-उमाजी म. केळुसकर ⬑ रायगडचा डंका ⬉
रायगड जिल्ह्यात भात पिकते पण भाजप मात्र येथे केशराची शेती पिकवण्यास उतरली होती, शिवसनेने विकासाचं भगवं वादळ निर्माण करण्याचा शब्द दिला होता, त्यामुळे रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिकी निवडणुकीत परिवर्तन होणार आणि सत्ताधारी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विरोधी बाकावर बसावे लागेल, असा एक्झीट पोल राजकीय विचारवंतांनी जनमनात पसरविला होता, पण गुरुवारी झालेल्या मतमोजणीनंतर पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हा परिषदेच्या सत्तासनावर एंट्री झाल्यामुळे सर्व राजकीय भाष्यकार उताणे पडले आहेत. किंबहुना त्यांना अनपेक्षित निकालांनी जिल्ह्यातील मतदारानी अक्षरश: उताणे पाडले आहे. असे असले तरी जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या विजयी शिलेदारांनीही आपण जनतेचे विश्वस्त आहोत, हे लक्षात घेऊन आपापल्या खात्यांना न्याय दिला तर निश्चितच रायगडच्या ग्रामीण विकासाची गंगा शिवगंगेप्रमाणे धो-धो वाहू लागेल आणि जनतेलाही आपण खरोखरचे मतदार राजा आहोत, याबद्दल खात्री वाटेल.
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या राज्यातील ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मंगळवार, २१ फेब्रुवारीला कोण बुडणार आणि कोण तरणार यावर शिक्कामोर्तब झाले आणि गुरुवार, २३ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांवर आणि पंचायत समित्यांच्या ११८ जागांवर कोण निवडून आले, हे मतमोजणीअंती जाहीरही झाले. निकाल अपेक्षित-अनपेक्षित असेच होते. शिवसेना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असेल असा अहवाल गुप्तवार्ता विभागाचा होता, राजकीय विचारवंतांचा गुप्तवार्ता विभागही काही वेगळे सांगत नव्हता. त्यामुळे शिवसेना जोशात होती. पण या जोशाला शेतकरी कामगार पक्षाने अटकाव करुन शिवसेनेला दुसर्या क्रमांकावर जखडून ठेवले आणि आपण प्रथम क्रमांकाचा मान मिळवला. रायगड जिल्हा परिषदेच्या २३ जागांवर शेकापने आपली मोहर उमटविली आहे. २०१२ च्या निवडणुकीत शेकापने १८ जागा मिळविल्या होत्या, तर त्याआधीच्या जिप निवडणुकीच २६ जागा मिळविल्या होत्या. म्हणजेच गेल्या निवडणुकीत शेकापला ८ जागांचा फटका बसला होता, तो ५ जागा वाढवून यावेळी शेकापने भरुन काढला आहे. त्यावेळी शेकाप-शिवसेना-आरपीआय अशी महायुती होती. या महायुतीतील शिवसेनेने तेव्हा १४ जागांवर विजय संपादन केला होता, या वेळी मात्र जिल्ह्यात शेकाप-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी आघाडी होती. शिवसेना आणि भाजपने आपल्या वेगळ्या चुली मांडून ही निवडणूक लढविली. त्यात शिवसेनेचा फायदा झाला आणि शिवसेनेने १८ जागावंर विजय संपादन केला, त्यांच्या ४ जागा वाढल्या आहेत. २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने २० जागा मिळवून आपण जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे दाखवून दिले होते. त्यापूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला १४ जागा मिळाल्या होत्या. २०१७ च्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस तिसर्या क्रमांकावर फेकली जाऊन १२ जागांवर घसरली. यावेळी तिला ७ जागांचे नुकसान झाले आहे. गेल्यावेळी ७ जागा असलेली कॉंग्रेस ३ जागांपुरती मर्यादित झाली असून ४ जागांचे नुकसान तिला सोसावे लागले आहे. यावेळी ती काही ठिकाणी शेकाप-राष्ट्रवादीबरोबर तर काही ठिकाणी शिवसेनेबरोबर, त्यामुळे या राष्ट्रीय पक्षाची न शिजलेली खिचडी बनली. ती जिल्ह्यातील मतदारांना पचलीही नाही. २०१२ ला भाजपने १ जागा मिळवून जिपमध्ये खाते खोलले होते. यावेळी तीन जागा मिळवल्या आहेत. पंचायत समितींमध्येही १५ पैकी ९ पंचायत समितींवर शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपला रायगड जिल्ह्यात नेत्रदीपक कामगिरी करता आली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जिल्ह्यात गाजराची पुंगी वाजवून गेले, तरी गाजर असो की गाजर गवत असो, ते कापायला विळाच उपयोगी पडतो हे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील, आ. धैर्यशील पाटील, आ. बाळाराम पाटील, आ. पंडित पाटील यांनी आणि शेकापच्या अढळ अशा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले.
