बुधवार, १५ जून, २०११

वाचन संस्कृतीचा उद्घोष

-उमाजी म. केळुसकर ⬑ पुस्तकवेध ⬉


      समाजमन समृद्ध करण्यात साहित्य संस्कृतीचा महत्त्वाचा वाटा असतो. अगदी रामायण, महाभारतासारख्या धर्मग्रंथांनीही समाजमनावर परिणाम केला आहे. वेद असो, बायबल असो, वा कुराण किंवा अन्य धर्मग्रंथ यांनी समाजमनाला एक डोळस विचार दिला. परंतु त्यातील अविचारांचं काहूर तेवढे अंधपणाने स्वीकारल्यामुळे एक प्रतिगामी शक्ती त्यातून तयार झाली. तथापि, पुरोगामी विचार मांडणारेही कमी झाले नाहीत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी यांनी आपल्या साहित्यातून जो पुरोगामी विचार मांडला, तो समाजमन समृद्ध करणारं जागरण ठरलं. त्यानंतर आधुनिक काळात महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींनी आपल्या साहित्यातून माणूस जागवला. माणूस जागवण्याचे हे कार्य अजूनही चालू आहे. हे कार्य महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘लोकराज्य’ या मासिकाद्वारे गेली ६३ वर्षे चालू आहे. परंतु २१ वं शतक उजाडल्यानंतर ‘लोकराज्य’च्यात अंतर्बाह्य बदल झाला. आधुनिक काळाबरोबर धावण्याची आपली कार्यक्षमताही या मासिकाने सिद्ध केली. लोकप्रेम मिळवलं.
     ‘लोकराज्य’ने आपल्यात बदल घडवताना अनेक प्रयोग केले आहेत. या प्रयोगांनी वाचक संख्या वाढवून वाचन संस्कृतीही फुलवली. याचाच एक भाग म्हणून जून-जुलै २०११ च्या ‘लोकराज्य’ वाचन विशेषांकडे पाहिले पाहिजे. खरोखरच, ‘वाचन: एक अमृताभव’ हे या विशेषांकाच्या मुखपृष्ठावर म्हटले आहे. त्यातून हा अंक म्हणजे अलिबाबाची गुहा आहे, याची जाणीव होते. ‘तिळा तिळा दार उघड’ असे म्हणून मुखपृष्ठ पालटावे आणि साहित्याच्या माणिक प्रदेशात शिरावे, अशी अवस्था लोकराज्यमुळे होते. या माणिक प्रदेशाला दिग्गजांच्या साहित्य रत्नांनी समृद्ध केले असून, त्यातून वाचकांना निश्चितच एक वेगळी दृष्टी मिळते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘वाचन संस्कृती जोपासताना’ या लेखात ‘दिसामाजी काहीतरी लिहावे| प्रसंगी अखंडित वाचित जावे॥या समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकातील दोन ओळी उद्धृत करून म्हटले आहे की, एक नीतीवान, समर्थ आणि राष्ट्र उभारणीत छोटे-मोठे योगदान देणारा जबाबदार नागरिक घडवायचा असेल तर केवळ ‘माहिती संपन्न’ असून चालणार नाही, तर ज्ञानसंपन्न बनावे लागेल, ज्ञानी व्हावे लागेल आणि यासाठी अर्थातच वाचनाला दुसरा कोणताही पर्याय नाही. वाचनाची श्रीमंती या लेखात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही अशीच भूमिका आहे.
     अरूण टिकेकर, दिनकर गांगल, गंगाधर पानतावणे, कुमार केतकर, डॉ. सदानंद मोरे, सचिन परब, हरी नरके, डॉ. मंगला आठलेकर, प्रज्ञा पवार, रा.रं. बोराडे, विजया राजाध्यक्ष, वसंत आबाजी डहाके, अरूण साधू, नंदिनी आत्मसिद्ध, निळू दामले, वि.वि. करमरकर यांचे लेख एकंदरित साहित्य संस्कृतीचा धांडोळा घेणारे आहेत यात वादच नव्हे, परंतु त्यांच्या लेखनातून सामाजिक जाणीवांचा विस्तारही होताना दिसतो. मानवी मूल्ये, बदलते जग, भाषा आणि वाचन या चतुसूत्रीचे मंथन या लेखकांनी आपल्या लेखनातून केले आहे. ज्ञानाच्या ज्या ज्या वाटा आहेत, त्यांचे दर्शन प्रत्येक लेखातून घडले आहे. सर्वंकष वाचनाची गरज, ज्ञानविश्वात फेरफटका, युवक वाचतील तर देश वाचेल, संत साहित्य, स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल, समग्र परिवर्तनाच्या दिशेने, जुने जाऊ द्या मरणालागूनी, कोशांचा धांडोळा, आमचं ‘विचार’धन, कवी आणि कविता, मराठी कादंबरीचे न्यून, वाङ्मयीन नियतकालिके, नवे शिक्षण-नव्या दिशा-नवे ग्रंथ, व्याकरण आणि भाषा व्यवहार, अक्षर-कल्पवृक्षाचा बहर, वेब विश्वातील मराठी, सफर मराठीच्या अनुवादविश्वाची, वाचन हा ज्याचा त्याचा प्रश्न, शासकीय ग्रंथ प्रकाशन विश्व इत्यादी लेखांतून एक साहित्य संस्कृतीविषयी परिसंवादच घडला आहे. या परिसंवादातील सूर निराशेचा नाही. ‘कोण म्हणतो वाचन कमी झाले आहे?’ असा खणखणीत सूर या दिग्गज साहित्यिकांनी आपल्या लेखांतून लावला आहे, हे महत्त्वाचे आहे. ‘लोकराज्य’ या ताज्या अंकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात प्रकाशन संस्था आणि त्यांच्या वाचकप्रिय पुस्तकांबद्दलचे लेख. सुनील मेहता यांचे मेहता पब्लिशिंग हाऊस, बाबा भांड यांचे साकेत प्रकाशन, अरूण पारगावकर यांचे प्रतिमा प्रकाशन, उल्हास लाटकर यांचे अमेय प्रकाशन, साधना ट्रस्टचे साधना प्रकाशन, मकरंद कुलकर्णी यांचे साहित्य प्रसार केंद्र, भागवतांचे मौज प्रकाशनगृह, दिलीप माजगावकरांचे राजहंस प्रकाशन, भटकळांचे पॉप्युलर प्रकाशन, तसेच लोकवाङ्मय गृह, ग्रंथाली यासारख्या प्रकाशन संस्थांची आणि त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांची माहिती निश्चितच वाचकांची अभिरूची वाढविण्यास मदत करणारी आहे. मराठी प्रकाशन विश्वात सरस-निरस साहित्यकृती पुस्तक रूपाने बाहेर पडत आहे. जे सरस आहे, त्याला वाचकवर्ग मिळतोय आणि निरस आहे, त्याची रद्दी होतेय. पण प्रकाशन विश्व हा रद्दीचा कारखाना नाही, ते वाचन संस्कृती जोपासण्याचे मंदिर आहे. या मंदिरात घंटानाद करण्याचे कार्य ‘लोकराज्य’ने केले आहे.
     ‘लोकराज्य’ मासिकाचा उद्देश सरकारी मुखपत्र एवढेच नाही, त्यातून समाजमनावर साहित्य संस्कारही चांगल्या प्रकारे करता येतात, हे मात्र या वाचन विशेषांकाच्या उदाहरणावरून मान्य करावेच लागेल. या ‘लोकराज्य’ वाचन विशेषांकाबाबत मुख्य संपादक विजय नाहटा यांनी म्हटले आहे की, ‘सर्वसामान्य वाचकाला एक दिवा दाखवावा, दिव्याने दिवा उजळत जावा आणि त्या प्रकाशात सारा महाराष्ट्र उजळून निघावा याच भावनेने मासिकाच्या वाचन विशेषांकाची निर्मिती करण्यात आली आहे.’ विजय नाहटांचे हे म्हणणे पूर्णपणे योग्य आहे याची प्रचिती या अकांचे वाचन करणार्या प्रत्येकाला येईल, यात शंकाच नाही.