेही सरकारी विभागाने कार्यालय असो, तेथे कार्यसंस्कृती आहे, असे कुणालाही जाणवत नाही. म्हणूनच सरकारी नोकरांबद्दल चांगले बोलणाऱ्यांची संख्या फारशी आढळत नाही. जनतेची कामे करायचीच नाहीत. तिला हेलपाटे मारत ठेवायचे आणि नंतर मनात आले तर तिचे काम कराचये, ही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खासीयत आहे. त्यामुळे प्रत्येक सरकारी कार्यालयांत पेंडिग फायलींचा ढिग दिसून यतो. लाल फितशाही हा सरकारी कार्यालयांचा आणि अधिकाऱ्यांचा स्थायी भाव झाला आहे. अधिकारी सरकारी वेळेचा त्यांच्या दृष्टीने सदुपयोग खासगी कामासाठी करतात आणि अगदीच काही केले नाही, असे वाटू नये म्हणून काही काम करतात. आपली निष्क्रियता झाकली जावी, म्हणून आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर फायर करतात.
       कर्मचाऱ्यांनाही कुठे कामाची ओढ असते? अधिकारी तसे कर्मचारी. घरी बायकोबरोबर गप्पा माराव्या, तशा कार्यालयांत आपल्या सहकारी मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पांचा फड रंगवतात. कामासाठी आलेली जनता तेथे डोक्यावर हात मारत उभी असते. त्यांचे काम करण्याची या गप्पीष्ट कर्मचार्यांची मानसिकताच असते कुठे? त्यामुळे जनतेला कामासाठी हेलपाटे मारल्याशिवाय तिला तिच्या कामाचे महत्त्व कसे समजणार? सरकारी कर्मचार्यांचे महत्त्व कसे समजणार? सरकारी कर्मचाऱ्यांची दांडगाई इतपतच मर्यादित नसते. त्यांना काम करून देण्यासाठी चिरीमिरीचीही गरज असते. ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे’ हे वाक्य सरकारी कार्यालयांवर एखाद्या सुभाषितासारखं लटकवलेलं असतं, तशीच येथे गरजू लोकं लटकलेली असतात. सदर वाक्याचा बाऊ कोणी करू नये, त्याचा धसका सरकारी अधिकारी, कर्मचारी घेत नाहीत आणि जनतेनेही त्याचा धसका घेऊ नये, असे त्यांना वाटत असते. जर जनतेने कामासाठी चिरीमिरी दिली नाही, तर या सरकारी जावयांची पोटे कशी भरणार? प्रत्येक वेतन आयोगाबरोबर त्यांचे पगार गलेलठ्ठ होत असूनही, ते स्वत:ला गरीबच समजताहेत. म्हणूनच ते खासगी क्षेत्राकडे डोळे लावून बसले आहेत. कामापेक्षा इतर वादात असलेल्या या सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तणावाने ग्रासले हे खरोखरच आश्चर्य आहे. असलाच तर हा तणाव पैशासाठी आहे.
गेल्या काही वर्षात काही सनदी अधिकाऱयांनी खासगी कंपन्यांत गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या पत्करल्या. प्रशासकीय सेवेतील कटकटींना कंटाळून आपण असे केले अशा चोराच्या उलट्या बोंबाही त्यांनी मारल्या. परंतु जनतेला सर्व काही माहीत आहे. काही सनदी अधिकाऱ्यांनी वर्षा-दोन वर्षांच्या रजा घेऊन सेझसाठी भूसंपादन करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या सेवा तितक्या काळाकरिता पत्करल्या. सेझमुळे अशा ‘पैसा हाच परमेश्वर’ समजणाऱ्या अधिकाऱ्यांचं चांगभलं झालं. आपलं ज्ञान, सरकारी गुपितांचा त्यांनी काही दीडक्यांसाठी या कंपन्यांना लिलाव केला आणि पुन्हा आपल्या सरकारी सेवेत परतले. हाही एक प्रकारचा देशद्रोह आहे. त्यामुळे अशा अधिकार्यांना तुरूंगात बसवायला हवे होते, परंतु सेझविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच तुरूंगात बसावे लागले.
      कंपन्यांचे दलाल असलेल्या या सरकारी अधिकाऱ्यांना पकडून भूमीपुत्रांनी त्यांची धिंड काढली, तर ते अयोग्य ठरणार नाही. सर्वच सरकारी अधिकारी, कर्मचारी अकार्यक्षम आणि भ्रष्ट नसले तरी या बदनाम मंडळींमुळे सर्वांचीच बदनामी होत आहे. त्यामुळे भ्रष्ट आणि अकार्यक्षम मंडळींचा ताणतणाव विपश्यनेने कसा दूर होणार आणि त्यांच्यात कार्यसंस्कृती, प्रामाणिकपणा कसा वाढेल हा प्रश्नच आहे.