रायगडचे राजकारण पूर्णता वेगळे आहे, हे सातत्याने दिसून आले आहे. असे असले तरी या राजकारणाला कलाटणी देण्याची सुवर्णसंधी भाजपकडे होती. पण रायगडवर लादलेले पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या रुपाने भाजपने आपली जिल्ह्यात छाटणी करुन घेतली. रायगड जिल्ह्याच्या विकासाबद्दल आणि येथील भूमीपुत्रांबद्दल अनास्था असलेला पालकमंत्री येथील जनतेने प्रकाश मेहता यांच्या उदासिन कार्यकर्तृत्वाने जनतेच्या संतापाचा विषय ठरले होते. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा संताप पोहोचूनही त्यांची या जिल्ह्यातून उचलबांगडी झाली नाही. या सर्वाचा परिणाम रायगड जिल्ह्यावर झाला आणि त्याचे परिणाम भाजपला भोगायला लागत आहेत. ३ जागा मिळाल्या म्हणून भाजप स्वत:ची पाठ थोपटून घेईल, पण त्यांनी ४० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, हे पाहता भाजपने स्वत:चीच फसवणूक करुन घेतली हे लक्षात येते. रायगडचा पालकमंत्री सक्षम असता तर रायगडचे राजकारण हे राज्यात पूर्णत: वेगळे आहे, हा समज त्यांना दूर करता आला असता.
राष्ट्रवादीच्या राजवटीत तत्कालिन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी जिल्ह्याचा कायम संपर्क राखला. त्यांच्याबाबत कितीही वाद-प्रवाद असले तरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ते सक्षमपणे सांभाळत होते. औटघटकेसाठी आलेल्या सचिन अहिर यांनीही हे पालमंत्रीपद सक्षमपणे साभाळले. कॉंग्रेसच्या राजवटीतही पालकमंत्र्याबद्दल कोणाची तक्रार नव्हती. परंतु विद्यमान पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्याबद्दल मात्र तक्रारींची कतार आहे. यामुळे जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते हतबल झाले आहेत. पण त्यांना बळ देण्याचे आवश्यक काम पक्षश्रेष्ठींनी केले नाही. पालकमंत्री जर वेळीच बदलेले असते तर कदाचित आज जे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत चित्र दिसते आहे ते रायगड जिल्ह्यात दिसले असते.
जिल्ह्यात पालकमंत्र्यांची ही उणीव केंद्रिय मंत्री अनंत गीते यांनी भरुन काढली. पालकमंत्री प्रकाश मेहता नाहीत तर अनंत गीते आहेत, असे वाटावे, अशी परिस्थिती या जिल्ह्यात निर्माण झाली आहे आणि त्याचाच फायदा या निवडणुकीत शिवसेनेला मिळाला आहे. शिवसेनेला रायगड जिल्हा परिषदेत यावेळी सत्तास्थानी येता आले नसले तरी तिला सत्ता नवीन नाही. जिपमध्ये शिवसेनेने अध्यक्षपदही अनुभवले आहे. २०१२ साली शेकाप-शिवसेना-आरपीआय महायुती सत्तास्थानी होती, त्यानंतर शिवसेनेला बाजूला सारुन शेकाप-राष्ट्रवादी असं समीकरण जिपच्या सत्तास्थानी आलं. या समीकरणाला यावेळी आपण भुईसपाट करु असे शिवसेनेला वाटले होते. अशा परिस्थितीत शिवसेना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर येणार हे भाकित जरी खोटे ठरले असले तरी शिवसेनेने १८ जागावर विजय संपादन करुन जिल्ह्यात दुसर्या क्रमांकाच पक्ष बनण्याचा मान मिळवला आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेकाप-राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हा परिषदेतील सत्तास्थानावर शिक्कामोर्तब झाले आहे, त्याबरोबरच विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेलाही संधी मिळाली आहे. आपापल्या संधीचे सत्ताधारी आणि विरोधक कसे सोने करणार हे लवकरच दिसून येईल. पण सत्ताधारी आणि विरोधकांनी स्वत:चे सोने करु नये, तर सत्ता आणि विरोधही रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी राबवावा, हीच जिल्ह्यातील जनतेची मागणी आहे. या मागणीचा पाठपुरावा योग्यरित्या झाला नाही तर यावेळी ‘नोटा’ या बटनाचा मर्यादित वापर झाला, तो पुढच्या निवडणुकीत अमर्यादित वापर होईल आणि त्याने सर्वच पक्ष अडचणीत येतील, हे आत्ताच लक्षात घ्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा